अस्तित्व

Submitted by मोहना on 4 September, 2014 - 17:26

"मी, मला या घरातून बाहेर पडायचं आहे. " कापलेल्या आवाजात उज्वलाच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.
"कोण बोलतंय? " पलीकडचा शांत आवाज ऐकून कोसळणारं रडू आतल्या आत जिरवताना उज्वलाला शब्द सुचत नव्हते.
"हॅलो, हॅलो... कोण बोलतंय? " धडधडत्या काळजाने उज्वलाने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतरही कुणीतरी हॅलो हॅलो करतंय असं तिला वाटत राहिलं. जिन्याच्या पायरीवर जाऊन ती तशीच बसून राहिली. पलीकडच्या त्या आवाजाने नंबर पाहून पुन्हा फोन केला तर? तेवढ्यात अमित आला तर? हातापायाला सुटलेली सूक्ष्म थरथर थांबेपर्यंत ती फोनकडे पाहत राहिली. आता फोन येणार नाही याची खात्री झाली तसा तिचा जीव शांत झाला. कितव्यांदा केलेलं हे धाडस होतं ते तिचं तिलाच आठवेना. पण त्यानंतर पुढे काहीच घडत नाही. कच खातं मन. आई म्हणायची, स्वावलंबी हो गं बाई. मग आपले निर्णय आपल्याला घेता येतात. स्वावलंबी असलं तरी आत्मविश्वास असतोच असं नाही, असला तरी तो ढासळतो प्रसंगांप्रसंगांनी हे का नाही तिने कधी सांगितलं? का तो आत्मविश्वास निर्माण करायला ती, बाबा दोघंही अपुरी पडली? प्रत्येक वेळेला आपण काहीतरी कारण शोधतो, दोष दुसर्‍यावर ढकलतो हे तिचं तिलाच जाणवलं. धडधडतं काळीज शांत होईपर्यंत आयुष्याची विस्कटलेली रांगोळी ती नीट करत राहिली, कुठला ठिपका कुठे होता ते आठवत राहिली.

अमित खोलीत आला तेव्हा ती वाचत होती. ही तिची नेहमीची सवय. डोळा लागेपर्यंत काही ना काही वाचत राहायचं. त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हटल्यावर पुस्तक मांडीवर ठेवत तिने त्याच्याकडे पाहिलं.
"तुझं आणि नरेशचं काय चालू आहे? " अकस्मात आलेल्या प्रश्नाने ती गोंधळलीच.
"अं..., नरेश? कोण नरेश? "
"तोच तुझ्या मैत्रिणीचा नवरा. "
"त्याचं माझं काय चालू असणार? " तिला संभाषणाचा रोख नक्की काय आहे तेच कळेना.
"तुला कळलं आहे मला काय म्हणायचं आहे ते. " अमितचा बदललेला आवाज, डोळ्यातले भाव पाहून ती चमकली.
"ईऽऽऽ, त्याचं आणि माझं काय चालू असणार अमित. चेष्टा करतोयस का? "
"काय चालू आहे ते सांग. "
त्याच्या स्वरातल्या तिटकार्‍याने तिच्या अंगावर शहारा आला.
"काही नाही. पण तू असं का विचारतोयस? "
उत्तर न देता तो तसाच बसून राहिला.
"तू असा कसा संशय घेतोस? इतका विश्वास नाही माझ्यावर तुझा? आणि हे काय खूळ काढलंस अचानक? " ती त्याला तोच प्रश्न परत परत विचारत राहिली. मनातला संताप शब्दात मांडत राहिली.
"तू उत्तर दिलंस ना, झालं तर मग. " तिचं जीव तोडून बाजू मांडणं त्याने कानाआड केलं. टी. व्ही. चं बटण दाबून कार्यक्रमात नजर गुंतवली. उज्वला नाईलाजाने शांत होत गेली. विचार करत राहिली.

अमितने नरेशचा संशय घेण्यासारखं काय घडलं? हे अचानक झालं की याच्या मनात आधीपासून...? गेली कितीतरी वर्ष ती दोघं नरेशला ओळखत होती. अधूनमधून सगळे भेटत, एकत्र बाहेर जात. कुठे ना कुठे भेटी चालूच असत. त्याच्या वागण्यात बोलण्यात तिला कुठे काही जाणवलं नव्हतं. त्यांच्याकडे जाणं येणं ठेवणं, मोकळेपणानं बोलणं किती अवघड होऊन जाईल आता. अमितने तर जाहीरच केलं होतं त्याच्यांशी काही संबंधच ठेवायचा नाही म्हणून. करता येतं असं?. काय सांगायचं हेमाला, नरेशच्या बायकोला? इतक्या दिवसांचे संबंध असे क्षणात कुणा एकाच्या लहरीपणापायी तोडूनच टाकायचे? उत्तर नव्हतंच. स्वत:च्या वागण्याची तिने चिरफाड केली. पण तसं काही मनात नसेल तर वागण्यात येण्याचा प्रश्नच नव्हता. मन आणि विचार पिंजून काढता काढता ती झोपेच्या अधीन झाली.

चुळबुळत अमितने कूस वळवली. पडल्या पडल्या तो चहाच्या भाड्यांचा, टी. व्ही. चा, उज्वलाच्या फोनवर बोलण्याच्या आवाजाचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होता. खिडकीतून डोळ्यावर येऊ पहाणार्‍या तिरिपेकडे पाठ वळवून तो तसाच पडून राहिला. खूप वेळ. कधीतरी पुन्हा त्याचा डोळाही लागला. जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. मनातलं मळभ दूर झालं होतं. पडल्या पडल्या तरीही कालची रात्र त्याला आठवत राहिली. काय झालं ते सुसंगतपणे आठवण्याच्या प्रयत्नात तो गढला.

रात्रीचे साडेदहा वाजले असतील. टी. व्ही. बंद करून मुलांच्या खोलीतले दिवे बंद झाल्याची खात्री केली अमितने. उज्वला सवयीप्रमाणे झोपण्यापूर्वी पलंगावर पडल्या पडल्या पुस्तक वाचत होती. तो तिच्या बाजूला जाऊन बसला. एकदा त्याच्याकडे नजर टाकून तिने पुस्तकात डोकं खुपसलं.
"तुझ्याशी बोलायचं होतं. "
"हं" तिने हातातलं पुस्तक मांडीवर ठेवून त्याच्याकडे पाहिलं.
"तुझं आणि नरेशचं काय चालू आहे? " प्रस्तावना न करता त्याने एकदम विचारलं. किती दिवस मनात घोळत असलेला प्रश्न त्याने शेवटी उज्वलाला विचारला. थोडी धाकधूक, भिती, बराचसा राग असं काही काही मनात साचलेलं स्वरात आलं. उज्वला गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली.
’नाटकी नुसती’ त्याच्या मनातला संताप तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहताना वाढत होता.
"नरेश? नरेश कोण? "
"तुझ्या मैत्रिणीचा नवरा. " तो तिच्या चेहर्‍याकडे निरखून पाहतं होता. थोडीशी गोंधळलीच ती. पण नंतर एकदम हसायलाच लागली.
"चेष्टा करतो आहेस का? "
"काय चालू आहे ते सांग आधी. " तिच्या हसण्याने त्याचा पारा चढला.
" काही नाही. " तिने ’काही नाही’ म्हटल्यावर तो तसाच बसून राहिला. त्या दोन शब्दांनी त्याच्या मनावरचा ताण नाहीसा झाला. गेले कितीतरी दिवस, महिने तो या विषयावरून तिला छेडायचं ठरवत होता पण धाडस झालं नव्हतं. आता मात्र तिच्या ’काही नाही’ या शब्दांनी तिला एकदम जवळ घ्यावं, मिठीत सामावून घ्यावंसं वाटलं. तो पुढे झाला. पण स्वत:च्याच नादात होती बहुधा ती. वेड्यासारखी, विश्वास नाही का? काय बोलतो आहेस हे तू असंच म्हणत राहिली. त्याला हसायलाच आलं, मळभ दूर झालं होतं त्यामुळे आता सांगून टाकलेलं बरं अशा थाटात म्हणाला,
"मी सांगतो तुला मला असं का वाटलं ते. " त्याला तो प्रसंग आत्ताच घडल्यासारखा वाटत होता.

कुठल्यातरी दुकानात नरेश भेटला होता. अमितशी काहीतरी बोलणं झालं आणि मग तो उज्वलाशी बोलत राहिला. तिच्या प्रश्नांना उत्तर देत राहिला. एकमेकांचा निरोप घेऊन खरेदी सुरू झाली आणि तेवढ्यात उज्वलाला काहीतरी आठवलं. ती परत नरेशशी बोलायला गेली. अमित निमूटपणे काय काय घ्यायचं ते पाहत होता, मध्येच त्याची नजर नरेश आणि उज्वलाकडे जात होती. हळूहळू त्याच्या मनात राग गर्दी करायला लागला. काय लहान मुलीसारखी हुरळते कुणाशीही बोलताना, हसणं म्हणजे तर खिदळणंच. नरेशशी बोलताना भानच विसरते. मनात रुजू पाहणारा विचार त्याने दूर ढकलायचा प्रयत्न केला खरा पण त्या दोघांकडे पाहताना नरेशलाही उज्वलाचा सहवास हवाहवासा वाटतो हेच त्याच्या मनाने घेतलं. हेमा आणि नरेशबरोबर गेली कितीतरी वर्ष असलेली मैत्री, भेटीगाठी सगळ्याला गढूळतेचा स्पर्श झाला. भूतकाळात जमा झालेल्या सुखद आठवणींवर संशयाचा पडदा मनाने अलगद पांघरला. मागचे कुठले ना कुठले प्रसंग आठवून तो त्याला पाहिजे तसे संदर्भ जोडत राहिला. मनात निर्माण झालेला कली कधी फोफावत गेला ते अमितच्याही लक्षात आलं नव्हतं.
आज उज्वलाने तसं काही नाही याचा दाखला दिल्यावर त्याला आता काहीही ऐकायचं नव्हतं. असं विचारणं चुकीचं, शंका येणं यात विश्वास दाखवला नाही अशासारखी विधानं त्याच्यादृष्टीने निरर्थक होती. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं. तो खूश होता. त्याला आठवड्यातून दोनच दिवस मिळणारे सुट्टीचे दिवस आता मस्त घालवायचे होते.

सोमवारी सकाळी तो बाहेर पडला तेव्हा मुकाट्याने उज्वलाने त्याचा डबा भरून ठेवला. हळूहळू मुलं उठून आपापलं आटपून जातील. तिलाही निघायचं होतंच. पण मनाला वेढून राहिलेला थकवा दूर होत नव्हता. शनिवार, रविवार ती घरात असून नसल्यासारखी वावरत होती. नवर्‍याच्या अतीव उत्साहावर पाणी ओतावं, मुलांसमोर त्याची वृत्ती उघडी पाडावी, स्वयंपाकघरात काम करताना हातात येईल ते धरून त्याच्या अंगावर फेकावं, काय काय वाटत राहिलं तिला. पण मनातला ज्वालामुखी बाहेर आलाच नाही. उगाच दोन दिवसाच्या सुट्टीवर विरजण नको, आत्ताच्या वादावरून पुढचे काही दिवस अबोला नको अशा विचारांनी ती त्याच्यांत असून नसल्यासारखी वावरत राहिली. कुणालाच काही खटकलं नाही. मुलं आपल्या नादात, नवरा संशय फिटल्याच्या मस्तीत... मुलं निघून गेल्यावरही ती तशीच बसून राहिली. अमित असा विचार करू शकतो हेच तिच्या कल्पनेपलीकडंच होतं. चेष्टेत, मजेत एकमेकांना चिडवणं निराळं आणि हे असं.... कुणाकडे बोलायचं? नवरा घरातली कामं करत नाही, चिडतो फार असं काहीतरी मैत्रिणींना सांगणं आणि संशय घेतो हे व्यक्त करणं यात जमीन अस्मानाइतकं अंतर, भावंडांना सांगायचं, आई वडिलांकडे जायचं परत, मुलांकडे बोलायचं की हे असलं काही झालं नव्हतंच अशी आपली आपणच समजूत घालून नेहमी सारखं वागायचं? रोजचे व्यवहार चालू ठेवायचे? अशा माणसाचा स्पर्शही नको असं वाटत असताना त्याची जवळीक सहन करायची, शरीरसुख द्यायचं, घ्यायचं. मुलांसमोर सारं काही आलबेल असल्याचा अभिनय करायचा. काय करायचं नक्की? किती दिवस? आणि पुन्हा असं होणार नाही, अमित कुणाबद्दल संशय घेणार नाही याची काय शाश्वती? हे तरी पहिल्यांदा कुठे घडत होतं. नको असणारे क्षण ती उगीचच चिवडत राहिली.

तिरमिरीत तिने पुन्हा ’आशा’ ला फोन लावला. पलीकडून उचलल्यावर न ठेवता थोडक्यात ती कोणत्या मन:स्थितीतून जाते आहे हे ही तिने सांगितलं. ’आशा’ च्या कार्यकर्तीने तिला संस्थेत येऊन भेटण्याचा सल्ला दिला. रोजच्या सारखी कार्यालयात जायचं म्हणून निघालेली ती सारं धैर्य एकवटून ’आशा’ च्या कार्यकर्तीसमोर बसली होती.
"पहिल्यांदाच होतं आहे का हे? "
ती गडबडली. म्हणजे पहिल्यांदाच असेल तर दुर्लक्ष करा असं सांगणार की काय ही पोरगेलशी स्त्री? तिच्या चेहर्‍यावरचा प्रश्न ओळखला कार्यकर्तीने.
"पहिल्यांदाच अशाकरता म्हटलं की आपल्या हातात वेळ आहे का याचा अंदाज येईल त्यामुळे. अशा परिस्थितीतून जाणार्‍या तुम्ही एकट्या नाही. तुम्हाला शक्य असेल तर इथल्या भेटी गाठी, चर्चासत्रांना या. तुमच्यासारख्या समस्या असणार्‍यांची ओळख होईल. स्वत:ला तपासून पाहता येईल. नक्की काय पाउलं उचलायची ते ठरवता येईल. मुलं असतील तर काही पर्याय आहेत का याचा अंदाज येईल. पासपोर्ट, जन्माचा दाखला सगळे कागदपत्र स्वत:जवळ ठेवा. "
"बरं. "
"खूपदा काय होतं रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेऊन मन मोकळं होतं. कधी कधी खूप सोसून झाल्यावर या दिशेने पाउलं वळतात. पण समदु:खी लोकांना इथे भेटलं की निवळतं मन. सापडतात मार्ग. " तिच्या आवाजातल्या गोडव्याने उज्वलाला ती खूप जवळची वाटली.
त्यानंतर उज्वला ’आशा’ मध्ये येत राहिली. एकेकाच्या कर्मकहाण्यांत गुंतत गेली. कधी कधी तर अमित बरा असं वाटायला लागलं आहे की काय अशी शंका चाटून जायची तिच्या मनाला. गरोदर असताना लाथा खाणारी रुही, डॉक्टर असूनही निर्णय स्वातंत्र्य नसलेली, जेमतेम जाण्यायेण्याचे पैसे स्वत:कडे बाळगू शकलेली वनिता, दिवसातून चार चार वेळा नवर्‍याबरोबर संभोग करायला लागणारी मीना, माहेरचे परत येऊ नको म्हणतात म्हणून मानसिक, शारीरिक छळ सहन करणारी नीता. ऐकताना नकळत मन तुलना करायला लागलं. छोट्याशा गोष्टीचा आपण बाऊ तर करत नाही ना, घर सोडायचा विचार करणं म्हणजे आततायीपणा तर होत नाही ना? प्रत्येक भेटीत एक एक भुंगा...

"गेले कितीतरी महिने तुम्ही इथल्या सर्वांना भेटता आहात. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र, रोख रक्कम असं ठेवलं आहे ना स्वत:जवळ? घर सोडायचाच निर्णय घेतलात तर या गोष्टी स्वत:जवळ असायलाच हव्यात. आणि एक चांगलं आहे की इतर कसला जाच नाही तुम्हाला. "
उज्वला एकटक त्या मुलीकडे पाहत राहिली.
"हो ना. इतर कसला जाच नाही मला. नवरा मारझोड करत नाही. खायला प्यायला देतो, कागदपत्र लपवून ठेवलेले नाहीत. चांगलंच आहे नं हे? तसा वाईट नाहीच तो. म्हणजे मी परपुरुषाकडे तशा नजरेने पाहते, मला दुसर्‍या पुरुषाचं आकर्षण वाटतंय असं वाटणार्‍या नवरा नावाच्या पुरुषाचा मला बाकी तसा कसलाच त्रास नाही. फक्त तो जेव्हा संभोगाच्या इच्छेने माझ्या देहाचे लाड करतो, अंगावरचे कपडे उतरवतो आणि पुर्‍या अंगाला भिडतो त्या त्या वेळेस कधीही इतर पुरुषाचा विचार नव्हता येत तो आता येतो. त्याने संशय घेतलेल्या पुरुषांची नावं आठवतात. वाटतं, अजून असेल का याच्या मनात संशय आणि मी का हात लावू देते आहे ह्याला माझ्या शरीराला. हा एवढा एक जाच सोडला तर तसा व्यवस्थित आहे माझा संसार. मुलांसमोर तमाशा नको म्हणून तोंड उघडायचं नाही, कुढत बसायचं म्हणजे काही विशेष नाही. संध्याकाळी घरी आलो की रात्री तो घोरायला लागेपर्यंत आज या माणसासमोर उघडं व्हावं लागणार की काय या शंकेने जीव घुसमटत राहतो. तसं न होता रात्र गेली की संपला एक दिवस यात समाधान मानायचं. जेव्हा तो शरीरसुखाच्या लालसेने कपडे उतरवतो तेव्हा याला संशय घेतलेल्या बायकोबरोबरच संभोग करायच्या कल्पनेने शिसारी येत नसेल का असा प्रश्न पडतो. रोज रात्री शेजारी शेजारी झोपायची कल्पनाच अंगावर काटा आणते. विलक्षण तिटकारा येतो, शिसारीच म्हणा ना. आणि तरीही म्हणायचं की तसा इतर जाच नाही कसला. बाकीच्या बायकांना काय काय सोसावं लागतं. " उज्वला समोरच्या टेबलावर थाडथाड डोकं आपटायला लागली. ’आशा’ ची कार्यकर्ती बावचळली.
"तुम्ही शांत व्हा आधी. माझ्या बोलण्याचा विपर्यास नका ना करू. शांत व्हा बरं. " बराचवेळ उज्वलाला ती थोपटत राहिली. तिच्या त्या थोपटण्याने मायेचा ओलावा जाणवल्यासारखी उज्वला सावरली.
"चुकलंच माझं. तुमच्या शब्दांनी तोल ढळला माझा. तुम्हाला असं काही म्हणायचं नव्हतं हे कळतंय मला. खरं सांगू का, बाकीच्यांच्या घरात काय काय घडतं ते ऐकून मलाही तेच वाटायला लागलं होतं, म्हणजे त्यातल्या त्यात माझं बरं चालू आहे असं. पण तुम्ही त्याला शब्दरूप दिलंत ते नाही पेलवलं मला. उगाच स्वत:ची समजूत घालण्यात काय अर्थ? मी जे बोलले ते मनाआड करा. स्वत:च्याच मनाची फसवणूक करत होते. " उद्ध्वस्त मनाने ती संस्थेतून बाहेर पडली. आपसूकच गाडीची चाकं घराच्या दिशेने वळली. रस्ता कधी संपूच नये अशी प्रार्थना करत ती बुजलेले व्रण मनाच्या सुरीने अलगद चिरत राहिली.

"तुझी लाज वाटते मला. "
"मी काय केलं? आणि तू काय माझा बाबा आहेस का? मुलांशी बोलतोस तसं नको बोलूस माझ्याशी. "
"अशी टक लावून बघत होतीस, त्यानेच नजर वळवली. "
"काय बोलतो आहेस हे? कुणाबद्दल बोलतोयस? "
"तोच. चेतन. "
"तुझा मित्र आहे तो. झाली त्याला भेटून दोन वर्ष. "
"तेव्हाचंच म्हणतोय मी. लाज वाटते मला तुझी. "
ती अवाक झाली. किती वर्षांनी पुन्हा भेटलेला मित्र. त्याच्या भेटीचा आनंद सोडून हे.... आणि इतक्या दिवसांनी सुचतं याला बोलायचं. तिला यातलं काहीच आठवत नव्हतं.
"दोन वर्ष लागली तुला माझी लाज वाटते हे सांगायला? "
"खात्री झाल्यावर बोलतोय. "
"वा रे वा, खात्री झाल्यावर बोलतोय म्हणे. दोन वर्ष काय खात्री करून घेत होतास? "
"कधी बोलायची संधी मिळाली नव्हती. " विषादाने हसत तिने मान डोलवली.
"तुला कशाला लाज वाटायला हवी. मलाच लाज वाटते तुझ्यासारख्या माणसाशी लग्न झालं म्हणून. " पुढे काही बोलण्याची इच्छाच उरली नाही तिला. घरात मूक शांतता नांदत राहिली. कितीतरी दिवस. काय फरक पडला, आणि कुणाला?

दोन तीन आठवडे अबोल्यात गेले. मुलांना काही जाणवू नये याची तिने पुरेपूर काळजी घेतली. सगळी छिद्र बुजवायची ती आपणच. या माणसाला कशाचा काही फरक खरंच पडतो का? रात्री एकमेकांकडे पाठ करून झोपलं तरी खर्‍या अर्थाने अशी पाठ वळवता कुठे येते? आणि किती दिवस? त्या दिवशी अमितने रात्री जवळ ओढलं आणि अपमान गिळून ती मुकाटपणे त्याच्या मिठीत शिरली. ही हतबलता होती, अबोल्यातून आलेला एकटेपणा पुसून टाकण्याची घाई होती की त्यातून आलेली शरणागती की फक्त शरीराची गरज? मनाचा आणि शरीराचा संबंध असा नाईलाजाने झुगारून द्यावा लागतो का तो तसा नसतोच? काय काय विचार मनात येऊन जात असं काही झालं की. अमितच्या मनात येत असतील का असे विचार, की पुरुष वेगळाच असतो?

पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं. मनावर एकामागून एक ओरखडे उठत होते. एक ओरखडा बुजतो आहे तोपर्यंत दुसरा तयार. मनाच्या कोवळ्या पडद्यावर ओरखड्यांची दाटी झाली होती, एकेक चूण दडवण्यात मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च होत होती. असं संशय घेणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण नाही हे मानणं किती हास्यास्पद आहे हे अमितने दाखवून दिलंच होतं. आणि तरीही बाकीच्यांच्या तुलनेत आपला संसार बरा असं समाधान मानायचं मनात यावं? गाडीचा ब्रेक दाबता दाबता तिच्या विचारांनाही खीळ पडली. दिवा हिरवा झाला आणि गाडीच्याच वेगाने तिचं मनही धावायला लागलं.

अमितशी लग्न होऊन थोडी थोडकी नाहीत तर आता जवळ जवळ पंधरा वर्ष होऊन गेली होती. सर्वसामान्यांच्या संसारात येतात तसे चढ उतार त्यांच्याही संसारात येत गेलेच. तसं बरं चाललं आहे असं वाटत असतानाच नक्की कधी बिनसायला सुरुवात झाली हे कळलंच नव्हतं. कळलं नव्हतं की कळून न कळल्यासारखं चाललं होतं इतकी वर्ष? आतापर्यंत या विचाराला तिने जवळ फिरकू दिलं नव्हतं. म्हणजे असे काही विचार मनात डोकावायला लागले की मेंदू बधिर व्हायचा. काही म्हटल्या काही आठवायचंच नाही.
सुरुवात अशी झाली असेल का?
"तुझा मुलगा अगदी तुझ्यासारखा दिसतो. " उज्वलाला कौतुकाने असं कुणी म्हटलं की त्याच्या कपाळावर नकळत उमटलेली आठी त्यालाही सुरुवातीला जाणवलीच नव्हती का? की
"बायको छान आहे तुझी. "
"उज्वलाचं रंग रूप घेतलंय मुलांनी. "
या आणि अशासारख्या वाक्यांनी न्यूनगंडाचं रोपटं लावलं गेलं असेल अमितच्या मनात, काहीही कारण नसताना? सावळ्या रंगाचा, उंच अमित आकर्षक होताच की. कितीतरी वेळा अमितवर गेली आहेत मुलं असंही सगळेजण म्हणायचेही. तेवढं पुरेसं नव्हतं की हा असा स्वभावच म्हणायचा? हे संशय घेणं का सुरू झालं? माणसाच्या मनात असा कली शिरला की त्यापुढे सगळं क्षुद्र असतं, जोडीदाराच्या भावना, स्वत:च्या मनाचा संकुचितपणा हे असले विचार येतंच नाहीत इतका छोटा होतो का माणूस? एकदा खात्री करून झाल्यावर, शाश्वती मिळाल्यावर पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर पाऊल टाकताना स्वत:बरोबर दुसर्‍याचंही मन रक्तबंबाळ करतोय हे समजतंच नाही का? अगदी हेच तो मुलांबरोबरही करतो. कुणावर विश्वास म्हणून नाही. साहिल काही आता लहान नाही. त्याने बोलून दाखवलंच होतं, अमित आजूबाजूला नसल्याची खात्री करून.
"बाबा, कुणावर विश्वासच ठेवत नाही. "
"असं का म्हणतोस? " धडधडत्या काळजाने तिने विचारलं. इतका खटाटोप करूनही मुलांना कळत असेल का घरात काय चाललं ते?
"कितीही जीव तोडून सांगितलं तरी त्याला कायम मी काहीतरी दडवतो आहे असंच वाटत राहतं. हजार प्रश्न. राग येतो मला. "
साहीलच्या बाजूला समीर होताच,
"तरी दादा तडकून बोलतो त्यामुळे मी सापडलो आहे तावडीत. तू हायस्कूलला आहेस. सिगरेट ओढतोस का? दारू पितोस का? असेच प्रश्न कायम. नाही सांगितलं तर पटतच नाही. "
"स्वभाव म्हणायचा. तुम्ही तर मुलं आहात पोटची. मलाही यातून जावं लागतं त्यातच काय ते समज. " नकळत ती बोलून गेली.
"आम्हाला नको ना सांगूस आई. ऐकायला सुद्धा शरम वाटते. " तिला आपली चूक कळून आली. इतके दिवस ठिगळ लावलेलं वस्त्र लपविण्याचं काम चोख बजावल्याच्या समाधानात होती ती. पण नीटसं कळत नसलं तरी मुलांना अंदाज असतोच की. तिला त्याला सांगावंसं वाटत होतं.
’बाबांनो, तुमच्यासाठी, तुम्हा दोघा मुलांसाठी विरलेला धागा तुटू देत न देण्याचा प्रयत्न करतेय रे. एकदा तुम्ही मोठे झालात की मी मोकळी. ’ पण खरं होतं का हे? मुलाचं निमित्त, म्हणजे मनाचा एक कोपरा त्याच्यांसाठी तुटत राहणारच पण अनिश्चित भवितव्यात उडी मारायची भिती हेच मुख्य कारण नव्हतं का? मुलं स्वत:च्या पायावर उभी राहिली तरी खरंच ती मोकळी करणार होती का स्वत:ला हे तिचं तिलाही ठरवता येईना. मनातल्या विचारांची कबुली स्वत:कडे देणंही तिला जड जात होतं. संभाषण अर्ध्यावर टाकून ती उठलीच तिथून.

संध्याकाळी मनोजचा फोन आला. तिने उचलला. गप्पा झाल्या. मनोज अमितच्या कंपनीतला जुना मित्र. भारत सोडल्यावर तसा काही संबंध राहिला नव्हता. पण तोही कॅनडात आला आणि त्याचे अधूनमधून फोन यायला लागले. अमित सुरुवाती सुरुवातीला संवाद साधायचा प्रयत्न करायचा. पण तसा तो मितभाषीच. उज्वलाला गप्पा मारायला फारशी ओळख लागत नाही हे बघितल्यावर त्याने ते खातं तिच्याकडेच सोपवलं. मनोज गप्पिष्ट, विनोदी. आत्ताही तिने फोन ठेवला तितक्यात अमित म्हणालाच,
"किती बोलतेस तू त्या मनोजशी. "
"तू बोलायचं टाळतोस. तुझ्याऐवजी मीच बोलते. कसला विनोदी बोलतो मनोज. "
"अर्धा तास! केवढ्याने हसतेस आणि. " उज्वलाला संभाषणाचा अंत काय होणार हे लक्षात आलं. ती काहीच बोलली नाही. आजूबाजूला मुलं होती ते लक्षात घेऊन तोही गप्प राहिला पण रात्री त्याने विषय काढलाच.
"मला नाही आवडत तू मनोजशी बोललेलं. "
"आजचा तिसरा फोन होता. त्याने निरोप ठेवला तरी आपण पुन्हा करत नाही. "
"हं... "
"मला नाही असं जमत. इतकं असेल तर तू घेत जा ना फोन. "
"ते मी बघेन. पण तू त्याच्याशी बोलू नकोस. "
"काय मिळतं तुला संशय घेऊन अमित? "
अमित गप्पच राहिला. तिने पुन्हा तेच विचारलं.
"संशय नाही. मला जे दिसतं ते बोलतो. "
"वा, धन्य आहे तुझी. नरेश झाला, चेतन झाला, मनोज वर गाडी आली. आता लवकरच कुणीतरी नवीन येईलच तुझ्या यादीत. " उज्जवलाने कडवट स्वरात म्हटलं तसा त्याचा तोल गेला. पुढे होत त्याने उज्वलाच्या थोबाडीत दिली. लाल झालेल्या गालावर हात चोळण्याचं भानही उज्वलाला राहिलं नाही. अविश्वासाने ती त्याच्याकडे पाहत राहिली. तो ही तसाच बसून राहिला. चुकलं म्हणावं वाटत होतं, पण जीभ रेटत नव्हती. स्वाभिमान आडवा येत होता.
हिय्या करून तिला जवळ घेण्यासाठी त्याने तिचा हात धरला पण उज्वलाने तो झिडकारून लावला.

अजून झोपली आहे उज्वला की फिरायला गेली एकटीच? उठलाच तो. मुलांच्या खोलीत डोकावून, गडबडीने हाका मारत स्वयंपाकघरापाशी आला. सगळं शांत होतं. त्याची नजर टेबलाकडे वळली. झोपमोड न करता कुठे जायचं असेल तर उज्वला चार ओळी लिहून टेबलावर ठेवायची.
’हं..., घरात नाही असं दिसतंय. ’ पुटपुटत त्याने कागद उचलला,
"मी बाहेर जातेय. कधी येईन माहीत नाही. मुलांना मी फोन करून सांगेन. " म्हणजे? तिने काय लिहिलं आहे हे अमितच्या पटकन लक्षात येईना. लक्षात आलं आणि त्याच्या शरीरभर पसरलेला आळस एकदम दूर झाला, रात्री घडलेला प्रकार त्याला आठवला.
"शीट" हातातला कागद चुरगळत त्याने त्याचे तुकडे तुकडे केले. तुकड्यांचा बोळा भिरकावून दिला. कालची रात्र. कधी नव्हे ती त्याला स्वत:ची शरम वाटली. हात उचलला उज्वलावर. नाईलाजच झाला तिचा उद्धटपणा ऐकून, पण तरीही असं नको होतं व्हायला. बोलून मोकळं होणं वेगळं आणि असं हात उगारणं. चुकलं म्हणायला हवं होतं तेव्हाच. आता हे नवीन काय, ती अशी कुठे निघून जाईल ही कल्पना तर त्याच्या मनाला शिवलीही नव्हती. घाईघाईत त्याने फोन लावला पण रिंग नुसतीच वाजत राहिली. दोन तीनदा त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि तो वैतागला, त्याच्या रागाचा पारा चढला.
"गेली उडत, नाही आली परत तरी चालेल. " दात ओठ खात त्याने फोन आपटला.

करकचून ब्रेक दाबत उज्वलाने गाडी थांबवली. तिचा श्वास एकाएकी कोंडायला लागला होता. गाडीतच थांबलं तर गुदमरून जीव जाईल या भितीने रस्त्याच्या कडेला तिने गाडी थांबवली. धपापत्या उराने ती खाली उतरली. गाडीच्या दाराला टेकून उभं राहत तिने आजूबाजूला पाहिलं आणि तिला हमसून हमसून रडायला यायला लागलं. तशाही परिस्थितीत अनोळखी माणसांनी हटकायला नको याचं भान होतंच. पसरलेल्या माळरानाकडे तिची पावलं वळली. कुठेतरी पाठ टेकावी असं वाटत होतं, पण सगळीकडे मातकट रंगाचं खुरटं गवत आणि विखुरलेली बारीक बारीक खडी. ती तशीच खाली बसली. भरदुपारी त्या उघड्या माळावर कुणी तरी गेल्यासारखं हंबरडा फोडून रडली. खुरट्या गवतावर डोकं आपटत ती तिथेच आडवी झाली. मातीचा तो खडबडीत स्पर्शही तिला आपलासा वाटला. आता इथून परतूच नये असं वाटण्याइतका. हाताचा आडोसा करत डोळ्यांवर येणा‍‍र्‍या रणरणत्या ऊनाला तिने दूर ढकललं. कितीतरी वेळ ती तशीच पडून राहिली. काहीतरी चाळा म्हणून डोळ्यांवरचे हात काढून ती आपल्याच हातांना न्याहाळत राहिली. पण नजर नुसतीच हातावरून फिरत होती. ताब्यात न येऊ पहाणार्‍या मनासारखी. गेले दोन तीन तास ती गाडी चालवत होती. कुठे जायचं ठाऊक नव्हतं, काय करायचं कल्पना नव्हती. तिला त्या घरातून बाहेर पडायचं होतं. गुदमरवून टाकणार्‍या आयुष्यापासून पळ काढायचा होता, निदान काही वेळ. काही क्षण, जमलं तर कायमचा...
असं मोकळ्यावर अंग टाकून दिल्यावर तिला सुटल्यासारखं वाटत होतं. तिची नजर वर पसरलेल्या निळ्याशार ढगात गुंतून गेली, निरर्थकपणे. तितक्याच अर्थहीनतेने शिक्षा दिल्यासारखी ती नकोशा प्रसंगातून स्वत:ला चिणून घेत राहिली, काहीबाही आठवत राहिली. पुन्हा पुन्हा.

पर्समधला सेलफोन वाजला आणि तिच्या विचारांची साखळी तुटली. साहिलचा, तिच्या मोठ्या मुलाचा फोन होता,
"कुठे आहेस आई तू? "
"अं? " इतका वेळ आपण रस्त्याच्या कडेला, उघड्या माळावर आहोत ह्याचंही भान राहिलं नव्हतं तिला.
"बाबा म्हणाला की तू संध्याकाळपर्यंत नाही येणार. काय करते आहेस? "
"मैत्रिणीकडे आहे. तिचा फोन आला होता म्हणून आले आहे. तुम्ही सगळे झोपला होता नं त्यामुळे सांगता नाही आलं. समीरला पण सांग. घरी आले की सांगते सविस्तर. " खोटं बोलताना तिचा जीव एवढा एवढा होत होता, पण झटकन काही सुचलंच नव्हतं. निदान आता संध्याकाळ पर्यंत चिंता नव्हती. हातातलं घड्याळ तीन वाजून गेलेलं दाखवत होतं, पोटात भुकेने कावळे कावकाव करत होते पण तिथून उठावंसं वाटत नव्हतं.

अमितने स्वत:चा जीव बागेत रमवला. सकाळी गेलेली उज्वला दुपारपर्यंत परत येईल असं वाटत होतं. पण त्याचा फोन ती उचलत नव्हती. साहिलला म्हणाली मैत्रिणीकडे गेली आहे. पण ज्याअर्थी फोन उचलत नाही त्या अर्थी तिचा रागच दाखवते आहे. ठीक आहे. सरळ विचारलं तर इतका राग येतो. गेली मसणात. आणि जाऊन जाऊन जाणार कुठे. रागाच्या भरात कामं आटपेल आणि येईल. पण आलीच नाही तर? खड्डा खणता खणता अमितचा हात थबकला. विचारातल्या गांभीर्याने तो हबकला. हे असं पहिल्यांदाच होत होतं. म्हणजे, वाद, रुसवा फुगवी चालू असायचं, पण असं घर सोडून निघून जाणं, तेही सुट्टीच्या दिवशी. शक्यच नव्हतं. मुलांसमोर उज्वला त्या दोघांमधल्या मतभेदाचा सुगावाही लागू द्यायची नाही. पण आज ह्या सगळ्याला न जुमानता ती बाहेर पडली आहे. मुलांना काय सांगायचं. राहता येईल तिच्याशिवाय? काय करेल ती. नोकरी आहे म्हणजे इथेच राहावं लागेल. मुलाचं काय? का जाईल भारतात परत? का हे सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत? संध्याकाळपर्यंत येईल, परत जाणार कुठे? तो स्वत:लाच बजावत राहिला. पण इतकं टोक गाठायला काय झालं? स्वत:चं वागणं तपासून पाहत नाही आणि मग हे नखरे.

बाजूला पडलेली पाण्याची बाटली उज्वलाने तोंडाला लावली. साहिल आणि समीरच्या आठवणीने जीव कासावीस व्हायला लागला. तिने आलेले फोन पुन्हा पुन्हा पाहिले. साहिलशी बोलणं झाल्यावर पुन्हा फोन नव्हता. तिने न राहवून समीरला फोन केला. तो मित्राकडे गेलेला होता. उज्वला दिवसभर घरात नाही हे तो विसरलाच होता. साहिलने तर तू घरातली काळजी करू नको असं आर्वजून सांगितलं. ती आज आली नाही तर पिझ्झा मागवणार होते तिघं. तिने फोन बंद केला. काय करावं याचा निर्णय उज्वलाला घेता येईना. तिडीक आल्यासारखी ती निघून आली होती, आता काय? पावलांना घरी परतावंसं वाटत होतं. पण आजचं टाकलेलं पाऊल निर्वाणीचं नव्हतं का? कधी कधी तिला वाटायचं ’आशा’ च्या लोकांना माहीत आहेना मी कोणत्या परिस्थितीला तोंड देते आहे. मग का नाही माझ्या घरी येत, अमितशी बोलत ते? का नाही मला सांगत तुझं सामान घेऊन निघून ये इथून. आम्ही आहोतच्या आश्वासनाचा हात पाठीवर पडतो तो कृतीतून का नाही करत ही लोकं. एकदा मनातला प्रश्न ओठावर आलाच.
"ती बळजोरी झाली. मग जे तुमच्या घरात चालू आहे तेच आम्ही केलं असं नाही का झालं? तुम्हाला वाटायला हवं की या परिस्थितीतून बाहेर पडायला हवं. तुम्ही एकदा निर्णय घेतलात की सर्वसामर्थ्यानिशी ’आशा’ उभी राहील तुमच्या पाठीशी पण तुमच्यासाठी आम्ही निर्णय नाही घेऊ शकत. सुरुवातीला कितीवेळा फोन करून तुम्ही ठेवत होता. पण तरीही आम्ही फोन नाही करू शकलो तुम्हाला. त्याचं कारण हेच. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचे बरेवाईट परिणाम असणारच तेव्हा आहोत आम्ही तुमच्या सोबतीला, मदतीला. "

काहीतरी ठाम निर्णय घ्यायला हवा होता. एकटीने? इतकं सोपं असतं ते? स्वत: निर्णय घेतला की त्याच्या परिणामांना पण आपणच जबाबदार. निर्णय घ्यायचा म्हणजे काय करायचं? सोडायचं नवर्‍याला? जायचं ’आशा’ मध्ये? उज्वलाला ठरवता येईना. पुन्हा तिचं मन कच खायला लागलं. आजचं टाकलेलं पाऊल, घराच्या बाहेर काढलेला दिवस.... अमितच्या लक्षात आलं असणारच. जायचं पराभूत मनाने पुन्हा? करायची ही तडजोड? मुलांसाठी की खरं तर स्वत:साठीच? हाताने जमिनीवर जोर देत ती उठली. गाडीच्या दिशेने वळली.

काळोख चारी अंगांनी गाडीत घुसला तसा तिचा जीव घुसमटला. पुन्हा परतीचा मार्ग. कुठेही जायचं तरी तिला या उघड्या मैदानातून बाहेर पडावं लागणार होतं. दोन तीन तास प्रवास करून ’आशा’ की ’घर’ या प्रश्नात ती घुटमळत राहिली. गाडी थांबली तेव्हा लक्षात आलं आपसूकच घरासमोर गाडी उभी राहिली होती. गाडीच्या काचेतून उज्वला घरातल्या हालचाली निरखीत राहिली. बराचवेळ. निर्णायक क्षण बाजूला उभा होता. उज्वलाचं मन दोलायमान झालं. त्या क्षणात हात गुंफायला मागेपुढे करायला लागलं. कमकुवत मनाने बाजी मारली आणि तिची पावलं घराच्या दिशेने वळली...

वरील शेवट वास्तव शेवट आहे.

आदर्श शेवट :- ...निर्णायक क्षण बाजूला उभा होता. उज्वलाने त्याच्या हातात हात गुंफायचा निर्णय अखेर घेतला. बाजूची पर्स उचलून शांतपणे तिने ’आशा’ चा नंबर फिरवला आणि संथपणे आपली गाडी घराच्या रस्त्यावरून ’आशा’ कडे वळवली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

ओघवती शैली आहे तुझी मोहना!
छान लिहिली आहेस कथा . उज्वला ची घालमेल पोहोचली .

आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी प्रत्येकाची.
दिनेश - केली सुधारणा. धन्यवाद.
पेरु - ’जुलै’ च्या ’माहेर’ मासिकात प्रसिध्द झाली आणि माझ्या ब्लॉगवर (http://mohanaprabhudesai.blogspot.com/) आहे.

मोहना, केवळ अप्रतिम. खरच खूप छान जमलिये कथा.
संशयखोर मनोवृत्तीचा नवरा, मुलांसाठी सोसणारी बाई...

अत्यंत ओघवती शैली.

दाद प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद. उज्वला मुलांसाठी तर सोसतेच पण धैर्य आणि आत्मविश्वासाचा अभाव ही कारणंही आहेतच.

छान लिहिली आहेस कथा. ओघवती आहे आणि प्रातिनिधिक तर आहेच.

धैर्य आणि आत्मविश्वासाचा अभाव ही कारणंही आहेतच.>> हम्म्!!

खूप छान लिहिलय.

उज्ज्वला आशाकडे गेली हे खूप चांगले. अनेकींना काय करायचे काही सुचत नाहीत. त्या सहन करत खरतर भोगत राहतात. पण नवरा सतत संशय घेतो, बायकोवरच नव्हे तर मुलांवरही घेतो म्हणजे त्याच्या विचारप्रणालीत काही बिघाड असेल असे आशाच्या कार्यकर्त्यांना वाटत नाही का? त्याला काउन्सेलिंग किंवा औषधोपचार मिळाल्यास हा त्रास कमी होईल ना? कथेत ह्या अनुषंगानेही विचार यायला हवा असे मला वाटते. कारण आपण ह्या अशा कथा वाचतो कधी विसरूनही जातो पण ह्या कथा आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि त्यातूनच ऊज्वलासारख्या स्त्रिया धाडस करून काही पावलं उचलू शकतात.

मोहना, छान आणि ओघवती शैली आहे तुमची! उज्वलाच्या मनाची घालमेल आणि अमितच्या डोक्यातला संशयाचा किडा छान मांडलाय. सामान्यपणे जसं घडु शकेल, तसंच मांडलय. प्रश्न छान मांडलाय सोबतच त्यावरचं उत्तरपण मांडल असतंत, तर कथा के-२ वरुन एव्हरेस्ट वर पोहोचली असती... असती काय्...याचा उत्तरार्ध लिहायच मनावर घ्या आणि कथेला एव्हरेस्टवर पोहोचवा, हि विनंती.

धन्यवाद सर्वांना.

रांचो/ preetiiii - शेवट मी देखील आशावादी केला होता. पण माहेरला दोन्ही शेवट पाठवल्यावर त्यांनी वास्तववादी शेवट ठेवायची विनंती केली.

वेल - उज्वलाच्या दॄष्टीने ’आशा’ मध्ये ती जाते हेच खूप आहे. मुळात अमितला आपण काही चुकीचं वागतोय हेच मान्य नाही/कळत नाही त्यामुळे कौन्सिलिंगला वगैरे जाणं या गोष्टी घडणं अशक्यच. ’आशा’ सारख्या संस्था उज्वलासारख्या व्यक्तिंनी काय पावलं उचलावी ते सुचवतात पण पुढाकार तिनेच घ्यायला हवा. ते धाडस, आत्मविश्वास तिच्यात नाही. स्वावलंबी असली तरी पडखाऊ स्वभावाची माणसं पेटून उठत नाहीत आणि आपल्या निर्णयाने आपल्या आयुष्यात काय फरक घडेल यापेक्षा इतरांच्या वाट्याला त्यामुळे काय दु:ख येईल याचा विचार जास्त करतात. आणि अशा असंख्य उज्वला आपल्या अवती भोवती नक्कीच आहेत.

Pages