Submitted by हर्ट on 31 August, 2014 - 02:33
तुम्हाला आवडलेली कुठल्याही भाषेतील दहा पुस्तकांची नावे इथे लिहायची आहेत. हे असे लिहिता लिहिता साधारणः
१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
ह्याबद्दल लिहू शकता.
इथे तुम्हाला "खो" मिळालाच पाहिजे असे नाही. कधी कधी आपण मित्रांच्या यादीत नसतो म्हणून आपल्याला खो मिळत नाही :(. पण म्हणून इथे लिहायचे नाही असे नाही. तुम्हाला आवडलेली दहा पुस्तके ह्याबद्दल इथे कुणीही लिहू शकतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टण्या ही तु वाचलेली की न
टण्या ही तु वाचलेली की न वाचलेली पुस्तके आहेत..:-)
माझी आवडती
१. अपुर्वाई व इतर - पु.ल.
२. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग. कानिटकर
३. पानीपत, नेताजी - विश्वास पाटिल
४. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
५. पुणेरी - श्री. ज. जोशी
६. सत्तांध - अरुण साधु
७. मी आणि माझा बाप - नरेंद्र जाधव
८. अरविंद गोखल्यांचे कथा संग्रह
९. हा तेल नावाचा इतिहास आहे , एका तेलियाने - गिरीश कुबेर
१०. बनगरवाडी, सत्तांतर etc - व्यंकटेश माडगुळकर
११. मातृका - पु. शि. रेगे
मातृका >> रेग्यांचे लोकांना
मातृका >> रेग्यांचे लोकांना फारसे न आवडणारे पुस्तक, फारच सुरेख. काहितरी वेगळेच आहे ते.
मी परत परत वाचतो अशा पहिल्या
मी परत परत वाचतो अशा पहिल्या दहा पुस्तकांची यादी:
१. युगान्त - इरावती कर्वे - नीरजाने म्हटल्याप्रमाणे वेळोवेळी परत परत वाचलेले पुस्तक. कधी सुरूवातीपासून तर कधी मधेच सुरू करून. बाईंच्या महाभारतातल्या पात्रांकडे बघण्याच्या द्रुष्टीकोनातून दर वेळी बरेच काहि शिकायला मिळते/मिळालेय.
२. काजळमाया - G.A. दर वेळी काहितरी नवे गवसत जाते, नवे काहितरी जाणवत जाते, उमगत जाते. हे जन्मभराचे गारुड आहे.
३. देनिसच्या गोष्टी : victor dragunski. लहान असताना रशियन पुस्तकांच्या प्रदर्शानातून घेतलेले, लहान मुलांच्या नजरेने मोठ्यांनी लिहिलेले, मी वाचलेले पहिले पुस्तक. कम्युनिस्ट सोवियत युनियनच्या काळातल्या ८-१० वर्षाच्या मुलाचे भावविश्व. त्याची जादू अजूनही तितकीच टिकून आहे. 'कुठे असे ऐकलय, कुठे असे पाहिलय', 'वरून खाली, खालून वर' अशा निरर्थक वाक्यरचना अजूनही तेव्हढ्याच हसायला भाग पाडतात. (अमेरिकेमधे आल्यावर ऑफिसमधे एका रशियनशी ह्या पुस्तकाच्या जोरावर जानी दोस्ती झाली
)
४. हाजार चुरासीर मा : महाश्वेता देवी. एका आईची गोष्ट जिचा मारला गेलेला नक्शलवादी मुलगा, ज्याचा प्रेताचा नंबर होता १०८४. आईला उमगत गेलेला मुलगा नि तिने त्याची विचारसरणी justify करणे ह्या वर लिहिलेली छोटिशी कादंबरी. बरेच प्रश्न पाडत जाते नि बर्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम तुमच्यावर थोपवत जाते.
५. Jurrasic Park : Michael Crichton : फोर्टमधल्या फूटपाथवरून उचलेले पुस्तक, techno thriller ह्या एका नवीन विश्वात मला घेऊन गेले. अशा पुस्तकांचे वेड लावण्याचे काम यथास्थित करून गेले. सिनेमा सिनेमाच्या जागी भव्य दिव्य असला तरी केऑस थियरीला अजिबात न्याय देत नाही.
६. Bourne Identity : Robert Ludlum : हार्डी बॉईज, कॉमिक्स वगैरेच्या जगातून बाहेर काढून thrillers चे वेड लावण्याचे काम ह्या पुस्तकाने केले. दहावी मधे असताना बिल्डिंगमधे पाण्याच्या टाकीकर सापडलेले. कोणाचे ते शोधायचे ते नंतर बघून म्हणत सहज चाळायला घेतले नि दोन दिवस दिवस रात्र एक करत संपवलेले.
७. असा मी असामी : पुलं . ह्यातल्या विनोदापेक्षा पुलंनी माणसाच्या स्वभावाबद्दल जे काही पकडलेय ते मला अधिक आवडते. सुरूवातीच्या वाचनात जाणवलेला विनोद शिळा झाल्यावर हा खालचा जाणवलेला पापुद्रा अधिक मस्त वाटतो.
८. लटकंती : सु.शी. : भूतांचा राजा वेताळाला माणसाने झपाटल्याने त्या जगात होणारी प्रचंड उलथापालथ हा concept मला भयंकर आवडला. ठसकेबाज लिखाण हा सु.शि.चा हातखंडा प्रकार आहे पण अतिशय farcical विनोद कधीही वाचायला मस्त वाटतो.
९. शपथ : नारायण धारप : धारपांची मी वाचलेली पहिली कादंबरी. त्या पुस्तकाने मला त्या सुट्टीमधे मुंबई मराठी नि ब्रुह्नमुंबई महापालिकेच्या ग्रंथालयातली एकूण एक धारपांची पुस्तके मी सलग वाचायला भाग पाडले होते. आजही संपूर्ण कथा नि जवळ जवळ शब्द न शब्द माहित असतानाही तोच थरारक अनुभव परत येतो. स्टिफन किंग चे मूळ पुस्तक वाचल्यावरही शपथ तेव्हढेच प्रभावी वाटले. उलट त्याला दिलेले चपखल देशी स्वरुप धारप एक लेखक म्हणून किती सिद्धहस्त होते हे जाणवून देतात.
१०. पर्व : भैराप्पा : माबो कर शोनूच्या क्रुपेने मिळालेला हा खजिना. महाभारतातल्या पात्रांचा माणूस म्हणून घेतलेला लेखा जोगा. मातीचे पाय असलेली ही पात्रे अधिक पटतात हे भैराप्पांचे श्रेय कि महाभारतातल्या पात्रांच्या मानवी स्वभावाशी वाटणार्या साधर्म्याची किमया हे उत्तर अजूनही उलगडलेले नाही.
ह्या यादीत गारंबीची राधा, सत्तांतर, मुंबई दिनांक, नि प्रेम पण्णीकरचा क्रिकेट ब्लॉग (ज्याने मला क्रिकेट चे बारकावे शिकवले नि पिचच्या पलीकडे पॅव्हिलियन मधे असलेला खेळाचा aspect दाखवला. प्रत्यक्ष मॅच बघण्यापेक्षा त्याचे live updates follow करण्यापर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले होते
) कुठे तरी बसतो. दहा आकड्याबद्दल धागाकर्त्याचा निषेध 
>>हाजार चुरासीर मा>> एका
>>हाजार चुरासीर मा>> एका मासिकात थोडं वाचलं होतं ह्याबद्दल.
>>Bourne Identity >> Bourne सिरिजचे वगैरे पिक्चर ह्यावरच बेस्ड आहेत का?
Bourne Identity >> Bourne
Bourne Identity >> Bourne सिरिजचे वगैरे पिक्चर ह्यावरच बेस्ड आहेत का? >> नावे त्यावर बेस्ड आहेत, थीम त्याची उचलली आहे. बाकि सगळा कचरा केलाय पार त्या पात्रांचा. नि तरिही सिनेमा बघायला मजा येते ह्यावरून मूळ पुस्तकाची मजा काय असेल ते समज.
आईने अकबरी पुस्तक वाचायला
आईने अकबरी पुस्तक वाचायला कुठं मिळेल?
<<
डाऊनलोडसाठी इथे उपलब्ध आहे.
हो, पिक्चर बघायला मजा येते हे
हो, पिक्चर बघायला मजा येते हे खरंय.
पुस्तकं मिळवते.
टण्याच्या यादीत गुरुनाथ नाईक
टण्याच्या यादीत गुरुनाथ नाईक राहिलेत.
मराठी वाचन खूप थोडं आहे तरी
मराठी वाचन खूप थोडं आहे तरी मराठी पुस्तकांची यादी इथे देत आहे. (इंग्रजीची २०-३० पुस्तकांची वेगळी यादी होईल त्यात आत्ता जायला नको!)
१. पूर्वरंग, पु.ल.देशपांडे- पुलंचं मी वाचलेलं पहिलं पुस्तक. या पुस्तकामुळे पु.ल.देशपांडे नामक काय महान लेखक मराठीला लाभले आहेत हे कळलं आणि भारावून गेले ते भारावलेपण आजतागायत टिकून आहे.
२. बटाटयाची चाळ,पु.ल.देशपांडे- तशी पुलंची सगळीच पुस्तकं या यादीत देता येतील. हसवणूक, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली आणि इतर अनेक. पण बटाटयाची चाळ या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून इथे आहे. पूर्ण पुस्तकभर हसल्यानंतर ’चिंतन’ वाचून अंतर्मुखही व्हायला होतं. किती दशकांपूर्वीची ती चाळ- पण आजही आपलीशी वाटते.
३. आहे मनोहर तरी, सुनीताबाई देशपांडे- या पुस्तकाबद्दल काय लिहू? ते प्रकाशित झालं तेव्हा त्याची इतकी चर्चा होत होती की फारसं काही कळण्याइतकं वय नसतानाही वाचून काढलं. त्यावेळी या पुस्तकावरच्या एका चर्चेला उपस्थित होते तिथे तर सुनीताबाईंबद्दल नाराजीचाच सूर लागला होता. "आपले पुलं कित्ती चांगले नै, दुसऱ्या कोणा नवऱ्याने बायकोला हे असलं पुस्तक लिहू दिलं असतं का? पण पुलंचा मोठेपणा बघा- त्यांनी पुस्तकाला किती छान सपोर्ट केलं. पुलंची बायको म्हणूनच लोक दखल घेतायत पुस्तकाची." असं पुलंच्या कट्टर चाहत्यांचं पुलंप्रेम भरभरुन वहात होतं. पुढे मग कळत्या वयात आहे मनोहरची पारायणं केली तेव्हा ’पुलंच्या बायकोचं पुस्तक’ हा चष्मा काढून पुस्तकाकडे नव्याने बघायला लागले, दरवेळी नवीन काहीतरी शिकायला मिळालं, इतकं प्रांजळ आत्मचरीत्र लिहिणाऱ्या लेखिकेविषयीचा आदर वाढत राहिला आणि पुलंबद्दलचा आदर तर नेहमीच कायम राहिला आहे.
४. सुनीताबाई, मंगला गोडबोले- ही ’निवडक दहा’ यादी देशपांडे पतीपत्नी स्पेशल होते आहे. पण काय करणार! मंगला गोडबोलेंची ओळख माहेरमध्ये हलकंफुलकं लिहिणारी लेखिका अशी होती. पण या पुस्तकात चरित्रलेखन त्यांनी वेगळ्याच प्रकारे हाताळलं आहे. पुस्तकामध्ये सुनीताबाईंच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू सहज उलगडत जातात..जणू तुमच्याशी त्या स्वत:च गप्पा मारत आहेत. कुठलंही पान उघडून वाचायला घ्यावं अशा या पुस्तकाची माझी ऑलरेडी पारायणं करुन झाली आहेत.
५. फास्टर फेणे सीरीज, भा.रा.भागवत- भागवतांची सगळीच पुस्तकं आवडतात पण फास्टर फेणे विशेष प्रिय. मी सगळी सीरीज वाचली नाहीये पण जी ५-७ पुस्तकं वाचली ती प्रचंड आवडली होती. एक सहा फास्टर फेणे पुस्तकांचा सेट आईच्या मैत्रिणीने गिफ्ट दिला होता. ती पुस्तकं मी असंख्य वेळा वाचली होती.
६. चौघीजणी, शांता शेळके- लिटल वुमेनचा अनुवाद. इथे अनेकांनी लिहिलंच आहे या पुस्तकाबद्दल. टीनएज वयात दोनदा वाचलं होतं आणि खूप आवडलं होतं. ओरिजिनल पुस्तकही वाचावं असं अजूनतरी प्रकर्षाने वाटलेलं नाही इतका शांताबाईंचा अनुवाद समर्थ आहे.
७. एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर- अजून एक पारायणं केलेलं पुस्तक. अतिशय प्रेम आहे माझं या पुस्तकावर. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या आफ्रिकन अमेरिकन scientist चं हे चरित्र- अत्यंत inspiring आणि वाचनीय.
८. युगान्त, इरावती कर्वे- महाभारतावरील अभ्यासपूर्ण पुस्तक. महाभारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारं.
९. व्यासपर्व, दुर्गा भागवत- दुर्गाबाईंच्या नजरेतून महाभारतातील पात्रांकडे बघण्याचा हा अनुभव अत्यंत वाचनीय व आनंददायी आहे.
१०. झिम्मा, विजया मेहता- अलीकडच्या काळात आवर्जून विकत घेतलेलं व वाचलेलं अप्रतीम आत्मचरीत्र. विजयाबाईंचं काम (अभिनय किंवा दिग्दर्शन) पाहण्याचा फारसा योगच आला नाहीये (एकदा कुठल्याशा फ्लाईटमध्ये त्यांची भूमिका असलेला पार्टी चित्रपट बघितला होता तेव्हढंच)..पण या पुस्तकातून त्यांच्या डोंगराएव्हढया कामाची ओळख होते. एका बुध्दिमान, असामान्य, विचारी रंगकर्मीने लिहिलेलं हे चरित्र एका गोष्टीची खात्री पटवतं की बाईंची रंगभूमीवर जितकी पकड आहे तितकीच लेखणीवरही आहे. तिथेही त्यांच्या कामाचं परफेक्शन दिसून येतं. आत्मचरित्रात सर्व आठवणी मोकळेपणाने तरीही विनम्रतेने व संयमितपणे लिहिण्याचा balance त्यांना जमून गेलाय.
असामी, प्रतिसाद दहा वेळा
असामी, प्रतिसाद दहा वेळा संपादित करणार बहुतेक
इब्लिस, तुम्ही दिलेला दुवा हा
इब्लिस, तुम्ही दिलेला दुवा हा त्या पुस्तकावरचा लेख्/असाईनमेन्ट आहे. मूळ पुस्तक नव्हे. त्या वेबसाईटवर फक्त स्वतःची पुस्तके, लेख अपलोड करणं अपेक्षित आहे.
आईने अकबरी हवं असेल तर archive.org वर शोधावं लागेल. किंवा डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (इथे डा.लो करायची सोय नाही)
असामी - पुलंच्या 'पापुद्र्या' बद्दल खासच अनुमोदन.
इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल
इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत
सानिया ,शैलजा राजे ,कुमुदिनी रांगणेकर यांचे कथा संग्रह -- आई आणायची पुस्तके, मला पण आवडतात ,१४ वर्षाची असेल .
शामची आई -साने गुरुजी ,गोट्या - ताम्हणकर
स्वामी ,
दुनियादारी ,
रमा मराठे यांनी अनुवाद केलेले --तो आणि ती
अमेरिका ,पूर्णिया ,आप्त -अनिल अवचट
एक होता कार्व्हर
द मॅजिक ऑफ थिंकींग बिग-Dr. David J. Schwartz
फ़ॉर हिअर, ऑर टू गो? - अपर्णा वेलणकर
स्व:देश - भूषण केळकर
कोसला -भालचंद्र नेमाडे
two states -चेतन भगत
Dont Lose Your Mind, Lose Your Weight -ऋजुता दिवेकर
Women And the Weight Loss Tamasha ऋजुता दिवेकर हे नाही आवडले
पोटाचा प्रश्न,कोपरा ,सोबत ,आरंभ ,पुन्हा झुळूक - मंगला गोडबोले
>>Women And the Weight Loss
>>Women And the Weight Loss Tamasha ऋजुता दिवेकर हे नाही आवडले>> स्वराली, आवडलेली दहा पुस्तकं लिहायची आहेत.
वरदा, आर्काईव्ह्ज वर सापडलं
वरदा,
आर्काईव्ह्ज वर सापडलं नाही. जे मिळालं त्यात खूप गार्बेज होती.
ओरिजिनल पर्शियन सापडलं, पण किती लोकांना इथे पर्शियन वाचता येईल ते ठाऊक नाही.
वा, वा! इथे पण आहे का हा
वा, वा! इथे पण आहे का हा धागा. मस्त. काही नवी पुस्तकं मिळाली. काही बरेच दिवसात न वाचलेल्या पुस्तकांची पुन्हा आठवण झाली.
माझी यादी पण टाकते.
'आवडत्या' व्याख्येकरता एकच
'आवडत्या' व्याख्येकरता एकच क्रायटेरिया- कधीही उघडून वाचाविशी वाटणारी. या पुस्तकांपेक्षा ग्रेट, साहित्यिक दृष्ट्या दर्जेदार अनेक पुस्तकं हाताखालून गेली पण ज्या पुस्तकांनी 'कम्फर्ट रिडिंग'चा अनुभव दिला/देतात अशी ही पुस्तकं.
यात एक त्रास लिहिताना झाला तो म्हणजे एका लेखकाची अशी अनेक 'आवडती' पुस्तकं तर त्यातलं नेमकं कोणतं नाव निवडावं.
१) बुक ऑफ नेचर- रस्किन बॉन्ड
याची अर्थातच अनेक पुस्तकं जसे की 'लॅन्डोर डेज'. पण जास्तीत जास्त वेळा कोणते उघडून वाचलं असा प्रश्न मनाशी केला तेव्हा बुक ऑफ नेचर उत्तर मिळालं.
२) द फाउंटन हेड- आयन रॅन्ड
या पुस्तकाचं नाव नाही घेतलं तर कॉलेज आणि त्याच्या आगेमागेची अनेक वर्षं मला माफ करणार नाहीत. तत्वज्ज्ञान वगैरे जाऊदे पण रोर्कच्या शोधात आयुष्यातला फार मोठा काळ घालवला आहे
३) एकेक पान गळावया- गौरी देशपांडे
पुढील आयुष्यात आपल्याला नेमक्या कशा प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतील, विचारांची बैठक कशावर स्थिर होईल याचा एक ढोबळ का होईना पण जाणीवपूर्वक अंदाज बांधायला या पुस्तकाने शिकवलं. पुढे त्यात अनेक बदल, भुकंप,डगमग झालीही पण गौरीवरचं प्रेम अभंग राहीलं.
४) मौनराग- महेश एलकुंचवार
भाषेचं सौंदर्य, रुबाब काय असतो, लालित्य किती नजाकतीने भाषेत उतरवता येतं, तेही वैचारिक खोली सांभाळून ते या पुस्तकाने दाखवलं. महेश एलकुंचवारांच्या मी अक्षरशः प्रेमात पडले हे पुस्तक वाचल्यावर.
५) रापण- प्र.अ. धोंड
चित्रकलेवरची, चित्रकारांवरची देशी-विदेशी अनेक पुस्तकं वाचली पण रापण पुस्तकाचं महत्व आणि गंमत वेगळीच. दस्तावेजीकरण किश्श्यांमधून, कहाण्यामधूनही किती सहज करता येऊ शकतं, रंजकता आणि संदर्भमूल्य यांचं एकत्रित मूल्य असलेलं हे पुस्तक वारंवार वाचलं जातं.
६) चेंजिंग- लिव्ह उलमन
या अभिनेत्रीचा एकही सिनेमा पाहिलेला नसताना हे पुस्तक वाचलं आणि त्यातल्या प्रांजळ, सखोल, पारदर्शी आत्मकथनाने चकित झाले. प्रेम या भावनेला राग, द्वेश, मत्सर, स्पर्धा अशा अनेक गुंतागुंतीच्या भावनांचे आंतरस्तर बिलगून असतात आणि शेवटी त्यांच्या गाळणीतून मागे उरणारी मैत्री हीच फक्त स्त्री-पुरुष नात्यामधे महत्वाची ठरते याचा अद्भूत अनुभव या पुस्तकाने दिला. इंगमार बर्गमनचे सिनेमे हे पुस्तक वाचलं नसतं तर कधी सर्वार्थाने कळालेच नसते हे निश्चित. धीरज अकोलकरला मनापासून धन्यवाद की त्याने नंतर इतक्या वर्षांनी या पुस्तकाच्या पुनर्प्रत्ययाचा अनुभव त्याच्या 'लिव्ह अॅन्ड इंगमार' या तितक्याच सुंदर लघूपटातून दिला.
७) अंडर द टस्कन सन
ट्रॅव्हलोग्ज वाचणे, तेही स्त्रियांनी लिहिलेले, एकट्यांनी भटकून केलेल्या प्रवासांचे अनुभव त्यांच्यासोबत आपणही घेणे, जमेल तसा आपणही प्रवास करत रहाणे हे सगळं या पुस्तकामुळे. सिनेमा आलाही नंतर यावर. पण पुस्तकात जी मजा आहे ती वेगळीच.
८)म्युझियम ऑफ इनोसन्स- ओरहान पामुक
खरं तर 'माय नेम इज रेड' सुद्धा घालायला आवडलं असतं इथे. पण ते जरा किचकट आहे. स्वतःच्या शहरावर, प्रदेशावर कसं प्रेम करावं. त्यातून देखण्या कहाण्या कशा जन्माला घालाव्या ते ओरहानकडून शिकावं.
९) भिजकी वही- अरुण कोलटकर
शब्द, रचना, अर्थ, प्रवाहीपणा, सौंदर्य, समकालिनता, पारंपरिकता, गूढ, लय हे सगळं मिळतं अरुण कोलटकरांचं काहीही वाचत असताना.
१०) द गोल्डन नोटबूक- डोरिस लेसिंग
विचारांनी आणि कृतीने फेमिनिस्ट असणं आणि 'स्त्री' म्हणून अभिमान बाळगत सौंदर्याने जगणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे डोरिसने शिकवलं. याबद्दल कोणताही गंड, द्वंद्व कधीही आयुष्यात समोर उभं राहिलं नाही याचं श्रेय तिचं.
या व्यतिरिक्त काही पुस्तक आहेत जी मी, माझी आई आणि माझी मुलगी आम्हा तिघींजणींमधे सामायिक पुल आहेत. आयुष्यात कायमच ती आमची 'आवडती' पुस्तकं राहिली, रहातील. त्या पुस्तकांना नॉस्टेल्जियाचा गंध वेढून आहे. लॉरा इंगाल्सची 'लिटल हाऊस’ सिरिज, एनिड ब्लायटनचं फारावे ट्री, ल्युइसा अल्कॉटचं लिटल विमेन, मार्गारेट मिशेलचं गॉन विथ द विंड इत्यादी. पण त्यांना नाही घेतलं यादीत तर ती काही रागावणार नाहीयेत. फार गोड आणि प्रेमळ आहेत ती त्याचा गैरफायदा घेतला इथे
मलाही असाच व्यासंग करायची
मलाही असाच व्यासंग करायची इच्छा आहे. >>>>>>>>>>>> सखाराम गटणे आठवला
मला केवळ १० काढणे केवळ अशक्य
मला केवळ १० काढणे केवळ अशक्य आहे. कदाचित १०० काढता आली असती.
१ लॉर्ड ऑफ द फ्लाईज - विल्यम गोल्डिंग
बस नाम काफी है ! का आवडले म्हणून काय आणि किती लिहिणार ? इथेच एक लेख लिहिला होता.
२. टू सर विथ लव्ह - Braithwaite, E.R.
३. अॅनिमल फार्म - जॉर्ज ऑरवेल
४. क्राईम अॅण्ड पनिशमेंट - Fyodor Dostoyevsky,
५. १९८४ - जॉर्ज ऑरवेल
६ अॅटलस श्रग्ड - आयन रॅन्ड .
७ अमेरिकन पॅस्त्रोल / आय मॅरिड अ कम्युनिस्ट आणि द ह्युमन स्टेन (पूर्ण अमेरिकन ट्रिलजी)- फिलिप रॉथ ह्या बद्दल मी मी वाचलेले पुस्तक मध्ये लिहिले होते.
८ द प्रोग्रेस ऑफ लव्ह - अॅलिस मुन्रो
९ From the Mixed-Up Files of Mrs. Basil E. Frankwelier - E. L. Konigsburg
१० अॅरो ऑफ गॉड - चिनूआ अचेबे - ह्या बद्दल मी मी वाचलेले पुस्तक मध्ये लिहिले होते.
ह्या वरच्या यादीत केवळ काहीच मराठी पुस्तकं येऊ शकतील.
१. वाल्मिकी रामायण -
२. महाभारत
३. पिंगळावेळ / काजळमाया
४. कोसला
५. रथचक्र
६.तुंबाडचे खोत
बी, हे पुस्तकांचे बीबी
बी, हे पुस्तकांचे बीबी उघडायला मला खुप धीर जमवावा लागतो. अजून किती वाचायचेच मला, असा विचार
करत लाज वाटायला लागते
@केदार - 'From the Mixed-Up
@केदार - 'From the Mixed-Up Files of Mrs. Basil E. Frankweiler' या पुस्तकाबद्दल कुतूहल आहे. फास्टर फेणे + लंपन अशा काहीशा कॅटॅगरीतलं आहे का हे पुस्तक?
(अवांतर - याची लेखिका E. L. Konigsburg आहे ना?
दुवा: http://en.wikipedia.org/wiki/From_the_Mixed-Up_Files_of_Mrs._Basil_E._Fr...)
नंदन हो लेखिका E. L.
नंदन हो लेखिका E. L. Konigsburg च आहे. त्याचवेळी Jaffe, Charlotte S. ने ह्यावर गाईड पण लिहिले आहे असे लिहिणार होतो पण चुकून ते तसेच राहिले.
पुस्तक लंपन मार्गी नसून थोडे फा फे मार्गाने जाते. अॅडव्हेंचर व शोध.
दोन लहान मुलं मेट्रोपोलिटिन म्युझियम ऑफ आर्टला (घरातून पळून) जातात, तिथे ते मायकल अँजलोच्या मूर्ती शोध घेतात, त्या शोधात तिथून ते Mrs. Basil E. Frankweiler पर्यंत पोचतात, तिथे शोध लागतो का? पुढे काय होते हे इतके उत्कंठावर्धक आहे की बास!
या धाग्यामुळे बरीच जुनी जुनी
या धाग्यामुळे बरीच जुनी जुनी (म्हणजे खूप आधी वाचलेली) पुस्तके पुन्हा आठवणीत येत आहेत हे खरे.
सुशीच्या तद्दन भिकार** पुस्तकात लटकंती हे एक लै भारी आहे - असाम्याच्या लिस्टमधून ते पुन्हा आठवले. चक्रपाणी!
चिनुआ आचेबे ची ट्रिलॉजी
शर्मिलाच्या यादीतले रापण सुरेख आहे. मौनरागदेखील. अर्थात कधी कधी एलकुंचवारांचा तो लहानपणचा अनुभव त्यांच्यावर फारच ओवरपॉवरींग राहिला आहे आणि त्याचे त्यांनी 'साहित्यिक' भांडवल (म्हणजे इतर साहित्य लिहिण्यासाठी वापरलेले भांडवल अश्या अर्थाने) केले असे वाटले. रापण वरून प्रभाकर बर्व्यांचे(??? बर्वेच ना?) कोरा कॅनवास आठवले. आणि किमया (आणि ते दुसरे कुठले?) आचवलांचे.
उद्धव शेळकेंचे धग हे एक अजून एक अजब पुस्तक वर कुणाच्या यादीत न आलेले. माणसे अरभाट चिल्लार वाचून मी झोर्बा सारखा नाचलो होतो ते आठवले. वर कुणाच्याच यादीत न आलेली पण मराठी साहित्यात फार महत्त्वाचे टप्पे असलेली पुस्तके (ज्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा होता माझ्यावर) म्हणजे दलित साहित्य. उचल्या, बलुतं, कोल्हाट्याचं पोर, अक्करमाश्या.
नातिचरामी, एक झाड दोन पक्षी, रणांगण ही पुस्तके अजून दिसली नाहीत. लंपनपण नाही दिसला - लंपनपर्व एक येउन गेलय मराठीत (हॅरी पॉटरसारखे).
लघुकथा हा मराठीतला सगळ्यात (की एकच?) सकस वाढलेला साहित्यप्रकार असून देखील काजळमाया/पिंगळावेळ वगळता फार कथासंग्रह येत नाहियेत. कथासमुच्चय लक्षात राहतो (पानवलकरांच्या कथा, गोखल्यांच्या कथा असे) पण कथासंग्रहाचे नाव किंवा कथेचे नाव फारसे लक्षात राहत नाही असे आहे का? जीएंचे वेगळेपण याच्यातर की त्यांनी कथासंग्रहाची नावेसुद्धा फार विचारपुर्वक दिली जी आजही लक्षात आहेत.
<उद्धव शेळकेंचे ढग> धग.
<उद्धव शेळकेंचे ढग> धग.
उद्धव शेळकेंचे ढग हे एक अजून
उद्धव शेळकेंचे ढग हे एक अजून एक अजब पुस्तक>> तुला 'धग' म्हणायचं आहे का?
मी इथे किंवा फेबुवर खो मिळालाय तरी लिहित नाहीये कारण मला अशी दहा पुस्तकं निवडणं फारच कठीण आहे. दहा लेखक निवडणं त्यामानाने सोपं असावं.
वाचनमात्र आहेच इथे. अनेक पुस्तकांशी पुनर्भेट होतेच आहे वरच्या याद्यांमुळे - व्यक्ती तितक्या प्रकृती हे परत एकदा जाणवतं आहे.
<मी इथे किंवा फेबुवर खो
<मी इथे किंवा फेबुवर खो मिळालाय तरी लिहित नाहीये कारण मला अशी दहा पुस्तकं निवडणं फारच कठीण आहे. दहा लेखक निवडणं त्यामानाने सोपं असावं.> बरोबर.
<<कारण मला अशी दहा पुस्तकं
<<कारण मला अशी दहा पुस्तकं निवडणं फारच कठीण आहे.>>
म्हणूनच मी इथे फक्त मराठीची यादी दिली. इंग्रजी यादी खूप मोठी होती. मराठीत मात्र दहाच नावं जमवता आली. इथे अर्थात भरपूर मोठी लिस्ट तयार होते आहे नजिकच्या काळात वाचण्यासाठी.
बावरा मन, भारी पोस्ट आहे
बावरा मन, भारी पोस्ट आहे तुमची.
लघुकथा हा मराठीतला सगळ्यात
लघुकथा हा मराठीतला सगळ्यात (की एकच?) सकस वाढलेला साहित्यप्रकार असून देखील काजळमाया/पिंगळावेळ वगळता फार कथासंग्रह येत नाहियेत. कथासमुच्चय लक्षात राहतो (पानवलकरांच्या कथा, गोखल्यांच्या कथा असे) पण कथासंग्रहाचे नाव किंवा कथेचे नाव फारसे लक्षात राहत नाही असे आहे का? जीएंचे वेगळेपण याच्यातर की त्यांनी कथासंग्रहाची नावेसुद्धा फार विचारपुर्वक दिली जी आजही लक्षात आहेत. >> बहुधा. मी पानवलकरांच्या कथासंग्रहाचे नाव आठवत होतो तर फक्त xyz च्या निवडक कथा एव्हढेच आठवत होते. श्री. वि. कुलकर्णींच्या 'डोह' मधल्या कथा आहेत. गाडगीळांची किडकी माणसे आहे. पण कथासंग्रहांचे नाव आठवत नाही.
टण्या तुला अजून तुझी खरी लिस्ट लिहिता आलेली नाहिये
वरदा आवडलेली पुस्तके लिहिण्यापेक्षा कधीही उघडून वाचायला आवडतात अशी दहा लिहिणे सोप्पे आहे बघ.
< श्री. वि. कुलकर्णींच्या
< श्री. वि. कुलकर्णींच्या 'डोह' मधल्या कथा आहेत>
श्रीनिवास कुलकर्णींचा डोह ? : ललितगद्य लेखांचा संग्रह आहे.
त्यात ललितांबरोबर कथापण आहेत
त्यात ललितांबरोबर कथापण आहेत ना ? कि त्यात पण गोंधळ होतोय आत्ता ? सुसरवाला लेख आहे ते पुस्तक नाही.
Pages