दिलखुलास व्यक्तींमुळे रंगलेला दिलखुलास कार्यक्रम : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा

Submitted by अ. अ. जोशी on 5 April, 2014 - 09:28

कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा या वेळीही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाचे वर्ष स्पर्धेचे 5 वे वर्ष होते. यावर्षी प्रेम या विषयावर आधारीत कविता पाठवून महाराष्ट्रातील 104 कवी-कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व कवींनी पाठविलेल्या कवितांच्या काव्यलेखनाचे परीक्षण गझलकार श्री. दिपक करंदीकर, कवयित्री सौ. रश्मी तुळजापूरकर यांनी केले. त्यातील निवडक 22 कवींनी दिनांक 30 मार्च 2014 रोजी झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला. काव्यसादरीकरणाचे मुख्य परीक्षण कवयित्री श्रीमती जयश्री घुले आणि कवी श्री. सारंग भणगे यांनी केले. सहाय्यक सादरीकरण परीक्षकाच्या भूमिकेत जयश्री बापट, वीणा पुरोहित आणि निशिकांत गुमास्ते यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. सुजाता कर्वे आणि निवेदन विनोद केंजळे यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठान तसेच आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मी काव्यस्पर्धेची आवश्यकता, त्यामागील भूमिका आणि माझी आई कै. सुचेता जोशी यांची स्पर्धात्मक उपक्रमांना असलेली प्रेरणा विषद केली. कै. सुचेता जोशी या व्यवसायाने मान्यताप्राप्त वास्तुविषारद असूनही कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांकडे त्यांची असलेली ओढ यामुळेच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धेच्या आयोजनाची प्रेरणा मला मिळाली.

या काव्यस्पर्धेत सादरीकरणाच्या परीक्षणासाठी आम्ही नेहमीपेक्षा जरा वेगळी पद्धती वापरली. काव्यसादरीकरणाचे परीक्षण जयश्री घुले आणि सारंग भणगे यांनी नेहमीप्रमाणेच आमच्या फॉरमॅटप्रमाणे केले. मात्र, त्याना सहाय्यक असलेल्या वीणा पुरोहीत, जयश्री बापट आणि निशिकांत गुमास्ते यांनी कविता सादर झाल्याबरोबर सर्वांसमोरच आपले गुणांकन सादर केले. त्यासाठी त्यांना लाल वेष्टनातील, हिरव्या वेष्टनातील आणि वेष्टन नसलेला असे तीन प्रकारचे गुलाब वापरायचे होते. कविता उत्तम वाटल्यास लाल, बर्‍यापैकी वाटल्यास हिरवा आणि ठिकठाक वाटल्यास बिगर वेष्टनाचा गुलाब दर्शवून त्यांनी गूण दिले. एकूण गुणांकनासाठीही हे गूण गृहित धरण्यात आले.

गझलकार कविवर्य सुरेश भटांना आपले गुरू मानणारे गझलकार श्री. दिपक करंदीकर यांनी काव्यलेखनाच्या परीक्षणाचे विश्लेषण केले. प्रेम या विषयावरील अत्यंत सुंदर रचना स्पर्धेसाठी आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा प्रेमग्रंथ काढण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला.

कवी श्री. सारंग भणगे यांनी काव्यसादरीकरणाच्या परीक्षणाचे विश्लेषण केले. कोणतीही कविता सादर करताना ती पूर्वतयारीने सादर केल्यास अधिक रंगत आणू शकते तसेच, कविता सादर करताना अनावश्यक प्रस्तावना टाळल्यास कवितेकडे अधिक एकाग्रता राहू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.

अॅड. प्रमोद आडकर यांनी काव्यस्पर्धेच्या आयोजनाबद्दल अजय अनंत जोशी यांना धन्यवाद दिले. कवींनी अधिकाधिक कविता करण्याचा आणि त्यातूनच उत्तम कवी होण्याचा प्रेमळ सल्ला त्यांनी कवींना दिला. कवींनी काव्यरचना करीत रहाव्यात आणि काव्यविषयक कार्यक्रमांच्या आधारे काव्यमय वातावरण निर्माण व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. अ. रा. शहा यांना तर द्वितीय क्रमांक पुष्पप्रभा बोकील यांना मिळाला. उत्कृष्ट काव्यलेखनाचा पुरस्कार संजीवनी सरबी यांना, उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार राजश्री कोकाटे यांना, तसेच उत्तेजनार्थ क्रमांक ऋषिकेश ढवळे आणि मिनाक्षी नवले यांना मिळाला.

शेवटी अॅड. प्रमोद आडकर यांनी मांडलेल्या मुद्याचा आधार घेऊन कवींनी आपल्या कवितेच्या वह्या बंद न करता उत्तम कविता करण्याचा सराव अव्याहतपणे चालू ठेवावा या मी मांडलेल्या प्रस्तावाला सर्वांनीच अनुमोदन दिले. दिलखुलास व्यक्तींमुळे रंगलेला दिलखुलास कार्यक्रम असेच याचे वर्णन करावे लागेल.

Vijeta1A.jpg
डावीकडून अ‍ॅड. प्रमोद आडकर, विजेते कवी अ. रा. शहा, आणि मी
मागे काव्यलेखनाचे परीक्षक श्री दिपक करंदीकर आणि सौ रश्मी तुळजापूरकर

Photo10A.jpg
द्वितीय क्रमांक विजेत्या पुष्पप्रभा बोकील आणि श्री दिपक करंदीकर

Photo25A.jpg
डावीकडे सौ. रश्मी तुळजापूरकर आणि काव्यलेखन पुरस्कार विजेत्या संजीवनी सरबी

Photo4A.jpg
मी आणि काव्यसादरीकरणाचे परीक्षक सारंग भणगे

Photo18A.jpg
वयाच्या ७५व्या वर्षीही तितक्याच उत्कटतेने कविता सादर करताना सादरीकरणाच्या दुसर्‍या परीक्षक जयश्री घुले

Photo8A.jpg
काव्यमंचावरील हास्यविनोद आणि दिलखुलास वातावरण

Adkar.jpg
नेहमीप्रमाणेच आपल्या हुकमी आवाजात अ‍ॅड. प्रमोद आडकर - कविता करणे कधीही थांबवू नका....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन, पाचवे वर्ष म्हणजे छान गति घेतली आहे उपक्रमाने. शुभेच्छा !
इतर काही प्रताधिकार इ. मुद्दे नसतील तर निवडक कविता द्या ना इथे वाचायला.