गज्याच्या दुकानातील चोरीचा छडा लावून अर्धं वर्ष होऊन गेलं होतं तरी गोपीकडे एकही केस नव्हती. आपलं तपासकामाचं दुकान बंद करावं लागेल की काय? अशी गोपीला भिती वाटू लागली.
दरम्यानच्या काळात आपल्या घराची आईने हरवलेली चावी हुडकून गोपीने घरचं कार्य केलं होतं तेवढंच.
आपल्यातलं बाँडपण गंजून गेलं तर.... या विचाराने गोपी कासावीस झाला होता.
एप्रिल महीन्यातली एक टळटळीत दूपार.
आप्पा कांबळे झोकांड्या खात गोपीच्या ओटीवर बसला.
"गोपी.... स्वारी....बांड.... कुनीतरी भो**च्यानी माझा चपलांचा नवा जोड चोरला. मायला मला अनवानी चालायला लावणार्याच्या पायाला नारू होईल नारू." तारवटलेल्या डोळ्यांनी गोपीकडे पाहत आप्पा बोलत होता.
ओटीच्या एका टोकाला असलेल्या खांबाला टेकून बसलेल्या गोपीच्या बापाला आप्पाचा हेवा वाटत होता. गेले दोन दिवस त्याचा गळा कोरडाठक होता. बापूकडील कुजलेल्या गुळावर प्रक्रिया केलेलं पेय पिण्याच्या इच्छेनं गोपीच्या वडलांच्या हातापायाला कापरं भरलं.
'आप्पांच्या पायात जोडा' हाच मुळात मोठा विनोद होता. आप्पांच्या पायात जोडा पाहील्याचं शपथेवर सांगणारा इसम बंडलवाडीत सापडणं मुश्किल.
"आप्पा तुम्ही कधी चपला घालायला लागलात?" गोपीला या केसमध्ये अजिबात रस नव्हता.
"अरे कुश्यानी बुधवारी तालूक्याच्या बाजारातून आणला होता जोड. काल मारूतीच्या देवळात गेलो तर जोड गायप ! देवा मारूतीराया, नारूचं जमलं नाय तर, बाभळीचा काटा तरी रूतू दे त्या भेन**च्या पायात." आप्पांच्या रागाचा पारा आणि त्यांच्या शरीरातली बापूकडची दारू दोन्ही चढत चालले होते.
काल हनुमान जयंती होती. त्यानिमित्ताने मारूतीच्या देवळात अख्खी बंडलवाडी लोटली होती. तिथुनच आप्पांच्या चपलांना पाय फुटले असावेत, असा तर्क काढून गोपीने आप्पांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचं ठरवलं.
सदर जोड्याचा तपास लावला तरी आपल्या हाती दिडकीही मिळणार नाही, हे ठाऊक असूनदेखील गोपीने केवळ आपल्यातला बाँड जिवंत राहावा म्हणून ही केस स्वीकारायचं ठरवलं.
"मला सांगा, कशा होत्या चपला?"
"प्यारेगॉनच्या होत्या.... निळ्या पट्टेवाल्या."
या वर्णनाच्या चपला उभ्या बंडलवाडीत पायापायात आढळतील, हे ज्ञात असलेल्या गोपीने या तपासकामात आपल्या पायीचा जोडा झिजू नये म्हणून आप्पांवर प्रश्नाचा दूसरा चेंडू फेकला.
"त्या चपलांवर कसली खूण केली होतीत का?"
"म्हंजे निशानी ना?" दारू आप्पांच्या मेंदूला पोचली असावी.
"होय. तेच ते. म्हणजे चपलांवर ऑइलपेंटच्या एखाद्या रंगाचा ठिपका असं काही.."
"मला शिकवू नको. कळतं मला. मी काय ढोसून नाय आलोय." आप्पांच्या या धमकीने गोपीच्या चेहर्याचा रंग उडाला. ठिपकादेखील उरला नाही.
"कोयत्याला तापवून दोन्ही चपलांच्या आंगठ्याजवळ डाग दिले होते." आप्पांनी निशाणी सांगितली.
"हे बरं केलंत. तसंही ठिपक्यांपेक्षा 'डाग अच्छे है'." गोपीचा विनोद आप्पांच्या मुलासारखा वाया गेला.
आप्पांचे एकमेव चिरंजीव कुशल उर्फ कुशा यांचं म्हात्रे गुर्जींची कन्या वैजंती हिसबरोबर शालेय दिवसांपासून 'गुटर्गु' सुरू आहे. म्हात्रे गुर्जींना अर्थातच हे पसंत नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'वैजंतीने एकवेळ गाढवाशी लग्न करावं. 'कुशल'सोबत राहून तिचं कधीच 'मंगल' होणार नाही.'
'वैजंती'साठी ते एक 'माला'माल स्थळ शोधत होते.
*
त्या डागाळलेल्या चपला शोधणं तसं फार काही अवघड नव्हतं. आपल्या डिटेक्टीव्हच्या पोशाखात गोपी बंडलवाडीत हिंडू लागला. रस्त्याने येणार्या-जाणार्यांच्या पायातील चपला निरखू लागला. कधी चपलांवर डाग असायचे पण त्या निळ्या पट्ट्यांच्या नसायच्या, तर कधी निळ्या पट्ट्यांच्या चपलांवर डाग नसायचे.
सबंध गावातील चपला एकाच ठिकाणी पाहण्याची संधी तो शोधत होता आणि अशी संधी लवकरच त्याला मिळाली. बबन चोगल्याचा मुलगा हरचन याच्या लग्नाची पत्रिका गोपीच्या घरी आली. लग्नाघरी सर्वांच्या चपला धूळ झाडून जातातच. आप्पांच्या पायातला जोड तिथेच सापडेल.
लग्नाचा दिवस उजाडला. गोपी हरचनच्या घरी गेला. तिथल्या ओटीवर त्याला हरतर्हेच्या खुणा केलेल्या चपला पाहावयास मिळाल्या. कुणी चपलांत स्क्रु रूतवून ठेवला होता तर कुणी आपल्या नावाचं इनिशियल कोरून ठेवलं होतं.
त्यात कुठेही आप्पांच्या चपला दिसत नव्हत्या. तो वैतागला. भिंतीवरून कौलांकडे पळणार्या पालीकडे तो पाहत होता. इतक्यात त्याला वाश्यामध्ये खोचलेल्या आप्पांच्या चपला दिसल्या. पालीला त्याने 'थँक्यु' असे इंग्रजी भाषेत धन्यवाद दिले. त्या चपला पिशवीत भरून तो आप्पांच्या घरी गेला नि त्या त्यांच्या हवाली केल्या. आप्पांनी एक रायवली आंबा देऊन त्याची बोलवण केली.
केस निकालात निघाल्यामुळे गोपी हरचनच्या लग्नाला जायला मोकळा झाला. हरचनला शेजारच्या गावातल्या सरपंचाची पोरगी केली होती.
लग्न मोठ्या थाटात पार पडलं.
*
लग्नाच्या दुसर्याच दिवशीची गोष्ट.
गोपी परसाकडे निघाला होता. दुरूनच त्याला कुशा नि वैजंती आपल्या घराकडे येताना दिसले.
'आता यांचं काय काम असावं आपल्याकडे? काही चोरीला गेलं असेल तर शोधून देईन पण तुमच्या लफड्यात आपण पडणार नाही बुवा.'
मागे कधीतरी कुशा थट्टेत म्हणाला होता, "गोपी, वैजंतीने मेरी नींद, मेरा चैन चुराया है. जा शोधून आण."
ती दोघं जवळ येताच गोपी भानावर आला. आपल्या हातातील टमरेल त्याने खाली ठेवलं. वैजंतीकडे पाहताच नुसत्या बनियन नि बरमुड्यानिशी उभ्या असलेल्या गोपीला कससंच झालं.
"गोपी, थोडा वेळ कळ सोसशील का?" टमरेलाकडे पाहत कुशा बोलला.
"बोल. मला घाई नाही." वैजंतीची नजर चुकवत गोपी.
"अरे हिच्या पप्पांच्या चपला कुणीतरी लंपास केल्या." वैजंतीने नुसतीच मान हलवली.
'पुन्हा चपलांचीच केस. आपलं करीयर चपलांसारखचं माती खात राहणार की काय?' गोपीनं कळ दाबली.
"तू शोधून दिल्यास तर मला खूप मदत होईल."
कुशाचा हेतू स्वच्छ होता. चोरीला गेलेल्या चपला शोधून दिल्या तर म्हात्रे गुर्जींच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण होईल, असं त्याला वाटत होतं.
"कुठून चोरीला गेल्या चपला?" यश्टी स्टँडवरील वडापावच्या गाडीवर बटाटेवडे तळणार्या सदानंदच्या पोशाखात असलेल्या गोपीने विचारले.
"काल हरचनच्या घरी गेले होते. तिथूनच कुणीतरी ढापल्या."
बंडलवाडीत कुणीएक भामटा जन्माला आलाय आणि तोच लोकांच्या चपला चोरून त्यांना वात आणतोय, असा गोपीला संशय आला.
"कशा होत्या चपला?"
"पॅरेगॉनच्या होत्या... निळ्या पट्टेवाल्या...आणि नवीनच होत्या." वैजंतीला कंठ फुटला.
"त्या चपलांच्या अंगठ्याजवळ तापवलेल्या कोयत्याने डाग तर दिले नव्हते?" गोपीने अंधारात दगड भिरकावून दिला.
"अय्या ! तुला कसं कळलं?" अंतर्ज्ञानी गोपीचं हेही कौशल्य पाहून वैजंती फार म्हणजे भलतीच खूश झाली. कुशाचा मात्र जळफळाट होत होता.
गोपीच्या पोटात जोरात कळ येऊन गेली. 'त्या चपला आपणच उचलल्या' हे सांगण्याचं धाडस गोपीला होईना.
"त्या चपला कुश्याच्या बाबांकडे आहेत." बस्स ! एवढचं बोलून गोपीने टमरेल उचललं नि तो किंदल नदीकडे पळत सुटला.
*
म्हात्रे गुर्जींच्या चपला त्यांना परत मिळाल्या. आप्पांच्या त्या कधी नव्हत्याच म्हणा. परंतू या चप्पल प्रकरणामुळे म्हात्रे गुर्जींच्या कुशावरील रागात उलट भरच पडली. पाहुण्यांच्या चपलेने विंचू मारावा म्हणतात, गुर्जींनी आपल्याच चपलेनं कुश्याच्या पिरतीचा विंचू चेचला.
हल्ली कुशादेखील पायात जोडे घालत नाही म्हणतात.
***
मी
मी पहिला...................छान मस्त कथा.
(No subject)
बंडलवाडीचा बाँड - नाव मस्त
बंडलवाडीचा बाँड - नाव मस्त आहे
पुलेशु
मस्त कथा
मस्त कथा
लय भारी
लय भारी
लय भारी+1
लय भारी+1
ज ब र द स्त
ज ब र द स्त
ज ब र द स्त
एक से एक कोट्या केल्या आहेत