पुणे-निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस

Submitted by पराग१२२६३ on 27 March, 2014 - 14:59

डिसेंबर २०१०मध्ये अचानक दिल्लीला जावे लागले. पुण्याहून दिल्लीला जाताना जेमतेम महिनाभर आधी आरक्षण मिळविणे हे एक दिव्यच असते. त्यामुळे पटकन आठ दिवसांच्या रजेसाठी अर्ज दिला आणि तो मंजूरही झाला. आता आरक्षण मिळविण्याची कसरत करायची होती. माझे पहिले प्राधान्य व्दितीय श्रेणीला असते. पण नेहमीच्या सुपरफास्ट गाड्या फूल होत्या. म्हणून पुणे निझामुद्दीन वातानुकुलित दुरंतोचा पर्याय निवडला. त्यातही एसी-३ ला वेटींग सुरू झाले होते. पण त्यावेळी या गाडीला इकॉनॉमी श्रेणी होती. म्हणजे गरीब रथचे पाच डबे होते. त्यात २००च्या जवळपास जागा शिल्लक होत्या. म्हणून नाईलाजाने त्या श्रेणीचे तिकीट आरक्षित केले. कारण नेहमीच्या एसी-३ पेक्षा यात १४ बर्थ जास्त असल्याने अडचणच असेल अशी माझी समजूत होती. ती खरी ठरली. मला जी-१मध्ये २२ क्रमांकाचा बर्थ मिळाला. बर्थ क्रमांकाच्या पुढे एसएल लिहिल्यामुळे भलताच खूष झालो होतो. कारण साईड लोअर बर्थ होता तो. पुढे प्रत्यक्ष गाडीत चढेपर्यंत मी सारखा हिशोब करत होतो की, २२ क्रमांक साईड लोअर कसा काय.
अखेर प्रवासाला निघण्याचा दिवस आला. मी पुणे जंक्शनवर पोहचलो, तेव्हा गाडी लागतच होती. तेवढ्यात एक आजोबा येऊन विचारून गेले की, या गाडीत तिकिटाच्या पैशातच जेवण, चहा नक्की मिळणार आहे ना. प्रवासभाडे केवळ १४०५ रुपये असल्याने त्यांना शंका आली होती. गाडी लागल्यावर माझ्या डब्यात साईड लोअर बाजू पाहत गेलो. पण माझा क्रमांक कुठेच नाही. म्हणून परत उलट्या बाजूने बघत आलो. नंतर साईड लोअर नाही, पण दुसऱ्या बाजूचा लोअर बर्थ मिळाला. जागेवर जाऊन बसलो तर बेडशीट, ब्लँकेट आणि उशी ठेवलेली होतीच. वातानुकुलित डब्यातून, इतक्या वेगवान गाडीतून, राजधानी दर्जाच्या गाडीतून, माझ्या आवडत्या मार्गावरून आणि इतकेच नव्हे तर आपण सूचविलेल्या मार्गावरून धावणाऱ्या गाडीतून माझा पहिलाच प्रवास होता. म्हणूनच खूप एक्साईटमेंट होती.
सकाळी ठीक ११.१० वाजता आमची २२६३ (तेव्हाचा क्रमांक) दुरंतो एक्सप्रेस सुटली. पुण्याहून बडोद्यापर्यंत या गाडीचे नेतृत्व एलएचबी राजधानीप्रमाणे रंगविलेल्या वलसाडच्या डब्ल्यूसीएएम-२पी कडे होते. माझा डबा शेवटून दुसरा होता. माझ्या बाजूच्या अन्य बर्थवर व्हिएतनामी व्यक्ती होत्या. त्यांची रात्रीपर्यंत अखंड बडबड चालू होती. अर्थातच ती कोणालाच समजत नव्हती. गाडी हळुहळू वेग पकडत होती आणि सर्व प्रवाशांना पाण्याची बाटली दिली जाऊ लागली. ११.४० मिनिटांनी तळेगाव ओलांडत असतानाच ब्रेड-स्टिक, बटर आणि लोणावळ्याजवळ गरमागरम टोमॅटो सूप (मीठ, मिरीच्या सॅशेसह) आले. माझ्या समोरच्या बर्थवर एक तरुण बसला होता. पुण्याहून गाडी सुटल्यापासून बडोद्यापर्यंत त्याचे फोनवर बोलणे सुरू होते. त्याने आधी पुरवलेली पाण्याची बाटली ठेऊन घेतली, पण सूप वगैरे आल्यावर त्याने अटेंडंटला सांगितले की, मला हे नको आहे. त्याला वाटले की, याचे पैसे द्यावे लागणार आहेत. पण शेजारच्या प्रवाशांनी त्याची शंका दूर केल्यावर काही क्षण बंद असलेला फोन पुन्हा सुरू झाला. त्याला कोणाला तरी तो या गाडीतील फ्री देण्यात येणाऱ्या पाणी आणि अन्य गोष्टींबाबत सांगायचे होते. त्याच्या एकंदर संवादावरून वाटत होते की, तो हे सर्व त्याच्या मैत्रिणीला सांगत आहे.
बारा पाचला लोणावळ्यात गाडी पोहचली. येथून मुंबई विभाग आणि घाट सुरू होत असल्याने गाडी अर्धा मिनिट थांबून कॉशन ऑर्डर घेतल्यावर गाडी पुढे निघाली. मी विरुद्ध बाजूला असल्याने दुसरी लाईन मला दिसत नव्हती. दरम्यान कर्जतही गेले आणि जेवण आले. पोळी-भाजी-आमटी-भात, सॅलड, लोणचे आणि दही असा मेनू. जेवण चांगले होते. दीड वाजता कल्याण ओलांडले. त्याचवेळी कर्जत/मनमाडच्या दिशेने एक कंटेनरची मालगाडी निघून गेली. डोंबिवलीनंतर एक मोठे रिंगण पार करत गाडी पुन्हा डोंबिवलीच्या वरच्या बाजूला आली. तेथे पूल ओलांडून कोपरही क्रॉस केले. थोड्याच वेळात वसई रोडहून आलेली बीटीपीएन (टँकर) मालगाडी धडधडत दिव्याकडे निघून गेली. थोड्याच वेळात भिवंडी रोड आले. तेथे दोन मालगाड्या डिटेन केलेल्या दिसल्या. कामण रोडलाही एक बीएलसी (कंटेनर) गाडी दिव्याच्या दिशेने क्रॉस झाली. मुंबई, जेएनपीटी बंदरांना उत्तर भारताशी जोडणारा हा मार्ग असल्यामुळे आता मालगाड्यांची वर्दळ वाढली होती.
दुपारी २.२० ला आमची दुरंतो वसई रोड जंक्शनवर दाखल झाली आणि इथून पुढे माझा सर्वांत आवडता मार्ग सुरू होणार होता. इथून बडोद्यापर्यंत ॲटोमॅटीक सिग्नलिंग यंत्रणा आहे. वसई रोडला चालक आणि गार्ड बदलले गेले. ही गाडी राजधानी दर्जाची असल्यामुळे तिचे चालक आणि गार्ड उच्च प्रशिक्षित आणि मोठा अनुभवी असलेले असतात. इथून पुढे विभागही बदलत असल्याने पुन्हा कॉशन ऑर्डर घेणेही आवश्यक असते. वसई रोडवर या घडामोडी सुरू असताना २२ डब्यांची वांद्रे (ट)हून जोधपूर जं.ला जाणारी २४८० सूर्यनगरी माझ्या शेजारच्या मार्गावरून पुढे गेली. त्यानंतर दहा मिनिटांनी - १४.३५ ला आमची दुरंतो सुटली आणि प्रवाशांनी लगेच आपापले बर्थ आडवे करून दुपारची झोप घेतली. काही वेळातच वसईची खाडी ओलांडली आणि वैतरणा नदीही ओलांडली. हा राजधानीचा म्हणजेच गृप बीचा मार्ग असल्याने आमच्या गाडीनेही आता चांगलाच वेग धरायला सुरुवात केली होती. ती आता ताशी १२० कि.मी.च्या वेगाने धावू लागली होती. पुणे-वसई मार्गावर इतका वेग नसतो. पुढे शेजारील अप मार्गावरून अनेक गाड्या वसई रोडच्या दिशेने जात होत्याच. साधारण तासाभराने घोलवड ओलांडले. हे महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक. सव्वाचारला वलसाड ओलांडले, त्यावेळी एका फलाटावर वलसाड-वांद्रे (ट) पॅसेंजर निघायची तयारी करत होती. साडेचारला सायंकाळचा चहा आला. झोपलेल्या साऱ्या प्रवाशांना अटेंडंटने उठवले. चहाबरोबर नाश्ताही आला. त्यात फृट ज्यूस, २ चॉकलेटस्, लाडू, सामोसा, सँडविच, सॉस यांचा समावेश होता. चहा/कॉफीचे वेगळे कीट होते. हे देत असतानाच अटेंडंटने सर्वांना चहा/कॉफीच्या कपात साखर, मिल्क पावडर आदींची तयारी करून ठेवण्यास सांगितले आणि थोड्या वेळानेच त्यात मिसळण्यासाठी गरम पाणी दिले गेले. दुरंतो वेगात पळत असताना या सर्वांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच होती. १६.२३ला डुंगरी स्थानक वेगाने ओलांडल्यावर लगेचच विरुध्द दिशेने बीओएक्सएन (कोळशाच्या वाहतुकीचे) वाघिणींची मालगाडी वसईकडे गेली. पाठोपाठ आणखी एक मालगाडी (कंटेनर) गेली.
१७.०५. गाडीचा वेग किंचित कमी झाला. कारण सुरत आले होते. येथे गाडी थांबत नाही, पण या स्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने वेग थोडा कमी करावा लागतो. त्याचवेळी कंटेनरची मालगाडी विरुध्द दिशेने सुरत ओलांडत होती. त्याचवेळी तापी नदीचे विस्तृत पात्रही ओलांडले. भारतीय व्दीपकल्पातील पश्चिमवाहिनी नद्यांपैकी ही एक महत्त्वाची नदी. पुढे १७.३३ वाजता पानोली स्थानकाजवळ ९०५४ वाराणसी सुरत एक्सप्रेस क्रॉस झाली. त्या आधी दोन मालगाड्या क्रॉस झाल्या होत्याच. भारतीय रेल्वेच्या यंत्रणेवरील सर्वांत जास्त वर्दळ असलेला हा एक मार्ग आहे. १७.५०ला भडोच जं. क्रॉस केले आणि त्याच्याजवळच भारतीय व्दीपकल्पातील पश्चिमवाहिनी नद्यांमधील सर्वांत मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. येथे या नदीचे पात्र इतके विस्तृत आहे की, ती खाडीच वाटावी. आता सूर्यास्त झाल्यामुळे अंधार पडू लागला होता. सायंकाळी १८.३५ वाजता बडोद्यात गाडी पोहचली. दुरंतोच्या प्रवासातील हा पहिला सर्वांत मोठा थांबा आहे. अलीकडेपर्यंत येथे या गाडीचे इंजिन बदलले जात असे, वलसाडच्या डब्ल्यूसीएएम-२पीची जागा गाझियाबादचे डब्ल्यूएपी-७ घेत असे. येथे चालक आणि गार्डही बदलले जातात आणि पुन्हा नव्याने कॉशन ऑर्डर दिल्या जातात. एकीकडे हे होत असतानाच रात्रीचे जेवण गाडीत चढविले जाते. या सर्व घडामोडी पूर्ण झाल्यावर आमची दुरंतो १८.५०ला बडोद्यातून निघाली. थोड्याच वेळात रात्रीच्या जेवणाआधीचा अल्पोपहार आला, ब्रेड-स्टिक, बटर, सूप (मीठ, मिरीच्या सॅशेसह). आता बाहेर अंधार असल्याने, वातानुकुलित गाडीमुळे खिडक्या बंद असल्याने बाहेरचे फारसे दिसत नव्हते.
पुण्यापासून बडोद्यापर्यंत सतत फोनवर बोलणाऱ्या त्या तरुणाला पलीकडून विचारणा झाली. अमूकएक सीरियल आज पाहिलीस काॽ पाहतो हं असे म्हणत त्याने आता फोन बंद केला आणि लॅपटॉप काढून त्यावर तो ती सीरियल पाहू लागला. दरम्यान १९.४५ वाजता गोधरा जं. गेले. त्यानंतर काही वेळातच ९०३८ गोरखपूर वांद्रे (ट) अवध एक्सप्रेस गोधऱ्याच्या दिशेने गेली. रात्री सव्वाआठच्या सुमारास रात्रीचे जेवण आले. दुपारच्या जेवणातील दह्याऐवजी आता आईसक्रीम आले होते. बाकी मेनू तोच. जेवण आटपल्यावर सारे जण झोपी गेले. पण त्याआधीच अटेंडंट टीप मागायला येऊन गेला. मला एसीतून प्रवासाची सवय नसल्याने मीही आता चांगलाच गारठू लागलो होतो. पुढे २२.१०ला रतलामला पाच मिनिटांचा टेक्निकल हॉल्ट घेऊन, चालक, गार्ड बदलून, कॉशन ऑर्डर घेऊन आमची दुरंतो दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. रतलाम स्थानकातच एका मालगाडीचे काही डबे घसरले होते. ते पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. मात्र ही घटना यार्डात घटली असल्याने इतर वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नव्हता.
पुढे मजल-दरमजल करत वाटेत येणाऱ्या काही रेल्वेगाड्यांना ओलांडत आमची दुरंतो मध्यरात्री ठीक एक वाजता कोट्याला पोहचली. वेळेच्या आधीच दहा मिनिटे आल्याने ती पुढे अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली. येथे पुन्हा चालक आणि गार्ड बदलले गेले. आमची दुरंतो प्लॅटफॉर्म क्र.१ वर उभी होती, तर पलीकडच्या लाईनवर एक बीओएक्सएन (कोळशाची) मालगाडी उभी होती. मध्यरात्री एक वाजता आणि कडाक्याच्या थंडीत प्लॅटफार्मवर होणारी तुरळक हालचाल मला दिसत होती. ठीक दीड वाजता आमची दुरंतो आणि शेजारची मालगाडी विरुद्ध दिशांनी एकाचवेळी सुटल्या. त्याआधी कोट्यात २९६३ ह. निजामुद्दीन उदयपूर सिटी मेवाड एक्सप्रेस आली होती. पहाटे २.३५ला सवाई माधोपूर जं., ४.००वाजता बयाणा जं., साडेचारनंतर भरतपूर जं. क्रॉस करत पाचला गाडी मथुऱ्यात आली. इथून पुढे गृप ए मार्ग सुरू होत असल्यामुळे दुरंतोचा वेग ताशी १३० कि.मी.पर्यंत गेला. या मार्गावरून ताशी १६० कि.मी. वेगाने गाडी जाऊ शकते. पण पुणे-निजामुद्दीन दुरंतोला अजून राजधानीचे जुने डबेच जोडले जात असल्यामुळे त्याच्या वेगावर मर्यादा आहेत. दिल्ली जवळ येऊ लागल्याने पावणेसहाच्या आसपास पँट्री सेवकांची लगबग सुरू होती. सगळ्यांना उठवत त्यांनी चहाचे कीट आणि बिस्किटे दिली आणि थोड्या वेळाने गरम पाणीही दिले. काही वेळातच ठीक साडेसहा वाजता आमची दुरंतो ह. निजामुद्दीनला पोहचली.
डिसेंबर असल्यामुळे बाहेर प्रचंड थंडी होती. दिल्लीच्या थंडीचा तो पहिलाच अनुभव होता. एवढ्या थंडीची सवयच नव्हती. त्यामुळे पुन्हा चहा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. चहा घेऊन बाहेर पडत असतानाच दक्षिण आशियातील सर्वांत वेगवान गाडी अशी ओळख असलेली नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेस धडाडत गेली. तोही एक अविस्मरणीय अनुभव होता. एकूण प्रवासच एक्साईटिंग होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या
गाडीच्या इकॉनामी क्लासच्या साईड स्लीपर मध्ये काय फरक होता ?मागच्या
कोयना लेखात ती गाडी कोल्हापूर-पुणे एकेरी रुळावर असल्यामुळे क्रॉसिंगला
सर्व गाड्या आणि इंजिने नीट पाहाता आली ."दुरांतोचे मोटारमेन खास
प्रशिक्षित असतात "हे कशावरून ठरवलेत ?फारतर असे म्हटता येईल की जरा जास्त
सिनिअर असतात .ज्या मार्गावर वाहतूक कमी आहे ,अरण्य आहे ,वळणे फार आहेत
तिकडे प्राणी येतात रुळावर तिथे जास्त लक्ष ठेवावे लागते .मुंबई
-वडोदरा-रतलाम-कोटा-मथुरा हा जास्त वाहतुकीचा घाट नसलेला जुना मार्ग आहे
.इकडे सिग्नल यंत्रणा आणि वेळापत्रकच महत्त्वाचे आहे मोटारमेनपेक्षा .
दुरांतो गाडी ह०निजा० ला जाते पण राजधानी गाड्या नवी दिल्लीला जातात
.केरळमध्ये तिरु०पुरम च्या अगोदरचे कोशुवेली गैरसोयीचे आहे .पुढेमागे
पुण्याच्या गाड्या घोरपडी /दापोडी ला संपवतील .

पराग,

मस्त वर्णन. पुण्याहून साडेतीन तासांत वसई म्हणजे चांगली हाणली गाडी! Happy नर्मदेचा पूल खरोखर खूप मोठा आहे. तब्बल १३ कमानी आहेत. तुम्ही म्हणता तशी खाडी पुलाखालीच आहे.

होकार गृहीत धरून थोडी दुरुस्ती सुचवतो. महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक बोर्डी रोड आहे. मला आठवतं त्याप्रमाणे त्यास फलाट नाही. दुसरं असं की वसईची खाडी भाईंदर आणि नायगाव यांच्या मध्ये उल्हास नदीची आहे. ती नदी तुम्ही कोपर आणि भिवंडी यांच्या मध्ये ओलांडली. Happy चूभूदेघे.

आ.न.,
-गा.पै.

रेल्वेमध्येच नोकरी करता कां? वर्णनावरून वाटले तसे.

छान वर्णन. मी मुंबई-दिल्ली राजधानीची नेहमीची (?) प्रवासी असल्याने डिटेल्स वाचायला जरा जास्तच आवडले.

कर्मचारी टीप मागायला रात्रीच का आलेले म्हणे? दिल्लीच्या आसपास आल्यावर त्यांचं हे काम सुरु होतं, मुखवासाचा ट्रे आला की समजायचं. Wink असो, पण मला भन्नाट आवडते राजधानी. उसकी शान कुछ और ही है.

मस्त लिहिलय !!!
एव्हडे बारीक सारिक तपशील कसे ठेवता ? प्रवासात नोट्स काढता का काय ?
राजधानीमधलं खाणं हा एक स्वतंत्र लेखाचा / चर्चेचा विषय आहे. Happy

सुरेख आहे. तपशील असूनही कोरडं वर्णन वाटत नाहीये, प्रवासाचा जलद चित्रपट सरकून जातोय डोळ्यांसमोर.
आता माझा रेल्वे प्रवास कमी झालाय पण पूर्वी राजधानी शताब्दी प्रवास अप्रूपाचा होता. लखनौ - दिल्ली शताब्दी ( प्रायोगिक तत्त्वावर नॉर्वे का कुठल्या देशाच्या बांधणीचे डबे होते ह्या गाडीला म्हणे), दिल्ली -भोपाळ शताब्दी, दिल्ली -कालका शताब्दी, लोकमान्य टिळक- मडगांव जनशताब्दी अशा चकाचक गाड्यांतून खातपित प्रवास करताना मजा यायची.
राजधान्याही खूप चांगल्या होत्या पण 'क्वीन' म्हणावी अशी एकच ती लालचुटूक अद्ययावत डब्यांची नवी दिल्ली- मुंबई राजधानी. त्यावेळी हॅरी पॉटरचे पुस्तक नुकते आले होते आणि मला ही राजधानी हॉगवार्ट्स एक्सप्रेससारखीच वाटायची Happy

मस्त लेख. Happy

आता पुणे - निझामुद्दिन दुरोंतोला इकनॉमी एसी स्लीपर नाहीत.
मात्र या गाडीला अजूनही जुने आयसीएफ डबे लावले जातात Sad नुकताच डिसेंबरात या गाडीनं प्रवास केला. द्वितीय श्रेणी (वातानुकुलित) डबा अतिशय जुना होता. बहुतेक सगळ्या राजधान्या, दुरोंतो आणि इतर काही पुरुषोत्तम, केरळ, तामीळनाडू अशा एक्स्प्रेस गाड्या नव्या एलएचबी कोचांसह धावत असताना हीच एक गाडी काय ती जुने डबे घेऊन धावते. काही डबे लाल, काही हिरवे, काही निळे आणि एखादा नवा एलएचबी डबा. रेलफॅन्स हिला 'क्वीन ऑफ मिसमॅच' म्हणतात.
जानेवारीपासून पुण्यापासूनच गाझियाबादचे वॅप-७ हे इंजिन असते. पण कधीतरी वॅप-५ किंवा वॅप-२सुद्धा लावतात.
वडोदरा स्थानकावर गाडीत चढणारं जेवण मात्र अतिशय वाईट. या गाडीच्या स्वच्छतेची आणि जेवणाची जबाबदारी ज्या कंत्राटदाराकडे आहे, तो कंत्राटदार एक मार्चपासून बदलला. तेव्हा परिस्थिती सुधारली असावी, अशी आशा आहे.

Srd,
काही राजधान्या ह. निजामुद्दिनपर्यंतच जातात.

एक प्रश्न :अशा भारी गाडीतून उतरल्यावर रिक्षावाले कापण्यासाठीचे गिऱ्हाईक आले म्हणून वाट पाहात असतात का ?

प्रवास वर्णन व सर्व तपशील फार आवडले. कुठेही कंटाळवाणे झाले नाही. इतके सगळे तपशील कसे मिळाले ह्याची उत्सुकता आहे.

srd, दिल्लीला उतरलात तर तिथे कोणत्याही गाडीतून उतरा असतातच कापायला बसलेले. अजिबात नाही आवडत मला दिल्ली. Angry केव्हा एकदा दिल्लीहून पुढे निघतोय असं होतं.

इतक डिटेल कसं लक्षात राहत.?
छान लिहिलय. Happy

मी एक ब्लॉग वाचलेला, आता त्याची लिन्क सापडत नाहिये.
पण त्या व्यक्तीने बाय रोड प्रवास केलेला.
नागपुर ते पुणे अथवा नागपुर ते मुंबई.
स्वतःची कार घेवुन.
त्यावेळी वाटेत भेटलेल्या एसटीचे फोटो आणि त्याचं सर्कल कोणते, मेक काय इत्यादी डिटेल सहीत.
ते वाचताना देखील मजा आली होती. तुमचा लेख वाचुन त्या लेखांची आठवण झाली. Happy

मस्त लेख...

एकदा असा रेल्वेचा पूर्ण प्रवास लिहून काढायला पाहिजे....

सुरेख प्रवास वर्णन... इतकं डिटेल लिहिलंत, म्हणजे प्रवासात अधून मधून नोंदी करत होतात का? नश्त्याला वगैरे काय होतं ते ही चांगलंच लक्षात ठेवलंत. बाकी शेजारून धडधडत जाणार्‍या गाड्याची नावं तुम्हाला कशी वाचता आली?

माझ्या वर्णनावरील प्रतिक्रियांबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. लिहिताना एखाद-दुसरे वाक्य पुढे-मागे झाले असेल कदाचित. पण तीही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी रेल्वेत नोकरीला नाही. पण रेल्वे हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने प्रवास कायम रेल्वेनेच करतो आणि त्यादरम्यान नोंदी काढत असतो. वरील वर्णनात आणखी तपशील घालून ते वाढविता आले असते. पण त्यामुळे ते खूपच लांबलचक झाले असते.
मुंबई-दिल्ली राजधानीनं प्रवास करण्याचे माझे स्वप्न आहे. पण आजपर्यंत या ना त्या कारणानं तीन वेळा आरक्षण रद्द करावे लागले आहे. ती मला एक आवडणारी पण दगा देणारी गाडी आहे.