अनंतचतुर्दशी

Submitted by प्रगो on 8 September, 2014 - 10:05

"इट्स डन "
******************************************************************************

साधारण १४ -१५ वर्षांपुर्वीची गोष्ट . अनंतचतुर्दशीचा दिवस ! महादरे तळ्याच्या काठावर विसर्जनासाठी तुडुंब गर्दी ओसंडली होती. तळ्याकाठच्या घाटावर लोक गणेशमुर्तींची आरती करत होते. पायर्‍यांवर उदबत्त्यांचा , निर्माल्याचा , चिरमुरे बत्ताशे फुटाणे वगैरे नैवेद्याच्या गोष्टींचा खच जमु लागला होता . छोट्या मोठ्या मंडळांच्या ढोलताशांच्या आवाजात सगळा परिसर दुमदुमुन निघत होता. तळ्याकडेच्या गणेशमंदीराच्या कळसावर सुरेख रोषणाई करण्यात आलेली होती. त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात जवळपास संपुर्ण तळेच उजळुन निघत होते . तळ्याच्या दुसर्‍या बाजुला , यवतेशवरच्या जंगलाच्या बाजुला मात्र घनदाट शांतता होती. नेहमी पोहायला गेलो की उड्या मारायला तिकडे गर्दी करणारी पोरे आज एक तर धोलताशांच्या पथकात होती तर काही तळ्यात पोहत पोहत विसर्जनाला मदत करत होती . (बरेच जण गुढघाभर पाण्यात मुर्ती नेवुन विसर्जित करत होते अन ही पोरं त्या मुर्ती तळ्याचा मध्यापर्यंत नेवुन सोडत होती.)
गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरयाच्या गजरात हा सारा सोहळा जोरदारपणे चालु होता ...

"दादा , ह्या पोरांकडे बघ रे , खाली येवु देवु नको कोणाला . मी विसर्जन करुन येतो . "
असे बोलुन मामाने ७-८ चिल्लीपिली भावंडे माझ्याकडे सोपविली. आमची नुकतीच गणपतीची आरती करुन झाली होती , नाना शांतपणे पुजेचे ताम्हण अन प्रसादाच्या पिशव्या घेवुन उभे होते अन मी त्यांच्या बाजुला ! मी जरा प्रेमाने तर जरा दटावुन पोरांना कठड्यापासुन दुर उभे केले . सगळ्यात धाकट्या छकुच्या तर डोळ्यात पाणी आले होते बाप्पा जाणार म्हणुन... तिला अलगद कडेवर उचलुन घेतले.

" ए वेडुले रडायचं काय ? बाप्पा परत येणार ना पुढच्या वर्षी ! "
"पन मग तो चाललायच कछाला ? त्याला सांग ना थांबायला "
"अगं त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल ना , तुला येते कीनई तशीच म्हणुन चाललाय तो "

पोरगी मुसमुसत खांद्यावर डोके ठेवुन पडली , इतर टवाळ कारटी तिला हसत होती त्यांना जरा दटावुन शांत केले.
नाना हे सारं शांतपणे पहात होते .त्यांनी माझ्याकडे पाहुन हलकेसे स्मितहास्य केले , त्यांच्या चेहर्‍यावरचा निर्विकार भाव पाहुन मला कोड्यात पडल्या सारखे वाटत होते ... इतका मोठ्ठा झाले तरी मलाही कुठे तरी बाप्पा जाणार ह्या विचाराने कसे तरीच व्हायचे , उणीपुरी दहा दिसांची सोबत पण घरी इतका मोठ्ठा कार्यक्रम असायचा , सकाळी अभिषेक , दुपारी आवर्तने , संध्याकाळी आरत्या वगैरे ! बाबांकडे दीडदिवसाचा गणपती विसरजन झाले की आम्ही ताबडतोब मामा कडे सुटायचो ते अगदी अनंतचतुर्दशी पर्यंत ! त्यात ही चिल्लीपिल्ली मामेभावंडं अन मग इतका दंगा असायचा की काय सांगु ! अन त्यात हा बाप्पा आमच्यातलाच एक होवुन रहायचा जणु ! मग विसर्जनाच्या वेळेला का बरे डोळ्यात पाणी नाही येणार ?

"नाना , इतका मोठ्ठा झालो तरी मला हे अजुनही उमगत नाहीये !" मी हळुच नानांना म्हणालो .
नाना म्हणाले " काय उमगत नाहीये ? अन कोण मोठ्ठा झाला ? "
"मीच की ! मीच मोठ्ठा झालोय...पण मलाही अजुन ह्या विसर्जनामागचे कोडे सुटत नाहीये "
नाना हसले " लेका अजुन अंड्यातुन बाहेर आला नाहीस अन म्हणे मोठ्ठा झालो , अजुन खुप वेळ आहे समजुन घ्यायला "
"नाही नाना . ही काय ७-८ पोरं मला दादा म्हणताहेत, मी मोठ्ठा झालोय, मला हे समजुन घ्यायचंय , मला कळालं नाही तर ह्या पोरांना मी काय सांगणार ? मला सांगा ना ह्या गणेशोत्सवामागचा नक्की उद्देश काय ? दहा दिवस आपण गणपती घरी आणतो इतक्या जिवाभावाने पुजा करतो अन मग दहाव्या दिवशी विसर्जन ...हे का ? दहा दिवस 'दास रामाचा वाटपाहे सदना' म्हणायचे अन दहाव्या दिवशी त्याला पाण्यात विसरजन करुन टाकायचे ... दहा दिवस ज्या मुर्ती वर प्रेम केले भक्ती केली तीच मुर्ती अकराव्या दिवशी तळ्याचा काठाशी मोडक्यातोडक्या अवस्थेत उध्वस्त पडलेली पहायची हे काही मला उमगत नाही , ही कसली भक्ती ?"

मी प्रश्नांच्या गुंत्यात अडकलो होतो , रादर अजुनच खोलखोल रुतत चाललो होतो....खुप विचार करुनही माझी मला उत्तरे सापडत नव्हती .

मामा विसर्जन करुन , भिजलेले धोतर सावरत पायर्‍या चढुन वर आला होता , तळ्यातले पाच खडे ताम्हणात घेतले होते. आमच्या पुढे येवुन तो नानांना म्हणाला

"इट्स डन "

नाना हसुन म्हणाले " नॉट येट ! तु ह्या पोरांना घेवुन पुढे हो , मला जरा दादाशी गप्पा मारायच्यात, मी दादाला घेवुन येतो थोड्यावेळाने "

मामा हसला . त्याने नानांकडुन प्रसादाची पिशवी घेतली . छकुला माझ्या खांद्यावरुन घेतले अन बाकीच्या पोरांना सोबत घेवुन घरी निघुन गेला .

"इथे जरा जास्तच दंगा आहे , आपण जरा पलीकडच्या कठड्यावर जाऊन बसुयात गप्पा मारत " नाना बाकी काही न बोलता पलीकडच्या कठड्याच्या दिशेने चालु लागले अन मी त्यांच्या मागेमागे.

*********************************************************************
तळ्याच्या पलिकडच्या काठावरुन विसर्जनाचा सोहळा अगदी वेगळा भासत होता . तळे बर्‍यापैकी मोठेठे असल्याने ह्या इथे ढोलताशांचा दंगा तितकासा कर्कश्श ऐकु येत नव्हतो उलट काजवे रातकिडे ह्यांचाच किर्किर आवाज जास्त होता ...पलिकडच्या काठावरील मंदीराची रोषणाई , पाण्यात उतरुन गणपति विसर्जन करणारी पोरं अन त्या मागे दिसणारी अजिंक्यतार्‍याची अस्पष्ट आकृती ... अगदी कोणा चित्रकाराने चित्र काढावे असे दृष्य होते !
मी आणि नाना तळ्याच्या कढड्याच्या बाजुला असलेल्या पायर्‍यांवर बसलो होतो...

नाना शांत गंभीरस्वरात म्हणाले
"अरे जे जालेंचि नाहीं | त्याची वार्ता पुससी काई | तथापि सांगों जेणें कांहीं | संशय नुरे ||"

" नाना ??"

"दादा , अरे ह्या गोष्टी अशा झटकन लक्षात नाही येणार , आधी खुप वाचावे लागेल मग चिंतन करावे लागे ...हळु हळु उमगायला लागतील ह्या गोष्टी ! तु कधी ना कधी असे प्रश्ण विचारणार हे ठाऊकच होते आजचा बरा मुहुर्त साधलास लेका !

हे बघ , आपल्यातले कोणतेही मोठ्ठे उत्सव पाहिलेस तर ते १० दिवसांचेच असतील , गणेशोत्सव म्हण की नवरात्र म्हण रामाचे नवरात्र. खंडोबाचे नवरात्र वगैरे सगळेच ! नऊ दिवसांचा उत्सव अन दहाव्या दिवशी विसर्जन !हे सगळे आपल्या नवविधाभक्तिराजपंथाचे प्रतिक आहेत.
आपण गणेशचतुर्थीला काय करतो तर एक मातीची मुर्ती घरी आणतो , म्हणजे खरेतर शाडु पीओपी वगैरेची पण पुजेत तरी पार्थिव महागणपतयेनमः म्हणतो , ही मुर्ती खरेतर मातीची असणे अपेक्षित आहे पण काळ बदलला तशा पध्दती बदलत जाणार , ते असो .
तर आपण ही मुर्ती घरी आणुन प्राणप्रतिष्ठापना करतो ... शब्द बघ किती छान वापरलाय ज्याने पुजा विधी लिहिणार्‍याने ! कारण द्गडामातीत कुठला आलाय रे देव ...
धातु, पाषाण, मृत्तिका । चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली ।
तर हे सारे आपल्या कल्पनेचे आहे , आपल्या मनाची धारणा आहे , त्या मुर्तीमधे आपण आता देव आहे अशी धारणा करतो ... नातुडे मुख्य परमात्मा म्हणोनि करावी लागे प्रतिमा !!
इथुनपुढचा प्रवास जी की बाह्यांतरी उपासना आहे साधना आहे तीच अभ्यंतरीचे मननचिंतन निजध्यासन आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

नऊ दिवस , नऊ भक्ती ! दररोज एकएक पायरी वर सरकत जायचे आहे आपल्याला , किंव्वा असे म्हण की एक एक पायरी खोल मनाच्या गाभार्‍यात उतरत जायचे आहे !
आधी श्रवण करायचे मग कीर्तन मग स्मरण वगैरे वगैरे , तुला रस्ता माहीत आहेच ... पण ह्या बरोबरच अंतरीचा प्रवासही , सुक्ष्माचा प्रवासही करायचाय !
ही माती , पाणी रंग वगैरे म्हणजे देव आहे का ? की ह्या दुर्वा , फुले म्हणजे देव आहे ? जे पिंडी तेच ब्रह्मांडी ... किंव्वा जे ब्रह्मांडी तेच पिंडी मग ह्या हिशोबाने विचार कर पाहु , हे हात पाय कान नाक डोळे म्हणजे तु आहे आहेस का ? जेव्हा माझे हात माझे पाय माझे कान नाक डोळे असे आपण म्हणतो तेव्हाच ह्यातला माझे म्हणणारा ह्यांपासुन वेगळा अलिप्त असा कोणी तरी आहे हेच अधोरेखित होत नसते काय ? "

मी गुंग होवुन सारे ऐकत होतो ... "पण मी विचार करतो , मी अनुभव घेतो , मला आनंद दु:ख वगैरे जाणवते म्हणजे मी असा कोणी तरी नक्की असणारच "

"करेक्ट , अरे पण तो मी कोण हे सारे जाणुन घेण्यासाठीच तर हा येवढा सोहळा मांडला ना आपण ! तर आपल्याला असा संतांच्या शब्दात सांगायचे तर नवविधाभक्तिराजसोपान चढुन जायचाय . अन शेवटच्या पायरीवर नवव्या पायरीवर पोहचलो की तुझ्या लक्षात येईल की ही पार्थिव अशी गणेशाची मुर्ती आपण निर्माण केली त्यात प्राणप्रतिष्ठापना केली , देव त्याच्यापेक्षा प्रचंड विशाल आहे अन ज्याला आपण माझे माझे म्हणतो तो मी देखील ह्या हात पाय कान नाक मन बुध्दी अहंकार ह्या सगळ्यांच्या परे आहे , त्याच्यात अन ह्या देवाच्यात काहीच फरक नाही.

पदार्थ मनें काया वाचा| मी हा अवघाचि देवाचा |
जड आत्मनिवेदनाचा| विचार ऐसा ||

ही झाली नववी पायरी पण अजुन बरेच आहे ... अजुन जसा जसा मोठ्ठा होत जाशील तेव्हा तुझ्या लक्षात येत जाईल

पदार्थ मनें काया वाचा| मी हा अवघाचि देवाचा |
जड आत्मनिवेदनाचा| विचार ऐसा ||
चंचळकर्ता तो जगदीश| प्राणीमात्र तो त्याचा अंश |
त्याचा तोचि आपणास| ठाव नाहीं ||
चंचळ आत्मनिवेदन| याचें सांगितलें लक्षण |
कर्ता देव तो आपण| कोठेंचि नाहीं ||
चंचळ चळे स्वप्नाकार| निश्चळ देव तो निराकार |
आत्मनिवेदनाचा प्रकार| जाणिजे ऐसा ||
ठावचि नाईं चंचळाचा| तेथें आधीं आपण कैंचा |
निश्चळ आत्मनिवेदनाचा| विवेक ऐसा ||
तिहिं प्रकारें आपण| नाहीं नाहीं दुजेपण |
आपण नस्तां मीपण| नाहींच कोठें ||

पाहातां पाहातां अनुमानलें| कळतां कळतां कळों आलें |
पाहातां अवघेंचि निवांत जालें| बोलणें आतां ||

नाना बोलता बोलता शांत झाले ...अन् मीही . बर्‍याच गोष्टी डोक्यावरुन गेल्या होत्या ;ज्या थोड्या फार डोक्यात शिरल्या होत्या तेवढ्याच आता आठवत होत्या.

" पण नाना मला अजुनही एक गोष्ट लक्षात येत नाहीये दहाव्या दिवशी विसर्जन का ? ठीक आहे तुम्ही आत्मनिवेदनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलात पण मग विसर्जन कशासाठी ? "

नाना हसुन म्हणाले " अरे आपण पारायणाच्या शेवटी काय म्हणतो आठव की

जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥
हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥

एकदा जे साध्य होते ते साधले की साधनांची काय गरज ? ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ? आता सगळीकडे तोच तो आहे मग त्याला ह्या शुल्लक मुर्तीपुरता का मर्यादित करा ? पायात लोखंडाची बेडी होती ती तोडुन आपण सोन्याची घातली अरे पण ती सोन्याचीही बेडीच आहे हे लक्षात आल्यावर ती तरी कशाला ... तीही सोडुन देता आली पाहिजे म्हणुन विसर्जन ... जो मुळात अनंत होता त्याला केवळ आपण आपल्या आकलनासाठी मुर्तीमधे कल्पिला , अन आता तो अनंत आहे हे लक्षात आल्यावर त्याला अनंतातच विलिन होवुन जाऊदे ...म्हणुन अनंतचतुर्दशी ! परत जे ब्रह्मांदी तेच पिंडी ! जो न्य्याय परम्यात्माला तोच अंतरात्म्याला ! एकदा विसर्जन झाले की संपले ! मग ती मुर्ती अन् तो देह कोठेही जाओ अथवा राहो , आपल्याला त्याच्याशी काय ? आता आपण मोकळे !

नाना शांतपणे उभे राहिले , माझ्याकडे पाहुन म्हणाले

"आतां होणार तें होईना कां| आणि जाणार तें जाईना कां |
तुटली मनांतील आशंका| जन्ममृत्यूची ||

संसारीं पुंडावें चुकलें| देवां भक्तां ऐक्य झालें |
मुख्य देवासि ओळखिलें| सत्संगेंकरूनी || "

नानांनी पाण्यामधे सुर मारला , मीही नानांच्या मागे मागे तळ्यात उडी मारली , पोहत पोहत विसर्जनाच्या काठावर पोहचलो , काठावरच्या गणेशमंदीरात देवाला नमस्कार केला .
*******************************************************************************

घरी पोहचलो तेव्हा गणपतीच्या मुर्तीच्या जागी घरातल्या गणेशाची प्रतिमा ठेवली होती , आरती जवळपास संपत आली होती, पोरांचा प्रसाद वाटण्यावरुन किलकिलाट चालु होता , ज्याला त्याला उकडीचे मोदक खायचे होते सर्वात आधी . मी कपडे बदलुन देवघरात आलो तेव्हा नाना शांतपणे डोळे मिटुन अथवशीर्ष म्हणत बसले होते.
मी देवाला जाऊन नमस्कार केला आरती घेतली अन मग मामाला नमस्कार केला , मामाने हसत हसत पाठीवर थाप मारली अन म्हणाला " नाऊ ,

" इट्स डन !"

*********************************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतरस्थितीचिये खुणा | अंतर्निष्ठ जाणती |
फार मोठा झालायस प्रसाद Happy
आतून उतरलंय लिखाण सगळं.
सकळ करणे जगदीशाचे | कवित्वचि काय मानवाचे? | ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे?
तेव्हा, 'अनंते त्वद्हस्ते लिहविले' हेच खरे !

आहा... फार फार सुरेख लिहिलय, प्रसाद.
ह्याची लिन्क देणार वाचायला.
वा.. आजचा दिवस कारणी लागला... दिवसाच्या सुरुवातीलाच.

श्री समर्थांनी सर्व परमार्थ (संसारासहित) इतका व्यवस्थित उलगडून सांगितलाय की एक "दासबोध" ग्रंथ वाचन -मननाला घेतला की बस्स ..

प्रसाद - फारच सुरेख विवरण केलेस..... सगुणाचेनी आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे | सारासार विचारे संतसंगे || हे सारे कसे नीट समजावून दिलेस .... या लेखाने जीव कसा तृप्त झालाय... Happy
सगुणाचे महत्व, नवविधा भक्ति हे करता करताच देव - भक्तांचे ऐक्य होणार यात काहीही शंका नाही.

जय जय रघुवीर समर्थ ||

प्रसाद....

तुमच्या नावाला सार्थ असेच सुंदर आणि वाचताना मोहून जावे असे लिखाण इथे उतरले आहे....मला तरी असेच भासत राहिले की नदीच्या किनारी मी तुम्हा दोघांचा हा ज्ञानदायी संवाद ऐकत आहे बाजूलाच बसून.

"...सोन्याचीही बेडीच आहे हे लक्षात आल्यावर ती तरी कशाला ... तीही सोडुन देता आली पाहिजे म्हणुन विसर्जन..." ~ हे वाक्य तरी इतके मोठे तत्त्वज्ञान सांगते की....संपूर्ण लेखातील व्याख्यानाचे हे सारच व्हावे.

ज्या गणेशाने तुम्हाला ही १४-१५ वर्षापूर्वीची कथा सांगण्यास प्रेरीत केले....त्याला मनोभावे वंदन.

[ह्या लेखाची लिंक मी माझ्या इथल्या परिचितांना देऊ इच्छितो....त्याला तुमची अनुमती आहे असे गृहित धरतो, प्रसाद.]

मस्त रे !

प्रसाद, किती दिवसांनी लिहिलस आणि ते ही इतकं खोलवर रुतणारं Happy सत्कारणी लागली अनंतचतुर्दशी. किती साध्या सरळ शब्दात विसर्जनाच महत्व उकलुन दाखवल नानांनी.

ही लिंक शेअर करणारच , इतका उत्कट वाचनानंद वाटून घेतलाच पाहिजे..
हे असं काही वाचायला मिळालं की चित्तवृत्तीत शिरलेला शिळेपणा झटकला जातो. हाच तर हेतू असतो सणाचा.क्षणात सामावलेलं अनंत अद्भुत नव्याने अनुभवणे . धन्यवाद प्रसाद.

थॅन्क्स भारती....मी तुझ्या प्रतिसादाची वाट पाहात होतो....नक्की खात्री होती मला तुला भावणार ही प्रसाद कथन "अनंतचतुर्दशी".

"...हे असं काही वाचायला मिळालं की चित्तवृत्तीत शिरलेला शिळेपणा झटकला जातो....." हे वाक्य फार भावले मला. मी साक्षात अनुभवच घेतला.

Pages