पहिला भाग इथे वाचा.
दुसरा भाग इथे वाचा.
दिवस ९ वा: गोरक शेप (१६,९२९ फूट) - काला पत्थर (१८,५१३ फूट) ते थुकला
काला पत्थरला जायला ठरल्याप्रमाणे वेळेवर उठलो व आवरून डायनिंग रूममध्ये आलो. हॉटेलचे कर्मचारी तिथेच गाढ झोपले होते. आम्ही चहा घेतला, गरम पाणी बाटल्यांमध्ये भरून घेतलं व निघालो. ५ वाजत आले होते पण उजाडलं होतं. बाहेर चांगलीच थंडी होती. अगदी ग्लोव्हज घालूनही बोटं बधीर झाली होती. आमच्यासारखीच बरीच जणं काला पत्थरच्या दिशेने निघाली होती. काला पत्थरहून एव्हरेस्टचं दर्शन चांगलं होतं एवढंच काय ते त्याचं महत्व.
आम्ही पोहोचतानाच शिखरं उजळलेली बघून असं वाटलं की अजून लवकर यायला हवं होतं, यापेक्षा झकास वाटलं असतं.
काला पत्थर डाव्या हाताला ठेवल्यावर काला पत्थरच्याच मागे पुमोरी, त्याच्या बाजुलाच लिगत्रेन व समोरच खुंबुत्से दिसत होती. काला पत्थरकडे पाठ करून उभं राहिल्यावर तोंडासमोरच नुप्त्से दिसत होता. एव्हरेस्टने नुप्त्से शिखराच्या मागून डोकं काढलं होतं. ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला ते जगातलं अत्युच्च शिखर आता समोर दिसत होतं. आजपर्यंत कल्पनेत मी ह्याचं अनेकदा दर्शन घेतलं असेल.पण आज प्रत्यक्षात ते दृश्य समोर असताना का कोण जाणे हरखून जायला झालं नाही खरं. तरीही तो नजारा डोळ्यांत आणि कॅमेर्यात साठवून घेतला. काला पत्थर अर्धा चढून मग तिथेच थांबलो कारण आज परतीचा रस्ता धरायचा होता. आमच्यातले तीन जण काला पत्थरच्या माथ्यापर्यंत म्हणून जाण्यासाठी निघून गेले.
जगातील अत्युच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट, काला पत्थरहून सूर्योदयाच्यावेळेस. (उजवीकडचा समजलात? उजवीकडून दुसरं टोक, तोच मा. एव्हरेस्ट)
बर्फाच्छादित शिखरं सूर्योदयाच्या वेळेस
फोलिएज हा एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक गोरक शेप व काला पत्थरपर्यंतच नेतात, एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत घेऊन जात नाहीत. एव्हरेस्ट बेस कँपहून खरंतर एव्हरेस्ट नीट दिसत नाही. तो काला पत्थरहून चांगला दिसतो, त्यामुळे बरेच जण बेस कॅंपपर्यंत न जाता काला पत्थरहूनच मागे फिरतात.
आज परततांना थुकलापर्यंत नक्की आणि जमलं असतं तर फेरिचेला मुक्काम करायचं ठरत होतं. म्हणून मग सकाळी ६,३० च्या आसपास हॉटेलवर परतलो. सामान आवरून ब्रेकफास्टला खाली आलो. तोवर आमचे काला पत्थरच्या माथ्यापर्यंत गेलेले मेंबर्सही परतले. त्यांचं आवरून होईस्तोवर निघायला १०.३० वाजलेच. येताना कदाचित रस्त्याचा अंदाज होता म्हणून की काय कोण जाणे पण २ तासात लोबुचेला पोचलो. जेवताना कोणीतरी आज रात्रीच्या मुक्कामाला 'पांगबोचे'ला जायची टूम काढली. पांगबोचेपर्यंत पोचायला कदाचित संध्याकाळचे ६.३० वगैरे वाजले असते. फेरिचेपर्यंत अंदाज घेऊन पुढचं ठरवू असं ठरवलं. लोबुचेला जेवण उरकून लगेच थुकलाकडे निघालोच. दुपारी २.३० वाजता म्हणजे लोबुचेपासून तासाभरात थुकलाला पोचलो.
गोरक शेपचा निरोप घेऊन लोबुचेकडे जाताना
थुकलाहून फेरिचेपर्यंत सगळा उताराचाच रस्ता होता त्यामुळे फेरिचेला पोचायला फार वेळ लागणार नाही असा अंदाज होता. रस्ता अगदीच सपाटीचा होता तरी बरंच अंतर होतं चालायला त्यामुळे ४.३० वाजले पोचायला. आन्ग गुम्बु म्हणाला की आज पांगबोचेला नकोच जायला, इथेच मुक्काम करू. आमच्यातल्या डॉक्टरांची उतरताना अचानक लोअर बॅक दुखावली त्यामुळे आज पुढे जाणं त्यांनाही जमलं नसतंच. त्यामुळे फेरिचेला मुक्काम करायचं नक्की झालं. आता परतीचे वेध लागले होते म्हणून की काय कोण जाणे पण पत्ते खेळायचा मूड झालाच नाही आज.
उद्याचा पट्टा पण तसा मोठा होता पण किंचित उशीरा म्हणजे ८ वाजता निघायचं ठरलं होतं.
दिवस १० वा:- फेरिचे ते नामचे
सकाळी सकाळी डेंडीसरांनी येऊन आम्हांला सरप्राईज दिलं. त्यांना बघून सगळेच एकदम खुश झाले. डेंडीसर म्हणजे चैतन्याचं प्रतिक होतं. आम्ही काठमांडूला पोचल्यावर लगेच ते दोन दिवसांत 'कैलास मानसरोवर यात्रा/ट्रेक' साठी तिबेटला जायला निघणार होते.
ठरल्याप्रमाणे निघालो पण ज्या रस्त्याने डिंगबोचेला आलो होतो त्यापेक्षा हा रस्ता वेगळा होता. सुरुवातीचा उत्साह होता त्यामुळे झपाझप चाललो होतो. हा रस्ता ज्या स्यमोरे गावातून येताना आलो होतो तिथेच जाऊन मिळाला. आधी स्यमोरेतच जेवायचा प्लॅन होता पण ते फारच लवकर झालं असतं त्यामुळे तेंगबोचेच्या खालच्याच गावात 'फुंकी थांगा' ला जेवू असं ठरलं.
अमा दबलम पांगबोचेहून अगदी विरुद्ध कोनात (फोटो पॉईंट अॅन्ड शूटने काढला, त्यामुळे मनासारखी सेटिंग्ज नाही करता आली. म्हणून इमेज HDR केलीये.)
देबोचे ते तेंगबोचे हा चढ सोडला तर बाकी पूर्ण उताराचाच रस्ता होता. हे अंतर तसं फक्त २० मिनीटांचच, पण त्या चढानेही चांगलीच दमछाक केली. येताना ढगाळ हवामानामुळे काहीच दिसलं नव्हतं पण आज लख्ख ऊन होतं त्यामुळे तेंगबोचेच्या आजूबाजूची सगळी हिमाच्छादित शिखरं मस्त दिसत होती. आमच्यातल्या डॉक्टरांचा तिथून पायच निघत नव्हता. तेंगबोचेहून उतरत असताना एक रनर दिसला आम्हांला. तो धावत चालला होता. इथे एक 'एव्हरेस्ट मॅरेथॉन' नावाची रेस दरवर्षी आयोजित केली जाते. ही रेस 'गोरक शेप' ला सुरु होऊन 'नामचे बझार' ला संपते. गेल्यावर्षीचा रेकॉर्ड ३ तास ४० मिनीटं ४३ सेकंदाचा आहे. आत्तापर्यंत राहिलेल्या दोन-तीन टी-हाऊसमध्ये आम्ही तिथल्या सहभागी लोकांनी लावलेली सर्टिफिकेट्स बघितली होती. हा बघितलेला रनर त्याच मॅरेथॉनची प्रॅक्टिस करत होता. हाच नंतर आम्हांला फुंकी थांगा ते नामचेच्या वाटेवर परत येताना दिसला. तेंगबोचेची उतरण आम्ही उतरतोय व लोकं चढतायत हे बघायला बरं वाटत होतं.
फुंकी थांगाला पोचल्यावर पायातले बूट अक्षरशः फेकून द्यावेसे वाटत होते. उरलेला ट्रेक फ्लोटर्सवर करायचा मोह झालेला. उतारामुळे पायाची बोटंही दुखायला लागली होती. अजून अर्ध अंतर शिल्लक होतं, त्यात फुंकी थांगानंतर तासा-दीड तासाचा चढ होता. जेवण झाल्यावर पाणी भरून घेऊन राहिलेल्या चालीसाठी सज्ज झालो. नामचेला पोचल्यावर काय काय करायचं त्याचे प्लॅन्स ऑलरेडी झालेच होते. त्यामुळे पाय रेटण्याशिवाय पर्याय नव्हता. चढामुळे गाडी न्युट्रल गिअर मध्येच चालली होती. छोटे छोटे ब्रेक्स घेत घेत एकदाचे ५.३० च्या सुमारास नामचे ला पोचलो. आमच्या ग्रूपमधले आघाडीचे शिलेदार जे पुढे गेले होते ते आधीच फ्रेश होऊन बसले होते.
सगळ्यांचा 'कॅफे दान्फे' ला जायचा प्लॅन होता. आज या टी-हाऊसचं डिनर न खाता बाहेरच खायचं ठरवलं. तसंही तेच तेच खाऊन कंटाळाही आलाच होता. मग सगळ्यांनी तिथे गेल्यावर पूल खेळून, व्हरायटी खाऊन जीवाचं नामचे केलं.
उद्याचा ट्रेकचा चालायचा शेवटचा दिवस होता. परंतू भरपूर चालायचं होतं. नामचे बझार ते लुकला हे अंतर भरपूर होतं. नामचे ते फाकडिंग उतारच होता तसा. पण फाकडिंग ते लुकला मात्र तीन तासाचा चढ होता.
दिवस ११ वा :- नामचे बझार ते फाकडिंग ते लुकला
सकाळी ७ वाजता निघायचं ठरलं होतं पण निघायला ७.१५ झाले. फाकडिंगपर्यंत उतार असल्याने फार वेळ लागणार नाही असं वाटत होतं. डेंडीसरांनी ४ तासांचा अंदाज वर्तवला होता. नामचेला शिरताना एक चेक पोस्ट लागतं तिथे पंधरा एक मिनीटं मोडली व आम्ही उताराला लागलो. येताना जो तीव्र चढ चढलो होतो तो आता उतरायचा आहे ह्या विचारानेच बरं वाटत होतं. झपझप उतरत तासाभरात हिलरी ब्रिजजवळ पोचलो देखील.
आज आम्ही उतरत असताना या वाटेवर बेस कँपला जाणारे भरपूर ट्रेकर्स दिसत होते. आणि...आत्ता थोड्या वेळापर्यंत सगळं आलबेल असलेल्या मला अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. नाक अचानक बंदच झालं. खोकल्याचा त्रास कालपासून होत होताच. पण नाकाने श्वास घेणं बंद झाल्यावर तोंडाने श्वास घेण्यावाचून काही पर्याय राहिला नाही आणि घसा कोरडा पडून खोकला वाढला. जोरसाले गाव मागे टाकल्यावर तर मी हैराणच झाले कारण प्रत्येक दोन पावलांनंतर थांबावं लागत होतं. ट्रेक लीडर सोडल्यास बाकीची मंडळी केव्हाच पुढे निघून गेली होती. मी लीडरकडे 'ऑट्रिविन' चे ड्रॉप्स आहेत का याची चौकशी केली. पण त्याच्याकडे असलेले ते ड्रॉप्स डफेल बॅगमधून पुढे गेले होते. मला आजपर्यंत कधीच ऑट्रिविन घालायची वेळ आली नव्हती त्यामुळे माझ्याबरोबर घेतले नव्हते मी. मध्ये-मध्ये नाकपुड्या वर ओढून श्वास घेणं चाललं होतं. हे कमी होतं म्हणून की काय, घसा कोरडा पडत होता म्हणून सतत लेमनड्रॉप्स चघळल्याने दाढही दुखायला लागली.
या अवस्थेत मला फाकडिंग-लुकला हे ३ तासांचं अंतर चालणं शक्य नाही हे कळून चुकलं. कारण उतरताना इतका त्रास होत होता, चढताना सतत तोंडाने श्वास घेत राहाणं अशक्य होतं. लीडरला तसं बोलून दाखवलं मी आणि मला घोडा मिळू शकेल कां याची चौकशी केली. नुसत्या कल्पनेने मला कसंसच झालं खरंतर पण नाईलाजच होता. कारण ३ तासांच्या चालीसाठी मला ६-७ तास कितीही लागू शकले असते. कशीबशी फाकडिंगला पोचले एकदाची. जेवणाचा ब्रेक घेऊन लगेच लुकलासाठी निघायचं होतं. मी तिथे घोड्याची चौकशी करून ठरवूनच टाकला.
माझ्याबरोबर आन्ग गुम्बु असणार होता. घोड्यामुळे खूपच सोप्पं झालं मला पण प्रवास अधेमधे फारच ड्येंजर होता. उतारावरच्या पायर्यांवर किंवा अगदी निमुळत्या वाटेवर जीवात जीव नव्हता. शेवटी एकदाची दीड तासाने 'लुकला' ला पोचले. बाकीचे मेंबर्स हळूहळू आलेच मागोमाग.
'लुकला' चं हे टी-हाऊस अगदीच सुमार होतं. त्यामुळे आम्ही दोन खोल्या बदलल्या. संध्याकाळी 'स्टारबक्स' ला भेट द्यायचा प्लॅन ठरला होता. आज शेवटचा दिवस असल्याने दोन पोर्टर्स व गाईड 'आन्ग गुम्बु' ला निरोप द्यायचा होता. त्यामुळे संध्याकाळी ७.३० वाजता डायनिंग रूममध्ये जमायचं ठरलं. त्याआधी आम्ही आवरून 'स्टारबक्स' ला गेलो. बर्गर व कॉफी घेऊन तिथेच गप्पा मारत बसलो. तेव्हा नाकात काहीतरी अडथळा जाणवला म्हणून स्वच्छ केलं तर बर्यापैकी रक्त पडलं व नाक एकदम मोकळं झालं. हे आधीच झालं असतं तर...? हा नाकातून रक्त यायचा प्रकार उंचीवर नाही झाला अजिबात पण पुढचे २-३ दिवस चालू राहिला. त्यामुळे नाक स्वच्छ करण्यावरही आम्ही दोघींनी रेशनिंग लावून घेतलं होतं.
स्टारबक्समधून आल्यावर आज पोर्टर्स व गाईडबरोबर जेवण केलं व त्यांना टीप दिली. उद्या सकाळी लुकला-काठमांडू विमानासाठी नशीब आजमावायचं होतं, त्यामुळे ब्रेकफास्टकरिता ५ वाजता डायनिंग रूममध्ये भेटायची शेवटची सूचना डेंडीसरांनी दिली.
दिवस १२ वा: लुकला ते काठमांडू
आज लवकर उठायचा शेवटचा दिवस होता . सकाळी ४.१५ ला उठलो. आवरून वेळेवर ५ वाजता डायनिंग रुममध्ये जाऊन ब्रेकफास्ट व चहा घेतला. बाहेर हवामान छान दिसत होतं. काठमांडूला जायला विमान उडेल याची खात्री वाटली. आमच्या पोर्टर्सनी शेवटच्या आमच्या डफेल बॅग्ज उचलल्या व आम्ही लुकलाच्या विमानतळावर पोचलो. तिथे सगळ्यांची झुंबड उडालेली. विमानतळ म्हणजे इन मीन तीन खोल्या. डेंडीसरांच्या कृपेने आमच्या सामानाचं चेक इन पटकन झालं. परत जाताना आमचं तिसरं विमान असणार होतं. सगळे सोपस्कार आटोपून आत जाऊन बसलो. दहा एक मिनीटांत विमानं यायला सुरुवात झालीच. एका मागोमाग एक विमानं उतरत होती. काठमांडूहून आलेलं सामान व लोकं उतरून नवीन चढवली की लगेचच काठमांडूसाठी उडत होती. बिल्डिंगमधून लोकंही फोटो काढत होते. यावेळेस अजिबातच वाट पहावी लागली नाही आम्हांला. सकाळी ७ वाजून १० मिनीटांनी आम्ही काठमांडूच्या दिशेने उडालो देखील.
८ च्या आसपास काठमांडूला उतरल्यावर लगेचच हॉटेलच्या गाडीने हॉटेलवर गेलो. सामान टाकून, फ्रेश होऊन पशुपतीनाथ व बुद्धनाथ बघायला बाहेर पडलो. आज पहिल्यांदाच नीट काठमांडू बघत होतो. अगदीच बकाल, बेशिस्त वाटलं. इथे आता २ दिवस काढायचे होते. त्यात उंचीवरून जाऊन आल्यामुळे काठमांडूचा उकाडा अगदीच नको वाटत होता. पशुपतीनाथाचं दर्शन त्यामानाने खूपच चांगलं झालं. केदारनाथला जाऊन आल्यावर पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायचं असतं असं ऐकलं. खखोदेजो. आमच्या ग्रूपमधल्या आम्हां तिघांचं केदारनाथ करून झालं होतं. तिथूनच सरळ 'बोधनाथ/बुद्धनाथ' ला गेलो. तिबेटियन व नेपाळी बुद्धधर्मीयांचं हे पवित्र स्थान. दुसर्याच दिवशी 'बुद्धजयंती' असल्याने तिथे वेगवेगळे कार्यक्रम चालले होते. बोधनाथच्या आजूबाजूला बरीच सोवेनिअर्स, कपड्यांची दुकानं व रेस्टॉरंट्सही आहेत. बुद्धजयंतीनिमित्त स्तूप बंद होता त्यामुळे आत जाता आलं नाही मग आम्ही आसपासच्या दुकानांमध्ये फिरलो व नंतर तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवून हॉटेलवर परतलो.
काठमांडूमधला असाच एक प्रसिद्ध भाग म्हणजे 'थामेल', शॉपिंग पॅराडाईस अगदी माऊंटेनिअरींगचे साहित्यही छान मिळते. दुसरा दिवस आम्ही दिवसभर थामेलमध्ये फिरण्यात घालवला. काठमांडूमध्ये इतके परदेशी पर्यटक येतात पण मला तर ते हरिद्वारपेक्षाही अस्वच्छ वाटलं. प्रचंड धूळ व प्रदुषण असल्याने रस्त्याने चालणार्या बर्याच लोकांच्या नाका-तोंडावर मास्क होता. उद्या इथून सकाळी दिल्लीला जायला निघायचं होतं. म्हणून मग रात्री काठमांडूमधल्या फेमस 'फायर अॅन्ड आइस पिझ्झेरिया' ला गेलो आणि ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.
ट्रेकनंतर :-
इतकी वर्ष मनात असलेल्या ट्रेकला जाता आलं, तो पूर्ण करता आला याचा खरंतर खूप आनंद व्हायला हवा होता. पण तो तसा नाही झाला. कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहिल्याची रुखरुख आहे. कां? ते माहीत नाही. खूप विचार केला यावर मी आल्यावर.
कदाचित.... माझा स्टॅमिना खूप कमी पडला म्हणून असेल. ट्रेकसाठी नाही परंतू मागच्या वर्षीपासूनच मी वजन उतरवायला सुरुवात केली होती. रोजचा व्यायाम नियमित सुरु होता त्यामुळे तशी फीट होते मी. त्यामुळे खूप त्रास होणार नाही अशी अपेक्षा होती माझी. अल्टिट्यूडचा त्रास होईल ही भिती होती, ती मात्र शेवटचा दिवस सोडला तर अगदीच फोल ठरली.
कदाचित....फोलिएज हा ट्रेक एव्हरेस्टच्या बेस कँपपर्यंत नेत नाहीत म्हणून ती अपूर्णतेची भावना असेल कां? कारण तिथपर्यंत गेलो तरी त्या ठिकाणी नाहीच पोचलो ही रुखरुख आहेच.
ट्रेकहून परत येताना आमच्या विरुद्ध दिशेला जाताना लोकं बघितली की मनात सगळ्यात आधी हाच विचार यायचा, हुश्श्य, झाला एकदाचा ट्रेक पूर्ण. या लोकांना अजून किती चालायचं आहे. त्यावेळेस मनात एक विचार असाही आणून बघितला की मला या ट्रेकला परत यावंसं वाटेल कां? त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंच आलं होतं. ट्रेकच्या दिवसांत फक्त आणि फक्त ट्रेकबद्दलचेच विचार डोक्यात असायचे. बर्याचदा असं झालं की अगदी फोटो काढायचंही डोक्यात यायचं नाही किंवा आलं तरी कंटाळा केला जायचा. खूप मेमरी कार्ड्स वगैरे घेऊन गेले होते खरंतर पण इतके फोटो निघालेच नाहीत. त्यामुळे फोटोंसाठीही परत जावंसं वाटतंय. आता ट्रेकहून परत आल्यावर ज्या चुका या ट्रेकमध्ये माझ्याकडून झाल्या त्या सगळ्या टाळून हा ट्रेक खर्या अर्थाने परत एकदा पूर्ण करावासा वाटू लागलाय. फिंगर्स क्रॉस्ड.
समाप्त
**** मी ह्या ट्रेकला जातेय हे सांगितल्यावर सुरुवातीपासून कशी तयारी कर, काय काय घे, कुठून घे अश्या टिप्स ज्याने दिल्या, ट्रेकहून परतल्यावर त्याचं इत्थंभूत वर्णन ऐकण्यात ज्याला प्रचंड रस होता त्या मायबोलीवरच्याच एका मित्राला अनेक धन्यवाद. ****
ह्या ट्रेकला जातेय हे सांगण्यापासून तयारीचे अपडेट्स तसंच आल्यावरही ट्रेकबद्दल बडबड करून मी तिला कदाचित बोअरही केलं असेल. पण जिने ही बडबड न कंटाळता ऐकून घेतली. माझ्या मागे लागून हे नुसतंच लिहून नाही घेतलं तर गरज होती तिथे स्वतःचा वेळ मोडून बदलही करून दिले त्या जिवलग मैत्रिणीचेही खूप आभार.
(No subject)
काय सुंदर फोटो आहेत !
काय सुंदर फोटो आहेत !
हाही भाग सुरेख. छान वर्णन आणि
हाही भाग सुरेख.
छान वर्णन आणि फोटो तर अहाहा!!!!
चला, आमचाही वर्च्युअल ट्रेक झाला. मनापासुन धन्यवाद!!!
समाप्त बघुन वाईट वाटलं.
ग्रेट!!!
ग्रेट!!!
फोटो आणि वर्णन
फोटो आणि वर्णन अफलातुन.............
मस्त आडो! वर्णन वाचताना मस्त
मस्त आडो!
वर्णन वाचताना मस्त वाटलं.
ते नाकातून रक्त पडणं वाचून भिती वाटली. पण पुढचं वाचून हे असं होणं खूप नॉर्मल असावं असं वाटलं.
परतून आल्यावर हवाबदलामुळे तुला काही त्रास नाही ना झाला?
पहिल्या फोटोत उजवीकडे जे
पहिल्या फोटोत उजवीकडे जे सर्वात उंच दिसतेय तेच एव्हरेस्ट ना ? "उजवीकडचा समजलात का पण तो नाही , उजवीकडून दुसरा" असे लिहिल्यामुळे नीट समजले नाही.
सुरेखच. छान झालीये पूर्ण
सुरेखच. छान झालीये पूर्ण मालिका.
मस्त फोटो आणि वर्णन आडो !
मस्त फोटो आणि वर्णन आडो !
प्रामाणिक समारोपही आवडला..
मस्त फोटो आणि वर्णन.
मस्त फोटो आणि वर्णन.
धन्यवाद मंडळी मंजूडी,
धन्यवाद मंडळी
मंजूडी, नाकातून रक्त येणं नॉर्मल आहे. तो एक प्रकार सोडला तर बाकी काहीच त्रास नाही झाला.
मै, उजवीकडचा 'नुप्त्से' आहे. जी तीन टोकं दिसतायत, त्यातला मध्यभागी आहे तो 'एव्हरेस्ट'.
छान झाली लेखमाला शॉर्ट अँड
छान झाली लेखमाला शॉर्ट अँड स्वीट.
कुठल्याही मोठ्या कमिटमेंट किंवा प्रोजेक्ट नंतर असं रिकामपण येणं नॉर्मल असेल का?
छान लिहिलं आहेस
छान लिहिलं आहेस
मस्त. फोटो पण जबरदस्त आलेत.
मस्त. फोटो पण जबरदस्त आलेत.
मस्त आडो. छान लिहिलस. फोटो
मस्त आडो. छान लिहिलस. फोटो पण मस्तच.
हाही भाग वर्णन फोटो सारेच
हाही भाग वर्णन फोटो सारेच सुंदर, एका वेगळ्याच विश्वात जाऊन परत आल्यासारखे नक्कीच वाटत असेल आपल्याला असे वरचे सारे फोटो पाहता खात्रीने सांगू शकतो.
धन्यवाद आडो ! तो मा. नुप्त्से
धन्यवाद आडो ! तो मा. नुप्त्से जास्त उंच वाटत आहे बघताना, बहुधा तो जवळ आहे म्हणून तसे वाटतेय!
खूप छान होते तुझे सगळेच लेख.आपणच जाऊन आल्यासारखं वाटलं!! एव्हरेस्ट वगैरे अतिरथी- महारथींचं दर्शन फोटोत पण भारी वाटतंय!!
मस्त .. अॅरो सकट दुसरा फोटो
मस्त .. अॅरो सकट दुसरा फोटो दिलास ते छान .. मलाही कळलं नाही नक्की एव्हरेस्ट कुठला ते ..
अभिनंदन!
मस्तच आडो. उगाचच आपण पण त्या
मस्तच आडो. उगाचच आपण पण त्या ट्रेक वर virtually जाऊन आलो असे वाटले
HDR केलेला फोटो पण मस्त आलाय.
भारीच... भाग १,२ आणि ३ असे
भारीच... भाग १,२ आणि ३ असे सगळे एका दमात वाचून काढले आज.
हॅट्स ऑफ टू यू आडो!
आणि हो, सगळे फोटो अप्रतिम् आलेत.
फोटो काय भारी आहेत.
फोटो काय भारी आहेत.
मस्तच. खूप मनापासून आणि साधं
मस्तच.
खूप मनापासून आणि साधं लिहिलंय. ग्रेट,
पु ट्रे शु,
मस्त फोटो. तुमचे मनापासून
मस्त फोटो. तुमचे मनापासून अभिनंदन !
पूर्ण लेखमाला वाचली. एकदम छान
पूर्ण लेखमाला वाचली. एकदम छान लेखन आणि फोटो आहेत.
मस्त!
मस्त!
एकट्याने किती दूरवर जाता येईल
एकट्याने किती दूरवर जाता येईल ?
वाह!!!! काय मस्त फोटोज आणी
वाह!!!! काय मस्त फोटोज आणी सुंदर वर्णन....... खूप छान वाटलए सर्व भाग वाचताना,पाहताना..
ग्रेट वर्चुअल सफर!!!!
आडो, खूप सुंदर झालीय लेख
आडो, खूप सुंदर झालीय लेख मालिका हॅट्स ऑफ!!
प्रतिसादाबद्दल परत एकदा आभार
प्रतिसादाबद्दल परत एकदा आभार
@ srd - एकट्याने अगदी शेवटपर्यंत जाता येईल. खूप जण करताना दिसले असं. तिर्थयात्रेला जातात तशी गर्दी असते पूर्ण रूट वर, त्यामुळे चुकायचा प्रश्न नाही. फक्त एखादा पोर्टर कम गाईड घेतला बरोबर तर बरं. माहिती पण कळते.
वा. मस्तच तिसरा भागही आवडला.
वा. मस्तच तिसरा भागही आवडला.
Pages