ते दोघ

Submitted by बावरा मन on 20 October, 2014 - 02:07

विदयार्थी दशेत असताना 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी एका प्री पोल सर्व्हे मध्ये भाग घेतला होता . त्यावेळेस अमरावती लोकसभा मतदार संघात पण काही चकरा कराव्या लागल्या होत्या . शिवसेनेचे अनंत गुढे आणि लोकशाही आघाडीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती . त्यावेळेस कोणी एक बच्चु कडू अस विचित्र नाव असणारा कोणी एक पोरगेला उमेदवार पण अपक्ष म्हणून उभा होता . या दिग्गजांच्या लढतीमध्ये पोरांचं टोळक घेऊन फिरणारा आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा आर्थिक परिस्थिती यथातथाच असणारा हा पोरगा काय करणार असाच एकूण सूर होता . पण निवडणुकीच्या मतमोजणी नंतर सगळ्यांनाच तोंडात बोट घालावी लागली . त्या 'पोरांन ' लोकसभा मतदारसंघात येणारया ६ विधानसभा मतदारसंघापैकी ३ मतदारसंघात आघाडी घेतली होती . फ़क़्त ६००० मतांनी त्याचा निसटता पराभव झाला होता . हि तर फ़क़्त सुरुवात होती . लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू आमदार म्हणून अचलपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले . हे पाणी काही वेगळेच आहे हे तेंव्हाच लक्षात आले होते . एकदा माझा मलकापूर ला शिकणारा एक मित्र घरी सुट्टीत आला असताना भेटला . त्याला बच्चू कडू बद्दल विचारले असताना त्याने अजून माहिती दिली . घरची आर्थिक परिस्थिती यथा तथा असतानाच हा पोरगा सगळ्या गरजूना मदत करण्यात आघाडीवर असायचा . एकदा कबड्डी चा खेळ रंगला असताना त्याच्या मित्राला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या . अमरावती च्या डॉक्टरांनी हृदय रोगांच निदान केल . इलाजासाठी मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता . पण पैसे कुणाकडे होते ? गरिबी सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेली . शेवटी बच्चू कडू ने घरचा कापूस विकून थोडे पैसे जमा केले . पण त्या पैशांमध्ये प्रवास करणे शक्य नव्हते . मंडळी without ticket निघाली . अनेकदा अपमान सहन करावे लागले . अनेकदा टीटी ने खाली उतरवल . पण ३ दिवसांनी मंडळी कशी बशी मुंबई ला पोहोंचली . गावाकडची हि पोर पहिल्यांदाच मुंबई ला आलेली . कस बस हॉस्पिटल शोधून काढल . रस्त्यावरच्या बाकावर झोपून रात्री काढल्या . मित्राला रक्ताची गरज पडली . वजन ५० किलो पेक्षा कमी असल्याने बच्चू कडू यांना रक्तदान करता येत नव्हते तर पठ्ठ्याने खिशात दगड भरून वाढीव वजन दाखवून रक़्त दिल . वाचला . मित्र वाचला आणि जेमतेम विशीत असणारां बच्चू गावाचा हिरो बनला . मग प्रथाच पडली . कुणाला काहीही अडचण आली कि तो बच्चू च्या घराचा दरवाजा ठोठावायचा . मग बच्चू पण त्याला आपल्या बाईक वर बसवायचा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायचा किंवा गरज पडली तर त्यासाठी मुंबई ला पण जायचा . छोट्या गावातून मुंबई सारख्या ठिकाणी उपचारासाठी जाणारया रुग्णाचे आणि त्याच्या कुटुंबियांचे काय हाल होतात हे बघितल्याशिवाय कळणार नाही . बच्चू कडू आणि त्याचे मित्र इथे मदतीचा दुवा बनले . रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना आर्थिक मदतीपासून ते त्यांच्या जेवणाखाणाची व्यवस्था करेपर्यंत या मदतीची range होती . वेळप्रसंगी पैशासाठी अडवणूक करणारया हॉस्पिटल च्या व्यवस्थापना शी नडाव लागायचं . बच्चू आनंदाने नडाय चा . आतापर्यंत साधारणतः ४००० शस्त्रक्रियांना बच्चू कडू नि मदत केली आहे .

ज्यावेळेस २००४ ला तो लोकसभेला उभा राहिला होता तेंव्हा इतक्या दांडग्या पुण्याई चा आधार त्यामागे होता . आणि आम्ही मुंबई पुण्याहून येणारे लोक त्याची त्याच्या दाढीवरून आणि वेगळ्या नावावरून टर उडवीत होतो . आपल्याच राज्यातल्या लोकांबद्दल आणि तिथल्या भयाण दारिद्र्याबद्दल आम्ही किती ignorant होतो याचा हा पुरावाच . बच्चू कडू सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले . आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी ते सतत चर्चेत असतात . भार नियमनाच्या विरुद्ध पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं 'शोले ' आंदोलन तर खूप गाजल . त्यांनी केलेल्या आंदोलनाची हि यादी :

उलटे लटकवून आंदोलन ः
दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आंदोलन
अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन
खुर्ची जलाओ आंदोलन
मुक्कामी आंदोलन
गणपती स्थापना आंदोलन
शोले आंदोलन
विष खा आंदोलन
राहुटी आंदोलन
टेंबा आंदोलन
सामुहिक मुंडण आंदोलन
अर्धदफन आंदोलन (आदिवासींसाठी)
कार्यालयात साप सोडण्याचे आंदोलन
फिनले मील आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या गावी डेरा आंदोलन
ठिय्या आंदोलन
विहिरीत उतरून आंदोलन
(स्त्रोत - http://bacchukadu.com/Default.aspx) हि web site बच्चू कडू आणि त्याच्या कार्यालायाबद्दल अजूनही माहिती देते .

कधी गरीब कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करणारया नाफेड चे कार्यालय पेटवून दे तर कधी मतदारसंघातल्या गरीब माणसाकडे काम करून देण्यासाठी लाच मागणार्या गब्बर अधिकारयाला मंत्रालयात जाउन फटकाव हा याचा खाक्या . विधानसभा भवन परिसरात त्याचे अनेक सुरस किस्से ऐकायला मिळतात . एकदा मतदार संघात होणारया वीज प्रकल्पाला विरोध म्हणून हा विधानसभेत बंडी घालून गेला होता . विधानसभेत भाषण करताना नक्षल वाद्यांना गोळ्या घालण्या एवजी इथे बसलेल्या आमदारांनाच त्या घालायला पाहिजेत असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते . विदर्भातील ‘कलावती’ या गरीब वृद्ध महिलेची परिस्थिती पाहून हळहळलेल्या राहूल गांधींनी तिला घरकूल बांधून दिले. खरे तर अखिल भारतात अशा किती तरी ‘कलावती’ आहेत. फक्त एक घर बांधून त्या सार्‍यांचे दुःख हलके होऊ शकत नाही. राहूल गांधींचे राजकीय वजन पाहता संपूर्ण देशातील अशा पीडितांसाठी ते सक्षम योजना अंमलात आणू शकत होते. पण तसे झाले नाही. बच्चुभाऊंनी अशा प्रवृत्तीविरूद्ध आवाज उठवण्याचे ठरवले आणि त्यांनी राहूल गांधींच्याच मतदारसंघातील ‘शकुंतला’ या अपंग अपत्याच्या आईचे घर कारसेवेच्या माध्यमातून बांधून देण्याचे ठरवले. अमरावती जिल्ह्यात गावोगावी फिरून ‘झोली भरो आंदोलनाने निधी गोळा केला आणि शकुंतलेचे घर उभे राहिले.

मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकाना बच्चू कडू कदाचित रानटी आणि असंस्कृत वाटू शकतो . पण समाजातल्या शेवटच्या थरातल्या लोकांसाठी काम करताना आणि निब्बर शासकीय यंत्रणेकडे दाद मागताना ज्याच्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठींबा नाही अशा नेत्याने अजून काय करणे अपेक्षित आहे ? बच्चू कडूच्या मागचा जनाधार पाहून अनेक पक्षांनी त्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला . दस्तुरखुद्द शरद पवारांनी त्याना भेटून पक्षात सामील होण्याची गळ घातली . पण बच्चू कडु नी कोणालाच दाद दिली नाही . नाहीतर मंत्रिपद किंवा गेलाबाजार एखाद्या मंडळाचे अध्यक्षपद मिळवणे त्याला काही अवघड नव्हते . त्यामुळे या व्यवस्थेत निव्वळ त्याचे असणेच खूप आश्वासक ठरते .

आता एका माजी आमदाराविषयी . दुर्दैव हे की आमच्या परभणी जिल्ह्यातले असून पण मला त्यांच्याबद्दल खूप उशिरा कळल . ते पण सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेबु वर टाकलेल्या एका पोस्ट मुळ . ज्ञानोबा गायकवाड हे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर गंगाखेड मतदारसंघातून सलग ३ टर्म राहिलेले आमदार . आज नगरसेवकाने पण आलिशान गाड्यातून फिरण्याचा काळ आला असताना ज्ञानोबा गायकवाड यांच वेगळेपण कशात आहे ? तर मुंबई हून आलेल्या धन दांडग्या उमेदवाराने प्रचंड धनशक्तीचा वापर करून १९९५ मध्ये त्यांचा पराभव केला . पराभव झाल्यावर दुसऱ्या दिवशी रोजगार हमी योजनेत बायको सोबत कामावर जायला लागले . त्यांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नाही . दोन्ही मुल आता मार्गाला लागली आहेत . छोट्या मोठ्या नौकर्या करून उदरनिर्वाह करत आहेत . त्याना कंत्राटदार बनवून घरात खोऱ्याने पैसा आणण ज्ञानोबा गायकवाड यांच्या मनात पण नाही आल . मुलाना पण त्याची कांही खंत नाही . ज्यांनी २००९ मध्ये गायकवाड यांचा पराभव केला ते सीताराम घनदाट यांचा गंगाखेड मतदारसंघाशी काहीही अर्थार्थी संबंध नव्हता . मुंबईत बसून ते अभ्युदय बँकेचे साम्राज्य सांभाळत होते . मऊ जमीन बघून ते इथे घुसले . आणि गंगाखेड च्या राजकारणाचे सगळे संदर्भच बदलले . आता गंगाखेड चे राजकारण फक्त पैशाभोवती फिरते . या विधानसभा निवडणुकीत तर हद्द झाली . पैसे वाटप करताना घनदाट आणि गुट्टे या दोन धनदांडग्या उमेदवाराना अटक झाली . माझ्या तिथल्या मित्राने सांगितले कि प्रत्येक मतामागे ५००० रुपये असा रेट चालू होता . विश्वंभर चौधरी म्हणतात तस ज्याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बदलत्या स्वरुपाचा अभ्यास करायचा आहे त्याने गंगाखेड मतदार संघाचा अभ्यास करावा .

बच्चू कडू आणि ज्ञानोबा गायकवाड . एक वर्तमान काळ आणि एक भूत काळ . दोघेही मराठवाडा आणि विदर्भ अशा मागास भागातून आलेले आणि rare breed प्रकारातले . राजकारणात अजून पण प्रामाणिकपणा टिकून आहे याची हि दोन प्रतिक . सगळच काही संपल नाही याची जाणीव टोकदारपणे करून देणारी माणस . नुकत्याच झालेल्या पंचरंगी तमाशानंतर यांची value अजूनच कळली . काल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना एक नजर अचलपूर च्या निकालावर पण होती . अनेक round बच्चू कडू पिछाडीवर होता . पण जिंकला एकदाचा शेवटी . आता त्याची कारकीर्द संपवणारा कोणी सीताराम घनदाट तिथे नाही आला म्हणजे मिळवली .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलाम

बावरामन, TITLE मधे दोघांची नावे टाकल्यास अधीक लोकं वाचतील. मी अमरावती ची .बच्चू कडू अगदी गरीबांचे
Robinhood ..होते ...आहेत.

@मना- तस करायला आव्डेल पण तसे केले तर शिर्षक लाम्ब लचक होइल. बाकि तुम्हि पण बच्चू कडू बद्दल अजुन माहिति दिलि तर वाचायला आव्डेल