ये क्या जगह दोस्तों...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आज आमच्या कंपनीतर्फे आम्ही २०/२५ स्वयंसेवकांनी एका NGO ला भेट दिली. वृक्षारोपण, सौरदिव्यांचं रोपण, तिथल्या मुलींसाठी घेतल्या गेलेल्या मेहंदीवर्ग, सौंदर्य प्रसाधन, संगणक वर्ग, इ. वर्गांमध्ये सहभाग घेतला. कंपनीने त्यांच्या सध्या चालू असलेल्या/ नजीकच्या काळात सुरू होऊ घातलेल्या नियोजित प्रकल्पांकरताच्या खर्चाचा काही वाटा उचलला.

ही NGO बोईसरमध्यल्या ५० एकर जागेत वसली आहे. वेश्या व्यापाराला बळी पडलेल्या निष्पाप मुलींची वेश्यावस्तीवर धाड टाकून त्यांची तिथून रितसर सुटका करून आणून इथं त्यांचं पुनर्वसन केलं जातं. अशा मुलींच्या पालकांचा ठावठिकाणा शोधून काढून मुलींना पुन्हा त्यांच्या स्वाधीन करताना आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य केलं जातं. अशा मुलींमध्ये बहुतांश मुली या नेपाळ, बांग्लादेशातल्या असतात. काहींना त्यांच्या लग्नाच्या नवर्‍यानेच तर काहींना भावी जोडीदारानेच विकलेलं असतं. या संस्थेत आल्यावर त्यांची आवश्यक ती शारीरिक तपासणी केली जाते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं अशा मुलींना/स्त्रीयांना मानसिक धक्क्यातून आणि प्रचंड दडपणाखालून बाहेर काढलं जातं. HIV संसर्ग झालेल्यांना इथं उपचार सुरू केले जातात. गर्भपात, प्रसुती यांची तरतूद केली जाते.

आम्ही इथं जाण्याआधी थोडीफार तोंडओळख करून गेलो होतो. पण प्रत्यक्ष भेट दिल्यावर या सगळ्याची प्रखरता कितीतरी पटींनी जाणवली. अशा मुलींसोबत काम करताना, त्यांच्याशी बातचित करताना मन सुन्न होऊन जातं. बारा ते अठरा वर्षांदरम्यानच्या, तारुण्यात पदार्पण करू पाहणार्‍या या मुलींच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्नं दिसण्याऐवजी त्यांच्या वाट्याला अमानुष वासनेचा बळी, गर्भपात, बाळंतपणं, सिगारेटचे चटके आणि कसले कसले शारीरिक छळ आलेले बघून मन बधीर होते. या मुली इथं येण्यापूर्वी त्यांनी नेमकं काय काय सहन केलं असेल याची कल्पना केली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. बाराव्या वर्षी माता झालेल्या आणि त्या बाळाची जबाबदारी सर्वस्वी स्वतःवर येऊन पडलेल्या मुलीने भविष्याकडे काय म्हणून बघायचे? ड्रग्जच्या अंमलाखाली रस्त्यावर आणून टाकल्या गेलेल्या आणि तिथून इथं आणल्या गेलेल्या पण आता मागचा भूतकाळ अजिबात न आठवणार्‍या, नृत्यकलेत सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या मुलीने जगण्याची कुठून सुरुवात करावी? पालकांचा ठावठिकाणा लागलाय पण लोकभयानं ते तिला इथून घेऊन जायला तयार नसलेल्या मुलीने कोणाला जवळ करावे? तेरा चौदाव्या वर्षी HIV ग्रस्त झालेल्या मुलीने कोणाला दोषी धरायचे? आम्ही तिथे असतानाच बाहेरून एका नावाचा पुकारा झाला. तर लगेच आपापल्या कामात मग असलेल्या मुली कार्यशाळेतून भराभर उठून आवाजाच्या दिशेने धावल्या. कदाचित आपल्याच घरच्यांकडून फोन आला असेल या आशेनं.

इथं मुलींना आणल्यानंतर बाकीच्या कायदेशीर बाबी निपटतानाच या मुलींना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपचारांची तजवीज करण्यात येते. एकदा त्यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या शालेय शिक्षणाच्या पूर्ततेबरोबरच, संगणक शिक्षण, कराटे शिक्षण, विविध हस्तकला, ब्युटीपार्लर कोर्सेस, मेहंदी कोर्सेस, खेळांचं शिक्षण, शेतीविषय कामांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण इ. देऊन त्यांना स्वावलंबी केलं जातं, असं सांगण्यात आलं. बांग्लादेशातल्या मुलींना परत स्वगृही गेल्यानंतर बहुतेकदा शेतीशिवाय दुसरा पर्याय नसतो म्हणून त्या मुलींकरता खासकरून शेतीमधल्या कामांत जास्त लक्ष दिले जाते.

ही संस्था बालकृष्ण आचार्य यांनी २००० मध्ये स्थापन केली. २००५ मध्ये त्यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्रिवेणी आचार्य या ह्या संस्थेचं कार्य पुढे चालवत आहेत.

http://www.rescuefoundation.net/ ही या संस्थेची वेबसाईट आहे. तिथे अधिक माहिती वाचता येईल, फोटो गॅलरी बघता येईल.

जरूर वाचा आणि बघा.

If anyone wants to support to the NGO at their individual capacity, they can get in touch with Mr Mahesh Ruparelia (projects@rescuefoundation.net/ 9619401637)

प्रकार: 

विनय, मी आता तुलाच मेल लिहिणार होतो. वर अश्विनीने सुपंथ संदर्भात ववि संयोजकांना सुचवायचे लिहिले आहे. तर हे लक्षात असू दे. वविची हालचाल सुरू झाली की संयोजकांनाही कळवतो.

गजानन, अत्यंत अस्वस्थ करणारं भयानक वास्तव. इथे या संस्थेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

>>> अश्या गोष्टींनी मनाला पडलेल्या पिळाचा एक वळसा तरी मुद्दाम सोडवायचा नाही. आपण आपल्यातच मश्गुल असलो तरी तो वळसाच कायम आठवण देत राहतो की बाई गं, तुझ्या पलिकडेही जग आहे आणि त्याची कायम आठवण ठेव. >>> केश्वे, लाखमोलाचं बोललीस.

गजानन
या वर्षी जी संयोजन समिती स्थापन होइल त्यांना संपर्क कर.

मायबोली टी शर्ट देणगी बद्दल मायबोलीची काही धोरण आहेत. त्यात जर सगळ बसत असेल तर नक्कीच या वर्षीची समिती ह्याचा विचार करेल. Happy

Pages