दिवाणाखाली कचरा साचलाय
कपाटावर धूळ जमा झालीय
भिंतीचे पापुद्रे ओठ काढून आहेत
सारवल्या नाहीत मी अजून.....
छप्पराचा पत्रा चिरलाय
त्यातून येते दिवस असताना
धुलीकणांशी घुटमळत
एखादी प्रकाशाची तिरीप
आणि रात्री थोडा निःशब्द गारवा...
कपडे अस्ताव्यस्त पडलेत
रणांगणात मरुन पडलेल्या सैनिकांसारखे
निवांतपणे अगदीच सुन्न.. बेवारस
तुझ्या स्पर्शाची वाट बघत..
जणू तू येशील अन भरशील
तुझ्या जिव्हाळ्याचे श्वास त्यांच्यात
आणि बोलू लागतील ते निर्जिव कपडेही..
प्रत्येक कोपर्यात जाळं विणलंय कोळ्याने
रोज हळूहळू आकार वाढत जाणारं
माझ्याकडे बघून छद्मीपणे हसणारं
अख्खं घर त्याच्या विळख्यात घेऊ पाहणारं..
देव्हार्यात तर ढीग साचलाय
जळून खाक झालेल्या अगरबत्त्यांचा
आणि तू जमा करायचीस त्या भस्माचा...
देव तसेच आहेत न धुतलेले
हळदीकुंकवाने बरबटलेले
आणि निस्तेज फ़ुलांच्या गराड्यात
झाकून ठेवलेले....
बाहेर बागेतल्या झाडांवरची पाने
जमिनीवर लोळत आहेत
येणार्या प्रत्येक वार्याच्या झुळूकीसोबत
स्वतःला हेलावून घेण्यासाठी
हलवून घेण्यासाठी,
स्वतःचा चुराडा करण्यासाठी...
तुझा फ़ोटो भिंतीवर लावायची हिंम्मत
अजूनही होत नाहीये...
-- संतोष वाटपाडे