रूट्स

Submitted by पूनम on 22 September, 2014 - 03:15

नॉयडामधल्या मे महिन्यातल्या असह्य उकाड्याच्या एका रविवारी अविनाश त्याच्या घरातल्या छोट्या टेरेस गार्डनमध्ये बागकाम करत होता. नवीन माती कुंड्यांमध्ये घालायची होती, जुनी एकसारखी करून परत वापरायची होती, खतं घालायची होती, एखाद-दुसरं नवीन रोप लावायचं होतं, जुनी वाळलेली रोपं काढून टाकायची होती अशी कितीतरी कामं होती. टेरेसभर पसारा झाला होता नुसता. गेल्या वर्षी लावलेल्या मोगर्‍याच्या दोन रोपांचा नुसता सांगाडाच उरला होता. ती त्याने समूळ उपटून बाजूला ठेवली होती आणि कुंडीतली माती साफ करत होता. इतक्यात साहिल खेळत खेळत त्याच्यापाशी आला. त्याची नजर टेरेसमधल्या सर्व पसा-याकडे गेली. त्या उपटलेल्या रोपांकडे लक्ष जाताच त्याला गंमत वाटली.
"बाबा, हे बघा, याला खाली पण झाड आलंय.." तो म्हणाला.
अविनाशला तंद्रीत आधी समजलंच नाही काही.
"अं? काय म्हणालास?"
"हे बघा ना बाबा, हे झाड. वर कशा नुसत्या काड्या आहेत. तशाच खाली पण आहेत.."
अविनाशने पाहिलं. साहिल त्या रोपाच्या मुळांबद्दल बोलत होता.
"अरे ती त्याची मुळं! झाड नाही काही ते. ’रूट्स’ शिकला आहेस ना तू? ही ती रूट्स. झाड मोठं मोठं होत जातं ना, तशी मातीखाली ही मुळंही लांब वाढतात आणि झाडाला स्ट्रॉंग करतात. समजलं?"
"पण ह्याची रूट्स नव्हती ना इतकी स्ट्रॉंग? असती तर हे झाड असं सुकलं नसतं.."

त्याची समज बघून अविनाशला आनंद झाला.. अनुजा नेहेमीच त्याच्या बागकामाच्या छंदाला ’वेळ जात नाही म्हणून केलेले उद्योग’ म्हणत असे. पण त्याला बागेची मनापासून आवड होती. कुंड्यांमधून का होईना, पण त्याच्या टेरेसमध्ये त्याने त्याची छोटीशी बाग फुलवली होती. साहिल मात्र दर वेळी तो बागेत काम करत असला, की आसपास घुटमळत असे, प्रश्न विचारत असे. त्याचं त्याला कौतुक होतं.

"मुळांचा दोष नसतो राजा. कधी माती खराब असते, कधी हवा चांगली नसते, कधीकधी रोपच चांगलं नसतं. मुळं आपलं काम चोख करत असतात. असेल तशा मातीत पाय रोवायचा प्रयत्न करत असतात..."

साहिलला यातलं बरचंसं काही कळलं नाही. त्याने एकदा बाबाच्या चेह-याकडे पाहिलं आणि मग परत पळत आत गेला. अविनाशलाही आपण अकारण फिलॉसॉफिकल झालो असं वाटलं. तो स्वत:शीच हसला. त्याने परत मोर्चा बागेकडे वळवला.

अर्ध्या-पाऊण तासाने तो घरात आला तेव्हा चांगलाच घामाघुम झाला होता. आंघोळ करून अनुजाने केलेला मस्त चहा पीत थोडावेळ शांत बसावं असा त्याचा विचार होता. तो शॉवर घेऊन बाहेर येतोय, इतक्यात अनुजाने त्याच्या एका हातात चहाचा मग ठेवला.
"अरे वा! मनकवडी आहेस!"
"मनकवडी कशाला? आठ वर्ष संसार केल्यावर इतकं तर मला समजलंच आहे, की पतीदेवांना बागकाम केल्यानंतर चहा लागतोच लागतो. तोही बायकोच्या हातचा..." ती हसतच म्हणाली. बोलता बोलता तिने त्याच्या दुस-या हातात त्याचाच सेलफोन दिला.
"हे काय?" अविनाशने गोंधळून विचारले.
"तू बाहेर होतास तेव्हा बाबांचा फोन आला होता. त्यांचा आवाज थोडा गंभीर वाटला..."

चहाचा घोट घेताघेता काय झालं असेल याचा विचार करतच त्याने बाबांचा नंबर लावला. नेहेमीप्रमाणे आठ-दहा रिंग वाजल्यानंतरच बाबांचा विशिष्ट ’हॅलो’ ऐकू आला.
"बाबा, अवि बोलतोय. मगाशी फोन केला होतात ना.. बरे आहात ना? आई कशी आहे?" त्याने एकदम सरबत्ती केली..

"अरे हो हो. आम्ही ठीक आहोत. मी वेगळ्याच कारणाकरता फोन केला होता.." एवढं म्हणून ते थांबले.

"बाबा, बोला ना? काय झालंय?" अविनाश इकडे गोंधळला. बाबा असे आढेवेढे का घेत होते?

"अरे परवा अण्णाचा, साता-याचा अण्णाकाका.. त्याचा फोन आला होता. सहा जूनचा मुहूर्त काढलाय. येताय ना तुम्ही?"

"बाबा.." अविनाश जरासा वैतागून काही बोलणार होता, इतक्यात बाबाच पुढे म्हणाले, "हे शेवटचंच. मग संपलंच सगळं. या रे. मी अजूलाही सांगितलंय. तो येतोय. तुम्हीही सगळे या. आणि हे बघ, अनुजाला रजा मिळत नसेल, तरी तू येच. साहिलला घेऊन ये बरोबर. त्याच्या शाळेला सुट्टीच आहे ना? आम्ही वाट बघतोय. सहा जून लक्षात ठेव रे. त्या आधी आणि नंतर दोन दिवस असे ठेवून या.. नाही म्हणू नकोस अवि.." त्यांच्या स्वरात अजीजी डोकावली आणि अविलाच कसंतरी झालं.

"बाबा, का तुम्ही त्या माणसांना इतकं धरून ठेवता हे मला अजूनही समजलं नाहीये.. "

"माणसं नव्हेत रे, आपलं गाव आहे ते.. निदान माझं तरी आहे."

"काहीही असो. मला हे काही पसंत नाही, मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे. आठवडाभर रजा पडते माझी आणि अजूचीही. पण तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही येतो. आम्हाला तिकडे अजून काहीतरी करायला भरीला पाडू नका.." त्याने निर्वाणीचं सांगून टाकलं.

"नाही रे बाबा. फक्त या, बस. मी करतो बाकी व्यवस्था. बाकी, आमचे साहिलबाबू कुठे आहेत? दे बरं त्याला फोन..." बाबांच्या स्वरातला आनंद लपत नव्हता. शेजारीच खेळणा-या साहिलला त्याने फोन दिला आणि तो विचारात गढून गेला..
**

बघता बघता पुण्याला जायचा दिवस येऊन ठेपला. अजय, अविनाशचा धाकटा भाऊ दिल्लीत नोकरीनिमित्त रहात असे. दोघेही संगणक अभियंते होते. अजू अजून अविवाहित होता. अवि, साहिल आणि अजू तिघेही एकत्रच जाणार होते पुण्याला. तो आणि साहिल अजूला दिल्लीच्या विमानतळावर थेट भेटणार होते. अनुजाने ऑफिसला रजा टाकून यायची अजिबात गरज नाहीये हे अविनेच परस्पर ठरवलं होतं.

सर्व आवराआवर करून सामान टॅक्सीत टाकून अवि आणि साहिल दिल्लीकडे निघाले. अवि टॅक्सीत जरा सैलावून बसला. बाबांवर कितीही वैतागला, तरी पुण्याला जाण्याचं अप्रूप होतंच. आजीला भेटायचं ह्या कल्पनेने साहिललाही आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याच्या बडबडीला आणि प्रश्नांना गेल्या काही दिवसांपासून खंड नव्हता. नॉयडासारख्या कॉर्पोरेट शहरात अवि केवळ नोकरीसाठी रहात होता. पुण्यात तो आणि अजू जन्मापासून पार शिक्षण होईपर्यंत राहिले होते. शिवाय तिथे आई-बाबा होते, आजोळ होतं, इतर नातेवाईक होते, मित्र होते. पुण्याची ओढ नैसर्गिक होती. बाबांना पर्‍ह्याची अशीच ओढ असेल का? हा विचार येताच अवि चमकला. आपण अकारण त्यांच्यावर या बाबतीत वाद घालतो असंही त्याला प्रकर्षाने जाणवलं.

साता-याजवळचं अगदी छोटं पर्‍हे हे बाबांचं जन्मगाव. ते खूपच लहान असताना त्यांच्या आई-बाबांचं निधन झालं होतं आणि मग अण्णाकाकाच्या वडिलांकडे ते रहात होते. पाचवीपर्यंत ते तिथेच होते. नंतर ते साता-यातच वसतीगृहात राहिले. तिथेच राहून शिकले. बारावीनंतर कोणाच्यातरी सल्ल्याने परिक्षा देऊन पुण्यात एलआयसीत नोकरीला लागले, ते पार निवृत्त होईपर्यंत. बाबांचा साता-यात अण्णाकाकाशी जुजबी संबंध होता, आणि पर्‍ह्याशी त्यांचा संपर्क सुटून कित्येक वर्ष झाली होती. तरी प-ह्याचा विषय निघताच ते हळवे व्हायचे. त्यांनाही त्यांच्या बालपणीच्या गावाची ओढ असेल, जशी आपल्याला पुण्याची आहे हे त्याच्या आधी लक्षातच आले नव्हते. बाबांची बाजू कधी समजून घ्यावीशीच वाटली नव्हती. आता पुण्याला पोचलो की या विषयावर बाबांशी एकदा शांतपणे बोलायचे असा निर्णय त्याने घेऊन टाकला.

पुण्याला पोचायला बरीच रात्र झाली, नेहेमीच होत असे कारण विमानाच्या वेळा तशाच होत्या. एरवी आई झोपून टाकत असे. पण या वेळी तीही जागी होती. गेल्या वर्षी दिवाळीत पुण्याला आले होते. त्यानंतर आताच. आई-बाबांच्या चेह-यावरचा आनंद लपत नव्हता. दुस-या दिवशी शनिवार होता. हे तिघं उठतात तोवर जवळच राहणारे दोन्ही मामा, मामी, मामेभावंडं भेटायला आले. घर दणाणून गेलं. अजूसाठी मुली सुचवणं हा सर्व बायकांचा लाडका विषय होता. अजूला त्यानिमित्ताने चिडवणे हा तर सर्वांचा आवडीचा उद्योग. हास्यविनोदाला उधाण आलं. त्या गोंधळातही बाबा एरवीपेक्षा जास्त उत्साही दिसत आहेत हे अविनाशने टिपलं.

नाश्ता करून मामाकडची मंडळी गेली आणि सगळेच सैलावले. आईही साहिलला घेऊन जरा टेकली. बाबांनी वाटच बघत असल्याप्रमाणे विषयाला वाचा फोडली.
"बरं वाटलं रे आलात ते. आता मी कार्यक्रम सांगतो.. सोमवारी सकाळी आपण पहाटेच निघू. अजू, मामाकडून उद्याच तू जीप घेऊन ये. थेट अण्णाकडे जाऊ. तिथून प-ह्याला. उद्यापासूनच जय्यत तयारी असणार आहे असं अण्णा म्हणालाय. एकेकाळी प-ह्यात राहात होते, त्या ब-याच जणांशी संपर्क झाला आहे म्हणे. बरेच जण येणार आहेत. देवस्थानाचे ट्रस्टी आणि गावकरी असतीलच. वरच्या गावात देऊळ बांधून तयार आहे. आता सोमवारी सोमेश्वराची पिंड आणि त्याच्यासमोरचा नंदी तेवढा काय तो आपल्या सर्वांच्या साक्षीने हलवायचा आहे. आपण सर्वांनीही थोडा हातभार लावूया नाहीतर नुसतेच सहभागी होऊया. नवीन मंदिरात पिंडीची विधिवत स्थापना झाली, की तिथेच प्रसादाचीही सोय करणार आहेत. तो घेऊन वाटलं तर लगेच परत येऊ. नाहीतर माझा विचार होता, की एक दिवस साता-यात राहू.."

"अण्णाकाकाकडे?" अविला राहवलंच नाही.

"साता-यात चांगल्यापैकी लॉज, हॉटेलं आहेत अवि." बाबा एकदम कडकपणे म्हणाले, तसं अवि वरमला. "अजिंक्यतारा पाहू, थोडं फिरू. साहिलबाबाला माझं कॉलेज दाखवतो, मग संध्याकाळ होईपर्यंत येऊ परत. पण तुम्हाला सातारा नको असेल तर हरकत नाही. सोमवारचा कार्यक्रम महत्त्वाचा. तो करून लगेच येऊ. मग एखाद दिवस राहून तुम्ही वाटलं तर जा लगेच परत दिल्लीला.."

"कशाला लगेच परतायच्या गोष्टी? रजा काढली आहेत ना रे आठवड्याची? रहा मग ठरल्याप्रमाणे. काही स्थळं आली आहेत. अजूला पसंत पडलं एखादं तर तो कार्यक्रम करता येईल.." आईने हस्तक्षेप केला.

"बरं. आईचंही बरोबर आहे. चालेल ना तुला अजू? आणि अवि तुला?"

"बाबा, असं काय विचारताय? राहतोय आम्ही ठरल्याप्रमाणे." अजूनं सांगून टाकलं.

"उतावीळ बघा कसा झालाय!" अविला थट्टा करायचा मोह आवरला नाही. सगळे हसले. अविनं पुढे विचारलं, "बाबा, तुम्हाला आठवतं का हो पर्‍हे?"

"अरे म्हणजे काय! माझं जन्म नाही का तिथला. घर तर सोमेश्वराच्या शेजारीच. सोमेश्वराच्या अंगणातच असू आम्ही सर्व वेळ. शाळा कशीबशी करायची आणि सोमेश्वर गाठायचा. तेव्हा तर देऊळही अगदी लहान आणि साधं होतं. अंगणही मातीचं. पक्कं देऊळ पुष्कळ उशीरा बांधलं. वडाला पार, अंगणात फरश्याही नंतरच्याच. माझ्या आठवणीत ते छोटं देऊळच आहे. आईला मी कधी पाहिलंच नाही. मला जन्म देऊन गेली बिचारी. वडिल कसल्यातरी आजाराने नंतर गेले. त्यांचा चेहरा अगदी अंधुक आठवतो. फोटो वगैरेची पद्धत नव्हती तेव्हा.. त्यामुळे तो सोमेश्वरच माझे आई-वडिल.."

"अण्णाकाकाकडे रहात होता ना तुम्ही?"

"रहात होतो म्हणजे काय, खायला-झोपायला मिळायचं, इतकंच. कुटुंब मोठं. अण्णाचे वडिल आणि माझे वडिल असे दोघंच भाऊ. चार आत्या होत्या. बाबा गेल्यानंतर सगळं त्या काकांवर पडलं. काकू चांगलं वागत नसे. अण्णा आणि त्याचे अजून वरचे दोघे भाऊ तू पाहिलेच आहेस. सगळे तसे आडदांड होते. मी एकटा सापडायचो त्यांना. म्हणून शक्य तितका वेळ मी घराबाहेर काढायचो. मी आणि माझे मित्र असे मिळून आम्ही सोमेश्वराच्या अंगणात खेळत असू. सोमेश्वराच्या आशीर्वादाने अभ्यासात बरा होतो. थोडी शिष्यवृत्ती मिळाली म्हणून पाचवीपासून होस्टेलवर राहिलो साता-याला. मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत परत काकांकडे जायचं म्हणजे नकोसं व्हायचं, पण दुसरा आसराच नव्हता. आत्यांची लग्न झालेली. त्यांना भाच्याला सासरी ठेवून घेण्याइतका अधिकार नव्हता. आईच्या आई-वडिलांना भीती, की याला ठेवून घेतला, तर आईवेगळ्या मुलाचा भार आपल्यावरच पडेल. म्हणून तेही दुरावले. ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच पुण्यात कायम नोकरी लागली आणि आता परत काकाकडे जायला नको या विचारानेच मला सुटल्यासारखं झालं.."

बाबांचं बालपण किती दु:खद गेलं आहे याची अवि-अजूला माहिती होती, पण अचानक आज ते सगळंच अंगावर आलं. तुलनेनं आपलं असलेलं प्रेमळ, सुरक्षित बालपण आणि आता साहिलवर तर दु:खाची सावलीही पडणार नाही अशी असलेली परिस्थिती.. या पार्श्वभूमीवर बाबांचं दु:ख आणखीनच गडद झालं.

"बाबा, तरीही तुम्हाला प-ह्याला जावंसं वाटतंय?"

"त्या सोमेश्वरासाठीच रे. तो परिसर, ते देऊळ हाच काय तो माझा ठेवा आहे. तुम्हाला आजवर कधी एकदाही मी प-ह्याला जायचा आग्रह केला का? पण आता ते देऊळच नवीन विस्तारित नदीपात्रात बुडणार आहे. जिथे माझ्या आयुष्याची सुरूवात झाली, ते तुम्हाला एकदा तरी दाखवावंसं वाटतंय रे. एकदा शेवटचं काय ते डोळे भरून मीही साठवून घेतो. मग तीही नाळ कापली जाईल." बाबा एकदम गप्प झाले.

"ओके बाबा. तुम्ही म्हणाल तसं करू आपण. आता जास्त विचार करू नका. आणि मी या आधी जी काही चिडचिड केली, त्यासाठी सॉरी.." अवि मनापासून म्हणाला.
**

सोमवारी पहाटे सहालाच सगळेजण साता-याला निघाले. साहिलनेही काहीही तक्रार न करता पटपट आवरलं. बाबा जास्त काही बोलत नव्हते, पण प-ह्याला जायची त्यांची ओढ त्यांच्या चेह-यावरून आणि देहबोलीमधून स्पष्ट दिसत होती. आईला बाबांची जरा चिंताच वाटत होती. पण आजवर दिली तशी फारसा निषेध न नोंदवता निमूटपणे त्यांना साथ द्यायची हे तिनं ठरवलं होतं. अवि-अजू त्या दिवसापासून जरासे गंभीर झाले होते. कोणीच काही फारसं बोलत नव्हतं. कारणं वेगवेगळी असली तरी प-ह्याला काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

वाटेत चहा-नाश्ता घेऊन अण्णाकाकाच्या इमारतीपाशी त्यांची गाडी पोचली तेव्हा नऊ वाजायचेच होते. सातारा आता एक गाव नसून शहरच झालं आहे असं अविला वाटलं. साता-यातही तो फारसा आलाच नव्हता. सगळे सज्जनगडावर दोनदा गेले होते तेव्हा आणि एकदा कासला गेले होते तेव्हा असेच ओझरते एकदोनदा अण्णाकाकाकडे तासभर आले होते. बाबांनी जाणूनबुजून त्यांची या नातेवाईकांशी ओळख तर राहील, पण संबंध जिव्हाळा किंवा तिटकारा यापैकी कोणत्याच टोकाला पोचणार नाहीत याची काळजी घेतली आहे, हे त्याला बाबांच्या परवाच्या बोलण्याच्या पार्श्वभूमीवरून जाणवले. त्यांच्या परीने बाबांनी आपल्यावर जमेल तशी सावली धरली आहे हे ही त्याला झटक्यात जाणवले. बाबांबद्दल त्याच्या मनात कृतज्ञता दाटून आली. साधे सरळमार्गी, काहीसे सामान्य असलेले बाबा याबाबतीत त्याला एका प्रचंड मोठ्या वटवृक्षासारखे भासले.

अण्णाकाका आणि त्याचे अजून दोन भाऊ सगळे मिळून एकाच इमारतीत रहात होते, पण वेगवेगळ्या मजल्यांवर. अण्णाकाकाकडे अविला कधीच अगत्याचे वातावरण आहे असं वाटलं नाही. काकू, तिची मुलं, बाकी दोन्ही काका आणि त्यांची कुटुंबं हे सगळे कुत्सितपणे किंवा काहीशा असूयेने आपल्या सर्वांकडेच बघतात असं त्याला कायम वाटत असे. आपुलकीने आपण काही बोलायला जावं आणि त्यांची थप्पड मारल्यासारखी उत्तरं ऐकून घ्यावी हा अनुभव तर त्यांनी नेहेमीच घेतला होता. यावेळी तर आपण गप्पच बसून फक्त जे जे होईल ते ते पहायचं असं अविने ठरवलं होतं.

अण्णाकाकाने स्वागत जोरात केलं. "आलात का? या. या. वेळेवर आलात अगदी. अहोऽऽ, चहा आणा. चहा झाला, की आपण निघूच. सगळे तयार आहेत. आमचे विजू-विनू, दादाचा श्री तर सकाळीच गेलेत प-ह्याला. कामं बरीच आहेत. अगदीच ऐनवेळी परक्यासारखं जाणं बरं दिसत नाही ना.." हा त्यांना मारलेला टोमणा होता, की साधं बोलणं होतं याचा अंदाज कोणालाच आला नाही. कोणी काहीच बोललं नाही.

अण्णाकाका अवि-अजूला उद्देशून पुढे म्हणाला, "तुम्हाला सांगितला आहे की नाही आजचा कार्यक्रम प्रभ्याने? अरे प-ह्याचं नशीबच पालटलं प्रभ्या. पाच वर्षापूर्वी तिकडं प्रलयी पाऊस झाला आणि नदीचं पात्रच बदललं. पार आपल्या घरापर्यंत नदी आली! सोमेश्वर तर बुडालाच. पाऊस ओसरल्यानंतरही सोमेश्वरापासून वीस फुटावर पाणी असतं. म्हणून मग सरकारनेच वरच्या गावात जमीन दिली. देऊळ आपण बांधलं बरंका. आपण म्हणजे सोमेश्वर ट्रस्टनं. पण म्हणजे आपणच. विश्वस्तात मी, दादा आणि भाऊच आहोत, आणि गावातले आणखी काही. झक्कपैकी नवीन पद्धतीनं देऊळ बांधलंय. गुळगुळीत फरश्या, ट्यूबलाईट्स.. बघालच म्हणा तुम्ही आज. आणि चक्क सरकारने आपल्या आळीतल्या लोकांना नुकसानभरपाईही दिली आहे! कारण नदीच्या पाण्यात सगळीच घरं जाणार. आता राहतंय कोण प-ह्यात, सांग पाहू? एरवी ओस पडलेलं असतं. कशीबशी सोमेश्वराला सोमवारी दिवा-बत्ती करतो दत्तू गुरव. पण पैसे मिळतात म्हटल्यावर सगळे आले की रे! सरकारी नोंदणीनुसार सर्व वारसांना भरपाई मिळणार आहे. तुझं बरं आहे प्रभ्या. तिथे कधी राहिला नाहीस, तरी वारस ना तू एक त्या घराचा, त्यामुळे तुझा हिस्सा आहे भरपाईत. अजून नोटीस आली नाही, पण आली की सांगेन तुलाही. साता-यातल्या तहसीलदार कचेरीत प्रत्यक्ष जाऊन चेक मिळतो म्हणे प्रत्येकाच्या नावाचा. म्हणजे तुझा हिस्सा लाटायचा झाला, तरी लाटता येणार नाही कोणाला!" आपण फार मोठा विनोद केला आहे अशा आविर्भावात अण्णाकाका जोराने हसला.

अविचं तोंड रागाने कडू झालं. सरकारी नियमानुसार पैसे येणार म्हणून बाबांना त्यांचा हिस्सा मिळणार. तसं नसतं तर पैसे किती आले आणि कोणाकडे गेले हे कधी समजलंही नसतं! काय वृत्ती आहे या माणसांची! ही जी इमारत आहे ती जमिनही या सगळ्या भावांनी त्यांची पूर्वापार असलेली जमिन विकून घेतली होती आणि मग त्यावर घर बांधलं होतं. त्यावेळीही प्रभाकरला पैसे, या जमिनीत हिस्सा नकोच असेल; किंबहूना त्याने तो मागू नये अशा पद्धतीनेच बाबांच्या कानावर घातलं होतं. बाबांनी क्षणभराचाही विचार न करता कोणताही हिस्सा नको म्हणून सांगितलं होतं. पण त्यांचा न्याय्य हिस्सा त्यांनी मागितला असता, तर चिकार वाद आणि भांडणं आणि कदाचित कोर्ट-कचेरीही झाली असती यात अविला शंका नव्हती.

सरतेशेवटी सर्व मंडळी निघाली. त्यातही ’तुम्ही गाडीवाले, या आरामात. आम्ही जातो आमच्या फटफट्यांवर पुढे’ असा आहेर मिळालाच. पर्‍हे साता-यापासून तीसेक किलोमीटरवर होतं, पण रस्ता खराब होता. शहराचं फारसं वारं लागल्याचं दिसत नव्हतं. कदाचित आता गाव पाण्याखाली जाणार म्हणून असेल किंवा तसं ते अगदीच एका बाजूला होतं, म्हणूनही असेल. पण एकूणात संपूर्ण गावालाच उतरती कळा लागल्याचं जाणवत होतं. गाडी घेऊन ते देवळाच्या अगदी जवळ जाऊ शकले. मोठा रम्य होता तो परिसर. पाऊस अजून सुरू व्हायचा होता, तरी अण्णाकाका म्हणाल्याप्रमाणे नदीचं पाणी अगदी जवळ दिसत होतं. मध्येच देऊळ होतं आणि देवळाच्या आजूबाजूने जुनी घरं. हा गावाचा सखल भाग होता. ’वरचं गाव’ म्हणजे ह्या भागाला वळसा घालून जरा वरच्या अंगाला थोडी अधिक वस्ती, रस्ते, दुकानं अशी होती. तिथेच नवीन देऊळही बांधलं होतं. इथे येतायेता त्यांना ते ओझरतं दिसलं होतं.

आत्ता त्या सर्वच परिसरात भरपूर गर्दी होती. पुष्कळ गावकरी, त्यांच्यासारखे उपरे आलेले लोक सगळीकडे घोळके करून उभे होते. एक ढोल-ताशा पथक आलं होतं. त्यांच्या अंगात पिवळे टीशर्ट होते. त्यांची वाद्य जवळच काढून ठेवली होती. प्रत्यक्ष मंदिर म्हणजे एका बंदिस्त शहाबादी फरशी घातलेल्या छोट्या अंगणात बांधलेली जुनी दगडी वास्तू होती. त्याचा कळसही दगडीच होता आणि त्याची बरीच पडझड झाली होती. एखादं चुकार रोपही उगवलं होतं मध्येच. देवळाला सभामंडपही नव्हता. आवारात बाहेरच एक सजवलेली पालखी ठेवलेली होती.

दोन पाय-या उतरून थेट गाभा-यातच त्यांनी प्रवेश केला. गाभा-यात एक पणती पेटवलेली होती आणि एक पिवळा दिवा भगभगत होता. मध्यभागी काळीशार दगडी पिंड होती. बहुधा आज ती हलवायची म्हणून असेल, पण पिंड स्वच्छ होती, पूजा होऊन फुलं, गंध वगैरे ल्यायलेली होती. उदबत्तीचा मंद सुवास गाभा-यात रेंगाळत होता. तिथेच बांधलेली एक पिचकी घंटा वाजवून सगळ्यांनी मन:पूर्वक सोमेश्वराचे दर्शन घेतले. बाबा एकदम गप्प झालेले होते. न बोलता सर्व काही मनात साठवत होते. अविने कॅमेरा काढला. पण बाबांनी नजरेनेच त्याला ’नको’ असे खुणावले. अविला कारण समजले नाही. आज आता हे सर्वच नष्ट होणार आहे, तर फोटोरूपाने त्याच्या छबी आपल्याकडे असल्या तर काय हरकत आहे असं त्याने एरवी बाबांना नक्की विचारलं असतं. पण आजचा प्रसंग निराळा होता.

ते दर्शन घेऊन बाहेर आले तर समोरच नंदी दिसला. आधी कसं काय आपलं लक्ष गेलं नाही याचं नवल वाटलं अविला. नंदीही त्याच्या मालकाप्रमाणेच उदास दिसत होता. तोही दगडी होता. आकाराने तसा लहान होता, आणि बराच झिजलेलाही होता. अवि त्याच्या जवळ जाऊन त्याला न्याहाळत होता. इतक्यात कोणीतरी गावकरी जवळ आला.

"नवीन देवळात नवीन नंदी बांदलाय. ह्यो न्हाई नेनार तिकडं. ह्यो हिकडेच ठिवनार येका बाजूला काडून.." त्याने माहिती पुरवली. नंदी एका चौथर्यावर बसलेला होता. त्याच्या लगतची फरशी थोडी उकरून ठेवलेली दिसली. म्हणजे त्यालाही हलवण्याची तयारी झालेली होती. अविला या नंदीबद्दल उगाचच जरा वाईट वाटलं. होता तो दगडच, पण नाही म्हणलं तरी आयुष्यभर त्याने त्या पिंडीची साथ केली होती. ती पिंड आज एका दिमाखदार देवळात जाणार आणि हा मात्र बिचारा मुळासकट उखडला जाऊन एका दुर्लक्षित कोपर्यात जाऊन पडणार.. आज या दगडात जीव असता, तर त्याला किती वाईट वाटलं असतं.. हे असं मुळापासून उखडलं जाणं किती क्लेषदायक असेल नाही? आपल्या घरातली उन्हाने सुकलेली रोपं, हा नंदी, प-ह्याशी संबंध तोडून टाकलेले बाबा.. हे सगळेच त्याच्या डोक्यात एकदम फेर धरून नाचायला लागले. इतक्यात ताशावर कोणीतरी एक सणसणीत टिपरी मारली आणि तो भानावर आला.

एक मोठा जथाच मंदिरात घुसला. अण्णाकाका, भाऊकाका, दादाकाका, त्यांच्या बायका, अजून गावातले पुढारी, त्यांच्या भोवतीचा गराडा आणि मजूर असे सगळेच एकदम मंदिरात आले. ’चला चला. सगळ्यांनी दर्सन घ्येतलं न्हवं? चला, टायम झाला..’ असं त्यांच्या कानावर आलं. पिंड हलवण्याची शुभ घटिका जवळ आली होती. सगळे गाभा-यात घुसले. टाणटाण घंटा बडवली. ’जय सोमेश्वरा, जय शिवशंभो’च्या ललका-या उठल्या आणि मजूरांनी पहिली पहार घातली. इकडे बाहेर ढोल-ताशे घुमू लागले. वातावरणात एकदमच जोश, उत्साह आला. चार मजूर पिंडीच्या आजूबाजूने खोदायला लागले, बाकी सगळे बघे आणि त्यांच्या प्रचंड सूचना. मध्येच ’जय सोमेश्वरा’चा गजर. ढोल तर गर्जत होतेच. तो एवढासा परिसर दुमदुमून गेला. बाबाही त्या जथ्यात होते. खोदकामाची सुरूवात बघून ते बाहेर आले. आई, अवि, अजू सगळे बाहेरच थांबून तो कालवा बघत होते. ढोल-ताशाच्या मोठ्या आवाजामुळे साहिल जरासा बावरला होता. बाबांनी त्याच्याकडे हसून पाहिले. "घाबरले काय साहिलशेठ?’ त्यांनी त्याला कडेवर घेत विचारले. त्यांच्या चेह-यावर एक उदासीही होती आणि आनंदही दिसत होता. ते त्याच्याशी नवीन मंदिर, शंकर वगैरेबद्दल बोलायला लागले. त्याला घेऊन ते पथकाजवळ गेले. साहिलला तो आवाज सहन होत नव्हता, पण त्याचं आकर्षणही वाटत होतं.

अर्धा-पाऊण तास झाला. पुरेसं खोदून झालं. आता पिंड उचलायची आणि पालखीमध्ये ठेवून वाजतगाजत नवीन मंदिरात न्यायची. पिंड लहान असली, तरी अखंड आणि दगडी होती. ती उचलून पालखीत ठेवायला नवीन धट्टीकट्टी मुलं सरसावली. पुन्हा एकदा ’जय सोमेश्वरा’चा गजर झाला आणि त्यांच्या खांद्यांवर पालखी उचलली गेली. अनेक जण झपकन पुढे झाले. पिंडीला हात लावायला लोक धडपडत होते. साहिलला पटकन अविकडे देऊन बाबा गर्दीत घुसले. गर्दीत त्यांनी एकाच्या खांद्यावरून पालखीचा एक दांडा आपल्या खांद्यावर घेतला. हे त्यांनी इतकं अचानक केलं की आई-अवि-अजू एकदम अवाक झाले. ’बाबाऽऽ’ म्हणत पटकन अजू पुढे धावला. पण बाबांनी त्याला हातानेच दूर केले. काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी अजून कोणाकडेतरी ती जबाबदारी दिली आणि ते माघारी आले. त्यांच्या चेहरा घामाने डवरला होता.

"अहो, काय हे धाडस अचानक? काही झालं असतं म्हणजे?" आईने नापसंती व्यक्त केली.
"काय होणारे? सोमेश्वरासाठी एरवी काही केलं नाही. ही सेवा करायची शेवटची संधी होती.. चार पावलं तर चाललो असेन बरोबर. तेवढंच.." बाबांनी आईचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही.
"अहो पण.."
"जाऊदे ना आई.. बाबा तुम्ही ठीक आहात ना?" अजूने मध्यस्थी केली.

तोवर पालखी रस्त्यापर्यंत पोचली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. ते सगळे देबळाच्या आवारातच थांबून ते दृष्य बघत होते. हळूहळू मिरवणूक लांब गेली, आवाजही कमी झाले आणि गर्दीही. सगळे लोक नवीन देवळाकडे गेले आणि इथे एकदम शांतता पसरली. देवळात हे पाच जणच उरले. सोमेश्वरला लांब जाताना पाहून बाबांना वरचेवर कढ येत होते, पण ते दर्शवत नव्हते. इतक्यात मगाचचे मजूर नंदीपाशी आले. त्यालाही हलवून टाकले की त्यांचे काम संपले असते. थोडीशी पूर्वतयारी केलेली होतीच. नंदीच्या चौथ-यापाशी त्यांनी पहारीचे घाव घालायला सुरूवात केली. हे सगळे गप्पपणे नुसते बघत होते काय चालू आहे ते. चार-पाच मजूर सवयीने घाव घालत होते. हळूहळू खालची ओलसर माती दिसू लागली. तो चौथरा आणि त्यावरचा नंदी हे एकाच दगडातून केलेले होते सगळे. तो अखंड दगडच एकदम हलवायचा होता. सगळं मिळून तीनेक फूटाचा असेल, फार जड असेल असे वाटत नव्हते.

चौथ-याखाली आणि बाजूने सुमारे फूटभर खणून झाल्यावर तो उचलता येण्यासारखा झाला. मजूरांनी खोदायचे काम थांववले. दोन मिनिटं विसावा घेऊन त्यांनी नंदी हलवायला सुरूवात केली. दोन बाजूंनी चार मजूर भिडले. तिथल्यातिथे चौथरा हलवून अंदाज घेऊन एकच मोठी आरोळी ठोकत त्यांनी तो नंदी उचलला. त्यांच्या अंदाजाप्रमाणेच तो फारसा काही जड नव्हता. उचलल्यावर दोनच मजूरांनी तो पेलत देवळाच्या गाभा-यात नेला. त्याचा धनी तिथून आधीच हलला होता. तो त्याच्या रिकाम्या जागेची सोबत करायला गाभा-यातल्याच एका कोप-यात ठेवला गेला.

नंदी उचललेली जागा भकास दिसत होती आता. फरशीच्या बांधीव अंगणात मध्येच उकरलेल्या मातीचा ढीग तसा विद्रूपच दिसत होता. एव्हाना ऊनही बरंच चढलं होतं. आता निघून नवीन देवळात जावं असा विचार अवि करत होता. इतक्यात त्या मातीत उन्हाची तिरिप पडून काहीतरी चमकलं. सगळ्यांचंच लक्ष गेलं. बाबा तीरासारखे पुढे गेले आणि वाकून पाहू लागले. त्यांनी काहीतरी उचललं आणि त्या वस्तूकडे बघताच मात्र आता त्यांचा बांध फुटला. त्यांचं सारं अंगं हुंदक्यांनी गदगदत होतं. ’सोमेश्वरा, सोमेश्वरा’ असं पुटपुटत रडतच ते खाली कोसळले.

"आता चोरीही करायला लागलास? सोमेश्वरा! कुठे फेडशील ही पापं? वेळेला दोन घास गिळायला मिळत आहेत हे पुरत नाही वाटतं! आईवेगळ्या मुलाला सांभाळतोय याचं हेच का फळ!"
"चोर! चोर! प्रभ्या चोर! प्रभ्याचा होणार बट्ट्य़ाबोऽळ!"
"अरे मेल्या! आई-बापाला खाल्लास तो खाल्लास. आता आम्ही पोसतोय तर आमच्यावरच उलटायला बघतोस! चालता हो या घरातून!"
"प्रभाकर, अरे काय केलंस हे? प्रत्यक्ष घरातला देव चोरलास? का केलंस रे असं?"
"भाऊसाहेब, प्रभाकराची सोय करता येईल साता-याला नादारीवर. वसतीगृहही आहे तिथे. त्याला तिथे राहूदे."
"तोंड काळं कर. आणि तिथे नीट रहा मेल्या. आमची अब्रू घराबाहेर तरी जप. तिकडून एक जरी वाकडा शब्द ऐकू आला तर तू आम्हाला मेलास!"

पन्नास वर्षापूर्वीची वाक्य जशीच्या तशी त्यांच्या कानात गजरासारखी वाजू लागली. त्यांनी हातातल्या तांब्याच्या विष्णूपादाकडे बघितलं. त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करणारा तो पुरावा आज त्यांच्या हातात होता. घरातले देव चोरल्याचे आरोप त्यांच्यावर कोवळ्या वयात केला गेला होता. काका-काकू-चुलत भाऊ कोणालाच आपण आवडत नाही हे माहित होतंच, पण त्यांच्याविरुद्ध कट करून त्यांना चोर सिद्ध करण्याइतका तिरस्कार कोण करत होतं? कोणीतरी देवघरातला विष्णूपाद उचलून इथे नंदीपाशी लपवला होता हे आता, इतक्या वर्षांनी उघडकीला आलं होतं. पण ते कोण होतं? हा प्रश्न आजही अनुत्तरित होता. आता तर त्या उत्तराची गरजही नव्हती. तांब्याच्या विष्णूपादाची किंमतही कितीशी असणार होती? ते चोरण्याचं आणि विकण्याचं धैर्य त्या लहान मुलात होतं का? या कशाचीच शहानिशा न करता निर्दयपणे त्यांच्यावर आरोप तेवढे ठेवले गेले. इतकं नीच पातळीवरचं कृत्य आपलं नाही हे माहित तर होतं, पण ते सिद्ध करता येत नव्हतं. त्यांच्या बाजूचं एक सोमेश्वर सोडला तर कोण होतं? पण ती एक मुकी पिंड. ती काय बोलणार? तिच्याच साक्षीनं त्यांचं त्या घराशी, त्या गावाशी असलेलं मूळ मात्र कापलं गेलं होतं ते मात्र कायमचंच.

पण आज न्याय मिळाला होता. त्या पिंडीनं शेवटचा आशीर्वाद त्यांना दिला होता. तो एकच डाग जो कोवळ्या मनावर पडला होता तो आज अगदी स्वच्छ झाला होता. संपूर्ण आयुष्यात ते एकच किल्मिष होतं, ते आज अगदी अनपेक्षितपणे साफ झालं होतं.

"बाबा, बाबा.. तुम्ही बरे आहात ना? काय झालं तुम्हाला? इकडे या, हे पाणी घ्या. काय आहे हे?" अवि-अजूचे प्रश्न त्यांच्या कानावर पडले आणि ते भानावर आले. मग अगदी शांत शांत होताना त्यांनी पत्नी-मुलांना तो कधीच न सांगितलेला भूतकाळ सांगितला. हातातला विष्णूपाद सगळ्याचं साक्षीदार होताच.

"नक्कीच आण्णाकाकाच असेल तो. तो नेहेमीच तुमचा द्वेष करत आला आहे.." अवि भडकून म्हणाला.
"अवि, आता तो विषय नको. मला उत्तर नको आहे. मला जे पाहिजे होतं ते मिळालंय.. आज मी शंभर टक्के समाधानी आहे."
अविने भारावून बाबांकडे पाहिलं. त्याला वाटलं, गेल्या चार-पाच दिवसात दिसलेले बाबा काही वेगळेच आहेत. इतक्या वर्षांच्या बाबांपेक्षा काही वेगळेच. आपल्या अंतरंगातल्या जखमा कधीही अगदी आपल्या बायको-मुलांसमोरही उघडे न करणारे, केवळ आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रयत्नशील असणारे, आपलं शल्य कोणापाशीही बोलून न दाखवणारे बाबा नक्की कसे आहेत? आपण त्यांना नीट ओळखलेलंच नाही. आपल्याला आत्तापर्यंत सर्वसाधारण वाटणारे बाबा खरंतर विलक्षण व्यक्तीमत्त्वाचे आहेत.

इतक्यात साहिलचं लक्ष आवारात असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाकडे गेलं.
"बाबा, ते बघा केवढं मोठं झाड! त्या झाडाची रूट्स केवढी मोठी असतील ना? बघता येतील मला?"
"नाही रे बाळा. कोणत्याही झाडाची मुळं अशी सहजासहजी दिसत नाहीत. खूप खोल गेलेली असतात ना ती. अपघातानेच त्यांचं दर्शन होतं.." तो बाबांकडे पहात उत्तरला.

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!!!

खूप सुंदर कथा! मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हाही अतिशय आवडली होती.
खूप छान तपशीलवार मांडलं आहे. वाचताना कुठेही कसलेही प्रश्न मनात उभे राहत नाहीत. कथा वाचायला सुरूवात केल्यावर शेवटच्या शब्दापर्यंत खिळवून ठेवते.

या कथेला बक्षीस मिळाल्याबद्दल लिही ना इकडे... Happy

बक्षीस मिळाल्याच मला माहित नाही तरी वाचतानाच वाटलं की ह्या कथेला नक्की बक्षीस मिळेल स्पर्धेत पाठविली तर !!!

पौर्णिमा, अभिनंदन. बक्षीसाबद्दल लिही ना

छान

अप्रतीम! पौर्णिमा अतीशय सुन्दर लिहीलय. तुमच्या लेखनात कायमच एक जिवन्तपणा आणी सहजता असते. जून्या मायबोलीवरची ( बहुतेक) ती पैठणीची कथा पण मला फार आवडलीय.:स्मित: पण खरच ही आणी ती पैठणीची कथा वाचताना आतुन हलल्यासारखे वाटले.

बक्षिसाबद्दल हार्दिक अभिनन्दन! या बद्दल पण सविस्तर लिहा.

मनःपूर्वक धन्यवाद मित्रहो Happy

'विपुलश्री' मासिकाच्या कथास्पर्धेत या कथेला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले होते. मे महिन्यात होती स्पर्धा. फेसबुकवर जे माझे 'मित्र' आहेत त्यांनी प्रशस्तीपत्रकाचा फोटो पाहिला असेल, ते याच कथेसाठी होतं Happy

हर्पेन, विष्णूपाद म्हणजे उजव्या पावलाचा आकार जो विष्णूचा आहे असं समजलं जातं.

Pages