MH 12 AQ 6699

Submitted by बेफ़िकीर on 9 November, 2014 - 06:58

(सत्यकथा)

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!

सुमारे २००१-०२ ची घटना आहे ही! मोबाईल फोन्सचा सुळसुळाट झालेला नव्हता. मी घरून काम करायचो. सकाळी सव्वा नऊ वाजता घरातला फोन खणखणला. त्यावेळी घरच्या लँडलाईनवर येणारे ९९ टक्के फोनकॉल्स माझ्यासाठी असल्याने मी उचलला आणि हॅलो म्हणायच्या आधीच कानावर आवाज पडला.

"कटॅकॅर?"

माझ्या आडनावाची अनेक भ्रष्ट रुपे आजवर ऐकत आलो आहे. हे रूप देणारा माणूस होता व्ही व्ही सत्यनारायणा! कोकाकोला अमीनपूर (हैदराबाद) चा स्टोअर इन चार्ज! कस्टमरकडील ऑपरेशनल लेव्हलपैकी दोन नंबरचा महत्वाचा माणूस!

"येस सर?"

"टँकर भेजेगा?"

"हां भेजता हूं ना सर?"

"तो भेज दो! और शामतक आना होना"

"शामतक? शामतक कैसे आयेगा सर? ५५० किलोमीटर्स है"

"तो कबाता?"

"कल दोपहरतक आयेगा"

नै नै! नै चलता!"

"सर आप जरा अपना अ‍ॅलोकेशनका फाईल देखिये ना? हमे कमसे कम फॉर्टी एट अवर्सका नोटिस देना चाहिये आपने"

"ऐसे अ‍ॅलोकेशनके फाईलसे प्लॅन्ट नै चलता कटॅकॅर? सुब्बे आता क्या?"

ऑर्डर प्रेस्टिजियस होती. सोडणे जीवावर आले होते. मी म्हणालो......

"मै अभी आज दोपहरतक रवाना कर देता हूं!"

"यहां कबाता?"

"कल ग्यारा बजेतक आना चाहिये सर"

"एक काम करो, भेजही दो! मै दुसराभी मंगवाके रखता! अगर वो पैले आया तो तुम्हारा परसो खाली होगा. फिर डिटेन्शन चार्जेस का ड्रामा नै चाहिये"

"ठीक है सर"

डिटेन्शन वेव्ह ऑफ करणे माझ्या अधिकारात सहज येत होते. पण ही असली वर्क प्रेशर्स नेहमीच असायची. जितका काळ मी नोकरी केली त्यातील कोणताही कालावधी 'काहीही पेटले नाही' असा नसायचा.

मी सगळी कामे सोडून पहिला प्लँटला फोन लावला. शहानेच उचलला.

"शहा?"

"बोला साहेब! छत्तीस स्टॉक आहे, बाहेर गणेश आलाय, तृप्ती कालपासून उभाय आणि आत्ता जे एअर येतोय"

"शहा, एकही टँकर भरू नका त्यातला, पहिला आपला एक टँकर अमीनपूरसाठी भरा! आधी क्वॉलिटीला सांगा! आज इन्टरनल रिजेक्शन झाले तर अख्खा समर वाट लागेल साऊथमधून"

"टँकर कुठेय साहेब आपला? सगळे गेलेत कुठेकुठे"

"शहा, चारपैकी एक टँकर तर येईल की नाही"

"बघतो, मग तृप......"

शहाच्या 'तृप्ती' ह्या शब्दाचा अर्धवट भाग कानात जाईपर्यंत मी फोन आपटलेला होता आणि दुसरा फोन नॉईडाला लावलेला होता. तो चंदरने उचलला, उचलला म्हणजे त्याचेच एक्स्टेंशन डायल केले होते मी!

"चंदर?"

"मॉर्निंग सर"

"मॉर्निंग! एक अर्जंड डी ओ है!"

"मेल भेजदो सर"

"अरे भेजरहा हूं! लेकिन फोनपे बात इसलिये कर रहा हूं के डीओ अर्जंट है, जैसेही मेल आती है, बनादेना"

"रन डाऊन लगाने जा रहे है मोहनजी"

"वो कितना टाईम चलता है?"

"एक घंटा कमस्सकम"

"तो साडे दस बजे तो बनाओगे?"

"हां हां पहले भेज तो दीजिये?"

तोही फोन आपटला.

तिसरा फोन डिस्टिलरी हेडला लावला.

"हॅलो मते साहेब? कोकला अ‍ॅप्रूव्ह होईल ना गाडी?"

"आम्ही कधीच रिजेक्ट नाही करत! साबणे करतात रिजेक्ट!"

"अहो हो पण आजचं सँपल काय म्हणतंय?"

"नेलंय आत्ताशीक आतमध्ये त्यांनी. कुठे पाठवायचीय गाडी?"

"अमीनपूर!"

"झाले वाटतं जागे समर आल्यावर"

"काय करणार! प्रोसेस चेंज नाही ना काही?"

"नाय नाय परवाच चारकोल बदललाय"

"ठीक आहे साहेब"

तो फोन ठेवला आणि अर्थातच चौथा फोन साबणेंना लावला.

"सर आज अमीनपूर आहे!"

"अमीनपूर? असे सकाळी सकाळी धर्मसंकटात नका टाकत जाऊ कटककर"

साबणे मोठ्या मनाचा, चांगल्या स्वभावाचा, मिश्कीलपणे बोलणारा आणि तज्ञ माणूस! नेहमी सहकार्य करायला तयार! क्वॉलिटीचा हेड!

"साहेब आजच्या दिवस सँपल थ्रू होऊदेत"

"आता जी सी समोर नारळ फोडूनच घालतो सिलिंडर आतमध्ये"

दोघांनी हासत हासत फोन ठेवला आणि पाचवा फोन ट्रान्स्पोर्टरला लावला.

ट्रान्स्पोर्टर मेहताने फोन उचलला.

"मेहताशेठ?"

"बोला की साहेब!"

"टँकर घ्या आतमध्ये! अमीनपूर आहे. आणि उद्या सकाळी गाडी पोचवायला हवीय!"

"टँकर एकबी नाही साहेब!"

"म्हणजे? गेले कुठे?"

"चाकण, बिलासपूर.... मारुतीचा त्या ह्याला ... कुठं ते.... जगदंबा... कोईंबतूर आणि १२५६ खोललाय"

"तो खोललाय तो बंद करा आणि आत घ्या"

"ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ! असं कुठं होतंय का साहेब?"

"मेहता हसायची वेळ नाहीये! अमीनपूरची ऑर्डर मिळत नाही एक तर!"चाकणचा येईल की?"

"तरी दुपार उजाडेल! तुम्ही घेता का बोलून चाकणच्या पार्टीशी? लवकर खाली करा म्हणाव"

फोन आपटला.

उगाचच सहावा फोन चाकणच्या पार्टीला करावा लागला. तिथे कल्याण होता. हा कल्याण बसून जगाचे कल्याण करायचा.

"हॅलो कल्याण?"

"मॉर्निंग सर"

"मॉर्निंग! ६६९९ आहे ना?"

"तोच लावलाय सर पहिला"

"किती वेळ झाला?"

"हे काय होत आला खाली! वेट करून धाडतो"

मला इतकी शुभबातमी खरंच अपेक्षित नव्हती. पुन्हा मेहतांना फोन केला. हा सातवा फोन!

"मेहता ६६९९ निघतोय चाकणहून!"

"अहो ते म्हन्तात नुस्तं निघ्तोय म्हणून! चार चार तास खाली क"

"मेहता तुम्ही मी सांगतोय ते ऐका फक्त! ६६९९ जवळपास रिकामा झालेला आहे. तो आत्तापासून चौथ्या तासाला प्लँटच्या वेब्रिजवर उभा पाहिजे"

"ह्यॅ ह्यॅ ह्यॅ"

"मेहता हसू नकाऽऽ! "

"नाय नाय आणतो की लगेच"

सातवा फोन संपला आणि आठवा फोन लावला तो बॉसच्या एक्स्टेंशनवर!

"सर मॉर्निंग"

"हां मॉर्निंग! क्या हुवा कल तृप्ती निकलाही नही क्या?"

"आज निकलेगा सर!"

"अरे उसका फोन आ रहा है यहांपर"

"नही नही आज निकलजायेगा सर, बीचमे अमीनपूर का शेड्यूल आया है"

"अमीनपूर?"

"जी सर"

"अरे तो मेक शुअर हां यू डोन्ट लूज दॅट शेड्यूल! आय अ‍ॅम टेलिंग यू कटककर! डिव्हीजनसे अमीनपूरके लिये इतना झगडा किया है, अभी अगर माल नही देंगे तो वुई विल हॅव नो फेस! आय डोन्ट वॉन्ट टू कट अ सॉरी फिगर! और उस पागल साबणेको बोलो आज सँपलका ड्रामा मत करना करके! मतेसे बात हुवी क्या?"

"हां सर सब होगया!"

"ठीक है, कीप मी पोस्टेड"

"सर एक बार चंदरको आपभी वही के वही बोलदेंगे क्या डी ओ अर्जंट है करके?"

"मेल भेजा क्या?"

"अभी जस्ट वही भेज रहा हूं!"

"तो मार्क अ कॉपी टू मी अल्सो, आय विल फॉरवर्ड इट टू हिम अगेन"

"येस सर"

हा फोन आनंदात ठेवला आणि फोन वाजला. पुन्हा सत्यनारायणा!

"कटॅकॅर"

माझ्या पोटात गोळा आला. काँपीटिटरचा टँकर येतोय म्हणून ऑर्डर कॅन्सल झाली का काय?

"हां जी सर?"

"प्रॅक्स एअर का टँकरभी कलही आयेगा बोलता है! तुम्हारा पक्का आता ना सुब्बे?"

"सर सुबह मतलब ग्यारा बाराके आसपासही आयेगा"

"कटॅकॅर तुम समझता नही है क्या? एक टँकर भरके अमीनपूरके बाहर खडा रहनेको होना सीझनमे! तुम्हे फकत ऑर्डर चाहिये. टाईमपे माल कौन देगा?"

आता माझी सटकली. ह्या ऑर्डर्स सुरू होण्यासाठी मी हैदराबादला चकरा मारलेल्या होत्या. हा सत्यनारायणा मला नुसता बसवून ठेवायचा अनेकदा! तेव्हा अगदी माज करायचे. आज स्वतःची अवस्था वाईट आहे तरी माजच करतायत? मीही सुनावले त्याला.

"साब मै दो सालसे चक्कर काटरहा हूं अमीनपूर और मौला अली के! मेरेको विजयवाडा और चित्तूरकेभी ऑर्डर मिले लेकिन आपका नही मिला. आज आप मेरेको एक दिनका भी समय नही देंगे तो ये बराबर है क्या?"

ह्या लोकांशी बोलून आपलेही हिंदी बिघडते.

"वो सब नै मालूम! गाडी भेजो! और मेरेको टँकर का नंबर, ड्रायव्हर का नंबर ये सब बताओ"

"ड्रायव्हरके पास मोबाईल नही है साब! वो बीचबीचमे मेरेको फोन करेगा तब मै आपको बोलदुंगा!"

"कुछ गडबड होगया तो अमीनपूर भूलजाओ इस सीझनमे!"

हा फोन त्याने आपटला.

अमीनपूर विसरणे म्हणजे सर्वाधिक प्रॉफिटेबल बिझिनेस विसरणे! शिव्या खाणे! नावावर कोणतेतरी नकोसे लेबल वर्षभरासाठी लावून घेणे!

मी सगळे सोडून नेटकॅफेत धावलो. धडाधडा नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये डी ओ बनवली. इन्टरस्टेट ट्रॅन्झॅक्शन असल्याने टॅक्सेशन दहावेळा तपासले. दिली ईमेल पाठवून! नेट कॅफेच्याच बाहेर बूथ होता त्यावरून आता माझी पुन्हा फोनाफोनी सुरू झाली. सत्यनारायणाला तेथूनच फोन करून त्या बूथचा नंबरही त्याला एक पर्यायी नंबर म्हणून देऊन ठेवला. तुंबळ फोनाफोनी चालू असताना सुमारे पावणे अकरा वाजता त्या सर्व घनघोर युद्धातील सर्वाधिक महत्वाचा आणि मला ज्याची सर्वाधिक प्रतीक्षा होती तो कॉल बूथवर आला.

त्या फोनवरचा आवाज ऐकूनच माझ्या डोळ्यासमोर ते व्यक्तिमत्व लगेच उभे राहिले. साडे पाच फूट उंची! किरकोळ शरीरयष्टी! पस्तीसच्या आसपास वय! काळा रंग! दाढीचे अस्ताव्यस्त खुंट! रापलेला चेहरा आणि हात! दात काळपटलेले! नुकतेच दहा घरचे पाणी भरून झाल्यासारखी दमलेली देहबोली! समोरच्याच्या नुसत्या भुवई उडवण्यावर आपले सबकुछ विसंबून असल्यासारखी लाचारी डोळ्यांमध्ये उगीचच! आणि किरटा, काहीशी अपराधी छटा असलेला आवाज!

मुहम्मद हुसेन!

MH 12 AQ 6699 टँकरवरचा त्या आठवड्यातील ड्रायव्हर!

जगात काही माणसे अशी असतात की आपल्याला त्यांची सर्वाधिक आवश्यकता असते तेव्हा ती नेमकी तिथे उगवतात आणि टिच्चून आपल्या पाठीशी उभी राहतात. असे का होते, अशी माणसे आपल्या नशिबात कशामुळे येतात ह्याला कोणतेही तर्कशास्त्र लागू होत नाही. पाप-पुण्य ह्या संकल्पना खुळचट वाटणार्‍या, आई वडिलांची पुण्याई पाठीशी असण्याला यडपटपणा मानणार्‍या आत्ताच्या काळात अशी माणसे भेटतात हे एक विचित्रच सत्य आहे. बहुतांशी लोकांचा जेव्हा प्रचंड पाठपुरावा करावा लागतो, बहुतेकांचा जेव्हा प्रत्येक लहानमोठा विरोध मोडून काढण्यात रक्त आटवावे लागते त्या ह्या व्यवहारी जगात एखादा असा माणूस असतो जो निव्वळ त्या परिस्थितीतील आपण सर्वाधिक आवश्यक माणूस आहोत हे समजल्यामुळे स्वतःच्या भूमिकेला न्याय द्यायला स्वतःहून पुढे होतो. त्याच्या मिनतवार्‍या कराव्या लागत नाहीत. त्याक्षणी त्याच्या कोणत्याही अडचणी नसतात. आणि सर्वात मुख्य म्हणजे त्या क्षणी तो सर्वात महत्वाचा माणूस आहे हे त्याच्यासकट सर्वांना मान्य असले तरीही तो भाव खात नाही. त्याला तर हेही माहीत असते की बरोब्बर चोवीस तासांनी तो कोणाच्या खिजगणतीतही असणार नाही. पण तरीही तो आत्ता भाव खात नाही.

मुहम्मद हुसेन!

मूळचा बिहारचा! 'डायवरी' शिकून स्थलांतर करत करत इकडे येऊन पोचलेला! प्लँटपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील एका नगण्य वाडीत एक नगण्य खोली घेऊन गुजराण करणारा! बायको आणि चार मुले बिहारलाच! शिक्षणही जवळपास नगण्य! त्याच्यात सांगाता येतील असे तीनच गुण होते. उत्तम ड्रायव्हिंगची कला, कामावरची निष्ठा आणि प्रचंड विश्वासार्हता!

अमीनपूरच्या पहिल्यावहिल्या ऑर्डरसाठी जाणार्‍या टँकरचा लगाम तूर्त सर्वाधिक सुरक्षित हातांमध्ये होता हे पाहून मला भरूनच आले. मुहम्मद हुसेनच्या हातांमध्ये! त्याचे ते किरटे 'हालो साब' ऐकताच, त्यामुळेच मी एक दीर्घ नि:श्वास सोडला आणि पुढच्याच क्षणी तोंडाचा पट्टा सुरू केला.

"मुहम्मद हुसेन? अरे तुम हो क्या ६६९९ पे? सुनो! वहांसे निकलो और प्लँट पहुंच जाओ! गाडी अमीनपूर ले जानी है! कल बारा बजे वहा पहुंचना है! समझे? और मेरे घरके या फिर इस बूथके नंबरपे बीचमेसे कमसेकम चार बार फोन करोगे तुम! समझे? इस बार कुछ भी लफडा नही चलेगा! क्या?"

जो कधीच लफडा होऊ देत नसे त्याला उगीचच मी सुनावले. त्यावर तो म्हणाला......

"साब मै कंपनीमे तो पहुंच जाउंगा, बस गाडी जल्दी भरवाके कागज जल्दी दिलवाने के लिये जरा बोलिये ना? छे छे, सात सात बजे तक साईन नही होते इन्व्हॉईस"

"वो सब मै देखता हूं यार! तुम निकलो चाकणसे"

फोन ठेवताना मी निश्चिंत झालो होतो.

एक अध्याय संपला होता.

घड्याळातल्या त्या वेळच्या क्षणी मला जे करणे शक्य होते ते सगळे करून झालेले होते. सर्व कम्युनिकेशनचे लूप्स व्यवस्थित को-ऑर्डिनेट झालेले होते. गांभीर्य सर्व पातळ्यांना पुरेसे समजलेले होते. नॉयडाचा रन डाऊन उरकून डी ओ तयार होत होती. आजचे सँपल थ्रू झाले होते. आणि मुहम्मद हुसेन पुण्याबाहेरच्या रस्त्याने प्लँटच्या दिशेने सुटलेला होता.

मी घरी आलो आणि घाईघाईत जेवून घेतले, घरी कोणतेही फोन आलेले नसल्याची खात्री केली आणि पुन्हा नेट कॅफेत धावलो. तिथल्या बूथवर माझ्यासाठी सत्यनारायणाचा फोन येऊन गेला होता. त्याने फक्त रिकन्फर्म करण्यासाठी आता प्रेशर टेक्निक्स सुरू केली होती. मी त्याला टँकर आज निघेल ही सुवार्ता दिली आणि मेल्स चेक करायला बसलो. बाकीची कामे हाती घेतली.

दुपारी दोनच्या सुमाराला बातमी कानांवर आली. ६६९९ वे ब्रिजवर आहे. म्हणजे साडे चार वाजणार तर, मी मनात म्हणालो. कारण टँकर भरायला एक तास, सँपल, वेमेंट, पेपर्स व्हायला एक तास, डिझेल, अ‍ॅडव्हान्स हे व्हायला अर्धा तास!

आता फोनाफोनीचा दुसरा अध्याय सुरू झाला. संदेश तोच, विषय तोच, प्रेशर तेच, फक्त वातावरण पेटलेले ठेवणे! बाकी काही नाही. असे का करायचे? तर कोणत्याही क्षणी कोणत्याही अतर्क्य कारणामुळे दिरंगाई होऊ शकते हा अनुभव अनेकदा घेतलेला होता. अमीनपूरच्या अकाऊंटमध्ये तेवीस हजार ओव्हरड्यू दिसत होते. एक रुपया ओव्हर ड्यू असला तरी डी ओ सिस्टीममध्ये लॉक व्हायची. अमीनपूरची डी ओ ही लॉक झाली. अश्या डी ओ अनलॉक करताना सतराशे एक्स्प्लनेशन्स द्यावी लागायची आणि बॉसच्या शिव्या खाव्या लागायच्या. आज एका ईमेलवर काम झाले. दोन वर्षापूर्वी अ‍ॅलॉकेशन नसताना ऑल इंडिया क्रायसिस सिच्युएशनमध्ये अमीनपूरने दुष्काळातील जमावाप्रमाणे जे दोन टँकर्स आमच्याकडून अक्षरशः ओरबाडून घेतलेले होते त्यातील शॉर्टेजेसच्या क्रेडिट नॉट्स नवीन सर्व्हरमध्ये ट्रान्स्फर झालेल्या नव्हत्या. डी ओ अनब्लॉक करण्यात आली. अमीनपूरने दोन वर्षापूर्वी दादागिरी दाखवून दोन लोड्स घेताना 'रेग्यूलर बिझिनेसही देऊ' असे व्हर्बली मान्य केले होते आणि ते आश्वासन अजून धूळ खात पडलेले होते.

चमत्कार व्हावा तसा चार वाजताच भरलेला टँकर प्लँटच्या बाहेर आला आणि डिझेल भरू लागला. जणू अश्वमेध यज्ञाचा घोडा सीमेवर फुरफुरत असावा तसे मला वाटत होते. आणि मुहम्मद हुसेनचा पहिला फोन आला.

"साब मै निकलरहा है!"

"हां! देखो दो बार कॉल करो आज! और सुबह आठ बजे के आसपास फिरसे कॉल करो"

"जी सर"

मी सत्यनारायणाला टँकर नंबर, ड्रायव्हरचे नांव, मालाचे वजन आणि निघण्याची वेळ सांगितली आणि दुसरा अध्याय संपला!

माझ्यापुरते 'त्याबाबतीत करण्यासारखे सर्व' करून झालेले होते. आता फक्त कम्युनिकेशन करत राहणे इतकेच उरले होते. आजच्या दिवसात झालेले तुफानी कम्युनिकेशन आठवून दमायला होत होते. संध्याकाळ झाली आणि मित्रांबरोबर फॅमिलीला घेऊन जेवायला जायचे ठरले. घरातून निघताना मुहम्मद हुसेनचा फोन आला आणि मनावर किंचित निराशेचे सावट पसरले. चार तासात तो फक्त इंदापूरच्या पुढे पोचलेला होता जेमतेम! अजून सोलापूर, उमरगा, हुमनादाब, झहीराबाद आणि मग अमीनपूर! हैदराबादमध्ये घुसताना सकाळचे आठ वाजलेले असले तर दुपारी दोनपर्यंत गाडी बॉर्डरवर लटकणार तिथल्या आर टी ओ च्या नियमानुसार! पण निराशा झटकत मी बाहेर पडलो.

रात्री उशीरा येऊन झोपलो तेव्हा मुहम्मद हुसेनचा आणखी एखादा फोन आलेला होता का हे सांगण्याची घरातल्यांची वेळ नव्हती. सगळे विसरून झोपून गेलो आणि सकाळी सहा वाजता खडबडून जागा झालो. वडील फिरून परतही आलेले होते. मला म्हणाले काल कोणा मुहम्मदचा फोन आला होता, सोलापूरमध्ये जेवतोय म्हणाला. किती वाजता असे मी विचारले तर म्हणाले दहा साडे दहा झाले असतील. मी किम्चित सुटकेचा नि:श्वास टाकला. सोलापूर निम्म्या रस्त्यावर! उरलेले अडीचशे, पावणे तीनशे किलोमीटर्स सकाळी साडे सातपर्यंत कव्हर होण्यासारखे होते. मी चहा घेत फोनपाशी बसून राहिलो.

सात वाजले, सव्वा सात, साडे सात, पावणे आठ आणि आठ! आता मात्र माझ्यावर दडपण आले. हा मनुष्य जर आठच्या आत हैदराबादच्या आत पोचला नाही तर सहा तास लटकणार! प्रश्न लेट होण्याचा नव्हताच. प्रश्न त्या दिरंगाईचा अमीनपूरवाले जो गैरवापर करतील त्याचा होता. ते लगेच ऑन रेकॉर्ड आणतील की ह्यांच्या कंपनीचा टँकर कमिटमेंट असून वेळेवर पोचत नाही. कोक आणि पेप्सी ह्या कंपनीतील अनेक नालायक लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की सप्लायरची चांगली गोष्ट मान्य करायला वर्षानुवर्षे लावतात पण घडलेली क्षुल्लक चूक सर्वत्र, सर्व पातळ्यांवर एकाचवेळी कम्युनिकेट करतात. स्वतःला अमेरिकन कल्चरचे म्हणवतात आणि दुसर्‍याकडून प्रोफेशनलिझम वाजवून घेताना स्वतः मात्र बेकार वागतात. पूर्ण दुर्लक्ष करतात सप्लायर्सच्या गरजांकडे! वर अरेरावी करतात ती वेगळीच! पण शेवटी दॅट इज द क्रीम सेगमेंट! इतरांच्या अडीचपट प्राईसला ते तीच कमोडिटी विकत घेत असतात. भारतात समर प्रोलाँग्ड असल्यामुळे आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये मिनि समर सीझन येत असल्यामुळे व्हॉल्यूम्सही बर्‍यापैकी मिळतात त्यांच्याकडून!

शेवटी मी माझे आवरून घेतले आणि साडे आठला पुन्हा फोनपाशी येऊन बसलो. अपेक्षेप्रमाणे फोन वाजलाच! तात्काळ मी फोन उचलून मुहम्मद हुसेनचा आवाज अपेक्षित करत होतो त्याऐवजी दुसराच आवाज कानात घुसला.

"कटॅकॅर? टँकर किधर है?"

"आयेगा सर! आताही होगा!"

"रातमे फोन आया था क्या?"

"हां जी, दसबजे के आसपास सोलापूरमे था"

"तो अभी तो यहां होनेको होना ना?"

"आयेगा आयेगा सर"

"स्टॉक नही है कटॅकॅर! आज प्लँट बंद हुवा तो बहुत बुरा होगा"

"नही नही अभी आता होगा सर, मै आपकि थोडी देरमे बताता हूं"

सत्यनारायणाने फोन आपटला तसा मी मेहताला फोन केला. मेहतालाही मुहम्मद हुसेनचा कॉल आलेला नव्हता सोलापूरनंतर!

च्यायला टँकर गेला कुठे? का यडचाप मौला अलीला पोचला? मौला अली हा हैदराबादमधलाच कोकचा दुसरा प्लँट! अमीनपूरपेक्षा थोडा लहान होता, पण तरी बर्‍यापैकी होता. मौला अलीला तर टँकर पोचलेला नव्हता असे मी केलेल्या फोनवर मला समजले.

वैतागलेल्या अवस्थेत घड्याळाकडे नजर टाकली तर साडे नऊ! आता बॉसचा फोन कोणत्याही क्षणी येणार हे माझ्या मनात येतंय तोवर फोन वाजलाच......

"कटककर?"

"मॉर्निंग सर"

"मॉर्निंग! क्या हुवा? पहुंचा अमीनपूर?"

"नही सर, समझमे नही आ रहा है! कल रात दस बजे सोलापूरसे उसका कॉल आया था! बादमे आयाही नही कॉल अभीतक"

"व्हॉट द हेल इज धिस कटककर? मतलब अब ड्रायव्हरपे तुम्हारा कंट्रोल नही रहा है क्या? आय वॉन्ट टू नो द व्हेअर अबाऊट्स इन टेन मिनिट्स! वो ट्रान्स्पोर्टरको कॉल करो."

मी येस सर म्हणेपर्यंत फोन आपटला होता. मी आता खरंच वैतागलो. एक तर मुहम्मद हुसेनचा कॉल नाही आणि नाही ते कॉल टेन्शन वाढवत होते. हे खरे तर माझे नव्हे तर ट्रान्स्पोर्टर आणि कमर्शिअल डिपार्टमेंटचे काम होते. पण हा फॉलो अप मला ह्यासाठी करावा लागत होता की त्या काळी आमच्या प्रॉडक्टला इथल्या प्लँटमध्ये जरा ओव्हरऑलच स्टेप मदरली ट्रीटमेंट मिळत असे. ह्याचे कारण आमच्या अन्य प्रॉडक्ट्सच्या तुलनेत ह्या प्रॉडक्टची प्रॉफिटॅबिलिटी कमी होती. माझी खिल्ली उडवताना काही जण 'अरे तुम तो चवन्नी का धंदा करते हो यार' असे म्हणायचे. पुढे ह्याच बिझिनेसने सलग दोन वर्षे आमच्या प्लँटची अब्रू राखली होती तेव्हा त्याच खिल्ली उडवणार्‍यांनी माझ्याकडून सलग दोन प्रमोशन्सच्या पार्ट्या उकळल्या होत्या. पण एकेक दिवस असतात.

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!

आणि पावणे दहाला जो फोन वाजला, तो उचलताना माझे मन मला सांगत होते, ह्या फोनवर कळणार की टँकर कुठे आहे. मी मन शांत केले, काहीही झाले तरी मुहम्मद हुसेनला उगाच खूप ओरडायचे नाही असे मनात ठरवले आणि फोन उचलून हॅलो म्हणालो.

"स्सार"

"येस?"

"स्सार मळागाळ्ळीसे बोलरहाऽऽऽ! सब इन्स्पेक्टर श्रीनिवास स्सार!"

मला गावाचे नांव काही केल्या समजेना! आधी तर मला मंदाकिनी असेच ऐकू आले होते. हा कुठला फोन आला असे वाटून माझे डोके फिरले आणि मी ओरडून विचारले.

"अरे कौन हो यार तुम? किससे बात करनी है?"

"काटाकर स्सार?"

"हां बोल रहा हूं!"

"स्सार, ह्यां मळागाळ्ळीमे अ‍ॅक्सिडेन्ट हुवा! आपका गाडी का"

"नही नही, राँग नंबर है"

"सर आपका गाडी है! यम एच १२...... ६६९९"

हादरा!

पुढची पाच ते सहा मिनिटे मी त्या इन्स्पेक्टरकडून सतरा वेळा नीट उच्चार करवून घेऊन नोंदी करून घेत होतो. जे काय आकलन झाले त्यानुसार मुहम्मद हुसेनचा पहाटे चार वाजता अपघात झाला होता. टँकर राँग साईडला असलेल्या झाडावर फुल्ल स्पीडमध्ये धडकला होता. त्यात क्लीनरला भरपूर मुका मार लागला होता तर मुहम्मद हुसेनचा उजवा पाय गुडघ्यापासून तुटला होता. दोघांनाही लोकांनी बीडरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले होते. टँकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हमधून बरेच लिक्विड उडाल्यामुळे आधी टँकरच्या जवळच जायला कोणी तयार होत नव्हते. सी ओ २ ने आग विझते हे तिथल्या लोकांना माहीत असायचे कारणच नव्हते. ते आग लागेल म्हणून लांब लांब पळत होते. अर्धवट भरलेला टँकर हायवेवर तसाच उभा होता.

माझ्यासमोर माझे भविष्य स्पष्ट झालेले होते. एक टँकर सप्लाय चेनमधून काही काळ रद्द होणे म्हणजे बिझिनेसचे बारा वाजणे! 'चवन्नी का बिझिनेस' अशी दुष्कीर्ती असल्यामुळे प्लँटमधून कोणीही त्या टँकरच्या किंवा ड्रायव्हरच्या काळजीने जाणार नाही हे नक्की असल्यामुळे मला निघावे लागणार होते. सत्यनारायना पुढचे चार महिने माझा फोनही उचलणार नव्हता. आंध्रातून ह्या सीझनमध्ये पाय काढावा लागेल की काय अशी शक्यताही वाटत होती. आणि...... ह्या सर्वांच्या आधी मनात आलेला विचार! बिचारा मुहम्मद हुसेन! किती तळमळत असेल! आयुष्यभराचे अपंगत्व घेऊन कुठल्याश्या बकाल खाटेवर एकटाच पडलेला असेल. त्याच्या घरच्यांना अजून माहीतही नसेल की त्याची अवस्था काय आहे! त्याच्या वेदना त्याला सहनही करता येत नसतील. त्याच्याकडे पैसेही नसतील. त्याला तेलुगु आणि कन्नड येतही नसेल. कदाचित...... तो शुद्धीतही नसेल!

कंपनीतील सर्व संबंधितांना सांगून, घरातून पैसे आणि सामान घेऊन मी संध्याकाळी सहा वाजता बाहेर पडलो. सातची खासगी बस घेऊन मी आत बसताना ड्रायव्हरला सांगितले. हुम्नाबाद आणि झहीराबादच्या मध्ये कुठेतरी एक टँकर धडकला आहे तो आमचा आहे. तो पहाटे पहाटे दिसेल, तेव्हा मला प्लीज उठवा.

सगळ्यात शेवटची सीट कशीबशी मिळाली होती. कधी झोप लागून गेली समजले नाही. पहाटे साडे चारला मला एक जण उठवायला आला तेव्हा बस थांबलेली होती. मी उठून बाहेर धावलो आणि अंधारातच वाहनांच्या दिव्यात दिसेल तेवढा टँकर पाहिला. टँकरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालेला होता. मुहम्मद हुसेन वाचला हेच आश्चर्य होते. टँकरची ती भयावह अवस्था पाहून मी बसमध्ये बसलो आणि हैदराबादला उतरून हॉटेलमध्ये पोचलो. एक विद्यासागर नावाचा इन्शुअरन्स सर्व्हेयर होता त्याला संपर्क केला. आणि त्याच्याबरोबर दुपारी प्रथम जाऊन टँकरचा सर्व्हे पूर्ण केला. तिकडून कंपनीतून एक रिकामा टँकर मागवला. रस्त्यातच ट्रान्सशिपमेंट करायची ठरवले. ट्रान्सशिपमेंट केलेला माल आम्ही घेणार नाही असे सत्यनारायणाने ठणकावून सांगितले. त्याला फाट्यावर मारत आणि एक जबरदस्त सणसणीत कॉमेंट त्याला ऐकवून मी बीदरच्या रुग्णालयाकडे धावलो.

मुहम्मद हुसेन!

त्याला गुंगीचे औषध देऊन झोपवलेले होते. त्याच्या पायारवचे पांघरूण काढण्याची माझी हिम्मत नव्हती. मला आणि विद्यासागरला पाहून जवळच बसलेला क्लीनर, जो फक्त सतरा वर्षाचा होता, तो लगबगीने आला आणि एकदम रडूच लागला. त्याला जबरदस्त धक्का बसला होता. त्यातच तिथल्या कोणीतरी एकाने सांगितले की ह्या क्लीनरने ड्रायव्हरचा उटलेला पाय पाहिल्यामुळे त्याला शॉक लागला आहे. त्या मुलाला आम्ही शांत केले. दुसर्‍या माणसाने सांगितले की ड्रायव्हरजवळचे सगळे पैसे मदत करणार्‍यांपैकीच काहींनी चोरले. ह्या माहितीचा तेथे काही संबंधच नव्हता, पण ते ऐकून संतापच आला. डॉक्टरांशी मीच बोललो. मग कंपनीतल्यांशी बोललो. मुहम्मद हुसेन हा मेहताचा कर्मचारी असल्याने कंपनी त्याच्यासाठी काहीही करू शकणार नाही असे कमर्शिअल, फायनान्स आणि एच आर ह्या सगळ्यांनी सांगितले. मेहताला फोन लावला तर मेहता म्हणाला की तो माझ्या रोलवर नाही आहे. नुसताच ट्रीप टू ट्रीप बेसिसवर पैसे घेतो. आमच्यात कोणतीही लिखापढी नाही. पण माणूसकी म्हणून मी त्याला पुण्याला आणून दुसर्‍या रुग्णालयात ठेवायला तयार आहे. त्यानंतर शांत झालेल्या क्लीनरने मला सांगितले. काल सोलापुरात जेवताना म्हणे मुहम्मद हुसेन त्याला म्हणाला होता. और किसीके नही, लेकिन कटककर साबके लिये रातभर ड्रायव्हिंग करनेको मै तैय्यार हूं! तू चाहिये तो सो जा गाडीमे! लेकिन गाडी अब अमीनपूरके दरवाजेपेही रुकेगी! नहाना, धोना, चाय, नाश्ता सब अमीनपूरमे!

मुहम्मद हुसेन!

डोळ्यातून घळाघळा पाणी वाहणार होते माझ्या! काहीतरी निमित्त काढून मी गर्दीपासून लांब गेलो. पाणी भरलेल्या डोळ्यांनी शून्यात बघत राहिलो. ह्या जगाने मला कशी कशी माणसे दाखवली होती. एक होता सत्यनारायणा! ज्याला फक्त स्वतःच्या नोकरीची चिंता होती. एक होते आमचे अधिकारी, जे मुहम्मद हुसेन आपला कर्मचारी नाही हे कारण दाखवून नवीन झंझट मागे लावून घ्यायला तयार नव्हते आणि एक होता मुहम्मद हुसेन! आपलीचार कच्चीबच्ची आणि डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारी बायको बिहारमध्ये असताना कोणा एका कटककरला दिलेल्या शब्दासाठी रात्रभर गाडी चालवून, धडकून, पाय तुटल्यामुळे जन्मभरचे अपंगत्व घेऊन बीडरमध्ये तळमळत पडला होता.

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!

मागून विद्यासागर आला. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला......

"इसको हैदराबाद लेजाना कॉस्टली है कट्कर! इधरहीच रहने दो! हम इसको यहीपर आके मिलते रहेंगे आठ दिन"

मला आठ दिवस राहावे लागणार होते सगळे सोपस्कार होण्यासाठी!

मुहम्मद हुसेनला समजलेही नसेल की आम्ही येऊन गेलो. क्लीनरला आम्ही हैदराबादला घेऊन निघालो. मी त्याला म्हणालो की मी तुला पाचशे रुपये देतो, तू परत जा बसने! तो बरं म्हणाला! पाचशे रुपये त्याने घेतले आणि मला वाटले की पोरगे बारके आहे, उगाच काही प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून त्याला विचारले की अजून थोडे पैसे देऊ का? तर तो एकदम म्हणाला 'नाही, सतराशे आहेत माझ्याकडे'! हे वाक्य ऐकून मी चपापून त्याचक्षणी त्याच्याकडे पाहिले तर तो दुसरीकडे बघून जीभ चावत होता. मुहम्मद हुसेनचे पैसे त्यानेही चोरलेले चक्क दिसत होते मला! माझा संताप झाला. मी गाडीतच त्याची गचांडी धरून त्याला विचारले, सतराशे रुपये कुठून आले? मुहम्मद हुसेनला मेहतासाहेबांनी दिलेलेच पैसे आहेत ना ते? त्यावर घाबरून हो म्हणाला. मग मी त्याला म्हणालो की परत गेल्यावर ते सगळे पैसे मेहतांना परत दे! इकडे मुहम्मद हुसेनचे काय करायचे ते मी बघेन!

जग कशी कशी माणसे दाखवत होते. मुहम्मद हुसेनचा तुटलेला पाय, नव्वदच्या स्पीडमध्ये झालेला तो भीषण अपघात, ती मध्यरात्रीची भयाण वेळ, तो भलताच इलाका, स्वतःला बसलेला मुका मार! ह्या सगळ्यामुळे ते बारकं पोरगं घाबरलेलं होतं, पण त्यातही बेण्याने चोरी केलीच होती. केवळ त्याला मुका मार लागला आहे आणि वयाने लहान आहे हे पाहून मी त्याला काही केले नाही.

पुढचे आठही दिवस आम्ही बीदरला जाय होतो. मुहम्मद हुसेन त्या आठ दिवसांपैकी फक्त एकदाच आमच्याशी बोलला. त्यावेळी मात्र मला म्हणाला...... साब, तुम्हारे लिये बहुत किय मैने!

मी त्याच्या खांद्यावर थोपटले होते. नि:शब्द झालो होतो. मी तिथून निघणार हे समजल्यावर मेहतांनी वेगळी गाडी करून मुहम्मद हुसेनला मुंबईला नेले. ह्या प्लँटला येण्यापूर्वी तो तिथेच एका ठिकाणी ड्रायव्हर होता व त्यामुळे तेथे त्याचे काही मित्र होते. त्यांच्यापैकी एकजण त्याच्याबरोबर ट्रेनने बिहारला जायला तयार झालेला होता.

अश्या रीतीने दृष्य स्वरुपात तरी मुहम्मद हुसेन हा अध्याय माझ्यासाठी संपला होता. तिसरा अध्याय संपला होता.

नंतर अमीनपूरचा बिझिनेसही सुरळीतपणे मिळू लागला, सगळेच छान झाले. पण मनात एक जखम ठुसठुसत असे. आपण मुहम्मद हुसेनसाठी काहीही केले नाही.

मुहम्मद हुसेन घरी पोचताच त्याच्या आईचा आणि बायकोचा थेट मला फोन आला. आक्रोशत होत्या,. शिव्या देत होत्या. माझी काहीच चूक नाही हे मागून मुहम्मद हुसेन त्यांना ओरडून सांगत असावा. माझे मन थकले होते त्या एका फोनमुळे! हातातून गळून पडावा तसा फोन ठेवला गेला होता माझ्याकडून! दोन थेंब आले होते डोळ्यांत!

मग मात्र मी कंपनीतील लोकांची लेव्हल पाहिली नाही की अधिकार पाहिले नाहीत. एक अशी खरडपट्टी काढनारी दीर्घ मेल लिहिली की बास्स! प्रत्येकाची यथेच्च नालस्ती केली मी! नियमांवर बोट दाखवून माणूसकीच्या क्षुल्लक अपेक्षेला पायदळी तुडवणे निंद्य आहे असे लिहिले. ह्याच कंपनीला सगळे काही नियमाप्रमाणे करूनही एक्साईझवाल्यांच्या तुंबड्या त्यांच्या नालायक नीयतीमुळे भराव्या लागत होत्या. पण त्या कॅशपैकी एखादेही पुडके सस्पेन्स अकाऊंटमध्ये दाखवून बिहारला पोचते होत नव्हते. माझ्या मेलने वादळ झाले. नॉयडा आणि प्लँट ह्यांच्यात फोनाफोनी झाली. रिझल्ट?

निल!

आपला माणूसच नाही तर काँपेन्सेशन देणार कसे?

चौथा अध्याय संपला! एका मुहम्मद हुसेनला कायमचे पंगू करून आमची अब्जाधीश कंपनी पुढची वाटचाल करू लागली.

वर्षभराचा काळ गेला असेल. माझ्या मनातील जखम थोडी बुजली होती. आणि अचानक मुहम्मद हुसेनने मला फोन केला. मी उडालोच. तो अगदी आधीसारखाच आनंदाने बोलत होता. पण ह्यावेळी तो नुकसान भरपाई मिळवून द्या अशी विनंती करत होता. मी पुन्हा कंपनीत प्रयत्न केले, मेहताकडे प्रयत्न केले, पण कोणीही मला चांगला रिप्लाय दिला नाही. शेवटी मुहम्मद हुसेनने मला दहा बारा फोन केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की माझ्या मनात कितीही असले तरी कंपनीच्या नियमांमुळे मी बद्ध आहे.

मग त्याने त्याचा मोर्चा कमर्शिअलचे हेड सरकार ह्यांच्याकडे वळवला. सरकार मनाने चांगला माणूस! पण तोही बद्धच होता. त्याने मुहम्मद हुसेनसाठी पर्सनली प्रयत्न केले. दहावेळा माझ्याकडून केस समजावून घेतली. पण शेवटी कंपनीच्या नॉयडा ऑफिसने, एच आर ने आणि फायनान्सने 'नो' असेच उत्तर दिले.

आता मात्र मुहम्मद हुसेन हे नांव मीही विसरलो.

पाचवा अध्यायही संपला!

आणि मग पुन्हा वर्षभराने एक लहानसा धक्का बसला.

मुहम्मद हुसेनने कंपनीवर केस केली होती. मुंबईच्या कोर्टाने कंपनीच्या प्रतिनिधीला येण्याचे आदेश दिले होते. आता मी सोडून सगळेजण त्या मुहम्मद हुसेनवर भडकले. मला त्याचा राग येऊच शकत नव्हता. पण कंपनीतील बाकी सर्व संबंधितांना त्याचा संताप आलेला होता. एक क्षुल्लक ड्रायव्हर आणि आमच्या कंपनीवर केस करतो? बारामतीचा एक निष्णात वकील त्या केसवर नियुक्त करून आमच्या कंपनीने मुहम्मद हुसेनसमोर शक्तीप्रदर्शन करायचे ठरवले.

सुमारे २००३-०४ मध्ये केस सुरू झाली.

मुहम्मद हुसेन आता माझ्याशी संपर्कात नव्हता. कोणाशीच संपर्कात नव्हता. माझे करिअर ऐन फॉर्मात होते. मी आता तेथील एक अतिशय महत्वाचा माणूस झालेलो होतो. माझ्या शब्दावर निर्णय घेतले जात होते.

तिकडे मुहम्मद हुसेनने लाकडी पाय बनवून घेतला होता. आता तर तो चक्क पुन्हा ड्रायव्हिंगही करू लागला होता. अहो आश्चर्यम!

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!

वर्षानुवर्षे गेली. मधूनच बातमी येत असे, मुंबईच्या कोर्टाची नोटिस आली आहे, आपले बारामतीचे वकील जाणार आहेत, वगैरे! फायनान्सची माणसे बदलली, एच आरची माणसे बदलली, कमर्शिअलची माणसे बदलली, नॉयडातील माणसे बदलली, ट्रान्स्पोर्टर बदलला. पण आमच्या कंपनीत त्या बिझिनेसचा हेड म्हणून मी आणि कंपनीवर दावा ठोकून नुकसान भरपाईची प्रतीक्षा करनारा मुहम्मद हुसेन, हे दोघे तसेच राहिले. मी पुण्यात, तो मुंबईत! आमच्यात काहीही संपर्क नव्हता.

२०१२ साली मला झालेल्या आजारानंतर मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. माझा नोटिस पिरियड सुरू झाला. बॉसने मला तो बारा दिवसांनी वाढवायची विनंती केली. मी पुढे कामच करणार नसल्याने मी ते मान्य केले. प्रत्यक्षात २०१३ च्या जानेवारीत मी रिलीव्ह झालो. १२ जानेवारी २०१३!

आणि सुमारे नऊ ते अकरा जानेवारी २०१३ ह्या तीन चार दिवसांत काय व्हावे?

मला प्लँटमधून फोन येऊ लागले. मुहम्मद हुसेन केस जिंकला होता.

काय?

मी अवाक होऊन विचारले होते.

होय! मुहम्मद हुसेन केस जिंकला होता. त्याने मागीतलेली नुकसान भरपाईची रक्कम, व्याज, आजवरचा खर्च, त्याचे नंतर झालेले अकूण आर्थिक नुकसान असे सगळे मिळून एक नाही, दोन नाही तर चौदा लाख रुपये त्याला ताबडतोब देऊन टाकण्याचे आदेश कोर्टाने कंपनीला दिले होते.

मुहम्मद हुसेन कोण होता, त्याचे नेमके काय झाले होते, त्याच्याबाबत कोणाची चूक होती, हे संपूर्णपणे माहीत असलेली व त्याकाळीही कामास असलेली कंपनीत एकच व्यक्ती होती. भूषण कटककर!

त्यामुळे मला नॉयडा, प्लँट अश्या सर्व ठिकाणांहून अर्ध्या अर्ध्या तासाला फोन येत होते. जुन्या मेल्स मिळतील का विचारत होते. काय काय झाले होते विचारत होते. प्रत्येकाला मी एकच सांगत होतो, त्यावेळी माझे कंपनीने ऐकले असते तर दिड लाखात सगळे झाले असते. आता माझ्याकडे कोणताही डेता उपलब्ध नाही.

प्रत्यक्षात आजही, २०१४ संपत आलेले असतानाही माझ्याकडे त्या सगळ्या मेल्स आहेत. पण मी मुद्दाम दिल्या नाहीत. मुहम्मद हुसेनच्या विरुद्ध जाण्यास सहाय्यभूत ठरेल असेही एकही कृत्य मला माझ्याकडून होऊन द्यायचे नव्हते. प्रत्येकजण फोनवरून माझ्याशी अती अजीजीने बोलत होता. कारण प्रत्येकाला दहा वर्षापूर्वीच्या मेल्स हव्या होत्या आणि नेमका तेव्हा मी माझा प्रायव्हेट रेडिफ अकाऊंट वापरत असे कारण नेट कॅफेमध्ये कंपनीची मेलबॉक्स ओपनच होत नसे.

बारा जानेवारीला मला शेवटचा फोन आला.

"तुमचा खरे तर आजचा शेवटचा दिवस आहे, पण बघा ना जरा, काही कम्युनिकेशन मिळाले तर जुने"

"गोखले, जाऊद्यात ना माणसाला सुखाने कंपनीबाहेर तरी"

दोघांनी हसत हसत फोन ठेवला असला तरी फोन ठेवतानाचे गोखलेचे वाक्य मला सुखावून गेले.

"खरंय साहेब, पण चौदा लाखांचा प्रश्न आहे, लोकांच्या नोकर्‍या धोक्यात आल्यायत, आजवर केस नीट न हँडल केल्याबद्दल"

एके दिवशी मुहम्मद हुसेनचे सर्व काही संपुष्टात आले होते व ते ह्याच हृदयशून्य लोकांमुळे संपुष्टात आले होते हे माहीत असलेला व त्या कंपनीत त्या दिवसापुरता तरी कर्मचारी म्हणून असलेला मी एकताच होतो.

मी रिलीव्ह होताना सुपर अ‍ॅन्युएशन, पी एफ, ग्रॅच्युइटी असे सर्व मिळून मला कितीतरी मोठी रक्कम मिळणार होती...... पण मला खरा आनंद वाटत होता तो मुहम्मद हुसेनला चौदा लाख तरी मिळणार ह्याचा!

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!

=================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीच मानसिकता सगळीकडे दिसते. कंपनीत एकाने नाहीन म्हंटले कि सगळेच नाही म्हणतात. इकडे माणुसकीचा विचार कोण करणार..

जर त्याने केस केली नसती , किंवा तुम्ही मेल दिल्या असत्या तर दैवाचे उत्तर वेगळे असते..

आपले विचार आणि निर्णय हे आपले दैव ठरवतात.. तुम्ही ते ठरवले.

कथा नेहमीप्रमाणे मस्तच . मुहम्मद हुसेन! ह्या नावाची कथेत लिहायची तुमची जुनीच पद्धत आणि त्या व्यक्तीचे केलेले वर्णन मला आवडलं, विशेष करुन हे>>>>जगात काही माणसे अशी असतात की आपल्याला त्यांची सर्वाधिक आवश्यकता असते तेव्हा ती नेमकी तिथे उगवतात >>>> मस्तच. या पॅरा साठी तरी "मला खरा आनंद वाटत होता तो मुहम्मद हुसेनला चौदा लाख तरी मिळणार ह्याचा! " मीपण सहमत.

आज आणखी एक गोष्ट शिकले तुमच्याकडुन काही आक्षेपार्ह वाक्य कथेतच योग्य वाटतात. प्रतीक्रीयेत नाही. Happy

आज पहिल्यान्दा एक कथा जागचे न हालता सलग वाचली. परीणामकारक आहे. तुम्ही तुमच्या वतीने खरच माणुसकी दाखवलीत, काहीतरी करण्याचे प्रयत्न केलेत. मात्र जगात माणुसकी आणी हृदयशून्यता या नाण्याच्या दोन बाजू पण एकाच वेळेस बघायला मिळाल्या.

तसे तर चूक तुमचीसुद्धा आहे, लोडींग चेकींग यासाठी चार चार तास जात होते तरीही ६०० किमी लांबची ऑर्डर घेतलीत. पुणे सोलापूर तेव्हा सिंगल लेन असताना तो 90ने गाडी चालवत होता ही त्याचीही चूकच.बरेचदा हे ड्रायवर दिवसा टंगळमंगळ करत जातात ,रात्री ढाब्यावर वगैरे खच्चून जेवतात ,दारु पितात आणि रात्रीच्या मोकळ्या रस्त्यांवर लो व्हीजीबीलीटीत गाड्या हाकतात.
@तिथल्या आरटीओचे हात ओले करता आले असते तर सहा तास अधिकचे भेटले असते,जर आधीपासुनच तुमचे काँन्टॅक्ट असते तर (बर्याच कंपन्यांची ,बरीच कामे हात ओले केल्याने होतात असे ऐकिवात आहे.)

एक मनात आलं, की या सगळ्या दरम्यान त्या मोहंमद हुसेन च्या पाठीशीही कुणीतरी पावरफुल उभे राहिले असावे. (जी चांगलीच गोष्ट आहे) नाहीतर त्याच्यासारख्याला इतके वर्ष दबावाला बळी न पडता मोठ्या कंपनीविरुद्ध केस लढवणे - जिंकणे , जयपूर फूट बसवून घेणे - पुन्हा पायावर उभे राहणे हे सगळे जमणे कौतुकाचे असले तरी फार अनलाइकली वाटते !

बेफिकीर,

कथा डोळे उघडणारी आहे. प्रभावीपणे पोहोचली आहे. मात्र प्रतिक्रिया काय द्यावी कळंत नाहीये. 'मास प्रॉडक्शन झिंदाबाद' म्हणू?

जाताजाता : एक वाक्य दुरुस्त करावंसं वाटतंय -

>> एके दिवशी मुहम्मद हुसेनचे सर्व काही संपुष्टात आले होते व ते ह्याच हृदयशून्य लोकांमुळे संपुष्टात आले होते हे
>> माहीत असलेला व त्या कंपनीत त्या दिवसापुरता तरी कर्मचारी म्हणून असलेला मी एकताच होतो.

कंपनीची माणसं बदललेली होती ना तोपर्यंत?

आ.न.,
-गा.पै.

>>>ह्याच हृदयशून्य लोकांमुळे<<<

म्हणजे ह्याच कंपनीमधल्या हृदयशून्य लोकांमुळे......असे अभिप्रेत असावे गा. पै. जी Happy

छान खिळवून ठेवणारे लिखाण. एक माणूस म्हणूनही आपण या प्रकरणार सरसच वागलात.

खरे तर त्या चौदा लाखांपेक्षाही बडी बात त्याचे पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहत ड्रायव्हिंग पुन्हा सुरू करणे हेच असावे. पण त्या चौदा लाखांनी समाधानही चौदा करोडचे दिले असावे अन्यथा आयुष्यभर ती खंत त्याच्या मनात राहीलीच असती.

मस्त ! शेवटपर्यन्त इन्टरेस्टिंग वाटली.>>>> +१

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!>>>> अगदी अगदी..

बेफिकीर, मी गोष्ट पूर्ण वाचली! एरवी तुमच्या कविता वगैरे कळत नाहीत म्हणून वाचत नाही, पण ही कथा मात्र न कंटाळता वाचतच गेलो. याचा अर्थ माझ्या दृष्टीने तुमचे लिखाण वाचनीय!! वर काही माझ्यापेक्षा नक्कीच जास्त शहाण्या लोकांनी काही वेगळी मते लिहीली आहेत, पण मी तिकडे;लक्ष देत नाही. खरी घटना असो, नसो, जे वाचताना कंटाळा येत नाही, समजते ते चांगले असे आपले माझे मत आहे.

बारामतीचा एक निष्णात वकील घेण्या ऐवजी तुमच्या कंपनीने वरील ज्या कुणी ड्रायव्हरचीच चूक होती असे सांगितले आहे, त्यालाच वकील नेमायचा! कंपनीचे पैसे॑ वाचले असते! Happy

झक्की ,तूमी अमेरिकेत राहुनही असली आचरट विधानं कशी करता बुवा! हायवेला हेवी व्हेकलचे स्पीड लिमीट ६० असताना ९०ने गाडी चालवणार्याचा दोष नव्हे काय?.भारतीय रस्ते ,तिथले बेसिस्त ट्रॅफिक, खड्डे, त्यावर ९०ने जाणारा हेवी लोडेड ट्रक... ड्रायवरचे आयुष्य त्याने आणि बेफीने धोक्यात घातले, उगाच का त्याच्या कुटुंबियांनी बेफिंना सुनावले....

बेफी मस्त लिहलय...

२००१ चे लाख दिड लाख आणि २०१३ चे १४ लाख मला तरी सारखेच वाटताहेत पण त्यावेळी त्या कुटूंबाने काढलेले हाल प्रचंड असतील .

आफाट लिखाण. मी सुरूवात केली आणि शेवट करूनच थांबले.
मुहम्मद हुसेन केस जिंकला हे ऐकून मला आनंद झाला. खरंच आहे भगवान के घर देर है अंधेर नही है.

Pages