आता कशाला शिजायची बात- पौर्णिमा- हाय फाईव्ह!

Submitted by पूनम on 3 September, 2014 - 02:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) सुके खोबरे- २ वाट्या
२) खारिक पूड- पाऊण वाटी
३) खडीसाखर- थोडी खलून- अर्धी वाटी (ओबडधोबड लागली पाहिजे)
४) बिया काढून चिरलेला खजूर- एक वाटी
५) खसखस- पाव वाटी
६) पातळ केलेले साजूक तूप- पाव वाटी

वाटी- नेहेमीची आमटीची. साधारण माप १२५ ग्रॅम्स

क्रमवार पाककृती: 

गणपती बाप्पाचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा आणि दर वर्षी उकडीच्या मोदकांप्रमाणे साधारणपणे एकदाच केलेला पारंपरिक नैवेद्य म्हणजे 'पंचखाद्य'. या पंचखाद्याचे घटक म्हणजे खोबरं, खारीक, खसखस, खडीसाखर आणि खिसमिस.
या घटकांमधून खिसमिस वगळून त्याऐवजी त्यात अजून एका 'ख'ची भर घातली- ती म्हणजे खजूर.

वर दिलेले सर्व पदार्थ एकत्र करायचे आणि पातळ केलेले तूप ओतत (!), मिश्रण एकत्र करत लाडू वळायचे! Happy लाडू रव्या-बेसनाच्या लाडवांपेक्षा जरा छोटेच बांधायचे.

या लाडूंमधले सर्व घटक पौष्टिक आहेत आणि तत्काळ ऊर्जा देणारेही आहेत. म्हणून यांचं नाव- 'हाय फाईव्ह'

माझ्या लेकाने त्यांचं नामकरण 'ख-लाडू' असेही केले आहे Happy

kha ladu.jpg

वाढणी/प्रमाण: 
१५ छोटे लाडू
अधिक टिपा: 

१) तूप अंदाजे घालायचे आहे. लाडू वळताना सुक्या खोबर्‍याला तेल सुटत जाते, त्यामुळे कमी-जास्त लागू शकते.

२) सुगरण लेव्हल तीन आणि त्यापुढे असाल, तर लाडू वळताना मध्ये एक खडीसाखरेचा खडा ठेवून मग लाडू बांधावा. लाडू खाताना ही सर्प्राईज खडीसाखर लाडूचा गोडवा वाढवते आणि खवय्यांचा आनंदही.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु रेसिपी आहे ही अगदी ! फोटोही मस्त Happy
घरात खजूर नाहीये सध्या. तो आणला की नक्की करणार मी.

तुझं उत्तर यायला आता चोवीस मिनिटं उरलेली आहेत Wink

पोतै, मस्त. पुढच्या गटगला नक्की आणा.
आम्ही मायनस मधे बर का. पण तरी एक आगाउ सजेशन. डिंक पण घाला. मधे आमच्या भगिनींनी (आमच्या ह्यांच्या मते भगिनी +१०) केले होते

मस्त. आमच्या शेजारी नेहमी ख ची खिरापत असते आणि मी दरवेळी ख चे पाच काय घटक आहेत हेही विसरते. मेलं ते खिसमिस लक्षातच राहात नहई. मी किसमिस म्हणते म्हणुन.

पण हे हाय फाईव खुप आवडातात मला. येता जाता खायला बरे.. मी खडीसाखर वगळून करेन. खजुर आणि खारिक इतका गोडवा पुरेसा आहे.

वॉव, मस्त आहेत गं लाडू. आणि नक्की जमण्यातले आहेत (हे महत्वाचं)
आजच घरी जाताना खजुर नेण्यात येईल.. खुपच थँक्स Happy

अर्र, रारोबद्दल विसरलेच.. Biggrin

संपदा आणि आशूला दोन दोन लाडू बक्षिस! रारोचे बरेच (बहुतेक सगळेच) सिनेमे 'के' पासून सुरू होतात आणि या लाडवांमधलेही सर्व पदार्थ इंग्रजी के ने.. म्हणून! Wink

विकीकाका, डिंकाची अ‍ॅडिशन मस्त आहे. नक्की करून बघेन. थँक्स! Happy

लोक्स, धन्यवाद... तुम्ही करा आणि त्यांचे फोटोही येऊद्या..

झकास! Happy

छान आहेत लाडू .. Happy ह्या स्पर्धेच्या नियमांत बसत नाही पण खोबरं परतून घेतलं तर खमंगपणा वाढेल का?

हो सशल, किसलेलं खोबरं आणि खसखस दोन्ही खमंग भाजून (तेच ते, गुलाबीसर भाजून ;)) घेतलं तर चव आणखी मस्त लागेल.

Pages