सकाळचे ११.३० वाजत आले होते. छोटया आदित्यचे बाबा अजूनही कूठेच दिसत नव्हते. शाळेत जायला उशीर होत होता. आदित्यच्या शेजारी त्याची लहान बहिण दिपा बसली होती. तिचेही डोळे इमारतीच्या गेटला लागलेले होते कधीपासून.…" चल आदी… मी सोडते तुला शाळेत. तुझ्या बाबाला उशीर झाला आज. चल नाहीतर तुझ्या madam रागावतील तुला. " , " नको... बाबाला येऊ दे. " , " चल ना आदी… उशीर होईल तुला. " , " नको… बाबाचं घेऊन जाईल मला, नाहीतर मी नाही जाणार शाळेत.. "," ठीक आहे.. madam ओरडल्या तर मग मला सांगू नकोस हा.. " भार्गवी म्हणाली आणि तिने दिपाला उचलून स्वतःचा मांडीवर बसवलं. आता सगळेच इमारतीच्या गेटकडे पाहत होते. ५-१० मिनिटे गेली असतील… अचानक छोटी दिपा आनंदाने ओरडली… " बाबा आला , बाबा आला.. " तसा आदित्य शाळेची bag सावरत उभा राहिला… " sorry हा बच्चा... थोडा उशीर झाला, चल , लवकर चल..." अविनाश धावतच गेटमधून आत आला. " काय ग भार्गवी... जरा जायचे ना शाळेत घेऊन आदी ला " ," अरे त्याला बोलली मी … पण त्याला त्याचा "बाबा"च पाहिजे ना.. " अविनाश हसला. इकडे दिपा " बाबा… बाबा " म्हणत होती. अविनाश पटकन पुढे आला आणि त्याने दिपाच्या गालाचा " पापा" घेतला. " चल भार्गवी… बाय दिपा.. " " लक्ष ठेव ग दिपावर... " अविनाश गेटबाहेर जाता जाता म्हणाला. अविनाश गेला तसा भार्गवीने त्याच्या घराला कुलूप लावलं आणि दिपाला घेऊन स्वतःच्या घरी आली. " चला दिपा madam…. आता आमच्या घरी. " भार्गवी दिपाला घेऊन घरी आली. " काय ग... गेला का अविनाश आदित्यला घेऊन शाळेत …? " भार्गवीच्या आईने तिला विचारलं… " हो गं… आत्ताच आलेला तो… उशीर झाला आज त्याला " ," आणि दीपाला किती वाजता सोडायचे आहे शाळेत ? " ," आज नाही , आज सुट्टी आहे तिला. " भार्गवी दिपाकडे पाहत म्हणाली. " म्हणजे आज आम्ही दिवसभर मस्ती करणार… हो ना… दिपा. " तशी दिपा खुदकन हसली.… " काय त्या पोराच्या नशिबात आहे, देव जाणे.. किती धावपळ करत असतो… एकटा माणूस सगळीकडे कसं लक्ष देणार… " भार्गवीची आई बोलली. तशी भार्गवी पुढे आली आणि आईला शांत राहायला सांगितलं. " आई ! … तुला किती वेळा सांगितलं आहे कि या मुलांसमोर तो विषय काढू नको म्हणून, मग ते सारखं विचारात बसतात आणि मला त्यांना उत्तर द्यायला जमत नाही… पुन्हा विषय काढू नकोस… प्लीज… " भार्गवी म्हणाली आणि दिपाला घेऊन बाहेर गेली. " देवा… त्या पोराकडे लक्ष ठेव रे बाबा…. चांगल होऊ दे त्याचा… " भार्गवीच्या आईने देवापुढे हात जोडले.
संध्याकाळ झालेली…. छोटा आदित्य शाळेत बसून बाबांची वाट बघत होता. शाळा सुटली होती केव्हाची, बाकीची मुले त्यांच्या आई-वडिलांबरोबर घरी जात होती. आदित्य त्यांच्याकडेच पाहत होता. त्याच्या ''बाबा'' ला आज पण उशीर झाला होता. गेटमधून भार्गवी येताना दिसली," चल आदी.... " , " तू का आलीस.... माझा बाबा कुठे आहे ? . "," अरे त्याला उशीर होणार आहे… म्हणून त्याने मला सांगितलं तुला आणायला. " , "मग मी थांबतो इथेच… बाबाला येऊ दे…" ," चल ना आदी. नको हट्ट करूस. तिकडे दिपा पण एकटी आहे." आदित्य तयारच नव्हता,पण छोटया दीपाची आठवण झाली तेव्हा तो तयार झाला. आणि एकदाचा आदित्य घरी आला. त्याचा बाबा आला नव्हता अजूनही. त्यामुळे दिपा आणि आदित्य, भार्गवीच्या घरी खेळत होते. रात्री ९ वाजता अविनाश घरी आला. " sorry पोरांनो... खूप उशीर झाला आज.. " म्हणत अविनाश, भार्गवीच्या घरी आला. " बाबा आला… बाबा आला... " म्हणत दोघेही धावत जाऊन त्याला बिलगले. " बर झालं तू आलास ते बाबा…. तुझी पोरं वेडी झाली होती अगदी.. " भार्गवीची आई म्हणाली. " हो… आज जरा काम होतं ऑफिसमध्ये…म्हणून उशीर झाला. " अविनाशने दीपाला वर उचलून घेतलं. " जेवलात का रे दोघेही… " ," हो... आमाला आज चोकलेट पण दिलं ताईने…" दिपा म्हणाली. " छान छान… चला आता झोपी करायला." म्हणत अविनाश स्वतःच्या घरी आला. अविनाशने त्या दोघांनाही झोपवले. जरासा काही जेवला आणि ऑफिसच्या कामात गढून गेला. रात्रीचे ११.३० वाजले होते. आणि अविनाश भार्गवीच्या घरी आला. " काय रे… झोपला नाहीस अजून… " ," हो गं… झोपतोच आहे आता…" , " ok… काही हवं आहे का तुला ? " ," नाही गं.. असंच आलो होतो, thank you म्हणायला… " ,"कश्याबद्दल ? " ," तू दिपा आणि आदित्यची काळजी घेतेस म्हणून. " गप्प बस हा अवि… नाहीतर उद्यापासून सांभाळ तू तुझ्या मुलांना… "," तसं नाही गं… तू लक्ष देतेस म्हणून., मी कधी घेणार त्यांचा अभ्यास… त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो. तुला thanks म्हणायला सुद्धा वेळ मिळत नाही मला. तू त्यांना सांभाळतेस ते उपकारच आहेत माझ्यावर. " ," अरे वेडा आहेस का तू ? काहीही बोलतोस. ", " बरं , उद्या पण उशीर होईल मला ऑफिसमध्ये , जरा आणशील का आदित्यला शाळेतून ? "," अरे ती सांगायची गोष्ट आहे का … तू पण ना… " ,"चल.. मी जातो झोपायला. " , " अवि.... " भार्गवीने त्याला थांबवलं."काय गं ? " , " सुरेखा कशी आहे रे ? " प्रश्न विचारातच अविनाशचा चेहरा उतरला.
" ठीक आहे. " ," डॉक्टर काय म्हणाले ? " , " अजून काही सांगता येत नाही म्हणाले… त्यांचे प्रयन्त चालू आहेत. " असं बोलून अविनाश शांत उभा राहिला…. भार्गवी मधेच बोलली. " आम्ही काही मदत करू का पैशाची… " हे ऐकताच अविनाशने नकारार्थी मान हलवली. " तुम्ही खूप करत आहात माझ्यासाठी… पैशाची कमतरता नाही आहे. कमतरता आहे ती फक्त वेळेची. वेळ अशीच निघून चालली आहे हातातून आणि हाती काहीच लागत नाही माझ्या. अजून काही माझ्यासाठी करायचे असेल तर त्या देवाकडे प्रार्थना कर , सुरेखासाठी. माझं देवाने कधीच ऐकलं नाही. बघ तुझं तरी ऐकतो का ते. " थोडावेळ शांतता. " चल, मी जातो झोपायला, सकाळी हॉस्पिटलमध्ये पण जायचे आहे लवकर.. " म्हणत अविनाश घरी आला.
अविनाश घरी तर आलेला झोपायला, झोप यायला तर हवी ना…. डोक्यात किती विचार चालू होते…. तळमळत होता तो बेडवर. झोपच येत नव्हती त्याला. तसाच उठून बसला अविनाश… उठून आदित्यच्या रूमकडे आला, दरवाजा हळूच उगडून त्याने झोपलेल्या आदित्यकडे पाहिलं. आदित्य , आपल्या लहान बहिणीला घेऊन शांत झोपला होता. अविनाश बाल्कनीत आला.रात्रीचे १२-१२.३० वाजले असतील. बाहेर हवा होती जराशी. अवीने वर आभाळात पाहिलं. पूर्ण चंद्र होता आज. पौर्णिमेचा चंद्र. त्याला पाहून अविला सुरेखाची आठवण झाली. अविनाश तिला पौर्णिमेचा चंद्र असंच म्हणायचा, इतकी सुरेख होती ती. म्हणून त्यानेच लग्नानंतर तिचं नाव " सुरेखा " असं ठेवलं होतं. सुरेखा म्हणजे अविनाशची बायको. Love marriage. सुरेखाची ओळख म्हणजे त्याच्या ऑफिसमधली. अविनाशने नवीन ऑफिस join केलं, त्याच्या बरोबर आठवड्याने सुरेखाने ऑफिस मध्ये entry केलेली accountant म्हणून. अविनाशच्या हाताखालीच ती काम करायची. चांगली मैत्री झालेली दोघांमध्ये. लवकरच प्रेम झालं आणि लग्नाचा निर्णय सुद्धा घेतला दोघांनी. दोघांमध्ये अजून एक गोष्ट common होती , ती म्हणजे दोघेही अनाथ होते. अविनाशचे शहरात फक्त एक चुलत काका राहायचे आणि सुरेखाचे तर कोणीच नव्हतं. त्यामुळे लग्नाला असा कोणाचा विरोध नव्हता. लागलीच लग्न झालं थाटामाटात. दोघेही चांगले कमावते होते. म्हणून एका चांगल्या सोसायटीमध्ये घर घेतलं. खूप छान ना… शेजारीही चांगले होते. भार्गवी राहायची शेजारी. तिला वाटायचं कि आपल्याला एक मोठा भाऊ असायला पाहिजे होता. अविनाश तिकडे रहायला आल्यापासून भार्गवीची तीही इच्छ्या पूर्ण झाली. भार्गवी दरवर्षी अविला राखी बांधायची आणि अविनाश प्रत्येक भाऊबीजला तिच्याकडून ओवाळून घ्यायचा. अगदी एक कुटुंबच तयार झालं होतं त्याचं.
आता १० वर्ष झाली होती अविनाश- सुरेखाच्या लग्नाला. प्रेम जराही कमी झालं नव्हतं दोघांचं. त्यात अजून दोघांची भर पडली होती. ती म्हणजे आदित्य आणि दीपाची… दोन्ही मुलं छान होती. लगेचच त्यांनी दोन्ही घरं आपली करून घेतली होती. वेळ वेळ कसा निघून गेला कळलही नाही त्यांना. आदित्य ५ वर्षाचा होता आणि दिपा ३ वर्षाची होती. सगळं काही छान चालू होतं. पण अचानक काय झालं कोण जाणे. सुरेखा आजारी पडली. निव्वळ तापाचा कारण झालं आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तो दिवस तर अविनाशला अजून आठवतो. दोन दिवस ताप उतरलाच नव्हता. आदित्य आईच्या बाजूलाच बसून होता. दिपा भार्गवीकडे होती. भार्गवीचे वडील अविनाशकडे आले. " चल बेटा… थोडयावेळाने ambulance येईल. तिला घेऊन जायलाच पाहिजे. चल तयारी कर." अविनाश सैरभैर झालेला. त्याने आदित्यकडे पाहिलं. कधीपासून तो त्याच्या आईच्या बाजूलाच बसून होता. त्याला कळतच नव्हतं, आपली आई का झोपली आहे ते. सुरेखा अंगात ताप असूनही त्याला त्याच्या आवडीची गोष्ट सांगत होती. तिकडे दीपाने रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. भार्गवी तरी काय करणार ना. १० मिनिटात ambulance आली, सुरेखाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी. सुरेखाच्या अंगात चालत जायची ताकद नव्हती. तिला stretcher वरून नेण्यात आलं. सुरेखाला जस घेऊन जाऊ लागले, तस आदित्यला कळलं. " बाबा…. आईला कुठे घेऊन जात आहेत…. बाबा. " अविनाशकडे काहीच उत्तर नव्हतं. तसाच आदित्य ambulance जवळ धावत गेला. " आई… आई … कुठे चालली तू…. मी पण येतो… " छोटया आदित्यचा निरागस प्रश्न. " कुठे नाही रे बाबा… जरा गावाला जाऊन येते मी, आपली गोष्टीतली आजी आहे ना… तिला भेटायला जाते आहे मी… लवकर येते मी… " ," आजीला भेटायला जाते आहेस तर मी पण येतो. मला पण बघायची आहे आजी." , " नको बाबा… आपण नंतर जाऊ कधीतरी. दीपाकडे लक्ष ठेव हा, आणि बाबाला कधी सोडून जाऊ नकोस हा. " ," हो नक्की. पण तू लवकर ये आई. " आदित्यचे ते बोलणे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. दिपा एव्हाना शांत झाली होती. भार्गवीने आदित्यचा हात पकडला. ambulance सुरु झाली. आदित्यने आईला ' टाटा ' केलं. नजरेसमोरून ambulance दूर गेल्यावर आदित्य जरा शांत वाटला. ते दोघेही भार्गवीकडे खेळत बसले. थोडयावेळाने दीपाला आईची आठवण झाली. " आई कुठे गेली ? " छोटया दीपाने आदित्यला विचारलं. " अगं , आई ना ती आजी आहे ना तिच्याकडे गेली आहे. आपल्याला चोकलेट आणायला. तुला पण देणार आणि मला पण. " तेवढयात भार्गवी आली. " ताई… आई कधी येणार ? " ," का रे आदी ? " , " अगं , आईने तर माझी गोष्टच पुरी सांगितली नाही… अर्धीच सांगितली तिने. आई आली कि ती सांगेल ना पूर्ण. " भार्गवीला ते ऐकून रडूच आलं, तशीच ती बाहेर आली रडत रडत.
तो दिवस होता आणि आजच दिवस. आज २५ दिवस झाले होते. सुरेखा अजूनही हॉस्पिटलमध्ये होती. ताप अजूनही उतरला नव्हता. डॉक्टरांचे प्रयन्त चालू होते. थोडे दिवस, दिपा आणि आदित्य " आई कधी येणार " विचारायचे, हळूहळू त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला. अविनाश किती धावपळ करत होता. सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचा. तिकडे थोडावेळ थांबून आदित्य आणि दीपाच्या शाळेची तयारी करायला घरी यायचा. त्यांना आंघोळ घालायचा, डब्बा करायचा, सगळ करायचा. शेवटी शाळेत सोडून यायचा. तिकडून तो ऑफिसला पळायचा. संध्याकाळी आदित्यला शाळेतून घरी आणण्यासाठी ऑफिसमधून थोडावेळ बाहेर यायचा. मग पुन्हा ऑफिसमध्ये जायचा. ऑफिस सुटलं कि पुन्हा हॉस्पिटलमध्ये. सुरेखा जवळ.तो पूर्ण वेळ राहू शकत नव्हता. कारण आदित्य आणि दीपा. भार्गवी जरी त्यांना सांभाळत असली तरी त्यांना त्यांचे , " आई किंवा बाबा " पैकी कोणीतरी पाहिजे होतं सोबतीला. असंच चालू होतं, अविनाशची तब्येतही खालावली होती,धावपळ करून. रात्रीची झोप मिळत नव्हती पुरेशी. जेवण नाही वेळेवर. कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना डोळा लागायचा त्याचा. अर्थात बॉसला त्याची परिस्थिती माहित होती. तरीही कामात चुका होऊ नये म्हणून अविनाशला दोनदा ताकीद दिली होती. तो तरी किती धावपळ करणार सगळीकडे. शेवटी माणूसच ना तो.
पण छोटया आदित्यसाठी त्याचा " बाबा " म्हणजे superman होता. आई जेव्हा पासून " गावाला " गेली होती, तेव्हा पासून त्याचा " बाबा " च तर सगळं करायचा. त्यांच्या शाळेच्या तयारी पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ… त्यांना शाळेत घेऊन जायचा, शाळेतून घरी घेऊन यायचा. रात्री अभ्यास घ्यायचा. मार्केट मध्ये जायचा. त्यांना खाऊ घेऊन यायचा. रात्री झोपताना गोष्टी सांगायचा. पण आईसारखी गोष्ट त्याला सांगता नाही यायची. तरीदेखील कधीतरी आपली आई येऊन आपल्याला गोष्ट सांगेल या आशेवर दोन्ही मुलं शांत झोपी जायची.
एक महिना होऊन गेला होता. सुरेखाच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च झाले होते. आदित्य आणि दीपाला आईचा जवळपास विसर पडला होता. त्या रात्री कुणास ठाऊक, आदित्यला आईची आठवण झाली. " बाबा , आई कधी येणार गावावरून ?" अविनाशच्या त्या प्रश्नाने आदित्य चमकला. किती दिवसांनी त्याला सुरेखाची आठवण झाली होती. मग दीपाने " मला आई पाहिजे, मला आई पाहिजे " म्हणायला सुरुवात केली. अविनाशने दीपाला कसबसं शांत केलं. ती झोपली तसा तो आदित्य कडे आला. " बाळा काय झालं ? आईची आठवण झाली का.. "," बाबा , आईला बोलावं ना गावावरून. कधी येणार आई ?"," येणार रे लवकर. काम असते ना तिला …. म्हणून राहिली आहे ती .तुला chocolate आणणार आहे ", " chocolate…! आणि दिपाला पण ना… "," हो रे बाळा…. खूप chocolate's आणणार आहे ती. झोप हा आता… " म्हणत आदित्यला झोपायला नेलं. आदित्य , आई येणार म्हणून जरा खुशीतच झोपी गेला. अविनाश मात्र बेडवर तसाच बसून होता, त्या दोन मुलांचा विचार करत.
पुढचा दिवस, अविनाश लवकर तयारी करून बाहेर पडला. " का रे अविनाश …. घाई कसली एवढी… " भार्गवीच्या आईने त्याला विचारलं. " काकू… आज ऑफिसला बोलावले आहे. काम आहे जरा." ," अरे आज सुट्टी आहे ना मग. " ,"जरा काम राहिलं आहे म्हणून बोलावलं आहे बॉसने. या दोघांना सांभाळाल का जरा आज … ? तुम्हाला त्रास दिला सुट्टीच्या दिवशी… sorry."," अरे त्यात काय … जा तू , यांना राहू दे आमच्याकडे. " अविनाशने , आदित्य आणि दिपाला त्यांच्याकडे सोपवलं. " चल बेटा, येतो हा मी लवकर " अविनाश ,दीपाच्या गालाचा पापा घेत म्हणाला. आणि धावतच इमारतीच्या गेट बाहेर गेला. " चला आज आपण बाहेर जाऊया का फिरायला.? " भार्गवीने , आदित्य आणि दिपा कडे पाहत प्रश्न केला, तसे दोघेही आनंदले. बऱ्याच दिवसांनी ते घर आणि शाळा व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे गेले होते. पूर्ण दिवस त्यांनी भार्गवी सोबत फिरण्यात घालवला. संध्याकाळी फिरून फिरून दमलेले आदित्य आणि दिपा घरी आले. तरी अजून त्यांचा " अविनाश बाबा " आला नव्हता. दिपा तर खूप दमली होती. लगेच झोपी गेली. आदित्य मात्र बाहेर उभा होता. भार्गवी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " काय रे... तुला झोप नाही आली अजून. " ," नाही गं ताई… बाबाची वाट बघतो आहे." ," येईल रे तो…. तू दमला असशील ना , चल… जरा आराम कर. ", " नको , बाबा येईल आता " , " ठीक आहे, मी पण थांबते इथे." दोघेही तसेच उभे राहिले अविची वाट पाहत.
थोडयावेळाने आदित्य बोलला ,"ताई …. आज सुट्टीचा दिवस ना, मग बाबा कसा कामाला गेला ? " , " अरे त्याचं काम होतं ना म्हणून गेला तो आज . " आदित्य लहान वयातच खूप विचार करायला लागला होता. खरेतर , अविनाश ऑफिसमधले काम लगेच संपवून हॉस्पिटल मध्ये गेलेला. दुपारपासून तो तिकडेच होता.…. " ताई, बाबा कधी झोपत असेल गं. ? " , " का रे ? " , " माझी आई असताना तो आमच्या अगोदर झोपायचा, आता तर त्याला कधी पाहतच नाही झोपलेला… " भार्गवीला खूप वाईट वाटलं. तीही त्याला रात्री उशिरा पर्यंत असाच बाल्कनीत उभा असलेला पहायची. " झोपतो तो , तुम्ही झोपलात ना कि झोपतो तो. चल, तू पण झोप आता. " भार्गवी म्हणाली. "मला ना , रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. बाबा सांगतो कधी कधी, त्याला नाही सांगता येत नीट. …. आई खूप छान सांगते गोष्ट… माझ्या आवडीची ,आजीची गोष्ट. ती गावाला गेल्यापासून तिची खूप आठवण येते. कधी येणार माझी आई ? " ते ऐकून भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ते अश्रू आदित्यच्या हातावर पडले. त्याने वर पाहिलं तर भार्गवी रडत होती. " तुला कोणी ओरडलं का ताई , मग कशाला रडतेस .? " , " नाही रे . डोळ्यात कचरा गेला जरा म्हणून डोळ्यातून पाणी आलं. " भार्गवी डोळे पुसत म्हणाली. " मग माझ्या बाबाच्या डोळ्यात पण सारखा कचरा जात असेल. " , " का ? " , " त्याच्या डोळ्यातून खूप वेळा पाणी येताना बघितलं आहे मी ना … " ते ऐकून भार्गवी गप्प बसली.
अविनाश उशिरा आला. तोपर्यंत आदित्य जागाच होता. बाबा आलेला पाहून त्याला आनंदच झाला. अविनाश खूप थकलेला वाटत होता. झोपलेल्या दिपाला त्याने उचलून घेतलं , आदित्यचा हात पकडून तो घरी जाऊ लागला. भार्गवीला पाहिल्यावर उगाचच खोटं खोटं हसला. " काय झालं अवि ?" , " काही नाही गं , जरा दमायला झालं आहे. उद्या बोलूया. " म्हणत तो आदित्य आणि दिपाला घेऊन निघून गेला. सकाळी सकाळी अविनाश पुन्हा आदित्य आणि दिपाला घेऊन भार्गवीकडे आला. " काय रे आज लवकर … आणि यांना शाळेत नेयाचे आहे कि नाही आज. " भार्गवी म्हणाली. " नाही… नको… आज शाळेत नको त्यांना. मी जातो चल… " अविनाश जाता जाता म्हणाला. भार्गवी त्याच्या मागून धावत गेली. " अविनाश… थांब जरा." तसा अवि थांबला. " काय झालंय… काल पण tension मध्ये होतास. " अविनाश गप्प. " बोल ना , काय झालंय " , " डॉक्टरने दोनच दिवस दिले आहेत फक्त गं …सुरेखासाठी ", अविनाशच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. भार्गवी तशीच उभी राहिली स्तब्ध.…. " कालपासून खूप तब्येत बिघडली आहे… " अविनाश सांगत होता. " चल मी निघतो, जरा काळजी घे दोघांची. कदाचित आज जमणार नाही यायला मला. " म्हणत अविनाश निघाला. जाता जाता मधेच थांबला, " तुझी मदत लागली तर येशील का हॉस्पिटलला जरा… मी call करतो… चल… bye " आणि अविनाश गेला निघून.
भार्गवीच मन लागत नव्हतं आज, अविनाशने सकाळी सांगितल्यापासून. आदित्य आणि दीपा तिथेच होते. भार्गवी कधी त्या दोघांकडे बघायची कधी घड्याळाकडे पहायची. वेळच जात नव्हता आज. घड्याळाचा काटा जणू अडकला होता. सकाळची दुपार , दुपारची संध्याकाळी झाली. अविनाशचा call काही आला नाही. इकडे भार्गवीच कुटुंब त्याचं tension मध्ये होते. संध्याकाळी ७ ची वेळ. दिवे लागणीचा काळ. भार्गवीच्या आईने देवासमोर दिवा लावला आणि भार्गवीचा mobile वाजला. …. " Hello… बोल अवि… येऊ का मी हॉस्पिटल मध्ये… काही मदत हवी आहे का तिकडे. " अविनाश शांत, थोडयावेळाने तो बोलला. " हो मदत हवी आहे जरा… मीही खूप थकलो आहे… " , "मग मी येते तिथे लगेच… " , " तू नको…. काका - काकूला पाठव , तू आदी आणि दिपा सोबत राहा." ," बरं … सुरेखा कशी आहे ? " काहीच उत्तर नाही अविचं. " भार्गवी…… तुझी वाहिनी गेली सोडून. " अवि शांत आवाजात म्हणाला. भार्गवीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. " मला तुमच्या शिवाय कोणीच नाही. म्हणून तिची शेवटची कार्य करण्यासाठी काका-काकूला पाठव इथे. " असं म्हणून अवीने call कट केला. एव्हाना काका काकू ला कळल होतं. तेही रडतच गेले हॉस्पिटलला. आदित्य आणि दीपाला कळेना , नक्की काय झालंय ते. भार्गवी ताई का रडते आहे ते.आदित्य दिपा सोबत होता ," अगं आपल्या डोळ्यात कचरा गेला कि आपण रडायला लागतो." आदित्यने दिपाला माहिती पुरवली.
सगळी कार्य करून अविनाश , भार्गवीचे आई वडील रात्री उशिरा आले. पुन्हा आदित्य जागाच होता. अविनाशला पाहिलं तसा धावत जाऊन त्याने त्याला मिठी मारली. त्याला कुठे माहित होते कि शेवटची कार्य करून आलेल्या व्यक्तीला शिवायचं नसते. नाहीतरी त्यांचा बाबाचं होता त्यांच्यासाठी आता. भार्गवी तर बाहेरच आली नाही. नेहमीप्रमाणे अवि , आदित्य आणि दिपाला घेऊन गेला घरी आणि त्यांना झोपवलं. आंघोळ केली आणि त्याने झोपण्याचा प्रयन्त केला. पण आज त्याला झोप लागणार नव्हती. तो बाहेर येऊन उभा राहिला. थोडयावेळाने भार्गवी बाजूला येऊन उभी राहिली. तसेच दोघे उभे होते शांत. अविनाश वर आभाळात असलेल्या, अर्ध चंद्रला पाहत होता. भार्गवी म्हणाली. " आदित्य आणि दिपाला काय सांगणार आहेस आता…. निदान शेवटचं दर्शन तरी त्यांना दयायला पाहिजे होतंस." अविनाशने निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. " एवढया लहान वयात त्यांना एवढा मोठा धक्का मला दयायचा नव्हता. त्यांच्यासाठी त्यांची आई गोष्टीतल्या आजीकडे गेली आहे, तिला गावालाच राहू दे. " , " त्यांना कधीतरी सांगायला हवं ना…. " , " त्यांना ते हळूहळू कळलं तर बरं होईल… काय ना, वेळ हे उत्तम औषध असते. अश्या गोष्टी हळूहळू कळल्या कि जास्त त्रास होत नाही मनाला. आणि अजून त्यांना खूप आयुष्य पाहायचं आहे. एवढे दिवस आईशिवाय राहिले. पुढेही राहतील. आणि त्यांचा " बाबा " आहे त्यांच्यासाठी. " ," आणि तू …. तू विसरू शकशील सुरेखाला…? तुझही आयुष्य आहे अजून पुढे. " त्यावर अविनाश शांत झाला जरा. " भार्गवी…आपलं आयुष्य म्हणजे एखादया लोकल ट्रेन सारखं असते… आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा आपल्या सोबत आपले आई-वडील असतात. तसच ट्रेनमध्ये सुरुवातीला मोजकेच प्रवासी असतात. जसा जसा प्रवास पुढे वाढत राहतो,तसे ट्रेनमध्ये नवीन प्रवाशी येत राहतात. काही चांगले असतात, आपले मित्र बनतात, सखी बनतात, नातेवाईक बनतात. ते कितीही चांगले असले तरी त्यांना त्यांचं स्टेशन आलं कि उतरावच लागते. सुरेखाचा प्रवास इतकाच होता माझ्यासोबत. तिचं स्टेशन आलं, ती गेली उतरून. माझा प्रवास चालू आहे अजून…… निदान आदित्य आणि दीपासाठी तरी… " मग कोणी काही बोललं नाही. अविनाश पुढे म्हणाला, " चल, उदया लवकर जायचे आहे हॉस्पिटल मध्ये…. " तो बोलता बोलता थांबला, " विसरलोच मी…. ऑफिसमध्ये …. खूप दिवसांनी लवकर जाईन ऑफिसमध्ये… कोणी नाही निदान बॉस तरी खुश होईल ना मला लवकर बघून… " म्हणत अविनाश झोपायला गेला.
------------------------------------------------to be continued-----------------------------------------------------
( courtesy by : http://vinitdhanawade.blogspot.in/ )
(No subject)
वाईट वाटलं शेवट वाचून.
वाईट वाटलं शेवट वाचून.
दिनांक : १७/९/२०१४…… वार :
दिनांक : १७/९/२०१४…… वार : बुधवार
सकाळ नेहमी प्रमाणे झाली , मग ऑफिस…. सर्व काही नेहमीप्रमाणे. काम करता करता mobile ने आवाज केला. अनोळखी नंबर. मला वाटलं कोणीतरी बँक लोन देणारी मंडळी असतील. तरी फोन उचलला मी. पलीकडून एक madam बोलत होती , " Hello, विनित धनावडे आहेत का …?" ," हो, मीच विनित आहे… आपण कोण ? " , " मी अपर्णा , पुणे ला राहते. मी एका खाजगी कंपनीत कामाला आहे." मी बोललो ," ठीक आहे , मग ? " , " मी तुमची नवीन कथा " बाबा " वाचली … त्या संदर्भात बोलायचे होते. " तेव्हा माझ्या लक्षात आले …. " हो हो बोला ma'am …. कशी वाटली गोष्ट ? ", त्या म्हणाल्या ," फारच छान… रडू आले वाचताना इतकी छान आहे कथा… " त्यावर मी " Thanks" म्हटले … पण खरी गोष्ट पुढे होती . त्यांनी पुढे सांगितलं ," पुणे ला मी आणि माझी १२ वर्षाची मुलगी रेशमा दोघीच राहतो. माझे पतींचे २ वर्षापूर्वी निधन झाले. तेव्हा रेशमा १० वर्षांची होती. खूप जवळ होते ते रेशमाच्या, त्यांच्या जाण्याचा खूप धक्का बसला तिला. पहिली खूप मस्ती करायची, बडबड करायची, आनंदी असायची ती. सगळ सोडून दिलं तिने. TV बघणे नाही, खेळायला जाणे नाही… सगळ्या आवडी निवडी सोडून दिलेल्या तिने. डॉक्टर कडे घेऊन गेलो तर त्यांनी सांगितलं कि खूप मोठ्ठा मानसिक धक्का बसला आहे तिला, वडील गेले तेव्हा ही ती रडली नव्हती…. डॉक्टरने सांगितले कि तिला एकदा तरी हसवलं किंवा रडवलं पाहिजे नाहीतर तिच्या डोक्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. गेल्या दोन वर्षात साधं हसणं नाही कि रडणं नाही… कितीतरी प्रयन्त केले तिला हसवण्याचे, रडवण्याचे . पण काहीच परिणाम झाला नाही. तिला एक आवड होती तेवढी,ती म्हणजे वाचनाची. कथा, कादंबरी वाचायची ती. म्हणून तुमची कथा " बाबा " तिला वाचायला सांगितली. आणि वाचता वाचता तिला रडू आले, २ वर्षांनी पहिल्यांदा … नंतर खूप रडली ती, माझ्या कुशीत येऊन…. मलाही बरं वाटलं. नंतर तिने सांगितलं कि गोष्ट वाचून बाबांची आठवण झाली… लोकांना हसू आलं तर आनंद होतो. मला माझी मुलगी रडताना बघून आनंद झाला. जे बाकीचे करू शकले नाहीत ते तुझ्या कथेनी करून दाखवलं… लोक म्हणत देव आहे, तू माझ्या साठी देवासारखा धावून आलास…. तुझे आभार मी जीवनात कधी विसरू शकणार नाही, तुझ्यामुळे मला माझी मुलगी परत मिळाली. खूप खूप आभारी आहे तुझी आणि जन्मभर राहीन. " आणि त्यांनी फोन बंद केला.
मी काही मोठा माणूस नाही, पण माझ्या लिखाणामुळे कोणाचे तरी चांगल होत असेल तर देवाकडे माझं लिखाण असंच चालू राहू दे हेच मागतो. feeling so proud for myself.
( बाजूला माझ्या कथेची लिंक देत आहे , कोणाला वाचायची असेल तर नक्की वाचा. तुमचा फार आभारी आहे.
" …. बाबा… " ( भाग पहिला )
http://vinitdhanawade.blogspot.in/2014/09/blog-post.html )
पहिल्या भागाचा शेवट जरी
पहिल्या भागाचा शेवट जरी दुर्देवी असला तरी हे जीवन आहे आणे पुढे जाणे हे आपले काम आहे हा विचार मांडताना लोकल ट्रेनच्या प्रवासाची दिलेली उपमा आवडली.
पहिला भाग आवडला, पण तुम्हाला फोन करून तुमचे आभार मानणार्या अपर्णाला तुमच्या लेखामुळे तिची मुलगी परत मिळाली ह्याचा आनंद फार झाला.
चांगली लिहिली आहे कथा. या
चांगली लिहिली आहे कथा.
या कथेमुळे एका आईला तिची मुलगी परत मिळाली हे वाचून खरंच बरं वाटलं.
भाग पहिला असे लिहिले आहे, दुसरा भागही असणार आहे का?
दुसरा भाग लवकरात लवकर
दुसरा भाग लवकरात लवकर प्रदर्शित करणार आहे.
best lihilay. Specially
best lihilay.
Specially Aaparna cha vachun khupach chan watla.
Please complete this story as
Please complete this story as early as possible.Waiting for next part.
पुढचा भाग लवकरात लवकर
पुढचा भाग लवकरात लवकर टाकण्याचा प्रयन्त करीन