झाला! झाला! प्रकाशित झाला! माझ्या प्रेमकथेचा तिसरा भाग प्रकाशित झाला!माझ्या प्रेमकथेचा हा भाग लिहिताना मला कळत नव्हतं की हा तिसरा म्हणु की अंतिम? जाऊ दे म्हंटलं, लिहिता लिहिता ठरेलच ते.
.
भाग पहिला: http://www.maayboli.com/node/4347
भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/4474
.
आज ऑफीसमध्ये विशेष काहीच घडलं नाही. जाम कंटाळा आला होता. काही कामही नव्हतं फारसं. जागच्या जागेवर बसल्या बसल्या पाय उडवुन उडवुन दुखायला लागले. हे म्हणे अस्वस्थतेचं प्रतीक असतं, म्हणजे असं पाय उडवणं. काहीतरी करायचं म्हणुन मी माझे ड्रॉवर आवरायला घेतले. इतक्यांत फोन वाजला. आमच्या भल्या मोठ्या रूममध्ये फक्त तीन फोन होते. एक वासाड्याच्या टेबलावर, एक हीरोपाशी आणि एक आमच्या रूममध्ये. आणि हो, चवथा फोन रतीच्या डिजिटल डीपार्ट्मेंटमध्ये होता. हीरो भलताच प्रामाणिक होता. तिथुन कुणालाच व्यक्तीगत फोन करु देत नसे. वासाड्याच्या फोनचं तर नावच घ्यायचं नाही. परवानगी नव्हती म्हणुन नव्हे हो, तर वासाड्यानं वापरलेला फोन मुखाजवळ धरण्याची कुणाची हिम्मत नव्हती. आमच्या रूममधुन फोन करायचा झाला तर रूममधले तमाम पब्लिक मुख्यमंत्र्यांची गाडी आल्यावर गर्दी जशी वळेल ना त्या घाइघाइने फोन करणार्याकडे वळुन बघत बसत. मग तिथुन काही प्रायव्हेटायझेशन शक्यच नसे. तर असा तो सामुहीक फोन वाजला. उठुन घेणार कोण? फोन बाहेरुन वाजला तर सगळे नसलेल्या कामात गढुन जात. मागे एकदा श्रीलंकन जयविलालची मी तक्रार केली होती. मराठी माणुस बाकी काही करु शकला नाही तरी तक्रार करण्यात आपला हात कुणी धरणार नाही. मग 'ऑफिशीअल्स'ची मिटींग घेण्यात आली. आमच्या बिग बॉसनं विचारलं, 'वॉट इज द कंप्लेन्ट?' मी 'छत्रपतींचा विजय असो' अशा आविर्भावात म्हंटलं, 'ही नेव्हर गेट्स अप टू अटेंड द फोन? एव्हन इफ इट इज फ्रॉम हिज वाइफ...' एक फसफसणारा हशा पिकला. का ते मला काही कळलं नाही. त्यावर जया (शॉ.फॉ.) म्हणाला, 'हाऊ डू आय नो इट इज माय वाइफ. इन माय होम ऑल्सो आय नेव्हर अटेंड द फोन. माय वाइफ ड्ज.' हे श्रीलंकन लोक इंग्लीश अगदी गोर्याच्या आविर्भावात बोलायचा प्रयत्न करतात. मेल्या, घराची तुलना ऑफीसशी करतोस? थुत तुझ्या जिंदगानीवर. मी आपलं मनात म्हंटलं. मग सगळ्यांनाच वॉर्निंग मिळाली. त्याचा परिणाम त्या आठवड्यापुरताच राहिला. आणि माझ्याही लक्षात आलं की टाइमपास करण्यासाठी फोन अटेंड करत रहाणं हा एक चांगला पर्याय असु शकतो. काम झालं नाही तर आपण ओरडायला मोकळे, फोन घेण्यामुळे काम नाही झालं! नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मीच उठले. 'हॅलो, गुड मॉर्निंग, आर्ट डीपार्टमेंट', 'मिस फालावी, मिस्टर वासाड्या (खरं नाव नको बाई घ्यायला, वासाड्याच बरंय) हॅज कंप्लेंट अबाउट चंद्रन, (मराठीतुन इंग्लिश टायपायला फार अवघड परिस्थिती होते हो, मराठीतुनच बोलुया) त्यानं तुमचंही नाव घेतलंय. येणार का माझ्या रूममध्ये.' 'हो, आलेच. एव्हढं हातातलं काम संपवुन. चालेल?' बरोब्बर काही ठिकाणी माझ्यातला शिष्टाचार असा जागृत होतो. आता ह्या 'चालेल'ची काही गरज होती का? पण तो फार आवश्यक असतो. मुळात माझ्या हातात कोणतं काम होतं ते मलाही ठाऊक नव्हतं. पण असं म्हणायचं असतं. हा ऑफीसचा शिष्टाचार आहे. आणखी एक शिष्टाचार म्हणजे इकडुन तिकडे कुठेही जायचं किंवा यायचं असेल तर हातात एखादी फाइल किंवा निदान काही कागद तरी बाळगावेत. आणि घाइत असल्यासारखं चालावं, म्हणजे पहाणार्याला आपण कामाच्या घाइत आहोत असं वाटतं. खरं सगळ्यांनाच ठाऊक असतं, पण तरिही हा शिष्टाचार सगळेच पाळतात. तसंच मी काही कागद घेऊन एम. डी. च्या ऑफीसकडे निघाले. वासाड्या आणि चंद्रन कुठे दिसत नव्हते. जाताजाता रूममध्ये नजर टाकली, तर सगळे माझ्याचकडे बघत होते (हीरो सोडुन, हीरो कामात गर्क दिसला. काय बाई तरी! बघायचंय नाही ही काय रीत झाली?) जणु काही मला 'टाडा' खाली बोलावण्यात आलं होतं असा भाव सगळ्यांच्या डोळ्यात होता. शी: चाबरट मेले! कसले बावळटासारखे बघतायत सगळे. शेखर म्हणालाच तेवढ्यात, 'काय पल्लवी? काय विशेष?' हा साडे तीन फुटी शेख्या, ह्याला नाही काम धाम. कुणी कर्मविधी, नाही नाही नुस्त्या विधीच्या कर्माला निघाला तरी ह्याचा हाच प्रश्न,' काय मग? काय विशेष?' मी सोईस्कर दुर्लक्ष करुन निघाले.
एम्.डी. वाटच बघत होता. चंद्रु खाली मान घालुन बसला होता. वासाड्यानं तिथंही नेहमीचं ओंगळ्वाणं हसुन मला 'सुप्रभात' म्हंटलं. काहीच अंदाज येत नव्हता. एम्.डी. म्हणाला की वासाड्याची तक्रार आहे की तुम्ही त्याचं ऐकत नाही. कोण ऐकतं? त्याचं नाव सांगा एकदा, माझं आपलं मनातल्या मनात. तो म्हणे की, तुम्ही त्याची टिंगल करता. आयला वासाड्या हुशार आहे तर. तो म्हणे की, चंद्रुनं तुम्हाला त्याच्या विरोधात भडकावलं आहे. भडकवायला मी काय स्टोव्ह आहे? की माथेफिरु? तो म्हणे चंद्रन तुम्हाला शिट्टी वाजवुन सिग्नल देतो आणि मग तुम्ही डार्करूममध्ये जाता. हे वाक्य अर्धवट स्वरुपात कुणी वाचलं तर काय अनर्थ होइल पहा. ज्याला संदर्भ माहीत नाही त्यानं काय समजायचं? वास्तवीक, चंद्रन हा मला बंधुतुल्य आहे. कारण प्रथमपासुन त्यानं माझं रक्षण केलं आहे. मला मदत केली आहे. मला सांभाळुन घेतलं आहे. तर आता माझी पाळी होती बोलण्याची. मी कुठला सूर छेडावा ह्या तयारीत घसा स्वच्छ केला. खाकरला म्हणायला मला आवडत नाही. याक थु. मग म्हंटलं, सर.... चंद्रुनं आपल्या बायकोला सुद्धा कधी शिट्टी मारली नसेल, तो बिचारा मला कशाला मारेल? हे सगळं वासाड्याचं मनोराज्य आहे. कृपया त्याला अधिक महत्व देऊ नये. उलटपक्षी, छुपे कॅमेरे लावुन पहावं की वासाड्या काय काय करतो. सुज्ञास सांगणे नलगे. न लगे. हुश्श. बोलले बाई. त्याचे काय परिणाम होतील ते त्या क्षणी डोक्यात आलं नाही पण मी खरं बोलले होते. अर्धसत्य का असेना!
आम्ही तिघे परत आलो. वासाड्यानं मला जिन्यात गाठलं, मला वाटलं तु माझ्या बाजुनं बोलशील. आपण दोघे मराठी आहोत म्हणुन. मी मनात म्हंटलं, त्याचाच तर खेद होतोय. पण अन्यायाची बाजु घेइल तर मी मराठी म्हणुन नाव सांगणार नाही. मराठी म्हणजेच सत्य. मराठी म्हणजेच धैर्य. मराठी म्हणजेच शौर्य. मराठी म्हणजेच महारथी! मराठी म्हणजे काय काय असतं ते तेव्हा आठवलं नाही.
त्यानंतर दीड वर्ष वासाड्याचा छ्ळ सहन करावा लागला.
दिड वर्षानी माझा कंपनीशी करार संपला.
थांबा. कथा संपलेली नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.......
एकदा प्रॉडक्शन फ्लोअर वर काम करताना सहपुरुषकर्मचार्यांच्या चक्षु आक्रमणाने मी त्रासले होते. मला सुमारे ४० फुट बाय २४ फुट अशी मोठी वक्र रेषा रेखाटायची होती. कशाला? बरोबर आहे तुमचा प्रश्न. मी तेव्हा निऑन इंडस्ट्रीत ग्राफिक आर्टीस्ट म्हणुन कार्यरत होते. मंडळी, निऑन आत्ता कुठे भारतीय बाजारपेठेत स्थिरावलंय. पण परदेशांत हे फार म्हणजे फार पुर्वीपासुन चालत आलंय. लॉस एंजेलीसला निऑनची काशी आणि पॅरीसला पंढरी म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे निऑनच्या मार्गातला मुळ अडथळा आहे, विद्युत पुरवठ्याचा. अनियमीत आणि महाग वीज निऑनला स्थैर्य मिळु देत नाही. शिवाय सरकारचे धोरणही विचारात घेण्यासारखे आहे. बरोबरही आहे म्हणा ते. गोर गरिबाच्या झोपडीत दिवा नाही आणि भले निऑन! अलीकडे शॉपींग मॉल्स मध्ये निऑनची आकर्षक रोषणाई बघायला मिळते. तर अशा एका मोठ्या निऑन साईनवर मी काम करत होते. प्रस्तुत जागेवर अचुक वक्रता नसल्यानं ती मशिनवर करणं शक्य नव्हतं म्हणुन मग मी हातानं करायचं ठरवलं. मोठाच्या मोठा शुभ्र कागद जमिनीवर पसरला. मापं घेऊन झाली. आता रेषा उतरवायचीच बाकी होती. दरम्यान सहपुरुषकर्मचारी बघ्याची भुमिका वठवत होते. अशा बघ्यांचा कामात किती व्यत्यय येतो म्हणुन सांगु! त्यामुळे गळ्याला स्कार्फ बांधुन मी खाली पाहुन काम करत होते, मधुन मधुन माझ्या शुभ्र कागदावर पाय ठेवणार्याला वर मान करुन न पाहताच दटावीत होते. इतक्यात, अगदी समोरच कागदावर पाय ठेऊन कुणीतरी उभं राह्यलं. मी दरडावलं. 'गो बॅक सायमन.' बूट मागे सरकले. माझं पुन्हा लक्ष गेलं. बूट छान पॉलीश केलेले महागडे बूट होते. कामगारांचे असतात तसे नव्हते. चमकुन मी वर पाहिलं तर माझा एम्.डी. समोर सुंदर हसु गालावर ठेऊन कौतुकानं पहात होता. उलट्या काळजाचा अशी ह्याची ख्याती होती. मी घाबरले. 'सॉरी सर.' 'काही हरकत नाही. चालु दे तुझं.' मी नखशिखांत घाबरणे म्हणजे काय ह्याचा ज्वलंत अनुभव घेतला होता. पण त्या एम्.डी. ची अखेरपर्यंत माझ्यावर मर्जी राहिली. ऑफीसच्या पहिल्या दिवशी, हाच माझ्या ड्राफ्टींग टेबलपाशी आला होता. मला ठाऊक नव्हतं तेव्हा हा आपला एम्.डी. आहे म्हणुन. तेव्हा त्यानं विचारलं होतं, 'कशी वाटली कंपनी आणि इथले लोक?' 'ठीक आहे. प्रोफेशनल ऍटीट्युडचा अभाव आहे.' तो निघुन गेल्यावर चंद्रुनं येऊन सावध केलं मला. तेव्हाही मी अशीच नखशिखांत उडाले होते. पुढच्याच महिन्यापासुन स्टाफसाठी प्रोफेशनल ट्रेनिंग सुरु करण्यात आलं होतं. प्रत्येकाकडुन फीड बॅक मागवुन मल्टी स्किलिंग वर भर देण्यात येऊ लागला आणि वैयक्तीक प्रगतीवरही.
आम्हाला वेगळी अशी रेस्ट रूम नव्हती. मग मी टेबलावरच डोकं ठेऊन लंच टाइममध्ये झोपायची. माझी आणि झोपेची फार जुनी गट्टी आहे. मला कुठेही मस्त झोप येऊ शकते. मी चालता चालता झोपत नाही इतकेच. आणि झोपेत चालत नाही हेही महत्वाचे. माझा माझ्या मित्र्-मैत्रीणींना हेवा वाटतो. टेबलावर डोकं ठेऊन असं अवघडुन झोपल्यानं एव्हाना मला डोकेदुखी, डोळेदुखी आणि पाठ्दुखी सुरु झाली होती. काय करावं बरं? मग माझ्या सुपीक डोक्यातुन एक कल्पना उगवली. प्रॉडक्शन फ्लोअरवरुन मी कोरुगेटेड ३-४ बॉक्स आणुन टेबलाच्या कोपर्यात ठेवले. घरुन हवेची छोटी उशी, छोटी सतरंजी आणि एक शाल आणुन कपाटात ठेवली. ऑफीसबॉयकरवी टेबलाखाली झाडुन पुसुन स्वच्छ करवुन घेतलं. लंच टाइम झाल्या झाल्या फ्लोअरवरचे सगळे लाइटस बिनधास्त ऑफ केले. माझ्या टेबलाच्या अवती भवती खुर्च्यांचा गराडा घालुन घेतला आणि टेबलाखाली वर उल्लेखिलेला सरंजाम पसरुन दिली ताणुन! खुर्च्यांच्या अडथळ्यामुळे माझ्यापर्यंत कुणी पोचु शकत नव्हतं. मी कुणाला जरी दिसु शकत नव्हते तरी तिथुन मला सगळं सहज दिसत होतं. मोबाईलवर अलार्म लावला आणि दे धडाक्. . . हळुहळु बातमी वार्यासारखी पसरली आणि बर्याच जणांनी आपापल्या टेबलाखालची जागा झाडुन पुसुन स्वच्छ करुन घेतली!
६ महिन्यांनतर आमच्यासाठी लेडीज आणि जेंटस अशा २ रेस्ट रूम्स बनवण्या आल्या. एव्हाना माझी पाठदुखीही थांबली होती.
चंद्रन बद्दल आपण बरंच काही जाणु घेतलं. आता रती बद्दल. रती खूप छान स्त्री होती. गरिबीनं पिचली होती. नवरा विचित्रच होता बाई तिचा. तिची मुलगी गोड होती. रतीनं एकदा आम्हाला ओणमनिमित्त घरी जेवायला बोलावलं. २८ प्रकारच्या केरळी डिशेस खाल्या आम्ही त्या दिवशी. रती डिजिटल डीपार्टमेंटमध्ये कामाला होती. प्रॉडक्शन फ्लोअर वर आम्ही दोघीच महिला, त्याही भारतीय; त्यामुळे आम्ही लगेचच एकमेकींच्या जवळ आलो. मुलगी आजारी पडली तर ती स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकायला निघाली. मग आमच्या गटानं काँट्रिब्युशन (मराठी शब्द काय आहे ह्याला?) काढुन तिची सहाय्यता केली. करारी, अभिमानी रतीला ते मान्य नव्हतं तरी आम्ही जबरदस्तीनं तिच्या बांगड्या वाचवल्या. माझ्या आर्थिक ओढाताणीत मला माझी सोन्याची बांगडी विकायला लागली, ती रतीनं सोडवुन आणली. मला रागावली. 'पल्लु, इतकं परकं समजु नकोस आम्हाला.....' खूप फिल्मि वाटतंय ना, पण माझ्या आयुष्यात हे घडलंय! ह्या सगळ्याचे हे सर्व जण साक्षीदार आहेत. मी माझ्या अधु आईचं स्वप्नं पुर्ण करायला तिला केरळला घेऊन गेले होते. तेव्हा रतीच्या आणि हीरोच्या घरी २-२ दिवस राहुन आले होते. हीरो घरी नसताना हीरोच्या घरच्यांनी माझ्या आईची फुलासारखी काळजी घेतली होती. निघताना रतीनं मला आणि माझ्या आईला सेट्ट्-मुंडु नावाची केरळी साडी दिली. मीही मराठमोळी पैठणी आणि इरकली त्यांना भेट म्हणुन दिली. केरळी आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीची अशी सुंदर देवाणघेवाण झाली. बरोब्बर, आम्ही हीरोकडे राह्यलो म्हणजे माझी त्याची दोस्ती झाली तर! पण कशी ते नाही कळालं ना, सांगणार आहे... सगळं सांगणार आहे. हीरोकडे राह्यला गेलो तर ते सपक खाऊन खाऊन आमच्या मातोश्रींची तोंडाची चव गेली होती. कधी एकदा चवदार, तिखट बिखट खाते असं तिला झालं होतं. मुळात तिख्खट भाजीबरोबर हिरवी मिरची मिठाला लावुन खाणारी बाई ती. केरळच्या भात संस्कृतीला पकली होती, दोनच दिवसांत. हीरो तेव्हा सुट्टीवर नव्हता, म्हणजेच त्याच्या घरी नव्हता. पण त्याच्या घरच्यांनी आमची खूपच सरबराई केली. विलक्षण! एक दिवस हीरोच्या आईने एक केरळी स्वीट डिश केली होती. तांदुळाच्या उकडलेल्या शेवईसारखं होतं ते. त्यावर नारळाचं दुध आणि साखर घालुन खायचं होतं. मला नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडतं पण आमच्या आईसाहेब! तिनं लिंबु आणि तिखट मागवुन घेतलं आणि ते घालुन ती केरळी स्वीट डीश खाल्ली! माझा चेहरा जुरासिक पार्कमधल्या हरवलेल्या डायनोला पुरातन संग्रहालयात ठेवल्यावर त्या डायनोचा दिसेल तसा झाला होता. वर मातोश्री मराठीतुन केरळी संस्कृतीवर आमच्याशी सुसंवाद साधुन मिरचीची मराठी फोडणी घालतच होत्या, ते वेगळेच. रतीच्या आईनं सेट्ट्-मुंडु दिल्यावर तिथेही आईसाहेबांनी फर्मान सुनावलं, 'हम ऐसा पहनते नई. हमको पैठणी नई तो सिल्क दियो...' तेव्हा माझा चेहरा कसा झाला होता सांगु? जाऊ दे, त्याला तर उपमाच नाही सापडत आहे माझ्या वाडंमयात. (कसा टायपायचा हा शब्द?)
ह्या चर्चेतुन केरळी लोकांचे हिंदी आठवले. आपण नेहमी मराठी माणसाच्या हिंदी बोलण्याची गंमत ऐकली असेल. पण केरळी लोक काय सॉलीड हिंदी बोलतात! उदाहरणार्थ, मेरा अंगल पुनामे रयता है... एकदा मी किराण्याच्या दुकानात गेले, दुकानदार मल्याळी माझा नित्याचा होता. म्हणजे मी नित्य त्याच्या दुकानात जात होते. काय बाई, अर्थ निघतात एकेक! तर मी म्हंटलं, 'व्हेजीटेबल स्टॉक है क्या?' तो म्हणाला, 'अब्बी नई है भाभी. तुम घर जाओ, आम बादमें आके पकडेगा.....'
माझ्या लग्नाला तेव्हा ७ वर्ष झाली होती आणि हा 'नई भाभी' का म्हणाला मला ते काही कळेना. माझ्या घरी कुठचे आम आहेत? आणि कळस म्हणजे हा काय येऊन 'पकडेगा' बाबा?
केरळी लोकांचे ईंग्लिश हा अजुन एक मस्त विषय. 'आय गिव यु कॉपी, अनलेस अँड अंडील आय हॅव.... ' 'रीमुव्ह प्रिंट आउट... आय ऍम इन द कॉम्प्युटर... मंडे सेम सेम संडे (म्हणजे मंडेलाही सुट्टी आहे. संडे इज ए हॉलीडे.)
चंद्रु मुंबईला काही काळ असल्यानं त्याचं हिंदी, मराठी, बंबैय्या बर्यापैकी बरं होतं. हीरो तर कॉन्व्हेंटला शिकला असल्यानं त्याचंही इंग्लीश, हिंदी बरं होतं. रती आणि विवेक मात्र फक्त इंग्लीश आणि त्यांची मातृभाषा बोलत. मला भाषा शिकायला आवडतं त्यामुळे मी हळुहळु अरबी आणि मल्याळम् शिकुन घेतली. खूप नाही पण गरजेपुरती. हे ऑफीसमध्ये माझ्या ग्रूप्खेरीज कुणालाच माहीत नव्हतं. एक दोन मल्याळी वीर माझ्यासमोर त्यांच्या भाषेंत माझा मस्त उद्धार करीत आणि माझ्याशी बोलताना एकदम 'दिदी' म्हणुन बोलत. अखेर तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन न होउन मी एक दिवस गरजले. त्यांना पळता भुइ थोडी झाली. त्यांनी दुरुनच विचारलं 'आपको मल्याळम आती है?' मी रागाच्या भरात म्हंटलं, 'बच्चे तुने जितना दुध पिया है उतनी आती है...' राग ओसरल्यावर मी काय बोलले आणि त्याचा काय अर्थ आहे हे मलाच समजेना. तुम्हाला काही समजलं तर कळवा.
.
माझ्या ह्या कथासत्रांत (खूनसत्र तसे कथासत्र), अनेक पात्र येतील आणि जातील. प्रत्येकाचे डीटेल्स घेत नको बसायला. त्यांचं तेव्हढं महत्वही नाही. तर अशीच काही अजुन पात्रे आता मी सांगणार आहे. माननीय शांता शेळके म्हणतात, 'वाचनाला शिस्त नसावी.' मी अगदी तेच उचल्ललं. फक्त मी इतकंच केलं की 'लेखनाला शिस्त नसावी.' (ध चा मा कसा होतो पहा). आणखी एका ठिकाणी वाचलंय (बहुधा मा. श्री. म. माटे सर) की, 'अनुभव हे कधी बचक्याने तर कधी चिमटीने उचलावेत आणि मग त्याचे वेगवेगळे विषय लिहावेत. वेगवेगळं लिहिण्यापेक्षा सगळे मसाले चिमुट चिमुट मी ह्या लेखात घातले. मग हा लेख ललित लेख होतो की आत्मकथा ह्यावर माझे स्वतःचे प्रगाढ (की नुसते गाढ? की गाढव?) चिंतन चालु आहे.
मोहम्मद फझल नावाचा एक नमुना होता आमच्या मार्केटींग विभागात. दिसायला गोविंदासारखा होता थोडाफार. एकदा, मी वॉचमन्/गेटमनच्या रूममध्ये गेले. गेटमन राणा नेपाळी होता. चांगला होता बिचारा. चांगला म्हंटले की पुढे बिचारा आपोआपच येते नाही का? राणा पुर्वी महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये चायनीज कूक होता. तिथुन तो आता गेटमन झाला होता. सारखा सलाम ठोकायचा. दिव्सांत कितीही वेळा आपण समोर आलो की ह्याचा हात आपोआप कपाळावर जायचा. जणु काही त्याचा प्रोग्रॅम फिट केलेला होता. तो महाबळेश्वरला असल्यानं त्याला मराठी आणि महाराष्ट्र आवडायचे. त्यामुळे माझ्याशीही तो विशेष अदबीनं वागायचा. त्याला पटवुन मी फजलला फोन केला. तोही अगदी मेघना नायडुसारख्या आवाजांत. 'श्रीयुन फजल, खाली येणार का? तुमच्याकडे एक काम होतं.... तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखते. येणार का प्लीइइइइइज...' दुसर्याच मिनिटाला फजल धावत पळत आला. फजल आणि मी नेहमी एकमेकांच्या खोड्या काढायचो. मित्र नाही म्हणता येणार पण आमचे रिलेशन मैत्रीपुर्ण होते. माझ्याकडे ढुंकुनही न पाहता त्यानं राणाला विचारलं,' कौन आया था राणा मेरे लिये?' राणा माझ्याकडे पाहुन हसला.... 'अबे तु है? मेरे को लगा कोई... खुदा कसम, मे आसमानमे उड रहा था यार... जमीन पर आ टपका मै.'
फजलचीच अजुन एक गंमत. एकदा सकाळी कार्ड पंच केल्यावर जिन्यानं वर जात असताना फजल मागुन आला. आदल्यच दिवशी मी केस कापुन आले होते. कालच नवीन घेतलेली जिन्स् घालुन मी आले होते. तेव्हा मी जिन्स घालण्याइतकी मस्त बारिक होते. तशी अजुनही मी बारिकच आहे म्हणा. लोकांची दृष्टी बिघडली आहे इतकेच. लोकांना आणि आरश्यालाही मी अलिकडे फार जाड दिसते. तर फजलला वाटले असावे की कुणी नवा आयटम ऑफिसमध्ये आला आहे की काय? गुड मॉर्निंग म्हणण्याच्या बहाण्याने ओळख वाढवता येइल म्हणुन फजल नव्या आयटमच्या म्हणजे माझ्या मागे आला. मला हे लक्षात आलेच. मीही मुद्दामुन चेहरा लपवत वर आले. आणि अचानक वळले आणि डोळे जमतील तेव्हढे तिरळे घाण करुन वाईट हसले. फजल अक्षरश: किंचाळला,'आयला तु है फिरसे...? ये मेरे साथही क्यु होता है? इसबारभी मेरी वाट लग गै यार. शी:...' मी मजेनं म्हंटलं, 'फजल, उपरवालेका इशारा समझ. बार बार मुझे क्यु तेरे सामने लाता है!' तर तो म्हणाला, 'यार पल्लु, मेरेको गर्लफ्रेंड चाहीये, बॉडी गार्ड नही. और तु तो आपुनकी बेहेन है रे...' मला सगळे बहनजी का करुन टाकतात कोण जाणे? अर्थात मी अशी आहे म्हणुन मला खूप चांगले मित्र आहेत आणि माझा रेकॉर्ड एकदम स्वच्छ आहे. शिवाय अशा टायपाचे विनोद कुणाशी करावेत एवढं कळायला मी काही लहान नाही ना! वयानेही नाही आणि आकाराने तर त्याहुन नाही.
.
हळुहळु मलाच ह्या लेखाचा कंटाळा आलाय. मग तुम्हाला किती आला असेल ह्याची मी तीळमात्र कल्पना करु शकते. तीळमात्र शंका नसते हे ठाऊक आहे पण अशी वाक्यरचनाही जमेल का हो? बरं आणि तीळ मधला ती पहिला लिहायचा की दुसरा? तसे बरेच शुद्धलेखनजन्य प्रश्न आहेतच, पण ते माझ्या सोयीने मी दुर्लक्षित केलेले आहेत. थोर लोक कदाचित मला सुधारण्यासाठी किंवा सुधरवण्यासाठी थोडे फार कष्ट घेऊन मला सुचवतील किंवा झाडतीलही. पाहु या. तर अशा प्रकारे आता हा लेख मी संपवायला घेत आहे. किंवा आवरायला घेत आहे. (अर्थातच मी किती दयाळु आहे हे कळले असेलच तुम्हाला.) पण जाता जाता तुमच्या मनांत शंका न ठेवता जाईन. कारण असं वाटतंय की बहुधा मला मायबोलीवरुनच निघुन जावे लागणार आहे. थोडा इमोशनल ड्रामा राहिला होता, म्हणुन हे वाक्य टाकले. पण त्याची कॉमेडी होइल की काय अशीही शंका चाटुन गेली. त्या शंकेचा चेहराही (मला चाटल्यानंतर) कडवट झालेला दिसला मला. अशा बर्याच शंकाकुशंकासुशंका मला वेळोवेळी भेटतच असतात. कुशंका तर सुशंका का नाही? उदा. पुजेच्या वेळी बाईने/बायकोने डावीकडे बसावे की उजवीकडे? आणि का?नुकतेच सत्यनारायण झाले ना घरी, तेव्हा माझे बरेचसे लक्ष्/दुर्लक्ष असल्या शंकांनी घेरलेले होते. म्हणजे माझे पुजेकडे लक्ष नव्हते असे मुळीच नाही. पण नेमकी मला जांभई यायची. आणि इतकी वेडी वाकडी यायची की सांगता येत नव्हती की देता येत नव्हती. नाहीतर पायाला सणकुन मुंग्या यायच्या. टी.व्ही. बघताना किंवा पुरणाच्या पोळ्या चापताना नाही येत अशा मुंग्या. ह्या मुंग्या येण्याचा संदर्भ काही मानसिकतेशी असतो का? ह्या असल्या शंकांवर जमल्यास वेगळी चर्चा करु. अर्थात मी मायबोलीकर राहीले तर. ऊप्स! पुन्हा इमोशन्स्. आवर पल्ले. आवर स्वतःला. तर वळु या माझ्या कथेकडे. पुन्हा एक शंका आली. हे 'वळु या' कसं वाटतं? असो.
.
कंपनीला दोन मालक होते. मोहम्मद अली आणि अब्दुल्ला. वर उल्लेख केलेला अब्दुल्ला. मोहम्मद अली हसरा म्हातारा होता. माझं आणि त्याचं फारसं जमलं नाही. उलट रागिट असलेल्या अब्दुल्लाशी पटायचं. मोहम्मद अलीची तारीक, आदील आणि जलाल आणि फौजिया ही मुलं. अब्दुल्लाला २ मुलं होती म्हणे.
एक दिवस कम्पनीच्या रिसेप्शनमध्ये एक क्रीएटीव थीम घेऊन पोस्टर लावायचं होतं मला. मापं घेताना माझ्या हातुन चूक झाली. पोस्टर छापुन झालं, कटींग झालं. डिस्प्लेला आल्यावर कळालं. काय करावे कळेना. माप कमी पडलं होतं. डिस्प्लेअची ऍल्युमिनिअमची कडा कव्हर होत नव्हती. इतक्यात अब्दुल्ला आला, शांतपणे म्हणाला काही हरकत नाही. चारी बाजुनं ऍल्युमिनिअम व्हिजिबल राहु देत. किती आधार वाटला तेव्हा.
माझ्या हाताखाली ट्रेनिंगला कुणी कुणी येत असत. प्रिंटींग टेकनॉलॉजी इंस्टीट्युट मधली पोरं वगैरे... त्या दिवशी मोहम्मद म्हणुन एक जण आला. २ महिने तो माझ्यासोबत रहाणार होता. जळ्ळा मेला अवलक्षण. पण म्हंटलं जाऊ दे. पोरगं बिचारं सुसंस्कारीत दिसत होतं. माझ्याशी आदरानं वागत होतं. मीही काही हातचं राखुन ठेवलं नाही. सगळं व्यवस्थीत शिकवत गेले. हळुहळु ओळख झाली आणि छान गट्टी जमली आमची. मी कधीच त्याची वैयक्तीक विचारपूस करण्याच्या फंदात पडले नाही. त्यानंही सांगितलं नाही. मी त्याला चिडवायची सुद्धा. त्याचा फोन वाजला की मी म्हणायची, 'ही कोण मैत्रीण रे? थांब तुझ्या बाबांनाच सांगते..' त्याचे बाबा कोण मला माहित असायचं कारण नव्हतं. ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी त्यानं मला 'चॅस्टीटी' पर्फ्युम गुरुदक्षिणा भेट म्हणुन दिला. बाबांनी बोलावलंय म्हणाला. कोण बाबा? तो म्हणाला 'अब्दुल्ला'........ ठाक्क. काळजाचा ठोका चुकला. त्याच्या बाबांनी म्हणजेच अब्दुल्लानं माझे आभार मानले. तो क्षण सोन्याहूनही अधिक सोनेरी होता.
१ एप्रिल १९९९. सकाळी ९.०० वाजता.
चंद्रुनं मला चॅलेंज केलं. दाखव तुझा मराठी बाणा. जिंकुन दाखव हा हीरोचा बुरुज. मग ठरवुन हीरोच्या शेजारच्या संगणकावर काम करायला जाऊन बसले. वासाड्या फोनवर गंभीर चर्चा करत होता. पहाते तर समोरुन आदील चालला होता. मी पटकन हीरोच्या इथला फोन उचलुन कानाला लावला. हा फोन वासाड्याच्या फोनशी समांतर आहे तर! आणि मला हसावं की रडावं तेच कळेना. पलिकडे कुणीच बोलत नव्हतं. आयला म्हणजे वासाड्या आदीलसमोर चक्क नाटक करतोय! ही म्हणजे ब्रेकींग न्युजच होती. हा साला वासाड्या, सगळ्यांना टोपी घालुन सगळ्यांनाच एप्रिल फुल करतोय की! मग निदान एकाला तरी आपण का करु नये? कुणीतरी पेक्षा हीरो काय वाईट आहे? प्रॉडक्शन फ्लोअर वरुन मी चॉकोलेट सारखे दिसणारे प्लॅस्टीकचे तुकडे चॉकोलेटच्या रॅपमध्ये मस्त अगदी हुबेहुब गुंडाळुन आणले. हीरोच्या लक्षात येइल अशा बेतानं त्यातला एक तुकडा तोंडात टाकुन चघळू लागले. एक दोन मिनिटानी हीरोला चॉकोलेट ऑफर केलं. त्यानं ते पटकन घेतलं आणि तोंडात टाकलं. है शाबास. जिंकली जिंकली. एव्हाना त्याला कळुन चुकलं असावं की आपण बनवले गेलोय तरिही तसं न दाखवता त्यानं ते गिळलंही! मग मात्र माझा धीर सुटला. मी त्याची माफी मागुन खरं काय ते सांगितलं. तो मस्त हसला. 'मला माहीतीय ते चॉकोलेट खरं नव्हतं.... पण तुम्ही दिलंय ना, म्हणुन ड्यु टु युअर रीस्पेक्ट आय एट इट.....' जिंकलंस मित्रा. आणि तेव्हापासुन आमच्या चाराचे पाच झाले. म्हणजे मी, रती, चंद्रन, विवेक चे मी, रती, चंद्रन, विवेक आणि हीरो. असे पाच झाले.
प्रथम जेव्हा हा जॉब मिळाला तेव्हा कंपनीनं मला फुल्ली फर्निशड फ्लॅट दिला होता. माझा हरवलेला आत्मविश्वास तेव्हा मला सापडला होता. हे सगळं आपल्या गुणवत्तेवर मिळालंय ह्याचा आनंद खरोख्खर गगनात मावत नव्हता. मी तेव्हा अवघी २४ वर्षांची होते. आकाश ठेंगणं होताना मी पाह्यलं होतं. मग मी कधीच मागे वळुन पाह्यलं नाही. आईचा ऊर अभिमानानं भरुन येत होता. आईच्या आठवणींनी मन भिजुन जाई. आईचं महत्व तेव्हाच पटलं. अशात पुरुषांकडुन येणारे विचित्र अनुभव माझं कोवळेपण हिरावुन घेत होते. मी हळुहळु कठोर होत गेले. आजुबाजुचं दु:ख पाहुन माझं मन झाकोळुन जाई. मी माणुस म्हणुन घडत गेले. हाच माणुस आपल्या भावनांना बाजुला ठेऊन कसा काम करतो हे मला जमायला लागलं. खोटं नाटं वागुन कसं हसत राह्यचं ते मला आयुष्यानं, माझ्या ह्या ऑफीसनं शिकवलं होतं. हाडामासाचा माणुस लेखी करारावर जेव्हा कंपनीत रुजु होतो त्याचा यंत्रमानव कसा होतो हे मी स्वानुभवलं होतं. रक्ताची ना गोत्याची. पण इथेच मला चंद्रु, रती, विवेक आणि हीरो सारखी नाती जोडली गेली होती. एकमेकांच्या सुखदःखाशी आम्ही अदृश्य सेतुनं जोडले गेलो. माझं काम माझी ओळख आहे, हा आनंद वेगळाच होता. माझं ड्राफ्टींग टेबल, माझा कॉम्प्युटर ही माझी टेरीटरी होती. हे अढळपद मला माझ्या कामाच्या जोरावर टीकवायचं होतं. खेरीज माझा स्त्री अभिमानही मरु द्यायचा नव्हता. माझ्या काळ्या पाषाणाला पैलु पडुन हीरा घडत होता. हो. हीराच. तेव्हढा स्वतःबद्दल अभिमान प्रत्येकालाच हवा. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर आपलं हे हीरेपण सिद्ध करण्याची देव प्रत्येकाला संधी देतो. निराश होउ नये, कधीच! रुकनेका नई. झुकनेका नई. टेंशन काय को लेने का?
एव्हाना तुम्हाला कळालं असेलच की माझं प्रेम माझ्या कामावर आहे. माझ्या त्या ऑफीसवर आहे. पण मी प्रेमक्था असं बाँबीक नाव दिलं नसतं तर हे कुणी तरी वाचलं असतं का? म्हणुन मग थोडासा 'बकरा उर्फ हीरो'चा आधार घेतला. सॉरी हं. आणि इतका वेळ सोशिकपणे वाचल्याबद्दल आभारी. माझ्या प्रत्येक उताराच्या काळात माझ्या कामानं मला मानसीक उभारी दिली. मला ओळख मिळवुन दिली. काही जण आदरानं पहात असतील तर ते ह्या माझ्या कामामुळे. माझी काहीच अपेक्षा नाही माझ्या कामाकडुन. इतरांपेक्षा मला चार पैसे कमी मिळाले असतील पण समाधान अपरिमीत आहे. माझा छंद हाच माझा व्यवसाय. माझा व्यवसाय - माझं काम. माझं काम - माझं प्रेम. माझं प्रेम - माझी प्रेमकथा! माझ्या प्रेमकथेचा हीरो.... मीच.
-पाच जणांची कथा तीन भागात सफळ संपुर्ण-
--------------समाप्त------------------
एक प्रेमकथा . . . (भाग ३रा)
Submitted by पल्ली on 17 December, 2008 - 13:15
गुलमोहर:
शेअर करा
छान जमलीये
छान जमलीये प्रेमकथा. तीनही भागांमध्ये खूप अंतर पडल्याने थोडी लिंक विस्कळीत झाली. पण ठिके.
पहिल्या भागापासून वाटत होतं की हिरोशी तुझं सूत जमणार. तो जरा अपेक्षाभंगच झाला.
ठमे,
ठमे,
आवड्या गो आवड्या. सुरवातीला पहील्या दोन भागांची लिंक टाक गो.
- अनिलभाई
ठमावती
ठमावती उर्फ पल्ली, मानलं तुला....
आवडली तुझी प्रेमकथा... सुरुवातिचं ट्युनींग तर आहेच छान पण शेवट तर खुपच आवडला.
----------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
कथा छान
कथा छान आहे. पण मधे मधे येणारा सुप्त संदेश अस्वस्थ करतोय. (कोणता ते तुला कळालेच असेल).
मला या तीनही भागात सर्वात काय आवडले असेल तर ते ऑफिस स्टफ... (आम्ही तरी दुसरं काय करतो ऑफिसमधे)
कथेच्या शेवटी आलेलं तुझं स्वतःबद्दलचं आवलोकन तर खासच. एकीकडे 'जिंदगीके मजे' (अर्थातच चांगल्या तर्हेने) घेणारी पल्ली आयुष्याला तेव्हढ्याच गंभीरपणे घेताना दिसते तेव्हा अधिक भावते.
मला तर तुझं अधिकाधिक लिखाण वाचायला आवडेल तेव्हा 'प्लीज कही मत जाना.. और हाजिर होना छोटेसे ब्रेक के बाद'
पल्लवी
*********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
झकास
झकास लिहिलंयस पल्ली!!
veellap, असे
veellap,
असे अस्वस्थ करणारे 'सुप्त संदेश' निसर्ग वेळोवेळी, अवेळी सगळ्यांनाच देत रहातो पण ते जास्त मनावर नसतं घ्यायचं. तिथंच सोडुन द्यायचं. जसं फुल झाडावर सुंदर दिसतं, तोडुन आपल्या हातात घेतल्यावर नाही. त्याचं सौंदर्य तिथंच. हो ना?
सर्वांचे आभार. तुमच्या सहनशक्तीला वंदन
अनिलभाई, भाग पहिला आणि दुसराचा दुवा टाकला आहे.
सायोनारा, असा अपेक्षाभंग हाही एक मसाला आहे आयुष्याचा. त्याचीही एक वेगळी खुमारी असते. एक प्रकारे 'भेजा फ्राय'!
सह्ही
सह्ही पल्ले, जबरदस्त लिहले आहेस.
खरोखर, कथेला अनपक्षीत कलाटणी म्हणतातना ती दिलीस.
आजुन नविन लेखनाची आशा आहे
************
आपला अमर.....
मस्तच ग ...
मस्तच ग ... पल्ली......
आवडेश.. तुझं अधिकाधिक लिखाण वाचायला आवडेल तेव्हा वाट पहात आहोत.
आनेवाला पल जानेवाला हे
बापरे !
बापरे ! किती उशिरा टाकलास हा भाग मला पुन्हा दोन्ही भाग वाचायला लागले ! एकदम मस्त जमलिये आणि शेवट एकदम भारी. लय भारी देवी,....... आता पुढची कथा बरं का !
वाट पहातोय !
.................................................................................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !
मला वाटलं
मला वाटलं विसरलात की काय तिसरा भाग टाकायला. एकंदरीत मजा आला वाचताना. कमी अधीक प्रमाणात प्रत्येक नोकरीपेशा करणार्याच्या आयुष्यात हे प्रसंग येतात. सर्वांना मांडता येतात असे नाही. शिवाय आपल्या माणसांपासून दुर करिअर करणार्याचे प्रोब्लेमस तर 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे'. पुढच्या लिखाणाची वाट पहात आहोत.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
पल्ली
पल्ली तुमची प्रेमकथा आवडली.
१ एप्रिल १९९९ चा भाग वाचताना वाट्ले की आता हीरो तुम्हाला मिळेल आणि कथा संपेल. पण शेवट खुपच छान झाला.
माझी काहीच
माझी काहीच अपेक्षा नाही माझ्या कामाकडुन. इतरांपेक्षा मला चार पैसे कमी मिळाले असतील पण समाधान अपरिमीत आहे. माझा छंद हाच माझा व्यवसाय. माझा व्यवसाय - माझं काम. माझं काम - माझं प्रेम. माझं प्रेम - माझी प्रेमकथा! माझ्या प्रेमकथेचा हीरो.... मीच.
फारच छान! 'पल्ली' फारच छान!
जे.डी भुसारे
पल्ली छानच
पल्ली छानच आहे प्रेम कथा. काहितरी वेगळे आणि वास्तव.
आभार.
आभार. पुन्हा एकदा. सर्वांचे.
पल्ले, तिसर
पल्ले,
तिसरा भाग उत्तम. मधला; दुसरा भाग मी अनेकदा वाचायला घेतला पण या ना त्या कारणाने वितुष्ट येत गेलं आणि रमता आलं नाही कदाचित म्हणून तितका रोचक वाटला नाही. तरीही मी तो पुन्हा एकदा वाचीन म्हणतो.
आज खूपच मस्त वाटलं. फारच टॉप. तब्येत एकदम खुष. keep it up.
...............अज्ञात
वा! मजा आ
वा! मजा आ गया..
कसली शाब्दिक कसरत साधलिस ग..
अन हटके शेवट.. एकदन पटेश..
पल्ले,
पल्ले, अफलातुनच गं !
तु असेही सुरेखच लिहितेस, पण हे खरंच मस्त . लिहीत राहा.
खरं सांगु, तु हे इथेच संपवायला नको होतंस. नाही, तु अगदी वेळेवर संपवलं आहेस यात शंकाच नाही.
पण आता वाट कशाची पाहायची हा मोठ्ठा प्रश्न आहे.
लिहीत राहा. सुरेख.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
आभारी.
आभारी. धन्स.
<<<<<<<<<< माझ्या
<<<<<<<<<<
माझ्या काळ्या पाषाणाला पैलु पडुन हीरा घडत होता. हो. हीराच. तेव्हढा स्वतःबद्दल अभिमान प्रत्येकालाच हवा. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर आपलं हे हीरेपण सिद्ध करण्याची देव प्रत्येकाला संधी देतो. निराश होउ नये, कधीच! रुकनेका नई. झुकनेका नई. टेंशन काय को लेने का?
>>>>>>>>>>
>>>>> पटलं एकदम!!!!!
छान लिहिता तुम्ही. शैली आवडली!!!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हजारों ख्वाइशें ऐसी
के हर ख्वाइश पे दम निकले...............
मस्त
मस्त जमलंय.. पण थोडी सहनशक्ती ताणवलीस हे खरंय!
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.
मस्त जमली
मस्त जमली आहे.
गप्पांचा धबधबा सुरु आहे अस वाटत होत. अधे मधे टकळी जरा कमी चालली असती तरी चालल असत की.
सगळ्यांचे
सगळ्यांचे आभार. टकळीशिवाय बायकांचं (माझ्यासारख्या) कसं होणार? तो तर जन्मसिद्ध अधिकार आहे....