सह्याद्रीच्या कुशीत अथवा दख्खनच्या पठारावर, विदर्भाच्या रणरणत्या ऊन्हात अथवा कोकणच्या निसर्गमय किनारपट्टीत, दगडामातीच्या ह्या पराक्रमी राष्ट्राने साधारणतः एकाच संस्कृतिक बैठकीचा वारसा देऊन वाढवलेल्या आपल्या सगळ्यांची छाती 'मराठी अभिमानगीत' ऐकतांना किंवा 'गर्जा महाराष्ट्र माझा' म्हणतांना फुलून न आली तर नवलच.
पण सतत खुणावणार्या नव्या ध्येयांना गवसणी घालण्याच्या ऊद्देशाने म्हणा किंवा कालचक्राच्या गतीला शरण जाऊन म्हणा आपल्यापैकी बरेच जण सातासमुद्रापार प्रवास करीत आहेत किंवा प्रवास करीत परदेशी मातीत स्थिर झाले आहेत. ह्या प्रवासांमध्ये, वैयक्तिक किंवा व्यावसायिक, सामाजिक किंवा कौटुंबिक, खाजगी किंवा सार्वजनिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक, वागण्यातून अथवा बोलणयातून अश्या अनेकानेक पातळ्यांवर दिवसातून अगणितवेळा आपल्याला विविधतेला सामोरे जावे लागते. आजकालच्या 'वसुधैव कुटुंबकम्' किंवा 'global citizen' च्या जमान्यात मिनिटागणिक विविधता दिसून येते आणि त्या विविधतेचा अंगिकार करून आपले व्यक्तिमत्व आणि पर्यायाने आयुष्यंच सर्वसमावेषक बनवण्याचा प्रयत्न मी, तुम्ही आणि आपण सारेच क्षणाक्षणाला करीत आहोत. आपली मराठमोळी संस्कृती आणि मराठी बाणा आपण ऊराशी अभिमानाने कवटाळून असलो तरी 'when in rome do as the romans do' ऊक्तीप्रमाणे वागण्याचे कसब आणि कल्पकताही आपण स्थलकालपरत्वे वापरतच असतो.
तर आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेल्या ह्या विविधतेला चूक किंवा बरोबरची फुटपट्टी न लावता ती आहे तशी स्वीकारून, त्यामागच्या कारणांची मीमांसा करून आणि जमल्यास चारचौघांना तुम्ही अनुभवलेल्या ह्या विविधतेबद्दल सांगून 'शहाणे करून सोडावे सकलजन' असे ह्या धाग्याचे प्रयोजन आहे. कुठलीही ऊचनीच भावना न ठेवता, ईतर धर्मांना अथवा त्यांच्या प्रथांना कमी न लेखता जर भारतीयेतर संस्कृतीतल्या वर्तमानाबद्दल तुमच्याकडे काही अनुभव किंवा माहिती असल्यास ईथे नक्की शेअर करा, अगदी वेगळ्या देशांमधले कॉर्पोरेट जगत, टॅक्स, ईकॉनॉमी, बेकारी, स्पोर्ट्स, प्रवास, खानपान, ऊत्सव,नातेसंबंध, कुटुंब, हवामान ई. ई. विविधता सुद्धा.
ऊदा,
ह्या अमुक देशांत घराचे दरवाजे आत किंवा बाहेरच का ऊघडतात, घरांना ऊंबरठे असतात किंवा नसतात?
ह्या अमुक देशात बोलतांना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघणे अपमान समजला जातो तर त्या तमुक देशांत असे न बघणे म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता अथवा सत्य लपवणे असे समजले जाते.
स्वीडीश लोक कसे मुलखाचे मितभाषी असतात आणि तिथल्या राजकारणात कसा प्रामुख्याने स्त्रियांचा वरचष्मा आहे.
केवळ फुटबॉल स्पर्धेदरम्यानच ऐकू येणार्या ऊरूग्वेमध्ये शेकडो भटकी कुत्री आहेत पण कुत्र्याला साधा दगड मारणे सुद्धा शिक्षापात्र गुन्हा आहे.
न्यूझीलंड मध्ये राष्ट्रगीताबरोबरच राणीच्या 'वेल बिईंगसाठी'ही गाणे म्हणावे लागते.
ग्रीकांचे लग्नातले सोपस्कार आणि रोमन लोकांच्या अंधश्रद्धांची यादी करण्यासाठी तर चार पानंही कमी पडतील.
जापनीज लोकांचा कामसू स्वभाव आणि ब्राझिलियन्सचे पार्टी प्रेम ह्यांचे तुम्ही साक्षीदार आहात का?
नमनालाच घडाभर तेल झाले खरे पण ही विविधता एकाच विषयाशी निगडीत असावी असे नाही तर आधी म्हंटल्याप्रमाणे वैयक्तिक किंवा व्यावसायिक, सामाजिक किंवा कौटुंबिक, खाजगी किंवा सार्वजनिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक, वागण्यातून अथवा बोलण्यातून तुम्हाला दिसून आलेल्या किंवा तुम्ही स्वतः अंगिकारलेल्या अश्या कुठल्याही लहानातल्या लहान अथवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी, प्रथा, फन फॅक्ट्स तुम्ही ईथे सांगू शकता.
छान धागा आहे. सुचेल तसे लिहिन
छान धागा आहे. सुचेल तसे लिहिन लवकरच.