“ देठी “ –आळूच्या देठांचे भरीत

Submitted by pltambe@yahoo.co.in on 11 April, 2014 - 19:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

“ देठी “ –आळूच्या देठांचे भरीत

साहित्य : १०-१२ आळूच्या पानाच्या मागचे लांब व जाड देठ,एक मोठ्ठा कांदा, एक वाटी गोडसर दही, अर्धी वाटी शेंगदाण्याचे भरड कूट,फोडणीसाठी दोन टे.स्पून तेल , मोहोरी , जिरे , हळद व हिंग , चवीनुसार लाल तिखट , मीठ , साखर व लिंबाचा रस , अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रथम आळूच्या (पानाच्या देठांवरचे) साल (स्कीन) काढून देठांचे बारीक तुकडे चिरून घेऊन ते शिजवून घ्या व स्मॅश करून घ्या , कांदा साले काढून बारीक चिरून घ्या.एका बाउलमध्ये स्मॅश केले आळूचे देठ , दही , शेंगदाण्याचे भरड कूट व चवीनुसार साखर,मीठ व लिंबाचा रस घालून चांगले हालवून एकजीव करून घ्या ,गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तेल तापल्यावर मोहोरी व जिरे घाला व ते चांगले तडतडल्यावर त्यात हळद व हिंग घालून भरतावर आधी चवीनुसार लाल तिखट घाला व मग त्यावर ती गरम फोडणी घाला (लाल तिखट फोडणीतच घातले तर ते जळते म्हणून ते प्रथम भरतावर घालून त्यावर गरम फोडणी घालावी) व पुन्हा एकवेळ चांगले हलवून सगळीकडे फोडणी व तिखट लागेल असे बघा. सर्व्ह करण्यापूर्वी भरतावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्या.
तोंडीलावणे म्हणून ही आळूच्या पानाच्या देठांची केलेली “देठी” (भरीत) पोळीबरोबर खाण्यास फारच चविष्ट लागते.

वाढणी/प्रमाण: 
४-५ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

तोंडीलावणे म्हणून ही आळूच्या पानाच्या देठांची केलेली “देठी” (भरीत) पोळीबरोबर खाण्यास फारच चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे अळूची पातळ भाजी (फतफतं) असली की थोडे देठ भाजीत घालून उरलेल्या देठांची आई नेहमी देठी करायची दुसर्‍या दिवशी. मस्त लागते. पण ती कांदा घालत नसे.

आळूचा उग्र वास कांद्याने थोदासा कमी होतो व चवही छान लागते म्हणूनच मीच घालून बघितला छान चव आल्यामुळे रेसिपीत दिला आहे. ज्यांना कांदा-लसूण वर्ज्य असेल त्यांनी नाही घातला तरी चालू शकेल. माझी आईसुद्धा आदल्या दिवशी आळूचे फतफते करत असे व दुसर्‍या दिवशी ही देठी होत असे. जुन्या पिढीतील बायका शक्यतो काहीही वाया जाऊ देत नसत.म्हणूनच उरलेल्य्य देठांचा हा असा उपयोग केला जाई.हा प्रकार बहुधा कोकणातून आला असावा,कारण तेथे प्रत्येकाच्या परसात आळू असेच व घरात अठरा विश्वे दारिद्र्य त्यामुळे असे काहीतरी करून बायका काटकसरीने संसार करत असत.

गोव्याला खाल्ला होता हा प्रकार. तिथे अर्थातच त्यात खोबरे भरपूर असते.
मला वाटतं देठ उकडताना चिंच वापरलेली चांगली. त्याने खाज कमी होईल.

ज्यांचे घरी आळू आहे त्यांनीच करावी देठी. कारण आळूचे फतफते (पातळ भाजी)केली की उरलेली देठे वाया जाऊ नयेत या एकमेव उद्देशाने हे भरीत (देठी) केली जाते. मुद्दाम ती करायची म्हणून अजून तरी कुणी आळू आणल्याचे मी ऐकले नाही. हे म्हणजे नाल सापडला म्हणून घोडा घेतल्यासारखे होईल.