नकोसे वाटते सारे, उसवते वीण एखादी

Submitted by बेफ़िकीर on 14 July, 2014 - 12:36

नकोसे वाटते सारे, उसवते वीण एखादी
मनाला आणते...ताजी गझलही...शीण एखादी

पिठोरी चांदणे पाहू, उपाशी जागते राहू
जगावी वाटते आहे कथा ग्रामीण एखादी

उदासीची मुळे जोपास आनंदात जगताना
जशी ठेक्यात पान्हवते कलावंतीण एखादी

तिला माहीत नाही की कुणी देणार नाही ओ
पुकारे देत पिल्लांना उडे पक्षीण एखादी

जिथे कर्कश्य हाकांनी कुणी विचलीत होईना
तिथे स्थित्यंतरे घडवेल हाळी क्षीण एखादी

तुला आधार रस्त्याचा तरी ना भान आलेले
झुले दोरीवरी बेभान डोंबारीण एखादी

जिथे एका विचाराचे हजारो लोक जमलेले
तिथे चर्चा कशी होईल सर्वांगीण एखादी

हवा आहे कुणाला मी, नको आहे कुणाला मी
कधी लाभेल आयुष्या खरी वैरीण एखादी

तुझ्या बदल्यात ती आयुष्यभर वा वा म्हणत राहो
तुलाही 'बेफिकिर' नेईल बोहारीण एखादी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या बदल्यात ती आयुष्यभर वा वा म्हणत राहो
तुलाही 'बेफिकिर' नेईल बोहारीण एखादी

क्या बात है भूषणराव!
सलाम!
बोहारीण काय मस्त निभवली!
पुन:श्च वंदन या शेरासाठी!
पूर्ण गझलच अप्रतिम!

टीप: जमिनीचा प्रचंड हेवा वाटत आहे!

जमीन निभवणे शिकण्यासारखे आहे.<<<<<<<

कुणला?

>>>>> कुणाला ते वर लिहायचं राहिलं. अर्थात मलाच. बाकी कुणाबद्दलही विचारही नव्हता आला डोक्यात.

ते माहित नाही. पण फक्त गझलेबद्दलच बोलूया आपण, ही विनंती. नाहीतर हेमाशेपो.

जिथे कर्कश्य हाकांनी कुणी विचलीत होईना
तिथे स्थित्यंतरे घडवेल हाळी क्षीण एखादी

व्वा व्वा

गझल आवडलीच! काफीया रदीफ वेगळे आणि सुंदर Happy

नकोसे वाटते सारे, उसवते वीण एखादी
मनाला आणते...ताजी गझलही...शीण एखादी

जिथे कर्कश्य हाकांनी कुणी विचलीत होईना
तिथे स्थित्यंतरे घडवेल हाळी क्षीण एखादी
सही !

>>
जिथे कर्कश्य हाकांनी कुणी विचलीत होईना
तिथे स्थित्यंतरे घडवेल हाळी क्षीण एखादी
<<

हाही आठवत राहिला. Happy

(अवांतर : The world will end not with a bang, but with a whimper ची आठवण झाली वाचून. Happy
अर्थ अगदी उलट आहे, पण आयरनी तीच!)

मक्ता ह्र्द्य !

गझल अफाट !!

आनंदयात्रींच्या प्रतिसादाशी १०० % सहमत.

आपल्या प्रत्येक गझलेतून बरेच काही शिकण्यासारखे असते . (मला)

धन्यवाद !!

-सुप्रिया.

अत्यंत सुंदर गझल, बेफिकिर. सगळेच शेर आवडलेतच.
तरीही सगळ्यात आरपार गेलेला... कलावंतिणीचा. हालू नये बोलू नये....वाचून गप्पं बसावं.