" Hello.....Hello....." पलीकडून काहीच response नाही....." Hello.....Hello.....संज्या....Hello...."," हा.... संजय बोलतोय आपण कोण .... ?" संजय डोळे चोळत उठला… अजूनही त्याची झोप उडाली नव्हती.... " साल्या संज्या..... तुझी सासू बोलतेय... ऊठ... अजून झोपला आहेस... ", त्या आवाजाने संजयची झोप उडाली... " आयला.... तू होय.... काय एवढया सकाळ- सकाळी call केलास... "," गाढवा.... सकाळ- सकाळी ? कूठल्या जगात आहेस तू... ११ वाजले आहेत सकाळचे.... कधीपासून तुला mobile वर call करते आहे मी... कुठे मेला होतास... ... " , " अगं... mobile ... silent वर होता ना …. sorry आणि thanks ... मला उठवण्यासाठी... बरं ... कशाला call केलास ?... " संजय आळस देत म्हणाला... "अबे..... आज आपलं १३ वीचं admission आहे.... विसरलास ना.... यायचं असेल तर ये…. आणि येताना त्या mobile ची पूजा घालून ये.... म्हणे silent वर होता.... मी घेते आहे admission... " असं म्हणत तिने call cut केला... त्याचबरोबर संजयची झोप उडाली... admission.... बापरे... विसरलो कसा.... पटापट त्याने तयारी केली... १२वीचा result, काही महत्त्वाची कागदपत्रे कशीबशी गोळा केली आणि धावाधाव करत संजय कॉलेजमध्ये पोहोचला... घामाघूम अगदी...बघतो तर केवढी मोठी रांग admission ला... पण त्याला त्याची पर्वा नव्हती... तो कोणाला तरी शोधत होता... अखेर , कॅम्पसच्या एका कोपऱ्यात, झाडाखाली त्याला ती बसलेली दिसली.
संजय तिच्या जवळ गेला. " किती शोधलं तुला..... आणि तू इकडे येऊन बसली आहेस... " ती काही बोललीच नाही... संजय तिच्याकडे बघत होता. कोणतीच reaction नाही.संजयला काय बोलावं ते आठवतच नव्हतं. रागावलेली ती त्याच्यावर.... " admission घेतलंस वाटतं.. ?" संजय काहीतरी बोलावं म्हणून बोलला.. तशी तिने त्याच्या डोक्यात टपली मारली. आणि म्हणाली," मी एकटीच घेऊ का admission.... तुला नाही घ्यायचं वाटते... " तसा संजय हसायला लागला... " साल्या.... लाईन बघितलीस केवढी आहे ती.... आज तुला भेटणारच नाही admission... मग मी कशी घेणार admission... मग वेगवेगळ्या वर्गात जावं लागेल आपल्याला... आणि मग माझा अभ्यास , प्रोजेक्ट कोण पूर्ण करून देणार मला... तुझा काका.. ?" संजय सारखा हसतच होता.. " काय झालं रे इतकं हसायला तुला.. ?" पोटात गुच्चा मारत ती म्हणाली," काही नाही गं..." संजय हसू आवरत म्हणाला,"तुला जेव्हा राग येतो ना... तेव्हा तुझ नाक... लाल बुंद होते... टोमेटो सारखं.. " आणि पुन्हा तो हसायला लागला... त्यावर ती अजूनच रागावली.
" श्वेता.... श्वेता.. " लांबून उदय हाका मारत आला. आता हा कशाला आला इथे.... " श्वेता रागातच बडबडत म्हणाली.... ..........." श्वेता.... श्वेता.... इकडे काय करते आहेस गं.. " उदय धावतच आला... " काही नाही... कांदा भजी तळते आहे.... खाणार का.. ? " तसा उदय नाराज झाला आणि आल्या पावली निघून गेला." काय गं... तुझ्यासाठी एवढा तो धावत धावत आला आणि त्याला झिडकारून लावलंस... कसं वाटलं असेल तुझ्या Boy-friend ला.. " ," साल्या संजय... तो त्याचं लायकीचा आहे.. आणि Boy-friend वगैरे काय रे…तसला Boy-friend असेल तर जीव नाही देणार मी ? " ," तू आणि जीव देणार... मग बघायलाच नको... " , " बस झालं आता संज्या..... आणि उद्या वेळेवर ये admission ला… नाहीतर मी घेते admission आणि तू जा उडत... " असं म्हणत श्वेता तरातरा निघून गेली. संजय तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता.. " संजय... " मागून आवाज आला.. मागे नेत्रा उभी होती... " Hi... खूप दिवसांनी.... होतीस कुठे... ? " ," मी तर इकडेच असते रे... पण तुझं कुठे लक्ष असते आमच्याकडे.." संजय जरासा बावरला.... " घेतलंस का admission तू .... संजय ? " नेत्राचा पुढचा प्रश्न... " नाही गं.... लेट झाला ना मला आणि लाईन केवढी आहे बघ... उद्या घेतो ना admission... "," म्हणजे श्वेताने सुद्धा घेतलं नसेल admission... " त्यावर संजय काही बोलला नाही. " बरं, आता काय करतो आहेस.. खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही आपण... चल ना आज जाऊया... " म्हणत नेत्राने संजयचा हात पकडला.. " ठीक आहे.. पण पहिली मी आंघोळ करून येऊ का ... घाई घाईत आंघोळ राहिली माझी.. " ," शी..... !.. घाणेरडा... Darty boy... अजून आंघोळ नाही केलीस तू.. "असं म्हणत नेत्राने संजयला दूर लोटलं... " संजयला माहित होतं कि नेत्राला स्वच्छता खूप आवडते ते ,म्हणून तो पुढे म्हणाला ," ठीक आहे मग.. आंघोळ नंतर करतो ... आपण आताच जाऊया फिरायला. चल. " अस म्हणत संजय नेत्राचा हात पकडायला गेला.. " शी... तूच जा फिरायला... घाणेरड्या... "आणि नेत्रा पळतच गेली. " चला... आता आपण सुद्धा पळूया, नाहीतर दुसरं कोणीतरी येईल.. " संजय घरी परतला.
संजय आणि श्वेता... दोघेही शाळेपासूनचे मित्र... एकाच वर्गातले.. पण एकाच बेंचवर नाही बसायचे. मैत्रीचं कारण.... दोघांची घरे तेव्हा आजूबाजूला होती त्यामुळे शाळेत एकत्र येणं- जाणं असायचं... त्यातूनच त्यांची मैत्री झाली होती. नंतर मात्र श्वेताच्या कुटुंबाने घर बदललं... पण श्वेताने शाळा मात्र बदलली नाही... म्हणून त्यांची मैत्री तशीच टिकून राहिली... शाळा सुटल्यावर वेगळं होण्याची वेळ आली... तरीही दोघांनी एकाच college मध्ये admission घ्यायचं ठरवलं. प्रोब्लेम होता कुठे admission घ्यायचा तो... संजयला science मध्ये इंटरेस्ट होता तर श्वेताला Arts ला जायचं होतं... तरी दोघांना १०वीला ८० % होते, त्यामुळे कोठेही admission मिळालं असतं... शेवटी श्वेताने स्वःतचं मन मारून science ला admission घेतलं, एका अटीवर…. प्रोजेक्ट, अभ्यास पूर्ण करायला मदत करायची... संजयला ते मान्य होतं... आता दोघेही १३वी ला होते.
चांगले मित्र असले तरीही स्वभाव दोन टोकाचे होते. संजय आपला शांत, संयमी, प्रत्येक गोष्ठीचा विचार करणारा, साधा सरळ स्वभावाचा... त्याच्या सगळ्या गोष्ठी कश्या एकदम perfect असायच्या. सगळी काम शांत डोक्याने करायचा. त्या उलट होती श्वेता... बडबडी, बिनधास्त,नेहमी घाईत असणारी. कोणालाही न घाबरणारी,पण तेवढीच प्रेमळ आणि मायाळू होती. कोणालाही त्रास होताना तिला बघवत नसायचे, त्यामुळे प्रत्येक वेळेस तिला कोणीतरी emotional blackmail करायचं आणि ती लगेच मदत करायला तयार असायची. अगदी प्रत्येक वेळेस नाही कारण संजय तिच्या बरोबर नेहमी असायचा. तो कधी कधी श्वेताला सांभाळून घ्यायचा. त्याने तिला किती वेळा सांगितलं होतं कि तुझी बोलण्याची style बदलं, जरा मुलींसारखं वागायचा प्रयन्त कर... पण नाही... तिला ते पसंतच नव्हतं.. " मला वागायचं असेल तसं वागेन मी." हाच तिचा attitude असायचा. संजयला ते कधीकधी आवडायचं नाही , पण उदयला मात्र ते सगळ आवडायचं . तिची बोलण्याची style, तिचा बिनधास्तपणा.... अगदी ११वीला असल्यापासून उदयला ती आवडायची. परंतू तिच्यासमोर बोलणार कसा... श्वेताला तो मुळीच आवडायचा नाही… एकदा तर रागात उदयच्या थोबाडीतही मारली होती श्वेताने आणि लगेच sorry ही बोलली होती... तरीही उदय काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलायला यायचा... तो बोलायला आला कि श्वेता तिथून पळून जायची... उदयला माहित होतं कि संजय तिचा Best friend आहे. म्हणून त्याने संजयशी दोस्ती वाढवली होती.
संजयनी उदय बरोबर मैत्री केली, पण स्वतःच्या मागे ब्याद लावून घेतली. ती म्हणजे उदयची बहिण नेत्रा... संजय तसा दिसायला चांगला होता, तरीदेखील कोणत्याही मुलीने त्याला प्रेमळ नजरेने पाहिलं नव्हतं कधी… त्याचं कारणही तसंच होतं.. "श्वेता"... संजयचा स्वभाव कसा सगळ्यांना मदत करणारा होता.. समोरच्या बरोबर नेहमी हसून-बोलून असायचा.त्याच्या डाव्या गालावर पडणारी खळी बघायला खूप मुलींना आवडायचं परंतु श्वेता बरोबर असली कि कोणाची हिंमत आहे,संजयला " Hi" म्हणायची.... नेत्रा मात्र वेगळंच रसायन होती..... तिने Direct श्वेता बरोबरच मैत्री केली. श्वेताला ती कधीच आवडायची नाही.. एक-दोनदा मदत केली असल्याने श्वेता तिच्या सोबत अशीच बोलायची, मनात नसलं तरी... नेत्रा जरा " मॉड " मुलगी होती, मराठी असूनही मराठी कमीच बोलायची. आणि बोलायची तेव्हा मराठीत इंग्लिश कि इंग्लिश मध्ये मराठी तेच कळायचं नाही. महागातले कपडे, पर्स, sandals…. अगदी श्रीमंतीचा देखावा करायची… टापटीपपणा, स्वच्छता, कसं वागायचं हे कोणी नेत्राकडून शिकावं… या सगळ्या गोष्टीमुळे श्वेता , नेत्रापासून थोडी लांबच राहायची. नेत्राने सुद्धा संजयच्या जवळ येण्यासाठी श्वेताशी Friendship केली होती. श्वेताचं बिनधास्त राहणं, कसंही आणि काहीही बोलणं, शिव्या देणं आणि सर्वात शेवटी... तिची राहण्याची स्टाईल खटकायची. पण संजयकडे बघून ती सगळं खपवून घ्यायची…. अर्थात नेत्राच्या मनात काय आहे ते संजयला ठावूक होतं, त्यामुळे तो नेत्राला तसा " ओळखून " होता. तर अशी होती चौकडी…. चार टोकांचे स्वभाव. तरीही एकत्र असायचे. चौघात एक पाचवा "कोन" ही होता. त्या सर्वापासून वेगळी अशी .. "पायल"…. शांत स्वभावाची, हसरी, साधी,सोपी,सरळ, जराशी चंचल, मधेच रागावणारी, पण नंतर लगेच हसणारी, मनमिळावू ..... जराशी सावळी, जराशी खोडकर होती पायल.... उंची जेमतेम होत. शरीरयष्ठी जराशी गोंडस, गोबरे गाल... जणू काही दोन गुलाबचं ... सगळ्यांना तिच्या गालांना हात लावायचा मोह व्हायचा. सदैव हसत असली तरी हलकीशी smile देणारी.... छान वारा वाहत असेल तरच केस मोकळे सोडणारी..... आणि कोणाची नजर लागू नये म्हणून कपाळावर उगाचच छोटीशी काळी टिकली लावणारी..... " पायल ". समोरची व्यक्ती ओळखीची असो वा अनोखळी, लगेचच मैत्री व्हायची तिची... सगळ्या कॉलेजशी मैत्री होती तिच्याशी.... कॉलेजमधील संपूर्ण शिक्षकवर्ग तिला ओळखायचा. एखादं दिवशी पायल कॉलेजमध्ये आली नाही तर सगळ्यांनाच चुकचुकल्या सारखं वाटायचं. अशी होती "पायल"…. पायलची सगळ्यांबरोबर मैत्री होती. मात्र या "चौघां" सोबत जरा जास्त ओळख होती…. नेत्राप्रमाणे पायललाही संजय आवडायचा. पण तिने त्यासाठी उगाचच श्वेता बरोबर मैत्री केली नाही. उलट श्वेतानेच पुढे होऊन मैत्रीचा हात पुढे केला होता. तेव्हापासून श्वेता,संजय आणि पायल यांची घट्ट मैत्री होती. त्यात उदय आणि नेत्रा हे भाऊ-बहिण " आगंतुक पाहुण्या " सारखे होते... ज्यांना तिथे कोणी भावही देत नव्हतं आणि पसंतही करत नव्हतं. श्वेता आणि संजय तर शाळेपासून एकत्र होते. पायल त्यांच्यासोबत ११वी पासून होती. त्याच्या मैत्रीचं तिसरं वर्ष होतं.
पायलने तर सर्वात आधी admission घेतलं होतं. श्वेताने संजयसाठी admission उशिराने घेतलं. नेत्रा आणि उदय यांचही रीतसर admission झालं..... आणि एकदाचं कॉलेज सुरु झालं...... कॉलेजचा पहिला दिवस..... अर्थातच पावसाळ्यातला.... त्यादिवशीही छान पाऊस पडत होता. पाच जणांपैकी फक्त दोघांनाच पाऊस आवडायचा,संजय आणि पायलला.... पायल कधी कधी कविता करायची म्हणून तिला पावसाळी वातावरण romantic वाटायचं. संजय तर लहानपणापासूनच पावसाचा fan होता. पावसामुळे होणारी चिखल, घाण हे नेत्राला आवडायचं नाही. म्हणजेच चिखलाच कारण असलेला पाऊस तिला पसंत नव्हता. पावसामुळे तिचे sandal , कपडे खराब व्हायचे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप खराब व्हायचा तिचा.... श्वेताला तसा काही प्रोब्लेम नव्हता पावसाचा, पण ऐनवेळी पाऊस येऊन भिजायला होणं, तिला आवडायचं नाही. उगाचचं कुठेतरी थांबून राहावं लागे तिला... कधी कधी तर कॉलेजलाही यायची नाही, मग संजय तिला जबरदस्ती कॉलेजमध्ये घेऊन यायचा भर पावसात.... श्वेताला पाऊस आवडत नाही म्हणून उदयला सुद्धा पाऊस आवडेनासा झाला होता... का तर तिला जे आवडणार नाही त्यावर तोही बहिष्कार टाकणार... बाकी काही विचार जुळले नाहीत तरी पाऊस हा फसव्या असतो , हेच दोघांचे मत होतं.
तर पहिला दिवस कॉलेजचा, पाऊस कोसळतोय…. थंडगार हवा... नवीन नवीन छत्र्या बाहेर पडलेल्या... एकदम फिल्मी वातावरण. पायल तर सर्वात पहिली येऊन पोहोचली होती.... " अरे... पायल, इतनी जल्दी क्यू आयी.... अभी तो कोई आया भी नही... अकेले क्या करोगी." watchman काकांनी विचारलं... " काही नाही करूंगी.. कोणी आलं नाहीतर... अकेले अकेलेच भिजणे के लिये जाऊंगी. " पायल मुद्दाम मराठी मिश्रीत हिंदी बोलायची, ते watchman काकांना सुद्धा आवडायचं. पायल असं बोलली आणि दोघेही हसायला लागले. इतक्यात, समोरून संजयची Entry झाली,.... श्वेता बरोबर.ते पाहून पायलला तर अजूनच हसायला आलं. एवढी बिनधास्त मुलगी… पावसाला घाबरून कशी छत्रीत अंग चोरून चालत होती... श्वेता जशी कॉलेजमध्ये शिरली तशी पायल गप्प झाली. "काय गं.... तुला काय वाटलं , मी बघितलं नाही हसताना तुला... माझ्याशी तुझी हुशारी चालणार नाही … समजलं ना" श्वेता छत्री बंद करत पायलला बोलली. एवढा वेळ हसू दाबून ठेवलं होतं संजयने,ते सगळं बाहेर पडलं. " साल्या संज्या.... मला हसतोस ना... उद्यापासून तुझ्या सोबत येणारच नाही कॉलेजला.... मग बस वाट बघत... " ," ठीक आहे. तू नाही मग नेत्रा तयारचं आहे... " नेत्राची गाडी येताना बघून संजय म्हणाला," हि बया कशी आली एवढया पावसात." श्वेता म्हणाली." पहिला दिवस ना कॉलेजचा... मग मिरवायला नको तिला ? " संजय हसतच म्हणाला." काय रे.... कशाला उगाचच तिला नावं ठेवता,आली आहे तर येऊ दे ना तिला. " पायल म्हणाली. नेत्रा गाडीतून उतरली तसं तोंड वाकडं झालं तिचं... चिखल होता ना... कशीबशी स्वतःचा महागातला ड्रेस सांभाळत आली ती... " Hi everybody.... कसे आहात सगळे... " नेत्रा आल्याआल्याच म्हणाली. " आम्ही सगळे ठीक आहोत , पण तुझा मूड खराब आहे वाटतं." संजय म्हणाला." Yes संजय. This पाऊस.... पाणी... चिखल and all that thing's.... मी अजिबात Like करत नाही.... मला यायचं नव्हतं... But आज study सुरु झाली तर उगाचच miss होईल ना माझी.... पप्पा तर किती सांगत होते ... Don't go in the rain... पण मी ऐकलाच नाही... " ," मग उदय कुठे आहे... तो नाही आला आज" पायलने विचारलं. " तो काय.... Behind श्वेता... " ," कुठे ...... ?"श्वेता दचकली ...... मागे वळून बघते तर उदय मागेच उभा ... "Hi...श्वेता... कशी आहेस... छान दिसते आहेस आज.. " उदय म्हणाला."चला.... चला.... Lecture सुरु होईल.. " उदय अजून काही बोलणार म्हणून श्वेता बोलली आणि सगळे वर्गात येऊन बसले... थोडयाच वेळात सगळा वर्ग भरला... पूर्ण वर्ग भरला तोही कॉलेजच्या पहिल्या दिवशी…
" काय गं पायल.... आज नक्की पहिलाच दिवस आहे ना.. " ,"का गं ?... "," नाही.. पहिल्याच दिवसाचा पहिला lecture आणि वर्ग Full.... " श्वेता म्हणाली." अगं, सायली madam चा lecture आहे ना आता... म्हणून १००% हजेरी आहे, कळलं का.. ? "…………. "सायली" madam… त्या chemistry शिकवायच्या.जरा बोरिंग विषय.... तरीही त्यांच lecture कोणी "miss" नाही करायचं. सुंदर होत्या दिसायला…. लहान वयात लग्न झालेलं, वय असेल २९-३० च्या आसपास... बोलायला छान होत्या. सगळी मुलं त्यांच्यावर फिदा होती. आणि त्यांनाही ते माहित होतं. Lecture तर Full असणारच....... सायली madam च जरी लग्न झालेलं असलं तरी, त्यांनाही संजय "आवडायचा"..... होताच तसा संजय... सायली madam आल्या वर्गात, नेहमीप्रमाणे आल्याआल्या वर्गात नजर फिरवली… खासकरून संजयकडे नजर टाकली. आणि smile दिली. संजयनेही गालावरची खळी दाखवली. श्वेताला मात्र राग आला... " हिच्या...आई... " श्वेता शिवी देता देता थांबली... पायलनेच तिला थांबवलं... " शिवी वगैरे देऊ नकोस हा श्वेता.. नाहीतर मी दुसरीकडे जाऊन बसते. "," sorry पायल, नाही देणार शिवी.... अरे पण... तिला कळलं पाहिजे ना…लग्न झालंय आपलं.... नवरा आहे आपला, मग दुसरीकडे कशाला तोंड मारायचं.... थांब, हिच्या नवऱ्याचा नंबर मिळवते आणि सगळं सांगून टाकते... " तशी पायल हसायला लागली... Actually, पायललाही ते आवडायचं नाही... सायली madam उगाचच कधी कधी संजय बरोबर बोलण्याचा प्रयन्त करायच्या, मुद्दाम.... त्यामुळे सगळी मुले संजयचा हेवा करायची तर मुली त्या सायली madam चा राग करायची.
" काय... पायल madam, आज खूप हसता आहात.... खूप खुश आहेस वाटते." पायलला हसताना बघून सायली madam म्हणाल्या… तशी पायल गप्प झाली. " नाही madam, बाहेर पाऊस पडतो आहे ना आणि कॉलेजचा पहिला दिवस... खूप छान वाटते आहे." पायल काहीतरी उगाचच बोलली.. " हो.. पायल एकदम बरोबर बोललीस.... मस्त पाऊस... थंड हवा... romantic वातावरण आहे ना अगदी.... भिजावंसं वाटते... हो ना... " सायली madam संजयकडे पाहत म्हणाल्या... तशी सगळी मुलं " आम्हालाही भिजावंसं वाटते आहे." अस म्हणाली आणि वर्गात हशा पिकला. ... ,"शांत बसा सगळ्यांनी.. "सायली madam म्हणाल्या... " एवढया romantic वातावरणात अभ्यास नकोसा वाटतो ना... नकोच आज lecture , छान गप्पा मारुया... " सगळ्यांना तो विचार पटला. " कश्याबद्दल बोलायचं.. " एक एक विचार बाहेर पडू लागले. परंतु काहीच नक्की होतं नव्हतं. " शांत राहा रे जरा.... आपण एक करूया.... एकेकाचं नावं घ्यायचं आणि त्याला एक विषय सांगायचा.. मग त्याने त्या विषयावर बोलायचं... "," चालेल चालेल.. " सगळा वर्ग बोलला..... पहिलं नावं कोणाचं... सगळे आतुरतेने वाट पाहत होते.. " संजय ",सायली madam नी नावं घेतलं... " मला माहीतच होतं , हि बाई त्याचंच नावं घेणार... " श्वेता रागातच म्हणाली. संजयचं नावं घेतलं तसा संजय पुढे येऊन उभा राहिला." हं... कोणता विषय देता आहात मला ? " संजयने विचारलं... सगळेच काहीबाही बोलत होते... पायल गप्पच होती, तो काय बोलतो ते ऐकण्यासाठी... तेवढयात सायली madam बोलल्या," तू एवढा Handsome आहेस... तुझी एखादी girl friend असेलच ना, तिच्याबद्दल सांग... " ," कुठे madam.... नाही आहे कूणी girl friend मला... एक मैत्रीण आहे, तिच्याबद्दल सांगू का ? " , संजय श्वेताकडे पाहत म्हणाला. " नको नको... तिला तर सगळेच ओळखतात... OK.... मग एक गोष्ट सांग... तू Love marriage करणार कि arranged marriage ? " असा प्रश्न विचारला आणि मागून श्वेताचा आवाज आला…. " सायली madam,…हे जरा personal नाही होतं आहे का ? " तश्या सायली madam बोलल्या. ," आपलं काय ठरलं होतं... कोणालाही इथे बोलावून एका विषयावर बोलायचं... मग आता त्याला मी प्रश्न विचारू कि नको…. " श्वेताला काय बोलावं ते कळतच नव्हतं.चडफडत ती खाली बसली... " हा, संजय.... तू उत्तर नाही दिलंस अजून... " ," मला वाटते कि प्रत्येकाने Love marriage च केलं पाहिजे… arranged marriage मध्ये अनोळखी व्यक्ती सोबत संसार करावा लागतो... त्यापेक्ष्या मी Love marriage वर जास्त विश्वास ठेवतो... " सगळ्यांनी , त्यात जास्त करून मुलींनी टाळ्या वाजवल्या. " अच्छ्या... मग तू काहीतरी , कोणीतरी ठरवली असशील ना मनात... "," मनात तशी आहे, पण ती कशी हवी ते आहे... कोणीतशी भेटली तर विचार करीन." ," मग हाच तुझा विषय आहे,... तुझ्या स्वप्नातली ,मनातली तुझी " ती " कशी आहे... हे तुला सांगायचे आहे... " ," दुसरा काही विषय द्याना मिस, हा नको.... "," नाही…. हेच तुला सांगायचे आहे, नाहीतर तुला तसच उभं राहावं लागेल." , " ठीक आहे…. ठीक आहे…. सांगतो मी… " तसे सगळे ऐकण्यासाठी सारावून बसले.
बाहेर अजूनही पाऊस पडत होता. संजय तसाच उभा राहून बाहेर पाहत होता, " ती...... पावसाच्या मेघाप्रमाणे मुक्त विहार करणारी असावी... तीचं प्रेम पावसाच्या सरींप्रमाणे असावं…. कधी रिमझिम , कधी टपोरे थेंब तर कधी मुसळधार.....तीचं मन सागरासारखं विशाल असावं आणि मी आभाळ बनून त्या निळाईत विसावून जावं....तीचं वावरणं हे उधाणलेल्या वाऱ्यासारखं असावं.... जेव्हा जेव्हा ती येईल तेव्हा सगळ्या वाईट गोष्टी उधळून लावेल असं… तिच्या फक्त येण्यानेच कळ्यांची फुलं व्हावीत... सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे... कोकिळेलाही कंठ फुटावा.... ती म्हणजे परमेश्वराने मला दिलेली देणगीच असावी, तीच माझं आयुष्य असावी. ... माझ्या सावलीत तिचाच अंश असावा.... जेव्हा जेव्हा माझं मन तहानलेलं असेल, तेव्हा तिच्याच आठवणींच्या पावसाने माझं मन तृप्त व्हावं…. ती नसताना तिच्या आठवणींनी माझ्याभोवती पिंगा घालावा.... सुखांची कितीही गर्दी झालेली असली तरी तिच्या कमतरतेमुळे मन दुखीः व्हावं... तिचा चेहरा... चंद्राप्रमाणे शीतल असावा....डोळ्यात आभाळाची विशालता असावी.... केस अमावशेच्या रात्रीप्रमाणे काळेभोर असावेत.... ती गोरी नसली तरी चालेल, पण मनाने स्वच्छ असावी.... पावसात भिजणारी तरी पागोळ्यात पाऊस शोधणारी असावी.... ती म्हणजे एक भिजरी पायवाट असावी, जिचा शेवट केवळ माझ्यापर्यंतच व्हावा... ती म्हणजे गुलाबालाही लाजवेल असं सदाफुलीचं फुल असावी.... कधीही न कोमेजणारी, सदैव फुललेली... स्वच्छंदी फुलपाखरू असावी.... " संजय बोलता बोलता खिडकीपाशी आला.... " ती क्षणात दिसणारं, क्षणात नाहीसं होणारं मृगजळ नसावी, खळखळ वाहणारा झरा असावी…. ज्याला पाहूनच मन भरून जाईल.... जेव्हा जेव्हा मी डोळे उघडीन तेव्हा तेव्हा तीच माझ्या नजरेसमोर असावी.. डोळे बंद केल्यावरही स्वप्नात तीच दिसावी.... माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट तिच्यापासूनच व्हावा... मी घेणाऱ्या प्रत्येक श्वासात तीच सामावलेली असावी... शेवटचं सांगायचं झालं तर ती माझंच प्रतिबिंब असावी... " संजयनी आपलं बोलणं संपवलं... सगळा वर्ग स्तब्ध झालेला होता... सगळेच संजयकडे पाहत होते, कोणीच काही reaction देत नव्हतं… शेवटी संजय " Thank You" म्हणाला, तेव्हा सगळे भानावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
संजय आपल्या जागेवर येऊन बसला तरीही सगळी मुलं टाळ्या वाजवत होती.. सायली madam आणि वर्गातील इतर मुली संजयच्या बोलण्याने " भारी " इम्प्रेस झाल्या होत्या. पण अजून काहीतरी घडलं होतं.... श्वेता स्तिमित झाली होती… संजय सोबत आपण एवढी वर्ष आहोत.... त्याच्या मनातलं आपण एकदाही ओळखलं नाही किंवा ओळखायचा प्रयन्तही केला नाही... कशी एवढी मूर्ख मी... संजय किती करतो आपल्यासाठी आणि आपण.... तिला तिचीच लाज वाटत होती... शरमेने मान खाली गेली होती श्वेताची... नेत्रानेही हे सगळ ऐकलं होतं... तिलाही कळलं कि संजयच्या मनात त्याच्या जोडीदाराची काय संकल्पना आहे ते... आणि त्यात आपण कुठेच बसत नाही. त्यामुळे तिलाही जरा वाईटच वाटत होतं… पण पायल मात्र खूप आनंदात होती. संजयने वर्णन केल्याप्रमाणे बहुतेक गोष्टी आपल्या स्वभावात आहेत, हे तिने स्वतःलाच समजावलं आणि संजय आपल्यावरच प्रेम करतो हे स्वतःच तिने मान्य केलं.
बाकी कोण पुढे येऊन बोलण्याचा प्रश्नच उरला नव्हता. सायली madam लाही काय बोलावं ते सुचतं नव्हतं… काहीतरी बोलणार इतक्यात lecture संपल्याची बेल झाली. ताबडतोब madam बाहेर पडल्या. पुढच्या lecture ला कोणीच आलं नाही... एव्हाना वर्गात गडबड गोंधळ सुरु झाला असता,पण सगळेच शांत होते. संजयच्या बोलण्याचा खूप वेगळा परिणाम झाला होता, सगळ्यांवर... त्यातच lecture off… पुढचाही... मग काय, एक एक जण वर्गाबाहेर पडू लागला… सगळ्यात आधी नंबर लावला तो नेत्रानी.. तिला संजय समोर थांबायचं नव्हतं. नंतर बाकीचे हळूहळू बाहेर पडत होते. " श्वेता.... चल …बसून काय करते आहेस तिथे.. आणि पायल… तुला काय वेगळं सांगायला हवं का.. " संजयने बाहेरून श्वेता आणि पायलला हाक मारली, तश्या दोघी भानावर आल्या.. " हो... येते मी... तू जा पुढे.. " श्वेता म्हणाली, पायल तर संजयनी बोलावल्याबरोबर बाहेर पडली होती…संजय श्वेता कडे तसाच पाहत होता... " पायल, ... काय झालं श्वेताचं ? बाहेर का नाही येत ती.. " संजयने पायलला विचारलं," माहित नाही, येते बोलली ना , मग थांबूया तिच्यासाठी... " म्हणत पायल आणि संजय तिथेच थांबले. त्यांना वर्गाबाहेर उभं पाहून श्वेता वर्गाबाहेर आली. " काय झालं गं श्वेता तुला, हाक मारली तेव्हा बाहेर का नाही आलीस ? " , " असंच " श्वेता म्हणाली. " तुम्ही जात असाल तर जा पुढे… मला जरा काम आहे library मध्ये... " ," कॉलेजच्या पहिल्या दिवशी… तुला काम आहे आणि तेही library मध्ये.. " संजय म्हणाला... " हो रे… खरंच काम आहे... जा तुम्ही... " , " मग मी सुद्धा येतो... "," नको संजय... please जा.... मला काम आहे. " नाईलाजास्तव संजय, पायल बरोबर पुढे आला.
" काय झालंय.. श्वेताला,… पहिली अशी कधी वागली नव्हती ती." संजय पायल बरोबर बोलत होता. पण पायलच कुठे लक्ष होतं त्याच्या बोलण्याकडे… ती तर स्वप्नातच होती... " Hello... पायल, तुझ्याबरोबर बोलत आहे… आहे का लक्ष.. ? " ," हं... हो... मला वाटलं तू श्वेता बरोबर बोलत आहेस.. " पायल बोलली," काय madam... काय चाललंय... डोक आहे का ठिकाणावर.. श्वेताबद्दल बोलतो आहे... आणि ती गेली ना मघाशी library मध्ये, विसरलीस का ? " ," sorry… sorry… विसरली मी... "," आज काय झालंय ते कळतच नाही सर्वाना.. " ,"तू जे काही बोललास ना वर्गात , त्यामुळे सगळं झालं आहे.. " ," असं काही वेगळं नाही बोललो मी… मनातलंच सांगितलं ना मी." संजय पायलकडे पाहत म्हणाला. छान गार वारा सुटला होता. पायलचे केस भुरुभुरु उडत होते आणि पायल संजयकडेच पाहत होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. संजयही पायलकडेच कधीचा बघत होता... थोडा वेळ शांत झाले दोघेही.. " तुला तुझ्या मनातली कधी भेटलीच नाही का... ?" पायलने संजयला विचारलं तेव्हा त्याने मान हलवून नकार दिला... " कधीच नाही का... कधी समोरसुद्धा आली नाही का ती तुझ्या ." अजूनही दोघे तसेच उभे होते... वारा तसाच वाहत होता. पायलचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते, ते हातानेच ती मागे करत होती... संजयच्या मनात काहीतरी झालं ते पाहून... तेव्हाचं मागून उदयने संजयला हाक मारली, तसं संजयचं लक्ष दुसरीकडे गेलं.. " चल.. मी जाते घरी... नाहीतर पाऊस सुरु होईल पुन्हा.. Bye... " म्हणत पायल निघून गेली, जाताना नेहमीची smile दिली तिने.. संजय तसाचं उभा राहून तिला जाताना पाहत होता.. " काय झालं रे संजय... चल आपण पण निघूया घरी. मी सोडतो तुला गाडीतून.. " उदय म्हणाला," नको, तू जा... मी library मध्ये जाऊन येतो... " संजय जाणाऱ्या पायलकडे पाहत म्हणाला. उदय निघून गेला. पायल नजरेसमोरून निघून जाईपर्यंत तो तिलाच पाहत होता.... ती नजरेआड झाली तशी त्याला श्वेताची आठवण झाली, तो library आला. पहिलाच दिवस त्यामुळे library त कोणीच नव्हतं. ," काका.. श्वेता आलेली का इकडे.. ?" संजयने librarian ला विचारलं," श्वेता आणि इकडे ... तसा तिचा आणि library चा काही संबंध नाही तरीही आज पहिला दिवस आहे आणि library अजून student's साठी उघडली नाही. त्यामुळे ती नाहीच आहे इकडे... " ," Thanks काका.. "म्हणत संजय बाहेर पडला.. " इकडे नाही मग गेली कुठे श्वेता ?" संजय एकटाच बडबडत होता...असं कधी झालं नव्हतं कधी पहिलं... श्वेता आणि संजय नेहमी एकत्रच घरी जायचे कॉलेजमधून. आज ती एकटीच गेली होती..... नेत्राही... नेहमी त्याच्याभोवती घुटमळणारी, आज पळूनच गेली होती. संजय एकटाच निघाला घरी.
पुढचे २ दिवस.... कॉलेज नेहमी सारखं सुरु झालं होतं. एव्हाना २ दिवसात संजयची " ती " सर्व कॉलेजमध्ये पसरली होती. सगळ्यांची संजयकडे पाहण्याची " नजर " जरा बदललेली होती. मुलींनी त्याची "ती" होण्याचा प्रयन्तही सुरु केला होता. सायली madam अजून संजयच्या प्रेमात पडल्या होत्या... पण त्या ५ जणांमध्ये वेगळचं सुरु होतं काहीतरी.. श्वेता त्या दिवसापासून वेगळीच वागायला लागली होती, शांत शांत रहायची... कोणी काही विचारलं तर फक्त छोटीशी smile द्यायची... बाकी काही नाही… शिव्या देणं, रागावणं, मोठयाने बोलणं…. सगळं बंद, दोन दिवसातच..... संजयने विचारलं तेव्हा ," तब्येत ठीक नाही आहे."एवढंच उत्तर मिळालं... शिवाय त्याच्या अगोदरच येऊन बसायची वर्गात... श्वेता गप्प तर उदयही जरा नरमलेला होता. त्याचही मन लागत नव्हतं वर्गात… श्वेता काहीच बोलली नव्हती त्याच्या बरोबरही... नेत्रा गुपचूप कॉलेजला यायची आणि lecture संपले कि निघून जायची... दोन दिवसात ती एकदाही संजय बरोबर बोलली नव्हती कि त्याच्या समोर आली होती…. तीही गप्प असायची वर्गात. सगळा तोरा उतरला होता तिचा. परंतु पायल मात्र खूप खुश होती. जणू काही तिला कोणता खजिनाच सापडला होता. चेहऱ्यावरूनच तिचा आनंद दिसायचा सगळ्यांना... त्यात पावसाचे दिवस… म्हणजे अजूनच आनंद तिला... संजय बरोबर तेच बोलणं,हसणं चालू होतं तिचं… श्वेता गप्प असल्याने, पायलचं जास्त बोलणं व्हायचं संजयशी. अजून चार दिवस गेले… सर्व तसंच चालू होतं. त्यादिवशी lecture चालू असताना , एक notice आली वर्गात.. " उद्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने , सुरक्षतेच्या कारणास्तव कॉलेज बंद राहिलं."
दिवसाचे lecture संपले.. practicals सुरु झाल्या नव्हत्या, त्यामुळे सगळे घरी जाऊ लागले. नेत्रा नेहमीप्रमाणे बाहेर पडली तर संजय समोरच उभा होता.... त्याच्या समोर यायचं नव्हत तिला. पण तोच समोर आलेला."Hi नेत्रा, कशी आहेस ? " संजयने विचारलं.. " Hi… मी ठीक आहे, चल... Bye , मला उशीर होतो आहे... " नेत्रा त्याच्याकडे न बघताचं म्हणाली. " Ok ... Bye" संजय म्हणाला, तशी ती निघून गेली, तिच्याबरोबर उदयही निघाला. लांबूनच त्याने संजयला हात हलवून " Bye " केलं... पायल बाहेर आली. पुन्हा तोच सीन, पायलचे केस भुरुभुरु उडत तिच्या चेहऱ्यावर येत होते. छान हसत होती… " भेटली का रे तुला ती... नक्की भेटेल... जरा आजूबाजूला लक्ष देत जा. " म्हणत पायल हसत हसत निघून गेली. तिच्या वागण्यातला बदल संजयला देखील कळत होता,पण आज त्याने तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक पाहिली होती.... मनात काहीतरी झालं त्याच्या पुन्हा… तसाच उभा राहिला…. तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत... " पायल तीन वर्ष आपल्या सोबत आहे... रोजची मस्ती, मस्करी असते…. ती आपली चांगली friend आहे... मग आजचं असं का वाटत आहे,तिच्याबद्दल…. तिला कधीच एवढं निरखून पाहिलं नव्हतं कधी.... काय झालयं आपल्याला.... तिच्या डोळ्यात तर कधीच आपण एवढं हरवून गेलो नव्हतो... नाही.... मला स्वतःला सांभाळायला हवं.…. ", संजय मनातल्या मनात बोलला. सगळा वर्ग रिकामा होतं आला, तरी श्वेता अजून वर्गाबाहेर आली नव्हती... संजय तसाच वाट पाहत होता वर्गाबाहेर. शेवटी , श्वेता बाहेर आली... संजयकडे न बघताच ती पुढे चालू लागली... " श्वेता.... ये …. श्वेताडी.... थांब ना... " तशी श्वेता थांबली... " काय झालंय तुला... " संजयने विचारलं," काही नाही."," नाही,…काहीतरी नक्की झालंय तुझं… रोज आपण एकत्र यायचो आणि घरी एकत्र जायचो... आता तर वर्गात माझ्या आधीच आलेली असतेस… सतत बडबड करणारी… गप्प गप्प असतेस…. कोणाबरोबर बोलत नाहीस, माझ्याशी तर नाहीच…. काय झालंय तुला.. ? " श्वेता गप्पच.. बाहेर वादळाची चिन्ह दिसू लागली होती... वारा वाहू लागला होता जोरात... श्वेता आकाशाकडे पाहत होती. " श्वेता... श्वेता... तुझ्याबरोबर बोलतो आहे मी... लक्ष कुठे आहे तुझं.... " श्वेता गप्पच... " कुठे हरवलेली असतेस हल्ली... जुनी श्वेता कुठे गेली.... बदललीस तू... "," बदललचं पाहिजे ना संजय.. " खूप वेळाने श्वेता म्हणाली... " पण का बदलायचं.... " श्वेता अजूनही आभाळाकडेच पाहत होती.. आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली होती, काळ्या ढगांची... वाऱ्याने जोर पकडला होता.... " बोल ना... का बदलायचं... ? ", संजयने पुन्हा विचारलं... श्वेताने संजयकडे एक कटाक्ष टाकला.," कारण....... कारण वातावरण बदलतंय संजय... " श्वेता आभाळाकडे पाहत म्हणाली... आणि जोरदार वीज कडाडली... शांतता... श्वेता थोडावेळ थांबली आणि झपाझप चालत निघून गेली… संजय काहीच बोलला नाही तिला... किंवा त्याने तिला अडवायचा प्रयत्नही नाही केला. थोडावेळ तसाच घुटमळत होता तो... निघाला मग तोही…
पुढचा दिवस... वादळामुळे कॉलेज बंद... सगळे आपापल्या घरीच होते... पायल मात्र कॉलेजला आली होती.. " अरे... पायल... तुम भूल गयी क्या... आज बंद है कॉलेज बेटा... " watchman काकांनी सांगितलं. तेव्हा पायलच्या लक्षात आलं कि आज सुट्टी आहे आणि आपण विसरलो आहे ते... आजकाल काहीच लक्षात राहत नाही आपल्या... काय वेड लागलंय आपल्याला.. स्वतःशीच हसत होती पायल... "चलो काका…. अशीच देखनेके लिये आली होती... कोणी आलेलंलं है क्या…. " पायल बोलली तसे watchman काका हसले. पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. पायल निघाली तशीच... खरंच तिला वेड लागलं होतं.. १० मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली… नेत्रा घरीच होती.. पावसाला पाहून तिला रडूच आलं.. उदय कसल्याश्या विचारात होता... घरीच. श्वेताही घरीच होती. पाऊस सुरु झाला तशी ती खिडकीजवळ आली, हात बाहेर करून पावसाचे थेंब हातावर झेलले. पावसाला घाबरून ती नेहमी घरीच राहायची... " काय असते या पावसात.... "म्हणत ती घराच्या बाहेर पडली... खूप दिवसांनी पाऊस आलेला .. श्वेता उभी राहिली पावसात... पहिल्यांदाच ती पावसाला तशी अनुभवत होती... पावसातला आनंद तिला मिळाला होता, तरी मन दुख्खी होतं.... इकडे पायल तर वेड्यासारखी नाचत होती पावसात... सगळ जग विसरून….चिंब चिंब झालं होतं तिचं मन…. यंदाच्या पावसात तिला तिच्या मनातलं काहीतरी मिळालं होतं... जवळचं.. प्रेमाचं..... प्रेमाचाच पाऊस पडत होता , तिच्यासाठीच.... कोणी म्हणत होत , वेडी झाली कि काय ही... काही जण तिला पाहून हसत होते... पण तिचं कुठे लक्ष होतं त्यांच्याकडे …. ती तशीच बेभान नाचत होती... संजय घरीच होता... त्यालाही पाऊस आवडायचा परंतु या वेळेस त्याला पाऊस नको होता... खिडकी जवळ उभा राहून तो फक्त पाऊस ऐकत होता... त्याला त्याच्याकडे बघायचही नव्हतं…. यंदाचा पावसाळा एक वादळ घेऊन आलेला, सगळ्यांसाठी... शेवटी न राहवून संजयने बाहेर पाहिलं…पाऊस तर नेहमी सारखाच पडत होता. त्याच्यासाठी मात्र तो वेगळा होता , यावर्षी.…. " वातावरण कोणतं बदलतंय .... बाहेरचं कि... मनातलं." संजय पावसाकडे पाहत विचार करत होता......तीन जीव पावसात भिजून जात होते……वेगवेगळ्या ठिकाणी... श्वेता, पायल आणि संजय.... यंदाचा पावसाळा तिघांसाठी वेगळा होता...... खरंच वातावरण बदलत होतं का .... ?
......................................................to be continued..........................................................
व्वा सुरुवात तर खूपच छान
व्वा सुरुवात तर खूपच छान