बीची बेटावरुन पुढे निघाल्यावर ग्जो ने बॅरो सामुद्रधुनी गाठली. प्रचंड धुक्याने पुढचं काहीही दिसत नव्हतं. परंतु धुकं निवळल्यावर २६ ऑगस्टला पील खाडीच्या आसपासचे भूप्रदेश त्यांच्या दृष्टीस पडले. सकाळी ९ वाजता ग्जो फ्रँकलीन सामुद्रधुनीतील प्रेस्कॉट बेटाजवळ पोहोचलं असताना अॅमंडसेनने सहजच कंपासवर नजर टाकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला!
कंपास बंद पडला होता!
दिशादिग्दर्शनासाठी अत्यावश्यक असलेला कंपास बंद पडल्यावर आता एकच मार्ग होता...
प्राचीन काळच्या व्हायकींग प्रवाशांप्रमाणेच तार्यांच्या स्थितीवरुन दिशादर्शन!
ते देखील अशा प्रदेशात जिथे धुक्यामुळे काही फूट अंतरापलीकडचंही कित्येकदा काहीही दिसू शकत नाही!
२८ ऑगस्टला ग्जो डी ला रोक्वेट बेटाच्या मार्गावर होतं. १८७८ च्या मोहीमेत अॅलन यंगला बर्फापुढे इथूनच माघार घ्यावी लागली होती! या बेटाच्या मार्गावर असतानाच अचानक एक हिमखंड त्यांच्यापुढे दत्त म्हणून उभा ठाकला. तो हिमखंड पाण्यावरुन मुक्तपणे वाहत होता. त्याची दिशा पाहील्यावर अॅमंडसेनच्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला.
दक्षिणेच्या दिशेने बर्फविरहीत मोकळ्या पाण्याचा सागर होता!
मात्रं दक्षिणेकडे असलेल्या या मोकळ्या सागराकडे जाणार्या वाटेत एक भाग असा होता की जिथे मॅक्लींटॉक दोन वर्षे अडकून पडला होता.
बेलॉट सामुद्रधुनी!
बेलॉट सामुद्रधुनीचा परिसर दाट धुक्याने वेढलेला होता. कंपासशिवाय तिथे शिरणं निव्वळ आत्मघातकी ठरणार होतं. धुक्याचा पडदा दूर झाल्यावर ग्जो ने बेलॉट सामुद्रधुनीत प्रवेश केला आणि ३० ऑगस्टला बेलॉट सामुद्रधुनीतून जेम्स रॉस सामुद्रधुनीचा मार्ग पकडला!
१ सप्टेंबरच्या सकाळी ११ च्या सुमाराला ग्जोला पाण्यात कसला तरी धक्का बसला!
एका लहानशा बेटाच्या किनार्याजवळील उथळ पाण्यात जहाज पोहोचलं होतं. जहाजाला बसलेला धक्का हा सागरतळाचा होता! ब्युफोर्ट द्वीपसमुहातील सर्वात दक्षिणेकडील बेटावरील किनार्याला ग्जो धडकलं होतं!
सावधपणे जहाज मागे घेऊन गॉडफ्रे हॅन्सनने ते अधिक खोल पाण्यात वळवलं!
या परिसरातील अनेक छोट्या बेटांतून मार्ग काढताना ग्जो ला अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. एकदा तर जहाज एका बेटावरील किनार्यावर असं काही अडकलं, की अॅमंडसेनने अत्यावश्यक सामग्री आणि बंदुका घेऊन जहाज सोडण्याची तयारी केली होती! सुदैवाने जहाजावरील सामानाची हलवाहलव करताना जहाजाची त्यातून सुटका झाली. जहाजाच्या इंजिनरुममध्ये एकदा जोरदार आग लागली! २२०० गॅलन पेट्रोलचे डबे असलेल्या ठिकाणाशेजारीच ही आग भड्कली होती! परंतु सुदैवाने वेळेवर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं! अखेर ८ सप्टेंबरला बेटांच्या त्या चक्रव्यूहातून ग्जो ची सुटका झाली!
९ सप्टेंबरला ग्जो ने रे सामुद्रधुनीत प्रवेश केला. किंग विल्यम बेटाच्या दिशेने मार्गक्रमणा करताना अॅमंडसेनला वाटेत अनेक लहानसहान बेटं आढळली. या बेटांना त्याने इविंग अॅस्ट्रपचं नाव दिलं.
लवकरच ग्जो किंग विल्यम बेटाच्या दक्षिण-पूर्वेच्या टोकाला पोहोचलं. या टोकाला अॅमंडसेनने लुईगी अॅब्रझी - ड्युक ऑफ अॅब्रझीचं नाव दिलं. (जगातील दुसर्या क्रमांकाचं शिखर असलेल्या के २ च्या मार्गावरील अॅब्रझी स्परला ज्याचं नाव दिलं आहे तोच हा ड्यूक ऑफ अॅब्रझी). अॅब्रझी पॉईंटच्या पलिकडे सिम्प्सनच्या सामुद्रधुनीत जाण्यासाठी त्याला मार्ग दिसून आला.
किंग विल्यम बेटाच्या दक्षिण-पूर्वेकडे असलेल्या पॅटरसनच्या उपसागरात नांगर टाकण्याचा अॅमंडसेनचा विचार असतानाच गॉडफ्रे हॅन्सनच्या अनुभवी नजरेला उपसागरात असलेलं एक नैसर्गीक बंदर दिसून आलं! हे लहानसं बंदर दृष्टीस पडताच त्याने अॅमंडसेनचं तिकडे लक्षं वेधलं. या बंदरात अजिबात वारा नव्हता!
किनार्यापासून काही अंतरावर ग्जो ने नांगर टाकला. पश्चिमेला सिम्प्सनची सामुद्रधुनी नजरेस पडत होती. अॅमंडसेनच्या मनात आलं असतं तर या सामुद्रधुनीतून पुढे मार्गक्रमणा करुन त्याच वर्षी बेरींगची सामुद्रधुनी गाठणं त्याला सहज शक्यं होतं. परंतु चुंबकीय उत्तर धृवाचं स्थान निश्चीत करण्यासाठी किमान एक संपूर्ण वर्षभर आर्क्टीकमध्ये मुक्काम करण्याची त्याची योजना होती. त्या दृष्टीने ही जागा आदर्श होती.
लहानशा बोटीतून बंदराचं निरीक्षण केल्यावर अॅमंडसेनने हिवाळ्यात तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. १२ सप्टेंबरला ग्जो ने या बंदरात नांगर टाकला. या बंदराला अॅमंडसेनने नाव दिलं..
ग्जो हेवन!
ग्जो हेवन परिसर
१४ सप्टेंबरला ग्जो किनार्याच्या अगदी जवळ आणून उभं करण्यात आलं!
ग्जो हेवन इथे नांगरलेलं ग्जो जहाज
सर्वात प्रथम जहाजावरील कुत्र्यांची किनार्यावर रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जहाजावरुन किनार्यावर चक्क रोपवे उभारला आणि त्याच्या सहाय्याने सामान उतरवण्यास सुरवात केली! १७ सप्टेंबरला सर्व सामान उतरवून झाल्यावर किनार्यावर निवासासाठी आटोपशीर लाकडी घर उभारण्याचं काम सुरु झालं! त्याचबरोबर काही अंतरावर चुंबकीय निरीक्षण आणि इतर प्रयोगांसाठी निरीक्षणगृह (ऑब्झर्व्हेटरी) उभारण्याचं कामही जोरात सुरु झालं!
दरम्यान हेल्मर हॅन्सन आणि लुंड या दोघांनी एका बोटीतून सिम्प्सन उपसागरातील लहानशा बेटाचा मार्ग धरला. या बेटावर रेनडीयरचे अनेक कळप येत असल्याची अॅमंडसेनला माहीती मिळाली होती. आपल्या मोहिमेवरुन दोघं परत आले तेव्हा त्यांच्या बोटीत शिकार केलेले तब्बल वीस रेनडीयर होते!
२९ सप्टेंबरला ग्जो हेवन इथे घर आणि ऑब्झर्वेटरी बांधून पूर्ण झाली!
३ ऑक्टोबरला आलेल्या जोरदार वादळामुळे ग्जो किनार्याच्या दिशेने ढकललं गेल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आलं. याचा अर्थ स्पष्ट होता. समुद्राच्या पाण्यात टाकलेला नांगर जहाजाला एका जागी स्थिर ठेवू शकत नव्हता! हा प्रकार धोकादायक होता. जोरदार वार्याने जहाज समुद्रात ओढून नेल्यास त्यांच्यावर बेटावर अडकून पडण्याची पाळी येणार होती. खबरदारीचा उपाय म्हणून अॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्यांनी ग्जो किनार्यापासून सुमारे ५० यार्ड बेटावर ओढून आणलं!
ग्जो हेवन इथे घर आणि ऑब्झर्वेटरी बांधून झाली असली तरी इतर अनेक सुविधा आवश्यक होत्या. कुत्र्यांसाठी एक वेगळी झोपडी बांधण्यात आली. नॉर्वेहून आणण्यात आलेले चार कुत्रे आणि गॉडहॉन इथे घेण्यात आलेले दहा कुत्रे तसेच एरिच्सेनने दिलेले चार कुत्रे यांचं एकमेकांशी एक मिनिटही पटत नसे! त्यामुळे या झोपडीत मध्ये पार्टीशन घालून त्यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती! बर्फात एक लहानसं इग्लू बांधण्यात आलं. या इग्लूला एक लहानसं भोक ठेवण्यात आलं. संपूर्ण हिवाळाभर हे भोक उघडं ठेवणं आवश्यक होतं. एखाद्या ठिकाणी आग लागली, तर ती विझवण्यासाठी पाणी उपलब्धं असणं अत्यावश्यक होतं. या इग्लूला अॅमंडसेनने ग्जो हेवन फायर स्टेशन असं नाव दिलं! अँटन लुंड याची या कामावर नेमणूक करण्यात आली. ऑब्झर्वेटरीच्या जोडीला एक वेगवेगळी निरीक्षणं नोंदवण्यासाठी आणखीन एक लहानसं घर उभारण्यात आलं. रिझवेल्ट आणि विल्क यांनी उभारलेल्या या घराला नाव देण्यात आलं मॅग्नेट!
मॅग्नेट
ग्जो हेवन इथे सर्व व्यवस्था जवळपास पूर्ण झालेली असतानाच एक दिवस अॅमंडसेनला दूरवरुन येणारे काही प्राणी दिसून आले. सर्वानी पुन्हा शिकारीसाठी आपल्या बंदुकी सरसावल्या, परंतु सर्वोत्कृष्ट शिकारी असलेल्या हेल्मर हॅन्सनने मात्रं काही क्षणातच ते प्राणी नसून माणसं आहेत असं छातीठोकपणे सांगितलं. काही वेळ त्यांचं नीट निरीक्षण केल्यावर हॅन्सनचा तर्क खरा असल्याचं त्यांना आढळून आलं.
एस्कीमो!
अॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्यांना पाहून एस्कीमोंना आनंद झाला. ग्रीनलंड इथे आढळलेल्या एस्कीमोंच्या तुलनेत हे एस्कीमो खूपच देखणे आणि जास्त सुदृढ होते. हे ओग्लुई एस्कीमो होते. अॅमंडसेनने दिलेल्या रेनडीअरच्या मांसावर ते तुटून पडले.
एस्कीमोंनी अंगात घातलेल्या रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल्या कपड्यांनी अॅमंडसेनचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्या अर्थी इतक्या थंड प्रदेशात राहणारे एस्कीमो हे कपडे घालतात त्या अर्थी ते अतिशय उबदार असतील हा त्याचा अंदाज होता. एस्कीमोंकडून तसे कपडे शिवून घेण्याचा अॅमंडसेनने बेत केला.
या एस्कीमोंचं वसतीस्थान पाहण्याची अॅमंडसेनला उत्सुकता होती. दुसर्या दिवशी ते एस्कीमो परत निघाल्यावर स्लेजवरुन अॅमंडसेनही त्यांच्याबरोबर निघाला! एका मोठ्या दरीत राहत असलेल्या एस्कीमो कँप वर रात्रंभर मुक्काम करुन अॅमंडसेन ग्जो हेवन इथे परतला.
अॅमंडसेनच्या कुत्र्यांपैकी सात कुत्रे दुर्दैवाने ख्रिसमसपूर्वीच मरण पावले. रेनडीयरच्या ताज्या मांसानेही त्यांच्या प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा झाली नव्हती.
ख्रिसमसच्या दुपारी एक एस्कीमो ग्जो हेवन इथे आला. एस्कीमोंच्या कँपमध्ये अॅमंडसेनची त्याच्याशी गाठ पडलेली होती. इतर सर्व एस्कीमोंमध्ये तो फारसा लोकप्रिय नव्हता. आपल्या कुटुंबाला मागेच सोडून इतर सर्व एस्कीमोंची टोळी निघून गेल्याचं त्याने अॅमंडसेनला दु:खद अंतःकरणाने सांगितलं. अॅमंडसेनने त्याला त्याच्या सर्व कुटुंबियांसह ग्जो हेवन इथे येऊन राहण्याची सूचना केली.
१९०४ च्या जानेवारीत अॅमंडसेनच्या तुकडीने आपल्या स्लेज मोहीमांच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी करण्यास सुरवात केली. बर्फावरुन सफाईदारपणे वाटचाल करण्यासाठी कुत्र्यांनी ओढलेल्या स्लेज अथवा स्कीईंग हा सर्वात उत्तम उपाय असल्याची अॅमंडसेनची खात्री होती. परंतु रात्रीच्या मुक्कामासाठी तंबू वापरण्यापेक्षा इग्लू बांधून राहणं हे जास्त सोईस्कर असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. अती थंड वातावरणात तंबूच्या अंतर्भागपेक्षा इग्लू जास्तं उबदार असल्याची त्याला कल्पना आली होती. ग्जो हेवन इथे येऊन राहीलेला एस्कीमो टेरीयू याच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण इग्लू बांधण्याचा सराव करु लागले.
अॅमंडसेनने रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेले कपडे टेरीयूकडून शिवून घेतले होते. हे कपडे आर्क्टीकमध्ये नेहमी वापरल्या जाणार्या लाकडाच्या भुशापासून बनवलेल्या कपड्यांपेक्षा अधिक उबदार असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. तसेच लाकडी कपड्यांच्या आत घातलेले लोकरीचे कपडे कितीही काळजी घेतली तरी भिजतात आणि भिजल्यावर चटकन वाळत नाहीत हे देखील त्याला आढळून आलं. या उलट रेनडीयरच्या कातडीपासून बनवलेले कपडे भिजले तरी सहज आणि बर्याच कमी कालावधीत पूर्णपणे कोरडे होतात हे त्याच्या ध्यानात आलं होतं. कातडीपासून बनवलेल्या या कपड्यांत हवा खेळती राहते आणि वार्याला प्रतिरोध करण्यास हे कपडे उत्कृष्ट असतात!
रेनडीयरच्या कातडीच्या कपड्यात 'सजलेले' अॅमंडसेनचे सहकारी - गॉडफ्रे हॅन्सन, विल्क, लिंड्स्ट्रॉम, रिझवेल्ट, अॅमंडसेन, लुंड आणि हेल्मर हॅन्सन
१ मार्च १९०४ या दिवशी अॅमंडसेन आणि त्याचे सहकारी आपल्या पहिल्या स्लेज मोहीमेवर निघाले. हेल्मर हॅन्सन पहिल्या स्लेजवर होता. या स्लेजला सात कुत्रे होते. अॅमंडसेन, रिझवेल्ट आणि गॉडफ्रे हॅन्सन दुसर्या स्लेजवर होते.
स्लेजवरची ही पहिली मोहीम अवघ्या तीन दिवसांत आटपली. पहिल्या दोन दिवसात मिळून त्यांना अवघ्या सात दिवसांची मजल मारता आली होती. बर्फावरुन स्लेज चालवताना त्याखाली लाकडी रोलर्स वापरणं अत्यावश्यक होतं. एस्कीमोंना उपजत असणारं हे ज्ञान युरोपियनांना नसल्याने अॅमंडसेन आणि इतरांना हा धडा मिळाला! तिसर्या दिवशी दुपारी सर्वजण ग्जो हेवन इथे परतले!
१६ जूनला अॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन स्लेजवरुन दुसर्या मोहीमेवर निघाले. सूर्यामुळे बर्फ वितळून स्लेज हाकणं पूर्वीपेक्षा जास्त सोईचं झालं होतं. ग्जो हेवनवरुन निघाल्यावर जेमेतेम तीन-साडेतीन तासात त्यांनी सात मैलांचं अंतर पार करुन आपलं इग्लू गाठलं. मागे ठेवलेल्या सर्व सामग्रीसह इग्लू अद्यापही सुस्थितीत असल्याचं त्यांना आढळून आलं.
दुसर्या दिवशी इग्लूमधील सामानाची त्यांनी दोन स्लेजमध्ये विभागणी केली. प्रत्येक स्लेजला पाच कुत्रे जोडण्यात आले होते. हॅन्सन आणि अॅमंडसेन दोघंच असल्याने पुढच्या मुक्कामांत इग्लू बांधण्यात बराच वेळ लागण्याची शक्यता होती. त्यामुळे अॅमंडसेनने बरोबर तंबू घेतला होता. काही वेळातच त्यांनी किंग विल्यम बेटाच्या पूर्वेकडे असलेला ला ट्रॉब उपसागर गाठला. गोठलेल्या बर्फावरुन प्रवास करत त्यांनी उपसागर ओलांडला आणि एका लहानशा टेकडीच्या आडोशाला तंबू ठोकला.
मात्रं तंबूत मुक्काम करणं हे इग्लूतील मुक्कामापेक्षा कितीतरी त्रासदायक ठरलं होतं! इग्लूमध्ये असलेला उबदारपणा इथे नावालाही नव्हता. आपल्या स्लिपींग बॅग्जमधे दोघंही पार गारठून गेले होते!
दुसर्या दिवशी पुढे निघाल्यावर दोघांनाही हायसं वाटलं! उत्तरेला मॅटी बेटाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होती. केप फ्रेड्री़क इथे आपल्या सामग्रीचा डेपो उभारण्याचा अॅमंडसेनचा विचार होता. सकाळी दहाच्या सुमाराला त्यांनी दोन्ही स्लेज एकत्र बांधल्या. या भागात एस्कीमोंचा वावर मात्र अद्यापही दिसून आला नव्हता.
ते पुढे निघण्याच्या तयारीत असतानाच हॅन्सनच्या तीक्ष्ण नजरेला दूरवर एक काळा ठिपका दिसला!
एस्कीमो!
काही वेळातच ३४ एस्कीमोंच्या तुकडीशी त्यांची भेट झाली. हे सर्वजण नेचिली एस्कीमो होते. सीलच्या शिकारीसाठी एस्कीमोंची ही टोळी उत्तरेला निघालेली होती. त्यापैकी प्रत्येकापाशी भाला होता आणि जोडीला दोरी बांधलेला कुत्रा! त्याखेरीज प्रत्येकाजवळ लांब पात्याचा सुरा होता! आधी भेटलेल्या ओग्लुई एस्कीमोंपेक्षा हे एस्कीमो बरेच स्वच्छ असल्याचं आणि अधिक चांगल्या पोशाखात असल्याचं हॅन्सनचं मत होतं!
अॅमंडसेनने त्यांच्या तळावर जाण्याची इच्छा प्रदर्शित करताच एस्कीमोंना अत्यानंद झाला! आपल्याजवळील सारे कुत्रे त्यांनी अॅमंडसेनच्या दोन स्लेजना जोडले आणि ते आपल्या तळाकडे निघाले! ज्या वेगाने कुत्रे स्लेज ओढत धावत होते, त्याच वेगाने एस्कीमो धावत असल्याचं अॅमंडसेनच्या ध्यानात आल्यावर तो थक्कं झाला!
एस्कीमोंच्या तळावर पोहोचल्यावर अॅमंडसेन आणि हॅन्सेनचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुरवातीच्या स्वागताचा भर ओसरल्यावर दोघे रात्रीच्या निवार्यासाठी इग्लू बनवण्याच्या तयारीला लागले. आदल्या रात्रीप्रमाणे पुन्हा तंबूचा आसरा घेण्याची त्यांची तयारी नव्हती! त्यांना इग्लू बनवताना पाहून एस्कीमोंना आश्चर्याचा धक्काच बसला! आपली परंपरागत कला युरोपियनांनी आत्मसात केलेली पाहून त्यांना आनंदाचं भरतं आलं! मोठ्याने ओरडत आणि टाळ्या वाजवत झाडून सारे एस्कीमो दोघांच्या मदतीला धावले! अवघ्या अर्ध्या तासात दोघांसाठी प्रशस्तं इग्लू तयार झालं होतं!
एस्कीमोंच्या तळावर अॅमंडसेनची अटीक्लेरा नाव्याच्या तरुण आणि उमद्या एस्कीमोशी गाठ पडली. एस्कीमोच्या संपूर्ण टोळीतील हा एस्कीमो अत्यंत नीटनेटका असल्याचं त्याला आढळलं. आपल्यापाशी असलेली रेनडीयरची उत्तम कातडी आणि त्यापासून बनवलेले काही कपडे त्याने अॅमंडसेनला भेट म्हणून दिले! त्याखेरीज हिम अस्वलाचं (पोलर बेअर) एक उत्कृष्ट कातडंही त्याने अॅमंडसेनला दिलं! हॅन्सनवरही भेटींचा असाव वर्षाव झाला होता!
इग्लूतील वास्तव्य आणि नेचिली एस्कीमो
दुसर्या दिवशी सकाळी अॅमंडसेन-हॅन्सनने पुढची वाट पकडली. अटीक्लेराने आपले दोन कुत्रे अॅमंडसेनला उसने दिले होते! अटीक्लेराचा धाकटा भाऊ पोएटा त्यांचा वाटाड्या म्हणून बरोबर होताच!
पोएटाने दाखवलेल्या वाटेने बर्फाच्या टेकड्या टाळून त्यांची वाटचाल सुरु होती. दुपारी चारच्या सुमाराला गोठलेल्या बर्फाच्या जाड थरावर पोएटाने रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. धुक्याचा पडदा दूर झाल्यावर त्यांना मेटी बेटाचं दर्शन झालं! सुमारे तासाभरातच इग्लू तयार करुन त्यांनी त्यात रात्रीचा मुक्काम ठोकला.
दुसर्या दिवशी खडतर वाटचालीनंतर अॅमंडसेन, हॅन्सन आणि पोएटा यांनी सहा इग्लूंची आणखीन एक एस्कीमो वस्ती गाठली, मात्रं इथे रात्रीचा मुक्काम केल्यावर अॅमंडसेनने मागे फिरुन नेचिली एस्कीमोंच्या कँपजवळ आपला डेपो उभारण्याचं निश्चीत केलं!
नेचिली एस्कीमोंशी अॅमंडसेनची घनिष्ठ मैत्री झाली होती. त्यांच्या वसाहतीत तो मनमोकळेपणे भटकत असे. इतकंच काय तर त्यांच्याबरोबर सीलच्या शिकारीच्या मोहीमेवरही तो आणि हॅन्सन जाऊन आले होते. प्रचंड वार्यात आणि हिमवादळ सुरु असतानाही एस्कीमोंना दोन सीलची शिकार करण्यात यश आलं होतं.
२५ मार्चला अॅमंडसेनने एस्कीमोंच्या तळापासून काही अंतरावर आपला डेपो उभारला. एका मोठ्या इग्लूमध्ये आवश्यक ती सामग्री त्याने जमा करुन ठेवली. एस्कीमोंना त्या डेपोवर लक्षं देण्याची त्याने विनंती केल्यावर सर्वांनी आनंदाने होकार दिला!
२६ मार्चला अॅमंडसेन आणि हॅन्सन ग्जो हेवनला परतले.
दरम्यान अॅमंडसेन-हॅन्सन ग्जो हेवनहून निघाल्याच्या दुसर्या दिवशीच गॉडफ्रे हॅन्सन आणि रिझवेल्ट हे ग्जो हेवनहून जवळच असलेया बेटांचा दौरा करण्यास निघाले होते. पूर्वी भेटलेल्या ओग्लुई एस्कीमोंकडून या बेटांवरच सीलची नियमीत शिकार करत असल्याची त्यांना माहीती मिळालेली होती. अॅमंडसेन आणि हॅन्सन ग्जो हेवनला पोहोचल्यावर काही वेळातच गॉडफ्रे हॅन्सन आणि रिझवेल्ट हे देखील ग्जो हेवन इथे पोहोचले. त्यांच्या जोडीला टेरीयूच्या टोळीतले तीस एस्कीमोही होते! त्या दोन्ही बेटांवर हॅन्सन-रिझवेल्ट यांची एस्कीमोंशी गाठ पडली होती!
या एस्कीमोंकडून टेरीयूचा खोटारडेपणा अॅमंडसेनला कळून आला. आपल्याला इतरांनी मागे सोडून दिल्याची त्याने बतावणी केली असली तरी प्रत्यक्षात तो स्वतः मुद्दाम मागे राहीला होता! ग्जो हेवनपासून जवळच एका गुप्त ठिकाणी त्याने मारलेले चार रेनडीयर लपवून ठेवले होते! टेरीयूबद्दल ही माहीती मिळाल्यावर अॅमंडसेन काहीसा रागावलाच, परंतु टेरीयूकडून त्यांना इग्लू बांधण्याच्या कलेचं ज्ञान मिळाल्याने अॅमंडसेनने तो विषय जास्तं ताणून धरला नाही!
६ एप्रिलला अॅमंडसेन पुन्हा एकदा स्लेजवरुन मोहीमेला निघाला! या खेपेला त्याच्या बरोबर रिझवेल्ट होता. त्या दोघांव्यतिरीक्त टेरीयू आणि च्कोचनेली एस्कीमो आपापल्या कुटुंबांसह निघालेल होते. सीलच्या शिकारीचा त्यांचा बेत होता.
दिवसभराच्या वाटचालीनंतर नेचिली एस्कीमोंच्या अब्वा या वस्तीस्थानापासून जवळच असलेला आपला डेपो त्यांनी गाठला. डेपो सुस्थितीत असल्याचं आढळल्यावर अॅमंडसेनला हायसं वाटलं. नेचिली एस्कीमोंच्या प्रामाणिकपणाचाही त्याला प्रत्यय आला. डेपोतील लाकडं आणि अनेक लोखंडी वस्तूंच्या त्यांना उपयोग होण्यासारखा असूनही एकही वस्तू चोरीला गेलेली नव्हती!
९ एप्रिलच्या संध्याकाळी अॅमंडसेन आणि रिझवेल्ट यांनी मॅटी बेटावरील केप हार्डी गाठलं. चुंबकीय उत्तर धृवाचं स्थान निश्चीत करण्याच्या दृष्टीने इथे एक निरीक्षण करण्याची अॅमंडसेनची योजना होती. दिवसातून किमान दोन वेळा अॅमंडसेने चुंबकीय निरीक्षणांची नोंद करत होता. सलग ५ दिवस निरीक्षणं नोंदवल्यावर १५ एप्रिलला त्यांनी पुढचा मार्ग धरला.
१५ एप्रिलला दाट धुक्यातून वाट काढतानाच अचानक भुतासारखे दोन एस्कीमो त्यांच्यासमोर अवतरले. या एस्कीमोंची नेचिली एस्कीमोंच्या वस्तीपासून उत्तरेला अॅमंडसेन आणि हॅन्सनची गाठ पडली होती. त्या दोघांबरोबर त्यांच्या वस्तीवर आल्यावर केवळ हे दोन एस्कीमो, एक म्हातारी आणि लहान मुलगा वगळता इतर सर्वांनी तिथून मुक्काम हलवल्याचं अॅमंडसेनला दिसून आलं. दुसर्या दिवशी उत्तरेला झालेल्या हिमवादळामुळे त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग खुंटला होता. दोघा एस्कीमोंपैकी एकाला बरोबर घेऊन रिझवेल्ट ग्जो हेवनकडे परतला. रिझवेल्टचं घड्याळ नादुरुस्तं झालं होतं! त्यांच्याजवळ दुसरं घड्याळ नसल्याने १०८ मैलांचं अंतर कापून ग्जो हेवन गाठण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. २० एप्रिलच्या संध्याकाळी घड्याळ घेऊन तो दुसर्या एस्कीमोसह परतला!
२२ एप्रिलला अॅमंडसेन आणि रिझवेल्ट यांनी मॅटी बेटाच्या पलीकडच्या भागात असलेली एस्कीमोंची वस्ती गाठली. ही वस्ती बुथिया आखाताला अगदी लागूनच होती. आतापर्यंतच्या निरीक्षणावरुन चुंबकीय उत्तर धृवाचं स्थान जेम्स क्लार्क रॉसच्या काळात होतं त्यापेक्षा निश्चीतच बदललं आहे अशी अॅमंडसेनची खात्री झाली होती. वुथिया आखातातून दक्षिणेचा मार्ग धरुन १८३१ मध्ये ज्या व्हिक्टोरीया बंदरात जॉन रॉसचं जहाज अडकलं होतं तिथपर्यंत जाण्याची अॅमंडसेनची इच्छा होती. परंतु त्या मार्गावर असतानाच ७ मे ला अॅमंडसेनचा डावा पाय अचानक दुखू लागला. पायाचं हे दुखणं इतकं बळावलं, की १२ मे पासून तब्बल ५ दिवस त्याला झोपून राहवं लागलं होतं! अखेर निरुपायाने १८ मे ला अॅमंड्सेन आणि रिझवेल्ट यांनी परतीचा मार्ग पत्करला!
अॅमंडसेन बरोबर असलेल्या कुत्र्यांपैकी दोन कुत्रे या दरम्यान गायब झालेले होते! बुथिया आखातातून माघार घेऊन २१ मे ला त्यानी आपला डेपो गाठला आणि तिथली अवस्था पाहून ते चकीतच झाले.
मॅटी बेटावर गाठ पडलेल्या दोन एस्कीमोंनी डेपोमधील सामग्रीवर चांगलाच हात मारलेला होता! जेमतेम थोडीशी सामग्री तिथे शिल्लक होती! ग्जो हेवनला पोहोचेपर्यंत त्या सामग्रीवर तग धरण्यापलीकडे मार्ग नव्हता! सुदैवाने कोणतीही अडचण न येता दोघं २७ मे ला ग्जो हेवन इथे पोहोचले!
अॅमंडसेन आणि रिझवेल्ट स्लेजवरुन मोहीमेला गेलेले असताना ग्जो हेवन इथे मागे असलेले त्यांचे सहकारी आपापल्या कामात मग्नं होते. गॉडफ्रे आणि हेल्मर या हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनवरुन दृष्टीस पडणार्या प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर आणि परिसरात केर्न उभारलेले होते. नैम्यूर आखाताच्या परिसरात सर्वत्र केर्न्सचं जाळं पसरलेलं दिसत होतं! अँटन लुंडने अविश्रांत मेहनत करून फायर स्टेशनला पाण्याचा पुरवठा सतत चालू राहील याची काळजी घेतली होती. १२ फूट उंचीचा बर्फ साचलेला असूनही पाण्याचा स्त्रोत गोठून न देण्यात त्याने यश मिळवलं होतं. विल्कचं चुंबकीय निरीक्षणांचं काम व्यवस्थित सुरू होतं. लिंडस्ट्रॉमने पाककौशल्याच्या जोडीला शिकारीतही प्राविण्य मिळवलं होतं!
५ जूनला अॅमंडसेन, रिझवेल्ट, गॉडफ्रे आणि हेल्मर हॅन्सन पुन्हा एकदा स्लेजवरुन मोहीमेला निघाले. ग्जो हेवनवरुन हिवाळ्यात निरीक्षण केलेल्या दोन बेटांचं पूर्ण सर्वेक्षण करणं आणि तिथे चुंबकीय निरीक्षणांची नोंद करण्याची त्यांची योजना होती. त्यांच्या जोडीला दोन एस्कीमो होते.
रात्री १०.०० च्या सुमाराला त्यांनी ग्जो हेवन सोडलं आणि अच्लिच्टू बेटाची वाट धरली. १८५९ मध्ये फ्रान्सिस मॅक्लींटॉकच्या मोहीमेने या बेटाची प्रथम नोंद केली होती. (या बेटांचं पुढे होगार्ड बेटं असं नामकरण झालं). बर्फाने वेढलेल्या या बेटावर पोहोचल्यावर अॅमंडसेन आणि इतरांना बर्फाच्छादीत नसलेला जमिनीचा तुकडा दिसताच अतिशय आनंद झाला. गेल्या कित्येक महिन्यांनंतर ते मातीचा स्पर्श अनुभवत होते! उन्हाळ्याला सुरवात होत असल्याने या बेटावर शिकारही विपुल प्रमाणात उपलब्धं होती.
हॅन्सन जोडगोळीने बेटाचं सर्वेक्षण पूर्ण केलं आणि जवळच असलेल्या दुसर्या बेटाची वाट धरली, परंतु ते बेट बरंच लांब असल्याचं आणि खोलगट भागात असल्याचं त्यांना आढळून आलं. दरम्यान अॅमंडसेन - रिझवेल्टने आपलं चुंबकीय निरीक्षणांचं काम सुरु ठेवलं होतं. एक दिवस अॅमंडसेन कामात मग्नं असताना इग्लूचं छत अचानक धाडदिशी खाली कोसळलं! सुदैवाने कोणतीही दुखापत न होता तो बचावला!
१० जूनला अॅमंडसेनच्या तुकडीने दुसर्या बेटाचा मार्ग धरला. या बेटाचं सर्वेक्षण करुन आणि चुंबकीय निरीक्षणं नोंदवून १५ जूनला पहाटे ते ग्जो हेवनवर परतले.
ग्जो हेवनला परतलेली अॅमंडसेनची तुकडी ग्जो चं बदललेलं रुप पाहून चकीतच झाले! अविश्रांत मेहनत घेऊन लिंडस्ट्रॉमने ग्जो वरील बर्फाचे थर पूर्णपणे खरवडून काढले होते! डेक पूर्ण चकाचक केलेला होता! रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेले संपूर्ण हिवाळाभर वापरलेले दिवे आता दिसेनासे झाले होते! बाहेरील थंडगार वारं आत शिरू नये म्हणून जहाजावर घातलेला जाड वायुविरोधी कातड्यांचा थर अदृष्य झालेला होता. जहाजात सर्वत्र मोकळी हवा खेळती झाली होती!
एस्कीमोंच्या अनेक टोळ्या ग्जो हेवनच्या परिसरात आजूबाजूला पसरल्या होत्या. अनेक एस्कीमोंनी नव्याने इग्लू बांधलेली होती. त्यांची मासेमारी आणि शिकारी जोरात सुरु होत्या. अॅमंडसेनच्या संपूर्ण तुकडीला त्यांच्याकडून रोज ता़जं मांस किंवा मासे विकत घेता येत असत!
हिवाळ्यातील आपल्या मोहीमेच्या दरम्यान गाठ पडलेल्या नेचिली एस्कीमोंमधील नैतिक मूल्ये अतिशय उच्च असल्याचं अॅमंडसेनला आढळून आलं. स्त्रिया या आपल्या पतीच्या अर्ध्या वचनात असल्याचं आणि दुसर्यांच्या बायकांकडे पुरुष ढुंकूनही पाहत नसल्याचं निदर्शनास आल्याने एस्कीमोंच्या संस्कासांबद्दल आणि नैतिकतेबद्दल त्याच्या मनात खूप आदर निर्माण झाला होता.
परंतु उन्हाळ्यात मात्रं एस्कीमोंचं वेगळंच रुप त्याच्या नजरेस पडलं!
मासे आणि इतर शिकारींबरोबर एस्कीमो आपल्या बायकांचाही खुलेपणाने सौदा करण्यास तयार होते. अॅमंडसेनच्या तुकडीला बायका - मुलींची खरेदी करण्याची उघड 'ऑफर' देण्यात येत होती! कहर म्हणजे त्यांचे नवरे, बाप आणि भाऊच त्यांना एखाद्या वस्तूप्रमाणेच विकण्यास तयार होते! एस्कीमोंच्या या पूर्णपणे बदललेल्या मानसिकतेवर काय बोलावं हे कोणालाच कळेना!
१७ जूनला अॅमंडसेन आणि रिझवेल्ट पुन्हा स्लेजवरुन आपल्या मोहीमेवर निघाले. ग्जो हेवन आणि आसपासच्या प्रदेशातील विविध ठिकाणाहून चुंबकीय निरीक्षणं नोंदवण्याची अॅमंडसेनची योजना होती. चुंबकीय धृवाचं नेमकं स्थान निश्चीत करण्यासाठी शक्यं तितकी निरीक्षणं नोंदवण्याचा त्याचा इरादा होता.
दोन एस्कीमोंसह रात्रभराच्या प्रवासानंतर पहाटेच्या सुमाराला त्यांनी अॅब्रझी पॉइंट गाठला. अॅब्रझी पॉईंट इथे निरीक्षण नोंदवल्यावर त्यांनी स्वाट्का उपसागराच्या टोकाच्या दिशेने मार्गक्रमणा सुरु केली. या उपसागराच्या ऊतरेला असलेल्या टेकडीचा माथा गाठल्यावर अॅमंडसेनने पुन्हा चुंबकीय निरीक्षणांची नोंद केली. आणखीन उत्तरे-पश्चिमेला मजल मारून त्यांनी दुसर्या एका टेकडीचा माथा गाठला. या टेकडीला अॅमंड्सेनने विल्कचं नाव दिलं! या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या सरोवराला रिझवेल्टचं नाव देण्यात आलं. विल्कच्या टेकडीवरुन दुसर्या एका टेकडीवर त्यांनी चढाई केली. तिथे निरीक्षणं नोंदवल्यावर २६ जूनच्या सुमाराला ते ग्जो हेवनला परतले.
या मोहीमेनंतर अॅमंडसेन दोन एस्कीमोंसह एकटाच पुन्हा बाहेर पडला. आणखीन तीन ठिकाणी चुंबकीय निरीक्षणं नोंदवल्यावर १८ जुलैला तो ग्जो हेवनला परतला. अॅमंडसेनने आणखीन एक मोहीम केली, परंतु ही मोहीम स्लेजवरुन न करता लहानशा बोटीतून करण्यात आली. हेल्मर हॅन्सनचं नाव दिलेल्या टेकडीवर त्याने मुक्काम ठोकला होता.
अॅमंडसेन या टेकडीवर असतानाच हॅन्सन जोडगोळी एका बोटीसह तिथे पोहोचली! १९०५ च्या वसंत ऋतूमध्ये व्हिक्टोरीया बेटाच्या पूर्व किनार्याची मोहीम करण्याच्या दृष्टीने डेपो उभारण्याची त्यांची योजना होती. दुसर्या दिवशी अॅमंडसेनसह त्यांनी बोटीतून पश्चिमेचा मार्ग धरला. परंतु १० मैलांवर बर्फाने वाट अडवल्यावर त्यांनी परतून हॅन्सन टेकडी गाठली! तीन वेळा प्रयत्न करुनही पुढे जाण्यात अपयश आल्यावर आपल्या सहकार्यांना त्यांच्या कामगिरीवर सोडून अॅमंडसेनने ग्जो हेवन गाठलं.
ग्जो हेवनच्या परिसरात असलेल्या सर्व एस्कीमोंनी आपला मुक्काम हलवला होता. त्यामुळे अॅमंडसेनच्या तुकडीव्यतिरीक्त आता तिथे कोणीच नव्हतं.
अॅमंडसेनने एका एस्कीमोसह बुथिया आखाताचा मार्ग धरला. जॉन रॉसच्या मोहीमेतील व्हिक्टोरीया बंदर गाठण्याचा त्याचा बेत होता. एका लहानशा बोटीतून त्याने बुथिया आखात गाठलं, पण गोठलेल्या बर्फाने त्याचा मार्ग रोखून धरला होता. नाईलाजाने तो ग्जो हेवनला परतला.
अॅमंडसेन म्हणतो,
"ही माझी मोहीम म्हणजे एखादी मोहीम कशी आखू नये याचा उत्तम नमुना होता! ती अयशस्वी ठरली यात काहीच आश्चर्य नव्हतं!"
७ सप्टेंबरला हॅन्सन जोडगोळी ग्जो हेवनवर परतली. १०० मैलांची मजल मारुन केप क्रोझीयर इथे डेपो उभारणीची आपली मोहीम फत्ते करुनच दोघे परतले होते! जहाज जाण्याच्या दृष्टीने सिम्प्सन सामुद्रधुनीचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं होतं. किंग विल्यम बेट आणि एटा बेट यामधील खाडी अतिशय चिंचोळी असल्याचं त्यांना आढळलं होतं. या खाडीचा तळ अत्यंत उथळ असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं होतं. परंतु एटा बेट आणि अमेरीकेचा मुख्य भूभाग यातील खाडी बर्फाने भरलेली असली, तरी उन्हाळ्यात जहाज जाऊ शकेल इतपत खोल होती!
याचा अर्थ एकच होता...
नॉर्थवेस्ट पॅसेज पार करणं शक्यं होतं!
बर्फाने तो कायमचा बंदीस्तं असल्याचं ब्रिटीशांचं अनुमान चुकीचं होतं!
हॅन्सन जोडगोळीला एका ठिकाणी दोन हाडांचे सापळे आढळून आले होते. हे सांगाडे युरोपियनांचे होते हे त्यांच्या वेशभूषेवरुन दिसून येत होतं. अर्थातच हे दोघे जॉन फ्रँकलीनच्या तुकडीचे सदस्य होते. दोघांनी त्यांचे सांगाडे वाळूत पुरले आणि त्यावर एका केर्नची उभारणी केली.
२१ सप्टेंबरच्या रात्री ग्जो जवळपास अर्ध बर्फात वेढलं गेलं होतं! अॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्यांचा आर्क्टीकमधला दुसरा हिवाळा सुरु झाला होता!
क्रमशः
हा ही भाग छानच
हा ही भाग छानच