माननीय श्री नरेंद्र मोदीसाहेब यांस

Submitted by बेफ़िकीर on 20 October, 2014 - 11:14

माननीय श्री नरेंद्र मोदीसाहेब यांस,

आदरपूर्वक नमस्कार!

यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी हे चौथे पत्र तुम्हाला उद्देशून!

मोदीसाहेब, प्रथम तीन गोष्टींबद्दल तुमचे अभिनंदन! तीस वर्षांनंतर ह्या देशात तुमच्या नेतृत्वाखाली एकाच पक्षाचे स्पष्ट बहुमतातील सरकार आल्याबद्दल, सर्व माध्यमांचा पुरेपूर वापर करून भारतातील एकुण मतदानाबाबत जागरूकता निर्माण करून व मतदानाचा टक्का वाढवून जनतेला सरकारशी थोडेसे अधिक 'कनेक्ट' केल्याबद्दल आणि एक पूर्वाश्रमीचा चहावालाही लोकशाहीत पंतप्रधानपदी विराजू शकतो हे सिद्ध केल्याबद्दल!

त्यादिवशी मोदीसाहेब, आमच्या येथे अजूनही भरणार्‍या शाखेत दोघेजण स्कूटरवरून चाललेले असताना पुढचा मागच्याला हासत हासत म्हणाला होता......

"लोकांनी पैसे राष्ट्रवादीकडून घेतले, पण मत भाजपला दिले"

काय दिवस होता तो! कित्येक कोटी लोकांनी कधीपासून पापण्यांच्या आड लपवून ठेवलेले स्वप्न सत्यात उतरले होते आणि हा जल्लोष सुरू झाला होता. भारतीयांना गप्पांसाठी रात्र रात्र पुरू शकतात असे तीनच विषय आहेत. क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण! क्रिकेटमध्ये तेंडुलकर आहे, चित्रपटात अमिताभ आहे, राजकारणात आजवर कोणी नव्हते. तुमच्यारुपाने ते व्यक्तिमत्व मिळाले मोदीसाहेब! कित्येकांच्या महत्वाकांक्षा, दुराभिमान धुळीला मिळवत तुम्ही बहुमत प्राप्त केलेत. तीन दशकांनी जगाला जाणीव झाली की लोकशाही शासनप्रणालीमध्ये काय ताकद असते.

त्रिशुल चित्रपट कधी पाहिला आहेत का मोदीसाहेब? त्यात मिस्टर आर के गुप्ताचा रोल करणारा संजीवकुमार आपल्या सहकार्‍याला अमिताभ ह्या त्याच्या स्पर्धकाने टेंडर जिंकण्याबाबत म्हणतो......

"हैरानी इस बातसे नही है के उसने ये टेंडर अपने नाम करलिया, हैरानी इस बातसे है के वो ये जानता था कि वो ये कर सकेगा"

तुमच्या विरोधकांचाही आर के गुप्ता झाला होता मोदीसाहेब! तुमच्या विरोधकांचाच नाही तर दस्तुरखुद्द लालकृष्ण अडवानीसाहेबांचाही!

जणू जग क्षणभर स्तब्ध झालेले होते. इसवीसन २०१४ मध्ये ज्या देशाची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे आणि जेथे बहुसंख्य मतदार हे तरुण वयोगटातील आहेत तेथे झालेला हा सत्तापालट नुसता एक सत्तापालट नव्हता. पारंपारीक धर्मनिरपेक्ष विचारांपासून फटकून असलेला पक्ष अशी ज्याची ख्याती होती तो पक्ष जिंकला होता. तेही लोकशाही पद्धतीने! आणि तुम्ही भाषणात काय म्हणालात? तर 'जे आत्तापर्यंत झाले ते झाले, आता सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे'. मोदीसाहेब, मन जिंकलंत तुम्ही तमाम भारतीयांचं, हे वाक्य टाकून!

गावसकर बाद झाला की टीव्ही बंद करणारा, इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाल्यावर राजीवजींना भरघोस पाठबळ देणारा हा भारतातील व्यक्तीपूजक समाज! जो 'दिमाग' ऐवजी 'दिल' वापरतो तो हा समाज! हा समाज पागल झाला. जिकडे बघू तिकडे 'मोदी, मोदी' च्या घोषणा दुमदुमू लागल्या. तुम्ही गर्दीच्या ज्या भागाकडे बघाल तिथले तरुण उठून उभे राहून तुमच्या नावाचा गजर करू लागले.

तुम्ही काहीही करावंत आणि त्याची बातमी व्हावी असे होऊ लागले. शपथविधीला सार्कचे नेते तासनतास खोळंबून होते पण ढिम्म हलत नव्हते. पाकिस्तानपुढे तर धर्मसंकटच उभे राहिले. आमंत्रण स्वीकारावे तर मोदींना पाठिंबा असल्याचे सूचित होणार, नाकारावे तर नसल्याचे!

शासकीय कर्मचारी वेळेवर ऑफीसमध्ये येत नाहीत हे तुम्ही हेरलेत आणि त्याबाबत कठोर झालात. क्षणोक्षणी तुमच्या बातम्या येऊन आदळतात आणि मन मोहरते.

तुम्ही ताबडतोब विदेशी दौरे सुरू केलेत. जपान, चीन आणि अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यांशी तुमच्या झालेल्या गाठीभेटी, त्यानंतर झालेले शाब्दिक करार, रॅपो डेव्हलपमेंट, सीमाशत्रूंविरुद्ध जगाचे मत तयार करण्यातील लाजवाब कसब, सगळेच दैदीप्यमान!

भर नवरात्रात नऊ दिवस लिंबू पाणी घेऊन तुम्ही अमेरिका गदागदा हालवलीत. पुन्हा आज म्हणायला मोकळे झालात की 'मी आजतागायत अमेरिकेचे मीठ खाल्लेले नाही'. सगळेच अद्भुत! इकडे पाकिस्तानची घुसखोरी होत होती, चीनची घुसखोरी होत होती, तुम्ही त्यांना सज्जड दम भरत होतात.

मोदीसाहेब, तुम्ही राज्यावर आलात आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या.

तुम्ही काही चांगले केलेत की आधीचे लोक म्हणू लागले की ही योजना आमची होती, मोदी नुसते श्रेय लाटत आहेत. तुमचे काही चुकले असे वाटले की हीच मंडळी 'आमच्यावेळी असे होत नव्हते' असे म्हणत होती. 'कुठे आहेत ते अच्छे दिन' हा प्रश्न विचारायची तर ह्या मंडळींना इतकी घाई की विचारू नका.

मोहन भागवत म्हणून कोणी आहेत हे पोराटोरांना माहीतही नव्हते. त्यांचे तर परवा भाषणच झाले. इतकेच काय तर तुम्ही थेट शाळेतल्या मुलांशी हितगुज केलेत. कोणत्या पंतप्रधानाने आजवर हे केलेले होते?

भारत स्वच्छ अभियान! हातात झाडू घेऊन तुम्ही कचरा साफ करू लागलात. खरे खोटे देव जाणे, पण तुमच्या मनातील भावना जनसामान्यांपर्यंत पोचल्या. मुख्य म्हणजे तुम्हाला विरोध कोण करणार? विरोधी पक्षच हलाखीच्या अवस्थेत आहेत.

महात्मा गांधींचे नांव तुम्ही चुकीचे उच्चारलेत. गुजरातमधील पाठ्यपुस्तकांत छत्रपतींबाबतच्या माहितीत तपशीलाच्या चुका असूनही महाराष्ट्रात बेधडक घुसलात. अमित शहांकडे पक्षाची सूत्रे सोपवलीत. अडवानींना निवृत्ती घ्यायची होती कधीची, तीही घेऊ दिलीत. ज्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत संभ्रम आहे त्यांना एच आर मिनिस्टर बनवलेत. जर्मनीच्या चॅन्सेलर बाई ब्राझीलमध्ये फूटबॉल बघायला गेलेल्या असताना त्यांच्या भूमिवर पाय ठेवून दाखवलात. विदेशी वस्तू खरेदी केल्या तर जास्त कर पडेल असा कायदा संमत करून घेतलात. करिष्मा तर एवढा वाढवलात की राहुलजींना खुद्द त्यांचेच पाठीराखे अशक्त नेतृत्व असे संबोधून स्वतःची हकालपट्टी करून घेऊ लागले.
मोदीसाहेब, मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर दुतर्फा असलेली गर्दी जेव्हा 'मोदी, मोदी' अश्या घोषणा देत होती तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला. एवढे होऊन तुम्ही स्वतःला 'प्रधानमंत्री' नव्हे तर 'प्रधानसेवक' म्हणवत राहिलात.

ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही महाराष्ट्रात मुसंडी मारायला आलात. पंतप्रधानांनी किती प्रचार करावा ह्यावर काही दिलजल्यांनी उद्वेगही व्यक्त केला. लोकसभेतील महान यशानंतर सेनेला एकमात्र मंत्रीपद देऊन तुम्ही तुमची खरी ताकद दाखवलीत. 'कोण बाळासाहेब आणि कोण उद्धव' अशी तुमची देहबोली होती. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही महाराष्ट्रात आलात.

मोदीसाहेब, तुमची लाट इथे होतीच हो! त्यात आणखीन तुम्ही स्वतः आलात! एक नाही, दोन नाही, डझनावारी सभा घेतल्यात. हादरला अबघा सह्याद्री! हा कोण गुजराथचा चहावाला येतो आणि इथल्या जनतेला भुरळ पाडून जातो. महाराजांनी सूरत लुटली होती, तुम्ही निम्मा महाराष्ट्र लुटलात! म्हणजे निम्म्या महाराष्ट्राची मने लुटलीत.

शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती अलगद शस्त्रक्रिया करावी तशी तोडलीत तुम्ही! तोडली नसलीत तर तुटू दिलीत!

मोदीसाहेब, पन्हाळगड ते विशाळगड हा ट्रेक अठरा तासांचा आहे. महाराज भले घोड्यावरून काही तासातच पोचले असतील, पण एक बाजीप्रभू कामी आला होता तेव्हा! मधली दरी पार करताना महाराजांच्या एका डोळ्यात पन्हाळगडाच्या शिखराचे प्रतिबिंब होते तर दुसर्‍या डोळ्यात मधल्या दरीखोर्‍यात छातीचा कोट करून लढणार्‍या बाजीप्रभूंच्या छातीवरच्या जीवघेण्या जखमा!

दरी युतीतही होती मोदीसाहेब! पण ह्यावेळी मोठ्या नेत्याला मधे मरणार्‍याची किंमत नव्हती. 'तो असता काय, नसता काय, मी पोचलोच असतो' ही भावना तुमच्या दोन्ही डोळ्यांत होती मोदीसाहेब!

ती भावना जेव्हा बेरकी अमित शहा आणि तुमच्या भाषणांमधून जाणवली ना मोदीसाहेब, मनापासून सांगतो, आम्ही प्रार्थना केली की प्रभू रामचंद्राने तुम्हाला जागेवर आणावे.

अहो कसले स्वच्छता अभियान आणि कसले परदेश दौरे? मोदीसाहेब, इथे पुण्यात राहणार्‍या माणसाला सियाचीनला दहा जवान मेल्याने काही फरक पडत नसतो. त्याला फरक पडत असतो रस्त्याला खड्डे किती ह्याने! त्या पुण्यातल्या माणसाला सीमेवरच्या जवानाच्या कुर्बानीचे मोल समजावे ह्यासाठी राष्ट्रीय नेता आवश्यक असतो. तुम्ही सीमेवर गेलात तर तिथल्या लोकांना आवडेल असे बोलता, इकडे आलात तर आम्हाला आवडेल असे आणि मॅडिसन स्क्वेअरमध्ये तिथल्यांना आवडेल असे!

मोदीसाहेब, प्रश्न इनमीन काही जागांचा होता. पण आज जो इगो इश्यू येत आहे ना, त्यामागे तुमचा आगाऊ आत्मविश्वास आणि तुमच्यातील तेवढेच वैशिष्ट्य घेऊन प्रकटलेल्या अमित शहांचे वर्तन कारणीभूत आहे.

मोदीसाहेब, माफ करा, पण शिखरावर पोचल्याक्षणीच तुमची घसरण सुरू झालेली आहे.

कसे असते ना? जे विचार आणि आचार घेऊन ह्या देशात टिकून राहता येते, ते तुमच्या आचारविचारांपेक्षा फार वेगळे असतात. आणि तुम्ही जर ते विचार, आचार आत्मसात करायला गेलात, तर तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये फरक नाही उरणार मोदीसाहेब! ह्या देशात दहा मैलाला भाषा, चाळ ओलांडल्यावर जात आणि मुहल्ला बदलला की धर्म बदलतो. मोदीसाहेब, हा देश असा आहे जो चहावाल्याला पंतप्रधान करेलही, पण पंतप्रधानाला चहावाला नाही बनू देत!

मोदीसाहेब, तुमचे इतक्या उद्योजकांशी निकटचे संबंध आहेत, कधी त्यांना विचारून बघा! प्रत्येक कंपनीत अशी काही माणसे असतात जी वेळेवल नेमून दिलेले काम करतात आणि ब्र काढत नाहीत. आणि अशी काही माणसे असतात जी काहीही काम करत नाहीत आणि यंव केले आणि त्यंव केले हे सांगण्यात माहीर असतात. बघा विचारून त्या इन्डस्ट्रियालिस्ट्सना!

तुम्ही दुसर्‍या प्रकारात फार वेगाने जात आहात.

तुम्ही हातात झाडू धरलात तर झाडू हा ह्या देशात दागिना ठरत आहे.

तुम्ही हाफ स्लीव्ह कुर्ता घातलात तर तश्या कुर्त्यांची गरज भागवताना संबंधितांची दमछाक होत आहे.

होतं काय आहे मोदीसाहेब, की तुम्ही काहीही केलेत तरी त्याची अतीच जाहिरातबाजी करत आहात.

देश एखाद्या कंपनीप्रमाणे चालवणारा नेता अशी तुमची प्रतिमा विदेशात अवश्य बनलेली असेल मोदीसाहेब, पण भारत हा देश ही एक कंपनी नाही.

भारत देश म्हणजे चहाची तल्लफ भागवायला कुठल्याही टपरीवर थांबलेला अजाण नागरीक नाही.

ज्या टपरीवर पन्नासवेळा उकळलेलाच चहा असतो, पण 'येथे टपरी आहे' ह्या पाट्या दहा दहा किलोमीटरपासून असतात.

मोदीसाहेब, सत्तांध झाला आहात तुम्ही! सत्तांध सगळेच आहेत. तुम्ही उपलब्ध त्या सर्व पर्यायांचा आणि माध्यमांचा वापर करावात ह्यातही काही गैर नाही. पण जेव्हा व्हॉट्स अ‍ॅपवर असे चित्र येते की निवडणूक आयोग मतपत्रिकांची पिशवी घेऊन खालच्या लाळ घोटणार्‍या कुत्र्यांना सांगत आहे की 'आज नव्हे, एकोणीस ऑक्टोबरला उघडेल ही पिशवी' तेव्हा त्या लाळघोट्यांमध्ये स्थानिकांबरोबर तुमचेही एक व्यंगचित्र असलेले पाहून आम्ही काय समजायचे ते समजतो.

आम्ही चहावाल्यालाही पंतप्रधान करतो मोदीसाहेब, पण पंतप्रधान पसंतीस उतरला नाही, स्वस्त वागू लागला, तर त्याला चहावालाही बनू देत नाही.

ही एक लाट आहे मोदीसाहेब! ज्या लाटेला फक्त आणि फक्त बदल हवा आहे. 'बदल हवा असणे' ह्याचा अर्थ 'मोदी सरकार हवे असणे' असा मुळीच नसतो.

आणि एक महत्वाचे सांगू का?

तुम्ही सोडून तुमच्या पक्षात आता काहीच नाही ही स्थितीही तुमच्या ह्या भयानक सत्तांधतेमुळेच आलेली आहे.

तुम्ही खूप काही वेगळे करू शकत नाही आहात. आमूलाग्र बदल घडवण्यासाठी नवरात्रात उपास करण्याची आवश्यकता नसते मोदीसाहेब, वर्षभर उपास घडणार्‍यांना भाकरी देण्याची आवश्यकता असते. इस्रोत जाऊन 'यान नाही पोचले तर माझे अपयश ठरेल' असे कुचकामी पण वरवर भावनिक भाषण देण्याची गरज नसते, 'मी तर काही केले नाही, पण हे झाले तर मी सलाम झोडेन' असे म्हणण्याची आवश्यकता असते.

तुमचे मार्केटिंग जरा आवराच! मनमोहन सिंग हे एक टोक होते आणि तुम्ही दुसरे! अहो ते पदच असे आहे की तेथे विराजमान झालेला कोणीही काहीतरी अद्वितीय करूच शकत नाही. नका सांगू जनतेला की तुम्ही अद्वितीय आहात.

मोदीसाहेब, भानावर येऊन वागा! अन्यथा, चहावाल्याला पंतप्रधानपदी बसवणारी ही जनता, पंतप्रधानाला चहावालाही बनू देणार नाही.

==========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत देश म्हणजे चहाची तल्लफ भागवायला कुठल्याही टपरीवर थांबलेला अजाण नागरीक नाही. >> अगदी खरंय, बेफिकीरजी.

भारत देश म्हणजे चहाची तल्लफ भागवायला कुठल्याही टपरीवर थांबलेला अजाण नागरीक नाही. >> अगदी खरंय, बेफिकीरजी.

हे पण पत्रं नाही आवडले.
'चहावाला' ही कन्सेप्ट जरा जास्तच ताणली गेलीय या पत्रात.

मात्रं
>>
ही एक लाट आहे मोदीसाहेब! ज्या लाटेला फक्त आणि फक्त बदल हवा आहे. 'बदल हवा असणे' ह्याचा अर्थ 'मोदी सरकार हवे असणे' असा मुळीच नसतो.

आणि एक महत्वाचे सांगू का?

तुम्ही सोडून तुमच्या पक्षात आता काहीच नाही ही स्थितीही तुमच्या ह्या भयानक सत्तांधतेमुळेच आलेली आहे.>>>

हे खरे आहे.
पण इथल्या प्रत्येक पक्षाने हेच धोरण ठेवले आहे याला मोदीकाका तरी काय करणार?

मोदीसाहेब, तुम्ही राज्यावर आलात आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या.>>>> Wink

जर्मनीच्या चॅन्सेलर बाई ब्राझीलमध्ये फूटबॉल बघायला गेलेल्या असताना त्यांच्या भूमिवर पाय ठेवून दाखवलात.>>>> Wink Happy

तुम्ही सोडून तुमच्या पक्षात आता काहीच नाही ही स्थितीही तुमच्या ह्या भयानक सत्तांधतेमुळेच आलेली आहे.>>> Uhoh

मग आता काय व्हॅक्युम इफेक्ट...... करनेको कुछ बचा नहीं......

मोदीसाहेब, माफ करा, पण शिखरावर पोचल्याक्षणीच तुमची घसरण सुरू झालेली आहे.>>> पण नक्कि हेच शिखर आहे? मला अजुन वाटते कि बरेच काही व्हायचे आहे. उदा. वन मॅन आर्मी लिडींग एन्टायर डेमोक्रसी.

बेफी, लेख बायस वाटतो. (कदाचित मी वाचताना बायस असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण काहि वाक्य ना अगदी चपखल बसलेत. Happy

बेफी, लेख बायस वाटतो. (कदाचित मी वाचताना बायस असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण काहि वाक्य ना अगदी चपखल बसलेत. >>> ++++

मोदीचे मार्केटिग जरा जास्त आहे पण कामे संथ गतीने का होईना पण होत आहेत. ६ महिन्यापुर्वी ती होतच न्हवती.

भारत देश म्हणजे चहाची तल्लफ भागवायला कुठल्याही टपरीवर थांबलेला अजाण नागरीक नाही. >> अगदी बरोबर.. पण जर दुसरा कोणी योग्य उमेदवार नसेल तर वासरात लंगडी गाय शहाणी म्हणुन चहावाल्याला पण परत परत डोक्यावर घेउ शकतात. सध्या दुसरा पर्याय नाही.

युती तोडताना पण शिवसेनेचे चुकले असे वाटते. १३० जागा दिल्या पाहिजे होत्या. ११९ तर दिल्याच होत्या आणी ११ जागा ज्या ५६ जागेतुन मागितल्या होत्या ज्यी शिवसेने २५ वर्षात कधीच जिंकल्या न्हवत्या. १३० जागा देउन मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवता आले असते. त्यात मोदीचा दोष वाटत नाही . १३० जागा दिल्यावर पण युती तुटली असती तर मोदीना जबाबदार धरु शकलो असतो.

मोदीचे उद्योग्जगत शी निकटचे संबध आहेत पण त्याचा वापर हा रोजगार वाढवण्यासाठी होत आहे . स्वताचे खिशे भरण्यासाठी नाही. डाव्या विचारसरणी ने मागच्या ५० वर्षात कोणताही देश पुढे गेलेला नाही. उद्योग असल्याशिवाय १२५ कोटीचा देश चालु शकत नाही,

मोदीची काही वाक्ये , ईतिहास वगैरे चुकले असेल पण बाकिचे त्याचा १० पट चुका करतात. तर पुन्हा वासरात लंगडी गाय शहाणी म्हणुन लोक accept करतात.

बाकीचे पक्ष जो पर्यन्त घराणेशाही संपवत नाहीत तोपर्यन्त असेच चालायचे.

भारतात इतिहास नीट लिहलेला नाही. जो लिहलाय तो इंग्रजांच्या सोयिचा. मराठीतला शिवाजी महाराजांचा इतिहास जो आपल्याला माहित आहे तो किती अमराठी लोकांना माहित आहे शंकाच आहे.

मग महाराष्ट्रातल्या इतिहासासाठी " भारत एक खोज " वर अवलंबुन रहाणे स्वाभाविक आहे.

पंडितजींनी सुध्दा शिवाजी महाराज एक वाट चुकलेले देशभक्त असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रातल्या जनतेने जेव्हा प्रखर विरोध केला तेव्हा माझा अभ्यास चुकीचा आहे असे त्यांना म्हणावे लागले होते.

ज्या कालखंडात आपण मोदींचे मुल्यमापन करताय तो अगदीच लहान आहे. बेफिकीरजी ही कावीळ आपल्यालाही व्हावी याचे वैषम्य वाटते.

मोदीसाहेब, सत्तांध झाला आहात तुम्ही! हे वाक्य म्हणजे लोकशाही अबाध असलेल्या देशात मोदी इदी अमिन सारखा नरसंहार करीत आहेत किंवा इंदीरा गांधींच्या आणिबाणी कालखंडासारखी परिस्थीती निर्माण झाल्याचे भासवत आहात.

भाजप किंवा मोदी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकत आहेत. उद्या हीच जनता भ्रम निरास झाला तर वेगळा पर्याय शोधु शकते.

एक गोष्ट मनावर ठसवुन ठेवा की भारतात हुकुमशहा निर्माण होऊ शकणार नाही. झालाच तर टिकणार नाही. इंदीरा गांधींनी केलेला अयशस्वी प्रयत्न अद्याप जनतेच्या मनात आहे. इंदिरा गांधी सुध्दा या देशात पराभुत होतात हे मोदींना नक्कीच माहित आहे.

एक गोष्ट मनावर ठसवुन ठेवा की भारतात हुकुमशहा निर्माण होऊ शकणार नाही. झालाच तर टिकणार नाही. इंदीरा गांधींनी केलेला अयशस्वी प्रयत्न अद्याप जनतेच्या मनात आहे. >>> पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? असे कुणाला का वाटुन नये.
दुसर्‍या महायुध्द्दाचा जय पराजय यात फार काही अंतर होते असे वाटते का तुम्हाला? Wink

बेफी,

उत्तम पत्र !!
पण आता जरी प्रामाणिक पणे तुम्ही मनापासुन मोदींची दुसरी आणि थोडी चुकीची बाजू मांडली असलीत तरी आता पब्लीक ह्या पत्रा वर पण कल्ला करणार बघ:डोमा:;)

मोदीसाहेब, माफ करा, पण शिखरावर पोचल्याक्षणीच तुमची घसरण सुरू झालेली आहे.>>>>

सहमत आहे !
हे ही पत्र आवडले. बाकीच्या पत्रांवर काही प्रतिक्रिया दिली नव्हती कारण त्या-त्या व्यक्तींच्या बाबतीत ते नवे नाही. पण हे मात्र पटले.

पत्र आवडले.

तुमचे मार्केटिंग जरा आवराच! मनमोहन सिंग हे एक टोक होते आणि तुम्ही दुसरे! अहो ते पदच असे आहे की तेथे विराजमान झालेला कोणीही काहीतरी अद्वितीय करूच शकत नाही. नका सांगू जनतेला की तुम्ही अद्वितीय आहात. >>>

हे खुप पटले. त्यांच्या वाढ्दिवसाला त्यांचे आईबरोबरचे फोटो facebook वर झळकत होते. ते खुप क्रुत्रिम वाटले. बिचार्या मनमोहन सिंगांचा वाढदिवस कधी होत होता हे कोणाला कळतही नसे.

बेफीजी, सद्य परीस्थीतीचे अतिशय उत्तम विवेचन केले आहे. तुमची सगळी पत्रे वाचतो आहे. तुमच्या सर्वच पत्रांतली खुपशी वाक्ये अतिशय चपखल आहेत. मोदीं बाबतीत, शिखरावरती पोहोचल्यावर कधीतरी उताराच्या दिशेने वाटचाल होणे क्रमप्राप्तच आहे. पण शिखरावर दिर्घकाळ मुक्काम करणे त्यांना नक्किच शक्य असते. त्यासाठी शिखरावर पोहोचण्यासाठीच वापरलेली पद्धत (कोणती ते सर्वांना माहीती आहेच, शिवाय तुम्हीही तुमच्या लेखात नमुद केलेलीच आहे.) वापरुन चालणार नाही. तिथे, आधी केले मग सांगितले आणि करवुनच घेतले असेच वागावे लागेल. उदा. ली कुआन यीव (Lee Kuan Yew, Singapore) असे थोडेबहुत काम मोदींकडुन गुजरातमध्ये नक्कीच झाले आहे. तिथे त्यांना दिर्घकाळापासुन लोकप्रियता टिकवुन ठेवता आलेली आहे. भारतभर ती टिकवुन ठेवने प्रचंड आव्हानात्मक आहे. म्हणुनच आता अधिक काळ वाया घालवणे मोदी आणि भा.ज.पा. साठी तोट्याचे ठरु शकते. कामांना थोडीफार सुरुवात झालेली आहेच. त्याला आता झंजावाताचे स्वरुप देणे आवश्यक आहे. हेच सांगण्याचा तुमचा प्रयत्न आहे म्हणुनच ह्या पत्रावर मुद्दाम प्रतिक्रीया द्यावीशी वाटली.

नीट कळालं नाही.

आपण काय करता ?
आपण मोहन भागवत आहात का ? किंवा त्यांचे दूत ?
मोदिंनी सल्ला मागितलेला का ? हे पत्र पाठवल आहे की असं संभाषण तुमच्यात फोन वर झालं आहे ?
इतर कुणाल लिहीलीत अशी पत्रं ?

रेल्वेमंत्री - सदानंद गौडा - १०.४६ लाख

अर्थमंत्री - अरुण जेटली - १.१४ कोटी

मोदीसाहेब, वरच्या दोन मंत्र्यांची संपत्ती गेल्या पाच महिन्यांत इतकी वाढली असे टीव्ही ९ सांगत आहे.

वर तिथे हेही सांगत आहेत की अशी अनेक मंत्र्यांची संपत्ती गेल्या पाच महिन्यांत वाढलेली असून 'अच्छे दिन' तुमच्या मंत्र्यांनाच आलेले आहेत.

तुमच्या स्वच्छ कारभाराला हरताळ फासला गेल्याचे सांगत आहेत.

मोदीसाहेब, झाली सुरुवात घसघशीत आरोपांची! आता तुम्ही काय आणि काँग्रेस काय!

उद्या महाराष्ट्र अदाणीला चालवायला दिला तरी आश्चर्य वाटायला नको.....
>>>>>>>>.
उद्या का, आजही आपले राज्य वा देश उद्योगपतीच चालवतात असाही एक मतप्रवाह आहेच.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतील त्रिशंकू परिस्थितीत शिवसेनेने भाजपाला जास्त आढेवेढे न घेता पाठिंबा द्यावा असा उद्योपतींच्या गटाकडून दबाव आल्याचे त्यादिवशी मी एका बातमीत वाचले.

थेट काँन्ट्रक्ट देईल मोदी अदाणीला, कि कृषी खातं सांभाळ, आंबाणीला उद्योग खातं देतील ,आयआरबीला गडकरी सार्वजनिक बांधकाम खातं देतील.या भांडवलशाहीवादी भाजपाचा काही नेम नाहि.

उद्या महाराष्ट्र अदाणीला चालवायला दिला तरी आश्चर्य वाटायला नको..... किती या लुज काँमेंट्स ? राजकीय प्रक्रिया म्हणजे काय बिझनेस आहे ? जर बिझनेसमन्स ना देश चालवायचा असेल तर ते सरळ राजकारणात नाही का येणार ?

जगभरात सर्वत्र बिझनेसमन आपल्याला सोयीच्या पॉलिसीज व्हाव्यात म्हणुन दबावगट निर्माण करतात आणि राजकीय पक्षांना फंडिंग करतात ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भारतात काही वेगळ घडत आहे अस वाटत नाही.

किमान गॅस च्या किंमतीवरुन जे आरोप आरोपतज्ञ केजरीवाल साहेबांनी केले तसे घडले नाही. मोदी सरकारने जनतेचे हित लक्षात घेऊन कुकिंग गॅस च्या किमती निर्धारीत केल्या. यात अंबानीला घसघशीत फायदा होईल असा कोणताच निर्णय झाला नाही.

जरा दम धरा. आज माझ्यासारखे भाजप समर्थक सुध्दा वेट & वॉच मोड मध्ये आहेत. प्रत्येक निर्णयाची चिकित्सा व्हायला काहीच हरकत नाही जे आपण कधीच काँग्रेस राजवटीत केले नाही पण सरसकट स्वैर विधाने का करताय ?

नितिनचंद्र,

ह्या ग्लोबेल्स ना आता दुसरा उद्योग नाहीय. प्रत्येक निवडणुकीत जनतेने काँग्रेस व त्याच्या सहकारी पक्षांची खरी जागा त्या त्या पक्षाला दाखवली तरीही हे लोक आता तोंड वर करुन बोलतात, जस काही आता पर्यंत ह्यांचच राम राज्य होत आणि आता जशी काही (पाकिस्तानातल्या प्रमाणे) लष्कराच्या मदतीने भाजप सरकारात आलीय,

जाऊ द्या !! कुत्रे भुंकणारच , त्यांच कामच ते ! दुर्लक्ष करा, आपसुकच त्यांची तोंड बंद होतील !!

नविन कुत्री भरती झाले वाटते
10 वर्षे विरोधी बाकांवरून तुन्ही भुंकतच होतात ते चालत होते वाटते की त्या भुंकण्यात देशभक्ती होती?
किती हलकटपणा करायचा याला मर्यादा ठेवा

Pages