भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७
काही वर्षांपुर्वी:
अकरावीचं वर्ष कसंबसं संपलं. श्रीनिवासने चक्क बरेच दिवस अभिला अभ्यासाबद्दल काहीच विचारलं नव्हतं त्यामुळे अभिषेक म्हणायला निवांत होता…बारावीनंतर काय हा विचार करणं त्याने तूर्तास बंद केलं होतं. आपण आईला दिलेलं वचन मोडायला लागलं तरी हरकत नाही याचा त्याने मनाशी निर्णय केलेलाच होता. अचानक एक दिवस त्याला कर्वे सरांनी बोलावून घेतलं.
"ये अभिषेक…तुझ्याकडे थोडं काम होतं"
"सर, माझ्याकडे काम?"
"अ हो…अरे पुण्याला 'आजची शिक्षणपद्धती आणि विद्यार्थी' असा एक परिसंवाद होणारे…मला आमंत्रण आहे! सो मी विचार केला की तू तुमच्या शाळेत गेल्या वर्षी सत्कार समारंभाला केलेलं भाषण मला दिलंस तर--"
"सर, तुम्हाला त्या भाषणाबद्दल कसं माहीत?"
"अरे त्या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या गोखले सरांशी अलीकडेच ओळख झाली…त्यांनी उल्लेख केला होता म्हणून माझं कुतूहल वाढलंय एवढंच!! सो मला शिक्षण पद्धतीबद्दल तुझं मत ऐकायला आवडेल! निदान सध्याची मुलं कसा विचार करतात याचं प्रातिनिधिक मत मिळेल मला"
"सर पण तुम्ही माझं भाषण वाचून काय करणार?"
"अरे…एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुझ्या वतीने तिथे बोलणार…तुझा नावासकट उल्लेख करेन मग तर झालं??"
"अहो सर…त्याची काही गरज नाही…झालंय असं की मी ते भाषण केलं तेव्हा त्यातल्या कंटेंटचा इतक्या सिरीयसली विचार नव्हता केला…पण आत्ता तुम्ही परिसंवाद वगैरे म्हणालात म्हणून ---"
"अरे ठीके रे…आता विचार करून लिहिणार आहेस ना? मग तुला परिसंवादाचा विषय माहितीय…आण लिहून तुला योग्य वाटेल ते! आणि हो…मी तुझा उल्लेख केला तर तो गडकरी पारितोषिक विजेता म्हणून करणारे. तेव्हा त्यांच्या नावाला बट्ट्या लागेल असं काही लिहू नको म्हणजे झालं"
"नक्की सर…येतो मी"
अभिषेकने भाषणाच्या वेळी मांडलेले मुद्दे सौम्य भाषेत लिहून काढले. एकूणच शिक्षणपद्धतीसंबंधी विषय असल्याने त्याने विचार करून एक-दोन मुद्दे वाढवले-
१. संस्कृतसारख्या जास्त मार्क्स मिळवून देणाऱ्या, भाषा उच्चारण सुधारणाऱ्या भाषेला जास्त वाव मिळावा! हिंदीचा वापर कमी असावा!
२. अकरावी प्रवेशाला गुणवत्तेचा मुद्द प्रमुख धरून आरक्षण रद्द करावं
तो कर्वेंकडे लिखाण घेऊन गेला. कर्वेंनी सगळ्यावरून नजर फिरवली. मग म्हणाले-
"आपल्याला शांतपणेच बोललं पाहिजे. एक काम कर- माझ्या घरी ये तू या वीकेंडला. सावकाश बोलू!"
तो त्यांचा पत्ता घेऊन शनिवारी त्यांच्या घरी जाऊन पोहोचला. कर्वेंनीच दार उघडलं.
"अरे अभिषेक…ये ये"
घरात आटोपशीर फर्निचर होतं. भिंतीवर गणपती, श्रीकृष्ण, विवेकानंद यांचे फोटो आणि अभिला माहित नसणाऱ्या कुणा परदेशी बँडचं पोस्टरसुद्धा होतं. घरात अजून कुणी माणसं दिसत नव्हती. सोफ्याच्या मागे सरांचं डेस्क होतं. त्यावर कॉम्प्युटर आणि काही पुस्तकं होती.
सरांनी त्याच्यासमोर ड्रायफ्रुट्स आणि पेप्सीचा कॅन आणून ठेवला.
"सर…हे कशाला?" आपण आपल्या एका शिक्षकाच्या घरी आलोय आणि तो आपल्याला खायला आणून देतोय हे बघून त्याला अवघडल्यासारखं होत होतं.
"कशाला म्हणजे? मला आणलंय…तुझ्यासाठी आणलंय असं वाटलं का तुला?" सरांनी गंभीरपणे विचारलं. अभिषेकला अजूनच ओशाळल्यासारखं झालं.
"ओह सॉरी सर….मला वाटलं-- रिअली सॉरी!" सर हसायला लागले.
"अरे मी थट्टा करत होतो…मी तुझ्या हालचाली निरखत होतो…मग मला जाणवलं की कसं वागावं, काय बोलावं याचा तू विचार करतोयस…म्हणून तुझी थट्टा करायची लहर आली…मला तुला कम्फर्टेबल करायचं होतं--अभिषेक आपण काहीवेळी उगाच खूप विचार करतो…आपल्यापेक्षा वयाने, अधिकाराने मोठ्या असलेल्या कुणाच्या घरी गेलं की कसं वागावं याचा आपण विचार करतो…घराच्या रंगरूपावरून तिथे राहणाऱ्या माणसांच्या राहणीमानाचे आणि नकळत त्यांच्या स्वभाव आणि मनोवृत्तीचे आडाखे आपण बांधायला लागतो.त्यांचं घर बघून त्यांच्या आणि आपल्या राहणीमानाची तुलना करत राहतो…अवघडून जातो…"
"अगदीच तसं काही माझ्या डोक्यात नव्हतं सर…पण शेवटी तुम्ही माझे सर आहात…मी तुमच्या घरी आलोय…पहिल्यांदा आलोय पण मी येताना काहीच आणलं नाहीये आणि वर तुम्हीच मला खायला देताय….हे जाणवलं म्हणून थोडा अस्वस्थ झालो एवढंच"
"ठीके रे…तेवढं चालतंच!! आणि एरव्ही तू माझा विद्यार्थी असलास तरी आज पाहुणा आहेस…सो जशी मी माझ्या इतर पाहुण्यांची सरबराई करेन तशी तुझी केलीच पाहिजे…नाही का?…असो… आरामात बस…निवांत बोलू!"
"सर ते लिखाण….??"
"वाचलं की मी…जेवढं मी ऐकलं होतं त्याच्यापेक्षा बरंच सौम्य वाटलं मला…पण उत्तम आहे…तुझे मराठी भाषाविषयक मुद्दे आवडलेसुद्धा! पण ते बाकी संस्कृत आणि आरक्षणवाले मुद्दे काही नाही पटले बुवा"
"सर…तुम्ही शिक्षणपद्धतीविषयक परिसंवाद आहे म्हणालात म्हणून मी माझी एकूणच जनरल मतं मांडायचा प्रयत्न केला…सो माझी मतं तुम्हाला का पटली नाहीयेत हे कळलं तर---"
"सांगतो ना…हे बघ…मराठी तुझी मातृभाषा आहे! त्याच्याबद्दल तू कळकळीने लिहिलंस हे लक्षात आलं माझ्या…पण हिंदीचा वापर कमी करून संस्कृतचा वाढवावा असं का बरं वाटलं तुला?"
"सर संस्कृत हिंदीला ऑप्शन म्हणून घेता येतं, त्यात मार्क चांगले मिळतात…शिवाय उच्चारांवर चांगले संस्कार होतात ते वेगळंच!"
"उच्चारांवर संस्कार होणं हा थोडा वादाचा मुद्दा आहे! म्हणजे बघ- लहानपणापासून तू 'पाणी' हा शब्द ऐकत आल्यास म्हणून तुला तो योग्य वाटतो पण ज्याने तो 'पानी' असाच ऐकलाय त्याच्यावर काय उपयोग उच्चार संस्कारांचा??"
"पण 'पाणी' हा बरोबर उच्चार नाहीये का?"
"हे कोण ठरवतं? एक गोष्ट लक्षात घे- आई आपल्याशी लहानपणापासून ज्या भाषेत बोलते ती आपली 'मातृभाषा'…आता जर आईच 'पानी', 'लोनी' म्हणत असेल तर त्या मुलासाठी ती मातृभाषा झाली आणि हेच तुला अशुद्ध वाटणारे शब्द त्यांच्यासाठी योग्य शब्द झाले! शाळेच्या सहा तासात आपण मुलांच्या अक्षरावर नक्की प्रयोग करू शकतो…त्यांच्या संस्कारांवर आणि जिभेवर करूच शकू असं नाही!! आणि गडकरी बक्षीस जिंकलं आहेस म्हणून तुला मराठीचा कळवळा कायम राहील पण भावना आधी आणि भाषा नंतर हा मुद्दा लक्षात घे…आणि एकीकडे तू मराठीचा मातृभाषा म्हणून उदोउदो करतोस मग हिंदीबद्दल उदासीनता का? ती तर राष्ट्रभाषा आहे…आणि राष्ट्र म्हणजे मातृभूमीच झाली की…मग तिची भाषा कमी महत्वाची करून चालेल?"
"मी चुकलो सर…"
"चुकलो नाही रे…थोडा सारासार विचार करायला कमी पडलास! हे बघ अभिषेक…शिक्षणपद्धतीवर आपल्याला मत मांडायला मिळतंय म्हणजे आपण तिची मोडतोड करायला सुचवू शकत नाही…त्यात दोष आहेत हे नक्की पण ते डोळसपणे सुधारायला हवेत…आता तुझा दुसरा आरक्षणवाला मुद्दा…तोही अर्धवटच!"
"तो कसा?"
"हे बघ…. आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण जेमतेम ५०-५५% आहे…त्यातही जास्त आकडा शहरांमध्ये! खेड्यांचं काय? तुला माहीत नसेल पण महाराष्ट्रात आणि देशात अशी कित्येक खेडी आहेत जिथे जातीव्यवस्था अजूनही आहे!! तिथली लोक जगाच्या ४०-५० वर्ष मागे जगतायत…अशा ठिकाणी समाजातल्या दुर्लक्षित घटकांना समाजात परत आणण्याचा प्रयत्न करायला म्हणून आरक्षण! हं…शहरात त्याचा वापर थोडा अनावश्यक वाटतो खरा…सो त्याबाबतीत आपण विरोध नक्की करू जमेल तसं!"
"सर, डोनेशन देऊन अॅडमिशन घेणं चूक का बरोबर?"
"अरे बापरे…आता मात्र मला पेचात टाकलंस तू…वेल…टू आन्सर युअर क्वेस्चन…मला तरी काही ते फारसं पटत नाही!"
"म्हणजे सर एखाद्या जनरल कॅटेगरीतल्या मुलाला बरे मार्क्स आहेत पण आरक्षण नसल्यामुळे प्रवेश नाही आणि त्याने डोनेशन देऊन प्रवेश घेतला तरी तो चुकीचा असं म्हणायचं आहे तुम्हाला?"
"मला वाटलंच होतं की असा काहीतरी प्रश्न येणारे म्हणून…तुझ्या प्रश्नातला तो मुलगा चुकला असं नाही म्हणणार मी…पण त्याने पैसे दिल्याने कदाचित त्याच्यापेक्षा जरासे जास्तच मार्क मिळालेला जनरल कॅटेगरीतला मुलगा प्रवेशावाचून राहिला तर तो चुकला असं मात्र नक्की म्हणेन मी!"
"सर म्हणजे एकूण काय? आरक्षण असो किंवा डोनेशन असो…कुठल्याही प्रश्नाला ठाम चूक किंवा बरोबर असं उत्तर नाही"
"नसतंच रे…जसं माणसांच्या बाबतीत काळं-पांढरं अशी टोकं सापडणं जवळपास अशक्य असतं तसंच आयुष्यातल्या प्रश्नांच्या उत्तरांचं असतं…कधी नियम पाळायचे तर कधीतरी त्यातून पळवाटा काढायच्या…परिस्थितीवर अवलंबून असतं बघ सगळं" बोलता बोलता सर गप्प झाले "थांब मी तुला अजून पेप्सी आणतो म्हणून उठून आत गेले.
'परिस्थिती. कसला मजेशीर शब्द आहे नाही? मी मनाविरुद्ध सायन्सला का आलो? परिस्थिती. डोनेशन चूक किंवा आरक्षण चूक हे कशावरून ठरतं?? परिस्थिती. मी आयुष्यात पुढे काय करणारे? वेल…परिस्थिती ठरवेल ते' अभिषेकच्या मनात विचार येउन गेला.
तेवढ्यात सर बाहेर आले.
"अभिषेक, खूप दिवसांनी कुठल्यातरी विद्यार्थ्याशी अशी चर्चा झाली माझी…दोनेक वर्षापूर्वीपर्यंत माझेच ज्युनिअर्स यायचे गप्पा मारायला…पण मी लेक्चरर झालो आणि विद्यार्थ्यांशी असा मला अपेक्षित असणारा संवाद पहिल्यांदा साधता आला"
अभिषेकने मान डोलावली.
"सर तुम्ही इथे एकटेच राहता?" अभिषेकने प्रश्न विचारला.
"नाही रे आम्ही आठजण"
"सात?"
"हो. गणपती, श्रीकृष्ण, विवेकानंद, हे बीटल्स… लेनन, मेक्कार्टनी, हेरीसन, स्टार….आणि मी. आठजण"
"सर हे बाकी सगळे तुमच्या घरासारखे इतर कित्येक घरांत राहतात…पण फक्त तुमच्या घरचे लोक?"
"यु मीन आई-वडील-भाऊ-बहिण वगैरे??"
"अ हो"
"सगळे गावी असतात…"
"गावी? मग ते तुमच्याबरोबर इथे का नाही राहत?"
"कारण मीच त्यांना सोडून इथे राहायला आलोय" कर्वेंनी निर्विकारपणे उत्तर दिलं.
अभिषेक काही न बोलता त्यांच्याकडे पाहत राहिला. अभिषेकशी बोलताना नकळत कर्वेंना त्यांचा भूतकाळ आठवायला लागला.
"त्यांना माझी खूप काळजी आहे. जगातल्या कुठल्याही आई-बापाला असेल एवढीच! पण मला ती कायम जास्त वाटायची, निरुपयोगी वाटायची. वाटायची कशाला म्हणू? अजूनही वाटते. मी आयुष्यात काय करावं याबद्दल त्यांची ठाम मतं होती जी मला मान्य नव्हती…सो मला त्यांच्यापासून लांब येणं योग्य वाटलं…मी आलो…चारेक वर्ष उलटून गेली त्यांना भेटून"
"सर तुम्हाला त्यांच्याकडे परत जावसं नाही वाटत?"
"नाही…तसंही त्यांच्याकडे जायला ते लांब नाहीचेत…त्यांच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे…त्या सोबत करतात माझी"
सरांचे डोळे अजूनही निर्विकार होते.
"सर…तुम्ही हे सगळं सांगितलंत यानंतर तुमच्याकडून काय उत्तर मिळेल याचा अंदाज असूनही एक प्रश्न विचारावासा वाटतोय… विचारू?"
"या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर तू मला अजून एकही प्रश्न विचारणार नाहीस?"
"नो सर…मला हे विचारायचं आहे की माणसाची स्वप्नं, उद्दिष्टं मोठी की त्याची माणसं?"
"पुन्हा तू मला पेचात टाकायचा पुरेपूर प्रयत्न करतो आहेस…पण पुन्हा उत्तर तेच…दोन्ही गोष्टी आपापल्या जागी मोठ्या आणि महत्वाच्या आहेत. पण प्रायोरिटी कुणाला द्यायची हे एकच गोष्ट ठरवते- परिस्थिती."
आज दुपारी:
"अ…मला एका पेशंटची चौकशी करायची होती."
"पेशंटचं नाव?"
"अभिषेक कुरतडकर"
अभिषेक कुरतडकर नाव ऐकल्यावर त्या रिसेप्शनवरच्या बाईने डोकं वर करून पाहिलं. काही वेळापूर्वीच एक माणूस येउन त्याची चौकशी करून गेला होता. 'हा अभिषेक कुरतडकर आहे तरी कोण? आणि ही सगळी येणारी माणसं जर का खरंच त्याची नातेवाइक असतील तर त्यांच्याकडे इतर घरच्या माणसांचे फोन नंबर्स नाहीयेत?"
"आपण कोण?"
"मी राजीव कर्वे…तो विद्यार्थी आहे माझा"
"आठवा मजला…आयसीयुमध्ये आहे काल रात्रीपासून…"
"अ…काय झालं काय त्याला?"
"काल रात्री अपघात झालेला पेशंट म्हणून अॅडमिट केलंय त्याला…पोलिससुद्धा येउन गेले!"
"ओके…मी त्याला भेटू शकतो"
"भेटायच्या वेळा आत्ता नसतात सर…तुम्ही त्या पलीकडच्या कौन्टरवर जा आणि तिथे भेटायच्या वेळांची चौकशी करा…ओके?"
"ओके"
'अभिषेक कुरतडकर…आज जणू काही हा एकच पेशंट आहे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये" रिसेप्शनिस्ट मनात पुटपुटली.
सर त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्याला भेटायला आले होते खरे, पण त्यांची भेट होणार होती का?
क्रमशः
मोठे भाग टाका ना, उत्सुकता
मोठे भाग टाका ना, उत्सुकता वाढते आहे
उस्तुकता वाढत चालली आहे..
उस्तुकता वाढत चालली आहे..
आज ८ ही भाग वाचले. वाचायला
आज ८ ही भाग वाचले. वाचायला मजा येतेय.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
PUDHCHA BHAG LAVKAR TAKA.
PUDHCHA BHAG LAVKAR TAKA.
खूपच छान चैर
खूपच छान चैर
सगळे भाग वाचले मस्त
सगळे भाग वाचले
मस्त लिहिताय
उत्सुकता वाढतेय पुढील लेखनासाठी शुभेच्छा
१ वर्षआने सगळे भाग वाचले ,
१ वर्षआने सगळे भाग वाचले , खुप उत्सुकता लागली आहे पुढे काय ?
मस्त!!
मस्त!!