शोषित योद्ध्या - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2014 - 07:41

शोषित योद्ध्या ह्या मालिकेचा चौथा भाग प्रकाशित करण्यास वेळ लागण्याचे कारण असे की एकाहून एक विषण्ण करणार्‍या कथा समोर येत राहिल्या. ह्या भागात एक प्रत्यक्ष मुलाखत आहे. दहा वेळा हो, नाही करत शेवटी ही मुलाखत येथे प्रकाशित करण्याचे ठरवले. मुलाखतीतील काही संदर्भ बहुतेकांना व विशेषतः स्त्रियांना उद्विग्न करणारे वाटतील. मात्र मायबोलीचा वाचकवर्ग सूज्ञ व सुजाण असल्यानेच ही मुलाखत येथे प्रकाशित करत आहे. काही बाबींना मात्र कात्री लावावीच लागली आहे.
=========================================================

उपक्रम - संवाद स्त्रीमनाशी

सामाजिक स्तर प्रकार - शोषित, अर्धशिक्षित तरुणी

संवाद प्रकार - प्रत्यक्ष मुलाखत

(संबंधित स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी काल्पनिक नांव घेतलेले आहे - शारदा जगताप)

मुलाखत कालावधी - ४५ मिनिटे

स्थळ - संबंधित तरुणीच्या कामाची जागा

तरुणीची माहिती - २०१४ मध्ये वय वर्षे ३२! राहण्यास जिल्हा अहमदनगर! एक अकरा वर्षाची व एक सहा महिन्यांची मुलगी! व्यवसाय मसाज पार्लरमध्ये मसाज करणे! पहिले लग्न जबरदस्तीने लावून देण्यात आले होते, ते लग्न मोडून नंतर दुसरा विवाह केला जो प्रेमविवाह होता. त्या पतीपासून मुलगी झाली. पाच वर्षांपूर्वी पतीचे दुर्दैवी निधन झाल्यावर एका केमिस्टच्या दुकानात नोकरी करणार्‍याने सांभाळ केला. त्याच्यापासून दुसरी मुलगी झालेली आहे. मात्र तो मनुष्य ह्या तरुणीला स्वतःच्या घरी ठेवत नाही. त्याचा स्वतंत्र संसार आहे. ह्या तरुणीला तो रखेली म्हणून ठेवून आहे व ती त्याने दिलेल्या आर्थिक सहाय्यावर व मसाज पार्लरमधून मिळणार्‍या पगार व टीप ह्यावर गुजराण करत आहे. तिचे स्वतःचे शिक्षण फक्त चौथी आहे व मोठी मुलगी आत्ता तिसरीत आहे. आर्थिक स्तर अर्थातच खूप खालचा आहे. तिची भाषा ग्रामीण स्वरुपाची मराठी असून मुलाखतीत केवळ वाचकांच्या सोयीसाठी प्रमाण मराठीत तिची उत्तरे रुपांतरीत करण्यात आलेली आहेत.

=================================

प्र - नमस्कार! तुमची माहिती तुम्ही सांगितलीत. तर प्रश्न असा आहे की मसाज पार्लर ह्या व्यवसायात कश्या आलात, तेथील पहिला अनुभव कसा होता, दैनंदिन अनुभवांबद्दल काय सांगाल आणि सर्वात चांगला व सर्वात दु:खद अनुभव कोणता म्हणाल?

उ - शिक्षण नसल्यामुळे, तसेच माहेरचा आधार नसल्यामुळे पतीच्या निधनानंतर मला कोणा परक्या पुरुषावर अवलंबून असणे भाग होते. मी आधी एक दोन ठिकाणी घरकाम केलेले होते. मात्र एका स्त्रीने मला मसाज पार्लरमध्ये पैसे अधिक मिळतात व सुरक्षितताही पुरेशी असते असे सांगितले. माझे वय त्या व्यवसायास अनुकुल असल्यामुळे मी प्रथम चौकशीसाठी त्या मैत्रिणीनेच सांगितलेल्या पार्लरमध्ये मुलाखतीसाठी गेले. तेथील वातावरण अर्थातच आवडण्यासारखे नव्हते. सर्वत्र गचाळपणा आणि वखवख होती. पण माझ्याइतक्याच गरीब व साधारण त्याच वयाच्या आणखीन तीन मुलीही तिथे होत्या. त्यांनी मला अचानक हासत हासत सामावून घेतले व मला जाणीव झाली की ह्या मुली सोबतीला असतील तर आपल्याला काही भीती नाही. आधीच्या कामातून फक्त दिड हजार रुपये महिना मिळत असताना मला येथे अचानक रोजचा दोनशे रुपये पगार आणि ग्राहक देतील ती टीप असे सांगण्यात आले. माझी परिस्थिती अशी होती की आपले काय होणार ह्यापेक्षा आत्ता हातात येत असलेला पैसा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. पदरात दोन मुली आहेत, त्यातील एक तर तान्हीच आहे. मी जगात जवळजवळ एकटी आहे आणि माझ्या वयानुसार हे असे पैसे मिळवण्याची अजुन फार तर दोन चार वर्षे आहेत. ह्या सर्वाचा विचार करून मी राजी झाले.

पहिल्या दिवशी मी एका ग्राहकाला मसाज कसा द्यायचा हे दुसर्‍या एका मुलीकडून शिकले. तो ग्राहकही जरा नवीन असावा कारण तो काहीच बोलत नव्हता. दोन तीन दिवसांमध्ये मी स्वतंत्रपणे मसाज द्यायला शिकले. त्या पार्लरकडे लायसेन्स असून संचालिका मॅडम प्रेमळ आहेत. मला व इतर मुलींना लहान बहिणीप्रमाणे वागवतात. माझ्या तान्ह्या मुलीला कोणी ना कोणी सांभाळत असते. आम्ही सगळ्या एकत्र डबे खातो. गिर्‍हाईकांची वर्दळ मात्र सतत असतेच.

एखादे गिर्‍हाईक आत येते आणि मुलींवरून नजर फिरवते तेव्हा मनातच किळस वाटते आणि संताप येतो आपल्या अवस्थेचा! जणू बाजारातील एखादी वस्तू पाहावी व निवडावी तसे आपण किंवा कोणीतरी निवडले जातो. निवडले गेल्याचा आनंदही होत नाही आणि न निवडले गेल्याचे दु:खही होत नाही अशी विचित्र परिस्थिती असते ती! गिर्‍हाईक निवडण्याचा अधिकार मात्र मुलींना नसतो. दारुडे, ओंगळवाणे असे कसेही पुरुष येतात आणि नोटा टाकून एखाद्या मुलीकडे बोट दाखवून खोलीत जातात.

स्वतंत्र मसाज देऊ लागल्यानंतर आलेल्या एका कस्टमरने मला बरीच माहिती विचारण्याचा प्रयत्न केला पण मला सूचना होती की 'माहिती देऊ शकत नाही' असे सांगायचे. परक्या पुरुषाच्या अंगाला सर्वत्र हात लावताना अतिशय भय वाटते. अचानक कोणी अनावर होऊन आपल्यावर झेपावला तर काय असे वाटू लागते. नंतर आपोआपच सवय होते. काही कस्टमर चांगलेही असतात. नुसतीच टीप देतात असे नाही तर एखादी वस्तू देतात, लहान मुलींसाठी काही आणतात. पुन्हा पुन्हा येणार्‍या कस्टमर्समुळे बरे वाटते कारण त्यांच्यावर विश्वास बसलेला असतो.

एकदा एकाने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, पैसेही देऊ करत होता, पण अर्थातच मी निक्षून नाही म्हणून सांगितले. पार्लरमध्ये इकडचे बोलणे तिकडे ऐकू जाऊ शकत असल्याने तो फार आग्रह करू शकला नाही. मोबाईल नंबर मात्र मी कोणालाही देत नाही.

मात्र ह्या व्यवसायात अनेक पुरुषांना हस्तमैथुनाचे सुख द्यावे लागते. त्याचे वेगळे पाचशे रुपये जे मिळतात त्यातील शंभर रुपये आपल्याला तर चारशे रुपये मॅडम ठेवून घेतात. हे सुख देत असताना अनेक पुरुष अनावर होऊन जवळीक साधतात, त्यावेळी मात्र पूर्ण विरोध करणे योग्य नसते अन्यथा वाद होऊ शकतात. ह्या सगळ्याचा अर्थ इतकाच, की शरीर विक्रय करणार्‍या वेश्येप्रमाणे आम्ही शरीर विक्रय करत नाही, पण तसा भास निर्माण करून गिर्‍हाईकाला सुख मिळवून देतो. .

चांगला अनुभव म्हणाल तर तसे अनेक आले. मात्र एकदा एका डॉक्टर असलेल्या गिर्‍हाईकाने मोठ्या मुलीच्या आजारपणाबाबत सांगताच औषध लिहून दिले व त्याचे एकशे ऐंशी रुपयेही वेगळे दिले. तिला त्या औषधाने खरेच बरेही वाटले. पण त्यांचा नंबरच माझ्याजवळ नसल्याने मी आभारही मानू शकले नाही की कळवूही शकले नाही. समाजात फक्त शोषण करणारेच नाही आहेत इतके मात्र मला समजले. वाईट अनुभव म्हणाल तर हा पूर्ण व्यवसायच माझ्यासाठीच काय कोणत्याही स्त्रीसाठी वाईट अनुभवच आहे. तरी त्यातल्या त्यात सांगायचे तर एका स्थानिक गुंडाने माझ्याकडून मसाज घेतला होता व नंतर माझी माहिती काढून माझ्या घरापर्यंत पोचून मला त्याच्या खोलीवर घेऊन जायला आला होता. मी घाबरून आजूबाजूच्यांना सांगितले व ते मधे पडले त्यामुळे मी वाचले. पण हे असे कधी पुन्हा होऊ नये म्हणून मी आता काळजी घेते. रस्त्याने जाताना एक दोन रस्ते बदलून जाते, अंधार पडला की घरी जाते. तोंड ओढणीने झाकून जाते. काही वेळा काही गिर्‍हाईके रस्त्यात अचानक समोरही येऊ शकतात. पण ती मला व मी त्यांना अर्थातच ओळख देत नाही कारण हा व्यवसाय बदनामच आहे. बाकी आमच्या मॅडम आणि मैत्रिणी ह्यांचा खूप मोठा आधार आहे. आम्हाला सुट्टी मात्र नसते.

======

प्र - तुमच्या लहानपणी वातावरण कसे होते? शिक्षण का मिळाले नाही? लैंगीक शिक्षण घरच्यांनी दिले का? की तेही नाही?

उ - वातावरण एकुण गरीबीचे व उदासीन होते. लहान भावावर अधिक लक्ष केंद्रीत केले जायचे. मला शिकवण्यात कोणाला रस नव्हता. माझी मी जितकी शिकले तितकी शिकले. मला लैंगीक शिक्षण माझ्या आईने दिले. लैंगीक शिक्षण म्हणजे फक्त मासिक ऋतूबाबतची माहिती आईने दिली व तेही मी वयात आल्यानंतरच! बाकी स्त्री पुरुष संबंधांबाबत काहीच माहिती नव्हती. अठरा वर्षांची असताना मी टेलिफोन बूथवर काम करू लागले. समोर राहणार्‍या एका माणसाला मी आवडू लागले व तोही मला! आमची जात वेगळी असल्याने त्याच्याबद्दल मला वा माझ्याबद्दल त्याला आपापल्या घरी बोलता येईना! शेवटी माझे लग्न एका वेगळ्या मुलाशी करून देण्यात आले. तेथे मी चार दिवस राहिले व अचानक हा माणूस त्याच्या आणि माझ्या घरच्यांना घेऊन माझ्या सासरी आला व म्हणाला की ही मुलगी माझ्या प्रेमात असल्यामुळे येथे नांदणार नाही. थोडेफार वाद झाले पण सगळ्यांनाच पटले की माझे सासरी असे राहणे निरर्थक आहे. म्हणून सर्वानुमते लग्न मोडून मी त्या माणसाशी वेगळा विवाह केला. आम्ही काही वर्षे एकत्र संसार केला, मला एक मुलगीही झाली आणि मग त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. मग दुर्दैवाची कुर्‍हाड कोसळली आणि मला कामासाठी घराबाहेर पडावे लागले. मात्र सुदैवाने मला कधीही दुष्ट माणसांचे अनुभव आले नाहीत. तूर्त मी ज्यांच्या आधाराने राहते ते आठवड्यातून दोन दिवस माझ्या खोलीवर राहतात. आजूबाजूच्या माहीत आहे की त्यांनी मला ठेवलेले आहे. त्यांच्यापासून मला धाकटी मुलगी झालेली आहे. ते मला थोडेफार पैसे देतात. पण आता त्यांच्याच घरच्यांचा त्यांना माझ्याकडे येण्यावरून विरोध होऊ लागला आहे व तोही आधार बहुधा लवकरच नष्ट होईल. त्यामुळे मसाज करण्याचे माझे वय निघून गेले की घरकामे करण्याशिवाय मला पर्याय राहणार नाही. मोठी मुलगी लवकरात लवकर शिकून कामाला लागावी एवढीच इच्छा आहे.

======

प्र - आयुष्य ह्या वळणावर येण्यास नेमके काय कारणीभूत ठरले असे तुम्हाला वाटते?

उ - उघड आहे, स्त्रीने स्वावलंबनाचे मार्ग स्वीकारले नाहीत, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण केली नाही तर ह्या समाजात तिची परवडच होणार. शिक्षण, नोकरी हा मार्ग कितीही अवघड असला, त्यास कितीही विरोध होत असला तरी प्रसंगी घरदार सोडावे पण हाच मार्ग स्त्रीने स्वीकारावा. असे केल्याने मानहानीकारक व्यवसाय करण्यास तिला प्रवृत्त केले जाऊ शकत नाही. आर्थिक स्वातंत्र्य अतिशय महत्वाचे आहे. मोठमोठ्या खानदानांमधील स्त्रिया नवर्‍याच्या इशार्‍यावर नाचताना पाहिल्या आहेत. त्यापेक्षा गरीब असलेले पण स्वतंत्र असलेले बरे असे वाटते. माझ्या मुलींना मी हाच शिक्षण व नोकरीचा मार्ग पत्करायला लावणार आहे. जेव्हा आपले वय निर्णय घेण्यास योग्य नसते तेव्हा घरचे मोठे लोक आपल्यासाठी निर्णय घेतात. पण आपण मोठे झाल्यानंतर तरी थोडे धाडसी निर्णय घ्यायलाच हवेत.

======

प्र - ह्या व्यवसायामार्फत कोणतेही रोग होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घेतली जाते?

उ - आमच्याकडे शरीरविक्रय अजिबात होऊ दिला जात नाही. मुखमैथुन करून देणार्‍या मुली गिर्‍हाईकाने निरोध वापरल्याशिवाय ते करत नाहीत. ह्या शिवाय शासनातर्फे आमची तपासणी होत राहते. केंद्राचीही तपासणी होते. आम्ही सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवतो. आमचा व्यवसाय कायदेशीरच आहे, पण तो कायदेशीरपणे चालवला तर आमच्याकडे कोणीही येणार नाही. समाजातील लोकांच्या विकृत इच्छांचा निचरा आमच्या मसाज पार्लरमध्ये होत असल्याने बाहेरच्या जगात होऊ शकणारे कित्येक गुन्हे होतच नाहीत हे वास्तव अनेकांना माहीत नसेल.

======

प्र - तुमच्यासारख्या असंख्य महिलांना, मुलींना उद्देशून तुम्हाला काय सांगावेसे वाटत आहे?

उ - पदोपदी अपमान आणि शोषण आहे. भोगवस्तू म्हणूनच आपल्याकडे पाहिले जाणार आहे. ह्या लढाईतून माघारही घेता येत नाही आणि धड लढताही येत नाही. पण हे लढणे थोडेसे सोपे तरी व्हावे ह्यासाठी शिक्षण आणि दर्जेदार नोकरी ह्याचा जमेल तितका पाठपुरावा करा. स्वतःला जपा! चार चांगल्या माणसांच्या सोबतीने राहात जा. इथे तीन महिन्यांच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या म्हातारीपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. पण म्हणजे चांगली माणसे नाहीतच असे नाही. निराधार स्त्रियांचा आधार बनण्याचा प्रयत्न करा, आपोआप तुम्हाला भरपूर आधार मिळू लागेल.

=======

मुलाखत समाप्त!

================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्न करणारा अनुभव. पण अर्थातच एच आय व्ही सेंटरवरच मी काम करत असल्याने असे किस्से आम्ही रोजच पहातो.

सदर स्त्री आणि कदाचित तिचे पूर्ण मसाज सेंटरच गुप्तरोगाबद्दल जागरुक दिसते आहे. ही स्तुत्य बाब आहे.

मसाज हा निरोगी व्यकी आनंदासाठी घेउ शकते. पण पॅरेलिसिस, वात, अस्थिभन्गानन्तरचा काळ अशा केसेस मध्येही त्यान्नी रस घेतल्यास त्यांच्या सेवेला अजुन एक पैलु मिळु शकेल.

हा भाग आजच पाहिला. आता बाकीचेची लेख वाचावे लागतील

बेफिकीर,

इथे इंग्लंडमध्ये मालिशकेंद्रे कशी चालतात ते माहीत असल्याने कथा वाचतांना अपेक्षा निश्चित होत्या. शोषण अर्थात इथल्यापेक्षा जास्त आहे.

अकुशल स्त्रीचे कसे लचके तोडले जातात ते पुन्हा पाहायला मिळाले. नवीन शासनाचे महिला आणि बालकल्याण खातं काही सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आहे.

आ.न.,
-गा.पै.

Sad

चिडचिड याची होते कि या घडणार्‍या गोष्टी कोणीही थांबवु शकत नाही. ना काँ सरकार ना मोदी सरकार. ना सेंट्रल गव्हर्न्मेंट ना स्टेट गव्हर्नमेंट ना म्युनिसिपल ना जनता .

कारणः
"समाजातील लोकांच्या विकृत इच्छांचा निचरा आमच्या मसाज पार्लरमध्ये होत असल्याने " हे वाक्यच समाजमनावर इतके बिंबलेले आहे कि पार्लर असो वा कुंटनखाना त्याचे समर्थन याच वाक्यावर होत असते.

यापुढे जाउन "या बायका आहेत म्हणुन आपल्या मुलीबाळी रस्त्यावर बिनबोभाट फिरु शकतात, समाजात सुरक्षितता येते" हे वाक्य एका सज्जनाकडुन ऐकले आहे.

जेंव्हा हा गैरसमज दुर होइल तेंव्हा खरोखर हि किड नष्ट व्हायला सुरु होइल जरी हा अतिप्राचिन बिझिनेस असला तरी....

माफ करा. पण ही कथा काही शोषित , पिडीत स्त्रीची वाटली नाही.
अधिकचे पैसे मिळवण्यासाठी हा स्वतःच्या मनाने निवडलेला मार्गं आहे.
तो चुकीचा की बरोबर हा प्रश्नं नसून 'बाय चॉईस! आहे.
हिला मी तरी 'शोषित योद्धी ' म्हणणार नाही.

साती,

तुमचं मत पटलं नाही. मला वाटत की ती शोषिता आहे का नाही ते पार्श्वभूमी पाहून ठरवायला पाहिजे.

पार्श्वभूमी म्हणून हे वाक्य निवडलं आहे :

>> माझी परिस्थिती अशी होती की आपले काय होणार ह्यापेक्षा आत्ता हातात येत असलेला पैसा माझ्यासाठी अत्यंत
>> महत्वाचा होता.

कदाचित तिची पैसा कमावण्याची बुद्धी योग्य दिशेने चालली नसेल. तसं असेल तर ती अधिकच शोषिता ठरते. Sad

आ.न.,
-गा.पै.

माफ करा. पण ही कथा काही शोषित , पिडीत स्त्रीची वाटली नाही.
अधिकचे पैसे मिळवण्यासाठी हा स्वतःच्या मनाने निवडलेला मार्गं आहे.>>> गापै यांच्याशी सहमत. जर मिळणारा / मिळवला जाणारा पैसा बेसिक गोष्टींसाठी वापरला जात असेल तर आप्न असा क्लेम नाही करु शकत. ती तिची रोजी रोटी आहे, जास्त पैसे मिळवण्यासाठी स्विकारलेली गोष्ट नाहीय.

अजुन एक समाजामधील चुकिचा मतप्रवाहः राबुन खाण्यापेक्षा या बायकांना ऐषोआरामातल पाहिजे असतं..... असे बोलणारे या धंद्यात काय ऐष आणि काय आराम बघत असतील देव जाणे.

स्वतःच्या मनाने निवडलेला मार्ग असा असु शकतो ? म्हण्जे लाखात एक असेलही पण मग बकिच्यांबद्दल असे मत व्यक्त करणे चुकिचे वाटते.

बेफ़िकीर तुमच्या आधीच्या शोषित योद्ध्या च्या भागा प्रमाणे हा मुलाखतीचा भाग सुधा चांगला जुळून आला आहे. शिक्षण आणि निर्णय स्वतंत्र्याचा अभाव ह्या मुळे भारतातील ह्या स्त्रियांचे जीवन किती कठीण असू शकते परंतु त्यात सुद्धा त्यांची जगण्याची एक नवी उमॆद कायम आहे म्हणून वाचताना नुसतेच वाईट न वाटता एक आशा सुद्धा वाटते. कदाचित ह्या सगळ्या जणी ह्यातूनही मार्ग काढतील. ह्या स्त्रियांची आणि त्यांचे जीवन ह्याची चांगली ओळख होते आहे.

ह्या लेखात तुम्ही ज्या महिलेची शोषित म्हणून माहिती दिली आहे ह्या महिला आधी एक दोन ठिकाणी घरकाम करत होत्या तसेच मसाज करण्याचे वय निघून गेले की त्या पुन्हा घरकामे करणार आहेत. ह्या महिलेने निवडलेला मार्ग हा त्यांनी स्वतःच्या मानाने निवडलेला आहे. त्यांना जास्त पैसे मिळवायचे आहेत. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्या आहे चांगली गोष्ट आहे हि.

शोषित अशासाठी की तिला चॉईस असला तरी निवडता येत नाही कारण कुठलीही निवड शोषणच करणार, ४थी पास स्त्रीला मुले असतील व घरचे विचारत नसतील तर आणखी काय होणार!
योद्धी आहेच, परिस्थितीशी लढायला पैसा मस्ट आहे हे तिला समजलेय, जाणवलेय,
त्यासाठी तिने स्वत:चा बळी जाऊ दिलाय एवढीच निवड तिला जमली.

>>>लोकांना धर्मशिक्षण देणे हा एक दीर्घकालीन तोडगा आहे.<<<

नेमका अर्थबोध झाला नाही. कृपया सविस्तर लिहाल ?

-सुप्रिया.