जुन महिन्याचा शेवटचा शनिवार म्हणजे मुक्तांगणमध्ये तुफान गर्दी. मुक्ता मॅडमचा वाढदिवस, रक्तदान शिबीर, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन या पार्श्वभुमीवर मुक्तांगणच्या अनेक शिलेदारांचा व्यसनमुक्तीचा वाढदिवस. समारंभाला त्यावेळी उपचार घेणारे रुग्णमित्र तर असतातच. पण व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करणार्यांचे आप्तेष्ठ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. मुक्तांगणमध्ये या सभारंभाची एक सुंदर संकल्पना आहे. जन्माचा वाढदिवस सर्वच साजरा करतात. पण व्यसनाच्या गर्तेत खोल गेलेल्यांना व्यसन ज्यादिवशी सोडले आणि मुक्तांगणमधुन उपचार घेऊन बाहेर आले तो दिवस पुनर्जन्माचाच असतो. तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. मुक्तामॅडमच्या हातुन मेडल मिळवण्याची जिद्द असलेले आणि वर्षानुवर्षे व्यसनापासुन दुर राहुन ती इच्छा पूर्ण केलेले शिलेदार डावीकडे खुर्च्यांवर बसलेले असतात. ती बाजु, त्या खुर्च्या आणि त्यावर बसलेली माणसे हे यशाचे प्रतिक असते. खाली बसलेले अजुन उपचार घेणारे रुग्णमित्र हे प्रयत्नांचे प्रतिक असते. ही खाली बसलेली माणसे या शिलेदारांकडुन प्रेरणा घेऊन पुढील वर्षी त्या खुर्च्यांवर बसणार असतात. एकुणच हा कार्यक्रम म्हणजे व्यसनमुक्तांच्या यशोगाथांनी सजलेला असतो.
कार्यक्रमाचे संचालन प्रसाद ढवळे सर करणार होते. अमोलसरांनी "जे टाळणे अशक्य" या मुक्तांगणच्या प्रार्थनेला सुरुवात केली. आपल्याकडे योगाभ्यास करण्याआधी ओंकार करण्याचा प्रघात आहे. त्यानंतर व्यक्तीची योगाभ्यासासाठी मानसिक बैठक तयार होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे मुक्तांगणच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना ही सुंदर प्रार्थना म्हणण्याचा रिवाज आहे. त्यामुळे व्यसन सोडण्याची मानसिक बैठक तयार होत असावी. सकारात्मकतेला प्रवृत्त करणारा कार्यक्रम अशी सार्थ ओळख करुन देत ढवळेसरांनी कार्यक्रमाला झोकात सुरुवात केली आणि त्याची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली. ढवळेसरांसारखे ज्येष्ठ समुपदेशक. या कामाचा त्यांचा अनुभव दांडगा. जमलेल्या सर्व व्यसनमुक्त मित्रांच्या कुंडल्या त्यांना तोंडपाठ. त्यामुळे जो कुणी आपले अनुभव सांगायला उठत होता त्यांना ते अचुक प्रश्न विचारुन बोलता करीत होते.
सर्वांसमोर बोलताना एरवी सहजपणे बोलणारे कसलेले असे मुक्तांगणचे ते योद्धे आज भावुक होताना दिसत होते. रवी यांनी सांगीतले कि ते जास्तीत जास्त अकरा महिने सोबर राहिले होते. त्यानंतर त्यांची स्लीप होत असे. अशी नऊ वर्षे गेली. आता मुक्तांगणच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे सोबर आहे. उदारसर हे आज चोवीस वर्षे सोबर असुनही फॉलोअपला येतात. त्यांना बॅटरी चार्ज झाल्याची भावना होते. त्यांच्या सोबरायटीतल्या ज्येष्ठतेचा ते रुग्णमित्रांना ताकद देण्यासाठी वापर करतात. उदारसर हे मुक्तांगणच्या यशस्वी उपचारांचं चालतंबोलतं उदाहरण आहे. त्यानंतर बोलायला उठलेले नितिन हे भावुक झाल्याने फार बोलु शकले नाहीत. मात्र त्यांच्या पत्नीने ती कसर भरुन काढली. भुतकाळ सांगताना त्या म्हणाल्या की एकदा लेडीज बार समोर नितिन यांनी त्यांना सोडले व ते पिण्यासाठी निघुन गेले. यांच्याकडे फक्त दोन रुपये होते. काय भावना असतील त्यांच्या आपल्या पतीबद्दल त्यावेळी? पण पुढे मुक्तांगणचं आणि मुक्तामॅडमचं मार्गदर्शन लाभलं. आणि सारं काही रुळावर आलं. एका प्रसंगी त्यांची कसोटी लागली होती. २००६ च्या प्रलयात त्यांचे सारे काही वाहुन गेले होते. तेव्हा नितिन यांना आत्यंतिक निराशेमुळे "प्यावीशी" वाटली होती. त्यावेळी पुन्हा त्यांना त्यांच्या पत्नीनेच सावरले. पुढे त्या म्हणाल्या की कठीण प्रसंग येतात. खुप कठीण वाटतं पण हिम्मत हरु नका. निश्चय केला तर घरात सोनपावले उमटतील.
माधव कुलकर्णींचा अनुभव तर अतिशय विदारक होता. २००२ साली ते मुक्तांगण मध्ये दाखल झाले. सारे काही संपले होते. इतरांचे नातेवाईक त्यांची विचारपुस करण्यासाठी येत असत. माधवरावांचे कुणीही येत नसे. वजन खालावलं होतं. मुक्तांगणमधुन बाहेर पडल्या दिवशीच घरी जाताना पुण्याला पाकीट मारले गेले. फक्त तिकिटावर घरी जावे लागले. पुढे एए च्या मिटींग्ज केल्या. विडी पिण्याचीही ऐपत न राहिलेल्या माधवरावांनी आज स्वतःचं घर घेतलं आहे. दुसरं लग्न देखिल केलं आहे. त्यांना स्वतःला मुक्तांगणमध्ये असताना या खुर्चीवर बसलेल्या लोकांबद्दल शंका वाटत असे. खरंच ही माणसे इतकी वर्षे व्यसनमुक्त राहिली असतील? कारण ते स्वतः एक मिनिटसुद्धा दारुशिवाय राहु शकत नसत. त्यावेळी असा विचार करणारे माधवराव आज अकरा वर्षे सोबर आहेत. कुठल्याही गोष्टीला दारु हा पर्याय नाही असे ते आता ठामपणे सांगतात. संजीव यांनी तर बोलताना सुरुवातच अशी केली कि ते जर मुक्तांगणला आले नसते तर आज त्यांचा वाढदिवस नाही तर आठवी नववी पुण्यतिथीच साजरी झाली असती. उपचार केले नाहीत तर आयुष्य संपणार हे त्यांना जाणवले आणि ते मुक्तांगणला दाखल झाले. मुक्तांगणमध्ये शिकवलेल्या गोष्टी आचरणात आणल्या त्याचे परिणाम दिसु लागले. पुढे ते फॉलोअपला नियमित हजर राहु लागले. नवीन उर्जा मिळाल्यासारखे त्यांना वाटले. आज श्री. विनय यांच्या सोबत ते जामनेर केंद्राची संपूर्ण जबाबदारी सांभाळताहेत. आपल्या बोलण्याचा समारोप करताना त्यांनी पत्नीचे आभार मानले. तिने दुसरा जन्म दिला. दारुसाठी दोन एक रुपयांची भीकदेखिल मागण्याची वेळ त्यांनी स्वतःवर आणली होती. पण पत्नीने साथ सोडली नाही हे देखिल त्यांनी सांगीतले.
आठ वर्षे सोबर असलेले राहुल यांचे मनोगत वेगळ्या तर्हेचे होते. प्रसिद्धी मिळालेल्या व्यक्ती बरेचदा हवेत चालताना आपण पाहतो. मात्र राहुल यांनी मी दारुडा आहे हे सांगायला मला संकोच वाटत नाही हे स्पष्टपणे सांगीतले. त्यांचे मनोगत ऐकताना या माणसाने आपल्या व्यसनावर आणि सोबरायटीवर देखिल बराच विचार केला आहे हे जाणवले. ड्राय डे असताना आपण दारु मिळण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो मग दारु सोडताना परीश्रम करण्यासाठी काचकुच का करावी? दारु प्यायल्यावर समाजात खुले आम धिंगाणा घातला. जगाला माहित झाले कि मी बेवडा आहे. मग आता ते लपवण्याची गरज काय? मला मदतीची गरज आहे हे सांगीतल्याशिवाय मदत मिळणार नाही. राहुल यांनी जवळपास बारा वर्षे व्यसन केलं. त्यांना व्यसन सोडणं जमत नव्हतं. मुक्तांगणची मदत घेतली. पुढे आत्मपरीक्षणाची सवय लागली. व्यसनाला स्टेटस नसतं हा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. राजा काय आणि भिकारी काय दोघांवरही व्यसनाचा परिणाम सारखाच होतो असे सांगुन पुढे ते म्हणाले कि दारु सोडायला हवी हे स्वतःचं स्वतःला कळायला हवं, इतर कुणी सांगुन काहीही फरक पडत नाही. स्वतःसाठी दारु सोडली तरच दारु सुटते. कुणासाठी, कुणावर तरी उपकार म्हणुन दारु सोडण्याचा प्रयत्न केला तर उपयोग होत नाही. राहुल जेव्हा उठले आणि त्यांच्या सोबरायटीसाठी लोकांनी टाळ्या वाजवुन त्यांचे अभिनंदन केले तेव्हा ते म्हणाले कि टाळ्या तुमच्या स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी देखिल वाजवा. कारण तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला मुक्तांगण लाभले. तुम्ही आणखि भाग्यवान आहात कारण मुक्तांगणला तुम्हाला आवर्जुन आणणारी प्रेमळ माणसे तुम्हाला घरी लाभली. बाहेर अनेकांना हे भाग्य मिळत नाही. शेवटी ते म्हणाले कि स्वतःला वेळ द्या, आत्मपरीक्षण करा, खुश राहा. दारु न पिण्यासारखा दुसरा आनंद नाही.
राजन यांची तीन वेळा स्लिप झाली. त्यामुळे त्यांना फॉलोअपचे महत्व अनन्यसाधारण वाटत होते. फॉलोअप मिटींगला ते पाच किलोमिटर अंतरावर पायी जात असत. बाहेरच्या जगात व्यसनी व्यक्तीला कुणीच उभं करीत नाही. मात्र मुक्तांगणची मदत रुग्णमित्रांना नेहेमीच मिळते. व्यसनापासुन दुर राहण्यासाठी फॉलोअप, मुक्तांगण आणि समुपदेशक या तिन्ही गोष्टींची गरज असल्याचं त्यांनी सांगीतलं. राजन आज नगरचा फॉलोअप चालवतात. समोर बसलेल्या रुग्णमित्रांकडे पाहुन त्यांनी शुभेच्छा दिल्या कि तुम्ही सारे बरे होऊन लवकरच आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे येणार आहात. राजन यांच्या पत्नीने पतीच्या निर्व्यसनी राहण्याचे सारे श्रेय मुक्तांगणकडुन वेळोवेळी मिळालेल्या मदतीला दिले. नंतर मनोगत व्यक्त करणारे संजीव यांची कथा तर अजबच होती. नीटपणे आपली सोबराईटी राखलेल्या संजीव यांना मुतखडा झाला. आणि कुणीतरी त्यांना "बीयर प्यायल्याने मुतखडा पडतो" असे सांगीतले. त्यावर विश्वास ठेउन ते बियर प्यायले आणि त्यांचे व्यसन पुन्हा सुरु झाले. आता ते सोबर आहेत. व्यसनाचा किडा डोक्यातुन जाण्यासाठी मुक्तांगणच्या आणि व्यसनमुक्त मित्रांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे असेही ते आवर्जुन म्हणाले. त्यानंतर पुढे आले प्रकाश. यांचे मनोगत ठाण्याला ऐकण्याची संधी नेहेमी मिळते. वाटले हे आज काय नवीन सांगणार? पण प्रकाश फार सुरेख बोलले. लहान मुल आईच्या कुशीत गेल्यावर जसं झोपी जातं तशी अवस्था आता मुक्तांगणमध्ये आल्यावर त्यांची होते. व्यसनमुक्तांच्या जागेकडे पाहात ते म्हणाले कि येथे बसणे सोपे नाही. मी बेवडा आहे याची सतत जाणीव ठेवली आहे. एके काळी पाणी कमी आणि दारु आपण जास्त प्यायलो आहोत ही कबुली देखिल त्यांनी दिली. आपल्या पत्नीचे त्यांनी आभार मानले. मुक्तांगणला येण्याआधी अनेक बाबा, बुवा केले पण काहीही उपयोग झाला नाही. या व्यसनाने फक्त मृत्यु येतो असा इशारा प्रकाश यांनी दिला. तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सकारात्मक संदेश देऊन त्यांनी आपले मनोगत संपवले.
सर्वजण सकारात्मकच बोलत होते. मात्र त्यांचे विचार वेगवेगळ्या दृष्टीकोणातुन केलेले होते त्यामुळे मनोगतांमध्ये एकसाचीपणा नव्हता. राजेंद्र यांनी तंबाखु आणि गुटखा याचे ३२ वर्षे व्यसन केले. ते सोडणे जमेल का याबद्दल ते स्वत:च साशंक होते. मात्र मुक्तांगण हे त्यांनी आपले कुटुंब असल्यासारखे स्विकारले. ते तेथे राहिले. व्यसनमुक्त झाले. जे नातेवाईक, मित्र देऊ शकत नाहीत ते मुक्तांगणमध्ये मिळते असे त्यांनी सांगीतले. समाजात व्यसनी माणसाला अपमानाशिवाय काहीही पदरी पडत नाही. मुक्तांगणमध्येच त्याच्या वेदना समजुन घेतल्या जातात असाच त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ होता. जब जागो तब सवेरा असे सांगुन राजेंद्र यांनी कुठल्याही काळात, वयात व्यसन सोडण्याचा जरुर निश्चय करावा, आता आपल्याला जमेल कि नाही असा नकारात्मक विचार करु नये असे आवर्जुन सांगितले. शैलेश यांनी मुक्तांगणला त्यांचं दाखल होणं फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्यामुळेच असेल कदाचित पण त्यांना दोनवेळा दाखल व्हावं लागलं. मग ढवळे सरांनी मंत्र दिला कि तु दारुड्या आहेस हे आधी मान्य कर. शैलेश यांनी त्यानंतर फक्त आजचा दिवस मी पिणार नाही आणि पहिला घोट घातक ही दोन महत्त्वाची उपचारात्मक वाक्यं आपल्या जीवनाचा भाग बनवली. आज ते व्यसनमुक्त आहेत. ज्ञानेश्वर यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासुन ते पन्नाशी उलटेपर्यंत व्यसन केलं. मुक्तांगणमध्ये उपचार घेतल्यानंतर आज त्यांना व्यसनमुक्त होऊन एक वर्ष झालं आहे. आईवडिलसुद्धा देणार नाहीत असं शिक्षण मुक्तांगणमध्ये मिळतं असं ते म्हणाले. त्यानंतर एका वृद्ध व्यसनमुक्त गृहस्थांनी "कुणी फुकट दिली तरीही दारु प्यायची नाही असा निश्चय सर्वांनी करावा" असे उपचार घेणार्या रुग्णमित्रांना आवाहन केले.
सोबरायटी नेहेमी तुमचा फायदाच करते अशा अर्थाचं एक इंग्रजी वाक्य ढवळे सरांनी संचलन करताना सांगीतलं होतं. त्याचा अनुभव सर्वांनाच आला होता त्यामुळे बर्याच जणांना किती बोलु किती नको असं झालं होतं. यावेळी वाढदिवस साजरे करणारे बरेच होते आणि वेळ नेहेमीप्रमाणेच मर्यादित होता. जवळपास सत्तर जण तर व्यस्त असल्याने येऊ शकले नव्हते. त्यामुळे शेवटी सर्वांनाच दोन मिनिटांत आपले मनोगत सांगण्याची विनंती करण्यात आली. शेवटी मुक्तांगणचे शिलेदार मनोगत व्यक्त करणार होते. त्यामुळे मनोगतांची सखोलता वाढतच गेली. अमोल पोटेसरांनी आपल्यावर जबाबदार्या आल्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवत गेलो असे सांगीतले. जबाबदार्यांची जाणीव त्यांना नुसती झाली नाही तर त्या व्यवस्थितपणे पेलता याव्या यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक सकारात्मक बदल केले. त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी तंबाखु सोडली. मधुमेह आहे पण तो त्यांनी ताब्यात ठेवला आहे. मुक्तांगणमुळे आयुष्य वंडरफुल वाटत आहे असे म्हणुन त्यांनी आपल्या सोबराईटीचे श्रेय मुक्तांगणला दिले. माधवसरांचं मनोगत हे त्यांच्या सोबराईटीला कारणीभुत झालेल्यांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञताच होती. त्यांनी सर्वप्रथम मोठ्या मॅडमचा कृतज्ञतेने उल्लेख केला. सात वर्षापूर्वी अक्षरशः रस्त्यावर असलेले माधवसर आज त्यांच्या प्रगतीमुळे आईवडिलांच्या डोळ्यांत जी चमक दिसते ती पाहुन आनंदुन जातात. त्यातच आता माधवी मॅडमची साथ मिळाली आहे. आज मिळालेले मेडल त्यांनी माधवी मॅडमना समर्पित केले आणि मिळालेली ही साथ अत्यंत मोलाची आहे हेच त्यातुन अधोरेखित केले. मुक्तांगणमुळे स्वतःला शोधायला वेळ मिळाला हे त्यांनी आवर्जुन सांगीतले. कुठलिही गोष्ट मनापासुन करायची हा खाक्या असलेल्या माधवसरांनी आपण दारु प्यायलो ते मनापासुन आणि सोडली तीही मनापासुन असे मोकळेपणाने सांगीतले. नितीन देऊसकरांनी मोठ्यामॅडमचा उल्लेख करुन मुक्ता मॅडम, बाबा, आईवडिल व पत्नी यांचे आभार मानले. सर्वांबद्दल कृतज्ञतेची भावना आणि सर्वांकडुन शिकणे, शिकत राहणे यांचा त्यांच्या सोबरायटीत फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमुद केले. प्रधानसर आपले मनोगत व्यक्त करताना खुपच भावुक झाले होते. ज्यांनी मदत केली ते आज माझा कौतुक सोहळा पाहायला समोर नाहीत हे सांगताना त्यांना प्रयत्नपूर्वक अश्रु आवरावे लागले. यानंतर सर्व उत्सवमुर्तीचा मुक्तांगणच्या प्रथेप्रमाणे मेडल देऊन गौरव करण्यात आला.
यानंतर सात समुद्र पार केलेले, इंग्लीश खाडी विक्रमी वेळात पार केलेले, २२ तासात १६ वेळा सिंहगड चढण्याचा अनोखा विक्रम केलेले, लिमका आणि गिनीस बुकमध्ये नाव असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमोल आढाव यांचे भाषण झाले. त्यांनी आपली इंग्लीश खाडी पोहल्याची चित्रफीत दाखवली. सारे रुग्णमित्र ती पाहण्यात रंगुन गेले होते. अमोल यांनी त्यांना देखिल दारु आणि तंबाखुचे व्यसन होते हे सांगुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. व्यसनापायी कँपमधुन काढुन टाकण्यात आलेले अमोल आढाव आता विक्रमवीर म्हणुन त्या ठिकाणी व्याख्याने द्यायला जातात. स्वतःवर ताबा हवा, शरीराला दुय्यम लेखु नका. मानसिकता मजबुत असायला हवी हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगीतले. चित्रफितीतुन त्यांची दुर्दम्य चिकाटी दिसली होतीच. यानंतर मनोगत या हस्तलिखिताचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचा समारोप मुक्तामॅडम यांच्या छोट्याशा भाषणाने झाला. त्यांनी सार्यांना हिम्मत न हरण्याचा संदेश दिला. समस्या येतात, त्या येतील, त्या येऊ देत पण त्या निवारण्यासाठी नशा करु नका. येथे व्यसनमुक्तांसाठी ठेवलेल्या खुर्च्या कमी पडायला हव्यात आणि समोर रुग्णमित्रांच्या जागी कुणीही बसलेले दिसु नये. ज्या दिवशी मुक्तांगण बंद करावे लागेल तो दिवस आम्हा सर्वांसाठी सर्वात आनंदाचा दिवस असेल. असे सांगुन मुक्तामॅडमनी आपले भाषण संपवले.
घरोघरी मुक्तांगणमुळे सुखाची सोनपावले उमटलीत. त्याचे यथार्थ प्रतिबिंब दाखवणार्या एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली होती.
अतुल ठाकुर
छान , तुमच्या मुळे आम्हालाही
छान , तुमच्या मुळे आम्हालाही या सुंदर कार्यक्रमाची माहीती मिळाली.
सुंदर
सुंदर
व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण जे
व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण जे अतिशय मोलाचे काम करीत आहे ते तुम्ही इथे दिलेत याकरता मनापासून धन्स ...
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद अतुल, नेहमीप्रमाणेच
धन्यवाद अतुल, नेहमीप्रमाणेच चांगला लेख.
शीर्षकही अगदी योग्य.
सर्वांचे मनापासुन आभार
सर्वांचे मनापासुन आभार
व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण
व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण अतिशय मोलाचे काम करीत आहे >+१
छान लिहिलायंत वृत्तांत.
अतिशय सुरेख लेख. धन्यवाद
अतिशय सुरेख लेख. धन्यवाद
खुपच स्तुत्य उपक्रम....
खुपच स्तुत्य उपक्रम....
छान वृत्तांत.
छान वृत्तांत.