"Congratulations, Swanand Rajadhyaksha... you have been selected for Mindcrest India Private ltd.."
हे शब्द स्वानंदच्या कानावर पडले आणि खूप दमून विश्रांती घेताना माणूस जसा शांत बसतो, तसा तो शांत सोफ्यावर बसला. अगदी शांतपणे एच आर ला थँक्स म्हणाला आणि खाली आला.
पार्किंग मधून गाडी काढताना घरी फोन लावला.
"हॅलो"
"हां…"
"आई... Mindcrest मध्ये सिलेक्शन झालं .. "
"काय बोलतोस काय, स्वानंद… खूप खूप अभिनंदन.. बरं झालं रे बाबा एकदाचं …. नाईट शिफ्ट संपली तुझ्यामागची.. ते पहाटे पर्यंत काम.. LL.M. होऊनही BPO चा जॉब… सगळं संपलं.. आता NET होईपर्यंत हा जॉब जरी चालू राहिला तरी काही अडचण नाही… चला आता एकदाचं तू तुझ्या क्षेत्रात जातोयेस.. काय, ऑफिस कसंय?, किती लांब आहे तुझ्या हॉस्टेलपासून?, का गाडी आहे ऑफिस ची? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्क टाईमिंग कसंय? आणि.. "
"सगळं चांगलंय.. " आईचं वाक्य मधेच तोडत स्वानंद म्हणाला.
दरवेळेस कुठलीच गोष्ट इतकी सरळ आणि पटकन नं सांगणाऱ्या स्वानंद नं ही गोष्ट इतक्या सरळ आणि लगेच सांगावी हे काही आईला पटलं नाही.
"का रे इतका थंड.. काही अडचण तर नाही ना..?"
"काहीच नाही.. सगळं चांगलंय.. "
"पण तरी???"
"...."
"स्वा…."
"…."
"काय झालंय??"
" काही नाही गं... आई........ खूप दमलोय..... तुझ्याजवळ यावंसं वाटतंय."
आईच्या डोळ्यातला ढग तिच्या मौनातून जाणवला.
खरंतर हा जॉब काही अशक्य कोटीतला किंवा अगदी स्वप्नवत वाटावा असा नव्हता. पण त्या परिस्थितीत तो जॉब स्वानंदसाठी खूप महत्वाचा होता. LL.M. झाल्यानंतर बराच काळ सर्च केल्यावर कुठेच व्हॅकेंसी नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वशिला नव्हता म्हणून BPO त काम करणे हा त्याचा शुद्ध नाइलाज. BPO मध्ये जॉब मिळवणं हे त्याच्यासाठी जरा अवघडंच होतं कारण तिथे वकील घेत नाहीत. पण देवाच्या कृपेनं जरा तोंड बरं वाजतं म्हणून तब्बल १ तासाच्या इंटरव्ह्यू नंतर झाला होता सिलेक्ट. त्यानं कोर्टात वकिली करावी ह्यासाठी त्याच्या घराची परिस्थिती परवानगी देत नव्हती. त्याच्या NET ची आषाढी - कार्तिकी चालू होती आणि पांडुरंग काही प्रसन्न होण्याचं नाव घेत नव्हता. नाईट शिफ्ट नं अगदी पिसून काढलं होतं... त्याच्या एका मित्रानं सांगितलं, ओपनिंग चालू आहे म्हणून आला आणि आता फायनली जॉईन होतोय..
त्यांच्या दोघांमधलं मौन बराच काळ वाहिल्यानंतर आई म्हणाली.. "ह्यांच्याशी बोल"
त्यांच्या दोघांमध्ये असं काय आहे देव जाणे पण नं बोलताही बर्याच प्रश्नांची उकल होते…
"काय मग वकीलसाहेब.. किती पगार?"
पपुंचा म्हणजे परमपुज्यांचा पहिलाच आणि अगदी अपेक्षित प्रश्न..
"जयंतराव... आधीच्या दुप्पट... अठरा हजार"
"मागेपुढे वाढेलंच कि मग अजून..."
"मागे कसा वाढणार... पुढेच वाढणार बाबा"
"बाबा पुढे नाही वाढणार… पगार पुढे वाढणार.. " ते स्वानंदचेच पपु.. बोलण्यात कधी ऐकतील?
"बरं…. जे काही वाढायचं ते वाढेल पण आता माझ्या मोबाईलचं बिल नका वाढवू.. मी ठेवतो. रात्री निवांत बोलु…"
"चालेल"
"ठेवतो मग"
"चला बाय"
"अररररर .. ठेवला का..? "
"नाही अजून.. "
"नमस्कार करायचा राहिलाय.... नमस्कार करतो.. आणि आईला पण सांगा" असं म्हणून स्वानंदने फोन ठेवला.
"तुझं पोरगं अजून संस्कार विसरलं नाही गंSSSSS"… असं काहीतरी बाबा मोठ्ठ्यानं म्हटल्याचा आवाज आला.
आता सबाला फोन करावा कि नाही अश्या संदिग्धतेत स्वानंदने तिला नंबर डायल केलाच.
"कुठे आहेस?"
"ऑफिस"
"खाली आलोय"
"अरे आज तू लीव्ह वर आहेस ना????"
"ब्रेक टाकून लवकर ये… उगा टाईम पास नकोस करू"
"अरे भयानक आणि किचकट रिक्वेस्ट येताहेत प्रोसेस करायला.. आणि अजून दोनच रिक्वेस्ट झाल्या आहेत"
"बरं ठीकाय मग.. मी निघतोय"
"मी खाली येतीये"
च्यायला फुकट मस्का लावायला कधी ना जमलाय.. आणि कधी जमेल असं वाटत पण नाही..
नुकताच तासापूर्वी पाऊस येउन गेला होता. मगरपट्ट्यातला हा नजारा खरंच पाहण्यासारखा असतो. स्वच्छ १२ टॉंवर्स.. चकाचक रस्ते.. संध्याकाळी तर सुर्याकिरणांचं इतकं भारी रिफ्लेक्शन पडतं ना.. आईशप्पथ..! ह्याच मगरपट्ट्यातून नाईटशिफ्ट संपवून जाताना कमालीचं फ्रेश वाटायचं.. दर शुक्रवारी स्वानंद नं चुकता बाईक वरच यायचा आणि शिफ्ट संपल्यावर निवांत म्हणजे अगदी निवांत रूमवर जायचा. टॉंवर नंबर २ ची टेरेस आत्तापर्यंत बघितलेली सगळ्यात सुंदर टेरेस. भलीमोठ्ठी, प्रशस्त… स्वानंद त्या ठिकाणी ठिकाणी मध्यरात्री ट्रान्स मध्ये जायचा.. काय व्हायचं देव जाणे पण त्या टेरेसवर तास न तास कसे जायचे काही कळायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे…
ठाप्प…….
पाठीवर जोरात थाप मारून वैतागलेली सबा…
"हे काय स्वान्या, आपण तसे रोज भेटतोच ना.. काय गरज होती आत्ता बोलावायची. आधीच ब्रेक चा प्रॉब्लेम तुला माहित नाही का? आता डीनर ला किती अडचण येईल.? तुझं एक बरंय रे.. बोलबच्चन करून तू वेळ नेतोस मारून.. मला नाही ना जमत तसं आणि त्यात तू पण नाहीस आज.. काय होणार आहे कोणास ठाऊक.. त्यात आपला तो दळभद्री टी एल.. असा बघत होता ना.. कुठे चालली म्हणून.. मी काही लक्ष नाही दिलं आणि.. "
"मी पेपर टाकतोय"
"क्क्काय………"
"मी रिझाईन करतोय"
"म्हणजे?????"
"मी सोडतोय EXL"
पोरगी एकदम शॉक्ड..
"स्वान्या, तू चेष्टा करतोयेस ना?... तू कुठेही जात नाहीयेस ना?.. लवकर सांग कि हे सगळं खोटंय… पटकन पटकन बोल"
"मी खरंच सोडतोय… आत्ताच mindcrest चं जॉइनिंग लेटर घेऊन आलोय"
"कधी गेला होतास?"
"आजच"
"काही बोलला नाहीस?"
"काय म्हणून सांगणार होतो?"
"चालला आहेस म्हणून"
"म्हणजे तुझा एक दिवस जास्तीचा खराब करून?…… "
"असा ना तसा झालाच ना"
"गेला आठवडा पण झाला असता"
"म्हणजे??"
"होय... गेल्याच आठवड्यात कॉल आला होता. मीच पोस्टपोन केला तो "
"का जातोयेस?? जाऊ नकोस ना.."
"अगं, मला तर कुठे जावं वाटतंय… पण BPO त किती दिवस काढू अजून.. काहीतरी दुसरं बघायला नको का?"
"........"
"........."
"…. पाय द्खायला लागलेत माझे...... कितीवेळ उभाच ठेवणार आहेस, अजून?"
"मग बस ना"
"कुठे…… रस्त्यात"
"काय फरक पडतोय... तेवढाच रस्ता साफ होईल"
"तेही करेन…....जर तू जर थांबत असशील "
"अय्युव…फंटे बास कर"
"जाणं गरजेचंच आहे का?"
"अगं बाई… मी दुनिया सोडून जात नाहीये.. फक्त ऑफिस सोडतोय.. बाकी भेटत राहूच कि"
"..... कधीतरीच ना…"
"नाही गं ……. नेहमी भेटत जाऊ"
"आम्ही तुम्हाला आज ओळखत नाही … साहेब"
"माहितीये.. सहा महिने झालेत"
"तू नसतोस भेटत. " जरा जरा पाउस पडायला सुरुवात झाली.
"विश्वास ठेव.. तुला इतक्या लवकर नाही विसरत मी"
"म्हणजे काही दिवसांनी विसरणार असाच ना"
"उगाच नकोस शब्दात पकडू… एक बार मैने बोला ना……. "
"बाकीच्यांना बोलावू का??"
"कशाला……. मी येणार आहे फॉर्मॅलिटीज उरकायला… तेंव्हाच भेटेन.. उगी नको सगळ्यांचा वेळ खराब करायला"
"असा ना तसा होणारच आहे……" बाईसाहेबाचं तोंड प्रचंड पडलं...
काय करावं ह्या सबाचं.. EXL च्या फ्लोअरवरची स्वानंदची सगळ्यात जवळची मैत्रीण.. त्यांची बॅच एकच.. एकत्र खूप मजा केलेली.. ट्रेनिंग ला झोपा काढलेल्या.. स्वानंद - श्वेता चं प्रकरण.. नंतरची मनीषा.. ब्रेक वाढवून उगाच मगरपट्यात हिंडलेलो.. ठोसेघरचा धबधबा.. कास पठार.. सगळ्याच गोष्टी शेअर झालेल्या.. एक मुस्लिम असून मराठीचे एव्हढे खाचखळगे माहीत असलेली त्याच्या आयुष्यातली एकुलती एक मुलगी.. एकदा का कुणाला आपलं मानलं कि त्याच्यासाठी काहीही करायची नुसती तयारीच नाही तर प्लॅनिंगसहित कार्यवाही लगेच.. हिला देवानं मनंच असं दिलंय ना कि ही मेंदूचा वापरच नाही करत अर्थात काहीजणांच्याच बाबतीत… हिच्याशी मैत्री स्वानंदनं आपण होउन केली नाही … तर झाली.. आता हीला कसं जायचं सोडून…????
अजून काही वेळ इथे थांबलो तर पाऊस खूप जोरात पडेल आणि मग सगळंच अवघड होऊन बसेल म्हणून…
"चल मी निघतो.. ब्रेक खूप वाढला असेल तुझा.. "
"शेवटी उभ्या उभ्याच चाललास…"
"अरे, यार…. पार्टी दिल्याशिवाय जाईन होय??"
"पार्टी…कशाबद्दल?? तू जातोयेस ह्याची…… तेवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर.... अजूनतरी"
"…………"
"एक ऐकतोस का………"
"बोल.... पटकन……" घाईत..
"एवढ्यातच वैतागलास?"
"वैतागलो नाहीये…... भिजायचं नाहीये" आता पाउस स्वानंदकडे वळत होता..
"भिजणं टाळू शकशील असं नाही वाटत"
"आता बोलतेस का?? "
"इथे जे केलंस ते तिथे नकोस करू"
"काय ???"
"जेवढा काही तू इथे छपरीपणा करायचास ना… तो प्लीज तिथे नकोस करू…. "
"………"
.
.
.
.
.
"मागे राहिणार्यांना त्याचा खूप त्रास होतो… "
life@mindcrest.com भाग १
Submitted by चेतन.. on 10 March, 2014 - 03:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mast aahe .yeu det.aavadali
Mast aahe .yeu det.aavadali
आवडली.. पुलेशु..
आवडली.. पुलेशु..
आवडली.. पुलेशु..
आवडली.. पुलेशु..
कथासुत्र छानच आहे. फक्त ती
कथासुत्र छानच आहे. फक्त ती लवकर पूर्ण करा प्लीज. काही कथा पुर्ण झालेल्या नाहीत म्हणून विनंति करावीशी वाटली.
मयुरा>>>+१
मयुरा>>>+१
छान आवडली क्रमशः लवकर पुर्ण
छान आवडली
क्रमशः लवकर पुर्ण करा
मस्तच. पुर्न कर
मस्तच. पुर्न कर
छान...
छान...
Mindcrest shi kahi kal
Mindcrest shi kahi kal sambandh aala hota. Mhanun hi katha pudhe vachaychi aahe. Aapan pudhe lihile tar vachayla jaroor aavdel.