मी नव्या कंपनीत मुलाखतीसाठी पोहोचले तेव्हा रिसेप्शनवर कुणीच नव्हतं. आधीच सांगितल्याप्रमाणे एकशे नव्व्यणव एक्स्टेन्शन नंबरवर फोन केला आणि मी रिसेप्शनजवळ आल्याची वर्दी दिली. काही सेकंदात जपानी नियमाप्रमाणे काळा सुटबुट घातलेला एक अगदी तरुण जपानी मुलगा माझ्याशी बोलायला बाहेर आला. वयाने लहान, अगदी टिपिकल जपानी चेहेरा आणि केसांची स्टाईल, तुकतुकीत जपानी त्वचा, दिसायला देखणा पण जरा बुटका. जपानी मुलगा म्हटल्यावर जपानीत बोलावे लागणार असा विचार मी करत होते तितक्यात शेकहँड साठी हात पुढे करत अमेरिकन उच्चाराच्या अस्खलित इंग्रजीमध्ये म्हणाला "हाय, आय अॅम केइजी ताकाहाशी." आज रिसेप्शनिस्ट सुट्टीवर असल्याने तो आलाय असे सांगत त्याने मला आत नेले. मग कंपनीबद्दल माहिती वगैरेही दिली. एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा भेटल्यावर आपण ज्या भाषेत बोलतो सहसा तीच भाषा पुढेही संवादासाठी वापरली जाते असा माझा अनुभव. त्याप्रमाणेच ऑफिसचे काम सुरु केल्यावर इंग्रजी ही आमच्या नेहेमीच्या संवादाची भाषा झाली.
वीस पंचवीस जणांच्या स्टाफ मध्ये मी आणि आमचा अमेरिकन सीईओ हे दोघेच परदेशी, बाकी सगळेच जपानी. त्यात बॉस बहुतांशी दौऱ्यावर असला की मी एकटीच. इतर सर्व जपानी बोलणारे. मग माझी आणि केइजीची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. त्यातही कंपनीच्या आयटी भागात काम करणारेही आम्ही दोघेच. त्यामुळे कामही रोज एकत्र करावे लागायचे.
कामाविषयी बोलता बोलता केव्हातरी लंचच्या वेळी इतर विषय निघत आणि केइजी त्याच्या आयुष्याविषयी, शाळा कॉलेजातल्या दिवसांविषयी सांगत असे. कोणालाही स्वत:हून कुठलेही खासगी प्रश्न विचारणे माझ्या स्वभावात कधीच नव्हते. त्यामुळे विषय निघेल तेव्हा तो सांगेल ते ऐकायचं काम मी करायचे. त्याने सांगितलेल्या काही गोष्टी तर अगदी सुरस आणि चमत्कारीक वाटाव्या अशा असत. इथे भारतात माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीच्या शालेय / कॉलेज जीवनात फारसे काही घडण्यासारखे नसते. पण त्याच्याकडे सांगायला अनेक गोष्टी होत्या.
त्याचं आणि त्याच्या भावाचं पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झालं होतं. तिथे त्या वयातही त्याला एशियन म्हणुन बरेच टक्के टोणपे खावे लागले होते. कधी कधी लहान मुलं इतक्या क्रूरपणे कशी वागतात काही कळत नाही पण त्याला त्याच्या तिथल्या वर्गमित्रांनी बराच त्रास दिला होता. जपानी मुलं डब्यात ओनिगिरी नावाचा एक पदार्थ नेतात त्यावर सिविड - नोरी गुंडाळलेली असते. ही नोरी काळपट हिरवी दिसते. हे खाणं चुकून त्याच्या डब्यात दिसलं की पोरं चिडवून हैराण करत. मग भांडाभांडी मारामारी असं काहीतरी होई. नुकतेच शिकत असलेल्या कराटेचे धडे त्या मुलांवरही गिरवून होत.
पुढे त्याच्या बाबांची बदली अमेरिकेत झाली. जपानी माणसांच एक असतं. ते जगात कुठेही रहात असले तरी आपल्या मुलांना जपानी भाषा यावी यासाठी अगदी प्रयत्नशील असतात. तर अमेरिकेत आल्यावर केइजीला इथे असलेल्या जपानी शाळेत टाकलं. आता निदान डब्यात काहीही नेलं तरी चालणार होतं! पण इथले आयुष्य विहीरीतल्या बेडकासारखे होते. मात्र इथल्या शाळेत अंमली पदार्थांना दूर कसे ठेवायचे, त्यांचे काय परिणाम होतात हे अगदी ठोकून ठोकून शिकवले.
अमेरिकेतल्या जपानी शाळेत जाऊन कंटाळलेल्या केइजीची रवानगी उच्च माध्यमिक आणि कॉलेज शिक्षणासाठी क्योतो इथल्या मोठ्या युनिवर्सिटीमध्ये झाली. आईबाबा, भाऊ अमेरिकेत आणि हा इथे हॉस्टेलमध्ये. नुसते स्वातंत्र्य ! कॉलेजचा कॅम्पस इतका मोठा की सायकलवरून सगळीकडे जावे लागावे. मुळात क्योतो हे शहरच अप्रतिम सुंदर. तिथली घरे , नद्यांच्या बाजू बाजूने जाणारे रस्ते, जपानी देवळे, दुतर्फा साकुराची झाडे असलेल्या वाटा सगळे एका वेगळ्याच कालखंडात असल्यासारखे. त्यातही युनिवर्सिटीचा परिसर अतिशय नेटनेटका आणि मोकळा. लहानपणी आई जबरदस्तीने पियानोचे धडे घ्यायला लावायची तेव्हा केइजीला पियानो बद्दल नावड होती. नंतर आईने फ्ल्यूटही शिकायला लावली होती. पण क्योतोला आल्यावर त्याला गिटार आवडायला लागली. समवयस्क मित्रांबरोबर स्वत:चा बँड सुरु केला. जगातली सगळी बंधने झुगारून टाकण्याच्या वयात इतके स्वातंत्र्य आणि संगीताची झिंग असे दोन्ही एकत्र मिसळल्यावर अभ्यासाचे जे व्हायचे ते झाले. मात्र नशिबाने अंमली पदार्थ सेवन न करण्याबद्दल आधीच्या शाळेत इतकं घासून घासून डोक्यात पक्कं केलं होतं की केइजी त्या वाटेला चुकूनही गेला नाही. सगळ्याप्रकारची व्यसनं आजूबाजूला सहज उपलब्ध होती. त्यातलं सिगारेटच व्यसन तेवढं लागलं ते ही बऱ्याच उशीरा. बँड नावारूपाला आणणे , त्यातून कार्यक्रम करणे हे आयुष्याचे उद्दिष्टं झाले. त्या सगळ्या भानगडीत शिक्षण वगैरे पुर्ण करण्यासारख्या फालतू गोष्टीकडे कोणाचं लक्ष असणार? केव्हातरी शिक्षण सुटले. मुलगा अठरा वर्षापेक्षा मोठा झाला होता. म्हणजे स्वत:च कमावून रहायला हवं होतं. गिटार वाजवायची , संगीत क्षेत्रात नाव कमवायचं पण ते सगळं करताना पोट थोडीच ऐकणार होतं? रोजचं खायला तर हवंच मग जशा मिळतील तशा नोकऱ्या सुरु केल्या.
आमच्या ऑफिसचे एक प्रवेशद्वार तोक्यो स्टेशनच्या अण्डरग्राऊण्ड भागात होतं. स्टेशन वरून शॉपिंग भागातून चालत जाऊन खालच्या खालीच ऑफिसमध्ये प्रवेश. असे तिथे बऱ्याच इमारतींना असते. अनेक रेस्तोरांपण खाली असतात. त्याकाळात तोक्यो स्टेशनच्या नुतनीकरणाचे काम चालू होते. जायच्या वाटा नेहेमी बदलत. एकदा असेच जेवून परत येताना केइजी मला म्हणाला की "आता या वाटेच्या बाजूला काम चालू आहे म्हणुन पत्रे लावून बंदिस्त केलाय ना त्या सगळ्या बंदिस्त जागा आपण चालत असलेल्या जागांपेक्षा कितीतरी मोठ्या असतात. आतमध्ये कुठून कुठे जोडणारे रस्ते असतात याचा विचार सुद्धा करता येणार नाही. "
सहाजिकच, त्याला कसकाय माहित असं मी त्याला विचारलं तर म्हणाला त्याने कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर म्हणुन काम केलं आहे. तो बांधकामाचं सामान उचलायचं आणि असंच काहीबाही काम करायला रोजंदारीवर तिथे होता. आता सूट बूट घालून सफाईदारपणे इंग्रजी बोलणारा, एसी ऑफिसात बसून आरामात काम करणारा हा मित्र कधी काळी मजूर म्हणुन कसा काम करत असेल हा विचार करूनच मी थक्क झाले!
जपानी रेस्टोरांमधल्या हसतमुखाने काम कराणाऱ्या वेटर मुली मुलांबद्दल मला नेहेमी कुतूहल वाटायचं. तिथली चकचकीत स्वयंपाकघरे, सजवलेल्या डिशेश, पटापट सराईतपणे काम करणे, आदराने बोलणे सगळे वेगळेच वाटायचे. मी केव्हातरी जेवताना तसे म्हणाले तर केइजी म्हणाला "यांना फार मेहेनत करावी लागते. रात्री रेस्टोरां बंद झाल्यावर सुमारे दोन तास हे लोक सफाई करत असतात म्हणुन किचन इतके साफसूफ आणि आटपलेले दिसते. मी काम करायचो तेव्हा पार दमून जायचो रात्री"
"तू रेस्टोरांमध्येही काम करायचास? " अर्थातच मी
त्यानंतर त्याने सांगितलं की तो कुकच्या हाताखाली मदतनीस होता. कुठलाही जपानी बॉस असावा तसाच हा कुकही खडूस होता. राबराब राबवून घ्यायचा. इतर भाज्या , मासे ठराविक पध्दतीने कापणे, त्यांचे ठराविक आकाराचे आणि वजनाचे तुकडे करणे. डिशेश भरणे अशी सर्व प्रकारची कामं बिनातक्रार झरझर करत राहायची. आणि दुकान बंद झाले की साफसफाई. रात्री घरी जायला बारा वाजून जायचे म्हणे. मग त्यांनतर प्रत्येक वेळी जेवताना एखादा वेगळा मासा असला, विशिष्ठ प्रकारे कापलेली भाजी असली की केइजी आवर्जून ते कापायला कसे सोपे किंवा कठिण आहे हे सांगायचा.
ऑफिसमधल्या लोकांनी आयटीसंदर्भातले प्रश्न विचारले कि केइजी सुरुवातीला अगदी समजावून सांगायचा पण पुन्हा पुन्हा तेच बाळबोध प्रश्न विचारले की जाम वैतागायचा. मात्र वयाने सगळ्यात लहान असल्याने कोणाला उलटून बोलायचा नाही. अशा वेळी स्वत:वर चिडून एकटाच, बहुधा सिगारेटसाठी बाहेर जाऊन यायचा.
शनिवार रविवारच्या सुट्ट्यानंतर 'हाऊ वॉज विकेंड' असं सहज विचारलं की केइजी हमखास सांगायचा 'टायरिंग ! डिड अ लॉट ऑफ किक बॉक्सिंग.' किक बॉक्सिंग शिकण्याचा अजून एक छंद त्याला होता आणि अगदी नेमाने तो ट्रेनिंग घ्यायला जायचा. त्याच्या कुठल्या कुठल्या स्पर्धा वगैरेही असायच्या त्या स्पर्धांमधेही तो नुकताच उतरायला लागला होता. कॉलेजला असताना जडलेले गिटार वाजवायचे वेड अजुनही होते पण आता सुदैवाने (?) बँड विखुरला होता. त्यामुळे घरी असल्यावर वेळ घालवायला म्हणुन तेवढी वाजवली जायची. क्वचित केव्हातरी एखाद्या जवळच्या मित्राच्या लग्नात वगैरे स्वत:च कंपोज केलेले गाणे वाजवायचे इतपत ते आले होते.
एकदा मला म्हणाला "माझ्या आईने कॉलेजला प्रवेश घेतला आहे. मास्टर्स करायला. ती रोज कॉलेजला जाते त्यामुळे मी क्वचित त्यांच्याकडे गेलो तरी फारशी भेटत नाही." आता या वयात कॉलेजला जाणाऱ्या केइजीच्या आईबद्दल मला अपार कौतुक वाटायला लागलं होतं. मग अचानक म्हणाला "मी पण नोकरी सोडुन पूर्णवेळ कॉलेज करू का? " हा एक माझ्यासाठी धक्काच होता. इतकी कष्टाने मिळालेली नोकरी हा मुलगा सोडणार आणि पदवी पूर्ण करणार, मग पुढे काय? आपण पदवी शिक्षण पूर्ण केले नाही याची त्याला कुठेतरी बोच होती पण आता गाडी रुळावर येत असताना असे काही करणे म्हणजे पायावर धोंडा होता. शेवटी त्याला पूर्णवेळ न करता अर्धावेळ किंवा दूरशिक्षण घेऊन पदवी घ्यायला सुचवले. त्याचे पुढे काय झाले देव जाणे. आमचे पुन्हा या विषयावर बोलणेच झाले नाही.
शिक्षण सोडुन, बँड बनवण्याची स्वप्न बघत मजूर म्हणुन , कुक म्हणुन काम करता करता हा आयटी इंजिनिअर कसा झाला याबद्दल मलाही कुतूहल वाटायला लागले होते. पण असे विचारणे मलाच बरोबर वाटत नव्हते. केव्हातरी बोलता बोलता त्यानेच सांगितले. त्याला जपानी आणि इंग्रजी दोन्ही भाषा सफाईदारपणे लिहीता वाचता बोलता येत होत्या त्या गुणामुळे एका मित्राच्या ओळखीवर एका नवीन कंपनीत तो रुजू झाला. तिथे वर्षभर काम केलं. मग आत्ताच्या कंपनीतला बॉस त्याला भेटला. पुन्हा एकदा जपानी आणि सफाईदार इंग्रजी येत असल्याने केइजीला या कंपनीत नोकरी मिळाली. हा अतिशय हुशार आणि मेहेनती मुलगा आहे हे बॉसला जाणवले आणि आयटीबद्दलचे शिक्षण घेण्यासाठी क्लास लावण्यास सांगितले, त्याची फी कंपनीने भरली. अगदी अल्पावधीत त्याने अॅड्मिनीस्ट्रेशन, हार्डवेअर, नेटवर्किंग शिकून घेतले. मायक्रोसॉफ्टची , सिस्कोची सर्टीफिकेशन पूर्ण केली. शिकता शिकता तेच ज्ञान ऑफिसात वापरावे लागायचे. रात्ररात्र जागून त्याने ऑफिसचे काम पूर्ण केले होते. नव्या इमारतीत गेल्यावर तिथले नेटवर्किंग , सर्वर सेटअप, युएस ऑफिसशी जोडणी हे सगळे त्याने एकट्याने केले.
केइजीची एक मैत्रिणही होती, ते एकत्रच रहायचे. इतक्या देखण्या, मेहेनती मुलाची मैत्रिणही छान असेलच आणि लवकरच ते दोघं लग्नही करतील असं मलाच नाही तर सगळ्या ऑफिसला वाटायचं. तो ही अनेकवेळा घर घेण्याबद्दल, लग्नानंतर सेटल होण्याबद्दल बोलत असे. त्याच्या अद्याप न ठरलेल्या लग्नाच्या फोटोग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट पण त्याने मलाच देऊ केले होते. पण मध्ये काही दिवस तो फारच उदास दिसयला लागला. शेवटी एकदा माझ्याकडून काहीतरी सल्ला मिळेल म्हणुन त्याने मला त्याचा प्रश्न सांगितला. त्याच्या मैत्रिणीला डिप्रेशनचा आजार होता. ती सदोदीत उदास असायची, कुठलेच काम करायच्या मन:स्थितीत नसायची. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही म्हणुन जागत शेवटी कसलेसे औषध घ्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी अगदी दुपारी उठायचे असा एक विचित्र चक्र चालू होते. खरेतर असा त्रास आधीपासुनच होता , याला माहितही होता. आणि तरिही गेले दोन एक वर्ष ते एकत्र होते. क्वचित केव्हातरी तो सांगायचाही त्याबद्दल. त्याला अपेक्षा होती की ती केव्हातरी बरी होईलच. तो तिला समजूनही घ्यायचा, तिची काळजी घ्यायचा. पण अलिकडे तीचा आजार वाढतच चालला होता. यानेही त्यापायी स्वत:ची मन:शांती घालवली होती. त्यातच त्याच्या दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखती चालू होत्या. त्याचा अभ्यास, अनेक मुलाखती यामुळे त्याला घरी तितकं लक्ष देता यायचं नाही त्यामुळे त्याची मैत्रीण अधिकाधिक पझेसिव्ह व्हायला लागली होती. आणि त्यात केइजीची घुसमट वाढत चालली होती. नुकतेच त्यांचे भांडण होऊन तो तात्पुरते दुसरीकडे जाउन रहायला लागला होता. खरंतर हे दोघं रहात असलेलं घर त्याच्याच नावावर, त्यानेच भाड्याने घेतलेलं होतं. पण तिला घर सोडुन जायला कसं सांगायचं असा विचार करून हाच बाहेर पडला होता. आता प्रश्न होता की पुन्हा एकत्र यायचं की नाही हा. मी तरी काय सांगणार होते!. त्याच्या मैत्रिणीची बाजू मी ऐकली नव्हती पण इतक्या चांगल्या मुलाचे आयुष्य निराशेच्या गर्तेत जाऊ नये असे मात्र मनापासून वाटत होते. सहसा जपानी माणसं आपल्या मनातले काही कुणाला म्हणजे अगदी घरातल्यानाही सांगत नाहीत मग केव्हातरी सगळे त्रास अनावर होऊन एखादा चुकीचा किंवा वाईट निर्णय घेतला जातो. केइजीने किमान आमच्या तीन वर्षाच्या मैत्रीच्या आधारावर मला त्याचा प्रश्न सांगितला. त्यानिमित्ताने आम्ही बोलता बोलता त्याची त्यालाच त्या प्रश्नाची उकल झाली. त्याने वेगळं राहूनच त्यांच्या नात्याला आणखी काही दिवस वेळ द्यायचे ठरवले.
ही गुंतागुंत सुटली आणि तो पुन्हा पूर्वीसारखा मोकळा बोलू लागला. यानंतर काही दिवसातच त्याला अतिशय प्रथितयश कंपनीत फार चांगली नोकरी मिळाली. महिनाभरातच तो तिथे रुजू झाला. नवी नोकरी, नवे मित्र , खूप काही शिकायला यामुळे तो खुश झाला होता. ऑफिस वेगळे झाल्याने आमचं बोलणही अगदी कमी झालं होतं. नंतर दोनतीन महिन्यांनी एकदा लंचला भेट झाली. तेव्हा त्याने पूर्वीच्या नात्यापासून फारकत घेतली आणि नवे घर भाड्याने घेतल्याचेही सांगितले.
मी भारतात परत आल्यावर केव्हातरी क्वचित बोलणे व्हायचे. मध्ये मी तोक्योला जाऊन आले तेव्हा आमची भेट झाली. तेव्हा एकदम खुशीत दिसला. एकूण त्याला नवी नोकरी मानवली होती, नवी मैत्रिणही मिळाली होती. परवाच फोनवर त्याचा मेसेज आला. "सॉरी, तू इथे नसल्याने तुला फोटोग्राफीसाठी बोलवता आलं नाही. मी लग्न केलं!"
शाळेत असताना व्यसनांना बळी न पडण्याचं बाळकडू मिळालं नसतं तर…त्या कोणा मित्राने नोकरी लावून दिली नसती तर…अमेरिकन बॉस भेटला नसता तर… नात्यांची गुंतागुंत सोडवताना त्यातच गुरफटला गेला असता तर… त्यावेळी त्याने मन मोकळं न करता काहितरी विचित्र निर्णय घेतला असता तर... हे सगळे जर तर आता अगदी क्षुल्लक वाटत असले तरी त्या त्या वेळी ही अगदी महत्वाची वळणं होती. त्यातल्या कुठल्याही वळणाला आपटून केइजीचं आयुष्य भोवऱ्यात सापडण्याची शक्यता होती. दुर्दैवाने अशा एखाद्या गर्तेत तो सापडता तर पार बरबाद झाला असता. सगळाच नशिबाचा डाव तरी का म्हणावा? केइजीची मेहनत, कष्ट करण्याची तयारी आज त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. नाहीतर कुठलंच कौशल्य नाही म्हणून तोक्योतल्या कुठल्यातरी गल्लीतल्या रेस्तोरांमध्ये फुटकळ कामं करत व्यसनाच्या आधाराने दिवस ढकलणारा असा एखादा केइजी जगतोय की मेलाय हे बघायलाही कुणी का जावं? आणि त्याच्याबद्दल चार ओळी खरडाव्याशाही कुणाला का वाटाव्या?
अतिशय सुर्रेख रेखाटलंय
अतिशय सुर्रेख रेखाटलंय व्यक्तिचित्र, त्यातल्या विविध रंगछटाही फारच बहारदार .....
अतिशय मस्त लिहल आहे.. आवडला
अतिशय मस्त लिहल आहे..
आवडला केइजी ताकाहाशी
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय व्यक्तीचित्रण !
मस्त लिहिलंय व्यक्तीचित्रण !
Perfect vyaktichitran khup
Perfect vyaktichitran
khup sundar!
kon konata to mulga agadi dolyasamor tyachya hasyasakat ubha rahila
sundarch!
btw takahashi nav vachun mala tottochan athaval
छान व्यक्तीचित्रण. सर्व फोकस
छान व्यक्तीचित्रण. सर्व फोकस त्याच्यावरच राहिलाय, ते आवडलं.
छान लिहिलंय सावली.
छान लिहिलंय सावली.
छान व्यक्तीचित्रण. सर्व फोकस
छान व्यक्तीचित्रण. सर्व फोकस त्याच्यावरच राहिलाय, ते आवडलं. >>>> +१
खूप छान लिहिलंय. अगदी
खूप छान लिहिलंय.
अगदी डोळ्यासमोर उभा राहिला ताकाहाशी.
पुरंदरे शशांक , अंकु, मंजूडी,
पुरंदरे शशांक , अंकु, मंजूडी, आशिका, रिया, दिनेश., धारा, भारती, साती धन्यवाद
मस्त गोळीबंद जमले आहे.
मस्त गोळीबंद जमले आहे.
सुरेख व्यक्तिचित्रण.
सुरेख व्यक्तिचित्रण.
मस्त लिहिलंयस सावली. आवडलं
मस्त लिहिलंयस सावली. आवडलं
खूप छान लिहिलं आहेस. आवडलं.
खूप छान लिहिलं आहेस. आवडलं.
केइजी आवडला.
केइजी आवडला.
मस्त !
मस्त !
आवडला ताकाहाशी अगदी
आवडला ताकाहाशी अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.. !
आशूडी, मृणाल १, मामी,
आशूडी, मृणाल १, मामी, माधुरी१०१, सायो, वर्षा, योकु धन्यवाद
खुप सुंदर लिहिलं आहेस सावली,
खुप सुंदर लिहिलं आहेस सावली, खुप आवडलं.
मस्तच गं.. केइजी आवडला.
मस्तच गं.. केइजी आवडला.
छान!!!!
मस्त!
मस्त!
सुंदर लिहिलय. आवडलं.
सुंदर लिहिलय. आवडलं.
छान लिहिलेय, प्रत्येक
छान लिहिलेय, प्रत्येक प्रसंगातून केइजी ताकाहाशी उलगडत होता.
प्रतिसाद देताना एवढे विचित्र (?) नाव लक्षात राहीले हेच लेख जमण्याची पावती
मस्त लिहिलयं. छान वाटलं
मस्त लिहिलयं. छान वाटलं वाचताना.
मस्त रंगवलाय केइजी. आवडलं.
मस्त रंगवलाय केइजी. आवडलं.
मस्त!
मस्त!
छान लिहिलय.
छान लिहिलय.
मस्त. जपानमधे असताना १० पैकी
मस्त. जपानमधे असताना १० पैकी ६ असे केईजीसान भेटले होते.
वा! वा! छानच!
वा! वा! छानच!
Pages