कैकेयी

Submitted by भारती बिर्जे.. on 15 April, 2014 - 07:29

कैकेयी

अयोध्या अजूनही निद्रिस्त होती. दूर शरयू नदीचं पात्र निळसर धुक्यात मंद उजळून शहारत होतं. सौधावर गार बोचऱ्या झुळुका सुटल्या होत्या. युवराज राम सौधाच्या अगदी कडेला रेलून उभा होता. अंगावर सैलसर शाल पांघरून शरयूपैल हरवलेल्या नजरेने पाहत होता.उत्तररात्रीचा प्रहर. राजप्रासादाला अजून जाग यायला बराच अवकाश होता.

‘’ रामा ! राजकन्या सीतेपेक्षा शरयू नदी सुंदर आहे की काय ?’’ त्या खट्याळ किणकिणत्या स्वरातल्या शब्दांनी त्याची तंद्री भंग पावली. दचकून त्याने मागे वळून पाहिलं तर धाकटी राणी कैकेयी सौधाच्या दरवाजात उभी होती.. नि:स्तब्ध शांततेत दोघे एकमेकांकडे क्षणार्ध बघत राहिले.
‘’ माते! ये,पण बोलू नकोस.या सघन चांदण्यातल्या शांततेला तडा जाईल. तसाही तो जाणारच आहे नगराचे व्यवहार सुरू झाल्यावर.आत्ता अयोध्येचं हे निरागस रूप पाहून घे.’’
त्याचा गंभीर भाव पाहून तीही मूक झाली.काही क्षण त्याच्यासोबत शरयूचं पात्र न्याहाळत राहिली.मग रामच बोलला ,’’ माते, बोल ग हवं ते.आपल्याला तरी कुठे बोलायला वेळ मिळतो आजकाल ! तुला आठवतं, या सौधावर अशाच पहाटवेळी कितीदा तरी अगदी मनातल्या गोष्टी सांगितल्या असतील आपण एकमेकांना.’’
‘’ श्रीरामा ! प्रियपुत्रा ! भरतापेक्षाही प्रेम केलं आहे मी तुझ्यावर असं म्हणणंही कमीच वाटतं मला. या कैकेयीच्या जीवनातल्या सर्वात पवित्र प्रेमाचं नाव राम आहे.पुत्रा,तू माझा पुत्र आहेस आणि पिताही.तू माझं माहेर आहेस दूर कैकेय देशात राहिलेलं.’’
‘’ माता कैकेयी, ही तुझी माहेरची ओढ इतक्या तीव्रतेने इतका काळ मी कोणत्याच स्त्रीमध्ये पाहिली नव्हती. माता कौसल्या, माता सुमित्रा काय आणि अगदी आता विवाहबद्ध होऊन प्रासादात आलेल्या राजकुमारी सीता आणि तिच्या तीनही भगिनी. किती पटकन रुळल्या इथे.स्त्रियांना कळतंच की नव्या मातीशी नव्या आवेगाने रुजलं तरच जगणं सुसह्य सुंदर होतं ते.नाहीतर तू ! अशा वेगळेपणामुळे कायम अस्वस्थ असतेस.’’
‘’ लग्न काय झालं महाशयांना स्त्रियांवर बोलण्याचा मोठा अधिकारच मिळाला. एरवी मान उचलून मातांशिवाय अन्य स्त्रियांकडे, अगदी समवयीन कन्यकांकडेही बघतसुद्धा नव्हते युवराज.’’

यावर राम लाजला आणि पुटपुटला ,’’ तुझं सगळंच जगावेगळं एवढंच म्हणायचं होतं माते.तुझं खळखळून हसणं , तुझं अश्वारोहण, तुझा शस्त्राभ्यास, तुझं तातांना युद्धात सहकार्य करणं .. कधीकधी वाटतं तू या स्थळकाळाबाहेरची कुणी यक्षिणी आहेस.’’
‘’ यक्षिणी शापित असतात ना रामा ? मग तुला वाटतं ते बरोबरच असेल.म्हणूनच अशी मातृविहीन , सात भावांची दंगामस्ती करणारी बहीण म्हणून वाढले मी माहेरी.आणि मग.. बरं पण आधी मला सांग, नवीन- नवीन लग्न झालेला,तेही सीतेसारख्या गुणलावण्यसंपन्न राजकुमारीशी,राज्याभिषेक एक आठवड्यावर आलेला हा माझा ज्येष्ठ प्रियपुत्र उत्तररात्री एकटाच सौधावर कसली चिंता करतो आहे ? बाळा,कसला तणाव आहे तुला ? मी गेले कैक दिवस पाहते आहे पण बोलले नाही. एक तर तुम्हा सर्वांच्या विवाहांची धामधूम, तुझ्या राज्याभिषेकाची त्याहीपुढची उत्सवी तयारी.. वाटलं माझ्या शहाण्या बाळाला येणाऱ्या जबाबदारीचा तणाव आला असेल, त्याचा स्वभाव आहेच तसा धीरगंभीर ! इतकंच आहे ना रामा ? खरं खरं सांग पाहू मला ! माझ्यापासून लपत नाहीत तुझे मनोभाव. अगदी लहानपणापासून तुझे सगळे हट्ट कौसल्यामातेपेक्षाही माझ्याकडेच चालले आहेत.’’
राम हसला. ‘’ आणि त्यापायी तुला तिचा रोषही उगीचच पत्करावा लागला आहे. कसं विसरेन ? पण मनकवडी आहेस माते , माझे अनुच्चारित भाव अचूक वाचतेस नेहमीच, म्हणून माझं रहस्य तुझ्यासमोर उघडं पडतं नेहमीच, हे मात्र कोणाला समजत नाही..’’
‘’ होय ना बाळा? मग सांग पाहू काय खुपतं आहे माझ्या रामाच्या कोमल हृदयाला ?’’

आता बोचऱ्या झुळुका निवळून हवासा गारवा सुटला होता.सौधावरच्याच एका संगमरवरी चौथऱ्यावर आपली रेशमी शाल पांघरून रामाने मातेसाठी आसन तयार केलं आणि बळेच तिला तिथे बसवलं. तिच्या पायाशी बसून तिला म्हणाला ‘’ माते ऐक तर. गोष्ट काही मासांपूर्वीची आहे. गुरुदेव विश्वामित्र तातांकडे आले आणि त्यांनी तातांकडे माझी आणि बंधू लक्ष्मणाची मागणी केली कारण राक्षस त्यांची यज्ञस्थळे उद्ध्वस्त करत होते हे तू जाणतेसच.’’
‘’ आठवतंय ना पुत्रा. तुझं आणि पुत्र लक्ष्मणाचं धनुर्विद्याग्रहण पूर्ण झालं होतं. धाकट्या दोन्ही कुमारांचं शिक्षण अजून चालू आहे म्हणून तुम्हा दोघांचीच मागणी केली त्यांनी.’’कैकेयी जणू ते दृश्य मनाने पुन: पाहत होती.
‘’ होय ग माते ! माहिती आहे मला भरत शत्रुघ्नही नुसते फुरफुरत होते यायला, वय लहान म्हणून नाही नेलं. मी कधी म्हटलं तुझा पुत्र कुठे कमी आहे धनुर्विद्येत ?’’ रामाने जरा विनोदाने तिला चिडवलं.
‘’ गप्प रे चहाटळा ! तुला माहितीय तूही माझाच पुत्र आहेस ते. उगीच चिडवू नकोस मला. पुढे काय झालं ते सांग.’’
‘’ तर गुरुदेव विश्वामित्रांबरोबर जनस्थानातील कित्येक आश्रमांमध्ये त्या काळात भ्रमण केलं मी. सोबत लक्ष्मण.गुरुदेवांची अखंड ओघवती वाणी. शस्त्रअस्त्रधनुर्विद्या, युद्धनीती, राजनीती, क्षत्रियधर्म ,राजधर्म याचबरोबर विविध वनस्पती, त्यांचे गुणधर्म , जलाशयांचे शोध, तिथे येणाऱ्या पशूंची वैशिष्ट्ये –एक ना अनेक विषयांवर अखंड ज्ञानसत्र चाललेले वाणीने. पायांखाली रानातल्या गच्च हिरवाईत लाल भांगासारख्या पाऊलवाटा. अरण्यातले पानाफुलांचे शीतल सुगंध ल्यायलेल्या दिवसरात्री माध्यान्ही सांजवेळा.अचानक समोर येणारे भयानक राक्षस-राक्षसिणी .. त्यांच्या नि:पाताचा थरार . आमचं खरं जीवनशिक्षण सुरू होतं आचार्यांबरोबर. प्रत्येक दिवस नवलाईचा , साहसाचा होता.’’
‘’आणि सर्वात सुंदर साहस या यशस्वी यात्रेच्या शेवटी होतं. विदेह राजकन्येचं स्वयंवर ! सगळं माहिती आहे रे रामा ! पण यात उदास होण्यासारखं काय आहे !’’
‘’ नाही माते ! सगळं माझ्याशिवाय कुणालाच माहिती नाही. आणि तूच पहिली आणि शेवटची व्यक्ती असशील ते समजून घेणारी. दुसऱ्या कुणातही ती क्षमता नाही.’’
रामचंद्राच्या विशाल डोळ्यात अश्रूंचं निळसर धुकं तरंगल्यासारखं वाटलं कैकेयीला आणि ती चपापली.मर्यादापुरुषोत्तम असं इतक्या लहान वयात अभिधान दिलं आहे त्याला त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या , अपार विश्वास ठेवणाऱ्या अयोध्येच्या प्रजाजनांनी. सहजासहजी भावना ओसंडत नाहीत त्याच्या.तिने त्याचं मस्तक थोपटलं मायेने, चिंतेने.

‘’ माते, या आश्रमांचे जीवनक्रम जवळून पाहिले या प्रवासात. शांत रम्य वनराईत उभारलेली सुंदर पर्णकुटी-संकुले.उगवतीबरोबरच सुरू होणारे पवित्र मंत्रघोष. लगबग करणाऱ्या ऋषिपत्नी, नित्यकर्माला लागलेला निरागस बटूसमूह. आणि सगळ्यांपेक्षा , धीरगंभीर तपाचरणात, संशोधनात , यज्ञकर्मात निमग्न ऋषीमुनी. वल्कले ल्यायलेले, तेज:पुंज तरीही करुणामय.मानवजातीवरच नव्हे तर वस्तुमात्रावर आणि चराचरावर त्यांच्या शुद्ध प्रेमाची गंगा अवतरताना प्रत्यक्ष अनुभवली . मी आश्रमात सिंहीणीच्या कुशीत झोपलेली हरीणशावकं पाहिली माते, जी या ऋषींच्या तपाच्या प्रभावात , शुद्ध प्रेमाच्या चांदण्यात नैसर्गिक वैरभाव विसरली होती. पशूही बदलले होते त्या दिव्य करुणेच्या धारेत माते मग मी अंतर्बाह्य बदलून गेलो यात काय आश्चर्य ? युवराज श्रीराम संपला तिथे.आत्मज्ञानाची तळमळ लागलेला विरागी नवाच राम जन्मला तिथे.’’

कैकेयी अंतर्बाह्य हादरली. कसलाशा अघटिताची चाहूल क्षितिजाच्या पलिकडे स्पंदन पावते आहे की आपल्याच हृदयाची धडधड फुटून बाहेर ऐकू येते आहे तिला कळेना .
‘’मग श्रीरामा ! कसं शक्य आहे हे ? नियोजित राजा तू अयोध्येचा. राज्याभिषेक एका सप्ताहावर आलेला. विसर ते सर्व आता.कर्तव्याबद्दल मी तुला काय सांगणार पुत्रा ? क्षत्रिय राजपुत्र तू. आश्रमधर्माची, वनवासाची ही ओढ एक स्वप्न समजून विसरून जा, राजसिंहासनावर विराजमान हो,अखंड विजयी हो बाळा.’’
‘’ विजय ? ते रक्तलांच्छित विजय मी डाव्या हातानेही मिळवेन, त्यात माझं जीवन घालवू मी ? खरा विजय स्वत:वर मिळवायचा असतो, त्यासाठी एकांतसाधना करायची असते ती माझी परमउत्कट इच्छा माझ्या श्वासांमध्ये निनादते आहे माते, हा राम आज अत्यंत दु:खी आहे. एखाद्या कैद्यापेक्षा त्याची अवस्था वेगळी नाही. सीतेसारख्या सुंदर कोमल पत्नीचा सहवासही या दु:खाचा विसर पडू देत नाही.’’

‘’तू गुरुदेव विश्वामित्रांशी बोलला होतास यावर ?’’ कैकेयीने विचारले.
‘’ मी केवळ तुझ्याशीच बोललो माते , तेही आत्ताच. पण होय, गुरुदेव विश्वामित्रांनी माझी अस्वस्थता जाणली होती जणू अंतर्ज्ञानाने. ‘’ रामाला कसलीशी गूढ आठवण आली .
‘’मग ? काय म्हणाले ते ?’’कैकेयीने औत्सुक्याने विचारलं .
‘’ तसं काहीच बोलले नाहीत , पण एका रात्री मला एकट्यालाच समोर बसवून म्हणाले- रामा , एकच लक्षात ठेव नेहमीच .घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत. या हाताने मी हा कमंडलू उचलून इथून तिथे ठेवला हे दिसेल तुला, का ठेवला हे कधी कळेल का ?’’

‘’ हे कसलं विचित्र विधान ? काय अर्थ आहे याचा ?’’ कैकेयी त्रस्त झाली.
राम हसला. ‘’ मलाही नाही कळलं माते , पण काहीतरी गूढ सत्य असावं त्यात असा त्यांचं मुखमंडळ उजळलं होतं हे वाक्य बोलताना. जाऊ दे. विसर माझं बोलणं. थोड्याच वेळात उजाडेल. जा तू आता माते. मला तर शोधत येतीलच तात. रोज नवे कर्मकांड चालले आहे उत्साहाने राज्याभिषेकासाठी.’’
पण कैकेयी स्तब्ध झाली होती. मान खाली घालून एकाग्र.जणू मंत्रमुग्ध. स्वत:शीच पुन: उच्चारत होती ते शब्द.

‘’ घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत.’’
मग तिच्या मुखावर एक वेगळाच अभिनिवेश प्रकटला .ती ताडकन उठून येरझारा घालू लागली .
राम अचंबित होऊन पहातच राहिला तिच्याकडे.

‘’ रामा , तुझी कोणतीच इच्छा, एकही शब्द मी खाली पडू दिला नाही.तुला आज राजप्रासाद बंदिशाळा वाटतो आहे आणि आश्रमीय जीवनाची, वनवासाची ओढ वाटते आहे.पुत्रा, तुझ्या इच्छेला कर्तव्यांनी बांधलेल्या जीवनात काय स्थान आहे ! हजारो प्रजाजनांची , तुझ्या तातांची जी इच्छा तीच तुझी इच्छा. पण नाही. तुझी माता कैकेयी तुला असं बळी जाऊ देणार नाही. तुझ्या आत्मशोधाच्या तळमळीचा मला अभिमान वाटतो आहे प्रियपुत्र ! तू वनवासाला जायची तयारी कर ! “

‘’ हे कसं शक्य आहे माते , तुलाही ठाऊक आहे ते.’’ रामाचे नेत्र विस्फारले होते. आपली जगावेगळी मनस्वी धाकटी माता आपल्यासाठी काहीही करण्याची क्षमता बाळगून आहे हे त्याला माहिती होतं.

‘’ घटना घडताना दिसतात, पण त्यामागच्या अंत:स्थ हेतूंचे प्रवाह कुणाला कालत्रयी दिसत नाहीत.- विश्वामित्रांच्या या वाक्याला खोल अर्थ आहे बाळा, आणि तो केवळ मलाच कळावा असा विधीसंकेत आहे. राम वनवासाला जाताना अयोध्येला दिसेल , तो हट्टी कैकेयीच्या हट्टापायी गेला असं चित्र उभं केलं तर तुझ्यावर दोष येणार नाही पुत्रा, तुझी विनासायास या तुरुंगातून सुटका होईल. ’’ कैकेयीचे शब्द जणू दूरच्या अंतराळातून येत होते. राम तिच्या पायाशीच कोसळलाच ते ऐकून !
‘’माते , मला महापातकात घालते आहेस. माझा ही इच्छा पुरवू नकोस ! जन्मजन्मांतरीचा कलंक तुला लागेल ! लोकक्षोभ भयंकर असतो माते.आधीच तुझ्या मनस्वी वागण्यामुळे तुझा तिटकारा करणारे अनेक आहेत . का सुचला तुला असा अघोरी विचार ?’’
कैकेयी मंद हसली. कधी नाही इतकी शांत दिसली तिची मुद्रा रामाला.

‘’ श्रीरामा, राजप्रासादाला बंदिवास म्हणालास तू आत्ताच, तेव्हाच माझ्या हृदयात सत्याचा प्रकाश पडला. पुत्रा, तुझी जगावेगळी माताही बंदिवासातच आहे. आता पुरेसा मोठा झाला आहेस, आज तुला हे सांगू शकते, तुझ्या पित्यानेही माझ्या केवळ बाह्य सौंदर्यावर प्रेम केलं आहे , युद्धातल्या कौशल्यावर प्रेम केलं आहे. इतर स्त्रियांसारखी मी कधीच नव्हते या असल्या प्रेमाला सर्वस्व मानायला.कैकेयीची बुद्धीमत्ता, तिच्या भावनांचं वैभव अगदी एकाकी होतं पुत्रा, मी बंदिवासात होते याच राजप्रासादात आणि तुझा जन्म झाला. तुझं अलौकिकत्व माझ्या अंगाखांद्यावर वाढलं कधी, पुत्र होतास तो सुहृद कधी झालास कळलंच नाही. रामा, तू माझ्या मनाचा विश्राम झालास.अस्वस्थ कैकेयी स्वस्थ झाली ती केवळ तुझ्यामुळे.. माझं तुझ्यावरचं हे प्रेम भरताच्याही मनात उतरलं आहे. तो पोर जीव लावतो तुला. दु:ख एकच आहे, तोही दुरावेल मला या प्रकारामुळे , पण रामा,मला तुझ्या उपकाराची परतफेड करू दे.हा आरोप माझ्यावर घेऊ दे. अट एकच आहे पुत्रा, हा वनवास चौदा वर्षांचाच असेल. नंतर परतून ये, मी अयोध्येवर याहून अधिक अन्याय करू शकणार नाही.. विचार कर पुत्रा,तुझा निर्णय उद्या मला इथेच सांग . आपल्या दोघातच राहील हे, माझ्या माहेरच्या विश्वासू दासी मंथरेची मदत घेईन मी या कामात ’’

कैकेयी हुंदके देत झपाट्याने सौधावरून निघून गेली. ..

राम अवाक होऊन शरयूपैल पाहत राहिला.पहाटेचे पहिले किरण पूर्वेला उजळत होते.अयोध्येला जाग येत होती..

-जिगिषा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदु धर्म हा लबाड बायकानी निर्बुद्ध पुरुषांची कशी फरपट केली त्याचा इतिहास आहे.

इक्ष्वाकु कुळापासुन पेशव्यंपर्यंत सगळे हिंदु राजे हे गृहकलहाने हैराण होऊन बरबाद होऊन लवकर मरुन अल्पायुषी झाले आहेत.

त्यात बायकांचे काँट्रीब्युशन लक्षणीय आहे.

.............

याउलट , हिंदुंच्या दहापट बायकांचा आकंठ उपभोग घेऊन त्याच वेळी हिंदुंच्या दहा पट मोठी राज्ये संभाळुन सगळे मुसलमान राजे हिंदुंच्या दुप्पट तिप्पट आयुष्य जगून थेरडे होऊन मेलेले आहेत !

रामाचा वनवास , भीष्माचे ब्रह्मचर्य ., अंधेका पुत्र अंधा , ध्रुवबाळाला हाकलणारी लबाड बाई असल्या माजोरड्या बायका मोघलांच्यात का सापडत नाहीत , हे मला न उलगङलेले कोडे आहे!

................

कुठेतरी जंगलात चार राक्षस माजले म्हणुन स्वतः रामाने राज्य सोडुन धावणे हे म्हणजे चांदणी चौकात उकिरडा साचलाय हे समजल्यावर मोदीने हातात झाडु घेऊन धावणे किंवा कुर्ला स्टेशनचा फलाट स्वछ करायला फडणविसाने हातात निरमा आणि बादली घ्वून धावणे आहे !

.......

मुळात , राक्षस ऋशीमुनींवर आक्रमण करत होते , हे सत्य आहे , की , मूळच्या द्रविड संस्कृतीला खड्ड्यात ढकलून आर्यांचे बांडगूळ वाढले हाही वादाचाच विषय आहे.

....

असो.

सात वाजले.

आता मशिदीतून बांग ऐकु येईल. ते ऐकले की बरे वाटते !

........

Proud

जिगीषा,

तुमचं स्फुट वस्तुस्थितीच्या बरंचसं जवळ जाणारं आहे. एकंदरीत घडलेल्या घटना पाहता रामाचं प्रशिक्षण अंतिमत: रावणाशी संघर्ष करण्यासाठीच चालू होतं असं वाटतं. खालील बाबी एकत्रितपणे विचारांत घेतल्या जाव्या :

१. विश्वामित्रांनी एकत्रितपणे रामलक्ष्मणांची मागणी केली. दशरथाने पूर्ण सैन्य देऊ केलं, पण विश्वामित्रांना रामलक्ष्मणच हवे होते. त्यास वसिष्ठांनी अनुमोदनही दिलं.

२. विदेह देशाचा राजा जनक याच्याशी चतुर्विध विवाहसंबंध करणे. राम आणि लक्ष्मण यांचा विवाह होणं समजू शकतो. पण भरत आणि शत्रुघ्न यांनाही जनकाच्या परिवाराशी विवाहित करण्याचा हेतू रामलक्ष्मणांच्या अनुपस्थितीत अयोध्येचं रक्षण करण्याचा आहे.

३. दशरथाने आगोदरही रावणाचा उपद्रव टाळण्यासाठी राजेलोकांनी एकत्र येण्याची कल्पना मांडली होती. रावणाने अयोध्येच्या उत्तरेस असलेला उत्तरकोसल देश जिंकून घेतला होता. बहुधा त्यानंतर हे राजकारण चर्चेत आणलं गेलं असावं.

विशाल कुलकर्णी म्हणाले की :

>> पण कधी कधी असाही प्रश्न पडतो की मंथरेने जर कैकेयीला भरीला घातलेच नसते तर प्रभुराम वनवासाला गेलेच
>> नसते, तर सीताहरण झालेच नसते..... तर 'रावणाचा अंतही झाला नसता

परंतु माझ्या मते श्रीराम वनवासास न जाता देखील अखेरीस रामरावण युद्धं झालंच असतं असं मानायला वाव आहे. रामाने दुसरी शक्कल काढली असती.

म्हणून तुम्ही लिहिलेलं स्फुट तत्कालीन वस्तुस्थितीशी सुसंगत वाटतं. Happy

आ.न.,
-गा.पै.

हि कथा वाचताना मी तेव्हाही भारावून गेले होते आणि आता रामायण चालू झाल्यावर वनवासात जातानाच एपिसोड बघताना राहून राहून हीच कथा आठवत होती.
आज घरून काम करताना पहिल्यादा हि कथा शोधून परत वाचली आणि मगच काम सुरु केले. Happy

Pages