Submitted by भारती.. on 6 October, 2014 - 04:19
महाभारत
द्यूताचा विखरे विखार निजल्या कित्येक अक्षौहिणी
दु:खाच्या लिपिची महान रचना मी सोसली उन्मनी
काळोखातच चांदणे अवतरे काळ्या उतारांवर
रात्रीचा कमनीय प्रस्तर जुन्या मूर्तीप्रमाणे स्थिर
पाषाणातच युद्धभू हरपली संग्राम शिल्पातला
पाषाणातून मंद सूर झिरपे पाताळगर्भातला
पाषाणाभवती सतृष्ण शतके घनगर्द ओथंबती
पाषाणास फुटून पाझर कृपा वाहेल ओसंडती
माझ्याही हृदयी प्रतिध्वनित हो विश्वात्म गीतारती
डोळ्यांना मिटल्या तमात दिसते अस्पष्ट भव्याकृती
लाटांच्या कुरळ्या बटा उसळती माझ्या किनाऱ्यावर
त्या एकास्तव साहण्यास धजले मी या कथेचा ज्वर..
भारती
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अलिकडे पुन्हा महाभारत
मी अलिकडे पुन्हा महाभारत वाचलं कमला सुब्रह्मण्यमचं, मंगेश पाडगावकरांनी अनुवादलेलं .महाभारत revise करणंही आवश्यक होतं आणि काय आश्चर्य, मंगेशबाबांचं ( पर्यायाने कमला यांचं )लेखन थेट हृदयाला स्पर्शून जातं आहे. कालातीत कथा अगदी जिवंत होऊन पानातून उठून मनात., प्रत्येक आणि असंख्य संध्याकाळींचे रंग.तऱ्हेतऱ्हेने उदास करणारी तीच तऱ्हा.
मन अगदी ओतप्रोत भरून गेलं, विषण्णता ,तत्वभ्रम, महाशोक, ज्ञान.
लाटांच्या कुरळ्या बटा उसळती
लाटांच्या कुरळ्या बटा उसळती माझ्या किनाऱ्यावर
त्या एकास्तव साहण्यास धजले मी या कथेचा ज्वर..<<< वा वा
भारती.... कमला सुब्रह्मण्यम
भारती....
कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारताच्या प्रथम प्रकाशनाला आज जवळपास ५० वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यांच्या कथानकाच्या शैलीत त्या महाभरताकडे इतिहास म्हणून प्रामुख्याने पाहात आहेत असे वाटत राहते. मी हा ग्रंथ पूर्णतः वाचलेला नाही शिवाय मंगेश पाडगांवकरांनी तो अनुवादित केला आहे हे देखील आता इथे समजले. जरूर मी हा अनुवादित ग्रंथ मिळवितो. आपल्या मौखिक परंपरेत महाभारताला पुराणग्रंथ, धर्मग्रंथ, नीतिग्रंथ आदी नामांनी पुकारतात तस्र रामायणानुसार महाभारतही महाकाव्य असा उल्लेख तर जागोजागी सापडतोच....."हा जय नावाचा इतिहास आहे" हे तर महर्षि व्यासांनीच म्हटले असल्याने त्या नजरेने कथानकाकडे पाह्यचे म्हटल्यास उपलब्ध असलेल्या श्लोकांत परंपरेनुसार अनेक कथाउपकथांची भर पडत गेली....वा घातली गेली असे म्हणू या सोयीसाठी....आणि मुळात १८-२० हजार श्लोकांची संख्या लाखावर गेल्याचे दाखले मिळतात....यामुळे झाले असे की कथानक हे चमत्कारांनी भरले गेलेच पाहिजे असा अट्टाहासच विविध शतकात विविध कथाकारांनी घेतल्याचे स्पष्ट होते.
तुम्ही म्हणता कालातीत कथा जिवंत होऊन पानातून उठून मनात येतात....मग वाचकही त्या पंगतीत रमून जातोच. "...डोळ्यांना मिटल्या तमात दिसते अस्पष्ट भव्याकृती..." ही कबुली त्या कथानकाच्या जादूचीच होय. महाभारताच्या मांडणीमुळे खूप भारावलेली कवयित्री आहे आणि तिची ती कबुली अगदी सुंदरतेने चितारली गेली आहे...तिच्या प्रतिभेची साक्षीदार बनली आहे ही कविता. यातील प्रभावानेच वाचक महाभारताकडे पुन्हा आकर्षिला जाईल असेच वाटत राहते. सुंदर प्रशंसा !
सुंदर कविता. मी महाभारत
सुंदर कविता.
मी महाभारत अनेकवेळा वाचलेय. मला त्यात नेहमी राजकारण आणि दु:ख दिसते. कृष्णात मला देवत्व वगैरे दिसत नाही. त्यानेही राजकारणच केलेय. अलिकडे काही लेखनात तो मला विवाहसंस्थेचा इतिहास या दृष्टीने अभ्यासलेला दिसला. खरा लढा औरस आणि अनौरस असाच आहे.
व्वा ! छान.... शेवटच्या दोन
व्वा ! छान.... शेवटच्या दोन ओळी खासच.
-----------------------------------------------------------------------------------------------
दुसर्या कडव्यातील
"पाषाणातून मंद सूर झिरपे......" या ओळीत
पाषाणातुन असे असणे आवश्यक वाटले.... (वृत्तानुषंगाने)
पाषाणातुन असे असणे आवश्यक
पाषाणातुन असे असणे आवश्यक वाटले.... (वृत्तानुषंगाने)<<<
शार्दुलविक्रीडित पाच ठिकाणी टायपोत बदललेले आहे, त्यातील एक वर उल्हासरावांनी निर्देशिलेले!
लाटांच्या कुरळ्या बटा उसळती
लाटांच्या कुरळ्या बटा उसळती माझ्या किनाऱ्यावर
त्या एकास्तव साहण्यास धजले मी या कथेचा ज्वर..
सुरेख finale.
दुसरे कडवे खूप आवडले.
(सध्या महाभारतातील एका फारशा न लिहिल्या गेलेल्या पण जवळच्या नात्यावर विचार सुरू आहे. तुम्हाला व मामांना त्याविषयी तुमचे views विचारायचे आहेतच. )
घनगर्द... चाही विचार व्हावा, या वृत्तात का कोण जाणे, इतकेसेही न्यून नसावे असे वाटते नेहेमी.
वा ! वेगळी रचना. शब्द देखिल
वा ! वेगळी रचना. शब्द देखिल नवीन आहेत काही माझ्यासाठी.
शार्दूलविक्रीडित पाच ठिकाणी
शार्दूलविक्रीडित पाच ठिकाणी टायपोत बदललेले आहे, त्यातील एक वर उल्हासरावांनी निर्देशिलेले! >>> आणखी चार ठिकाणी कुठे ते समजले नाही. प्लीज सांगाल का बेफीजी ?
उतारांवर स्थिर
उतारांवर
स्थिर
किनाऱ्यावर
ज्वर
ओह ! तुम्ही याबद्दल बोलताय
ओह ! तुम्ही याबद्दल बोलताय बेफीजी !
(माझ्या माहितीनुसार) शार्दूलविक्रीडित सारख्या जुन्या वृत्तांमधे प्रत्येक ओळीतील शेवटचे अक्षर हे (लघु असले तरी) गुरुच समजले/मानले जाते. कारण अशा वृतांच्या लयीनुसार शेवटच्या अक्षराच्या उच्चारणासाठी अधिक कालावधी लागतो. लघु, गुरु हे उच्चारणानुसार ठरतात हे वेगळं सांगायची गरज नाहीच.
याबाबत माझ्याच एका कवितेवर आपली चर्चा झालेली आठवते.
इथे लिंक देत नाही कारण उगाच त्यानिमित्ताने रिक्षा फिरायला नको
तुम्हाला मेलने ती लिंक पाठवतो.
या वृत्तातील एक खूप जुने उदाहरण कृपया पहावे :
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर
रामरक्षा म्हणत असताना "....भो राम मामुद्धर"
यातील शेवटच्या ’र’चा उच्चार कसा केला जातो हे आठवून पाहिल्यास
मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
उल्हासराव, भारतीताईंनी
उल्हासराव,
भारतीताईंनी शार्दुलविक्रीडित पूर्णपणे पाळलेले नाही. बुधकौशिक विरचितं रामरक्षेतही ते पाळले गेलेले नाही हे आज ते पाळले न जाण्याचे समर्थन असू शकत नाही.
"भारतीताईंनी शार्दुलविक्रीडित
"भारतीताईंनी शार्दुलविक्रीडित पूर्णपणे पाळलेले नाही. बुधकौशिक विरचितं रामरक्षेतही ते पाळले गेलेले नाही हे आज ते पाळले न जाण्याचे समर्थन असू शकत नाही." >>> समर्थन !! मुळीच नाही.
असो.... याबाबतीत आपल्यात मतभिन्नता आहे आणि कदाचित ती तशीच राहील.
"बुधकौशिक विरचितं रामरक्षेतही ते पाळले गेलेले नाही " >>> या विषयातील अन्य तज्ज्ञांकडून मत मांडले जावे ही अपेक्षा/इच्छा.
या मनस्वी प्रतिसादांसाठी आभार
या मनस्वी प्रतिसादांसाठी आभार बेफिकीर, अशोक,दिनेश, उल्हासजी , जाई, अतुल, अमेय !
अशोक, नेहमीप्रमाणेच अभ्यासू प्रतिसाद. आमच्या क्यूट लायब्ररीत मूळ पुस्तकाआधी अनुवाद मिळतात , पण अनुवादात प्रतिबिंबित झालेले सौंदर्य जितके मंगेश पाडगावकरांच्या कवीवृत्तीचे, तितकेच ते कमला यांच्या मूळ दृष्टिकोनाचे असलेच पाहिजे..
@ उल्हासजी, होय तो टायपोच होता, समजून घ्यावे ऐसाजे.
बेफिकीर, शेवटच्या अकाराबद्दल( जो चार ठिकाणी मी आणला आहे ) मी व्यक्तिश: उल्हासजींशी सहमत. यापूर्वीही हा मतभेद आला आहेच संस्थळावर.
आता यापलिकडे गेले आहे. म्हणून वृत्ताचा उल्लेख केला नव्हता.
भारती...
भारती...
भारती!!!!!!!!!!!!!!! केवळ!!!
भारती!!!!!!!!!!!!!!! केवळ!!!
अप्रतिम ...
अप्रतिम ...
कविता खूप अवडली भारतीताई
कविता खूप अवडली भारतीताई शेवटच्या २ ओळी तर अप्रतीम . दुसरे कडवे मलाही विशेष वाटले
असो
@बेफीजी : तृटी असतात त्याच पुढे सुटी म्हणून मान्य केल्या जातात . त्यांचेच मग नियमही होतात आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आजवर मराठी काव्यात ही तृटी सूट म्हणून सर्वमान्य बनत गेली आहे आणि आता ती नियमाप्रमाणे हाताळली जाते आहे . आता ह्याचीही परंपरा बनलेली आहे अनेक पिढ्यांपासून ती "रुजली" आहे . तिचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे .
ओळीचे शेवटचे अक्षर लघु असल्यास ते गुरु मानले तरी चालेल अश्या शब्दात म्हटले गेले पाहिजे ...ते गुरु मानावे असे म्हणणे किंवा ते गुरु असते असे म्हणणे ह्यातून संभ्रम वाढतात .
ओव्हरऑल ही तृटीच आहे जी सूट बनत बनत मराठी काव्यात कधीपासूनची नियमाप्रमाणे वापरली जाते
भटांनी ह्या संदर्भात दिलेल्या गाईडलाईन्स मरठी गझल ह्या काव्यप्रकाराबाबत असून इतर फॉर्म्स च्या मराठी कवितेला लावल्याच पाहिजेत हा आग्रह व्यर्थ ठरवला जाऊ शकतो . (तसेही गझल च्या अनेक नियमांमध्येही सुटी घेतल्या जातात त्या सर्वमान्यही असणेही पारंपारित झाले आहे आणि त्यांना आता आक्षेपार्ह म्हणणेही आक्षेपार्ह ठरू शकते हे आपण जाणताच ..तसाच हा प्रकार आहे )
म्हणजे ह्या कवितेत जे झाले आहे ते लयीच्या नियमानुसार नसेलही पण मराठी काव्याच्या नियमानुसारच आहे त्यामुळे त्या अनुषंगाने ते चूक ठरवता येणार नाही
पॉइंट टु बी नोटेड की ही मराठी काव्याच्या जडणघडणीतली एक महत्त्वपूर्ण बाबीबाबतची चर्चा आसून संस्कृत छंदशास्र्तातील लयी पाळण्याच्या शास्रोक्त पद्धतीबाबतचा ऊहापोह नाही
असो
धन्यवाद
मध्यंतरी एकदा मला सहजच
मध्यंतरी एकदा मला सहजच भीमरूपी आठवली
बहुधा अनुष्टुभ मधली ही रचना आहे . दोनेक ओळींंमधे यमके जुळलेली असतीलही बाकी कुठेही नाही स्वरांत साधलेली असतील तर माहीत नाही पहावे लागेल . अश्या काव्याचा प्रघातच काय अश्या काव्याची कल्पनातरी मराठीत कुण्या इतर कवीने त्याकाळी केली होती का असे वाटते (रामदासाला मानला बुवा !!)
आत्ता आठवायचे कारण भीमरूपीत प्रत्येक ओळीचा एंड दीर्घाक्षरीच आहे (अनुष्टुभ म्हणून असा काही नियम असेलही पण आपण मराठी काव्यातले उदाहरण म्हणून पाहणार असू तर भीमरूपी इस बेस्ट )
तस्मात बेफीजी आपल्याला इथे घडलेल्या तृटीवर अजूनही आक्षेप असेल तर मनातल्या मनात भीमरूपी म्हणत बसले तरी चालेल

मध्यंतरी एकदा मला सहजच
मध्यंतरी एकदा मला सहजच भीमरूपी आठवली<<<<< ...सहजच???...

अरेरे !!.....काय हे वैवकु गझलेसाठी यमके मिळावीत म्हणून आता भीमरूप्या वगैरे पाठ करण्याची वेळ आली का तुझ्यावर??
अगं अगं गझलेss ..कुठं न्हेउन ठेवलाय वैवकु माझा !! :हहगलो::
__________________________
भारतीताई ग्रेट आहात तुम्ही
एक नंबर कविता है बॉस !
अप्रतिम!
अप्रतिम!
वैवकु, तुमचा गैरसमज झाला आहे.
वैवकु,
तुमचा गैरसमज झाला आहे. उल्हासरावांनी शार्दुलविक्रीडितातील एक बदल दाखवला म्हणून मी आणखीन चार आहेत इतकेच म्हणालो. मला गझल आणि कविता ह्यांच्यातील सुटींमधील फरक समजू शकतो.
तुम्ही माझ्या ह्या खाली दिलेल्या दोन वाक्यांच्यामध्ये हे कंसातले वाक्य अॅड करून वाचा म्हणजे माझे म्हणणे स्पष्ट होईल. (ह्याने काही बिघडत नाही कारण ही काही गझल नाही, पण म्हणून)
>>>भारतीताईंनी शार्दुलविक्रीडित पूर्णपणे पाळलेले नाही (ह्याने काही बिघडत नाही कारण ही काही गझल नाही, पण म्हणून) बुधकौशिक विरचितं रामरक्षेतही ते पाळले गेलेले नाही हे आज ते पाळले न जाण्याचे समर्थन असू शकत नाही.
ओक्के बेफीजी आपले म्हणणे आता
ओक्के बेफीजी आपले म्हणणे आता मला समजले
तसदीबद्दल क्षमस्व
धन्यवाद
सगळ्यांना खूप प्रेम, या
सगळ्यांना खूप प्रेम, या चर्चेची मजा येत असताना 'परंपरा आणि नवता ' हा जुनाच विषय मनात घोळत आहे.
-
सुहृदांशी माझं मन शेअर करण्यासाठी फक्त हा विचार व्यक्त करावासा वाटतोय
भरपूर वृत्तबद्ध लिहितानाच एक वाक्य आठवतं मला अधूनमधून बायबलमधलं, रविवारचा दिवस माणसासाठी की माणूस रविवारच्या दिवसासाठी ? तसंच वृत्तं ही कवितेच्या रसनिष्पत्तीसाठी, आनंदासाठी शेवटी..
वर्तमानाच्या काळोख्या घाटावर
वर्तमानाच्या काळोख्या घाटावर प्राचीन महाकाव्याच्या अफाट नदीतुन वहात आलेल्या या शब्ददिवल्या.... .......... हृदयात प्रतिध्यनित होत रहातात विश्वारतीचे अनाहत अर्थनाद ....खुपच सुंदर काव्यरचना.
मला' प्रतिध्वनित ' असे
मला' प्रतिध्वनित ' असे लिहायचे होते. लिखाणातील अशुद्ध शब्दांबद्दल क्षमस्व.
मला अजुनही नेटवर लिहण्याचे तंत्र जमत नाही.
भारती ताई , पोट भरल्यावर
भारती ताई , पोट भरल्यावर त्यात लवंग कमी होती का वेलची हे प्रश्न गौण असतात ..(त्यातही आम्ही वडापाववाली माणसे) ...मजा आली ...
भारतीताई, अतिशय आशयघन कविता
भारतीताई,
अतिशय आशयघन कविता आहे. वाचल्यावर त्यात काहीतरी सिनेमॅटीक असल्यासारखे वाटले. लांबलचक पर्वतश्रेणी दाखवणारा एखादा वेस्टर्नपट पाहावा तसे. कविता सुरेखच आहे. आणि शब्दांची निवडदेखिल चोख, महाभारताच्या भव्य कथेला साजेशी.
वाटलं काळोखी रात्र आहे. युद्ध नुकतंच उलटुन गेलंय. सारं काही संपलंय. भीष्म, द्रोण, कर्ण सर्वांना या युद्धभूमीने गिळंकृत केलंय. अठरा दिवस प्रचंड घनघोर संग्राम पाहिलेली युद्धभूमी आता शांत झालीय. पण या शांततेमागे असीम वेदना आहे. मुक आक्रोश आहे. युद्धामुळे काय कमवलं काय गमावलं असा हिशोब पांडवांना पडला आहे. तेव्हाच...
माझ्याही हृदयी प्रतिध्वनित हो विश्वात्म गीतारती
डोळ्यांना मिटल्या तमात दिसते अस्पष्ट भव्याकृती
....या ओळी मनात येतात. रात्रीच्या पटलावर ती सावळी भव्याकृती अस्पष्ट दिसु लागते आणि शब्द घुमु लागतात...
ध्यायतो विषयान्पुंसः ......
मग कुठेतरी खुप धीर वाटु लागतो.
लाटांच्या कुरळ्या बटा उसळती माझ्या किनाऱ्यावर
त्या एकास्तव साहण्यास धजले मी या कथेचा ज्वर..
भारतीताई, सावळ्या कृष्णाला दाखवण्याआधी त्याची अस्पष्ट भव्य आकृतीच पडद्यावर दिसते, गंभीर आवाजात गीतेचे श्लोक ऐकु येऊ लागतात आणि सागराच्या गर्जनेसोबत त्या पाठमोर्या भव्याकृतीचे कुरळे केस वार्याने उडताना दिसतात असं काहीसं चित्र माझ्यासमोर आलं.
पुनरेकवार धन्यवाद भुईकमळ
पुनरेकवार धन्यवाद भुईकमळ ,विक्रांत, अतुल, या रसास्वादासाठी.
अतुल,
>>भारतीताई, सावळ्या कृष्णाला दाखवण्याआधी त्याची अस्पष्ट भव्य आकृतीच पडद्यावर दिसते, गंभीर आवाजात गीतेचे श्लोक ऐकु येऊ लागतात आणि सागराच्या गर्जनेसोबत त्या पाठमोर्या भव्याकृतीचे कुरळे केस वार्याने उडताना दिसतात असं काहीसं चित्र माझ्यासमोर आलं.>>
होय, अगदी त्या कवितेची नस तुम्हाला मिळाली आहे, त्यातली भव्य चित्रात्मता तुम्ही अचूक टिपली म्हणून मला खूप आनंद होत आहे..हा आनंद विश्वाच्या शोकात्म नियतीतून प्रत्येकाने शोधून काढायचा आहे , त्यासाठी आतल्या कृष्णतत्त्वाची आराधना करून..
केवळ अप्रतिम भारती! धुक्यातून
केवळ अप्रतिम भारती! धुक्यातून काहीतरी आकार जाणवतोय म्हणेपर्यंत तो परत धुक्यात विरून जावा तसं महाभारत. थोडक्या शब्दात नीट पकडलंस ते.
"लाटांच्या कुरळ्या बटा उसळती माझ्या किनाऱ्यावर
त्या एकास्तव साहण्यास धजले मी या कथेचा ज्वर.."
सावळ्या कृष्णाचा चटका लावणारा भास, कुंतीने त्याच्याकडे मागून घेतलेलं दु:ख हे सगळं मनात झरझर आलं. तोपर्यंत अतुलने तेच लिहिलेलं दिसलं. मस्त!