१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते!
इंग्लंडहून निघाल्यावर रॉसच्या मार्गाने न जाता पेरीने थेट लँकेस्टर साऊंडची दिशा पकडली. खाडीतील बर्फातून वाट काढत २८ जुलैला तो खुल्या समुद्रात पोहोचला. लँकेस्टर साऊंड गाठून त्याने रॉस परत फिरला होता तो भाग ओलांडला आणि पश्चिमेला पुढे मजल मारली. परंतु गोठलेल्या बर्फाने त्याचा पुढील मार्ग खुंटला होता!
पेरीने दक्षिणेची वाट पकडली. सुमारे १०० मैल अंतर काटल्यावर तो प्रिन्स रिजंट खाडीच्या मुखाशी पोहोचला. मात्रं खाडीच्या मुखाशी असलेल्या बर्फामुळे त्याला तिथूनही माघार घ्यावी लागली. पुन्हा उत्तरेकडे परतून पेरीने पश्चिमेची वाट धरली. ११० अंश पश्चिम रेखावृत्त ओलांडून त्यांनी पुढे मजल मारली. लँकेस्टर सामुद्रधुनीपासून पश्चिमेला त्यांनी ६०० मैलांची मजल मारली होती. परंतु गोठलेल्या बर्फापुढे अखेर त्याला माघार पत्करावी लागली. परतून त्यांनी १०८ अंश पश्चिम रेखावृत्तावर असलेल्या मेलव्हील बेटाच्या दक्षिणेला हिवाळ्यासाठी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. २६ सप्टेंबरला त्यांनी मेलव्हील बेट गाठलं.
प्रिन्स रिजंट खाडी
पुढचे १० महिने ते बर्फावर अडकलेले होते. त्यातील तीन महिने पूर्ण अंधार होता! तापमान -४८ अंश सेल्सियस (-५४ अंश फॅरनहीट) पर्यंत खाली उतरलं होतं! जानेवारीमध्ये स्कर्व्हीने ग्रासलेला पहिला रोगी पेरीला आढळला! मार्चपर्यंत १४ जणांनी स्कर्व्हीने अंथरुण धरलं होतं. परंतु पेरीजवळ असलेल्या मोहरीच्या पानांमुळे अनेकांच्या दुखण्याला उतार पडला.
मार्च महिन्याच्या सुरवातीला बर्फ वितळण्यास सुरवात झाल्यावर सर्वजण आनंदीत झाले. परंतु अद्यापही सुमारे सहा फूट बर्फाचा थर शिल्लक होता! जूनमध्ये पेरीने मेलव्हील बेटाच्या उत्तर किनार्याचं सर्वेक्षण करण्यास एक तुकडी पाठवली.
मेल्व्हील बेट
ऑगस्ट महिन्यात बर्फात अडकलेली जहाजं मो़कळी झाल्यावर पेरीने पश्चिमेच्या दिशेने पुढे मजल मारली. ११३'४६'' पश्चिम रेखावृत्त त्यांनी गाठलं, परंतु पुन्हा बर्फ गोठण्यास सुरवात झाल्यावर पेरीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. आणखीन एक हिवाळा आर्क्टीकमध्ये व्यतित करणं म्हणजे सरळ सरळ आत्महत्या ठरणार होती.
१८२० च्या ऑ़क्टोबरमध्ये पेरी इंग्लंडला परतला. नॉर्थवेस्ट पॅसेजचा महत्वाचा भाग पेरीने पार केला होता. लँकेस्टर खाडीपासून बॅरो सामुद्रधुनी आणि मेलव्हील बेटापर्यंत त्याने मजल मारली होती. परंतु मेलव्हील बेटापुढील सामुद्रधुनी गोठल्यामुळे त्याला माघार पत्करावी लागली होती.
या सामुद्रधुनीचं पुढे मॅक्क्युलर सामुद्रधुनी असं नामकरण करण्यात आलं.
१८२१ च्या एप्रिलमध्ये पेरीने पुन्हा नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेसाठी इंग्लंड सोडलं!
पेरीच्या या दुसर्या मोहीमेत फुरी आणि हेक्ला या दोन जहाजांचा समावेश होता. जॉर्ज फ्रान्सिस लिऑन, जॉर्ज फिशर, विल्यम हूपर, फ्रान्सिस क्रोझियर, हेनरी हॉपनर आणि जेम्स क्लार्क रॉस यांचा त्याच्या मोहीमेत समावेश होता. जहाजांना बुचाचा थर देण्यात आला होता. जहाजावर कोळशावर चालणारी जास्तीची शेगडी घेण्यात आलेली होती. जहाजाचं तापमान कायम ठेवण्यासाठी हिटर लावण्याची योजना मात्रं रद्दं करण्यात आली होती.
हडसनच्या सामुद्रधुनीतून हडसनचा उपसागर गाठायचा आणि त्याच्या उत्तर-पश्चिमेला असलेल्या गोठलेल्या सामुद्र्धुनीतून पुढे मार्गक्रमणा करण्याची पेरीची योजना होती! १७४२ मध्ये ख्रिस्तोफर मिडल्टनला ही सामुदधुनी गोठल्यामुळे माघार पत्करावी लागली होती.
हडसनच्या सामुद्रधुनीतून पेरीने हडसनचा उपसागर गाठला आणि गोठलेल्या सामुद्रधुनीतून पश्चिमेला मार्ग काढण्यास सुरवात केली. धुक्याने वेढलेली ही सामुद्रधुनी पार करुन पेरीची तुकडी रिपल्सच्या उपसागरात पोहोचली. परंतु रिपल्सच्या उपसागराभोवती सर्वत्रं जमिन आढळल्याने पेरीने उत्तर-पूर्वेचा मार्ग प़कडला. विंटर बेटाच्या दक्षिणेला त्याने हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.
विंटर आयलंडवर मुक्काम करुन असलेल्या एस्कीमो लोकांकडून पेरीला उत्तरेकडे जाणारा जलमार्ग पश्चिमेला वळत असल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली. १८२२ च्या मार्च आणि मे मध्ये लिऑनने बेटाच्या अंतर्भागात दोन मोहीमा केल्या. जुलै महिन्यात बर्फातून जहाजं मोकळी झाल्यावर पेरीने उत्तरेकडे मोहरा वळवला, परंतु त्याचं स्वागत केलं ते गोठलेल्या सामुद्रधुनीने! पेरीने आपल्या दोन्ही जहाजांचं नाव या सामुद्रधुनीला दिलं. बर्फ वितळण्याची वाट पाहत तो तिथे थांबला, परंतु बर्फ वितळण्याची चिन्हं दिसेनात!
सप्टेंबरमध्ये लेफ्टनंट रीडने १०० मैलांची पदयात्रा करुन सामुद्रधुनीच्या काठाने बुथियाचं आखात गाठलं. आपल्या आदल्या सफरीत ज्या प्रिन्स रिजंट खाडीच्या मुखापासून पेरीला माघार घ्यावी लागली होती, ती खाडी या आखाताला येऊन मिळत होती! इग्लूलिक बेटावरील एस्कीमोंच्या वस्तीत त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.
इग्लूलिक
१८२३ च्या जुलैपर्यंत बर्फ वितळला नव्हता. ८ ऑगस्टला अखेरीस दोन्ही जहाजं बर्फातून मो़कळी झाली खरी, परंतु एव्हाना बराच उशीर झालेला होता. त्यातच स्कर्व्हीचीही लक्षणं दिसू लागल्याने पेरीने परतीचा मार्ग पत्करला. ऑक्टोबरच्या मध्यावर पेरीची तुकडी स्कॉटलंडच्या शेटलँड बेटांवर पोहोचली.
१८२४ मध्ये पेरीने पुन्हा एकदा इंग्लंड सोडून नॉर्थवेस्ट पॅसेजचा मार्ग धरला!
१८२१-२३ च्या मोहीमेप्रमाणेच पेरीने फुरी आणि हेक्ला ही दोन्ही जहाजं घेतली होती. हेनरी हॉपनर, जेम्स क्लार्क रॉस हे आधीच्या मोहीमेतील सहकारी यावेळेसही पेरीबरोबर होते. त्यात भर पडली होती ती हॉर्शो ऑस्टीनची. या वेळी प्रिन्स रिजंट खाडीतून बुथिया आखातात प्रवेश करुन पुढे पश्चिमेला मजल मारायचा पेरीचा बेत होता.
१८२४ मध्ये थंडीचा कडाका जबर होता. लँकेस्टर खाडीच्या मुखाशी पोहोचेपर्यंतच १० सप्टेंबर उजाडला होता. पेरीने प्रिन्स रिजंट खाडी गाठली खरी, परंतु खाडीतून ६० मैलांची मजल मारल्यावर पुढे गोठलेल्या बर्फामुळे त्याचा मार्ग खुंटला. रिजंट खाडीच्या पूर्वेच्या किनार्यावर त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.
१८२५ च्या जुलैमध्ये त्यांची बर्फातून सुटका झाली खरी, परंतु आणखीन ६० मैल दक्षिणेला गेल्यावर त्यांना हिमवादळाने गाठलं! या वादळापासून कमीत कमी नुकसान व्हावं म्हणून फुरी पूर्वेच्या किनार्याने मार्ग काढत होतं. त्यातच फुरीचे दोन्ही पंप निकामी झाले. पंप दुरुस्त करण्यासाठी दोन दिवस प्रयत्नांची शिकस्तं करण्यात आली, पण फारसा उपयोग झाला नाही. अखेरीस जहाज मुद्दाम किनार्यावर आणण्यात आलं. जहाजावरील सर्व सामान उतरवून जहाजाची दुरुस्ती करण्याचा पेरीचा विचार होता, परंतु जहाजाचा मुख्य सांगाडाच निकामी झाल्याचं आढळून आल्याने ते तिथेच सोडून देण्याला पर्याय नव्हता!
फुरीची घटका भरली होती!
जहाजावरील सर्व सामग्री किनार्यावर उतरवण्यात आली. यातील आवश्यक ती सामग्री हेक्लावर चढवून पेरीने परतीची वाट धरली. १८२५ च्या ऑक्टोबरमध्ये पेरी इंग्लंडला परतला.
७२'३०'' अंश उत्तर अक्षवृत्त आणि ९२'३०'' अंश पश्चिम रेखावृत्तावर फुरी जहाजाला चिरविश्रांती देण्यात आली. त्या ठिकाणाला फुरी बीच असंच नाव पडलं!
जॉन फ्रँकलीनने १८२५ मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर इंग्लंड सोडलं!
मॅकेंझी नदी तून प्रवास करत नदीच्या मुखातून आर्क्टीक महासागर गाठायचा आणि किनार्या-किनार्याने पश्चिमेला प्रवास करत फ्रेड्रीक बीचीच्या मोहीमेशी भेट घ्यायची अशी फ्रँकलीनची योजना होती. बीचीची मोहीम बेरींगच्या सामुद्रधुनीतून पूर्वेला येणार होती! फ्रँकलीनच्या तुकडीत पीटर वॉरन डीसचा समावेश होता.
फ्रँकलीनच्या मोहीमेतील दुसरी तुकडी रिचर्डसनच्या नेतृत्वात पूर्वेला पेरीच्या मोहीमेला गाठण्याचा प्रयत्न करणार होती.
फ्रँकलीनने ग्रेट स्लेव सरोवर गाठलं आणि मॅकेंझी नदीतून प्रवास करत १६ ऑगस्ट १८२५ ला आर्क्टीक मध्ये प्रवेश केला. पेरीसाठी खुणेचा ध्वज आणि चिठ्ठी ठेवून फ्रँकलीन हिवाळ्यासाठी ग्रेट बेअर सरोवरावरील फोर्ट फ्रँकलीनला परतला.
१८२६ च्या उन्हाळ्यात फ्रँकलीनने पुन्हा मॅकेंझी नदीची वाट पकडली. परंतु नदीच्या मुखाशी पोहोचल्यावर आर्क्टीकमधील गोठलेल्या बर्फाने त्याचं स्वागत केलं. फ्रँकलीनने पश्चिमेची वाट धरली. अनेक मैल बर्फावरुन वाट काढल्यावर त्याने परतीचा निर्णय घेतला. या ठिकाणाला त्याने नाव दिल...
टर्न अगेन पॉईंट!
१८२७ च्या सप्टेंबरमध्ये फ्रँकलीन लिव्हरपूलला परतला.
पेरीबरोबर १८२१ च्या मोहीमेत भाग घेतलेल्या फ्रेड्रीक बीची याची १८२५ मध्ये अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावरुन नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या मोहीमेवर नेमणूक करण्यात आली. पूर्वेकडून येणार्या पेरीच्या मोहीमेला पूरक म्हणून पश्चिमेकडून बीचीची ही मोहीम होती.
१८२६ च्या उन्हाळ्यात बीचीच्या तुकडीने रशिया आणि अमेरीकेला विभागाणार्या बेरींगच्या सामुद्रधुनीतून उत्तर आर्क्टीक सागरात प्रवेश केला. बेरींगची समुद्रधुनी ओलांडल्यावर बीचीच्या तुकडीतील एक बार्ज आर्क्टीक मधील उत्तरेला असलेल्या अत्यंत महत्वाच्या ठि़काणावर पोहोचला. ७१'२३'' उत्तर अक्षवृत्त आणि १५६'२१'' पश्चिम रेखावृत्तावरी हे ठिकाण म्हणजे नॉर्थवेस्ट् पॅसेजचं पश्चिमेचं प्रवेशद्वारच होतं!
पॉईंट बॅरो!
पॉईंट बॅरो
पॉईंट बॅरो
जॉन फ्रँकलीन मॅकेंझी नदीवरच्या मोहीमेदरम्यान ज्या भागातून परत फिरला होता, त्याच्या केवळ १४६ मैल पश्चिमेला बीची येऊन पोहोचला होता!
बीचीने आर्क्टीकच्या उत्तर भागातील अनेक बेटांचा शोध लावला. बेरींगच्या सामुद्रधुनीतील तीनही बेटांना भेट देऊन १८२७ मध्ये तो इंग्लंडला परतला.
१८२७ मध्ये विल्यम पेरी उत्तर धृवाच्या मोहीमेवर गेला होता. प्रत्यक्षात धृव गाठण्यात त्याला यश आलं नाही तरी ८२'४५'' उत्तर अक्षवृत्तापर्यंत त्याने मजल मारली होती! तब्बल ४८ वर्षे पेरीचा हा विक्रम अबाधीत होता.
१८२९ च्या मे महिन्यात इंग्लंडहून नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर आणखीन एक तुकडी रवाना झाली!
या मोहीमेचा प्रमुख होता जॉन रॉस!
१८१८ च्या मोहीमेत लँकेस्टर खाडीच्या पश्चिमेला दिसलेल्या पर्वतराजीमुळे रॉस परत फिरला होता. प्रत्यक्षात ही पर्वतराजी हा त्याचा दृष्टीभ्रम होता हे पुढे सिद्ध झाल्यावर त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. आपली गेलेली पत परत मिळवण्याची ही संधी आहे असं रॉसला वाटलं नसलं तरच नवल. १८२५ मध्ये पेरीचं जहाज फुरी जिथे सोडण्यात आलं होतं, त्या ठिकाणापासून दक्षिणेला प्रिन्स रिजंट खाडी मधून बुथिया आखातात प्रवेश करुन पश्चिमेला मार्गक्रमणा करण्याची रॉसची योजना होती.
या मोहीमेसाठी रॉसने व्हिक्टरी हे जहाज वापरण्याचं ठरवलं होतं. या जहाजात अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. जहाज संपूर्ण बर्फावर उचलून घेण्याची सोय होती. तसेच जहाजाची पॅडल्स आतल्या बाजूला ओढून घेण्याचीही सोय होती. जहाजावर रॉस, त्याचा पुतण्या जेम्स क्लार्क रॉस, विल्यम थॉम, जॉर्ज मॅकडर्मीड आणि १९ खलाशी होते.
इंग्लंड सोडल्यावर ऑगस्ट महिन्यात त्याने बॅफीनचा उपसागर गाठला. बॅफीनच्या उपसागरात नेहमी आढळून येणार्या हिमखंडांचं प्रमाण खूपच कमी असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. ६ ऑगस्टला १८१८ मध्ये तो ज्या भागातून परत फिरला होता, तो भाग मागे टाकून रॉसने लँकेस्टर खाडीतून पुढे कूच केलं. प्रिन्स रिजंट खाडीच्या दिशेने दक्षिणेला वळून १३ ऑगस्टला त्याने फुरी जहाज सोडलेला सागरकिनारा गाठला.
फुरीचा सांगाडा अदृष्यं झाला होता!
पेरीच्या मोहीमेतील बरीच सामग्री अद्याप तिथे होती. आवश्यक ती सामग्री घेतल्यावर रॉसने दक्षिणेकडे कूच केलं आणि बुथिया आखातात प्रवेश केला. परंतु सप्टेंबरच्या अखेरीस फुरीच्या किनार्यापासून सुमारे २०० मैल दक्षिणेला गोठलेल्या बर्फामुळे रॉसचा मार्ग खुंटला! बुथिया आखाताच्या पूर्वेच्या टोकाला असलेल्या फेलीक्स बंदरात त्याने हिवाळ्याचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
१८३० च्या जानेवारीत नेट्स्लीक एस्कीमोंचा एक जथा फेलीक्स बंदरात प्रगटला. त्यांच्याकडून रॉसच्या तुकडीला ताजे खाद्यपदार्थ मिळाले. त्याच्या बदल्यात रॉसच्या सुताराने एका एस्कीमोला लाकडी पाय बनवून दिला!
वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर रॉसचा पुतण्या जेम्स क्लार्क रॉसने बुथिया आखाताच्या पश्चिमेला अनेकदा पदयात्रा केली. ९ एप्रिलला तो बुथिया आखाताच्या पश्चिमेला पोहोचला. मे महिन्यात त्याने बर्फाचं आवरण ओलांडून किंग विल्यम बेटाचा उत्तर-पूर्वेचा किनारा गाठला. मात्रं आपण गोठलेल्या बर्फावरुन समुद्र ओलांडल्याचं त्याच्या ध्यानात आलं नाही. सप्टेंबरच्या मध्यावर बर्फाचं आवरण विलग होण्यास सुरवात झाल्यावर नेमका प्रकार त्याच्या ध्यानात आला.
सप्टेंबरच्या मध्यावर रॉसच्या तुकडीने बर्फ फोडून जहाज मोकळं करण्यात यश मिळवलं खरं, पण जेमतेम काही अंतर गेल्यावर ते पुन्हा बर्फात अडकलं! ऑक्टोबरच्या महिन्यात बर्फ फोडून जहाज शेरीफच्या उपसागरात आणण्यात त्यांना यश आलं खरं, परंतु पुढे मजल मारण्यापूर्वीच जहाज पुन्हा बर्फात अडकलं! शेरीफच्या उपसागरत हिवाळ्यासाठी मुक्काम करण्यावाचून त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उरला नाही.
फेलीक्स बंदरापासून शेरीफचा उपसागर अवघ्या ३ मैलांवर होता!
१८३१ च्या एप्रिलपर्यंत एस्कीमोंचा एकही गट शेरीफच्या उपसागरात आला नव्हता. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच जेम्स क्लार्क रॉसचे दौरे पुन्हा सुरु झाले!
जेम्स क्लार्क रॉसने पुन्हा एकदा बुथिया उपसागर ओलांडला! १ जून १८३१ रोजी जेम्स क्लार्क रॉसने एक महत्वाचं ठिकाण पादाक्रांत केलं.
चुंबकीय उत्तर धृव!
जेम्स क्लार्क रॉस चुंबकीय उत्तर धृवावर पोहोचणारा पहिला युरोपीय ठरला होता!
ऑगस्ट महिन्यात जहाज हलवण्याइतपत बर्फ वितळला होता, परंतु अवघ्या चार मैलांवरील व्हिक्टोरीया बंदरात पोहोचल्यावर जहाज पुन्हा बर्फात अडकलं! त्या परिसरातील हा त्यांचा तिसरा हिवाळा होता!
१८३२ च्या जानेवारीत रॉसला एक भयावह जाणिव झाली...
व्हिक्टरी जहाज बर्फातून बाहेर पडण्याची शक्यता खूपच कमी होती!
जवळपास शून्यं!
जहाज बर्फातून बाहेर पडणं शक्यं नाही हे स्पष्ट झाल्यावर एक मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर आSS वासून उभा राह्णार होता.
त्या प्रदेशातून बाहेर कसं पडता येईल?
जॉन रॉसने यावर एक उपाय शोधून काढला. व्हिक्टरीवर असलेल्या लाईफबोटी फुरीच्या समुद्रकिनार्यापर्यंत ओढून न्याव्या, तिथे आवश्यक साधनसामग्री घेऊन उत्तरेची वाट धरावी आणि व्हेल माशांच्या शिकारीसाठी आलेलं एखादं जहाज आपल्याला वाचवेल अशी आशा करावी अशी रॉसची योजना होती!
२९ मे १८३२ ला रॉसच्या तुकडीने आपलं व्हिक्टरी जहाज सोडलं, जहाजावरील सर्व उपयुक्त साधनसामग्री आणि लाईफबोटी त्यांनी काढून घेतल्या होत्या. फुरीच्या समुद्रकिनार्याच्या दिशेने २०० मैलांची पायपीट करण्याची तयारी सुरु असतानाच ९ जूनला जेम्स क्लार्क रॉस तिथे येऊन धडकला!
जेम्स क्लार्क रॉस फुरीच्या सागरकिनार्याला भेट देऊन परतला होता!
त्याने एक अत्यंत महत्वाची बातमी आणली होती. फुरी जहाजाच्या मागे ठेवण्यात आलेल्या लाईफबोटी थोडीफार दुरुस्ती करुन वापरता येणं शक्यं होतं!
लाईफबोटी वाहून नेण्याचं टळल्यामुळे एक मोठं ओझं कमी झालं होतं!
१ जुलैला रॉसच्या तुकडीने फुरीचा समुद्रकिनारा गाठला. तिथे असलेल्या बोटींची आवश्यक ती दुरुस्ती करुन आणि शक्य तितकी सामग्री बरोबर घेऊन त्यांनी १ ऑगस्टला फुरीचा किनारा सोडला आणि उत्तरेचा मार्ग पकडला.
ऑगस्टच्या अखेरीस ते बॅटीच्या उपसागरात पोहोचले. परंतु गोठलेल्या बर्फाने इथे पुन्हा त्यांची वाट अडवली! सप्टेंबरच्या अखेरपर्यंत त्यांनी बर्फ वितळण्याची वाट पाहत तिथेच मुक्काम ठोकला, परंतु बर्फ वितळण्याची चिन्हं दिसेनात! आणखीन एक हिवाळा तिथे घालवण्याला पर्याय नव्हता!
आपल्या बोटी बेटीच्या आखातापाशी ठेवून त्यांनी फुरीचा किनारा गाठला. फुरीच्या किनार्यावर हिवाळ्यासाठी मुक्काम करण्यात एक महत्वाचा फायदा होता तो म्हणजे अन्नसामग्री भरपूर प्रमाणात उपलब्धं होती!
१९३३ च्या ८ जुलैला रॉसने पुन्हा एकदा बेटीचा उपसागर गाठण्यासाठी प्रस्थान ठेवलं. अद्यापही बर्फ पूर्णपणे वितळला नव्हता, पण सुदैवाने १४ ऑगस्टला त्यांना बोटी हाकारण्याइतपत मार्ग मोकळा झाल्याचं आढळून आलं!
१५ ऑगस्टला त्यांनी बेटीच्या आखातातून प्रस्थान केलं. व्हेल्सच्या शिकारीसाठी आलेलं एखादं जहाज आपल्या दृष्टीस पडेल अशी त्यांना आशा होती.
प्रिन्स रिजंट खाडीच्या मुखाशी पोहोचून त्यांनी लँकेस्टर खाडीत प्रवेश केला. २६ ऑगस्टला त्यांच्या नजरेस एक जहाज पडलं, परंतु त्या जहाजावरील खलाशांचं रॉसच्या तुकडीकडे लक्षंच गेलं नाही! सुदैवाने त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास दुसर्या एका जहाजाने सर्वांना उचलून घेतलं!
ऑक्टोबरमध्ये इंग्लंडला परतल्यावर आपला पूर्वीचा मान-सन्मान परत मिळवण्यात जॉन रॉस यशस्वी झाला. चार वर्ष चाललेल्या या मोहीमेत रॉसच्या नेतृत्वाचं सर्वांनी भरपूर गुणगान केलं. चुंबकीय उत्तर धृव गाठण्यातही जेम्स क्लार्क रॉस यशस्वी झाला होता.
अर्थात जॉन रॉसची हुकुमशाही प्रवृत्ती इथेही उफाळून आलीच!
१८३० मध्ये जेम्स क्लार्क रॉसने एका मोहीमेत एका सामुद्रधुनीतील ३ बेटांना भेट देऊन त्यांचा नकाशा तयार केला होता (या सामुद्रधुनीला पुढे जेम्स क्लार्क रॉसचं नाव देण्यात आलं). या बेटांना त्याने ब्युफोर्ट बेटं असं नाव दिलं होतं. जॉन रॉस स्वतः त्या मोहीमेवर गेला नव्हता. ही बेटं त्याने दूर अंतरावरुनही पाहीली नव्हती.
परंतु इंग्लंडला परतल्यावर या बेटांच्या शोधाचं श्रेयं त्याने सर्वस्वी स्वतःकडे घेतलं! आपल्या नकाशात त्याने या बेटांचं क्लेरेन्स बेटं असं नामकरण केलं. या बेटांच्या परिसरात अनेक अस्तित्वात नसलेल्या बेटांचाही त्याने नकाशात अंतर्भाव केला! इंग्लंडचा राजा चौथा विल्यम याला खुश करण्यासाठी जॉन रॉसने हा उद्योग केला होता!
१८२९ मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर गेलेल्या जॉन रॉसच्या तुकडीबद्दल १८३२ पर्यंत काहीही माहीती मिळालेली नव्हती. इंग्लंडमध्ये रॉसच्या शोधासाठी मोहीमेची जुळवाजुळव सुरु होती. जॉर्ज बेक या दर्यावर्दीने नॉर्थवेस्टच्या जुन्या मार्गाने शोध घेण्याऐवजी एक वेगळीच योजना मांडली.
कातड्यांचा व्यापार करणार्या मार्गाने जाऊन ग्रेट स्लेव सरोवर गाठावं आणि ग्रेट फिश नदीतून जात रॉसचं नेमकं ठिकाण शोधून काढावं असा त्याचा बेत होता. तोपर्यंत कोणीही युरोपियन माणूस ग्रेट फिश नदीत पोहोचला नव्हता, परंतु एस्कीमो आणि रेड इंडीयन जमातींच्या बोलण्यात या नदीचा नेहमी उल्लेख येत असे.
जॉर्ज बेकने १८३३ च्या फेब्रुवारीत इंग्लंड सोडलं आणि ऑगस्टच्या सुरवातीला ग्रेट स्लेव सरोवर गाठलं. या सरोवराच्या पूर्व टोकाला असलेल्या फोर्ट रिलायन्स इथे हडसन बे कंपनीने थंडीसाठी आपल्या अधिकार्यांना राहण्याची सोय केली होती! २९ ऑगस्टला बेकला ग्रेट फिश नदीचा शोध लागला. हिवाळा संपेपर्यंत बेक फोर्ट रिलायन्स इथे मुक्कामासाठी परतला.
१८३४ च्या मार्च महिन्यात बेकला अनपेक्षीत बातमी मिळाली.
जॉन रॉस सुखरुप इंग्लंडला पोहोचला होता!
रॉसच्या किंग विल्यम बेटापासून ते जॉन फ्रँकलीनच्या टर्न अगेन पॉईंटपर्यंत प्रदेशाचं संशोधन करण्याची बेकला सूचना देण्यात आली होती. नॉर्थवेस्ट पॅसेजमधील हा भाग (आणि पॉईंट बॅरोच्या पूर्वेकडील भाग) तो पर्यंत संपूर्ण अज्ञात होता. किंग विल्यम बेटाच्या परिसरातील प्रदेशाबद्दल अनेक वेगवेगळे दावे करण्यात आल्यामुळे नेमका काय प्रकार असावा याची कोणालाच काही कल्पना नव्हती.
७ जून १८३४ ला बेकने ग्रेट फिश नदीच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. आर्टीलरी आणि क्लिंटन-कोल्डन सरोवरातून त्याने अखेर ग्२८ जूनला ग्रेट फिश नदी गाठली! नदीच्या काठाने प्रवास करताना या नदीत एकूण ८३ ठिकाणी जोरदार प्रवाह (रॅपीड्स) असल्याचं त्याला आढळून आलं! २३ जुलैला अखेर तो चॅन्ट्री खाडीच्या मुखाशी पोहोचला.
समोर नजर टाकताच त्याला उत्तरेला ओळखीचा भूभाग दृष्टीस पडला!
किंग विल्यम बेट!
किंग विल्यम बेटाचं दुरुनच दर्शन घेऊन बेक परत फिरला. २७ सप्टेंबरला तो फोर्ट रिलायन्सला पोहोचला. तिथे हिवाळा काढून ८ सप्टेंबर १८३५ ला बेकने इंग्लंड गाठलं.
ग्रेट फिश (बेक) नदी
किंग विल्यम बेट
१८३६ मध्ये बेक पुन्हा नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला!
हडसनचा उपसागर गाठून त्याचा उत्तरेचं टोक असलेला रिपल्सचा उपसागर किंवा वॅग्नर खाडी गाठण्याची यावेळी बेत होता. या दोनपैकी एका ठिकाणी जहाज समुद्रातून किनार्यावर ओढून घ्यावं आणि जमिनीवरुन मार्गक्रमणा करुन पश्चिमेला सागर दिसताच जहाजावरुन ग्रेट फिश नदी किंवा फ्रँकलीनचा टर्न अगेन पॉईंट गाठावा अशी एकंदर योजना होती.
ग्रेट फिश नदी आणि टर्न अगेन पॉईंट ही हडसनच्या उपसागराच्या पश्चिमेला जास्तीत जास्त गाठण्यात आलेली ठिकाणं होती. याच्या दरम्यानचा संपूर्ण प्रदेश आणि ग्रेट फिश नदी आणि हडसनच्या उपसागर यामधील प्रदेश पूर्णपणे अज्ञात होता. वास्तवीक रिपल्सच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम दिशेला अवघ्या ६० मैलांवर बुथियाचं आखात होतं, परंतु त्यावेळी कोणालाही हे माहीत नव्हतं!
या योजनेत एक मोठीच अडचण होती. हडसनच्या उपसागराच्या उत्तर टोकाशी पोहोचल्यावर बेकला आपलं जहाज जमिनीवर ओढून घ्यावं लागणार होतं. ग्रेट फिश नदी गाठण्यापूर्वी जहाज हाकारण्यायोग्य समुद्राचा भाग न आढळल्यास त्याला तब्बल २५० मैल ते जमिनीवरुन ओढून न्यावं लागणार होतं!
१८३६ च्या जूनमध्ये ६० खलाशांसह टेरर या युद्धनौकेवरुन बेकने हडसनच्या उपसागराच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. अर्थात मोसमाच्या इतक्या उशीरा निघाल्याने ओर्कनी बेटांपर्यंत दुसर्या बोटीला टेररला ओढून न्यावं लागलं!
१ ऑगस्टला बेक हडसनच्या सामुद्रधुनीत पोहोचला. परंतु ऑगस्टच्या शेवटी गोठलेल्या सामुद्रधुनीत टेरर बर्फात अडकलं!
पुढचे १० महिने जहाज बर्फात अडकलेलं होतं! एक वेळ तर अशी आली होती की सतत जमा होणार्या बर्फाच्या थरामुळे जहाज त्या हिमखंडाच्या कड्याच्या टोकाला पाण्याच्या पातळीपासून तब्बल ४० फूट उंचीवर अडकलं होतं! जहाज सोडून देण्याची अनेकदा तयारी करण्यात आली, परंतु बेकने केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर जहाज सोडलं नव्हतं!
१८३७ च्या जानेवारीत जहाजावरील खलाशांमध्ये स्कर्व्हीचा प्रादुर्भाव झाला. परिणामी तीन खलाशी प्राणाला मुकले. त्यातच दुसर्या एका हिमखंडाशी टक्कर झाल्याने जहाजाचं अधिकच नुकसान झालं! बर्फाच्या दबावामुळे अनेकदा जहाजाच्या फळ्यांना लावलेलं टर्पेंटाईन गळून पडत असे! हिमखंडावर अडकलेलं असतानाच जहाज साउथहॅम्टन बेटाच्या बाजूने हडसनच्या सामुद्रधुनीत वाहत आलं!
१८३७ च्या जुलैमध्ये बहुधा त्या हिमखंडालाच जहाजावरील खलाशांची दया आली असावी. आपल्या कचाट्यातून त्याने जहाजाची मुक्तता केली!
जहाज अखेरीस पाण्याच्या पृष्ठभागावर टेकलं! परंतु अद्यापही जहाजाचे हाल संपले नव्हते!
जहाजावर जमलेल्या बर्फाच्या मोठ्या थरांपैकी एक थर जहाजापासून अलग होऊन समुद्रात तरंगू लागला. एका बाजूचं वजन अचानक कमी झाल्याने जहाज दुसर्या बाजूला ६० अंशांपर्यंत कललं! जीवाच्या कराराने जहाजाच्या दुसर्या बाजूला असलेला बर्फ मोकळा करुन ते कसंबसं सरळ ठेवण्यात खलाशांना यश आलं!
आयर्लंडच्या किनार्यावरील लॉफ स्विली खाडीत बेकने जहाज सरळ वाळूत घातलं! जहाज जवळपास बुडण्याच्या अवस्थेत आलं होतं!
"त्या जहाजावरुन आम्ही अटलांटीक पार करुन आलो हा मोठा चमत्कारच होता!" बेक म्हणाला!
आपलं जहाज किनार्यावरील बर्फात मुद्दाम अडकवल्याची अनेक उदाहरणं आढळतात, परंतु भर समुद्रातील हिमखंडावर अडकल्याने टेररच्या नशिबात आलेले भोग मात्रं विरळाच!
क्रमशः
आज मी परत पहिली.. मस्त आहे -
आज मी परत पहिली..
मस्त आहे - वाचतिये
अति सुंदर अभ्यासपूर्ण वर्णन
अति सुंदर अभ्यासपूर्ण वर्णन
mast...
mast...
खूप सुंदर!! - रत्ना
खूप सुंदर!!
- रत्ना
हा भागही मस्तच!!!!
हा भागही मस्तच!!!!
एकच प्रश्ण फेलिक्स बंदर (Gulf
एकच प्रश्ण फेलिक्स बंदर (Gulf of Boothea) च्या आजुबाजुस कुठेच दिसत नाही. रॉस बूथिया मधुन फेलिक्सजवळ कसा आला?
१) रॉसच्या किंग विल्यम
१) रॉसच्या किंग विल्यम बेटापासून ते जॉन फ्रँकलीनच्या टर्न अगेन पॉईंटपर्यंत प्रदेशाचं संशोधन करण्याची बेकला सूचना देण्यात आली होती. नॉर्थवेस्ट पॅसेजमधील हा भाग (आणि पॉईंट बॅरोच्या पूर्वेकडील भाग) तो पर्यंत संपूर्ण अज्ञात होता.
२) समोर नजर टाकताच त्याला उत्तरेला ओळखीचा भूभाग दृष्टीस पडला!
किंग विल्यम बेट!
हे कसे ते कळले नाही रॉस विलियम बेटाच्या पुर्वेला गेलेला पहिला युरोपियन तर बेक दक्षिणेला मग बेकला ते बेट ओळखीचे कसे?
सॉरी खुप प्रश्ण विचारते पण बर्याच मोहिमात जरी कप्तान माहिती शेअर करित असले तरी टेलिग्राफ (१८३८ शोध आणि १८५० प्रचलित) च्या आधी ही माहिती दुरवर कळत कशी असे ती ही एवढ्या डिटेल मध्ये की प्रथमच बेट पण ओळखिचे वाटावे यावे.