मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 22 June, 2014 - 04:36

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....

खडकू काही आले नाही
दवापाणी झाले नाही
गरिबीच्या सत्तेपुढं
डोकं काही चाले नाही
अंती मात्र देवच आला
प्राणज्योती घेऊन गेला ....

नियोजनपंडितांना भयावह क्षय आहे
पोशिंदा भयभीत; ऐद्यांना ’अभय’ आहे
शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही!
शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?

                               - गंगाधर मुटे ’अभय’
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad छान