केप कॉलबॉर्न इथे पोहोचल्यावर अॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला!
तो म्हणतो,
"इथून पुढे जाताना सतत पाण्याची खोली मोजण्याची आवश्यकता नव्हती! आमच्या जहाजापेक्षा कितीतरी मोठी जहाजं इथपर्यंत येऊन परत गेली होती! जॉन रे, कॉलीन्सन, मॅक्क्युलर आणि इतरांच्या मेहनतीतून तयार झालेले अनेक नकाशे आता आम्हाला उपलब्ध होते! अज्ञात सागरातून मार्ग काढण्याची यापुढे आवश्यकता नव्हती!"
शिडाच्या उपकरणाची दुरुस्ती केल्यावर उरलेला दिवसभर त्यांनी तिथे आराम केला. अॅमंडसेनला आतापर्यंतच्या आपल्या प्रगतीचा संदेश किनार्यावर केर्न उभारून त्यात ठेवण्याची इच्छा होती, परंतु जोरदार वार्यांमुळे लहानशा होडीतून किनार्यावर जाण्याचा आपला बेत त्याने रद्द केला.
१८ ऑगस्टच्या पहाटे ग्जो ने केप कॉलबॉर्न सोडलं आणि पुढचा मार्ग धरला. रिचर्ड कॉलीन्सनने या परिसराचं केलेलं वर्णन अचूक असल्याचं अॅमंडसेनला आढळून आलं. फिन्लेसन बेटाच्या परिसरातील कॉलीन्सनने नोंद केलेलं कोरल रीफही त्यांना आढळून आलं. दक्षिणेकडील खुल्या सागरात आता एकही हिमखंड दिसत नव्हता!
दुसर्या दिवशी ग्जो ने रिचर्डसन द्वीपसमुह ओलांडला. या बेटांवर अॅमंडसेनला घनदाट झाडी असल्याचं आढळून आलं. रात्रीच्या मुक्कामासाठी मिल्स बेट गाठण्याचा विचार त्याला वार्याचा जोर वाढल्याने सोडून द्यावा लागला. या परिसरातील अनेक बेटांचा भूभाग हा एकाच प्रकारे बनलेला असल्याचं हॅन्सनच्या ध्यानात आलं. बहुतांश बेटांच्या पूर्वेच्या किनार्याला उभाच्या उभा कडा होता. कड्याच्या टोकावरुन पश्चिमेच्या दिशेने कमी तीव्रतेचा उतार होता. त्यामुळे या बेटांजवळून जाताना अनेक आकाराचे त्रिकोन समुद्रातून प्रगटल्यासारखं दृष्यं दिसत होतं!
२१ ऑगस्टच्या सकाळी डग्लस बेट मागे टाकून ग्जो ने पुढचा मार्ग धरला. या परिसरातून डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनीत जाणारी चिंचोळी खाडी शोधण्याचा प्रयत्नं करुनही ही खाडी त्यांना सापडत नव्हती. अॅमंडसेनने डग्लस बेट आणि केप क्रुन्सेस्टर्न यामधील खाडीतून उत्तरेचा मार्ग धरला. मात्रं तिथे एका वाळूच्या पट्ट्यात जहाज अडकण्याचा धोका लक्षात येताच त्याला आपली चू़क कळून आली. दक्षिणेच्या मार्गानेच डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनी गाठणं शक्यं होतं. अखेर मागे परतून अॅमंडसेनने डग्लस बेटाजवळ नांगर टाकला.
डग्लस बेटाच्या किनार्याला जहाज नेण्याचा धोका पत्करण्यास अॅमंडसेन तयार नव्हता. इथे सागरतळ कठीण खडकांनी बनलेला होता. तळाची खोली अवघी पाच फॅदम होती. मॅटी बेटावर जहाज सागरतळात रुतल्याने मिळालेला धडा अॅमंडसेन विसरला नव्हता. त्यातच इथे कठीण खडकामुळे जहाज तळावर घासलं गेल्यास त्याचं अपरिमीत नुकसान होण्याची शक्यता होती. जहाजावर अवघी आठ माणसं असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास जहाज सोडून देण्याची पाळी आली असती! नॉर्थवेस्ट पॅसेजच्या आपल्या स्वप्नपूर्तीच्या इतक्या जवळ आल्यावर अॅमंडसेनची कोणताही धोका पत्करण्याची तयारी नव्हती!
हॅन्सन जोडगोळीने लहानशा होडीतून डग्लस बेटावर जाऊन परिसराचं निरीक्षण केलं. डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनीकडे जाणारी खाडी नेमकी कुठे असावी याचा त्यांना अंदाज आला होता.
२२ ऑगस्टच्या पहाटे ग्जो ने डग्लस बेट सोडलं आणि दक्षिणेचा मार्ग धरला. वाळूचा उथळ पट्टा टाळण्यासाठी दक्षिणेला बरीच मजल मारल्यावर जहाजाने पश्चिमेची वाट धरली. सागरतळाची खोली मोजण्याचं लिंडस्ट्रॉमचं काम सुरुच होतं. सुदैवाने सात फॅदमपेक्षा पाण्याची खोली कमी असल्याचं त्याला कुठेही आढळलं नाही. दुपारी ३ च्या सुमाराला लिस्टन आणि सटन बेटांतून मार्ग काढत ग्जो ने अखेर डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनी गाठली!
नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्यातील शेवटचा महत्वाचा अडथळा दूर झाला होता! इथून पुढे अलास्का गाठण्यास त्यांना कोणतीही अडचण येण्याची शक्यता फारच कमी होती!
डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनी
डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनीतून पश्चिमेच्या दिशेने मार्गक्रमणा करताना पुन्हा बर्फाचे पुंजके आढळण्यास सुरवात झाली! हे बर्फाचे पुंजके अॅमंडसेनच्या उत्साहाने उसळणार्या तुकडीला वास्तवाची जाणीव करुन देण्यास पुरेसे होते. अद्यापही ते आर्क्टीकच्या परिसरात होते! अशा भागात जिथे पुढच्या क्षणी नेमकं काय होईल याचा अंदाज बांधणं जवळपास अशक्यं होतं! कोणत्याही परिणामाला समोर जाण्याची जिथे सतत तयारी ठेवावी लागते!
२६ ऑगस्टच्या दुपारी एक उंच भूभाग अॅमंडसेनच्या नजरेस पडला. हा उंच भूभाग अमेरीकेच्या किनार्यावरील केप पेरीचा प्रदेश असावा अशी सुरवातीला अॅमंडसेनची समजूत झाली, परंतु धुक्याचा पडदा दूर झाल्यावर हे केप पेरी नसून व्हिक्टोरीया बेटाच्या पश्चिम टोकावरील बेरींग प्रदेशातील नेल्सन हेड असल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आलं! अर्थात आर्क्टीकच्या चक्रावून टाकणार्या प्रदेशात अशी चूक न होणं हे विरळाच!
२७ ऑगस्टच्या सकाळी नुकतंच सुकाणू गॉडफ्रे हॅन्सनच्या हाती देऊन अॅमंडसेन आपल्या बिछान्यावर पडला होता. त्याला जेमतेम झोप लागत असतानाच वरच्या डेकवर जोराने माणसांच्या धावण्याचे आवाज येत असल्याची त्याला कल्पना आली. नेमका काय प्रकार असावा या विचारात तो असतानाच गॉडफ्रे हॅन्सन वादळासारखा त्याच्या खोलीत शिरला.
"जहाज! जहाज दिसतं आहे!" हॅन्सन कमालीच्या उत्तेजीत स्वरात उद्गारला.
अॅमंडसेन उडी मारुनच बिछान्यावरुन उठला.
जहाज! नक्कीच हे जहाज बेरींग सामुद्रधुनीच्या मार्गाने आर्क्टीकमध्ये आलेलं जहाज असणार! याचा अर्थ... याचा अर्थ नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्यात ते यशस्वी ठरले होते!
"जहाज दिसतं आहे या हॅन्सनच्या तीन शब्दांनी जादू केली होती!" अॅमंडसेन म्हणतो, "ज्या अर्थी पश्चिमेला जहाज दिसत होतं, त्या अर्थी आम्ही नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्यात यशस्वी झालो होतो याची मला पक्की खात्री पटली! माझं लहानपणापासूनचं स्वप्नं अखेर साकार झालं होतं! सर्वप्रथम आमच्या कुटुंबियांचा आणि देशवसीयांचा विचार माझ्या मनात आला. आमच्या यशाने त्यांना किती आनंद होईल याची केवळ कल्पनाच करणं शक्यं होतं! डेकवर जाण्यापूर्वी माझ्या खोलीत असलेल्या नॅन्सनच्या चित्रावर माझी नजर गेली तेव्हा तो हसून डोळे मिचकावतो आहे असा मला क्षणभर भास झाला!"
अॅमंडसेनने डेकवर धाव घेतली. जहाजावरील सर्वजण पश्चिमेला दूर अंतरावर दिसणार्या दोन शिडांकडे उत्तेजीत होऊन पाहत होते. हवामान पूर्णपणे अनुकूल होतं. मधूनच येणारी थंड वार्याची झुळूक सर्वाना सुखावून जात होती!
हे जहाज दृष्टीस पडताच अॅमंडसेनने नॉर्वेचा झेंडा ग्जो वर फडकावण्याची सूचना दिली. काही क्षणांतच भरारणार्या वार्यावर नॉर्वेचा झेंडा डौलाने फडकत होता!
एव्हाना समोर दिसणारं जहाज नेमक्या कोणत्या देशाचं असावं याबद्दल सर्वांचे तर्क-वितर्क सुरु झाले होते.
"आपल्याला पाहून त्या जहाजाच्या कॅप्टनला काय वाटेल कोणास ठाऊक!" हेल्मर हॅन्सन.
"बहुतेक एखादं जुनं जहाज समुद्रात अडकलं आहे अशी त्याचं समजूत होईल!" लिंडस्ट्रॉम.
"कदाचित ते जहाज अमेरीकन असावं!" विल्क.
"एखादं इंग्लिश जहाज असण्याचीही शक्यता आहे!" लिंडस्ट्रॉम.
"आपला ध्वज पाहूनच आपल्याला ओळखतील ते!" हेल्मर हॅन्सन.
"अर्थात, आपण नॉर्वेजियन आहोत हे त्याला लगेच कळून येईल!" रिझवेल्ट.
एव्हाना दोन्ही जहाजं वेगाने जवळ येत होती.
"अमेरीकन ध्वज!"
टेहळणी करणार्या अँटन लुंडने येणार्या जहाजाचं राष्ट्रीयत्वं जाहीर केलं! त्याच्यापाशी असलेल्या अधिक क्षमतेच्या टेलीस्कोपमधून त्याच्या तीक्ष्ण दृष्टीने अमेरीकन ध्वज नेमका टिपला होता!
अॅमंडसेनने जहाजाच्या डेकवरील पसारा आवरण्याची सूचना दिली. जहाजावर आलेले अमेरीकन अधिकारी जहाजाची नीट पहाणी करतील तेव्हा जहाजावर अस्ताव्यस्त कचरा दिसू नये अशी त्याची अपेक्षा होती! सर्वांनी त्यातल्या त्यात बरे कपडे चढवले. काही जणांनी नॉर्वेतून आणलेले पाश्चिमात्य कपडे घातले, पण काहीजण मात्रं एस्कीमोंच्याच कपड्यात होते!
अॅमंडसेन त्या अमेरीकन जहाजाचं निरीक्षण करत होता, ते दोन शिडांचं लहानसं जहाज होतं. जहाज संपूर्णपणे काळ्या रंगाने रंगवण्यात आलं होतं.
ग्जो वरील तुकडीने आपल्याजवळील सर्वात उत्तम अवस्थेत असलेली बोट पाण्यात सोडली. या बोटीतून चार जणांनी अमेरीकन जहाजावर चक्कर मारावी आणि उरलेल्या चौघांनी ग्जो वर थांबावं अशी अॅमंडसेनची योजना होती. आपल्या तीन सहकार्यांसह अॅमंडसेनने लहानशा बोटीतून त्या अमेरीकन जहाजाची वाट धरली.
काही वेळातच ते त्या अमेरीकन जहाजापाशी पोहोचले. सॅन फ्रॅन्सिस्को इथून आलेलं ते चार्ल्स हॅन्सन या नावाचं जहाज होतं. एका लहानशा शिडीवरुन अॅमंडसेन आणि इतर या जहाजावर चढून गेले. जहाजावर एस्कीमो आणि निग्रोंची भरपूर गर्दी होती. त्याचवेळी एक उंच आणि वयस्कर माणूस अॅमंडसेनला सामोरा आला. त्याने पांढरी दाढी राखलेली होती.
"कॅप्टन अॅमंडसेन?"
त्याने अॅमंडसेनला प्रश्न केला. आपलं आणि आपल्या जहाजाचं नाव अमेरीकन जहाजाला माहीत आहे हे पाहून अॅमंडसेनच्या सहकार्यांना आश्चर्य वाटलं. अॅमंडसेनने मान डोलवून होकार देताच त्याने पुढचा प्रश्न टाकला,
"आमचं जहाज हे तुम्हाला भेटलेलं पहिलंच जहाज आहे का?"
"हो!" अॅमंडसेन उत्तरला.
अॅमंडसेनच्या या उत्तराबरोबर त्या कॅप्टनने त्याला आलिंगनच दिलं! नॉर्थवेस्ट पॅसेज पार करुन आल्यावर अॅमंडसेनच्या तुकडीला भेटणारं पहिलं जहाज चार्ल्स हॅन्सन आहे याचा हॅन्सनचा कॅप्टन जेम्स मॅकेना याला अतिशय आनंद झाला होता.
मॅकेनाच्या केबिनमध्ये आल्यावर अॅमंडसेनच्या सहकार्यांना काही जुनी वर्तमानपत्रं पाहण्यास मिळाली. अर्थात ही वर्तमानपत्रं तुलनेने जुनी असली, तरी अॅमंडसेनच्या सहकार्यांच्या दृष्टीने ती नवीनच होती. त्यातील एका बातमीने सर्वांचं लक्षं वेधून घेतलं. स्वीडनपासून स्वतंत्र होण्यासाठी नॉर्वेमध्ये स्वातंत्र्ययुद्ध सुरु झालं होतं! अर्थात ही बातमी बरीचशी त्रोटक असली तरी सर्वांची उत्सुकता चाळवण्यास पुरेशी होती.
अॅमंडसेन आणि गॉडफ्रे हेन्सन यांना मुख्य रस होता तो नॉर्थवेस्ट पॅसेजच्या पुढील मार्गाबद्दल. मॅकेना एक अनुभवी कॅप्टन होता. त्याच्यापाशी नॉर्थवेस्ट पॅसेजच्या पुढील मार्गाचे नकाशे होते. हे नकाशे तुलनेने जुने असले तरी अॅमंडसेनपाशी असलेल्या नकाशांच्या तुलनेत ते अद्ययावतच होते. हे नकाशे मिळाल्यावर अॅमंडसेन-हॅन्सन यांना आनंद झाला. कॅप्टन मॅकेनाच्या मते हर्शेल बेटांपर्यंतचा नॉर्थवेस्ट पॅसेजचा मार्ग तसा निर्धोक होता. हर्शेल बेटांच्या परिसरात बर्फाने त्याचा मार्ग अडवला होता. मात्रं त्यांना कोणतीही अडचण येणार नाही असा त्याचा अंदाज होता.
मॅकेनाचा निरोप घेऊन अॅमंडसेन आणि हॅन्सन ग्जो वर परतले. लवकरच ग्जो ने पुढचा मार्ग धरला.
२८ ऑगस्टच्या दुपारी ग्जो ने फ्रँकलीनचा उपसागर ओलांडला. आर्क्टीकमधील अनेक जुन्या प्रवासवर्णनांत उल्लेख करण्यात आलेले 'धुराचे कडे' अद्यापही कार्यरत असल्याचं त्यांना आढळून आलं. त्या कड्यांमधून अद्यापही धूर निघत होता! फ्रँकलीन उपसागराच्या किनार्यावर बर्फाचं साम्राज्यं असल्याने तिथे नांगर टाकण्याचा विचार मात्रं त्यांना सोडून द्यावा लागला. उपसागरातील बर्फातून मार्ग काढण्यास त्यांना सुदैवाने कोणतीही अडचण आली नाही.
केप बार्थहर्स्ट इथे बर्फाने त्यांची प्रथम वाट अडवली. या बर्फातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी पश्चिमेचा मार्ग धरला, परंतु बर्फामुळे तो मार्गही बंद असल्याचं त्यांना आढळून आलं. त्यामुळे पुन्हा मागे परतून त्यांनी फ्रँकलीनचा उपसागर गाठला. सुदैवाने तोपर्यंत बर्फ बराचसा दक्षिणेला वाहून गेल्याने केप बार्थहर्स्ट गाठण्यात त्यांना कोणतीही अडचण आली नाही. एका लहानशा खाडीतून किनार्याच्या काठाने त्यांनी बर्फाचा प्रदेश ओलांडण्यात अखेर यश मिळवलं. केप बार्थहर्स्ट ओलांडताना किनार्यावर असलेला एस्कीमो कँप त्यांच्या नजरेस पडला. अनेक एस्कीमो त्यांना हात हलवून निरोप देत होते.
३० ऑगस्टच्या दुपारी चारच्या सुमाराला ग्जो ने बेली बेट ओलांडलं. कॅप्टन मॅकेनाने अॅमंडसेनला पश्चिमेच्या दिशेने किनार्याला समांतर मार्गक्रमणा करण्याची सूचना दिली होती. परंतु हर्शेल बेटं लवकर गाठण्याच्या उद्देशाने अॅमंडसेनने भर समुद्रातून पश्चिमेची वाट धरली.
केप बार्थहर्स्ट वरुन पुढे आल्यावर त्यांना भर समुद्रात चिखलाने भरलेला तपकीरी रंगाचं पाणी आढळून आलं. मॅकेंझी नदीच्या मुखातून आर्क्टीकमध्ये येणार्या पाण्याचा हा झोत होता. मॅकेंझी नदीच्या मुखापाशी पाण्याची खोली जेमतेम तीन-चार फॅदम असल्याची कल्पना असल्याने अॅमंडसेनेने जहाज उपसागराच्या मध्यभागीच ठेवण्याची खबरदारी घेतली होती. परंतु हवामान मात्रं पूर्णपणे बिघडलं होतं. अनेक हिमखंड आसपास वाहून येत होते. या हिमखंडांच्या गर्दीतून रात्रीच्या वेळी मार्ग काढताना हॅन्सनच्या नाकीनऊ येत होते. सुदैवाने कोणतीही अडचण उद्भवली नाही. रात्री भरपूर मोठा हिमखंड आढळून आल्यावर मॅकेनाने दिलेला सल्ला योग्य असल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आलं.
३१ ऑगस्टच्या सकाळी ग्जो ने पुन्हा पश्चिमेचा मार्ग धरला. धुक्यातून मार्ग काढताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु पश्चिमेला खुल्या पाण्याचा समुद्र असल्याचं त्यांना आढळूण आलं होतं. हॅन्सनने पश्चिमेच्या या समुद्राचा मार्ग धरला. मात्रं वाटेत असलेल्या अनेक बेटांतून मार्ग काढणं सोपं नव्हतं. त्यातच पुढेच असलेली दोन जहाजंही त्यांच्या नजरेस पडली. धुक्यातून सावधपणे मार्ग काढत ग्जो ने दक्षिणेचा मार्ग धरला.
सकाळी ११ च्या सुमाराला धुक्याचा पडदा दूर झाल्यावर ग्जो च्या मागे असलेली दोन अमेरीकन जहाजं अॅमंडसेनच्या दृष्टीस पडली. लवकरच या दोन्ही जहाजांनी ग्जो ला गाठलं. अलेक्झांडर आणि बोहेड अशी ही दोन जहाजं आर्क्टीकमधून परत अमेरीकेच्या वाटेवर होती. अॅमंडसेनला त्यांनी सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. परतीच्या वाटेवर असताना हर्शेल बेटांवर पुन्हा ग्जो शी गाठ पडण्याची त्यांना अपेक्षा होती.
१ सप्टेंबरच्या रात्री हवामान पुन्हा एकदा बिघडलं. सागरतळाची खोली अवघ्या चार फॅदमवर आली होती. २ तारखेच्या पहाटे ग्जो ने एका लहानशा खाडीतून पुढची वाट धरली. ही खाडी अगदीच अरुंद नसली, तरीही जहाज जाण्याइतपतच रुंद होती. ग्जो भरवेगाने पुढे जात असताना वाटेत आडव्या आलेल्या हिमखंडामुळे किनार्याची वाट धरण्यावाचून जहाजाला गत्यंतर उरलं नाही. किनार्याजवळ सागरतळ अवघ्या दोन फॅदमवर आला होता! या परिस्थितीत पुढे जाण्यापेक्षा अॅमंडसेनने तिथेच नांगर टाकण्याचा निर्णय घेतला.
लिंडस्ट्रॉमला जहाजावर ठेवून इतर सर्वांनी किनारा गाठला. जहाजाच्या डोलकाठीला शीड धरुन ठेवणारं उपकरण अनेकदा नादुरुस्तं झालं होतं. सतत दुरुस्ती करुन कंटाळलेल्या रिझवेल्टने नवीन उपकरण तयार करण्याच्या दृष्टीने किनार्यावर लाकडाची शोधाशोध सुरु केली होती. लाकडाचे अनेक तुकडे त्यांना आढळून आले. रिझवेल्टने लाकडाचे तुकडे गोळा करण्याचा सपाटा लावला.
दरम्यान इतर सर्वजण किनार्याजवळच असलेली सुमारे ६० फूट उंच टेकडी चढून गेले होते. या टेकडीपासून आत काही अंतरावर त्यांना एका जुन्या एस्कीमो कँपचे अवशेषही आढळले. दूर अंतरावर नजर पोहोचेपर्यंत उगवलेलं गवत त्यांच्या दृष्टीस पडत होतं. हॅन्सन जोडगोळीचे हात शिकारीसाठी शिवशिवत होते, परंतु काही बदकांचा अपवाद वगळता त्यांना दुसरा कोणताही प्राणी आढळला नाही!
३ सप्टेंबरच्या सकाळीही हवामानात फारसा बदल झाला नव्हता. मात्रं दक्षिणेच्या दिशेने येणार्या वार्याचा फायदा घेण्याचा अॅमंडसेनचा बेत होता. इंजीनाच्या सहाय्याने ग्जो ने खाडीतून पुढचा मार्ग पकडला.
तासाभराने टेहळणी करणार्या लुंडला दूरवरुन एक बोट येताना दिसून आली. सुरवातीला ही एस्कीमोंची बोट असावी असा सर्वांचा ग्रह झाला. परंतु बोट जवळ आल्यावर त्यात एक एस्कीमो आणि दोन गोरे खलाशी असल्याचं आढळून आल्यावर अॅमंडसेनच्या सहकार्यांना नवल वाटलं. त्या दोन गोर्या खलाशांपैकी एकाने अॅमंडसेनशी नॉर्वेजियन मध्ये संभाषणास सुरवात केल्यावर तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
तो गोरा अधिकारी मूळचा नॉर्वेजियनच होता. त्याचं नाव होतं क्रिस्टीयन स्टेन!
सॅन फ्रॅन्सिस्को इथून आर्क्टीकमध्ये आलेल्या बोनान्झा जहाजावर स्टेन सेकंड मेट होता. या जहाजाने आर्क्टीकमध्ये एक हिवाळा मुक्कामही केला होता. मात्रं काही दिवसांपूर्वी हिमखंडामुळे जहाजाचं नुकसान झालेलं होतं. जहाज बुडू नये म्हणून कॅप्टन मॉग याने किंग पॉईंट इथे ते किनार्यावरील वाळूत आणून रुतवलं होतं. स्टेन आणि जहाजावरील एक शिकारी खलाशी यांना एका एस्कीमोसह तिथे ठेवून जहाजावरील इतर खलाशांसह कॅप्टन मॉग हर्शेल बेटांच्या दिशेने मदत मिळवण्याच्या इराद्याने गेला होता.
किंग पॉईंटच्या परिसरात बर्फ असल्याने पश्चिमेच्या दिशेने पुढे मजल मारणं जहाजाला शक्यं होणार नसल्याचंही स्टेनने अॅमंडसेनच्या कानावर घातलं. अर्थात या बर्फातून लवकरच मार्ग मिळेल याची स्टेनला खात्री होती. स्टेन अनुभवी होता. अनेक हिवाळे त्याने आर्क्टीकमध्ये घालवले होते. मॅकेनाचा सल्ला न मानल्याने आलेल्या अनुभवावरुन शहाणा झालेल्या अॅमंडसेनने स्टेनचा सल्ला मनावर घेण्याचं ठरवलं होतं.
दुपारी बाराच्या सुमाराला ग्जो ने किंग पॉईंट गाठला. स्टेनने वर्णन केल्याप्रमाणे गोठलेल्या बर्फाने त्यांचं स्वागत केलं. किनार्यपाशी वाळूत रुतलेलं बोनान्झा जहाज त्यांच्या दृष्टीस पडलं. तिथे असलेल्या बर्फाच्या एका थराशी ग्जो ने नांगर टाकला.
किंग पॉईंट इथे ग्जो आणि किनार्यावर रुतलेलं बोनान्झा जहाज
लहान बोटींतून अॅमंडसेन आणि इतरांनी किंग पॉईंटचा किनारा गाठला. अलेक्झांडर जहाजाचा कॅप्टन टिल्टन याने किंग पॉईंटजवळून जाताना स्टेनला ग्जो वरील नॉर्वेजियनांना लागेल ती मदत देण्याची सूचना केली होती! स्टेनच्या लहानशा वसाहतीमध्ये एक पुरुष आणि तीन स्त्रिया होत्या. ग्जो वरील एस्कीमो मन्नी याने त्यांच्याशी चटकन संवाद साधला. अर्थात त्यांच्या भाषेत फारसा फरक असा नव्हताच. हे एस्कीमो बेरींगच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील कॉट्झबे खाडीच्या वसाहतीतील होते. बोनान्झा जहाजावरुन हे सर्वजण आर्क्टीकमध्ये आलेले होते. हे एस्कीमो स्वतःला नुनॅट्रीयम एस्कीमो म्हणवून घेत होते.
अॅमंडसेन आणि इतरांनी स्टेनच्या बोनान्झा जहाजालाही भेट दिली. जहाजाच्या तळाच्या भागात पाणी साचलेलं त्यांना आढळून आलं. जहाजावरील बहुतेक सर्व सामग्री किनार्यावर हलवण्यात आली होती. जहाजावर शिल्लक असलेल्या सामग्रीतून स्टेनच्या परवानगीने अॅमंडसेनने दोन कंदील आणि एक स्टो उचलला. बर्फातून मार्ग मोकळा होईपर्यंत तिथे मुक्काम करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या दृष्टीने या गोष्टी महत्वाच्या होत्या. अॅमंडसेनच्या तुकडीचा स्टेनलाही बराच फायदा होणार होता. हिवाळ्यापूर्वी त्याला आवश्यक असणारं इग्लू बांधण्यासाठी त्याला मन्नी आणि इतरांची मदत मिळणार होती.
किंग पॉईंटच्या पश्चिमेला सुमारे चार मैलांवर अनेक एस्कीमोंची एक वसाहत असल्याचं अॅमंडसेनला आढळून आलं. हे एस्कीमो एका जहाजातून व्हेलच्या शिकारीसाठी हर्शेल बेटावरुन मॅकेंझी नदीच्या दिशेने निघाले होते. त्यांच्याजवळ असलेल्या सील आणि हिमअस्वलाच्या कातडीच्या बदल्यात त्यांनी एक जहाज मिळवलं होतं. परंतु आता हे जहाज नेमकं बर्फात अडकलं होतं. एस्कीमोंच्या सुदैवाने दोन - तीन दिवसांनी हे जहाज बर्फातून निसटलं आणि त्यांनी परतून हर्शेल बेटाची वाट धरली.
या भागातील एस्कीमो हे उत्कृष्ट दर्यावर्दी असल्याचं स्टेनने त्यांना सांगितलं. हे एस्कीमो किती कुशल शिकारी आहेत याचा अॅमंडसेनने प्रत्यक्ष अनुभव घेतला होताच. व्हेलच्या शिकारीसाठी येणारी अमेरीकन जहाजं अनेकदा आवश्यक तेवढेच खलाशी घेऊन अमेरीकेहून निघत आणि अलास्का गाठून एस्कीमोंची भरती करत असत! एस्कीमो हे उत्तम शिकारी - खलाशी होतेच, पण अमेरीकन खलाशांच्या तुलनेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणंही जास्तं सोपं असल्याचं अनेक कॅप्टन्सचं मत होतं!
दरम्यान रिझवेल्ट आणि मन्नी यांनी शिकारीचा धडाका लावला होता. अनेक पक्ष्यांची शिकार त्यांना मिळाली होती. शीड उभारण्यासाठी आवश्यक उपकरण तयार करण्यासाठी लुंड झपाट्याने कामाला लागला होता. अॅमंडसेनच्या विनंतीवरुन विल्क आणि हेल्मर हॅन्सन स्टेनला हिवाळ्यासाठी घर बांधण्याच्या कामात मदत करत होते. लुंडचं उपकरण तयार झाल्यावर सर्वजण बर्फ मोकळा होण्याची वाट पाहत कोणत्याही क्षणी जहाज हाकारण्याच्या तयारीत होते.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस जोरदार हिमवर्षाव झाला!
रोज होणार्या बर्फवृष्टीमुळे पश्चिमेला जाणार्या खाडीतील बर्फ दिवसेदिवस घट्ट होत होता. पूर्वेला सुमारे १२ मैलांवर दुसरं एक बंदर असल्याची स्टेनला अंधुकशी माहीती होती, पण तो खात्रीपूर्वक काहीच सांगू शकत नव्हता. आदल्या वर्षी व्हेल्सच्या शिकारीसाठी आलेल्या तीन जहाजांनी इथे हिवाळ्यात मुक्काम केला होता. जुलैच्या अखेरीसच त्यांची बर्फातून सुटका झाली होती.
अॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्यांना हळूहळू एका गोष्टीची पक्की खात्री पटत चालली होती. खाडीतला बर्फ मोकळा होण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. रोज होणार्या हिमवर्षावामुळे त्यात भरच पडणार होती. याचा अर्थ सरळ होता...
त्यांना किंग पॉईंटलाच मुक्काम करावा लागणार होता!
आर्क्टीकमधला आणखीन एक हिवाळा!
क्रमशः
छान भाग
छान भाग