मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी.
पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती. वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध घ्यावा, त्यावर कब्जा करुन आपला मालकी हक्क प्रस्थापित करावा आणि आपलं साम्राज्यं विस्तारावं ही सहज मानवी प्रवृत्ती. अज्ञात प्रदेशाच्या शोधात अनेकांनी सागरालाच आपल्या प्रवासाचा मार्ग बनवून शोध घेण्यास सुरवात केली. अर्थातच अनेक संशोधकांना आणि प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले तरी शतकानुशतके हा शोध अव्याहत सुरुच राहीला.
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सत्तर टक्के भाग व्यापला आहे तो पाच महासागर मिळून बनलेल्या जलसाठ्याने! उत्तर गोलार्धाच्या प्रमाणात तुलनेने दक्षिणेत पाण्याचं साम्राज्यं मोठ्या प्रमाणात आहे. अर्थातच मानवी संस्कृती प्रथम उदयास आल्या त्या उत्तर गोलार्धातच! या मानवी संस्कृतींचा पाचही खंडात प्रसार होण्यात मुख्य वाटा होता तो अर्थातच समुद्रपृष्ठभागावरुन करण्यात आलेल्या सागरसफरींचा!
पृथ्वीच्या पाठीवरील पाच महासागरांपैकी प्रत्येक महासागर म्हणजे एक निराळंच प्रकरण आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियापासून ते पार अमेरिकेच्या पश्चिम किनार्यापर्यंत पसरलेला पॅसिफीक महासागर, अमेरिका आणि युरोप - पश्चिम आफ्रीकेच्या दरम्यान पसरलेला अटलांटीक महासागर, आफ्रीकेच्या पूर्व किनार्यापासून ते दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला हिंदी महासागर, दक्षिण धृवाला कवेत घेणारा अंटार्क्टीक महासागर आणि उत्तर धृवप्रदेशाभोवतीचा आर्क्टीक महासागर! प्रत्येक महासागर आपलं एक वैशिष्ट्य जपून आहे.
कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे!
पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!
सुमारे साडेपाच लाख चौरस मैल पसरलेला आर्क्टीक महासागर हा आकाराने जवळपास रशियाएवढा आहे. युरोपमधील अनेक देश, रशिया, उत्तर अमेरीका, ग्रीनलंड आणि अनेक बेटांचा सुमारे २८ हजार मैलाचा किनारा या महासागराला लाभलेला आहे. बॅफीनचा उपसागर, बेरेंट्स आणि ब्युफोर्ट समुद्र, चुकची समुद्रापासून ते सैबेरीयन समुदापर्यंत आर्क्टीक महासागर पसरलेला आहे. बेरींगच्या सामुद्रधुनीने पॅसिफीकला तर ग्रीनलंड आणि लॅब्रेडॉर समुदाने तो अटलांटीकला जोडला गेलेला आहे. अलास्कातील पॉईंट बॅरो, कॅनडातील चर्चिल, नॅन्स्वीक आणि इन्विक. ग्रीनलंडमधील नूक, रशियातील मुरमान्स्क, टिक्सी आणि पेवेक ही आर्क्टीकमधील प्रमुख बंदरं.
स्कँडीनेव्हीयन प्रदेशातील नॉर्स टोळ्यांनी (व्हायकिंग्ज) ८ व्या शतकापासून उत्तर युरोपात आणि पूर्वेला रशियापर्यंत आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली होती. या नॉर्स टोळ्यांचा मुख्य उद्देश व्यापार हाच असला तरी वसाहतींच्या उभारणीसही त्यांनी प्राधान्य दिलेलं होतंच. हे लोक उत्कृष्ट दर्यावर्दी होते. आपल्या तत्कालीन जहाजांतून ते युरोपातील अनेक देश, रशिया तसेच उत्तर अटलांटीक मार्गे अमेरीकेच्या उत्तर पूर्वेकडील अनेक बेटांवरही पोहोचले होते. ११ व्या शतकापर्यंत व्हायकिंग्ज वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला होता. उत्तर अटलांटीकमधील अनेक लहान-मोठ्या बेटांवरही त्यांनी आपल्या वसाहती उभारल्या होत्या. ग्रीनलंडच्या पश्चिमेला असलेल्या एल्स्मेअर बेटापर्यंत व्हायकिंग्ज पोहोचले होते.
तेराव्या शतकाच्या सुरवातीलाच आर्क्टीक सर्कलमधील बर्फ गोठण्यास सुरवात झाली. याचा परिणाम म्हणून युरोप आणि आशियाच्या उत्तर भागात अतिथंड हवामानाचं साम्राज्यं पसरलं.
लिटिल आईस एज!
या अतिथंड हवामानाचा परिणाम व्हायकिंग्जच्या वसाहतींवर होणं अपरिहार्यच होतं. तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत उत्तर अटलांटीकमधील बहुतेक सर्व व्हायकिंग्ज वसाहतींनी थंडीच्या कडाक्यामुळे स्कँडीनेव्हीयाची वाट धरलेली होती. या लिटील आईस एजचा परिणाम म्हणून जवळपास सोळाव्या शतकापर्यंत उत्तर अटलांटीकमधील सागरात युरोपीय दर्यावर्दींच्या सफरी जवळपास बंदच होत्या!
अॅरीस्टॉटलच्या सिद्धांतानुसार उत्तर गोलार्धातील जमिनीचा तोल सावरण्यासाठी दक्षिण गोलार्धातही दाट लोकवस्तीचे मानवी प्रदेश पसरलेले होते. या सिद्धांताचा विस्तार करुन टॉलेमीने दक्षिणेतील या मोठ्या भूभागाला टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटा असं नाव दिलं. या प्रदेशाच्या शोधातच अनेक युरोपीय संशोधकांनी दक्षिणेच्या दिशेने अनेक मोहीमा आखल्या.
१४८८ मध्ये बार्थेल्योमु डायझने आफ्रीकेचं दक्षिणेचं टोक असलेल्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून अटलांटीकमधून हिंदी महासागरात प्रवेश करण्यात यश मिळवलं. यामुळे आशिया खंडात समुद्रीमार्गाने प्रवेश करणं युरोपातील व्यापार्यांना सहज शक्यं झालं. पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज व्यापार्यांनी या मार्गाचा वापर करुन पूर्वेला दूरपर्यंत आपल्या वसाहती उभारण्यास सुरवात केली.
केप ऑफ गुड होप नंतर १५२२ मध्ये फर्डीनांड मॅजेलनने दक्षिण अमेरीकेतील मॅजेलन सामुद्रधुनीचा शोध लावला. या सामुद्रधुनीच्या मार्गे अमेरीकेचा पश्चिम किनारा गाठणं युरोपातील विस्तारवादी शक्तींना सहजसाध्य झालं. मॅजेलन सामुद्रधुनीच्या मार्गे दक्षिण पॅसिफीकमधून आशिया खंडाचा पूर्व किनारा गाठणंही शक्यं होणार होतं.
युरोपातून उत्तर अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावर जाण्याचा त्यावेळी उपलब्ध असलेला एकमेव मार्ग म्हणजे मॅजेलन सामुद्रधुनी! अटलांटीकमधून दक्षिण अमेरीकेच्या पूर्व किनार्याने दक्षिणेला प्रवास करुन मॅजेलन सामुद्रधुनीत प्रवेश करायचा आणि पुढे पॅसिफीक महासागर गाठून पुन्हा उत्तरेच्या दिशेने जात अमेरीकेला पोहोचायचं! हा मार्ग अर्थात लांबलच आणि वेळखाऊ होताच, जोडीला दक्षिण अमेरीकेच्या किनार्यांवर कधीही धडकणार्या वादळांचा धोका होता. मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर वादळात जहाज भरकटल्याने फ्रान्सिस ड्रेकला १५७८ मध्ये ऑस्ट्रेलेशियाकडे जाणार्या ड्रेक पॅसेजचा शोध लागला.
१६१५ मध्ये विल्यम शूटेन आणि जेकब ला मेर यांनी मॅजेलन सामुद्रधुनीच्या मार्गे न जाता दक्षिण अमेरीकेच्या दक्षिण टोकाला - केप हॉर्नला - वळसा घातला आणि ड्रेक पॅसेजमधून पॅसिफीकमध्ये प्रवेश केला. मॅजेलन सामुद्रधुनीच्या आखूड मार्गाने न जाता पॅसिफीक गाठण्यासाठी आणखीन एक पर्यायी मार्ग उपलब्धं झाला होता. परंतु या मार्गाने मॅजेलन सामुद्रधुनीच्याही दक्षिणेला प्रवास करावा लागत होता. त्यातच केप हॉर्नच्या आसपास सतत घोंघावणार्या वार्यांपुढे अनेक मोठ्या जहाजांचा टिकाव लागणंही कित्येकदा कठीण जात असे.
युरोपातून अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावर जाणार्या नजीकच्या मार्गाची निकड युरोपीय सत्ताधार्यांना भासू लागली होती. परंतु अटलांटीकच्या दक्षिण भातातून मॅजेलन सामुद्रधुनी अथवा केप हॉर्न गाठल्याशिवाय असा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही हे ध्यानात आल्यावर युरोपातील दर्यावर्दींनी उत्तर अटलांटीक भागाकडे लक्षं केंद्रीत केलं. परंतु लिटील आईस एजमुळे सोळाव्या शतकापर्यंत उत्तर अटलांटीकतमधील बर्फापुढे मार्ग खुंटला होता.
सोळाव्या शतकात मेक्सिकोवर नियंत्रण मिळवणारा स्पॅनिश सेनानी हर्मान कॉर्टेझ याने अमेरीकेच्या पश्चिम किनार्यापासून आर्क्टीक सागरातून युरोपात जाण्याचा मार्ग शोधण्याचा निश्चय केला. या कामावर त्याने दर्यावर्दी फ्रान्सिस्को डी उलो याची नेमणूक केली.
तत्कालीन युरोपीय दर्यावर्दी आणि खलाशी यांच्यात प्रचलित असलेला एक सिद्धांत म्हणजे कॅलिफोर्निया हे एक बेट आहे आणि अमेरी़केच्या मुख्य भूभागापासून ते कॅलिफोर्नियाच्या आखाताने वेगळं झालेलं आहे! फ्रान्सिस्को डी उलोचा अर्थातच या सिद्धांतावर ठाम विश्वास होता. त्याच्या मतानुसार मेक्सिकोची पॅसिफीक समुद्रात घुसलेली पट्टी - बाजा कॅलिफोर्निया - हा कॅलिफोर्नियाच्या आखाताच्या दक्षिणेचा भाग होता. हे आखात पुढे उत्तर समुद्रातून पार अटलांटीकच्या मुखाशी असलेल्या सेंट लॉरेन्सच्या आखाताला जोडलेलं होतं!
डी उलोने बाजा कॅलिफोर्नियाच्या दोन्ही किनार्यांचा शोध लावला, परंतु कॅलिफोर्नियाच्या बेटाचा शोध त्याला लागला नाही!
डी उलोच्या या सफरीनंतर एका दंतकथेचा जन्म झाला...
अॅनियनची सामुद्रधुनी!
अॅनियन या नावाचा उगम बहुधा प्रसिद्ध इटालियन प्रवासी मार्को पोलोच्या पुस्तकात असावा. मार्को पोलोच्या पुस्तकाच्या १५५९ च्या प्रतिमध्ये चीनच्या अॅनिया प्रांताचा सर्वप्रथम उल्लेख सापडतो. तीन वर्षांनी, १५६२ मध्ये गॅकोमो गॅस्टाल्डी या संशोधकाने आपल्या नकाशात सर्वप्रथम अॅनियाच्या सामुद्रधुनीचा समावेश केला होता. १५६७ मध्ये बोलोग्निनी झाल्टीएरीने आपल्या नकाशात ही सामुद्रधुनी म्हणजे आशिया आणि अमेरीका खंडांना विभागणारा चिंचोळा जलमार्ग असल्याचं नमूद केलं होतं!
अॅनियन सामुद्रधुनीचा मार्ग
युरोपियन संशोधकांमध्ये अॅनियन सामुद्रधुनीची ही दंतकथा इतकी मान्यता पावली होती, की ही निव्वळ सामुद्रधुनी नसून आशिया आणि अमेरीका यांच्यातील हा प्रशस्त सागरी मार्ग आहे अशा निष्कर्षाला युरोपियन संशोधक आले होते! कॅथे (चीन) प्रदेशातील खांगन (खानाचं निवासस्थान) प्रदेशाकडे जाणारा हाच राजमार्ग असावा अशी युरोपियनांची पक्की खात्री झाली!
विषुववृत्त ओलांडून दक्षिणेला मॅजेलन सामुद्रधुनीतून किंवा केप हॉर्नला वळसा घालून पुन्हा उत्तरेला मार्गक्रमणा करुन अमेरीकेचा पश्चिम किनारा गाठणार्या नेहमीच्या मार्गापेक्षा उत्तर अटलांटीकमधून आर्क्टीक महासागरामार्गे अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावर पोहोचणार्या या जवळच्या मार्गाचं युरोपियन व्यापार्यांना आणि दर्यावर्दींना आकर्षण वाटलं नसतं तरच नवल. पश्चिमेच्या दिशेने अमेरीकेकडे जाणार्या या मार्गाला त्यांनी नाव दिलं....
नॉर्थ वेस्ट पॅसेज!
अॅनियनच्या या सामुद्रधुनीचं पश्चिमेकडचं प्रवेशद्वार सॅन डिएगोच्या वर सरळ रेषेत असावं असा नकाशा बनवणार्यांचा तर्क होता. पॅसिफीक महासागरातील ड्रेक पॅसेजचा शोध लावणार्या फ्रान्सिस ड्रेकने १५७९ मध्ये अॅनियन सामुद्रधुनीचं पश्चिम टोक गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. ग्रीक दर्यावर्दी जुआन द फुका याने पॅसिफीकमधून अॅनियन सामुद्रधुनीमार्गे उत्तर समुद्र गाठून परत आल्याचा दावा केला. १६४० मध्ये बार्थेल्योमु डी फोंटे याने मेक्सिकोहून निघून नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे हडसन बे गाठल्याचा दावा केला, परंतु डी फोंटेचा हा दावा पूर्णतः चुकीचा असल्याचं पुढे सिद्धं झालं.
नॉर्थ वेस्ट पॅसेजने सोळाव्या शतकापासून युरोपियन दर्यावर्दीनाही भुरळ घातली होती. इंग्लंडचा राजा सातवा हेनरी याने १४९७ मध्ये जॉन कॅबोट याची आशिया खंडाचा शोध घेण्याच्या कामगिरीवर रवानगी केली. कॅबोट उत्तर अमेरीकेतील न्यू फाऊंडलंडच्या किनार्यावर पोहोचला. पण नॉर्थवेस्ट पॅसेजमधून पुढे मजल मारणं त्याला शक्यं झालं नाही. १५२४ मध्ये स्पेनचा राजा पंधरावा चार्ल्स याने इस्टेव्हन गोमेझ याला मसाल्याची बेटं शोधण्यासाठी पाठवलं, परंतु कॅबोटच्या पुढे मजल मारणं त्याला शक्यं झालं नाही. नोव्हा स्कॉटीया इथून त्याने दक्षिणेकडे मोहरा वळवला. न्यूयॉर्क बेट आणि हडसन नदीचा शोध लावल्यावर तो स्पेनला परतला.
३ जून १५७८ ला मार्टीन फ्रॉबीशरने पंधरा जहाजांच्या काफील्यासह नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यासाठी इंग्लंडचं प्लायमाऊथ बंदर सोडलं. फ्रॉबीशरची ही तिसरी सफर होती. २० जूनला फ्रॉबीशर आणि काही सहकारी ग्रीनलंडच्या दक्षिण किनार्यावर पोहोचण्यात यशस्वी झाले. २ जुलैला एका मोठ्या उपसागराचं त्यांना दर्शन झालं. पुढे या उपसागराचं फ्रॉबीशयचा उपसागर असं नामकरण करण्यात आलं. एका वादळात सापडल्यामुळे फ्रॉबीशरचं जहाज भरकटलं आणि उत्तरेला असलेल्या एका वेगळ्याच सामुद्रधुनीत पोहोचलं.
हडसनची सामुद्रधुनी!
या सामुद्रधुनीतून सुमारे ६० मैलांची मार्गक्रमणा केल्यावर फ्रॉबीशर नाईलाजाने परत फिरला. फ्रॉबीशरच्या उपसागरात मोहीमेतील इतर जहाजांशी त्याची गाठ पडली. इमॅन्युएल या जहाजाला बझ बेटाचा शोध लागला होता. तिथे वसाहत स्थापनेचा फ्रॉबीशरचा प्रयत्न मात्रं अयशस्वीच ठरला.
हडसनचा उपसागर आणि सामुद्रधुनी
१५८३ च्या जुलै महिन्यात सर हंफ्रे गिल्बर्ट नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर आला. परंतु न्यूफाऊंडलंडच्या पुढे मजल मारणं त्याला शक्यं झालं नाही. परतीच्या वाटेवर असताना वादळात गिल्बर्टचं जहाज समुद्राच्या तळाला गेलं. परंतु गिल्बर्टबरोबरचं गोल्डन हाईंड हे जहाज मात्रं सुखरुप बचावलं होतं!
८ ऑगस्ट १५८५ ला जॉन डेव्हीस हा इंग्लीश दर्यावर्दी लॅब्रेडॉर समुद्रातील बॅफीन बेटावर पोहोचला. ज्या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून आत शिरुन त्याने नांगर टाकला होता त्याला त्याने नाव दिलं कंबरलँड साऊंड.
लॅब्रेडॉस समुद्र आणि कंबरलँड साऊंड
(कंबरलँड साऊंडवरुनच इथे वर्षभर आढळणार्या पांढर्या आणि राखाडी रंगाच्या व्हेलच्या प्रजातीला कंबरलँड साऊंड बेलुगा व्हेल असं नाव पडलं आहे).
नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या दर्यावर्दींनी अटलांटीकला मिळणार्या नद्यांमधून मार्ग काढण्याचाही प्रयत्नं केला.
फ्रेंच दर्यावर्दी जॅक्स कार्टीयर १५३४ मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून मार्ग काढून आशिया खंडात प्रवेश करण्याचा त्याचा इरादा होता. लॉरेन्सच्या आखातात अटलांटीक महासागराला मिळणारी सेंट लॉरेन्स नदी अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावर पॅसिफीक महासागराला मिळत असावी अशी त्याची कल्पना होती! कॅनडाच्या किनार्यावरील आदीवासींशी गाठ पडल्यावर सेंट लॉरेन्स नदी हाच नॉर्थवेस्ट पॅसेज असल्याचा आपला अंदाज अचूक असल्याचं त्याने मनाशी ठरवलं! कॅनेडीयन आदीवासींनी वर्णन केलेला अंतर्गत भाग हाच आशिया खंडाचा भाग असावा अशी त्याची खात्री झाली होती!
१९३५ मध्ये कार्टीयर आपल्या दुसर्या मोहीमेवर सेंट लॉरेन्स नदीत शिरला. सेंट लॉरेन्स नदीत प्रवेश करुन त्याने पश्चिमेची वाट पकडली. स्टॅडकोना या आदीवासींच्या राजधानीत पोहोचल्यावर कार्टीयरने आपली मोठी जहाजं तिथल्या बंदरात नांगरून ठेवली आणि एका लहान बोटीतून पुढे मजल मारली. (स्टॅडकोना हे आजच्या क्युबेक सिटीजवळ आहे).
२ ऑक्टोबर १५३५ ला होचेलगा (माँट्रीयाल) इथे पोहोचला. होचेलगा हे स्टॅडकोनाच्या तुलनेत बरंच मोठं शहर होतं. फ्रेंच दर्यावर्दींच्या स्वागताला इथे सुमारे हजारेक लोक जमले होते!
पुढे मजल मारण्याच्या कार्टीयरच्या प्रयत्नाला मात्रं तिथेच खीळ बसली. होचेलगाच्या पुढे नदीच्या पात्रात जोरदार खळखळणार्या प्रवाहांचं (रॅपीड्स) वर्चस्वं होतं. या प्रवाहांच्या खळखळाटामुळेच पुढे जाणं कार्टीयरच्या लहानशा बोटीला अशक्यं होतं!
सेंट लॉरेन्स नदी ही नॉर्थवेस्ट पॅसेज असल्याची कार्टीयरची इतकी खात्री होती, की नदीच्या प्रवाहात असलेले हे रॅपीड्सच आपल्याला चीनला पोहोचण्यापासून रोखत असल्याचं त्याने खेदाने आपल्या डायरीत नमूद केलं! त्या रॅपीड्सना त्याने नाव दिलं 'ला चीन रॅपीड्स'! आजही हेच नाव चिकटून राहीलेलं आहे!
कार्टीयरची दुसरी सफर
१ मे १६०७ ला इंग्लीश दर्यावर्दी हेनरी ह्डसन नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. १४ जूनला त्याने ग्रीनलंडचा पूर्व किनारा गाठला. ग्रीनलंडच्या किनार्याने उत्तरेला जात त्याने ७३ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं आणि २७ तारखेला स्पिट्सबर्जेन त्याच्या नजरेस पडलं. १३ जुलैला त्याने ७९'२३'' उत्तर अक्षवृत्त गाठलं. दुसर्याच दिवशी हडसन व्हेल्सच्या उपसागरात पोहोचला. १६ जुलैला त्याने ७९'४९'' उत्तर अक्षवृत्तापर्यंत मजल मारली. परंतु अखेर गोठलेल्या बर्फापुढे त्याला माघार घ्यावी लागली. १६०८ च्या मोहीमेतही हडसनने आर्क्टीकमधून रशियाच्या दिशेने पूर्वेला २५०० मैलांची मजल मारली, परंतु पुन्हा एकदा बर्फापुढे त्याला माघार पत्करावी लागली.
१६०९ मध्ये डच इस्ट इंडिया कंपनीने पुन्हा आशिया खंडाचा शोध लावण्यासाठी हडसनची नेमणूक केली. ४ एप्रिलला हडनने अॅमस्टरडॅम बंदर सोडलं, परंतु नॉर्वेच्या नॉर्थ केपच्या पुढे बर्फामुळे पुन्हा एकदा माघार पत्करावी लागली. हॉलंडला परतण्यापूर्वी उत्तर अमेरीकेच्या दिशेने नॉर्थवेस्ट पॅसेजमधून आशियाकडे कूच करण्याची हडसनने योजना आखली.
२ जुलैला हडसनने न्यू फाऊंडलंड गाठलं. जुलैच्या मध्यावर तो नोव्हा स्कॉटीया इथे पोहोचले. ४ ऑगस्टला हडसन केप कॉड सोडून ३ सप्टेंबरला त्याने नॉर्थ रिव्हर गाठली. ६ सप्टेंबरला आदीवासींशी झालेल्या युद्धामध्ये हडसनचा सहकारी जॉन कोलमन मरण पावला. १२ सप्टेंबरला हडसनने अटलांटीकमधून अमेरीकेच्या अंतर्भागात जाणार्या नदीत प्रवेश केला. या नदीतून मार्ग काढत तो २२ सप्टेंबरला आज जिथे अल्बनी आहे, तिथे पोहोचला.
ज्या नदीतून मार्ग काढत हडसनने अल्बनीचा परिसर गाठला होता, त्या नदीला पुढे त्याचंच नाव देण्यात आलं. न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क दरम्यान....
हडसन नदी!
१६१० ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनी आणि व्हर्जिनिया कंपनीने नॉर्थवेस्ट पॅसेजमधून आशियाला जाण्याच्या मोहीमेवर नेमणूक केली. ११ मेला हडसनने आईसलँड गाठलं. २५ जूनला त्याने हडसनच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला. २ ऑगस्टला त्याने सामुद्र्धुनी ओलांडली आणि मोठ्या उपसागरात प्रवेश केला. पुढे त्याचंच नाव या उपसागराला देण्यात आलं.
हडसनचा उपसागर!
हडसनच्या उपसागरातून आशिया खंडाकडे जाण्याचा मार्ग काही सापडत नव्हता. पुढचे दोन महिने हडसनने आलेल्या मार्गाचे आणि परिसराचे तपशीलवार नकाशे बनवले. नोव्हेंबरमध्ये जेम्सच्या उपसागरात हडसनचं 'डिस्कव्हरी' हे जहाज बर्फात अडकलं!
१६११ च्या वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर बर्फ वितळण्यास सुरवात झाली. हडसनचा पुढे आशिया खंडाकडे कूच करण्याचा इरादा होता. परंतु बहुतेक सर्व खलाशांना आता घरची ओढ लागली होती. याचा व्हायचा तोच परिणाम झाला....बंडं!
१६११ च्या जूनमध्ये एक दिवस बंड केलेल्या खलाशांनी हडसन, त्याचा तरुण मुलगा जॉन आणि सात आजारी आणि हडसनशी प्रामाणिक असलेल्या खलाशांना एका लहानशा होडीत बसवलं, थोडेसे अन्नपदार्थ बरोबर दिले आणि हडसनच्या उपसागरात सोडून जहाज इंग्लंडच्या दिशेने हाकारलं!
हेनरी हडसन आणि इतरांचं पुढे काय झालं याचा कधीही तपास लागला नाही!
क्रमशः
माहितीपुर्ण लेख ..
माहितीपुर्ण लेख ..
मस्त लेख.. मजा आली वचताना..
मस्त लेख.. मजा आली वचताना..
मस्त लेख
मस्त लेख
एव्हरेस्ट, के-२, दक्षिण धृव
एव्हरेस्ट, के-२, दक्षिण धृव आणि आता नॉर्थ वेस्ट पॅसेज...
वेड लावणार तुम्ही.
स्पार्टाकस, तुमचा वेगवेगळे
स्पार्टाकस, तुमचा वेगवेगळे समुद्र, वेगवेगळ्या समुद्रसफरी, त्यांचा ईतिहास, भूगोल इत्यादींचा अभ्यास फारच चांगला आहे. तुमची लेखनशैली आणि भाषा तर एकदम अप्रतिमच ! या नविन लेखमलिकेच्या पुढील भागाचीपण फार आतुरतेने वाट पाहत आहे. लवकर येवु द्या.....
वाचनाचे जबरदस्त भांडार असलेला
वाचनाचे जबरदस्त भांडार असलेला हा लेख एका दमात न वाचता त्याचे भाग पाडावेत असे वाटू लागले आहे. दर्यावर्दी सारंगांच्या अतुलनीय इच्छा आणि प्रत्यक्षातील त्यांचे कार्य याचा केवळ सुरेख आढावा नसून स्पार्टाकस यानी त्यावर आपलेही भाष्य अत्यंत संतुलितपणे केल्याचे आढळले....ही एखाद्या लेखकाची जमेची मोठी बाजू मानली पाहिजे.
काही बाबींवर खुलासे वा अधिकचे लिखाण आवश्यक वाटल्यास ते लेखक पूर्ण करतील याचा विश्वास वाटतो कारण लेखणाची जातकुळी पाहिल्यास इथे प्रकाशित झालेले लिखाण अखेरचे नसून त्यासंदर्भात अजूनही भरपूर नोट्स काढल्या गेल्या असतील हे तर स्पष्टच आहे. त्यानुसार हा प्रतिसाद देत आहे. चर्चेला पोषक असेच मानावे.
१४८८ मध्ये बार्थेल्योमु डायझने केप ऑफ गुड होपला वळसा घालून हिंदी महासागरामध्ये प्रवेश केला असा उल्लेख सुरुवातीला आला आहे. डायझचे नाव वाचता क्षणीच इतका आनंद झाला की वाटले कित्येक वर्षानंतर या दर्यावर्दीचे नाव समोर आले. त्याच्या संदर्भात "केप ऑफ गुड होप" आले आहे. पण मला वाटते डायझच्या कारकिर्दीत वा प्रवास पट्ट्याच्या दरम्यान महासागराच्या त्या वळणाला केप ऑफ गुड होप हे नाम प्राप्त झाले नव्हते......(याला 'केप ऑफ स्टॉर्म्स' या नावाने ओळखले जात होते....वास्को डी गामाच्या आगमना संदर्भातील एका लेखात 'स्टॉर्म्स' चा उल्लेख वाचल्याचे स्मरते....गुड होप हे नामकरणही पोर्तुगालचा राजा जॉन याने नंतर केले असावे.) खलाशांची बंडखोरी हा तर सागरसफारींतील नित्याच्या घडामोडीचा भाग असतो. या सागरी नेत्यांच्या मोठ्या शोध कार्यात नैसर्गिक आपत्तीसोबतच जहाजावर उमटणार्या अशा बंडांच्या खटाटोपीनाही तोंड द्यावे लागत असे....त्यातून तावून सुलाखून अखंडित असे प्रवास करीत राहणे म्हणजे त्यांच्या सहनशक्तीची परमावधीच होय.
वाचत आहे......अतिशय आनंदाने.
मामा, बार्थेल्योमु डायझने
मामा,
बार्थेल्योमु डायझने १४८८ च्या सफरीत केप ऑफ गुड होपला केप ऑफ स्टॉर्म असंच नाव दिलं होतं. पोर्तुगालचा राजा जॉन २ रा याने ते बदलून केप ऑफ गुड होप असं केलं.
माझ्या ९० डिग्री साऊथ या मालिकेतील पहिल्याच भागात याचा उल्लेख आहे.
खूप खूप छान सुरुवात नवीन
खूप खूप छान सुरुवात नवीन लेखमालीकेची..
पुलेशु
थॅन्क्स स्पार्टाकस.... मला
थॅन्क्स स्पार्टाकस....
मला वाटले होतेच की "स्टॉर्म" चा उल्लेख तुमच्याकडून हुकणार नाही.....तुमच्या लेखनमालिकेतील "आर्क्टिक बाय नॉर्थवेस्ट...." हा पहिलाच लेख मी वाचत असल्याने तुम्ही उल्लेख केलेला ९० डीग्री साऊथ राहिलाच. आता सवडीने पूर्ण मालिका वाचून काढतो. माझ्याही अत्यंत आवडीचा हा विषय आहे....त्यातही इतका अभ्यासपूर्ण म्हणजे त्याचे वाचन अगदी अधाशाप्रमाणे होत राहील....केवळ डोळ्याकडून काही त्रासाची कारणे असल्याने जितक्या शांतपणे वाचन व्हायला हवे, तितके होत नाही...पण उपचार चालू असल्याने तोही प्रश्न दूर होईल....वाचन त्यातूनही करीत असतोच मी....तुम्ही तर जाणताच की माहितीपूर्ण लेखामध्ये संदर्भासाठी कित्येक वेळा गाडी अडून राहते....इच्छा असूनही पुढे जाता येते नाही...रेफरन्सचा तो मुद्दा निवल्याशिवाय....त्यामुळेही वाचन थबकते. अर्थात ही बाब म्हणजेही तुमच्यातील लेखकाचे ते कौतुक केले जाते अशीच असते.
मामा, अहोजाहो म्हणू नका हो...
मामा,
अहोजाहो म्हणू नका हो... बराच लहान आहे मी तुमच्यापेक्षा
९० डिग्री साऊथ ही १३ भागांची लेखमालिका आहे. दक्षिण गोलार्धातील प्रदेशाचा वेगवेगळ्या दर्यावर्दींनी घेतलेला शोध आणि रोआल्ड अॅमंडसेन आणि रॉबर्ट फॅल्कन स्कॉट यांच्या दक्षिण धृवांवरील सर्वप्रथम पोहोचण्याच्या समांतर मोहीमांवर ती संपूर्ण मालिका लिहीली आहे. वेळ मिळेल तेव्हा वाचून कशी वाटली ते अवश्य कळवा.
स्पार्टाकस.... "टेरा नोव्हा"
स्पार्टाकस....
"टेरा नोव्हा" प्रकरण आणि स्कॉटच्या कपाळी आलेले ते अपयश....मला वाटते माझ्या हायस्कूलच्या दिवसातील भूगोलमध्ये त्याचे उल्लेख आले होते. कॅ. अमुंडसेन (असाच उच्चार आम्हाला शिकविला गेला) चे यश किती झळाळते होते त्याहीपेक्षा स्कॉटचा परतीच्या प्रवासात झालेला अंत जास्त हळहळ व्यक्त करावीशी वाटणारी घटना. पण अशा शोधमोहिमेचे महत्त्व इतके की त्यात जयपराजय असले काही घटक नसावेत. मात्र नैराश्येने ग्रासले म्हणजे परतीचा प्रवास आनंदाचा नसून जीवघेणा होऊ शकतो....त्यातही थंडीसोबत पोटात उसळलेली भूकही वेळीच भागली नाही म्हणजे मृत्यू आणखीच जवळ. मला वाटते स्कॉट आणि त्याच्या अन्य साथीदारांची प्रेतेही नंतरच्या खास मोहिमेत सापडली.
{विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी मी आपल्या कोल्हापुरी धाग्यावर स्कॉट आणि अमुंडसेन यांचा उल्लेख केला होता... एका मजेच्या प्रतिसादात....आता ह्या योगायोगाची गंमत वाटते.}
मामा, स्कॉट आणि त्याच्या
मामा,
स्कॉट आणि त्याच्या सहकार्यांचा मृत्यू हा चुकीचे नियोजन आणि माणसांनी स्लेजवरुन ओझी वाहून नेण्याच्या वेडगळ कल्पनेचा परिपाक होता. त्यातच त्यांचं अन्नपदार्थांचं वाटप आणि रेशनिंगही चुकीचं होतं. स्कॉटने पत्करलेला मार्गही काहीसा कष्टप्रदच होता. तसेच कुत्र्यांच्या वापराबद्दल असलेली अढी आणि त्याने त्यात घातलेला गोंधळही याला जबाबदार होताच.
स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांचे मृतदेह त्याच मोहीमेत पुढील वर्षी सापडले. त्यांचं तिथेच बर्फात दफन करण्यात आलं. लॅरी ओएट्सचा मृतदेह मात्रं आढळला नाही. तसंच एडगर इव्हान्स बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्याशी बराच आधी मरण पावल्याने स्कॉट आणि इतरांनीच त्याला बर्फात चिरविश्रांती दिली होती.
स्पार्टाकस, नविन लेखमालिका
स्पार्टाकस, नविन लेखमालिका लवकरच वाचकांसाठी लिहिल्याबद्दल आपले आभार. तुमची लेखमालिका कधी सुरू होईल ह्याची वाटच पाहत होतो कारण तुमच्या लेखमालिकामुळे ज्ञानात अमुल्य भर पडत असते.
स्पार्टाकस.... मोहिम यशस्वी
स्पार्टाकस....
मोहिम यशस्वी होणे आणि ती अयशस्वी होणे....या दोनच घटना इतिहासात येत असतात. स्कॉट अपयशाचा धनी झाला म्हणजे त्याची मोहिम फसली असे म्हणता येणार नाही....मोहिम तर पूर्ण केलीच त्याने विपरित परिस्थितीशी सामना देवून....पण त्याच्यापेक्षा नॉर्वेचा अमुंडसेन आघाडीचा वीर ठरला आणि स्कॉट व त्याच्या साथीदारांनी जेव्हा दक्षिण ध्रुवावर अमुंडसेनने फडकाविलेला झेंडा पाहिला त्यावेळी तिथेच खरेतर त्यांचे हृदय विछिन्न झाले....उरला होता तो केवळ श्वास....जो नंतर परतीच्या प्रवासात संपुष्टात आला.
ही घटना १९१२ ची. माझ्या वाचनात आलेल्या मोहिम इतिहासात स्कॉट दफनानंतर ब्रिटनच्या शोधमोहिमा इतिहासातील एक मानाचे पान बनला होता. कसलीही टीका त्याच्यावर झाली नाही. स्कॉट घराण्यातील पुरुषांना अशाच मृत्युला सामोरे जावे लागल्याचा इतिहास आहे. वडील आर्थिक चणचणीमुळे निर्माण झालेल्या धंद्यातील दिवाळखोरीच्या धक्क्याने वारले तर धाकटा भाऊ आर्चि टॉयफॉईडचा बळी ठरला. आई आणि दोन बहिणी यांचा संसारखर्च एकट्या रॉबर्ट स्कॉटच्या अल्प वेतनावर चालत होता....त्यामुळेच की काय याने आपले लक्ष आणि क्षमता सारी दक्षिण ध्रुव मोहिमेत व्यतीत केली.....आता हा काही जन्मजात संशोधक नव्हता तर परिस्थितीमुळे झाला होता असे मानले तर त्याने मोहिमेसाठी केलेल्या अभ्यासात आणि तयारीत त्रुटी गृहित धरायलाच हव्यात. अमुंडसेनलाही अशा संकटांना सामोरे जावे लागले असेलच.
स्कॉटच्या मृत्युला जवळपास १०० वर्षे पूरी झाल्यावर त्याच्या संशोधन मोहिमेचा काटेकोरपणे आढावा घेण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यामध्ये सापडलेल्या काही माहितीवरून त्याची शोध मोहिम त्रुटीपूर्ण होती हे सिद्ध झाल्याचे दिसत्ये. मोहिमेचे विच्छेदन करताना अमुक एकाकडेच बोट दाखविणे हे चूक की बरोबर याबद्दल प्रश्न उठतील...उठतात. तरीही रॉबर्ट स्कॉट आणि त्याच्या धाडसी सहकार्यांचा मृत्यू म्हणजे वेडगळपणाचा परिपाक होता असे अनुमान काढणे चुकीचे ठरेल असे मला वाटते. इतिहास यशाबरोबर अपयशाच्या घटनांमुळेही घडत असतो.....यशाला आरती ओवाळली जाते तर अपयश्याच्या चिंध्या करण्यात येतात....अर्थात त्यातून काहीतरी शिकायला मिळावे म्हणूनही असेल.
मामा, वेडगळपणाचा मी उल्लेख
मामा,
वेडगळपणाचा मी उल्लेख केला तो स्कॉटच्या सामान वाहून नेण्याच्या पद्धतीविषयी.
हे वाचा :-
http://www.maayboli.com/node/48974
स्पार्टाकस, एकदम नॉट लिसनिंग
स्पार्टाकस, एकदम नॉट लिसनिंग लिखाण चाललंय हल्ली. अजून सगळं वाचूनही नाही झालंय आणि.
स्पार्टाकस, एकदम नॉट लिसनिंग
स्पार्टाकस, एकदम नॉट लिसनिंग लिखाण चाललंय हल्ली.>> +१
इतंक वैविध्यपूर्ण आणि सुरस लेखन वाचायला मिळाल्याबद्द्ल, स्पार्टाकस तुमचे मनापासून आभार!!!!
स्पार्टाकस, आणखी एक अज्ञाताचा
स्पार्टाकस, आणखी एक अज्ञाताचा शोध घेणारी लेखमलिका आणल्याबद्दल हार्दिक अभार. तुमच्या मेहनतीला आणि लेखन कौशल्याला __/\__
खूप सुंदर सुरवात नवीन
खूप सुंदर सुरवात नवीन मालिकेची.
पॉईंट बॅरो आणि हडसनच्या उपसागरात संशोधनानिमित्त गेले असल्याने खूप सहज रिलेट करता आलं. नाहीतर गुगल मॅप बाजूला ठेवूनच वाचावं लागेल.
- रत्ना सहस्त्रबुद्धे
बाप्रे इतकी अफाट
बाप्रे इतकी अफाट माहीती......छान लेख