भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी

Submitted by स्पार्टाकस on 13 August, 2014 - 14:19

सागरावरील खलाशांवर अनेक अंधश्रध्दांचा पगडा असतो. या अंधश्रध्दा सहजासहजी दूर होत नाहीत. पूर्वीच्या जवळपास प्रत्येक जहाजावर पुढच्या डोलकाठीखाली एक आकृती असे. खलाशांच्या विश्वासानुसार ही आकृती हा जहाजाचा आत्मा असतो! ही आकृती पसंत पडली नाही तर खलाशांनी जहाजावर काम करण्यास नकार दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेच जहाजाच्या नावाबद्दल! जहाजाचं मूळ नाव काही कारणाने बदलण्यात आलं, तर जहाजावर आरिष्टं कोसळतं अशी खलाशांची ठाम समजूत असे. त्यामुळे जहाजाचं नाव बदलण्यास खलाशांचा खूप विरोध होत असे.

१८६१ सालात नोव्हा स्कॉटीयामधील स्पेन्सर आयलंड इथल्या जोशुआ डेव्हीस याच्या शिपयार्डमध्ये दोन शिडांचं एक जहाज बांधून तयार झालं. जहाजाचं नाव होतं अ‍ॅमेझॉन! स्वत: डेव्हीस आणि एक स्थानिक व्यापारी हेनरी बिगॅलो आणि इतर सहाजणांनी जहाजाच्या बांधणीकरता पैसे गुंतवले होते. पार्सबोरो बंदरात या जहाजाचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं.

रॉबर्ट मॅक्लीन हा या जहाजाचा पहिला कॅप्टन होता. जहाजाच्या आठ मालकांपैकी एकाचा तो मुलगा होता. कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यावर मोजून नवव्या दिवशी त्याला न्युमोनियाने गाठलं! जहाजाच्या पहिल्या सफरीत सुरवातीलाच त्याचा मृत्यू झाला! पुढील कॅप्टन जॉन नटींग पार्कर याच्या अधिपत्याखाली जहाज असताना एका मासेमारी करणार्या बोटीशी समोरासमोर धडक झाल्याने जहाजाला शिपयार्डमध्ये परतावं लागलं. शिपयार्डमध्ये असताना जहाजाच्या मधल्या भागात अचानक आग पसरली. पहिल्या ट्रान्स-अटलांटीक सफरीत डोव्हरच्या किनार्याजवळ इंग्लिश खाडीत जहाजाची पुन्हा एका बोटीशी टक्कर झाली! परिणामत: जहाजाच्या कॅप्टनला डच्चू देण्यात आला!

सुरवातीच्या या प्रकारानंतर सहा वर्षे सर्वकाही सुरळीतपणे चालू राहीलं. या काळात जहाजाने वेस्ट इंडीज बेटे, दक्षिण अमेरिका या भागात अनेक सफरी केल्या. १८६७ मध्ये एका वादळात ग्लेस बे किनार्यावर धडकल्यामुळे जहाचाचं इतकं जबरदस्तं नुकसात झालं. जहाजाच्या मालकांना जहाज शिपयार्ड्पर्यंत आणण्यासाठी १७०० डॉलर्स खर्च करावे लागले! त्यानंतर जहाजाची मालकी तीन-चार वेळा बदलली. परंतु कुणालाही या जहाजापासून काही नफा मिळवता आला नाही! त्यापैकी दोघांचं तर पार दिवाळं वाजलं होतं!

१८६८ मध्ये चार अमेरिकन लोकांनी हे जहाज विकत घेतलं. इटलीच्या पूर्वेला असलेल्या बंदरांशी व्यापार करण्यासाठी हे जहाज वापरण्याचा त्यांचा इरादा होता. न्यूयॉर्क बंदरात जहाजाचं रजिस्ट्रेशन करताना अमेरिकन मालकांनी ज्या गोष्टीला खलाशी अत्यंत घाबरतात तीच गोष्टं केली. जहाजाचं अ‍ॅमेझॉन हे मूळ नाव बदलून जहाजाला नवीन नाव दिलं!

मेरी सेलेस्टी!

अमेरिकन मालकांनी जहाजाचा संपूर्ण कायापालट करुन टाकला होता. चार मालकांपैकी अनुभवी दर्यावर्दी असलेल्या बेंजामिन ब्रिग्स याची जहाजाचा कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली.

Benjamin Briggs.jpgकॅप्टन बेंजामिन ब्रिग्ज

१८७२ मध्ये न्यूयॉर्क मधील इस्ट रिव्हर परिसरातील गोदीत मेरी सेलेस्टी धक्क्याला लागलं होतं. जहाजावरुन वाहून नेण्यात येणारा हा माल म्हणजे उत्कृष्ट इटालियन वाईनने भरलेली १७०१ पिंप (बॅरल्स) होती! मेसनर अ‍ॅकरमन कंपनीचा हा माल न्यूयॉर्कहून इटलीतील जिनोआ बंदरात जाणार होता. या मालाची एकूण किंमत ३५ हजार डॉलर्स इतकी होती. जहाजाचा एकूण ४६ हजार डॉलर्सचा विमा उतरवण्यात आला होता! परंतु माल येण्यास दोन दिवस उशीर झाल्याने बंदरातच थांबण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं!

न्यूयॉर्क बंदरात असताना मेरी सेलेस्टीचा कॅप्टन बेंजामिन ब्रिग्स याची गाठ आपला जुना मित्र डेव्हीड रीड मूरहाऊस याच्याशी गाठ पडली. ४ नोव्हेंबरच्या रात्री ब्रिग्ज आणि मूरहाऊस यांच्या कुटुंबियांनी एकत्रं जेवण घेतलं. मूरहाऊस डेल ग्रेटीया या कॅनेडीयन व्यापारी जहाजाचा कॅप्टन होता. डेल ग्रेटीया हे मेरी सेलेस्टीप्रमाणेच दोन शिडांचं जहाज होतं. गप्पांच्या ओघात आपल्या जहाजांचा मार्ग साधारणतः एकच असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. मेरी सेलेस्टीप्रमाणेच डेल ग्रेटीयादेखील अटलांटीक पार करुन भूमध्य समुद्रातून युरोपकडे जाणार होतं.

मूरहाऊसशी गाठ पडण्यापूर्वी कॅप्टन ब्रिग्जने आपल्या आईच्या नावाने पत्रं लिहीलं होतं. ब्रिग्जचा मोठा मुलगा आर्थर शाळा असल्यामुळे त्याच्या आईजवळ होता. आपल्या आईला लिहीलेल्या पत्रात आर्थरची काळजी घेण्याविषयी ब्रिग्जने आईला सांगितलं होतं. आपल्या प्रवासाविषयी तो खूप आशादायी होता. त्याची पत्नी सारा आणि दोन वर्षांची मुलगी सोफीया ब्रिग्जसह मेरी सेलेस्टीवरुन प्रवास करणार होत्या.

Sarah Briggs.JPGसारा ब्रिग्ज

Sophia Briggs.JPGसोफीया ब्रिग्ज

७ नोव्हेंबर १८७२ ला मेरी सेलेस्टीने न्यूयॉर्कमधील स्टेटन बंदर सोडलं आणि जिनोआच्या सफरीसाठी प्रस्थान ठेवलं. कॅप्टन ब्रिग्ज आणि त्याच्या कुटुंबियांव्यतिरीक्त आणखीन सात जण जहाजावर होते. त्यात चार जर्मन आणि एक डॅनिश खलाशांचा समावेश होता. जहाजावरील स्वयंपाकी आणि फर्स्ट मेट अल्बर्ट रिचर्डसन दोघेही अमेरिकन होते. हे सर्वजण अनुभवी दर्यावर्दी होते. कित्येक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता.

Albert Richardson.JPGफर्स्ट मेट अल्बर्ट रिचर्डसन

न्यूयॉर्क बंदरातून निघाल्यापासून दोन दिवसांनी मेरी सेलेस्टीने न्यूयॉर्क बंदराच्या ईशान्य दिशेला सुमारे तीनशे मैलांवर एका जहाजाबरोबर संदेशांची देवाण-घेवाण केली होती. त्यानंतर मात्रं कोणाशीही मेरी सेलेस्टीचा संपर्क झालेला नव्हता.

मेरी सेलेस्टी न्यूयॉर्क बंदरातून बाहेर पडल्यावरही कॅप्टन मूरहाऊसचं डेल ग्रेटीया जहाज बंदरातच होतं. जहाजावरुन नेण्यात येणारा माल अद्याप धक्क्यावर न आल्याने त्यांना न्यूयॉर्कमध्येच प्रतिक्षा करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. अखेर पेट्रोलची १७३५ पिंप जहाजावर चढवण्यात आल्यानंतर १५ नोव्हेंबरला डेल ग्रेटीयाने न्यूयॉर्क बंदर सोडलं आणि भूमध्य समुद्राचा मार्ग धरला.

डेल ग्रेटीयाने न्यूयॉर्क बंदर सोडल्यापासून सुमारे पंचवीस दिवसांनी ते जिब्राल्टरच्या पश्चिम किनार्‍यापासून सुमारे ६०० मैलांवर पोहोचलं होतं. ४ डिसेंबर १८७२ ला डेल ग्रेटीया ३८'२०'' अंश उत्तर अक्षवृत्त आणि १७'१५'' अंश पश्चिम रेखावृत्तावर होतं. ( सागरावरील कालगणनेप्रमाणे हा दिवस ५ डिसेंबरही सांगितला जातो. सागरावरील कालगणना मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत न करता, माध्यान्हापासून दुसर्‍या दिवशीच्या माध्यान्हीपर्यंत मोजला जातो ).

दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला डेल ग्रेटीयाचा नॅव्हीगेटर जॉन जॉन्सनला दूर समुद्रात सुमारे पाच मैलांवर एक जहाज दिसून आलं! त्या जहाजाची अवस्था पाहून जॉन्सन काळजीत पडला होता. जहाजावर कोणाचंही नियंत्रण नसल्यासारखं ते लाटांवर हेलकावे खात होतं. जहाजाची शिडं किंचीत फाटलेल्या अवस्थेत दिसत होती. जॉन्सनने सेकंड ऑफीसर जॉन राईटचं तिकडे लक्ष्यं वेधलं. त्या जहाजाची अवस्था पाहिल्यावर त्यालाही आश्चर्य वाटलं. जहाजाजवळ पोहोचल्यावर कॅप्टन मूरहाऊसला आश्चर्याचा धक्काच बसला.

ते जहाज दुसरं-तिसरं नसून मेरी सेलेस्टी होतं!

मेरी सेलेस्टी पाहून मूरहाऊस थक्कं झाला! त्याच्या अंदाजानुसार मेरी सेलेस्टी एव्हाना इटलीला पोहोचायला हवं होतं!

डेल ग्रेटीयावरील खलाशांनी सुमारे दोन तास मेरी सेलेस्टीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं. जहाजाच्या शिडात हवा भरलेली होती. मात्रं जहाज कोणाचंही नियंत्रण नसल्यासारखं जिब्राल्टरच्या दिशेने भरकटत होतं. डेकवर एकही माणूस दिसत नव्हतं. जहाजावरुन धोक्याचा संदेशही येत नव्हता.

डेल ग्रेटीयाचा चीफ मेट ऑलिव्हर डेव्हू मेरी सेलेस्टीवर चढला. संपूर्ण जहाजावर कोणाचाही मागमूस नव्हता! जहाजावरील एकूण एक गोष्ट भिजून ओलीचिंब झालेली होती! जहाजावरील एकच पंप चालू अवस्थेत होता. उरलेल्या दोन पंपांचे भाग सुटे करुन ठेवलेले आढळले होते. दोन डेकमधील जागेत आणि जहाजाच्या आत साडेतीन फूट् पाणी भरलेलं होतं. मात्रं पाणी भरुनही जहाज बुडण्याच्या स्थितीत मात्रं नव्हतं. अद्यापही ते बर्‍यापैकी सुस्थितीत होतं!

जहाजाच्या पुढील आणि मागील भागातील डेकवर येणारी हॅच उघडी होती, परंतु डेकवर येणारं मुख्यं दार मात्रं बंद होतं. जहाजाचं घड्याळ बंद पडलेलं होतं. कंपासची पूर्ण वाट लागलेली होती. जहाजावरील सेक्स्टंट आणि मरीन क्रोनोमीटर गायब होता. जहाजावरील एकुलती एक लाईफबोट गायब होती. जहाजावरील शिडाचा मुख्य दोर जहाजाच्या मागील भागातील एक हूकला बांधलेला आढळून आला! दोराचं दुसरं टोक लाटांवर हेलकावे खात होतं! जहाजाचं लॉगबुक वगळता इतर सर्व कागदपत्रं गायब होती.

डेव्हू डेल ग्रेटीयावर परतला. कॅप्टन मूरहाऊसची भेट घेऊन त्याने सगळी हकीकत त्याला सांगितली. चार्ल्स ऑगस्टस अँडरसन आणि चार्ल्स लुंड हे दोन खलाशी मेरी सेलेस्टीवर चढले आणि डेल ग्रेटीयापाठोपाठ ते जिब्राल्टर बंदरात आणलं.

मेरी सेलेस्टीवरील दारुची सर्व पिंपं बंद असल्याचं दिसून आलं होतं. परंतु जिनोआ बंदरात ही पिंपं उतरवण्यात आल्यावर त्यापैकी नऊ पिंपं रिकामी असल्याचं आढळून आलं! सहा महिने पुरेल इतकी अन्नसामग्री आणि पिण्याचं पाणी जहाजावर आढळून आलं होतं. जहाजावरील खलाशांकडे असलेल्या मौल्यवान चीजवस्तू आणि पैशांनाही हात लावलेला दिसत नव्हता!

जिब्राल्टरच्या रॉयल अ‍ॅडमिरल्टी कोर्टाने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले. डेल ग्रेटीयाच्या कॅप्टन आणि खलाशांच्या धैर्याची कोर्टाने विशेष प्रशंसा केली.

मेरी सेलेस्टीवरील कॅप्टन ब्रिग्ज आणि इतर नऊ जणं हवेत विरुन जावं तसे अदृष्यं झाले होते! त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही!

*****************************************************************************************

मेरी सेलेस्टीवर नेमकं काय झालं असावं याविषयी अनेकांनी वेगवेगळे तर्क मांडले.

पहिला तर्क मांडण्यात आला तो म्हणजे दारूच्या पिंपांचा भडका उडण्याचा. दारुच्या १७०१ पिंपांपैकी ९ पिंपे रिकामी होती. बाकीच्या सर्व पिंपांप्रमाणे पांढर्‍या ओकच्या लाकडापासून न बनता ही पिंपे लाल ओकच्या झाडापासून बनवलेली होती. रेड ओकच्या लाकडातून द्रव अथवा वायुपदार्थ जास्तं प्रमाणात झिरपण्याची शक्यता असते. दारुच्या नऊ पिंपांतून दारु झिरपून तिथे दारु वाफ जमा झाली असावी.

काही कारणामुळे कॅप्टन ब्रिग्जने दारुची पिंपं उघडण्याची आज्ञा दिली आणि हवेच्या संपर्कात आल्याने आणि थोड्याशा घर्षणाने वाफेने आग पकडली! कॅप्टन ब्रिग्जने यापूर्वी कधीही दारू अथवा कोणत्याही ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक केलेली नव्हती, त्यामुळे अचानक लागलेल्या या आगीमुळे घाई-गडबडीतच त्याने जहाज सोडण्याचा निर्णय घेतला असावा. सर्व़जण लाईफबोटीत उतरल्यावर दोरखंडाच्या सहाय्याने लाईफबोट जहाजाला बांधण्यापूर्वीच समुद्राच्या अंतःप्रवाहाच्या जोराने लाईफबोट जहाजापासून दूर लोटली गेली आणि खुल्या समुद्रात सर्वांसह बुडाली अथवा सर्वजण भुकेमुळे मरण पावले.

त्याच सुमाराला अटलांटीकमध्ये वादळाची नोंद करण्यात आली होती. कदाचित एक शक्यता अशीही होती की लाईफबोट जहाजाच्या मागे बांधलेली असताना दोर तुटून ती भरकटली असावी. खुल्या समुद्रात लहानशा लाईफबोटीवर तग धरणं दहा जणांना अशक्यंच होतं.

मात्रं या तर्काप्रमाणे विचार केल्यास डेल ग्रेटीयावरील खलाशांना तसेच जिब्राल्टर इथे तपासणी करणार्‍या कोणालाही मेरी सेलेस्टीच्या डेकवर जळाल्याची कोणतीही खूण आढळून आली नव्हती. त्याचप्रमाणे जळालेल्या दारुचा वासही आढळून आला नव्हता. दारूची नऊ पिंपं रिकामी होण्यामागचं नेमकं कारण काय असावं याचं कोणतंही तर्कशुध्दं स्पष्टीकरण करता येत नव्हतं.

दुसरी शक्यता व्यक्तं करण्यात आली ती म्हणजे चाचेगिरीची. तुर्कॉ चाच्यांचा त्याकाळात अटलांटीकमध्ये प्रादुर्भाव होता. मेरी सेलेस्टीवरील सर्वांची हत्या करून चाचांनी त्यांची प्रेते समुद्रात फेकून दिली. मात्रं या तर्काप्रमाणे विचार केला तर मेरी सेलेस्टीवर कोणत्याही संघर्षाची अथवा मारामारी झाल्याची खूण आढळून आली नाही. जहाजावरील दारूच्या बाकीच्या पिंपांना हात लावण्यात आला नव्हता, तसेच कोणत्याही मौल्यवान चीजवस्तूलाही स्पर्श करण्यात आला नव्हता.

आणखीन एक तर्क व्यक्तं करण्यात आला तो म्हणजे खलाशांच्या बंडाचा! मेरी सेलेस्टीवरील खलाशांनी बंड करुन कॅप्टन ब्रिग्ज आणि त्याच्या कुटुंबाची हत्या केली, आणि ते लाईफबोटीतून निसटले. मात्रं या तर्काला कोणताही आधार नव्हता. फर्स्ट मेट अल्बर्ट रिचर्डसन आणि मेरी सेलेस्टीवरील इतर खलाशांचा पूर्वेतिहास पाहता ते सर्वजण प्रामाणिक आणि आपल्या कामात पारंगत होते. कॅप्टन ब्रिग्जबद्दल सर्वांना आदर होता.

आणखीन एक तर्क व्यक्तं करण्यात आला तो म्हणजे रिकाम्या नऊ पिंपातील दारु प्यायल्यावर नशेने धुंद झालेल्या खलाशांनीच कॅप्टन ब्रिग्ज आणि त्याच्या परिवाराची हत्या केली. त्यानंतर बोटीवरील नॅव्हीगेशनला आवश्यक उपकरणे नष्ट करुन त्यांनी लाईफबोटीवरुन काढता पाय घेतला. अर्थात या तर्काप्रमाणे विचार केल्यास मेरी सेलेस्टीवर कोणत्याही संघर्षाचं पुसटतं चिन्हंही दिसून आलं नव्हतं. तसंच कॅप्टन ब्रिग्जचा जहाजावर मद्यपानाला सक्तं विरोध असल्याचंही सर्वांना ठाऊक होतं!

मेरी सेलेस्टीवरील दहा माणसांच्या गायब होण्यामागचं कोणतंही स्पष्टीकरण कधीही मिळालं नाही!

***************************************************************************************************

संदर्भ :-

बर्म्युडा ट्रँगल - चार्ल्स बार्लीत्झ
डेव्हील्स ट्रँगल - रिचर्ड वायनर
इंटरनेटवरील अनेक साईट्स
विकिपिडीया

सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही सगळी नावं आणि सनसनावळ्यांमुळे थोडे कन्फ्युजिंग वाटतेय. पण मस्तच झालेत सगळे भाग.

खुप छान मालिका सुरू आहे. हा भागही तितकाच उत्कंठावर्धक आहे जितके आधीचे तिन भाग. आता पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

त्या बाळाचा फोटो पाहुन वाईट वाटले. खरच काय झाले असेल या कुटुम्बाचे.:अरेरे:

छान चालू आहे सिरीज. पुढचे टाका सवडीने.

सहीच!!!!, कदचित हीच ती ओढ असेल जी मला मर्चंट मरिनर व्हायला भाग पाडत होती!!!! तो थरार ती रहस्ये!!! काही अनाकलनीय नैसर्गिक, महासागराच्या पोटातुन उफाळणारी तर काही अशी, अनुत्तरीत!!! (अर्थात आमच्या मातुश्रींनी आम्हांस दर्यावर्दी होऊ दिले नाही हा भाग अलाहिदा )

मस्तय. घरातल्या सर्वच खलाश्यांना या लेखांची लिंक पाठवते आहे.
अ‍ॅड्मिन, याची लेखमालिका बनवाल का? म्हणजे शोधयला सोपे पडेल.

स्पार्टाकस,

कथेबद्दल धन्यवाद! Happy बर्म्युडा त्रिकोणाच्या बाहेरही अशा घटना घडतात.

एक शंका आहे. विकिवर बघितलं तर जहाजाला दोनहून जास्त शिडं दिसतात. उरलेली नंतर बसवली होती का?

आ.न.,
-गा.पै.