मीरा बडवे यांचे "टीम निवांत" वाचायला घेतले फक्त प्रस्तावनाच वाचली आणि मी भाराऊन गेले.निवांत अंध मुक्त विकासालय या शाळेच्या पलीकडच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी रचल्या गेलेल्या विलक्षण प्रयोगाची सकारात्मक गाथा.बडवे कुटुंबाच्या घराचा निवांत टीमपर्यंत झालेला जीवन प्रवास.पुस्तक पूर्ण वाचल्यावर परिचय लिहायलाच हवा.अपंग दिनी बडवे कुटुंबियांच्या कार्याला डोळस माणसानाही शिकवणा-या त्यांच्या चमूला सलाम.मला राहून राहून आज विजय कुदळेची आठवण येते.त्याच्यापर्यंत हे पोचवायला हव.
अपंग दिनानिमित्त त्याची ही कहाणी. १० वर्षापूर्वी केसरी या वृत्तपत्रात लिहिलेली.
"थेल्मा काळे वर्गावर राउंड मारून आल्या तर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहात होते.रोज प्रत्येक वर्गावर कडक शब्दात कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्याना सुनावणा-या अशा एकाएकी हळव्या का झाल्या? मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.
सेंट हिल्डाजमध्ये वार्षिक परिक्षेचे केंद्र होते.आणि थेल्मा काळे तिथल्या स्थानिक वरिष्ठ पर्यवेक्षिका होत्या.माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहिल्यावर त्या म्हणाल्या,'ही धडधाकट मुले आणि कॉपी करतात.तो अंध विद्यार्थी पहा कसा रायटरला धडाधडा उत्तरे सांगतो आहे.त्याला शिकायची इतकी तळमळ आहे,तर वाचता येत नाही.आणि हे विद्यार्थी डोळे असून न वाचता येतात आणि कॉपी करून पास होऊ पहातात'.थेल्माच चिडण रास्त होता आणि हळवं होणही.विजय कुद्ळेकडे पाहिल्यावर त्याच्या वर्गात असणार्या प्रत्येक सुपरवायझरची अशीच भावना व्हायची.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मुक्ताविद्याकेंद्र सुरु झाल्यापासून प्रत्येक वर्षी एकना एक अंध विद्यार्थी असतोच.परिक्षेच्यावेळी या विद्यार्थ्याना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.रायटर घेण्याची परवानगी दिली जाते.अंतर्गत मुल्यामापनात सुट दिली जाते.काहीजण अभासक्रम अर्धवट सोडतात.काही थोडे विषय सोडवत अभ्यासक्रम पूर्ण करतात.अनेक गोष्टी दुसर्यावर अवलंबून असल्याने पदवीधर होणे ही सर्वसामान्य वाटणारी बाब अंधांसाठी खडतर बनते.विजय माझ्या संपर्कात आल्याने हीखडतरता मला लक्षात आली.
प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यावर पुस्तक वाचून दाखवायला कोणी मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.परंतु तसे कोणी उपलब्ध झाले नाही. मुक्ताविद्याकेंद्राने प्रथम वर्षाच्या सर्व विषयाच्या श्राव्यफिती तयार केल्या होत्या पण कुद्ळेची परिस्थिती त्या विकत घेण्याएवढी नव्हती.त्याला वडील नव्हते. आई चतुर्थश्रेणीकर्मचारी.परत देण्याच्या बोलीवर त्याला श्राव्यफिती द्यायचे ठरले. पण त्याला लावायला टेपरेकॉर्डर हावा त्याचे काय?शेवटी परिक्षेच्या काही दिवस आधी त्याच्या आईने हप्त्यावर टेपरेकॉर्डर आणला.श्राव्यफिती ऐकून ऐकून विजयने अभ्यास केला.त्याचे सर्व विषय तोंडपाठ झाले होते.विज्ञान आणि समाज या पेपरच्या दिवशी वीज गेल्यामुळे त्याला केसेट ऐकताच आल्या नाहीत.म्हणून तो थोडा उदास होता.परंतु तो सर्व विषयात पास झाला.त्याचा रायटर असलेल्या मानेने प्रथम वर्षास प्रवेश घेतला..
प्रत्येक वर्षी कुदळेचा रायटर वेगळा होता.प्रत्येकानी पुढील वर्षी मुक्तामध्ये प्रवेश घेतला.डोळसानी अंधाकडून प्रेरणा घेतली होती.
प्रथम वर्षानंतर विजयचा आत्मविश्वास वाढला.आता त्याच्याकडे टेपरेकॉर्डर होता.द्वितीय वर्षाला त्यांनी प्रथमपासून अभ्यास केला होता सुरुवातीपासून कॅसेट ऐकल्या.त्यामुळे ते वर्ष सहज पार पडले.तृतीय वर्षात मात्र संज्ञापनकौशल्य, आणि विशिष्ट सामाजिक प्रश्नांचा अभ्यास या दोनच विषयाच्या कॅसेट होत्या.त्याने विशेष विषय म्हणून निवडलेल्या राज्यशास्त्राच्या नव्हत्या.मग राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका सुमित्रा काकडे, प्रतिभा मुडगेरीकर,शुभदा चांदवले यांनी विद्यापीठाच्या टेपरेकॉर्डरवर खास त्याच्यासाठी जेंव्हा फारसा आवाज नसतो अशी वेळ पाहून व्याख्यान रेकॉर्ड केले.प्राध्यापकांचे सहकार्य आणि विजयचे कष्ट याला फळ आले. तो हायर सेकण्डक्लास मिळून पदवीधर झाला.त्याला महानगरपालिकेत नोकरीही मिळाली.
पदवीधरांच्या स्नेहमेळाव्यास तो आला होता.बरोबर त्याची आईही आली होती.आकाशवाणीच्या तत्कालीन संचालिका उष:प्रभा पागे आणि साहित्यिक शरणकुमार लिंबाळे प्रमुख पाहुणे होते विजयचा सत्कार करण्यात आला.त्याच्या आईलाही स्टेजवर बोलावले होते.तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.निमंत्रित पाहुणे प्रेक्षक सर्वांनाच गहिवरून आले. खणखणीत आवाजात विजयने आपले मनोगत व्यक्त केले.त्यानेच केलेल्या दृष्टी या कावितेने भाषणाचा शेवट केला.
सुयोग्य दृष्टी प्रखर ज्ञान
टि.म.वि.चा मंत्र महान
अध्ययन पद्धती आहे छान
लोकशाहीची खरीखुरीजाण
टि.म.वि.ने आम्हाला केले सज्ञान
विजय कुडळे गातो गान
टि.म.वि.स करितो प्रणाम.
विजयला पुढे एम.ए. करायचे होते.टि.म.वि. मधेच तो प्रवेश घेणार होता.राज्यशास्त्राच्या माधाळेसरांनी त्याला मदत करायचे कबुल केले.अंधत्वावर मात करायची दृष्टी असल्याने तो येथेही यशस्वी होईल यात शंका नाही"
___________________________________________________
मी निवृत्त झाल्यावर त्याचा संपर्क राहिला नाही. कुठे असेल? कसा असेल? माहित नाही.त्याच्याशी संपर्काचे साधन नाही.कुठेही असलास तरी विजय तुला अपंग दिनासाठी तुझ्या स्वप्नांसाठी शुभेच्छा.
(केसरीने छापावयास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.)
शोभनाताई, छान
शोभनाताई,
छान लिहिलंय!
येणार्या काही वर्शामध्ये विजयसारख्या अंधांना 'बायॅानिक् आय' द्वारे दिसू लागेल़!
http://m.huffpost.com/us/entry/3187732
शोभनाताई.... निवांत पाटील
शोभनाताई....
निवांत पाटील यानी भूमिती विषयावरील तयार केलेली मॉडेल्स तुम्ही मान्य केली असतीलच. ती मॉडेल्स निवांतच्या कल्पक शक्तीला दाद देण्याच्या योग्यतेची आहेतच.
डॉ.सुरेश शिंदे यांचे इथले सदस्यत्व आणि त्याद्वारे ते देत असलेली माहिती अत्यंत प्रेरणादायी अशीच असते. आज त्यानी वरच्या लिंकद्वारे दिलेली "बायॉनिक आय" ची माहिती मी वाचली. त्यावरील व्हिडिओही पाहिले. आज हा प्रयोग कॅलिफोर्निया इथे झाला असल्याने भारतात तो केव्हा सुरू होईल याची माहिती डॉ.शिंदे देतीलच. तरीही लेख वाचताना एकदोन शंका आल्या आहेत, त्याविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभेल अशी आशा आहे :
१. माहितीत उल्लेख आहे की Retinitis Pigmentosa या कारणास्तव जर आंधळेपण आले असेल तर डॉ.मार्क ह्यूमेन यांचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. विजय कुदळे यांच्या अंधत्वाची फाईल तपासणे आलेच या मुळे.
२. Argus II पद्धतीचा वापर करून व्हिडिओ प्रोसेसर कार्यरत केला जातो असे लिहिले आहे. It does not restore sight completely असे म्हटले असले तरी अंध व्यक्ती रंगसंगती, मोठी अक्षरे ओळखी शकतो.... आणि ही कमाई अंधासाठी निश्चित्तच उपयुक्त होईल.
३. अंधत्व अपघाताने आले असले तरच ही उपाययोजना यशस्वी होऊ शकते का ? हा प्रश्न मनी आला आहे. जन्मजात अंधत्व असेल तर या योजनेचा काही उपयोग होऊ शकेल किंवा नाही या विषयी लेखात काही दिसले नाही.
३. टि.म.वि. च्या टीमने या लिंकचा अभ्यास केल्यास विद्यापीठ पातळीवर जास्त शक्यता अजमावता येईल असे वाटते.
डॉक्टर धन्यवाद तुम्ही अमेरिका
डॉक्टर धन्यवाद तुम्ही अमेरिका ट्रिपमध्ये अस्तानाही आवर्जून लेख वाचला.आणि आशादायी लिंकही पाठवलित.लोकशिक्षणाची तळ्मळ असलेली व्यक्तीच हे करु शकते.
अशोक, तुमचा प्रतिसाद पाहिला की लिहिल्याच सार्थक झाल्यासारख वाटत.तुमच्या शन्कांच उत्तर डॉक्टर देतिलच.टि.म.वि.च्या कुलसचिवाना लिन्क पाठविन.
ती मॉडेल्स निवांतच्या कल्पक
ती मॉडेल्स निवांतच्या कल्पक शक्तीला दाद देण्याच्या योग्यतेची आहेतच.>>>> ही मॉडेल्स माझ्या वडीलांनी साधरण पणे १९९० मध्ये बनवली आहेत (त्यामुळे कल्पनाशक्ती त्यांची). ते हायस्कुल मध्ये गणित / भुमिती शिकवायचे. ते करण्यामागे त्यांचा विअचार असा होता कि जर मॉडेल मुलांनी बघितले तर ती आकृती त्यांना काढता येइल व ते प्रमेय त्यांच्या लक्षात राहतील.
फक्त हा लेख वाचल्यावर याचा इथेही वापर होउ शकतो हे फक्त माझ्या लक्षात आले.
अॅक्चुअली इथे टायपायचा त्रास
अॅक्चुअली इथे टायपायचा त्रास कमी करण्यासाठी कागदावर उतरुन टाकतो आहे.
वरील प्रमेय समजाउन सांगण्याकरिता लागणार्या मॉडेलचा छोटा फोटो त्यातच खाली दिला आहे. अंध मुलास तोंडी समजावुन सांगतानाच जर हे हातात अश्या प्रकारचे मॉडेल मिळाले तर त्याला समजण्यास खुप मदत होइल असे मला वाटले. वर दिलेल्या प्रमाणेच त्या गृप फोटो मध्ये असणारे प्रत्येक मॉडेल एखादा सिद्धांत / किंवा एखादा क्न्सेप्ट समजावुन सांगणारे आहे.
(सध्या माझ्याकडे पुस्तक नसलेले, स्मरणशक्तीवर अवलंबुन लिहले आहे आणि त्यात एक चुकही झाले आहे. please read MA instead of AM)
Pages