अश्रू सांज-सावल्यांचे
कुणाला दु:ख हो मरणाचे
कुणाला दु:ख त्या जगण्याचे
पापणी आड लपले अश्रू सांज-सावल्यांचे
दाटले भय मनी पूर्व संचिताचे
कष्टीले बहु वाहुनी तारुण्य
फेडिले पांग झेलूनी कारुण्य
कथु दु:ख कोणा असह्य गात्रांचे
गेले आटोनी झरे इथे वात्सल्याचे
भय न मानसी असे अस्ताचे
दु:ख नित्य बोचे मरून जगण्याचे
कोंडूनी अश्रू उथळ हसण्याचे
दाटले भय व्यथांची कथा होण्याचे
काय वेळ येते कसे सांगू मी कोणा
अपमानिले मज लेखूनी पायीच्या वहाणा
वाटते दूर लोटावे जिणे उपेक्षिताचे
पुसावे वरच्याला फळ हे कोणत्या संचिताचे
पेलली पालखी, होऊनी भोई त्यांचे
मिरविले सन्मान आपुल्याच वारसांचे
माझ्याच घरी ओझे माझ्याच पाहुणपणाचे
दाटले भय मनी सांज सावल्यांचे.
सौ.जयश्री सुभाष देशकुलकर्णी