स्विट्झर्लंडचे अनुभव.. ६ - पाळीव प्राणी

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

हे मी प्रियाच्या रंगीबेरंगी पानावर टाकलं होतं, पण आता इथेही टाकते आहे....

प्रिया, आम्ही १५ एप्रिल २००६ पासुन आम्ही goldan retriever आणला आहे. तू जे लिहिलं आहेस तसंच आम्ही अनुभवतो आहोत. त्याला आम्ही breeding house मधून विकत घेतला. तिथे त्याचं नाव Quando ठेवलं होतं. स्वीसमधे प्रत्येक कुत्र्याच्या कानांत चीप इन्जेक्ट करतात. चीपमध्ये त्याच्या मालकासकट त्याची सर्व माहिती असते, त्यामुळे स्वीसमधे प्रत्येक कुत्र्याची सरकारकडे यादी असते. चीपमुळे त्याचं नाव आम्हाला बदलणं शक्य नव्हतं. मला स्वत:ला कुत्री तितकीशी आवडत नाहीत, पण नवर्‍याला अतिशय वेड, त्याने रिटायर झाल्यावर लगेच क्वांडोला घरी आणला.

क्वांडोची लव सोनेरी आहे व डोळे काजळ घातल्यासारखे काळेभोर आहेत. आणला तेव्हा १२ आठवड्याचा होता, वजन ९ किलो होतं. त्याची वाढ फार वेगाने होते आहे... आता ७ महिन्यांचा झाला आहे आणि वजन २५ किलो! पूर्ण वाढ झाल्यावर त्याचं वजन म्हणे ३५ ते ४० किलोपर्यंत जाईल असं कळलं! (रेफ: त्याचा डॉक्टर!)

पहिले दोन महिने मी खरंच फार टेन्स होते, आता त्यानेच लळा लावला आहे. त्याची शाळा असते, तिथे कुत्र्यांना शिस्त कशी लावायची याचं शिक्षण देतात. प्रायमरी पास झाला... ऑगस्टमध्ये हायस्कूलमध्ये गेला आहे. शाळेचा खूपच फायद होतोय आम्हाला! त्याचं सोशलायझेशन होतं.... शाळेत इतर कुत्र्यांशी संपर्क आल्यामुळे फिरायला गेल्यावर जर दुसरे कुत्रे भेटले तर इतका छान खेळतो की त्या कुत्र्यांच्या मालकांना क्वांडो खूपच आवडतो. शाळेतले कमांडस विशेषत: रस्त्यावरुन चालतांना, घरी पाहुणे आले असताना, खाण्याच्या सवयी लावताना फार उपयोगी पडतात. शाळेमुळे वळण लावणं सोपं जातं.

सध्या आमची दिनचर्या क्वांडोच्या भोवती व क्वांडो आमच्याभोवती! त्याचं खाणं, शी-शूसाठी बाहेर घेऊन जाणं, फिरायला नेणं, त्याच्याशी खेळणं.... यांत दिवस कसे निघून जाताहेत कळत नाही! माझ्या नवर्‍याला निवृती नंतरचे डिप्रेशन येणं तर दूरच.... क्वांडोमुळे स्वत:बद्दल विचार करायला फुरसत नसते!

आता पुरे! नाहीतर पु. लंच्या कुत्र्यांच्या मालकांच्या यादीत मी जाऊन बसेन!

बी ने मला पुढे शाळेविषयी लिहायचा आग्रह केला, म्हणुन पुढे.....

बी, अरे शाळाच काय पण आमच्या गावांत Cynology Association आहे. या संस्थांमधुन कुत्र्यांवर प्रशिक्षण घेतलेली माणसं काम करीत असतात. हे शिक्षक अगदी नावापुरती फी आकारून कुत्र्यांची शाळा चालवतात. इथल्या शिक्षकांचा पोटाचा व्यवसाय दुसरा असतो, हे काम ते विना मोबदला करतात. फी संस्था चालवायला व कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी जी साधने लागतील त्यावर खर्च होते. या संस्थेचं खूप मोठं आवार आहे. तर्‍हेतर्‍हेचे खेळ आहेत. आवार नदीच्या काठावर असल्याने कुत्र्यांना पाण्यांतही सोडतात. सगळे कुत्रे मस्त मजेत एकेमेकांसोबत पोहतात.

कुत्र्याचं पिल्लू असतांनाच त्याला शिक्षण देणे, वळण लावणें हे लोक जरुरीचं समजतात. त्याचा फायदा होतो हे आम्ही अनुभवतो आहोत. कुत्र्याने मालकाच्या सांगण्याकडे एकाग्रतेने लक्ष देणे ही पहिली महत्वाची पायरी आहे, पण ते शिकवणे कौशल्याचे शिवाय अत्यंत जिकिरीचे आहे. शाळा आठवड्यांतून एकदाच असते. कुत्र्याचा मालक बरोबर जातो. दोन तास प्रशिक्षण असते. कुत्र्यांची बुध्दी काही आपल्यासारखी नसते हे लक्षांत घेऊन मालकाने कुत्र्याकडून शाळेत शिकवलेले पुढे करून घ्यायचे असते.... गृहपाठच म्हण! कुत्र्याकडून गृहपाठ करुन घ्यायला संयम आणि चिकाटी दोन्हीची अत्यंत जरुरी आहे. थोडक्यांत कुत्र्याबरोबर मालकाचंही शिक्षण! डबा देत नाही पण बरोबर कुत्र्यांची बिस्किटं न्यायची असतात. कुत्र्याने शिकवलेले नीट केले की त्याला एक बिस्किट देऊन प्रोत्साहन द्यायचे असते. तसंच गृहपाठ करतांना बिस्किटाची बक्षिसी दिली की कुत्रा ते लक्षांत ठेवतो.

दुसरी महत्वाची गोष्ट... कुत्र्याने कुठेही केलेली शी - अगदी जंगलांतसुध्दा - उचलायची सक्ती आहे. ठिकठिकाणी रॉबी डॉग नावाच्या हिरव्या पेट्या उभारलेल्या असतात. त्यांत काळ्या रंगाच्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेऊन दिलेल्या असतात. त्या हाताला लावून शी उचलून त्याच डब्यांतील मोठ्या पिशवीत टाकून द्यायची असते. या पिशव्या व्यवस्थित मोठ्या असतात. आपले हात एकदम सुरक्षित राहातात. शेतांतदेखिल कुत्र्याने शी केली तर ती उचलावी असा तिथे फलक लावलेला असतो. कुत्री पाळणारे इमाने इतबारे हा नियम पाळतात!

विषय: 
प्रकार: