भुताळी जहाज - १० - क्वीन मेरी

Submitted by स्पार्टाकस on 21 August, 2014 - 18:03

पहिल्या महायुध्दानंतर व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला युध्दनौका ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. सुरवातीची काही वर्षे या कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. काही काळाने ब्रिटनने जर्मनीशी केलेल्या नाविक करारानुसार एका मर्यादेपर्यंत नौदल ठेवण्याची जर्मनीला परवानगी दिली! (हा करार करताना ब्रिटनने पहिल्या महायुध्दातील आपल्या सहकार्‍यांना एका शब्दाने कल्पना दिली नव्हती!). मात्रं, पुढेमागे जर्मन नौदल आपल्याला वरचढ होऊ नये या उद्देशाने ब्रिटननेही काही मोठ्या नौका बांधण्यास सुरवात केली. (त्यावेळी चेंबरलेनसाहेब पंतप्रधान झालेले नव्हते!).

१९२८ मध्ये क्लाईड नदीवरील गोदीत एका ७५००० टनाच्या जहाजाच्या बांधकामाला सुरवात झाली. त्याकाळातील प्रचंड मोठ्या जहाजांपैकी एक असलेल्या या जहाजाच्या बांधणीला सुमारे ३५ लाख पौंड खर्च आला होता. साडेतीन वर्षांनी हे जहाज बांधून पूर्ण झाल्यावर इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने नाव देण्यात आलं,,

क्वीन मेरी!

या जहाजावर अनेक खास सुविधा होत्या. उच्चभ्रू लोकांच्या वापराच्या दृष्टीनेच जहाजाची बांधणी करण्यात आलेली होती. जहाजावर दोन स्विमींग पूल होते. लायब्ररी होत्या. तिन्ही डेकवरील मुलांसाठी नर्सरीची सोय होती. म्युझिक स्टूडीयो, लेक्चर हॉल, टेनिस कोर्ट आणि जगात कोठेही टेलीफोन करण्याची सोय असलेली रेडीओ रूम होती. या सर्वाच्या जोडीला ज्यूं साठी खास प्रार्थनास्थळाची सोय असलेलं हे पहिलं जहाज होतं! जर्मनीत तत्कालीन ज्यूंबद्दल असलेल्या धर्मभेदाला उत्तर म्हणून ही खास व्यवस्था करण्यात आली होती!

जहाजच्या डायनिंग रुममध्ये अटलांटीक महासागरातून अमेरीकेला जाण्याचा मार्ग तपशीलवारपणे दाखवणारा नकाशा होता. उन्हाळा आणि हिवाळ्यात वापरण्यात येणारे वेगवेगळे मार्ग त्यावर दाखवलेले होते. मुख्य डायनिंग रुमच्या जोडीला फर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी उघड्या डेकवर खास वेगळी डायनिंग रुमही होती!

१९३४ पासून क्वीन मेरीने आपल्या सफरींना सुरवात केली. इंग्लंड आणि अमेरीकेतील प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या या जहाजावरुन प्रवास करणं हे त्याकाळी दोन्ही देशांत प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं.

१ सप्टेंबर १९३९ ला हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसर्‍या महायुध्दाचा भडका उडाला. क्वीन मेरी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतं. इंग्लंडच्या वाटेवर असताना ब्रिटीश खाडीत जर्मनीच्या पाणबुड्यांपासून ते थोडक्यात वाचलं होतं! काही काळ साउथएम्प्टनच्या बंदरात काढल्यावर ब्रिटीश नौदलाच्या अधिकार्‍यांनी युध्दसामग्रीची आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठी जहाजाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात जहाजाचा पूर्ण कायापालट करण्यात आला. जहाजाला राखाडी रंग देण्यात आल्यामुळे त्याला ग्रे घोस्ट असं नाव पडलं! जहाजावर अनेक बंकर्स उभारण्यात आले.

इंग्लंडजवळ असलेल्या मोठ्या जहाजांपैकी क्वीन मेरीची वाहतूकक्षमता सर्वात जास्तं होती. १९४२ च्या डिसेंबर महिन्यात एका सफरीत विक्रमी १६ हजार अमेरीकन सैनिक इंग्लंडमध्ये आणण्यात आले! ताशी ३० मैलांपेक्षा जास्त वेगाने प्रवास करण्याची क्षमता असल्याने जर्मन पाणबुड्यांची मात्रा या जहाजावर चालू शकत नव्हती! १९४२ च्या सफरीत अटलांटीक मध्ये एका २९ फूट उंचीच्या महाकाय लाटेचा जहाजाला तडाखा बसला. या धक्क्यामुळे जहाज ५२ अंशांनी कललं होतं! आणखीन २-३ अंशांनी कललं असतं तर ते पूर्ण उपडं होऊन बुडालं असतं! (या घटनेवरच पॉल गॅलीकोने पोसायडन अ‍ॅडव्हेंचर ही सुप्रसिध्द कादंबरी लिहीली).

इंग्लंडचे तत्कालिन पंतप्रधान विन्स्टन चर्चील यांनीही या जहाजावरून अमेरीकेला प्रवास केला होता. कर्नल वॉर्डन अशी त्यांच्या नावाची नोंद केली जात असे!

दुसर्‍या महायुध्दातील या सफरींच्या दरम्यान जहाजावर एक भयंकर घटना घडली...

क्वीन मेरी अमेरीकेहून इंग्लंडच्या वाटेवर असताना जहाजावरील एका स्वयंपाक्याचा काही सैनिकांशी वाद झाला. त्याने बनवलेलं जेवण सैनिकांच्या पसंतीस उतरलं नव्हतं. चिडलेल्या सैनिकांनी त्या स्वयंपाक्याला चक्क ओव्हनमध्ये भरलं आणि जिवंतपणे भाजून काढलं! त्याच्या वेदनेने फोडलेल्या किंकाळ्यांनीही सैनिकांचं मन द्रवलं नाही. अखेर त्या स्वयंपाक्याचा दुर्दैवी मृत्यू झाला! मात्रं त्या सैनिकांवर कोणती कारवाई झाल्याची नोंद सापडत नाही.

दुसरं महायुध्द संपल्यावर क्वीन मेरीने पुन्हा पहिल्याप्रमाणे प्रवासी वाहतुकीला सुरवात केली. परंतु पुढे विमानांचा उदय झाल्यावर निर्माण झालेल्या स्पर्धेत टिकून राहणं जहाजाची मालक असलेल्या कंपनीला शक्यं झालं नाही. २७ सप्टेंबर १९६७ मध्ये जहाजाने आपली शेवटची सफर पूर्ण केली. अमेरीका आणि इंग्लंडच्या दरम्यान तब्बल १००० सफरी करणार्‍या या जहाजाने तब्बल २१ लाख प्रवाशांची वाहतूक केली होती! १९६७ मध्ये झालेल्या लिलावात कॅलिफोर्नियातील एका कंपनीने हे जहाज विकत घेतलं.

१९६७ मध्ये क्वीन मेरीने शेवटच्या वेळी इंग्लंडचा किनारा सोडला आणि कॅलिफोर्निया गाठलं. लॉस एंजलिस इथल्या लाँग बीच बंदरात आल्यावर जहाज कायमचं तिथे नांगरण्यात आलं. कॅलिफोर्नियातील ज्या कंपनीने हे जहाज विकत घेतलं होतं त्यांची या जहाजाची कायमस्वरुपी हॉटेल म्हणून उभारणी करण्याची योजना होती! या योजनेनुसार जहाजाच्या खालील डेकवरील सर्व सामग्री काढून घेण्यात आली. बॉयलर रुममधील सर्व बॉयलर्स काढण्यात आले. पुढच्या बाजूची इंजिनरुमही बंद करण्यात आली. अमेरीकन कोस्टगार्डच्या नोंदीनुसार हे जहाज न राहता त्याचं बिल्डींगमध्ये रुपांतर झालं होतं!

युध्दकाळात आणि त्यापूर्वी आणि नंतरही क्वीन मेरीवर एकूण ४९ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी अनेक अतिंद्रीय शक्तींचं जहाजावर अस्तित्वं असल्याचं अनेक संशोधकांना जाणवलं होतं! क्वीन मेरीचं हॉटेलमध्ये रुपांतर झाल्यावर तिथे वास्तव्य करणार्‍या अनेक पर्यटकांनाही अतिंद्रीय अनुभव आल्याची नोंद सापडते. अतिंद्रीय (पॅरानॉर्मल) शक्तींवर संशोधन करणार्‍यांनी अनेकदा तिथे आलेल्या अनुभवांच्या तपशिलवार नोंदी केल्या आहेत. टाईम मासिकाने २००८ साली अमेरीकेतील सर्वात जास्त गूढ असलेल्या १० ठिकाणांमध्ये या जहाजाचा समावेश केला आहे!

क्वीन म्रेरीवरील प्रमुख गूढ जागा:-

केबीन बी ३४० - पूर्वीचं केबीन बी ३२६ असलेलं ही रूम कोणालाही दिली जात नाही! पूर्वी या रुममध्ये वास्तवं करणार्‍यांना अनेक अनाकलनिय अनुभवांना सामोर जावं लागलं असल्याची नोंद आढळते. बाथरुममधील नळ कधीही अचानक बंद-चालू होणं, अंगावर घेतलेलं पांघरुण अचानक ओढून काढलं जाणं असे अनुभव अनेकांनी नोंदवले आहेत. या केबीनमध्ये एका माणसाची आकृती फिरताना आढळते. बोटीवरील पर्सर असलेल्या या व्यक्तीची इथे हत्या झाली होती, परंतु अद्याप त्याने ही जागा सोडलेली नाही असं मानलं जातं!

क्वार्टर मास्टर इंजिन रूम - जहाजाच्या पुढील भागात असलेल्या क्वार्टर मास्टर इंजिन रुममध्ये पेडर नावाच्या खलाशाचा १९६६ मध्ये बळी गेला होता. जहाजावर अग्निप्रतिरोधक साधनांचं प्रात्यक्षिक करताना १३ क्रमांकाच्या हवाबंद दारामध्ये तो चिरडला गेला होता! निळा ओव्हरकोट घातलेली जॉन पेडरची दाढीधारी आकृती इंजिनरुमजवळ फिरताना अनेकांना आढळून आल्याची नोंद आहे.

स्विमींग पूल - जहाजावरील दोन्ही स्विमींग पूलवर अतिंद्रीय अनुभव आल्याची नोंद आढळते. फर्स्ट क्लास स्विमींग पूलवर दोन स्त्रियांच्या आकृत्या अनेकदा आढळल्या आहेत. सेकंड क्लासच्या स्विमींग पुलावर ६०-६५ वर्षांच्या एका वृध्द स्त्रीचं आणि एका लहान मुलीचं अस्तित्वं आढळल्याची नोंद आहे. या लहान मुलीचं नाव जॅकी असून तिचा स्विमींग पूलमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला होता! जहाजावर काम करणार्‍या एका स्त्रीने रिकाम्या स्विमींग पुलावर लहान मूल पाणी उडवत असल्याचा आवाज ऐकला होता. त्या आवाजापाठोपाठ लहान मुलाच्या ओल्या पावलांचे ठसे पुलाबाहेरील पॅसेजमध्ये आढळून आले! परंतु त्या संपूर्ण महिन्याभरात जहाजावर एकही लहान मूल असल्याची नोंद आढळत नाही.

स्त्रियांची ड्रेसिंगरुम - एका लहानशा पॅसेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या छोट्या खोल्यांतून अनेक विचित्र अनुभव पर्यटकांना आल्याची नोंद सापडते. ही जागा अतिशय कोंदट आणि काहीशी कारुण्याची झाक असल्याचं विशेषतः जाणवतं. अतिंद्रीय शक्तींवर संशोधन करणार्‍या अनेक संशोधकांनी या ठिकाणी अमानवीय अस्तित्वाचा अनुभव आल्याची नोंद केली आहे.

बॉयलर रुम - क्वीन मेरी कॅलिफोर्नियात आल्यावर सर्व बॉयलर्स काढण्यात आले. या बॉयलर रुममध्ये मरण पावलेल्या एका इंजिनियरच्या अस्तित्वाचा अनेकांना अनुभव आला असल्याची नोंद सापडते. दर शनिवारी रात्री हा इंजिनियर एका विशिष्ट कोपर्‍यात काही क्षण उभा असलेला आढळून येतो!

स्वयंपाकघर - अमेरीकन सैनिकांनी ओव्हनमध्ये भाजून हत्या केलेल्या स्वयंपाक्याची किंकाळी इथे अनेकदा ऐकू आल्याची नोंद आढळते.

विन्स्टन चर्चील रुम - विन्स्टन चर्चीलनी या जहाजावरुन अनेकदा प्रवास केला होता. एक विशीष्ट केबीन चर्चीलसाठी खास राखून ठेवलं जात असे. या केबीनमधील बाथरुममध्ये खेळण्यातील बोटींच्या सहय्याने चर्चीलनी डी-डे या दिवशी (६ जून १९४४) नॉर्मंडीवरील हल्ल्याची योजना आखली होती असं मानलं जातं. चर्चील यांच्या या केबीनबाहेर जुन्या ब्रिटीश पध्दतीच्या सिगारचा वास आल्याची अनेकांनी नोंद केली आहे!

जहाजाच्या उजव्या बाजूकडील भागात अनेकदा स्त्रियांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याची नोंदही सापडते. अमेरीकेबअतहून इंग्लंडच्या वाटेवर असताना जहाजाची आपल्याच ताफ्यातील क्युरॅको या जहाजाशी टक्कर झाली होती. या अपघातात क्युरॅकोवरील ३०० जणांना जलसमाधी मिळाली! जहाजाच्या उजव्या भागावर क्युरॅको आदळल्यावर त्या भागाचं बरंच नुकसानही झालं होतं. या भागात जोरात पाणी घुसत असल्याचा आवाज अनेकदा ऐकू येतो! तसंच अनेकदा अनैसर्गीक थंड हवा अनुभवास येते.

सेकंड क्लासवरील डेकच्या पॅसेजमध्ये १९३० सालातील सूट घातलेला एक माणूस फिरताना आढळल्याची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच जहाजावर एकही मूल नसताना नर्सरीतून लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज आल्याचीही नोंद सापडते.

क्वीन मेरी हे जहाज मोबाईल फोन आणि कॅमेर्‍यांच्या बाबतीतही विचित्रं असल्याचं आढळून आलं आहे!

मोबाईल फोन आणि कॅमेरा याच्या पूर्ण चार्ज केलेल्या बॅटरी काही मिनीटांत पूर्णपणे डिस्चार्च होत असल्याचं आढळलं आहे! डिजीटल कॅमेर्‍यांचे फ्लॅश नीट काम करत नाहीत! अत्याधुनिक कॅमेरे आणि व्हिडीओ कॅमेर्‍यातूनही अनेकदा धुरकट आणि अनाकलनीय प्रतिमा उमटल्याचं आढळलं आहे! (कॅमेरा आणि मोबाईलच्या बॅटरीचा मी स्वत: अनुभव घेतला आहे).

यापैकी कोणत्याही अनुभवांचं नेमकं स्पष्टीकरण देणं कोणालाही शक्यं झालेलं नाही. आजही कॅलिफोर्नियातील लाँग बीचवर क्वीन मेरी हॉटेल उभं आहे. कोणाला स्वतः अनुभव घेण्याची इच्छा असल्यास.......

*********************************************************************************************************

संदर्भ :-

Ghost Ships - रिचर्ड वायनर
Time Magzine 2008 Edition - टाईम
RMS Queen Mary: Queen of the Queens - विल्यम डंकन
Captain of the Queens - हॅरी ग्रॅटीज

(पुढील भाग अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे!
आत्ताची क्विन मेरी टू शी या क्विन मेरीचा काही संबंध आहे का?
क्विन मेरी २ पाहिलयं जवळुन. प्रचंड आहे. खरतरं आयुष्यात एकदा तरी जायची इच्छा आहे क्विन मेरी टु वर.

Great!

सगळ्यात खतरनाक भाग! कारण ह्यात प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध आहे! मला माहिती नाही मला आवडेल की नाही जायला ते!

सोल्लीड भुताळी जहाज..

(पुढील भाग अंतिम)

आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र. असे नको व्हायला... Happy

चिडलेल्या सैनिकांनी त्या स्वयंपाक्याला चक्क ओव्हनमध्ये भरलं आणि जिवंतपणे भाजून काढलं! >>> हॉरीबल रे .. हे असे केल्यावर भूत नाही निपजणार तर काय जन्नत नसीब होणार ..

पुढील भाग अंतिम .. च्च च्च झालेच.. ज्या वेगाने टपाटप लेख पडत होते, ३०-४० भाग डोक्यात आहेत असे वाटलेले

नका हो संपवू हि मालिका Sad प्लिज.

माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याना. उत्तर दिलेत तर क्विन मेरी २ चे फोटो टाकेन मी Proud

ते नाही माहित. पण ती क्रुज शिप आहे सध्या जगातली सगळ्यात मोठी. अजुनही वापरात आहे. एकदा तरी जायचे स्वप्न आहे तिच्यावर पण खुप महाग आहे Sad

हायला, म्हणजे हे एक भुजा अजूनही अ‍ॅक्सेसेबल आहे तर! (जाणार कोण आहे म्हणा!)

मस्त आहे ही गोष्ट.

हायला, म्हणजे हे एक भुजा अजूनही अ‍ॅक्सेसेबल आहे तर! (जाणार कोण आहे म्हणा!)

जाना गं जाना... प्लिSSSSSSSSSSज. तु नेहमी हटके जागी जातेस ना, आवडते ना तुला, मग जाना माबोकरांसाठी एकदा..

आणि (परतोनी आलीसच तर) वृत्तांतही टाक... Happy

स्पार्टा Happy

खरंच गूढ.... क्वीन मेरी २ वर काम केलेला एक इतालियन माणूस माझा सहकारी होता.. त्याने त्या बोटीवरचे असले काही अनुभव सांगितले नाहीत कधी.

पेरु,
क्वीन मेरी २ आणि क्वीन मेरी ही दोन्ही जहाजं एकाच कंपनीची आहेत. त्यांच्या जोडीला क्वीन व्हिक्टोरिया आणि एलिझाबेथही होत्या. क्वीन मेरी २ ही क्वीन मेरीप्रमाणे भुताळी असल्याची मात्रं नोंद नाही.

क्विन मेरी मधे प्रत्यक्ष जाउन आलो. तुम्ही सांगितला तसा कॅमेरा आणि मोबाईलच्या बॅटरीचा मला अनुभव नाही आला.
तसेच बॉयलर रुम, स्विमिंग पुल वगैरे दाखवून आणनारे शोज थोडे भयानक पद्ध्तीने(लाइट अ‍ॅन्ड साउंड इफेक्ट ने) दाखवीले जातात. स्विमिंग पुल जवळ तर नक्की फाटते,बॉयलर रुम पण खुप गुढ वाटते.