पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)

Submitted by तुमचा अभिषेक on 11 May, 2014 - 04:45

शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे.

एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे. ज्यांना जेवण फक्त गरमच काय ते करता येते आणि तरीही बाहेरचे न खाता घरचेच आवडते अश्यांना फायद्याचे ठरू शकेल हि यामागची सद्भावना आणि जाणकारांकडून चार टिपा मलाही मिळतील हा यामागचा सदहेतू.

तर,
एका माणसासाठी रावडाचिवडा बनवायला लागणारे साहित्य आहे,
खालीलप्रमाणे :-

तयार भात - प्रमाण आपल्या पोटाच्या अंदाजाने

कोणत्याही प्रकारची तयार डाळ, आमटी, कालवण वगैरे - प्रमाण भात कोलसवण्याइतपत (गोडे वा आंबट वरणापेक्षा तिखट डाळ वा आमटीला जास्त पसंती.)

तयार भाज्या - घरात, फ्रिजमध्ये, आजच्या, कालच्या, परवाच्या, असतील नसतील तेवढ्या सर्व! शेजार्‍यांकडे फक्त तेवढे मागायला जाऊ नका.

अंडे - ज्यांना चालते त्यांच्यासाठी तर मस्ट’च. (अंड्याला या प्रकारात सोन्याची किंमत. कारण सोन्याचे जसे ठोकून पत्रा करणे, खेचून तार करणे, (ज्याला सायंटिफिक भाषेत तन्यता-वर्धनीयता असेही म्हणतात) तसे काहीही करता येते, त्याचप्रमाणे इथेही अंड्याचे आपल्या आवडी आणि मर्जीनुसार भुर्जी ऑमलेट बॉईल’एग वगैरे काहीही करता येते.)

शेव, फरसाण, चिवडा, बाकरवडी - उपलब्धतेनुसार

मीठ - चवीनुसार

सॉस, ठेचा, लालतिखट चटण्या - आवडीनुसार

लोणचे - हे मात्र हवेच ! प्रकार कुठलाही चालेल.

पापड, रायता, पकोडे ईत्यादी ईत्यादी - मूळ पदार्थाला असल्या कुबड्यांची गरज लागत नाही.

शीतपेय - थंडगार ताक किंवा लिंबू-कोकम सरबत.

---------------------------------------------------------------------------------

तर,
आता काय करायचे हे दरवेळी बदलत असल्याने आज मी काय केले हेच सांगतो.

कृती :-

१) सर्वप्रथम एक पसरट भांडे घेतले. (पसरट टोप वा कढई काहीही चालते, फक्त जे काही आई-बायकोने स्वच्छ धुतलेले असेल आणि आपल्याला धुवायची गरज लागणार नाही असे एखादे घ्यावे. कारण असल्या धुण्यापुसण्यातच अर्धी शक्ती खल्लास झाली तर पुढचा पदार्थ बनवायचा उत्साह मावळायची भिती असते.)

२) त्यानंतर एका अंड्याला जेवढे तेल लागते त्याच्या दुप्पट तेल त्या टोपात ओतून घेतले. चमच्याने छानपैकी टोपभर पसरवले. गॅस चालू करून तापायला ठेवले. पहिला तडतड आवाज येताच लागलीच घाबरून गॅस बंद केला. स्वयंपाक करणे आपल्या रोजच्या सवयीचे नसल्यास उकळत्या तेलाशी जास्त खेळू नये.

३) आता फ्रिजमधले थंडगार अंडे एका चमच्याने टकटकवून त्या तेलात सावकाश सोडले आणि टरफले बोटाने साफ पुसून फेकून दिल्यावर गॅस पुन्हा चालू केला. (सेफ गेम, याचे दोन फायदे - एक तर तडतडत्या तेलात अंडे सोडायची रिस्क नाही. दुसरे म्हणजे टरफले पुसून, फेकून, हात धुवुन, होईपर्यंत तेलातले अंडे करपायची भिती नाही.)

४) आता त्याच चमच्याने टोपातले अंडे परतायला घेतले. त्याआधी त्यात मीठ टाकायला मात्र विसरलो नाही. मसाला टाकायचे टाळले कारण त्याने अंड्याची मूळ चव लोप पावते जे या डिशमध्ये मला नको होते.

५) अंड्याचा कच्चेपणा जाऊ लागला तसे ते लालसर व्हायच्या आधीच गॅस पुन्हा एकदा बंद केला. पनीर असो वा अंडे, जास्त तळले गेले की रबरासारखे चिवट होते आणि त्याच्यातील फ्रेशनेसपणा जातो. (वैयक्तिक मत)

६) आता मूळ डिशला थोडावेळ विश्राम देत शीतपेय बनवायला घेतले. ताकाचा बेत होता. आपली नेहमीचीच पद्धत. तांब्यात दही, मीठ, थंड पाणी आणि रवीने घुसळणे. मॅगी नूडल्सनंतर मला परफेक्ट जमणारा हा दुसरा पदार्थ. तसे यात काही कठीण नसते, पण माझ्या रवी घुसळायच्या हाताला गुण आहे असे घरचे म्हणतात. (माझ्या मॅगीबद्दलही असेच म्हणतात, कदाचित मला जे जमतेय ते काम तरी माझ्याकडून काढून घ्यावे या हेतूनेही चढवत असतील.)

७) आता वेळ होती कूकरमधील भात काढून (जो आईने सकाळीच केला होता) त्या टोपातल्या तळलेल्या अंड्याबरोबर मिसळून घ्यायची. मगाशी वर अंड्यास तळताना गरजेपेक्षा जास्त तेल घ्या असे सांगितले होते ते याचसाठी जेणेकरून आताचा भातही त्या तेलात थोडाफार तळला जाईल. सोबतीला आवडीनुसार कोणताही लालतिखट मसाला टाकू शकतो. माझा पावभाजीचा मसालाही वापरून झालाय. पण आज मात्र घरात शोध घेता ‘लाल ठेचा’ गवसला. ज्यात लाल मिरची आणि सुके खोबरे असल्याने एकंदरीत भाताला फ्लेवर छानच येणार होता. छानपैकी अर्धी मूठ भुरभुरला आणि चमच्याने पुन्हा परतायला घेतले.

............बस्स हाच तो क्षण जेव्हा भाताचे बदलणारे रंग पाहता मला आठवले की या डिशचे फोटो काढून काय कसे बनवले हे व्हॉट्सपवर बायकोशी शेअर करावे. मला मॅगी बनवणे आणि जेवण गरम करणे याव्यतिरीक्त आणखीही बरेच(?) काही करता येते यावर ती दाखवत असलेला अविश्वास मला आज तोडायचा होता.
इथे एक नम्रपणे नमूद करू इच्छितो - फोटो मोबाईलने काढल्याने आणि मोबाईलची सेटींग गंडल्याने फार काही सुरेख आले नाहीत, म्हणून फोटोंची क्वालिटी बघून पदार्थांची चव ठरवू नका. फिशटॅंक मधील मासे कितीही रंगीबेरंगी आणि छानछान दिसत असले तरी ते खायला तितकेच चवदार लागतील असे नसते, तिथे चारचौघांसारखा दिसणारा बांगडाच हवा.

.
तर हा पहिला फोटो टोपात परतलेल्या भाताचा ज्याला ‘एग फ्राईड राईस विथ महाराष्ट्रीयन तडका’ असेही बोलू शकतो.
.

1.jpg

८) टोपातला भात काढून ताटात घेतला आणि त्यावर घरात सापडलेली बारीक तिखट शेव पसरवली. सोबतीला चितळे बंधू बाकरवडी देखील होती, तर ती सुद्धा दाताने कचाकचा कुरतडून त्यावर सोडली. इथे हा भात मी स्वताच आणि एकटाच खात असल्याने बाकरवडी दाताने तोडली कारण मला स्वताच्या उष्ट्याचे चालते.

.
हा दुसरा फोटो त्या भाताला ताटात घेतल्यावरचा प्लस तिखट शेव आणि बाकरवडीचा.
(जाणकार व्यक्ती फोटो झूम करून चेक करू शकता की खरोखर चितळेंचीच बाकरवडी होती, टीआरपीसाठी त्यांचे नाव घेतलेले नाहीये)
.

2.jpg

.
लगे हात मगाशी घुसळून ठेवलेल्या ताकाचाही एक फोटो काढून घेतला.
.

4.jpg

९) ग्रेवी बनवण्यासाठी आता त्याच रिकाम्या टोपात डाळ घेतली आणि भाजीचा शोध घेता फ्रीजमध्ये कालची शेंगाबटाट्याची एकच काय ती माझ्या आवडीची भाजी सापडली. काही हरकत नाही, भारंभार सतरा पदार्थ असण्यापेक्षा मोजकेच पण आवडीचे पदार्थ या प्रकारासाठी केव्हाही चांगलेच. आता इथे काही विशेष करायचे नव्हते. डाळ आणि भाजी एकत्र करून छानपैकी एक कढ घ्यायचा होता. पण तरीही थोडीफार वेगळी चव म्हणून अर्धा चमचा दही त्यात टाकले. (कधी मूड आला तर टोमेटो सॉसही टाकायचो) अर्थात आमची डाळ आणि भाजी तिखट असल्याने त्यात दही टाकले पण कोणाकडे तिखट डाळ-भाजी नसल्यास प्लीजच हं मग नको त्यात दही.

.
हा पुढचा फोटो त्या तयार ग्रेवीचा - दोन बटाटे आणि तीन शेंगा एवढे मोजकेच माझ्यापुरतेच घेतले. या प्रकारात पोटाचा अंदाज घेऊन अन्नाची नाशाडी होऊ नये हे बघणे खूप महत्वाचे असते.
.

3.jpg

.
हा फोटो आता पर्यंत तयार झालेल्या एकंदरीत सर्वच जेवणाचा.
यात ताटात अ‍ॅड झालेली लोणच्याची फोड विशेष महत्व राखते. इतरवेळी मला लोणचे हवेच असा आग्रह नसला, अगदी हॉटेलमध्ये मिळणारे फुकटचेही खात नसलो, तरी या डिशबरोबर ते आवर्जून लागतेच.
.

5.jpg

१०) फोटोग्राफीच्या नादात ग्रेवी थंड झाली असे जाणवल्याने पुन्हा एकदा गॅसवर ठेऊन एक कढ काढून घेतला.

.
पण फोटो काढायची एव्हाना चटक लागल्याने खायला सुरुवात करायच्या अगदी आधी हा खालचा फोटो काढायचा मोह काही बाई आवरला नाही.
.

6.jpg

एक सांगावेसे वाटणारे - अंडे फोडण्यापासून, भात परतवायला, डाळ-भाजी घेऊन ती ढवळायला वापरला जाणारा तो एकच एक चमचा जेवायच्या वेळी मात्र ताटातून अल्लद बाहेर काढून बोटांना गरम चटके देत खायची मजा काही औरच !

तळटीप - सारे फोटो मुद्दामहूनच खालच्या फरशीवर काढले आहेत. किचनमधील पसारा एकाही फोटोत दिसून बायकोच्या शिव्या खायला लागू नये यासाठी घेतलेली हि काळजी. तरी यावरून हे मीच कश्यावरून बनवले असा अविश्वास कोणी माझ्यावर दाखवू नये. खुद्द माझ्या बायकोने यावर विश्वास ठेऊन मला ‘मिस्टरशेफ’चे प्रशस्तीपत्रक दिले आहे Happy

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया , अभिषेक - आताच वाचली ती "भुताच्या गावात…"कथा. भय/गूढ कथाच म्हणता येईल तिला.
कमेंटपण टाकली बर्का Happy

Pages