आमची विजयानगर बाग

Submitted by pltambe@yahoo.co.in on 9 April, 2014 - 01:18

आमची विजयानगर बाग
 बागेचे प्रवेशद्वार.jpg

जानेवारी २००० मध्ये केलेल्या कालबद्ध वैद्यकीय तपासणीचे अहवाल बघून आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला माझी रक्त-शर्करा पातळी व रक्त-दाब हे दोन्ही हळूहळू वाढत असल्याचे पाहून असा सल्ला दिला की जर तुम्हाला या दोन्हीही व्याधींना तुमचा ताबा घेण्यापासून लांब ठेवायचे असेल तर आता ताबडतोब तुम्हाला आहारात बदल करून काही पथ्ये पाळावी लागतील व त्याच बरोबर नियमित चालण्याचा व्यायामही सुरू करावा लागेल.
फॅमिली डॉक्टरांनी दिलेला सल्लावजा आदेश शिरोधार्य मानून दुसर्या् दिवसापासूनच आम्ही दोघांनी पहाटे उठून व्यायामासाठी सारस बागेत चालायला जायची सुरुवात केली. मात्र काही दिवसातच असे जाणवले की इतक्या भल्या पहाटेसुद्धा सारस बागेत व्यायामाला येणार्या् लोकाची एव्हढी प्रचंड गर्दी असे की २० फुट रुंदीचा जॉगिंग ट्रॅकसुद्धा अपुरा वाटत असे. त्यातही चालायचा व्यायाम करणारे काही लोक एव्हढे विक्षिप्त होते ट्रॅकवरून चालत असलेल्या इतरांना त्यांचा त्रास होत असे. काही लोक दोन्ही हात लांब खांद्यापर्यंत उचलून घेऊन व पसरून चालत असत, तर काही मिलटरीतील सैनिकांसारखे जोरात हात हलवित चालायचे, तर काही लोक एका हातात पोलिसांसारखी छडी गेऊन संगीत संयोजक जसे वाद्यवृदासमोर छडी हलवून त्यांना दिग्दर्शन करतो तसे चालत ,काहींचे चालणे याहून अगदीच वेगळे असे म्हणजे ते उलटे (म्हणजे मागे मागे पावले टाकत) चालत असत. भल्या पहाटेही मला तेथे माणसांच्या गर्दीमुळे तेथे माणसांचेच प्रदूषण जाणवू लागले व त्यात तेथे आशा विक्षिप्तपणे चालणार्या लोकांचा त्रासही खूपच होऊ लागल्याने अखेर डिसेंबर २००१ मध्ये आम्ही तेथे व्यायामासाठी जाणे नाइलाजाने बंद केले.
त्यानंतर आम्ही भिकारदास मारुती शेजारच्या व बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानात जायला लागलो. पण एक महिनासुद्धा पूर्ण होण्याच्या आताच आम्हाला पहाटे बाजीराव रोडवरून शिवाजीनगर व इतर ठिकाणी जाणार्याए बसच्या डिझेलचा धूर व बसचे हॉर्नचे आवाज ह्यांच्या प्रदूषणामुळे तेथे जाणे नकोसे झाले व एक महिन्याच्या आताच आम्ही ती बागही सोडून दिली व जानेवारी २००२ च्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही काही महिन्यापूर्वीच (ऑक्टोबर २००१) नव्याने सुरू झालेल्या या विजयानगरच्या बागेत व्यायामासाठी येऊ लागलो.

विजयानगरमधील ही बाग निलायम टॉकीज जवळ रहदारीच्या हमरस्त्यापासून थोडीशी आतील बाजूस आहे. बाग गोलाकार असून आकाराने छोटीच असली तरी या बागेत माणसांची गर्दी फारच तुरळक असते. त्यामुळे एकदम शांत वाटते. आवाजाचे किंवा हवेचे प्रदूषण कसलेही आजिबात नाही. येथील जॉगिंग ट्रॅक फक्त १० फुट रुंद असला तरीही माणसे कमी असल्याने प्रशस्त वाटतो. बागेत गर्द झाडी आहे त्यामुळे उन्हाचा ताप अजिबात जाणवत नाही. त्यामुळेच आज १२ वर्षे होऊनही आम्हाला येथे आले की रोज ताजेतवाने झाल्यासारखे व प्रसन्न वाटते,दिवसभर उत्साही वाटते व कंटाळा येत नाही. १२ वर्षे आम्ही नियमितपणे येथे येत असल्याने सहाजिकच या बागेविषयी आम्हाला एक प्रकारची आत्मीयता व प्रेम निर्माण झाले आहे. येथे बागेत आमच्यासारख्याच नियमितपाने येणार्याउ इतर काही लोकांच्या ओळखी पण झाल्या आहेत व गप्पाटप्पातून एकमेकांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
मला येथे अभिमानाने सांगावेसे वाटते की गेल्या दोन वर्षात पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने बागेचे नूतनीकरण व विकास करून त्यात सातत्याने बर्या च नव्या गोष्टींची भर घातली आहे, ज्यामुळे बागेचे सौंदर्य नक्कीच वृद्धिंगत झाले आहे. आज मी पुणे म.न.पा.ने केलेल्या विकास कार्याचा थोडक्यात परामर्श घेणार आहे.
बागेच्या मध्यभागी वर्तुळाकार स्टेजसारखा उंचवटा केला असून त्यात हिरवळ लावली आहे. ज्याचा उपयोग लहान मुलांना बागडण्यासाठी होतो,तर नव विवाहित ,मित्र-मैत्रिणी , अख्खे कुटुंब हिरवळीवर बसून गप्पागोष्टी करू शकते. आरोग्याला हितकर असल्याने सकाळी बरीच मंडळी या हिरवळीवर अनवाणी चालत असतात. सकाळी हिरवळीवर एका हास्य क्लबची मंडळी जमतात. काही तरुण –तरुणी सकाळी हिरवळीवर योगा किंवा प्राणायाम करतांना दिसतात. एक वर्षापूर्वी पुणे महानगर पालिकेने हिरवळीवर लहान मुलासाठी काही घसरगुंडी व इतर काही खेळणी बसवली आहेत. तर गतवर्षी हिरवळीच्या मध्यभागी वृद्धांसाठी अतिशय देखण्या अशा विरगुळा केंद्रासाठी एका शेडची उभारणी केली आहे. सकाळ संध्याकाळ ज्येष्ठ मंडळी येथे बसून आपसात सुख-दुःखाच्या गप्पा मारत बसलेली दिसतात.
तुम्ही बागेत प्रवेश केल्याबरोबर समोरच एक नयनरम्य धबधबा तुमचे लक्ष वेधून घेतो. तर तेथून जरासे पुढे जाऊन पायर्याब चढून तुम्ही बागेत प्रवेश करताच डाव्या बाजूला तुम्हाला उद्यान विभागाने नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची केलेली सोय पाहायला मिळेल.
काही महिन्यांपूर्वी बागेत ठिकठिकाणी अत्यंत सुंदर असे शोभेचे दिवे बसवले आहेत. तसेच जागोजागी कचरा कुड्याही बसवल्या आहेत.
त्याशिवाय नागरिकांना बागेत बसण्यासाठी जागोजागी आकर्षक अशी बाकेही बसवलेली आहेत. मात्र एकाच गोष्ट खटकते ती म्हणजे नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशातूनच जरी म.न.पा. अशा सर्व सुविधा पुरवत असली तरी या बाकांवर “चमको”गिरीची हौस पुरी करुण घेण्यासाठी नगरसेवकांनी या बाकांवरही स्वतःची नावे घातली आहेत.
गेल्याच आठवड्यात म.न.पा.ने बागेत हिरवळीवर एक मोठा भव्य असा पांढरा शुभ्र मोर व एक सुवर्ण गरुड बसवले आहेत व बागेतील बर्याकच झाडांवर रंगीत पोपट,बुलबुल असे पक्षी बसवले आहे व जॉगिंग ट्रॅकच्या मार्गावर ठिठिकाणी बगळे उभे केले आहेत. या सर्वाँमुळे बागेच्या शोभेत खचितच खूपच भर पडली आहे यात काही शंकाच नाही.
बघावे तेथे उधळमाधळ व भ्रष्टाचार करणार्या. पुणे म,न,प.ने अशी लोकोपयोगी व आवश्यक कामे केल्याचे पाहून वाटलेला आनंद शब्दात व्यक्त केळ्याखेरीज रहावेना म्हणूनच हा प्रपंच !
 विरंगुळा शेड xxx.jpg पक्षी १ xxx.jpg मोर xxx.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता बसा ! हा इतका छान लेख पाहून आणि फोटोज बघून लोकांची तुंबळ गर्दी तिकडे वाढणार मग तुम्हाला परत बाग बदलावी लागणार Sad Wink