अमेरीकेच्या ईशान्येला गल्फ ऑफ मेक्सीकोच्या पलीकडे पसरलेला सागर म्हणजे कॅरेबियन समुद्र. मेक्सीकोच्या उत्तरेकडील किनारा आणि क्युबापासून वेस्ट इंडीज बेटांमधील त्रिनिदादपर्यंत हा पसरलेल्या या सागराच्या किनार्यावर अनेक लहानमोठे देश आणि असंख्य बेटं आहेत. पॅसिफीक आणि अटलांटीक महासागरांना जोडणार्या पनामा कालव्यातून जहाजं प्रवेश करतात ती याच कॅरेबियन समुद्रात. कॅरेबियन समुद्र ओलांडल्यावर बेटांच्या दरम्यान असलेल्या अनेक मार्गांतून उत्तर अटलांटीक महासागरात प्रवेश करता येतो. क्युबाच्या आग्नेयेला आणि डोमिनिकन रिपब्लीक आणि हैतीच्या वायव्येला असलेल्या बहामा बेटांच्या पलीकडचा प्रदेश म्हणजे कुप्रसिद्ध बर्म्युडा ट्रँगल!
कॅरेबियन समुद्रातील मध्यवर्ती असलेलं बेट म्हणजे हैती आणि डोमिनिकन रिपब्लीक. डोमिनिकन रिपब्लिकचा पूर्व किनारा आणि प्युर्टो रिकोचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यानची सामुद्रधुनी म्हणजे कॅरेबियन आणि अटलांटीक यांना जोडणारा एक महत्वाचा मार्ग...
मोना पॅसेज!
कॅरेबियन सागरातील एक अत्यंत महत्वाचा परंतु धोकादायक मार्ग असलेला मोना पॅसेज सुमारे ८० मैल रुंद आहे. हिस्पॅनिओला आणि प्युर्टो रिकोच्या मोठ्या किनार्यांवर आदळून परत फिरणार्या लाटांमुळे आणि सँडबार्समुळे सागराचा हा भाग तसा वर्षभर खवळलेलाच असतो! जोडीला पाण्याखालचे प्रवाहही जोरात असल्याने हा पॅसेज पार करणं म्हणजे नौकानयनाच्या दृष्टीने एक आव्हानच असतं!
मोना पॅसेज आणि मोना बेट
मोना पॅसेजचा हा भाग अत्यंत धोकादायक आहे याची फार पूर्वीपासून नोंद झालेली आहे. आशिया खंडाच्या शोधात निघालेल्या ख्रिस्तोफर कोलंबसने मोना पॅसेजमधील धोकादायक समुद्राची आपल्या पहिल्या सफरीतच नोंद घेतलेली होती. 'ह्या भागातून जहाज हाकारताना ते सतत झिग-झॅग करत वळवत राहवं लागत असे. अन्यथा जलसमाधी ठरलेलीच होती!' अशी कोलंबसने नोंद केलेली आढळते.
मोना पॅसेजच्या बरोबर मध्ये मोना नावाचं बेट आहे. या बेटावरुनच या मार्गाला मोना पॅसेज हे नाव पडलं आहे. सुमारे ७ मैल लांब आणि ४ मैल रुंदीचं हे बेट प्युर्टो रिकोच्या पश्चिमेला ४१ मैलांवर आणि डोमिनिकाच्या पूर्वेला सुमारे ३४ मैलांवर आहे. या बेटाची मुख्य भूमी म्हणजे मोठं पठार आहे. त्याच्या चारही बाजूला समुद्रकिनार्यावर उतरलेले कडे आहेत. या कड्यांच्या पोटात चुनकळीपासून बनलेल्या असंख्य गुहा आहेत! बेटावर अनेक प्रकारच्या वनस्पती आढळून येत असल्या तरीही या बेटावर कायमचे रहिवासी म्हणून कोणाचीही नोंद नाही.
मोना बेटावरील पठारावर मुख्यतः निवडुंगाचं रान माजलेलं आहे. या निवडुंगामुळे बेटावरील अनेक विवरं फसव्या पद्धतीने झाकली गेलेली आहेत. ही विवरं ही काही फूटांपासून ते काहीशे फूट खोल आहेत! अनेकदा या विवरांमध्ये मानवी सांगाडे आढळून येतात! बेटावर मुख्यतः जंगली बोकड, रानडुकरं आणि सहा फूट लांबीपर्यंट वाढणारे सरडे आढळून येतात! आंबा, लिंबू आणि संत्र्याची झाडं इथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. बेटाच्या पश्चिम किनार्यापासून काही अंतरावर सागरात असलेल्या कोरल रीफमुळे इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आढळून येतात.
मोना बेटावर पूर्वी हैती आणि डोमिनिकातून आलेल्या ताईनो इंडीयन जमातीची वस्ती होती. आपल्या दुसर्या सफरीच्या दरम्यान प्युर्टो रिकोहून डोमिनिकाकडे जाताना २४ सप्टेंबर १४९४ ला कोलंबसला मोना बेटाचं दर्शन झालं. त्याने ताबडतोब त्यावर स्पेनचा मालकी हक्क सांगितला! १५०२ मध्ये हिस्पॅनिओला (डोमिनिका) वर सुरू असलेल्या उठावावर नजर ठेवण्यासाठी निकोलस डि ओव्हॅन्डोच्या नेतृत्वाखाली २००० जणांची तुकडी मोना बेटावर पाठवली. या बेटावर कायमची वसाहत उभारण्याचा त्यांचा इरादा होता, परंतु इतक्या लोकांना निवारा उभारण्याच्या दृष्टीने हे बेट खूपच लहान होतं. तसंच प्युर्टो रिकोहून अन्यधान्य आणि इतर सामग्रीची नियमीत तरतूद होणंही मुष्कीलच होतं.
१५०२ मध्ये कोलंबस आपल्या चौथ्या सफारीवर हिस्पॅनिओला इथे पोहोचला होता. हिस्पॅनिओलाचा गव्हर्नर बोबदिला याने कोलंबसला बंदरावर नांगर टाकण्यास मज्जाव केला! तिसर्या सफरीवर असताना या बोबदिलानेच कोलंबसला साखळदंडाने जखडून त्याची स्पेनला रवानगी केली होती! कोलंबस परतलेला पाहून त्याचा चांगलाच जळफळाट झाला असावा.
हिस्पॅनिओलाला पोहोचतानाच अनुभवी दर्यावर्दी असलेल्या कोलंबसला येऊ घातलेल्या झंझावाती वादळाचा अंदाज आला होता. कोलंबस पोहोचला त्या वेळेस बोबदीलाचा ३० जहाजांचा काफीला प्रचंड सोन्या-चांदीचा प्रचंड मोठा खजिना घेऊन स्पेनला निघण्याच्या तयारीत होता. बोबदिलाने केलेला अपमान गिळून कोलंबसने त्याला येऊ घातलेल्या वादळाची कल्पना दिली. परंतु आपल्याच तोर्यात असलेल्या बोबदिलाने अनुभवी कोलंबसचा सल्ला धुडकावून लावला!
याचा परिणाम काय होणार होता?
३० जूनला बोबदिलाच्या जहाजांनी स्पेनच्या दिशेने प्रयाण केलं! १ जुलैला ते मोना पॅसेजच्या मध्यावर असतानाच प्रचंड झंझावाती वादळाने त्यांना गाठलं! प्राण वाचवण्याची कोणतीही संधी मिळण्यापूर्वीच अनेक जहाजांनी समुद्राच तळ गाठला होता! काफील्यातील ३० जहाजांपैकी एकाही जहाजावरील एकही माणूस त्या वादळातून वाचू शकला नाही! बोबदिला आणि त्याच्या अफाट खजिन्यासह सगळा काफीला सागरतळाशी गेला!
मोना पॅसेजच्या तळाशी आजही करोडो डॉलर्सचं सोनं-चांदी पडलेलं आहे!
परतीच्या वाटेवर असताना झालेल्या एका वादळात कोलंबसच्या काफील्यातील फक्तं कोलंबसचं जहाज सुखरुप वाचलं! आणखीन तीन जहाजांना मोना पॅसेजमध्येच जलसमाधी मिळाली!
मोना बेट हे एव्हाना कॅरेबियन समुद्रातून अटलांटीकच्या मार्गावरील महत्वाचं ठिकाण बनलं होतं. स्पेनचा लॅटीन अमेरीकन देशांशी चालणारा व्यापार मुख्यतः मोना बेटावरुन चालत असे. तसंच युरोपात परतणार्या जहाजांना पाणी आणि इतर सामग्री भरुन घेण्यासाठी आणि काही दिवस आरामासाठी हा महत्वाचा निवारा होता.
१५२२ च्या सुमाराला स्पेनच्या जोडीला इंग्लीश, डच आणि पोर्तुगीज यांच्या जहाजांचा या भागातील वावर वाढण्यास सुरवात झाली. स्पेनच्या या भागातील वर्चस्वाला आव्हाने देण्यासाठी सर्वांनी वारंवार स्पॅनिश आरमारावर हल्ले करण्यास सुरवात केली. या सर्व जहाजांना आणि चाचांना असलेला एकमेव आश्रय म्हणजे मोना बेट! सोळाव्या शतकाच्या अंतापर्यंत हा संघर्ष सुरु राहीला. १६०० च्या सुमाराला या सततच्या लढायांना कंटाळून मोना बेटाच्या रहिवाशांनी कायमचं प्युर्टो रिकोला स्थलांतर केलं.
१७ व्या शतकात मोना बेट हा चाचांचा स्वर्ग बनला होता. कॅप्टन विल्यम किड, फ्लड, रॅकम, अॅव्हरी, बॉनेट, व्होर्न, हॉर्निगोल्ड, बॅलेमी अशा अनेक चाचांनी इथे आश्रय घेतला होता. या चाचांचा मुकुटमणी म्हणजे कॅप्टन हेनरी जेनींग्ज.
१७१५ मध्ये स्पॅनिश जहाजांचा एक काफीला फ्लोरीडा कीज मधून अटलांटीकच्या मार्गावर होता. या काफील्यातील अनेक जहाजं खजिन्याने गच्चं भरलेली होती. अटलांटीकच्या मार्गावरच असलेल्या या जहाजांना एका जबरदस्तं वादळाचा तडाखा बसला. वादळाचं थैमान शांत झाल्यावर काफील्यातील बहुतेक जहाजांचा पत्ता नव्हता. अनेक जहाजं जवळपासच्या खडकांवर अडकून फुटली होती. काही जहाजं कोणत्याही खुणा न ठेवता सागरतळाशी गेली होती!
क्युबातील हॅवाना इथे स्पॅनिशांचा तळ होता. या फुटलेल्या जहाजांचा शोध घेऊन त्यातील मिळेल तेवढा खजिना शोधण्याची जबाबदारी इथल्या जहाजांवर आली. अनेक जहाजांच्या अवशेषांचा शोध लावण्यात त्यांना यश आलं. स्थानिक अमेरीकनांनी पाण्यात बुड्या मारण्याच्या प्राथमिक साधनांच्या सहाय्याने बुडालेल्या जहाजांचा आणि त्यावरील संपत्तीचा शोध घेण्यास सुरवात केली. फ्लोरीडाच्या दक्षिण किनार्यावर असलेल्या केप कान्व्हेरल इथे हा सापडलेला खजिना साठवण्यासाठी एक कोठार उभारण्यात आलं.
हेनरी जेनींग्जच्या कानावर ही बातमी गेलीच! जेनींग्ज मूळचा ब्रिटीश होता. त्यावेळी ब्रिटन आणि स्पेन यांच्यात सागरी वर्चस्वावरुन जुंपलेली होती. अशा परिस्थितीत जेनींग्जने स्पॅनिश जहाजांवर हल्ला चढवून लुटालूट करणं म्हणजे एकप्रकारे राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन करणंच होतं असं जमेकाचा ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड आर्चिबाल्ड हॅमिल्टनचं मत होतं! जेनींग्जला त्याचा आशिर्वाद होता! (अर्थात मिळालेल्या लुटीत आपल्याला वाटा देण्याचं जेनींग्जकडून कबूल करुन घेण्यास हॅमिल्टन विसरला नव्हता)!
स्पॅनिश खजिन्याची बातमी कानावर येताच जेनींग्जच्या तोंडाला पाणी सुटलं. स्पॅनिश साम्राज्याकडे आतापर्यंत जमा झालेली संपत्ती पुरेशी आहे असा त्याचा विचार असावा. आपली पाच जहाजं आणि तीनशेच्या आसपास माणसं घेऊन जेनींग्जने केप कान्व्हेरलकडे कूच केलं!
केप कान्व्हेरेल इथे पोहोचून जेनींग्जने नांगर टाकला. सुमारे तीनेकशे चाचे चाल करून येत असलेले पाहून तिथे असलेल्या साठ स्पॅनिश पाहरेकर्यांनी कधीच पोबारा केला होता. जेनींग्जने कोठारातील संपत्तीवर पूर्ण हात साफ केला. चांदीच्या तब्बल तीन लाख विटा, सोन्याचे तुकडे असा अमाप खजिना त्याला मिळाला! ही सर्व लूट आपल्या जहाजांवर लादून जेनींग्ज जमेकाच्या दिशेने फिरला. दक्षिणेकडे जाताना त्याची आणखिन एका स्पॅनिश जहाजाशी गाठ पडली. अर्थातच जेनींग्जने त्यावरही हात मारलाच! त्या जहाजावर आणखीन पासष्ठ हजार चांदीच्या विटा त्याच्या हाती पडल्या!
जमेकापासून एक दिवसाच्या अंतरावर असताना जेनींग्जची गाठ एका इंग्लिश जहाजाशी पडली. त्या जहाजाच्या कॅप्टनकडून जेनींग्जला एक धक्कादायक बातमी कळली. जेनींग्ज आपल्या लुटालूटीत मग्नं असताना ब्रिटन आणि स्पेनमधील युद्ध संपून तह झाला होता! या बदललेल्या परिस्थितीत जेनींग्जने स्पॅनिश जहाजांची केलेली लूट ही उघड-उघड चाचेगिरीत मोडत होती!
जेनींग्जची पाठराखण करणार्या गव्हर्नर लॉर्ड आर्चिबाल्ड हॅमिल्टनने त्याला चाचा म्हणून जाहीर केलं होतं. त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आलेलं होतं!
जेनींग्जने सारासार विचार केला आणि बहामा बेटातील नासाऊ इथे पलायन करण्याचा निर्णय घेतला! नासाऊ हा त्या काळी चाचांचा स्वर्ग होता. मात्रं जमेकातून क्युबा किंवा हैतीमार्गे नासाऊला न जाता जेनींग्जने आधी मोना बेट गाठलं. तिथे बर्याच संपत्तीची विभागणी करण्यात आली. बेटाच्या पश्चिम भागातील अनेक गुहांमध्ये चांदीच्या विटा दडवण्यात आल्या! सर्व काही शांत झाल्यावर आरामात हा खजिना ताब्यात घेण्याचा जेनींग्जचा विचार होता. सर्व संपत्ती योग्य तर्हेने दडवल्यावर जेनींग्ज नासाऊला पोहोचला.
हॅमिल्टन नंतर जमेकाचा गव्हर्नर झालेल्या वूड्स रॉजर्सने जेनींग्जला पूर्ण अभय दिलं. जेनींग्ज जमेकाला परतला आणि मोठा शेतकरी म्हणून निवृत्तीचं जीवन जगू लागला. पुढे स्पॅनिश खलाशांनी त्याला पकडून नेलं आणि तुरुंगात डांबलं! परंतु मोना बेटावर लपवलेल्या खजिन्याबद्दल जेनींग्जने एक चकार शब्द उच्चारला नाही!
जेनींग्जच्या मोना बेटावर असलेल्या खजिन्याची कथा सर्वत्र पसरल्यावर अनेकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही यश आलं नाही. उलट जेनींग्जचा हा खजिना शापीत असल्याची वदंता पसरली!
१८७४ मध्ये प्युर्टो रिको इथे असलेल्या स्पॅनिश अधिकार्यांनी जेनींग्जचा खजिना शोधण्याची मोहीम आखली. मोना बेटावरील गुहांमध्ये शोध घेऊन जेनींग्जने तिथे लपवलेली संपत्ती ताब्यात घेण्याचा त्यांचा हेतू होता.
या मोहीमेला सुरवातीपासूनच धक्के बसण्यास सुरवात झाली. मोना बेटाच्या मार्गावर असताना पहिल्याच दिवशी मिळणार्या संपत्तीच्या वाटणीवरुन खलाशांत तुफान हाणामारी जुंपली! मोना बेटावर पोहोचल्यावर शोधाला सुरवात करण्यापूर्वीच एका खलाशाने स्वतःला झाडाला टांगून घेतलं!
चौथ्या दिवशी संध्याकाळी खजिन्याच्या शोधात असलेले काही खलाशी एका गुहेत शिरले. गुहेच्या अंतर्भागात पूर्ण अंधार पसरलेला होता. कंदीलाच्या प्रकाशांत खलाशी शोध घेत असतानाच....
अचानक गुहेचा अंतर्भाग लालसर प्रकाशाने उजळून निघाला! कंदील विझवल्यानंतरही डोळ्यांना स्वच्छ दिसू शकेल इतका तो प्रकाश प्रखर होता! त्या गुहेचा कण न् कण त्या प्रकाशात तेजाळून निघाला होता!
हा नेमका काय प्रकार असावा याविषयी ते आपापसात चर्चा करत असतानाच एका खलाशाने गुहेच्या अंतर्भागात नजर टाकली..
दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांच्या दिशेने पुढे झुकून पाहत असलेली एक आकृती त्याच्या नजरेस पडली!
चकीत झालेले खलाशी जागीच खिळल्यागत तो प्रकार पाहत राहीले...
काही क्षणांनी अचानक ती आकृती हवेत विरुन गायब झाली!
त्याच क्षणी ती गुहा उजळून टाकणारा लालसर प्रकाश अदृष्य झाला आणि गुहेवर अंधाराचं साम्राज्यं पसरलं!
एव्हाना सर्व खलाशांची पाचावर धारण बसली होती. जिवाच्या आकांताने ते गुहेच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने धावत सुटले! गुहेबाहेर येताच आपापल्या बोटी गाठून त्यांनी मोना बेटाचा किनारा सोडला!
दहा दिवसांच्या या मोहीमेतून काहीही निष्पन्न झालं नाही!
१९ व्या शतकाच्या शेवटी बार्बर नावाच्या एका चाचाने डोना जेना नावाच्या एका श्रीमंत घराण्यातील मुलीचं प्युर्टो रिकोहून अपहरण केलं. डोनासह बार्बर मोना बेटावर परतला. मोना बेटावर बार्बरच्या टोळीचा तळ होता. या तळावरील एका झोपडीत अनेक तरुणींचं अपहरण करुन बार्बरने त्यांना कोंडून ठेवलं होतं!
एक दिवस बार्बर मोना बेटावरुन बाहेर पडत असताना एका ब्रिटीश जहाजाची त्याच्यावर नजर पडली. चाचांचं हे जहाज दृष्टीस पडताच इंग्रजांनी त्याच्यावर हल्ला केला. बार्बरने माघार घेऊन मोना बेटावरील आपल्या तळावर आश्रय घेतला, परंतु ब्रिटीश जहाजाने त्याची पाठ सोडली नाही. बार्बरच्या तळावरील झोपडीत असलेल्या स्त्रियांची ब्रिटीशांना काहीच कल्पना नव्हती. ब्रिटीशांच्या जहाजावरुन डागण्यात आलेला एक तोफगोळा नेमका त्या झोपडीवर पडला! त्या दुर्दैवी स्त्रियांना बाहेर पळण्याचीही संधी मिळाली नाही! त्यांच्या किंकाळ्यांनी आसमंत भरुन गेला. झोपडीला लागलेल्या आगीत एकूण एक स्त्रियांचा जळून कोळसा झाला!
आजही अंधार्या रात्री मोना बेटावर या दुर्दैवी स्त्रियांच्या किंकाळ्या ऐकू येतात!
काही वर्षांनी पोर्तुगीज नावाचा एक वृद्ध माणूस मोना बेटावर आला. बेटावर एक लहानसा निवारा बांधून तो तिथे राहू लागला. कित्येक महिन्यांपर्यंत त्याच्या या गुप्त अस्तित्वाची कोणालाही कल्पनाही आली नाही.
हा वृद्ध माणूस नेमका कोण होता?
प्युर्टो रिको इथे राहणार्या एका कोळ्याला एकदिवस अनावधानाने वृद्ध पोर्तुगीजचा शोध लागला. मोना बेटावर गुप्तपणे वास्तव्यास असणार्या या माणसाबद्दल त्याची उत्सुकता चाळवली. काही दिवस त्याचं लपूनछपून निरीक्षण केल्यावर हा माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून पूर्वाश्रमीचा कुप्रसिद्ध चाचा असल्याचं त्याच्या ध्यानात आलं!
बार्थेल्योमु पोर्तुगीज!
बार्थेल्योमुने आपल्या तरुणपणीचा काळ एक धाडसी आणि तितकाच क्रूर चाचा म्हणून गाजवला होता. स्पॅनिश जहाजं हे त्याचं आवडतं लक्ष्यं असे. अनेकदा स्पॅनिश जहाजांची लूट करुन त्याने अमाप संपत्ती जमा केली होती. स्पॅनिश गव्हर्नरने बार्थेल्योमुला जिवंत अथवा मृत पकडून आणणार्यास मोठं इनाम जाहीर केलं होतं!
हा कोळी पूर्वी स्वतःच एक चाचा होता. पण त्याचे हे उद्योग गुपचूप सुरू असल्याने कोणाला त्याचा पत्ता लागला नव्हता. काही कारणाने आपल्या टोळीतून हाकलले गेल्यावर त्याने मासेमारीचा व्यवसाय सुरु केला. परंतु या व्यवसायात त्याला फारशी प्राप्ती होत नव्हती. आता बार्थेल्योमुच्या रुपाने श्रीमंत होण्याची आयती संधी त्याच्यापुढे चालून आल्यावर त्याचा फायदा घेण्याचा विचार त्याच्या मनात आला नसला तरच आश्चर्य होतं! अर्थात बार्थेल्योमुला जिवंत पकडणं आपल्याला जन्मात शक्यं होणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे येनेकेनेप्रकारेण त्याचा काटा काढून त्याचं मुंडकं पोर्तुगीज गव्हर्नरपुढे हजर करायचं असा त्याने निश्चय केला.
अर्थात बार्थेल्योमुचा निकाल लावणं वरकरणी वाटलं तितकं सोपं नव्हतं! आपल्याला जिवंत अथवा मृत हजर करण्यासाठी गव्हर्नरने बक्षीस जाहीर केलं असल्याची त्याला पूर्ण कल्पना होती. या बक्षीसाच्या लालसेनं अनेक लोक आपल्या मागावर असतील याचा त्याला अंदाज होता. मोना बेटावर वावरत असताना तो कायम शस्त्रसज्ज आणि सावध राहत असे. बेटाच्या कोणत्याही विशीष्ट भागात फिरण्याचं आणि ठरावीक हालचाली करण्याचं तो टाळत होता!
बार्थेल्योमुला संशय येऊ नये म्हणून त्या कोळ्याने एक युक्ती लढवली. आपली एक जुनी नौका त्याने मुद्दामच मोना बेटाजवळ आणून किनार्यावरील खडकावर आदळली! या बोटीचं चांगलंच नुकसान झालं होतं. परंतु बोट दुरुस्तीसाठी मोना बेटावर कधीही ये-जा करण्याचं निमित्तं मात्रं त्याला मिळालं! सुरवातीला बार्थेल्योमुनेही त्याच्यावर नजर ठेवली असावी. परंतु बोट दुरुस्तीच्या कामात मग्नं कोळ्याकडे त्याने दुर्लक्षं केलं असावं!
मोना बेटावर वारंवार खेपा मारणार्या कोळ्याने बार्थेल्योमुच्या हालचालींचा नीट अभ्यास केला. कोणतीही नियमीत हालचाल नसल्याने त्याचा नेमका काटा कसा काढावा या विवंचनेत तो कोळी असतानाच एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली. रोज सकाळी एका विशीष्ट झर्याचं पाणी बार्थेल्योमु पिण्यासाठी भरुन घेत असे! त्याच्या अनियमीत दिनक्रमात एवढी एकच गोष्ट नियमीत होती!
नेहमीप्रमाणेच एका सकाळी बार्थेल्योमु त्या झर्याच्या काठी पोहोचला होता. झर्याचं पाणी भरून घेण्यासाठी तो किंचीत पुढे झुकला होता. हातातील शस्त्रं त्याने बाजूला ठेवलं होतं...
त्याचवेळी..
आपल्या धारदार तलवारीच्या एकाच घावात त्या कोळ्याने बार्थेल्योमुचं मस्तक धडावेगळं केलं!
कोळ्याचा हल्ला इतका अचानक आणि अनपेक्षीत झाला की बार्थेल्योमु पोर्तुगीजला आपला प्राण वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही!
बार्थेल्योमुचा निकाला लागताच कोळ्याला आपल्या संपत्तीची स्वप्नं पडू लागली असावीत. बार्थेल्योमुचं धड त्याने ओढत निग्रा नावाच्या एका गुहेत आणूल लपवलं आणि त्याचं मस्तक घेऊन आपली बोट गाठली!
प्युर्टो रिको इथल्या स्पॅनिश गव्हर्नरच्या ऑफीसाता त्याने बार्थेल्योमुचं मस्तक आणून हजर केलं आणि हा बार्थेल्योमु पोर्तुगीजच असल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं. परंतु या मस्तकाचं बार्थेल्योमुच्या चेहर्याशी साम्य असलं तरी तो दुसराच कोणीतरी असावा असा गव्हर्नरला संशय आला! त्या कोळ्याने परोपरीने गव्हर्नरची खात्री पटवण्याचा प्रयत्न केला, परंतु गव्हर्नर ढिम्म! गव्हर्नरच्या ऑफीसमधील एका अधिकार्याने बार्थेल्योमुला अनेकदा पाहीलं होतं. त्याच्या देहावर असलेल्या अनेक जखमांच्या खुणांची त्याला पूर्ण माहीती होती. बक्षीस मिळ्वण्यासाठी त्याचं पूर्ण धडही हजर करण्याचा त्याने त्या कोळ्याला सल्ला दिला!
निरुपायाने तो कोळी मोना बेटावर परतला. बेटावर उतरल्यावर त्याने बार्थेल्योमुचा देह लपवलेली निग्रा गुहा गाठली. परंतु...
बार्थेल्योमुचं धड तिथून गायब झालं होतं!
हा प्रकार पाहून तो कोळी चांगलाच हादरला. धीर धरुन त्याने त्या गुहेत आणि आसपासच्या कित्येक गुहांमध्ये शोध घेतला, परंतु त्या धडाचा पत्ता लागलाच नाही!
निराश मनाने तो कोळी प्युर्टो रिकोला परतला. बक्षीसाची रक्कम त्याला मिळाली नाहीच!
या घटनेनंतर काही वर्षांनी तो कोळी पुन्हा आपल्या सहकार्यांसह मोना बेटावर आला. हेनरी जेनींग्जच्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी ते तिथे आले होते. दिवसभर शोध घेऊनही काही हाती न लागल्याने सर्वजण वैतागलेच होते. रात्री मद्यपानाचा कार्यक्रम रंगात आलेला असताना त्या कोळ्याने आपण बार्थेल्योमुचा खून कसा केला याची कहाणी रंगवून रंगवून आपल्या सहकार्यांना सांगीतली! त्याची कहाणी जेमतेम संपत आली असतानाच...
एका जोरदार किंकाळीने आसमंत दणाणून गेला!
ही भयानक किंकाळी कानावर पडताच सर्वजण हादरले! परंतु धीर करुन ते सर्वजण त्या आवाजाचा माग काढत निघाले. काही अंतर चालून गेल्यावर ते निग्रा गुहेत पोहोचले.
...आणि समोरचं दृष्यं पाहून सर्वजण जागच्या जागी खिळून उभे राहीले!
बार्थेल्योमु पोर्तुगीज!
हुबेहूब बार्थेल्योमुच्या आकाराची एक शिरविरहीत आकृती त्यांच्याकडे रोखून पाहत होती. त्या आकृतीच्या उजव्या हातात एक धारदार तलवार होती आणि दुसर्या हातात एक मुंडकं होतं!
हा प्रकार पाहताच त्या कोळ्याने जोरात किंकाळी फोडली! सर्वजण धूम पळत सुटले..
...परंतु त्या कोळ्याला मात्रं तिथून हलता येईना! जणू कोणतीतरी अनामिक शक्ती त्याला तिथून पळून जाण्यापासून रोखत होती!
इतर सर्वांनी किनार्यावरील आपला तळ गाठला आणि जीव मुठीत धरुन ते तिथे बसून राहीले!
दुसर्या दिवशी आपला सहकारी असलेला तो कोळी दिसत नसल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. त्यांच्या पैकी दोन-चार धाडसी कोळ्यांनी निग्रा गुहेत जाऊन पाहीलं आणि...
त्या कोळ्याचं मस्तक धडावेगळं केलेलं त्यांच्या दृष्टीस पडलं!
बार्थेल्योमु पोर्तुगीजने आपला बळी मिळवला होता!
बार्थेल्योमु पोर्तुगीजची आकृती अद्यापही मोना बेटावर नजरेस पडते!
मोना बेटावर मुक्काम केलेल्या कोळ्यांनी अनेकदा रात्री स्त्रियांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकल्याचीही नोंद केली आहे.
प्रख्यात संशोधक रिचर्ड बायर्डने आपल्याला मोना बेटावर शिरविरहीत आकृती दिसल्याचं नमूद केलं आहे.
कॅप्टन हेनरी जेनींग्जचा खजिना मात्रं अद्याप कोणालाही सापडलेला नाही!
*****************************************************************************************************
संदर्भ :-
Bermuda Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
Ghost Ships - रिचर्ड वायनर
विकीपिडीया
नवीन भाग टाकल्याबद्दल भरपूर
नवीन भाग टाकल्याबद्दल भरपूर धन्यवाद. आता वाचुन मग सान्गते. सुरुवात जबरी आहे पण.:स्मित:
अजून पूर्ण वाचलं नाहीये पण
अजून पूर्ण वाचलं नाहीये पण ईशान्य म्हणजे north-east ना? Caribbean sea अमेरिकेच्या south-east (मराठीत?)ला आहे ना? I may be wrong!
(No subject)
जिज्ञासा, माझ्या
जिज्ञासा,
माझ्या माहीतीप्रमाणे North-East म्हणजे आग्नेय दिशा. ईशान्य दिशा ही South-East असल्यानेच बंगालच्या उपसागरावरुन येणार्या पावसाळी वार्यांना ईशान्य मोसमी वारे म्ह्टल्याचे आठवते आहे. तसेच अरबी समुद्रावरुन - South-West मधून येणारे वारे हे नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखले जातात. भारताच्या North-West - वायव्येला असलेल्या प्रांतातूनच गझनीच्या महमदापासून ते बाबरापर्यंत इतिहासात अनेक आक्रमणे आपल्यावर झाली आहेत.
नॉर्थ ईस्ट = ईशान्य साऊथ ईस्ट
नॉर्थ ईस्ट = ईशान्य
साऊथ ईस्ट = आग्नेय
लेख मस्त आहे.
दिशांसंदर्भात - ईशान्य
दिशांसंदर्भात -
ईशान्य ----- पूर्व ----- आग्नेय
उत्तर -----------|--------- दक्षिण
वायव्य ----- पश्चिम ---- नैऋत्य
सही...
सही...
मस्त!
मस्त!
मस्तच!!!
मस्तच!!!
रोमान्चक आहे.
रोमान्चक आहे.
मस्त झालायं हा भाग!
मस्त झालायं हा भाग!
मस्त
मस्त
छानच. या वाक्याची थोडी वेगळी
छानच.
या वाक्याची थोडी वेगळी रचना करायला हवी का ?
हुबेहूब बार्थेल्योमुच्या आकाराची एक शिरविरहीत आकृती त्यांच्याकडे रोखून पाहत होती.
खरच अद्भुत आहे! मस्त...
खरच अद्भुत आहे! मस्त...
हुबेहूब बार्थेल्योमुच्या
हुबेहूब बार्थेल्योमुच्या आकाराची एक शिरविरहीत आकृती त्यांच्याकडे रोखून पाहत होती. >>>>> - गंमतच म्हणायची की !!
कापलेल्या शिराची रोखलेली नजर
कापलेल्या शिराची रोखलेली नजर
मस्त.........अद्भुत ..गूढ ..
मस्त.........अद्भुत ..गूढ ..
मस्तच आहे हा भाग............
मस्तच आहे हा भाग............