अंधत्वावर मात करणारी दृष्टी

Submitted by शोभनाताई on 21 March, 2014 - 04:53

मीरा बडवे यांचे "टीम निवांत" वाचायला घेतले फक्त प्रस्तावनाच वाचली आणि मी भाराऊन गेले.निवांत अंध मुक्त विकासालय या शाळेच्या पलीकडच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी रचल्या गेलेल्या विलक्षण प्रयोगाची सकारात्मक गाथा.बडवे कुटुंबाच्या घराचा निवांत टीमपर्यंत झालेला जीवन प्रवास.पुस्तक पूर्ण वाचल्यावर परिचय लिहायलाच हवा.अपंग दिनी बडवे कुटुंबियांच्या कार्याला डोळस माणसानाही शिकवणा-या त्यांच्या चमूला सलाम.मला राहून राहून आज विजय कुदळेची आठवण येते.त्याच्यापर्यंत हे पोचवायला हव.
अपंग दिनानिमित्त त्याची ही कहाणी. १० वर्षापूर्वी केसरी या वृत्तपत्रात लिहिलेली.

"थेल्मा काळे वर्गावर राउंड मारून आल्या तर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहात होते.रोज प्रत्येक वर्गावर कडक शब्दात कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्याना सुनावणा-या अशा एकाएकी हळव्या का झाल्या? मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.

सेंट हिल्डाजमध्ये वार्षिक परिक्षेचे केंद्र होते.आणि थेल्मा काळे तिथल्या स्थानिक वरिष्ठ पर्यवेक्षिका होत्या.माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहिल्यावर त्या म्हणाल्या,'ही धडधाकट मुले आणि कॉपी करतात.तो अंध विद्यार्थी पहा कसा रायटरला धडाधडा उत्तरे सांगतो आहे.त्याला शिकायची इतकी तळमळ आहे,तर वाचता येत नाही.आणि हे विद्यार्थी डोळे असून न वाचता येतात आणि कॉपी करून पास होऊ पहातात'.थेल्माच चिडण रास्त होता आणि हळवं होणही.विजय कुद्ळेकडे पाहिल्यावर त्याच्या वर्गात असणार्या प्रत्येक सुपरवायझरची अशीच भावना व्हायची.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मुक्ताविद्याकेंद्र सुरु झाल्यापासून प्रत्येक वर्षी एकना एक अंध विद्यार्थी असतोच.परिक्षेच्यावेळी या विद्यार्थ्याना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.रायटर घेण्याची परवानगी दिली जाते.अंतर्गत मुल्यामापनात सुट दिली जाते.काहीजण अभासक्रम अर्धवट सोडतात.काही थोडे विषय सोडवत अभ्यासक्रम पूर्ण करतात.अनेक गोष्टी दुसर्यावर अवलंबून असल्याने पदवीधर होणे ही सर्वसामान्य वाटणारी बाब अंधांसाठी खडतर बनते.विजय माझ्या संपर्कात आल्याने हीखडतरता मला लक्षात आली.

प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यावर पुस्तक वाचून दाखवायला कोणी मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.परंतु तसे कोणी उपलब्ध झाले नाही. मुक्ताविद्याकेंद्राने प्रथम वर्षाच्या सर्व विषयाच्या श्राव्यफिती तयार केल्या होत्या पण कुद्ळेची परिस्थिती त्या विकत घेण्याएवढी नव्हती.त्याला वडील नव्हते. आई चतुर्थश्रेणीकर्मचारी.परत देण्याच्या बोलीवर त्याला श्राव्यफिती द्यायचे ठरले. पण त्याला लावायला टेपरेकॉर्डर हावा त्याचे काय?शेवटी परिक्षेच्या काही दिवस आधी त्याच्या आईने हप्त्यावर टेपरेकॉर्डर आणला.श्राव्यफिती ऐकून ऐकून विजयने अभ्यास केला.त्याचे सर्व विषय तोंडपाठ झाले होते.विज्ञान आणि समाज या पेपरच्या दिवशी वीज गेल्यामुळे त्याला केसेट ऐकताच आल्या नाहीत.म्हणून तो थोडा उदास होता.परंतु तो सर्व विषयात पास झाला.त्याचा रायटर असलेल्या मानेने प्रथम वर्षास प्रवेश घेतला..

प्रत्येक वर्षी कुदळेचा रायटर वेगळा होता.प्रत्येकानी पुढील वर्षी मुक्तामध्ये प्रवेश घेतला.डोळसानी अंधाकडून प्रेरणा घेतली होती.

प्रथम वर्षानंतर विजयचा आत्मविश्वास वाढला.आता त्याच्याकडे टेपरेकॉर्डर होता.द्वितीय वर्षाला त्यांनी प्रथमपासून अभ्यास केला होता सुरुवातीपासून कॅसेट ऐकल्या.त्यामुळे ते वर्ष सहज पार पडले.तृतीय वर्षात मात्र संज्ञापनकौशल्य, आणि विशिष्ट सामाजिक प्रश्नांचा अभ्यास या दोनच विषयाच्या कॅसेट होत्या.त्याने विशेष विषय म्हणून निवडलेल्या राज्यशास्त्राच्या नव्हत्या.मग राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका सुमित्रा काकडे, प्रतिभा मुडगेरीकर,शुभदा चांदवले यांनी विद्यापीठाच्या टेपरेकॉर्डरवर खास त्याच्यासाठी जेंव्हा फारसा आवाज नसतो अशी वेळ पाहून व्याख्यान रेकॉर्ड केले.प्राध्यापकांचे सहकार्य आणि विजयचे कष्ट याला फळ आले. तो हायर सेकण्डक्लास मिळून पदवीधर झाला.त्याला महानगरपालिकेत नोकरीही मिळाली.

पदवीधरांच्या स्नेहमेळाव्यास तो आला होता.बरोबर त्याची आईही आली होती.आकाशवाणीच्या तत्कालीन संचालिका उष:प्रभा पागे आणि साहित्यिक शरणकुमार लिंबाळे प्रमुख पाहुणे होते विजयचा सत्कार करण्यात आला.त्याच्या आईलाही स्टेजवर बोलावले होते.तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.निमंत्रित पाहुणे प्रेक्षक सर्वांनाच गहिवरून आले. खणखणीत आवाजात विजयने आपले मनोगत व्यक्त केले.त्यानेच केलेल्या दृष्टी या कावितेने भाषणाचा शेवट केला.

सुयोग्य दृष्टी प्रखर ज्ञान
टि.म.वि.चा मंत्र महान
अध्ययन पद्धती आहे छान
लोकशाहीची खरीखुरीजाण
टि.म.वि.ने आम्हाला केले सज्ञान
विजय कुडळे गातो गान
टि.म.वि.स करितो प्रणाम.

विजयला पुढे एम.ए. करायचे होते.टि.म.वि. मधेच तो प्रवेश घेणार होता.राज्यशास्त्राच्या माधाळेसरांनी त्याला मदत करायचे कबुल केले.अंधत्वावर मात करायची दृष्टी असल्याने तो येथेही यशस्वी होईल यात शंका नाही"
___________________________________________________

मी निवृत्त झाल्यावर त्याचा संपर्क राहिला नाही. कुठे असेल? कसा असेल? माहित नाही.त्याच्याशी संपर्काचे साधन नाही.कुठेही असलास तरी विजय तुला अपंग दिनासाठी तुझ्या स्वप्नांसाठी शुभेच्छा.

(केसरीने छापावयास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लेख,
पुस्तक वाचून दाखवण्याचे काम कधी कसे करता येऊ शकेल याबद्दल कोणी सांगेल का !

विजयला, त्याच्या आईला, त्या शिक्षकांना आणि संस्थेला सलाम.

खुप चांगली ओळख करून दिलीत शोभनाताई.

सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हर्पेन, विजयपेक्षा आता काळ बद्लला आहे मोबाइलवरही रेकॉर्ड होउ शकत.मला माझि एक मैत्रिण अन्धान्साठी काम करायची तिच्याकडुन नेहा कुलकर्णी चा नम्बर मिळाला.त्याना सम्पर्क साधु शकता..
फोन २४२२११३८
मोबाइल ९९६०६७११४४

अशी जिद्दी मुलेमुली समोर आली म्हणजे तुमच्यासारख्या शिक्षण प्रसाराचा ध्यास घेतलेल्या व्यक्तीला जो आनंद होत असतो तो तुमच्या शब्दातून प्रतीत झाल्याचे दिसत आहे. समाजात असे अनेक विजय असतात पण त्याना वेळीच पाठबळ....जे फक्त आर्थिकच नव्हे तर मानसिकही लागते....मिळाले तर ते समोर आलेल्या संधीचे सोने करून दाखवितात. विजयने पदवीधर होऊन महापालिकेत नोकरी मिळविली म्हणजे त्याचे स्वप्न कधीच संपणार नाही. आज जरी त्याच्या करीअरचा मागोवा मिळत नसला तरी ज्या ठिकाणी तो असेल तिथे त्याने आपल्या अंधत्वावर मात करून डोळे असणार्‍यांसमोर प्रकाश निर्माण केला असणार यात संदेह नाही.

अशा विद्यार्थ्यांची असली तेजस्वी जीवन कहाणी प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकात प्रकाशित होणे आवश्यक आहे.

शोभनाताई, खुप प्रेरणादायी माहिती मिळत असते तुमच्या लेखातून नेहमी Happy धन्यवाद.
आणखी असं खुप सारं वाचायला आवडेल...

लेख आवडला
छान लिहिलत

रुपारेलमध्ये असताना रुपारेलच्या होस्टेल मधल्या एका अंध मुलाला बारावीचे धड़े वाचून आणि समजावून दिले होते
वाचून दाखवल्यावर समजल्यानंतरचा त्याच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्यालायक असे

भिडणारे लेखन. योग्य संधी मिळाल्यास अंधपणावर मात करणारी आत्मविश्वासाची, शिक्षणाची दृष्टी कशी आयुष्य बदलून टाकू शकते याचे हृद्य उदाहरण आहे विजयची गोष्ट म्हणजे Happy
शाळेत असताना वर्गात दोन तीन अंध विद्यार्थी होते. स्पर्शज्ञानाने माणूस ओळखायचे, त्यांची जगण्याची, शिकण्याची तळमळ पाहून आपण आपल्या सुरक्षिततेला, धडधाकटपणाला किती गृहीत धरून वावरतो याची जाणीव व्हायची.

उत्तम लेख, आणि खरच अशा सार्‍या 'विजय' ना सलाम जे उणीवांचा बाऊ न करता जिद्दीने मेहनत करत यश मिळवतात.
धन्यवाद या लेखाबद्दल.

शोभनाताई मस्त लेख.

आताच एक विचार चमकुन गेला डोक्यात Happy

कि या मुलांना भुमिती समजावताना जत त्याचे मॉडेल्स वापरले गेले तर खुप फायदा होइल.

उदा. गोल चौकोन असे आकार त्यांना दाखविले जात असतीलच. पण बारीक सळिचे मॉडेल्स ज्यामध्ये भुमितीचे प्रमेय तयार करता येतात असे वापरता येवु शकतात. बर्‍याच वर्षापुर्वी माझ्या वडीलांनी असे मॉडेल्स तयार केले होते शाळेत.

२-४ दिवसात असे एखादे करुन इथे त्याचा फोटो टाकतो. मग मला काय न्हणायचे आहे ते नेमके ल्क्षात येइल.

ग्रेट Happy
आम्ही सर्व पन्चेन्द्रियान्सहित धडधाकट असून कायम "रडे" अस्तो हेच खरे!

शोभनाताई फोन-नंबरबद्दल धन्यवाद, मला स्वतःला लगेच उठून काही करायला जमेल असं नाही पण तोपर्यंत ही माहिती इतरांना वाटता तरी येईल....

सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.निवांत पाटील छान कल्पना. फोटोची वाट पाहातेय.अशोक,टीम निवांत वाचताना त्याना बी.ए.,एम.ए. सारख्या अभ्यासक्रमाबरोबर कौशल्यही शिकवणे किती गरजेचे आहे.हे लक्षात आले.त्याला पदवी मिळाली पण ज्ञान किती मिळाल? इतर पुस्तक वाचण्याच्या त्याच्या गरजेच काय? विजयच्या काळापेक्षा परिस्थिती बदलली आहे.पण तरी प्रयत्न अपुरेच आहेत.विजयच कौतुक आहे.पण शिक्षणव्यवस्था आणि आम्ही शिक्षक झापड लावल्यासारखे.वागतो त्याची लाज वाटते.

आता वेळ काढुन त्यातल्या प्रत्येक आकृतीबद्दल बद्दल थोडेफार लिहीन. बर्‍याच लोकांना त्यातील प्रमेय आठवतील देखिल. Happy

इथे लिहण्याचा उद्देश असा होता कि, प्रमेय वाचुन समजण्यापेक्षा असे मॉडेल हाताळले तर त्यांना अ‍ॅक्चुअल "व्हिज्युअलाजेशन" व्हायला मदत होइल.

विजयच्या जिद्दीला आणि शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेला मनापासून सलाम !
पाटील साहेबांची कल्पना आवडली. प्रत्यक्ष स्पर्शाने त्या त्या भौमितीक आकाराची ओळख करून देण्याची, प्रमेये शिकवण्याची ही कल्पना मस्तच आहे.

वा, खूपच प्रेरणादायी लेख .....

भौमितिक आकार समजावून सांगण्याकरता पाटील साहेबांची आयडिया मस्तच ....

निवांत पाटील फोटोबद्दल धन्यवाद.अकृतिवरुन लेखनाचि वाट पहात आहे.टिम निवांतमध्ये मिरा बडवे असे अनेक प्रयोग मुलाना समजवण्यासाठी करतात. अशा कल्पनांचा त्याना उपयोग होइल.कला वाणिज्य, विज्ञान शिक्षणशास्त्र सर्व शाखेतिल विद्यार्थ्याना शिकवताना त्या अंधांच्या दृष्टिकोनातुन विचार करुन विविध प्रयोग करतात.

Pages