गणेशोत्सव २०१४: समारोप आणि आभारप्रदर्शन

Submitted by संयोजक on 9 September, 2014 - 00:42

मराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव 'मायबोली.कॉम'ने सर्वप्रथम ऑनलाईन स्वरूपात सुरु केला. ह्या उत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते! गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पडद्यामागील अनेक जणांचा हातभार लागला. त्यांच्या योगदानाशिवाय उत्सव पार पडणे शक्य नव्हते. त्यामुळे मंडळी घरचीच असली तरीही त्यांचे आभार मानण्यासाठी हा आभारप्रदर्शनाचा गोड कार्यक्रम.

सर्वप्रथम गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा आणि उपक्रमांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार. सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हा उत्सव पार पडणे शक्य नव्हते. 'असाच उत्साह कायम राहू दे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ दे' हीच गणरायाचरणी प्रार्थना!

आम्हां सर्वांना यंदाच्या गणेशोत्सव मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच उत्सवादरम्यान वेळोवेळी तांत्रिक मदत केल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेबमास्तर ह्यांचे आभार. प्रताधिकार तसेच इतर कायदेशीर बाबींबद्दल लागेल ती मदत केल्याबद्दल चिनूक्सचे आभार.

गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम सादर करून गणेशोत्सवाची रंगत वाढवल्याबद्दल खालील मायबोलीकरांचे संयोजक मंडळातर्फे विशेष आभार!

- गणेश प्रतिष्ठापनेवरील श्र्लोक गायन : कौस्तुभ परांजपे (रैना यांच्या विनंतीवरुन, त्यामुळे रैना यांचे ही आभार!)
- गणेश प्रतिष्ठापना व इतर प्रकाशचित्रे- इंद्रधनुष्य आणि जिप्सी
- गणेशाचे जलरंगातील चित्र : अजय पाटील
- ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन ह्याबद्दलचे लेखन : शशांक पुरंदरे
- गायन- ओंकार देशमुख
- वादन- केदार देशमुख (तबला), ओंकार दिवाण (सिंथेसायजर)
- बाप्पा माझ्या मनातला -फोटो फीचर : अनन्या
- विजया बाई आणि आपण : चिनूक्स
- आसनम् समर्पयामि : नीधप
- क्वीलिंगचा बाप्पा : प्राजक्ता शिरीन

ह्याचबरोबर :
- जाहिराती, चित्रफलक साहाय्य ह्याकरिता नीलू, नील वेदक आणि कविन ह्यांचे आभार.
- पाककृती स्पर्धा हा मायबोली गणेशोत्सवातला अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी अतिशय जवळचा भाग. स्पर्धा ठरवताना नियमांमध्ये कसल्याही त्रुटी राहू नयेत ह्यासाठी यंदा आम्ही नियमांचा अंतिम मसुदा मंडाळाबाहेरील व्यक्तींकडून तपासून घेण्याचे ठरवले होते. ह्या कामात मदत केल्याबद्दल तसेच काही महत्त्वाच्या सुचवण्या केल्याबद्दल मायबोलीकर मृण्ययी ह्यांचे आभार.
- बालचमूंच्या उत्साही सहभागाचं खास आकर्षण असलेली चित्रं नीलू यांनी काढून दिली तसेच बच्चेकंपनीचं कौतुक करण्यासाठी दिलेली प्रशस्तिपत्रके तयार करण्यासाठी मायबोलीकर पेरू आणि कविन या सर्वांचे आभार.

सरते शेवटी विशेष आभार मानावेसे वाटतात ते 'सुरक्षेचा श्रीगणेशा' ह्या कार्यक्रमाची चित्रे काढून देण्यार्‍या गार्गी दत्ता ह्यांचे. ही संकल्पना सर्वात पहिली पक्की झाली असली तरी गणेशोत्सव तोंडावर आला तरी आम्हाला त्यासाठी समर्पक चित्रे काढून मिळेनात. अगदी अचानक चैतन्य दीक्षित यांच्या या सहकारी मैत्रिणीने मदतीची तयारी दर्शवली! गंमत म्हणजे, ती स्वतः बंगाली असल्याने तिला मजकूर, त्यातली मजा स्वतः वाचून समजत नव्हती. चैतन्य यांनी ती कामगिरी पार पाडली व योग्य अर्थच्छ्टा समजावून अतिशय समर्पक अशी सुंदर चित्रे आपल्या सर्वांसमोर मांडली. याबद्दल गार्गी यांचे आभार मानले असता -"भगवान के काम के लिए 'थँक्स' बोलके मुझे पाप मत लगाओ!" असं गोड उत्तर मिळाल्यावर आम्ही काय बोलणार! कोणतंही काम पूर्ण करताना हजारो अनाम हात त्यापाठी कसे लागलेले असतात याची प्रचिती इथे आली.

यंदाच्या गणेशोत्सव संयोजन मंडळात आम्ही सगळे अगदी योगायोगाने आलो. स्वयंसेवकांअभावी यंदा मायबोलीचा गणेशोत्सव होऊ शकणार नाही हे वाचताच मागचा पुढचा विचार न करता आम्ही सर्वांनी पाऊल पुढे टाकले. हातात अत्यंत कमी वेळ शिवाय प्रत्येकाला अनेक व्यवधानं - कुणाच्या शिफ्ट्स, तर कुणाच्या घरी बाळराजांचं आगमन, कुणाला अचानक ऑनसाईट व्हिजिट तर कुणाच्या घरी उद्भवलेलं संकट! परंतु मायबोली आणि व्हॉट्स अ‍ॅप यांच्या माध्यमातून हातात हात धरुन हा उपक्रम व्यवस्थितपणे पार पाडायचा प्रत्येकाने निश्चयच केला होता . कमी वेळात पण सर्वसमावेशक असे खेळ आणि स्पर्धा निवडणे, त्यांची जाहीरात करुन ते यशस्वीपणे अंमलात आणणे सोपे नव्हतेच. उत्सव सुरू झाल्यावर प्रत्येक उपक्रमाचं, स्पर्धेचं, संयोजनाचं मायबोलीकरांनी केलेलं कौतुक वाचताना मिळणारं समाधान शब्दांपलीकडचं आहे. नेमून दिलेला 'मुख्य संयोजक' आणि 'सल्लागार' नसतानाही गोष्टी पार पडलेल्या पाहून मायबोलीवरची मंडळे 'सेल्फ सफिशंट' किंवा 'स्वयंपूर्ण' होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत असं म्हणावसं वाटतं.

मायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते. मायबोलीवरचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मायबोलीकरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. यंदा गणेशोत्सव संयोजन मंडळासाठीच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद आल्याने उत्सव रद्द होतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे सर्व मायबोलीकरांना, विशेषतः नवीन मंडळींना, संयोजन मंडळातर्फे आवाहन की अश्या मंडळामध्ये नक्की भाग घ्या कारण हा अतिशय आनंददायी अनुभव असतो.

गणेशोत्सवाच्या संयोजनात काही त्रुटी राहून गेल्या असल्याची नम्र जाणीव आम्हाला आहे. तर त्याबद्दल तसेच तुम्हाला काय आवडलं,काय नाही, अजून काय करणं शक्य होतं ह्याबद्दलची आपली मते ह्या धाग्यावर नक्की मांडा. आगामी मंडळांना ह्या सूचनांचा निश्चित उपयोग होईल. स्पर्धांचे विजेते निवडण्यासाठी मतदानाची सोय लवकरच उपलब्ध करून देऊ. आपापल्या आवडत्या प्रवेशिकांना नक्की मत द्या.

अनेक उपक्रमांवर लोकांनी ही कल्पना कुणाची? असं विचारलं आहे. तेव्हा आम्ही सांगू इच्छितो की सर्व उपक्रम हे संपूर्ण संयोजक मंडळाच्या शब्दशः 'अहोरात्र' केलेल्या मेहनतीचं फलित आहे.

कसं जमेल, कसं होईल करता करता आता 'कार्यालय' आवरायची वेळ आली की आवंढा येतोच. गाठीशी आलेले अनेक नवे अनुभव, नवीन शिकलेल्या अनेक गोष्टी, मनभर आनंद आणि किंचित चुटपूट लागली की निरोपाची वेळ येते.

निरोप घेता घेता, आपण मायबोलीतर्फे आजवर जिथे जिथे असा आनंद पसरवला आहे त्या संस्थांची नावे गुंफून मायबोलीकर उदयन... यांनी हा अक्षर गणेश तयार केला आहे ज्यात रंग भरलेत नीलू यांनी. काही क्षणांसाठी का होईना मायबोलीने तिथे हसू फुलवले तोच आनंद आशीर्वादाच्या रूपात आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहील. गणपती बाप्पा मोरया!

धन्यवाद!
- २०१४ गणेशोत्सव संयोजन मंडळ
(आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया, स्नेहश्री)

संस्थांची नावे-
अस्तित्व, भागिरथ, मैत्री, सावली, शबरी, सुमति, स्नेहालय, स्नेहाधार, आदिनाथ, सुपंथ, लोकबिरादरी, वनवासी, ग्रीन अम्ब्रेला, मनोहर, एकलव्य, प्रगती.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१४ मधल्या स्पर्धासाठी मतदान सुरु झालेलं आहे. खालील दुव्यावर तुम्ही आपले मत नोंदवू शकता.

आता कशाला शिजायची बात

http://www.maayboli.com/node/50769

मलाही कोतबो

http://www.maayboli.com/node/50768

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं म्हणजे हा माझा संयोजन मंडळात काम करण्याचा दुसरा अनुभव. आधीचा अनुभव होता पण तो परिपक्व नव्हता. तेव्हा काही वैयक्तिक कारणांमुळे फुलफ्लेज सहभाग घेता आला नव्हता.ह्या वर्षी अ‍ॅड्मिन ची गणेशोत्सव होणार नाहीची पोस्ट बघुन मी थोडी नाराजच झाले होते. शेवटी मी सुद्धा नाव दिले अगदी शेवटच्या क्षणी.
मी कायम रोमात राहणारी आहे. पटकन संवाद साधणं मला जमत नाही. पण ह्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मात्र मी त्या कॉम्प्लेक्समधून बाहेर आले. याला कारण रिया, जाई, आशुडी,कविता, चैतन्य, उदयन..., पराग व गजानन सारखे छान सहकारी मित्र-मैत्रिणी . खंर तर ह्या सगळ्यानां मी पूर्णपणे अनोळखी होते पण मला सगळ्यांनी खूप छान सामावून घेतले.
समतोल उत्तरं कशी द्यावीत, चारही बाजूंनी एखाद्या गोष्टीचा विचार कसा करावा, नियोजन कसे करावे ह्या व अश्या अनेक गोष्टी ज्या मला माझ्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवनात सुद्धा उपयोगाला येतील ह्या गोष्टीं मला शिकायला मिळाल्या.
माझ्या संयोजक सहाकार्‍यांचे सुद्धा मनापासुन आभार Happy संयोजक मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली अ‍ॅडमिन यांचेही आभार.​

वरचा गणराया काय मस्त आहे. कोणाची कल्पना ही?
कार्यक्रम छान झाला. शिजवा व ठो ने मजा आली.
वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे कमी वेळ असुनही छान सादर केलात कार्यक्रम.
गणेशमंडळाचे कौतुक!

आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया, स्नेहश्री
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद! आणि अत्यंत यशस्वीपणे उपक्रम पार पाडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
सगळेच उपक्रम हटके आणि डोक्याला चालना देणारे होते..वेळेअभावी सहभागी होते आले नाही तरी सगळ्या उपक्रमातून दूरदेशी असून उत्सवाचा फील येत राहीला! गणपती बाप्पा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो!

मस्त झाला गणेशोत्सव.

मला सगळ्यात आवडले ते झब्बू. खूप कल्पक विषय होते त्यामुळे भाराभर फोटो न येता निवडक पण अतिशय सुंदर फोटो आले.
सगळ्या संयोजक मंडळाला मनापासून धन्यवाद.

झिम्माच्या वाचनाबद्दल चिनूक्सला अनेक धन्यवाद.

ह्यावेळेसचा गणेशोत्सव नावीन्याने ओतप्रोत वाटला. सर्वसमावेशक वाटला. मजेशीर वाटला.

हा गणेशोत्सव कार्यक्रम डिझाईन करणारे आयोजक / संयोजक, इतर सर्व कल्पक सहभागी कलाकार ह्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन! Happy

यंदाच्या गणेशोत्सवात (माझ्यासारख्या फक्त रोमातल्या मायबोलीकरीणीलाही) एकूणच मज्जा खूप आली. धन्यवाद संयोजक. Happy

ह्या वर्षीचे उपक्रम खूप वेगळे होते आणि खूप मजा आली. मी सुद्धा प्रथमच खेळात आणि स्पर्धेत भाग घेतला होता. गेल्या दोन वर्षाचे उपक्रम संपल्यावर मला मायबोलीवर येण्यासाठी वेळ मिळत होता पण ह्या वर्षी भाग घ्यायला मिळाल्यामूळे खूप खूष होते. खाद्ययात्रेतील खेळाने खूप मजा आली.

ठो उपमा, सुरक्षेचा श्रीगणेशा , पाककृती स्पर्धेची कल्पना, फोटो झब्बूची कल्पना खूपच सुंदर होती.

स्वयंसेवकांअभावी यंदा मायबोलीचा गणेशोत्सव होऊ शकणार नाही <<<< हे वाचल तेव्हा खूप वाईट वाटल होत कारण मला वेळ देण सध्या शक्य नाही पण हेच वाक्य वाचून सहभागी झालेल्या संयोजक मंडळातील मायबोलीकरांच खूप कौतूक वाटल आणि खूप खूप धन्यवाद.

गार्गी दत्ता यांचेही खास कौतुक आणि आम्हा मायबोलीकरांचे धन्यवाद त्यांना नक्की द्या. Happy

पडद्याआडच्या व पडद्यापुढे येऊन हा उपक्रम यशस्वी करणार्‍या सर्व संयोजक मंडळी व मदत चमूचे खास कौतुक व अभिनंदन! जोरदार झाला यावर्षीचा कार्यक्रम! उपक्रम नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक होते. संयोजकांनी घेतलेले कष्ट व उपक्रम यशस्वी व्हावा यासाठीची त्यांची धडपड, उत्साह हे सारे काही जाणवत होते. मंडळींची ती लगबग घरचे कार्य असल्यासारखी सुखावून जात होती.

प्रकाशचित्रांच्या झब्बूत यावर्षी मला फारसा भाग घेता आला नाही. पण पाककृती, ठो उपमा, मलाही कोतबो यांमध्ये भाग घेता आला याचा आनंद वाटला.

मायबोलीचा गणेशोत्सव म्हणजे वैविध्याची लयलूट असते ही जाणीव पुन्हा एकदा पक्की झाली. आयत्या वेळी आपली व्यवधाने बाजूला ठेवून संयोजक भूमिकेत यशस्वी शिरकाव करून हा उपक्रम जोरदार साजरा करणार्‍या सर्व संयोजकांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

मायबोलीच्या गणेशोत्सव उपक्रमाशी संबंधित आणि संयोजक मंडळातील सर्वांचंच अगदी मनापासून कौतुक!

प्रभा, मतदानासाठी अ‍ॅडमिनांच्या मदतीने नवीन पाने उघडली जातात, जिथे सगळ्या प्रवेशिकांची नावे आणि त्यांपैकी कोणत्याही एकीला मत देण्याची सोय असते.

आम्ही कुटुम्बीयान्नी खूप enjoy केला

अजून बरेच लेख़ ,पाककृती वाचायच्या राहील्या आहेत. दिवाळी पर्यन्त पुरतील.
संयोजक मंडळाला धन्यवाद

झब्बू collection मस्तच

कल्पकतेच्या बाबतीत आजवरचे हे सर्वोत्तम संयोजक मंडळ.
>>>>>>>>>>
आधीच्या वर्षांची फारशी कल्पना नाही पण पुढच्या वेळसाठी मात्र एक बेंचमार्क सेट केला या टीमने एवढे नक्की.

सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार,
या अकरा दिवसांत काय वाचू आणि काय नाही असे झाले होते.
ऑफिसची कामे उरकता उरकता कॉम्प्युटरच्या एका छोट्या विंडोमध्ये गणेशोत्सव साजरा होत होता Happy

या वर्षीचा गणेशोत्सव खूपच खास वाटला . सगळ्याच कल्पना नाविन्यपूर्ण होत्या .... खरोखर दूरदेशी राहून सुद्धा इतका सुंदर उत्सव साजरा होवू शकतो हे केवळ मायबोली वरच शक्य आहे ..... संयोजक आणि संपूर्ण मंडळाला सलाम ... _^_

हार्दिक अभिनंदन!!

फारच छान झाला गणेशोत्सव Happy

सगळे उपक्रम आणि स्पर्धा एकदम वेगळ्या आणि इंटरेस्टिंग होत्या Happy पण यंदा काहि अडचणींमुळे उपक्रमांमधे जास्त भाग घेता आला नाही.

तसेच मदत करेन म्हणुन आश्वासन देऊन सुद्धा आयत्यावेळेस काही अपरिहार्य कारणांमुळे मदत करु शकले नाही त्याबद्दल मनापासुन दिलगीर आहे.

तुम्हा सर्व संयोजकांना धन्यवाद आणि पाठीवर कौतुकाची थाप Happy

खूप धमाल आली यावेळेस. संयोजकांना वाचकांतर्फे धन्यवाद व अभिनंदन! एकदम मजेदार लेख वाचायला मिळाले.

Pages