पाऊस, शाळा.....आणि खो- खो

Submitted by बागेश्री on 18 June, 2014 - 09:08

उघड्या पाठ्यपुस्तकावर,
दोन थेंब..
सरसरून आलेला वारा,
बाहेर मैदानावर हलका शिडकावा,
सरींचा एक फिरलेला हात अन् चौफेर मृद्गंध.. !!
तास संपल्याची घंटा आणि खो- खो च्या खांबाशी गलका
काही मिनिटांत रंगलेला खेळ,         
मिळालेला खो,       
अडकलेला पाय,
फुटलेला गुडघा... आणि मी बाद!         

दूर लिंबाच्या झाडाखाली उभी राहून,
आता मी त्यांचा खेळ निरखत असलेली..  
गार वार्‍यावर उडणारे रंगबेरंगी फ्राॅक, 
धावण्याची लगबग,
बसलेल्यांची सतर्कता,     
भुरभूर उडणारे केस कानामागे सारण्याची घाई..

पावसाचं समाधान मात्र झालेलं नसतं..
आभाळ दाटतंच जातं,
वारा भरारात राहतो...
धुळीचा पडदा हां हां म्हणता व्यापून उरतो..
खो खो लोपतो,
....झाडही!

मधे अनेक वर्ष सरलीत,
डोक्यावर वय पिकल्याची झाक आहे..
खिडकीतून वारा धडक आत शिरतोय,
मुजोर पावसाचे थेंबही घरात,
काॅफीची गरम वाफ सुखावतेय,
बाहेर काॅलनीत लहानग्या जागेत खो- खो रंगलाय,
आणि आत,
उघड्या पाठ्यपुस्तकावर दोन थेंब...!!

चला,
उद्या शाळेत शिकवण्याचा धडा वाचून ठेवला पाहिजे!

-बागेश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. वाचताना माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं होत होतं.
खोखो माझा आवडता खेळ होता... आता जळ्ळ तसं बसणे सुद्धा कठिण आहे गुडघ्याची हालत बघता. Sad

आवडलं

खुप काही आठवलं. शाळा नुकतीच सुरु झालेली असे. नवा युनिफॉर्म.. नवी पुस्तके..
पावसाने भिजु नये म्हणुन दप्तरात प्लॅस्टिकची पिशवी घालणे..
सुट्टीत सकाळी उठायची मोडलेली सवय.. आणि पावसाळ्यात सकाळी हवेत असणारा गारवा..
यामुळे सकाळी उठवतांना आईबाबांना होणारा त्रास..
नवीन वर्ग.. नवे मित्र मैत्रीणी.. नवे शिक्षक.. नवीन टाईमटेबल..
नवीन वह्या.. नवीन अभ्यास.. आईने रेनकोट घेतलेला असतांना छत्रीसाठीच हट्ट धरणे..
कधी घरी येतोय आणि कधी जेवुन झोपतोय असं होणं..

जाऊदे.. खुपच नॉस्टॅल्जिक होतंय.. Girl Cry.gif

पियू खरंच, खरंच!
आम्ही सातवीनंतर सायकल ने जायचो शाळेत... दप्तरावरून रेनकोट घालून सायकल दामटत जायला मजा यायची.. तो धो- धो लागला की एखाद्या झाडाखाली थांबून रहायचो.. प्राथनेच्या वेळेआधी शाळा गाठण्याचा अनुभवच धमाल असायचा Lol