स्विट्झर्लंडचे अनुभव.. १
ऍडमिन, आभार मला रंगीबेरंगी घर दिल्याबद्दल, जिथे माझे वेगळे अनुभव आपल्या मायबोलीकरांना सांगण्याची संधी मिळते आहे....
माझी देशांतर करणारी पहिली पिढी! तसे तुमच्यापैकी बरेच असणार.... मी ज्या देशांत आले तेथे भलामोठा अडथळा भाषेचा होता. जर्मन भाषा आयुष्यांत कधीच ऐकली नव्हती. आधी आधी तर कोण काय व कशाला बोलतंय् कळतच नव्हतं! टी. व्ही.वर फक्त आम्ही पुर्वी पाहिलेले इंग्रजी सिनेमे अर्थात जर्मन मधे डब केलेले दाखवले तर काही करमणूक बाकी उजेड! मुलांचं शाळेत कसं होणार याची वरती घनघोर चिंता... त्यांचा अभ्यास घेणें शक्यच नव्हते, गणिताची फक्त आकडेमोड समजावता येत होती. शाळेतुन आलेली लेखी नोटिस समजावून घ्यायला एका माझ्या स्वीस मैत्रीणीकडे धाव घ्यायला लागयची. तिला इंग्रजी येत असे, ती समजावून द्यायची. (माझे व्हेरेनाशी घनिष्ट संबंध अजुनही टिकून आहेत) अगदीच ठकू हो^ऊन गेले होते. इतकी भांबावलें होते की कशी वाट काढावी समजत नव्हतं. नवरा त्याच्या कामांत रमला होता. टेक्निकल फील्डमधे तो इंग्रजी वापरू शकत असे, शिवाय सतत निरनिराळ्या देशांत कामासाठी जावं लागल्यामुळे त्याला माझ्यासारखी भाषेची अडचण जाणवत नव्हती. मी एकटी सगळ्या पातळ्यांवर झुंजत होते. मग अक्षरश युध्दपातळीवर लढा द्यायला सुरवात केली. जर्मन शिकायला इंटेंसिव्ह क्लासेस सुरू केले, स्थानिक महिलामंडळ जिथे ऍरोबिक, शारिरीक शिक्षण, तर्हेतर्हेचे खेळ शिकवत तें जॉइन केलं हेतु हा की आपल्या गांवांतील काही चेहरे ओळखीचे व्हावेत. स्वीसमधे त्यांची स्थानिक भाषा आहे, ती तुम्हाला बोलता जरी नाही तरी समजायला पाहिजे. स्वीस जर्मनला लिपी नाही, ती आपल्या कोकणीसारखी फक्त बोलीभाषा आहे. स्वीस जर्मन समजायला पांच वर्षं लागली कारण वाचायला लिहायला जर्मन भाषेत शिकत होते. हुश्श! एकदाचं तें जमत गेलं!
त्यावेळी म्हणजे २० वर्षांपुर्वी, इथला समाज रुढीप्रिय आणि पुराणमदवादी होता. त्यांत भारताबद्दल बरेच गैरसमज वा अपसमज बाळगून असायचा. भारतीय लोकांच्या कपड्यांना मसाल्याचा वास येतो म्हणुनही हिणवीत. कांही अंशी तें खरंही आहे. लहान अपार्टमेंटमधे फोडण्यांचा वास आपल्या कपड्यांत मुरतो कारण थंडीमुळे दारं खिडक्या बंद असतात आणि एक्झॅस्टचा तसा उपयोग होत नाही कारण वाढून घेतल्यावरही मसाल्याचा वास घरांतुन पसरतो. त्यासाठी मी किचनचं दार लावून स्वपंपाक करत असे. थंडीच्या दिवसांत सर्वांचं जेवून झाल्यावर खिडक्या १० मिनिटांसाठी उघडून ठेवत असे, त्यामुळे आमच्या घरांत तसा मसाल्यांचा वास येत नसे.
स्वीसमधे त्यावेळी आपले मसाले अजिबात मिळत नसत. अगदी गरजेचे म्हणजे मोहरी, हिंग, जिरं वगैरे भारतांतून आणून ठेवत होतो, पण वर्षभराचं सामान कसं आणणार? डाळ मिळतच नव्हती, तांदूळ अमेरिकन जाडा भरडा किंवा उकडा असायचा. बेसन, कोथिंबीर, कढीपत्ता कित्येक वर्षांत वापरलाच नव्हता, नारळही दुर्लभ... (सध्या श्रीलंकेतील लोकांमुळे सर्वकाहीं मिळत आहे) मग स्वयंपाकाचे अनेक प्रयोग करायचे.... कधी यशस्वी, कधी सपशेल फसायचे! सर्व प्रयोग घरांतल्यांवर करून मगच पाहुण्यांवर होत असत! तरीही कळविण्यास आनंद वाटातोय् की माझ्य प्रयोगानंतरही तमाम जनता सुखरूप आहे!
सध्या मुलांवरील संस्काराची चर्चा मी 'Relationship' मधे मायबोलीवर वाचत्येय्. त्या पार्श्वभूमीवर मी माझ्या मुलांची अभारतीय वातावरणातील्ल जडणघडणीचा विचार करते. इथे ती दोघंही आली तेंव्हा संस्कारक्षम वयांत होती. मोठा मुलगा ९ व धाकटा ४.५ वर्षांचा होता. त्यांना दोन संकृतींमधुन वाढावं लागलं. दोघेही उत्तम मराठी बोलतात. जेव्हढे शक्य होते तेव्हडे भारतीय संस्कार त्यांना आम्ही दिले. तरीही बाहेरच्या वातावरणाचा परिणाम आपल्या मुलांवर फार मोठ्या प्रमाणांत होतो हे इथे प्रकर्षाने जाणवते. भारतांत गेले की तिथे मुलं तिथल्या वातवरणाशी समरस होतात, पण कुठेतरी युरोपीय विचारसरणी कुरघोडी करतेच!
आमचं चौघांचं कुटुंब युरोपांत एका छोट्या मराठी उबदार घरट्यांत राहात होतं आता मुलं उडून गेलीयत्... मुलांना सुरुवातीला आमचा मानसिक आधार प्रचंड प्रमाणांत लागत होता, तो आम्ही कटाक्षाने पुरवला. वंशभेद वा वर्णभेद इथे नाही... पण कांही प्रमाणांत तुलना होतेच. त्याची जाणीव मुलांना होते. मी चांगलं लिहूनही त्या अमुक तमुक मुलाला माझ्यापेक्षा जास्त मार्क दिले गेले असं जेंव्हा मुलं सांगतात तेव्हा खरी परिक्षा असते. त्यांचा आत्मविश्वास गमावूं न देता त्यांना समजावणें अत्यंत महत्वाचें आहे. नाहीतर परक्या देशांत ती मुलं निगेटिव भावनेने जगत राहतात.
तुमच्याबरोबर माझे स्वीस अनुभव share करावंसे वाटले म्हणून लिहिण्याचा प्रपंच केला!
इतक्या सुंदर लेखाला एकही
इतक्या सुंदर लेखाला एकही प्रतिसाद का नसावा?
अरे मला वाटले ललिता परत आल्या
अरे मला वाटले ललिता परत आल्या माबोवर! निनाद - बहुधा हा लेख जुन्या माबोवरून अॅडमिननी हलवला असेल कधीतरी येथे. २००४ साली माबो या फॉर्म मधे नव्हती.
हो बरोबर. तेव्हा इंग्रजीतले
हो बरोबर. तेव्हा इंग्रजीतले मराठी वापरावे लागे...
छान. हा जुना लेखाहे का?
छान.
हा जुना लेखाहे का?
ओह्ह २००४. ! मला वातले नवीन
ओह्ह २००४. ! मला वातले नवीन लेख आहे. आता तर आणखीच पुलाखालून पाणी वाहून गेलेले असेल. त्यारही लिहा ना.... छान आहेत तुमचे अनुभव.