पौष्टीक दडपे पोहे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 August, 2014 - 07:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या जाडे पोहे
२ वाट्या गाजराचा किस
१ वाटी खवलेले ओले खोबरे
१ वाटी डाळींबाचे दाणे
पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
१ मोठा कांदा चिरून
अर्धा वाटी चिरलेली कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या कापुन
१ चमचा साखर
चवीनुसार मिठ
अर्धा लिंबू (लिंबाचा रस)
फोडणी - तेल, राई, जिर, हिंग

क्रमवार पाककृती: 

पोहे थोडे भाजून घ्या. भाजलेल्या पोह्यांसकट वरील फोडणी सोडून सर्व साहित्य एकत्र करुन एकजीव करा. त्यावर फोडणी तयार करून ओता व पुन्हा एकजीव करून अर्धा तास मुरण्यासाठी ठेउन द्या. अगदीच राहवत नसेल तर खाउ शकता असेही छानच लागतात. Happy

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

पोहे भाजल्यामुळे खमंग वास येतो.
पापडही भाजून ह्यावर कुस्करून घालतात तसेच नारळ पाणीही घालतात. त्या पद्धतीनेही मी करते. तेही चविष्ट लागतात.

तुमच्या आवडीनुसार कोबी, बिट, टोमॅटो तसेच कच्च्या खाऊ शकणार्‍या भाज्या घालू शकता.

वरील पाककृती मी एका पुस्तकात पाहून चेंज म्हणून केली होती. मुळ रेसिपी बर्‍याच माबोकर मैत्रीणींनी प्रतिसादात दिली आहे. त्यात अजुन फेरफार करुनही छान रेसिपी प्रतिसादात दिल्या आहेत. त्या एकत्र वाचता याव्यात म्हणून इथे एकत्र देत आहे.

मुग्धानंद

पातळ पोहे(चिवड्याचे) पाखडुन स्वच्छ करुन घेणे. एक मुठ भर पोह्यांचा एका मोठ्या पातेल्यात थर देणे. त्यावर एक थर ओल्या खोबर्‍याचा. मग पुन्हा पोह्यांचा, मग किसलेला कांदा, काकडी, गाजर हवे असल्यास, बारीक चिरलेला टोमॅटो यांचा थर, परत पोह्यांचा थर, त्यावर, थोडे मेतकुट, मीठ, साखर इ. घालणे. हे थोडा वेळ दडपुन ठेवणे, म्हणजे खोबरे, कांदा आदिचा ओलावा पोह्याला लागतो.
फोडणी-- तेल, जिरे, मोहोरी, कढिलिंब, हळद, हिंग, हवे असल्यास शेंगादाणे.
फोडणि करुन घालणे.
मग सगळे व्यवस्थित हलविणे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे

रॉबिनहुड यांनी दडपे पोह्यांच्या विविध प्रकारांसाठी दिलेली लिंक https://www.youtube.com/results?search_query=dadpe+pohe+recipe

शुम्पी

पातळ पोहे , तळलेली सांडगी मिरची आणि दाणे मात्र मस्ट.
टोमॅटो, लिंबू, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचा ओलेपणा पुरतो पोह्याला, अगदीच वाटलं तर मी ताकाचा हबका मारते क्वचित.
नीधप

कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिराचिरीच्या गोष्टी व्हायच्या आधीच पोह्यांमधे नारळाचा चव, मीठ (इथे शिजवायचं किंवा उकळायचं नसल्याने मी सैंधव घालते) आणि किंचित साखर मिक्स करायची. नारळाच्या चवाने पोहे ओले होणे सुरू होते. डाळिंबाचे दाणे, किसलेलं गाजर, कोचलेली काकडी वगैरे जे काय तयार असेल ते आधी ढकलायचे. किंवा मग जसे जसे होत जाते तसे ढकलायचे.
मग कां, को आणि टो चिरलेले घालून वरून लिंबू पिळून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे.
दाणे चांगले भाजलेले असतील तर इथेच घालायचे. भाजले नसतील तर आधी भाजून घ्यायचे. जरा जास्तच भाजायचे. आणि दाणे सढळ हाताने घालायचे.
मग फोडणीच्या वस्तू जमवायच्या. मिरची धुवून चिरून घेणे, कढीपत्ता धुवून चिरून, आले किसून घेणे वगैरे. फोडणी करायच्या आधी सांडग्याच्या मिरच्या कढल्याला तेलाचा हात पुसून भाजून घ्यायच्या (तळणापेक्षा तेल कमी, अर्थात खमंगपणा पण कमी होतोच) त्या पोह्यांवर आधी घालायच्या नाहीत. त्यातला फक्त चुरा भुरभुरायचा पोह्यांवर.
मग फोडणी करून ती जिवंत फोडणी ओतायची पोह्यांवर. सगळं व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून झाकणी घालून वरून दाबून ठेवायचं. १५ मिनिटांनी घ्यायचे. तळलेली मिरची चुरून किंवा नुसतीच प्लेटीवर सजवायची.

झंपी
आम्ही ह्यात हिरवी मिरची तळून कुस्करून घालतो जर दह्यातील मिरची नसेल तर... पोह्याचा पापड, घरचा उडदाचा पापड, मिरगुंड, बटाटा पापड(हे मी माझ्यासाठी) वरून भरपूर कों, लिंबू, बारीक शेव. जरासं लाल तिखट भुरभुरवायचं आणी एक गरम चहा.
एक घास ह्याचा, एक घोट चहाचा.
हिरवी मिरची तिखट हवी.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याचा एक चीपर व्हर्जन म्हणजे तेल तिखट पोहे. : पातळ पोहे, तिखट, गोडा मसाल,, चिरलेला कांदा, मीठ कच्चे शेंगदाणे आणि कच्चे तेल. एकत्र मिसळायचे असली तर कोथिबीर नाहीतर कांदा पात चिरून.

हैद्राबादकडे पोहे लावून खाउ असे म्ह्णतात. त्यात आंब्याच्या लोणच्याचा खार मिसळतात.

लई भारी लागतं हे. Happy
माझी आई करती हे, पण पोह्यांना हाताने मस्त तुप चो़ळुण , वरुन ओलं खोबरं कच्चे कांदे बारिक मिर्ची, टोमेटो चे बारीक तुकडे झडवुन लई भारी लागतं.
पण ४० मिनीटे नाही लागत, १०-१५ मिन्टात होतं.

हे बघा, सारखा सारखा हा धागा डोळ्यापुढे आणू नका. मागच्या आठवडयात कंपलसरी दोनदा दडपे पोहे करून खावे लागले. आता सध्या घरातले पोहे संपलेत. थोडातरी दुसरयाचा विचार करा.

जागू तशीही दुष्टच आहे. Proud

काल इथल्या 2-3 पद्धती मिक्स करून उरलेल्या भाताचा प्रकार केला.

भात गरम करून त्यात ओलं नारळ (फ्रोझन फ्रॉम asian shop), कोथिंबीर, कच्चा कांदा, टोमॅटो बारीक चिरून टाकला.त्यात मेतकूट, मीठ, साखर, लिंबाचा रस टाकून सगळं मिक्स केलं. फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता आणि शेंगदाणे फ्राय करून त्यात मिक्स केले आणि खाल्ला. फार फार छान लागला हा दडपे भात!!

यम्मी प्रकार एकेक!
लाल पोह्यांसाठी काही खास रेसिपी आहे का कोणाकडे?

Pages