अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा!
खात्री असणार्यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून आणि शास्त्रीय पुराव्यानिशी सिध्द करुन घेण्यावर त्यांचा भर असतो.
परंतु अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून कोणी चक्कं भुतांचा फोटो काढला तर??
१९२४ सालच्या डिसेंबर महिन्यात वॉटरटाऊन या जहाजाने न्यूयॉर्क बंदरातून कॅलिफोर्नियाची वाट धरली होती. वॉटरटाऊन हे तेलाची वाहतूक करणारं - ऑईल टॅंकर - जहाज होतं. न्यूयॉर्कमधून अटलांटीक महासागरातून पनाम कालवा ओलांडून पॅसिफीक मध्ये प्रवेश करणं आणि कॅलिफोर्नियाचा पश्चिम किनारा गाठणं असा जहाजाचा नियोजीत प्रवासमार्ग होता.
एस्. एस्, वॉटरटाऊन
४ डिसेंबर रोजी एका साठवण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी जेम्स कर्टनी आणि मायकेल मिहान हे खलाशी टाक्यात उतरले होते. त्यांच्या दुर्दैवाने टाक्यातून अनपेक्षीतपणे झालेल्या वायुच्या गळतीमुळे टाक्यातील तेलाने पेट घेतला. कर्टनी आणि मिहान यांना टाक्यातून बाहेर पडण्याचा बराच प्रत्यत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही. टाक्यातच होरपळून दोघांचाही मृत्यू झाला. तत्कालीन प्रथेप्रमाणे दोघांनाही समुद्रात जलसमाधी देण्यात आली आणि जहाज पुढे निघालं.
सर्व जहाजावर कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूमुळे दु:खाची छाया पसरलेली होती.
लवकरच या छायेचं भीतीमध्ये रुपांतर झालं.
दुसर्या दिवशी जहाजावरील टेहळ्याला समुद्रात दूरवर काही अंतरावर पोहत असणारी दोन माणसं दिसली. त्याने ताबडतोब कॅप्टन कीथ ट्रेसी याचं तिकडे लक्षं वेधलं. भर समुद्रात पोहत असलेल्या या दोघांना पाहून कॅप्टन ट्रेसी बुचकळ्यात पडला. त्यांना काही मदत हवी आहे का हे पहावं या हेतूने त्याने आपलं जहाज त्यांच्या दिशेला वळवलं. काही अंतर त्या दोघांजवळ जाताच जहाजावरील सर्वांना जबरदस्तं धक्का बसला!
"माय गॉड! हे तर कर्टनी आणि मिहान आहेत!" कॅप्टन ट्रेसी न राहवून ओरडला.
काही काळ एका लयबध्द गतीने जहाजाला समांतर पोहत राहील्यावर कर्टनी आणि मिहान अचानकपणे दिसेनासे झाले!
जहाजावरील कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण जे पाहीलं ते सत्यं की स्वप्नं असा कॅप्टन ट्रेसीसह सर्वांना प्रश्न पडला होता.
सुरवातीच्या धक्क्यातून सावरल्यावर कॅप्टन ट्रेसीने या घटनेची जहाजाच्या लॉगबुकमध्ये सविस्तर नोंद केली. कॅप्टनच्या हकीकतीवर साक्षीदार म्हणून जहाजावरील सर्वांनी सह्या केल्या होत्या.
दुसर्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तासाभराने कर्टनी आणि मिहान पुन्हा जहाजाच्या बाजूला प्रगटले! टेहळ्याने कॅप्टनच्या कानावर ही गोष्टं घातल्यावर सर्वजण पुन्हा डेकवर जमा झाले. यावेळीही आदल्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली. काही काळ जहाजाला समांतर पोहून झाल्यावर दोघंही अदृष्यं झाले!
"दिवसाच्या कोणत्याही वेळेला ते जहाजाच्या बाजूने पोहताना दिसत असंत!" कॅप्टन ट्रेसीने लॉगबुकात नोंद केली, "जहाजाचा वेग कितीही कमी-जास्तं झाला तरी ते त्या वेगाने जहाजाला समांतर पोहत असत! मात्रं जहाजापासून एका ठराविक अंतरावरुन त्यांचा हा पोहण्याचा कार्यक्रम चालत असे. जहाजाच्या जवळ येण्याचा त्यांनी प्रयत्नं केला नाही. समुद्रात उतरुन त्यांच्या जवळ जाऊन तपास करण्याची आमच्यापैकी कोणापाशीही हिंमत नव्हती!"
कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या प्रगट होण्याच्या आणि अदृष्य होण्याच्या प्रत्येक वेळेची काळजीपूर्वक नोंद लॉगबुकमध्ये करुन ठेवली होती. आपल्या सर्व सहकार्यांच्या त्यावर सह्या घेण्यास तो विसरला नाही.
अटलांटीक महासागरातून जहाजाने पनामा कालव्यात प्रवेश केला आणि कर्टनी आणि मिहान एकदम गायब झाले!
पनामा कालव्यातून बाहेर पडून जहाज कॅलिफोर्नियाला पोहोचलं. कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूचा आणि 'पुनरागमना'चा तपशीलवार रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना केला. सुरवातीला कंपनीच्या अधिकार्यांचा यावर अजिबात विश्वास बसला नाही. अत्यंत संशयाने ते या सर्व प्रकाराकडे पाहत होते. परंतु जहाजाच्या लॉगबुकमधील नोंदी पाहिल्यावर आणि इतर खलाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी परतीच्या वाटेवर कर्टनी आणि मिहान पुन्हा दिसून आल्यास कॅप्टन ट्रेसीने त्यांचा फोटो काढावा अशी सूचना केली! त्यासाठी ट्रेसीला एक कॅमेरा आणि फिल्मही देण्यात आली.
वॉटरटाऊन जहाजाने कॅलिफोर्निया सोडलं आणि न्यूयॉर्कच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. अमेरिकेच्या पश्चिम किनार्याने दक्षिणेला येत त्यांनी पनामा कालवा गाठला आणि अटलांटीकमध्ये प्रवेश केला.
अटलांटीक महासागरात जहाज शिरताच दुसर्याच दिवशी कर्टनी-मिहान जहाजाशेजारी हजर झाले! जहाजाला समांतर पोहत राहण्याचा त्यांचा शिरस्ता पुन्हा सुरु झाला!
एक दिवस फोटो घेण्याइतका स्वच्छ सूर्यप्रकाश दिसू लागताच कॅप्टन ट्रेसीने जहाजाच्या तिजोरीत ठेवलेला आपला कॅमेरा बाहेर काढला. तो एक साधा बॉक्स कॅमेरा होता. जहाजाला समांतर पोहणार्या कर्टनी आणि मिहान यांच्यावर कॅमेरा रोखून कॅप्टन ट्रेसीने एकापाठोपाठ एक सहा फोटो काढले. फिल्म संपताच कॅमेरा पुन्हा जहाजाच्या तिजोरीत ठेवून त्यावर सील करण्यात आलं. कॅप्टन ट्रेसीने आपल्या लॉगबुकात तशी नोंद करुन ठेवली.
कॅप्टन ट्रेसीने फोटो काढल्यानंतरही काही दिवस कर्टनी आणि मिहान यांचं जहाजाच्या बाजूने पोहण्याचं सत्रं सुरूच राहीलं. समुद्राच्या ज्या भागात त्यांचा मृत्यू झाला होता, तो भाग ओलांडून जहाज उत्तरेला निघाल्यावर मात्रं ते दोघं पुन्हा कोणाच्याही नजरेस पडले नाहीत!
यशावकाश जहाजाने न्यूयॉर्क गाठलं. बंदरात पोहोचताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीसांच्या साक्षीने जहाजाच्या तिजोरीचं सील उघडण्यात आलं आणि आतला कॅमेरा आणि फिल्म प्रोसेस करण्यासाठी एका स्टुडीओत नेण्यात आली!
स्टुडीओत कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि कॅप्टन ट्रेसी अस्वस्थंपणे वाट पाहत बसले होते. एकेक फोटो धुवून झाला की तत्काळ पाहीला जात होता.
पहिले दोन फोटो हलले होते. त्यात काहीच दिसत नव्हतं!
तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या फोटोत समुद्राच्या लाटाच दिसत होत्या!
सहावा फोटो धुतला गेला!
तो पाहिल्यावर मात्रं कॅप्टन ट्रेसीने सुटकेचा नि:श्वास टाकला. तर कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आश्चर्याने थक्कं झाले होते.
सहाव्या फोटोत जहाजाजवळ पोहोणार्या दोघांची डोकी स्पष्टं दिसत होती!
हा फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द होताच प्रचंड खळबळ उडाली. कर्टनी आणि मिहान यांच्या नातेवाईकांनी, मित्र-मंडळींनी आणि त्यांच्या अनेक जुन्या सहकार्यांनी फोटोवरुन दोघांना ओळखलं!
स्टुडीओमध्ये आणि एका शास्त्रीय प्रयोगशाळेत कॅमेरा आणि फोटोंच्या निगेटीव्हची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. सर्व तपासणी आणि विविध चाचण्यांनंतर फोटोच्या अस्सलपणाची सर्वांची खात्री पटली.
सागरावरील या अभूतपूर्व घटनेचं कोणतंही शास्त्रीय स्पष्टीकरण देणं कोणालाही शक्यं झालं नाही!
( टीप : वॉटरटाऊन जहाजावरील या घटनेबद्दल पुढे अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या. हा फोटो खोटा असल्याचे अनेकांनी दावे केले. परंतु तसा निर्णायक पुरावा कोणालाच देता आला नाही. ही जुनी निगेटीव्ह आता नष्टं झाल्याने त्यावर नव्याने शास्त्रीय संशोधन होणं आता अशक्यं आहे. )
*****************************************************************************************************
संदर्भ :-
The Ghost Tale - डग्लस मॅफर्ड
Ghost Ships - टी. ड्युप्लेन
Ocean Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
खुपच उत्कंठावर्धक आणि थरारक
खुपच उत्कंठावर्धक आणि थरारक मालिका आहे! वाचताना थोडीशी भीती वाटते पण तरी ही मजा येतेय वाचायला!
ओह ! असही होऊ शकते थरारक !
ओह ! असही होऊ शकते
थरारक !
इंटरेस्टिंग!!!
इंटरेस्टिंग!!!
डाव्या बाजूचा चेहरा चार्ली
डाव्या बाजूचा चेहरा चार्ली चॅप्लीनसारखा आहे तर उजवा आईन्स्टाईनसारखा दिसतो.
कथा मस्त आहेत या.नेहमीप्रमाणेच स्पार्टा.
बापरे पहिल्यांदाच भुतांचे
बापरे पहिल्यांदाच भुतांचे फोटो पाहीले.
OMG! एकसे एक कथा.
OMG! एकसे एक कथा.
भुतांचा फोटो !!!!! टेरिफीक
भुतांचा फोटो !!!!!
टेरिफीक !!!
ही कथा सुद्धा मस्तच
ही कथा सुद्धा मस्तच
मालिकेतील प्रत्येक कथेत
मालिकेतील प्रत्येक कथेत एकापेक्षा एक थरारक अनुभव वाचायला मिळत आहेत. पुढील कथेच्या प्रतिक्षेत..............
सुंदर आहे कथा..............
सुंदर आहे कथा.............. तुम्ही भाषांतर करत आहात ? असल्यास शैली चांगली आहे........
उदयन, भाषांतर नाही. ओशन
उदयन,
भाषांतर नाही. ओशन ट्रँगल आणि इतर पुस्तकं केवळ संदर्भ म्हणून वापरली आहेत. ज्या कथा भाषांतर केल्या आहेत ( केनेथ अँडरसनच्या शिकारकथा ) त्या प्रत्येक कथेत मूळ लेखकाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
अच्छा... म्हणजे संदर्भ वापरुन
अच्छा... म्हणजे संदर्भ वापरुन कथा बनवली गेली.... मग अजुन चांगले आहे...
भाषांतर केलेले वाटले नव्हते कारण शैली चांगली आहे .. म्हणुन विचारले
स्पार्टाकस लगे रहो, उत्तम
स्पार्टाकस लगे रहो, उत्तम विषय निवडलाय या वेळीसुध्दा
बापरे पहिल्यांदाच भुतांचे
बापरे पहिल्यांदाच भुतांचे फोटो पाहीले.>>> व्हॉट्स्सपवर आहात का? तिथे बरेच फिरताना दिसतात
हि कथा सुद्धा ईंटरेस्टींग, माहौल बनतोय हळूहळू, पाच-सहा कथांत संपवू नका मालिका, येऊ द्या जास्तीत जास्त
मस्त ... मजा येतेय वाचायला ..
मस्त ... मजा येतेय वाचायला .. लिहित राहा ...
कुठली पुस्तक आहेत ते पण सांगा न प्लीज ..
लाटांच्या आकारामुळे त्या
लाटांच्या आकारामुळे त्या माणसांच्या चेह्र्यासारख्या दिसताहेत . म्हणे भूतांचे फोटो .
<हि कथा सुद्धा ईंटरेस्टींग,
<हि कथा सुद्धा ईंटरेस्टींग, माहौल बनतोय हळूहळू, पाच-सहा कथांत संपवू नका मालिका, येऊ द्या जास्तीत जास्त> +1
तीनही कथा एकानंतर एक वाचल्या.
तीनही कथा एकानंतर एक वाचल्या. मस्त आहेत. काही महिन्यांपुर्वी हिस्ट्री आणि डिस्कव्हरी चॅनेल्सवर अशा कथांची सिरीज लागत असे, आता नाव आठवत नाही, असो, लगे रहो
मस्त!
मस्त!
क्लास स्टोरी
क्लास स्टोरी
झक्कास...
झक्कास...
verrry interesting!!! just
verrry interesting!!! just finished reading all three parts.. great!!
तीनही भाग वाचले, पण ऑफिसमधून
तीनही भाग वाचले, पण ऑफिसमधून प्रतिसाद देता आला नव्हता म्हणून तिघांना सामाईक एकच .. मस्त आणि ईंटरेस्टींग !!
बापरे।
बापरे।
Wow 2014 च्या आसपास वाचलेली
Wow 2014 च्या आसपास वाचलेली ही सिरीज....आता इतक्या वर्षांनी पूर्ण सिरीज पुन्हा वाचून काढणार....
मला बाकी लेखन वाचता येत नाहीय
मला बाकी लेखन वाचता येत नाहीय....
https://www.maayboli.com/user
https://www.maayboli.com/user/41403/created
थँक्स आनंद... पण मला का
थँक्स आनंद... पण मला का दिसेना ते
ओह ! खूपच रोचक कथा (घटना)..
ओह ! खूपच रोचक कथा (घटना)..
ढापाढापी मूळे काढून टाकलेलं
ढापाढापी मूळे काढून टाकलेलं ना या आयडीला?
Pages