दिसायला खूप सुंदर! वय एकोणीस! शरीरावर तारुण्याची झळाळी आणि उत्साहाचे झरे! कोणीतरी भेटायला आले ह्याचा आनंद हालचालींमध्ये ओतप्रोत भरलेला! ती हासली की एखाद्या रोग्यालाही बरे वाटेल. तिला लग्नाच्या बाजारात मागण्यांवर मागण्या येतील. तृतीय वर्ष बी ए नंतर एम एस डब्ल्यू करण्याचे स्वप्न! खोखो मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक! कबड्डीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक! पुण्यात नुकत्याच झालेल्या आंतरविद्यापीठीय ज्युडो स्पर्धेत काहीही म्हणजे काहीही अनुभव वा सराव नसताना द्वितीय क्रमांक! खेळ व व्यायामामुळे अतिशय प्रमाणबद्ध असलेले शरीर! वाक्यावाक्यावर चांदणे शिंपडल्यासारखे नितळ हासणे......
...... आणि दर दोन तीन वाक्यांनंतर...... खोल खोल निराशेच्या डोहाचे तरंग अचानक वर यावेत तसे डोळे भरून येणे! तिचे नांव आराधना! वडिलांच्या बाहेरख्यालीपणामुळे वडिल, वडिलांमुळे आई आणि दोघांमुळे आराधना एच आय व्ही पॉझिटिव्ह! आई व वडील निधन पावून अनेक वर्षे झालेली! आराधनाला तिच्या काकांनी काही काळ सांभाळले. मग तिच्या चुलत भावांची लग्ने झाल्यानंतर भावजयांनी कान फुंकायला सुरुवात केली. ही घरात राहिल्यामुळे आपल्याला एड्स झाला तर? आराधनाची हकालपट्टी करण्यात आली. आता ती संस्थेत राहते... शिकते... कॉलेजमध्ये कोणाला खरे सांगत नाही.... एकदाच एका अतिशय जवळच्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन ती म्हणाली होती...... "तुला माहितीय का? मी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे"...... त्यावर मैत्रिणीने तिच्या गालावर जोरात चापटी मारून तिला सुनावले...... "पुन्हा असले अभद्र बोलायचे नाही...... आपल्यासारख्यांना असे काही होत नसते"
ही एक काल्पनिक कथा वाटत आहे तुम्हाला? नाही. ही सत्यकथा आहे. अश्या चिक्कार सत्यकथा गेल्या आठवड्यात मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आहे. तेव्हापासून मनाचा एक कोपरा विषण्णतेने व्यापलेला आहे.
आराधनाचे दोन फोटो माझ्याकडे आहेत, अर्थातच ते येथे देणार नाहीच, पण ते फोटो जो कोणी पाहील त्याला वाटेल की मी तिचे वर्णन जरा कमीच केले...
ज्यांना स्वारस्य असेल त्यांच्या माहितीसाठी:
मला नुकतेच लेखनाचे एक मोठे काम मिळालेले आहे. समाजातील ऐंशी प्रकारच्या स्त्रियांची प्रत्यक्ष मुलाखत घेणे, त्यांची नांवे, स्थळे ह्यांचा कोठेही उल्लेख होऊ न देता त्यांची व्यक्तीचित्रे शब्दांमधून साकारणे आणि स्त्रीची विविध रुपे ह्या अश्या प्रकारे समाजासमोर आणणे! त्याचे एक मोठे पुस्तक काढण्यात येणार आहे. हे कंत्राट अगदी सहजच मला मिळण्यामागे माझी प्रकाशित पुस्तके व जालावरील साहित्य कारणीभूत ठरले आहे. अर्थातच, हे कंत्राट मिळण्यामागे मायबोलीचा अप्रत्यक्ष सहभाग आहेच, त्याचे मी नुसतेच ऋण मानू शकतो.
ह्या ऐंशी प्रकारच्या स्त्रियांमध्ये वेश्या, मसाज पार्लरच्या मुली, कॉल गर्ल्स, एड्सबाधित स्त्रिया, परित्यक्ता, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी, बलात्कारिता, कुमारी माता येथपासून ते एंटरप्रीनर, प्राध्यापिका, कॉर्पोरेट लीडर्स अश्यापर्यंत सर्व प्रकार आहेत. ह्यातच पोलिस, चांभार, व्यसनी स्त्री, गृहिणी, देवदासी असेही प्रकार आहेत.
एकाचवेळी हा प्रस्ताव अत्यंत आव्हानात्मक, संवेदनशीलतेचा कस लावणारा, व्यक्तित्व घडवणारा आणि झोकून द्यावेसे वाटणारा आहे. मला विचारणा झाली होती की ह्यापैकी किती व्यक्तीचित्रे तुम्ही लिहू शकाल. असे काम हातातून जाऊ नये म्हणून घाईघाईत मी उत्तर दिले होते की 'सर्व'! आणि मुळीच विलंब न होता मला उत्तर मिळाले की 'काम सुरू करा'.
एखाद्या स्त्रीला प्रथमच भेटणे, त्यात त्या स्त्रीची समाजाला असलेली ओळख काहीशी विचित्रच असणे, तिला मनमोकळे बोलण्यास उद्युक्त करणे, आपल्याबद्दल तिला विश्वास वाटावा ह्यासाठी आधी गप्पा मारणे आणि एवढे सगळे करून तिच्या मनातील खरे विचार सरफेसवर आणण्यास तिलाच मदत करणे!
पुढेपुढे ह्या कामी अर्थातच मला माझ्या लेखनवर्तुळातील एका स्त्रीचे सहाय्य आवश्यक ठरणार आहे आणि तिने ते द्यायचे कबूलही केले आहे, पण ग्राऊंडवर्क मला करणे आवश्यक आहे.
काही मुलाखती झाल्याही! त्यानंतर मायबोलीवर 'स्नेहालयास मदत' हा धागा आला व मी त्या संस्थेला काहीशी मदत पाठवली. नंतर संस्थाचालकांच विचारले की अश्या काही महिला, मुली ह्यांना मी भेटू शकतो काय? त्यांना पाठवलेली माझी पुस्तके, त्या पुस्तकांचे विषय, त्या विषयाशी काही प्रमाणात संबंधित असेच त्यांचे कार्य आधीपासूनच असणे हय सर्वामुळे मला ती परवानगी मिळाली. अश्याप्रकारे मी गेल्या आठवड्यात दोन अडीच दिवस अहमदनगरमधील स्नेहालयात घालवले. जवळपास पंधरा मुलाखती घेतल्या. अनेक छायाचित्रे घेतली. स्नेहालयाच्या अधिकार्यांनीच अॅक्सेस दिलेला असल्याने महिला व मुली बोलायला संकोच करत नव्हत्या. स्नेहालयाचे हे सहकार्य मोठेच होते. अन्यथा कोणती बलात्कारिता किंवा पुनर्वसन होत असलेली वेश्या स्वतःच्या तोंडाने सांगेल की तिच्याबाबतीत काय काय झाले!
तर आराधना! अजूनही डोळ्यासमोरून चेहरा हटत नाही. तिचे ते वारंवार भरून येणारे डोळे तिच्या आणि इतर जगात असलेल्या फरकाची तिला स्पष्ट व कटू जाणीव असल्याचे सतत सिद्ध करत होत्या. आपली मान शरमेने खाली जावी असे यश तिने ह्याही परिस्थितीत इतक्या लहान वयात मिळवलेले होते. 'अजून किती वर्षे हातात आहेत' हेही माहीत नसणे आणि कोणत्याही क्षणी उतार सुरू होऊ शकतो हेही माहीत असणे! ते तरुण वय किती उभारी धरू शकेल? मैत्रिणींना काही सांगितले तर त्यांना खोटेच वाटणार, घरच्यांनी अडाण्यासारखे वागून वाळीत टाकलेले! रोज डोळ्यासमोर अश्राप बालके आणि मरणासन्न अवस्थेतील एड्सग्रस्त दाखल होत आहेत. तरीही जो तो हासत आहे. शिकत आहे. धडपडत आहे. प्रार्थना करत आहे.
प्रत्येकीचा एक इतिहास आहे. एक हेलावणारा इतिहास!
अशीच एक आहे संगीता! तीही खरोखरच देखणी! गालावर खळी, सतेज गव्हाळ कांती, वाटनारच नाही पाहून की तिने ह्या एवढ्याश्या वयात काय काय पाहिलेले आहे. डोंबिवलीहून आलेली! कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील एकमेव मुलगी!
वय सतरा! वडील लहानपणीच गेलेले! संगीताने सोळाव्या वर्षात पदार्पण केले आणि तिच्या एड्सग्रस्त आईने तिला एका माणसाची शय्यासोबत करण्यास सांगितले. त्या माणसाने हात लावायच्या आधीच संगीता पळून डोंबिवलीतल्याच काकांकडे गेली. काकांनी दोन तीन दिवस सांभाळून तिला अहमदनगरमधील त्यांच्या मुलीकडे, म्हणजे संगीताच्या चुलत बहिणीकडे धाडले. ही बहिण विवाहीत होती पण नवरा मात्र तिला सोडून गेलेला होता. नवरा सोडून जाण्याचे कारण काय? तर ही बहिण दुपारच्या वेळात पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडून धनिकांसोबत स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवत असे. आता ती असे करते हे काकांना माहीत होते की नव्हते हे कळले नाही, पण जावई निघून गेला म्हंटल्यावर कुणकुण तरी असणारच! त्या सापळ्यात संगीताला का पाठवावे? पाठवले. बहिणीने चार दिवस ठेवून घेतले आणि पाचव्या दिवशी एका माणसाला घरी आणले. कशीबशी निसटलेली संगीता चक्क रस्त्यावर आली आणि कोणी भल्या बाईने तिला स्नेहालयाच्या दारात आणून सोडले. आता ती एड्सग्रस्त व एड्सग्रस्त नसलेल्या समवयीन मुलींबरोबर आनंदात राहते. किंबहुना अधिकच खुलून दिसत असावी. तिचाही फोटो पाहणार्याला वाटणार नाही की तिने एवढे सोसले आहे. अनेकांना तिने ही कहाणी सांगितली असेल, पण तरीही तेच तेच सांगताना पुन्हापुन्हा डोळे भरून येत होते. तिला पाहून तरुण मुले पागल होतील. सध्या तरी ती एच आय व्ही निगेटिव्ह आहे. आता घरी जाण्यास ती अर्थातच तयार नाही.
पण संगीतासमोर निदान एड्समुक्त आयुष्य जगण्याच्या शक्यतेची उमेद तरी आहे. पूजाचे काय?
सावळा रंग, तरुण वय असूनही शरीरभर आणि डोळ्यात एक खिन्नता! तरीही खळखळून हासण्याचा प्रयत्न! एड्सच्या गोळ्या नियमीत घ्याव्या लागणे! आणि हा रोग होण्याचे कारण काय? तर आई व वडील ह्या दोघांनाही हा रोग होता. दोघेही हयात आहेत. हिचे लग्न करून टाकले. हिच्या सासरी सांगितलेच नाही की ही पॉझिटिव्ह आहे. आता कदाचित नवर्यालाही रोग झालेला असला तर तिला कल्पना नाही. सासरी जेव्हा समजले की सून पॉझिटिव्ह आहे तेव्हा तिला हाकलून देण्यात आले. कोणीतरी ह्या संस्थेत आणले. मरण टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आता तिचे जीवन आहे.
पण सगळ्यात भयानक हकीगत आहे नेहाची! वय सत्तावीस! सणसणीत प्रकृती! डोळ्यात धार! संस्थेच्याच कामाला वाहून घेतलेले असणे! आणि इतिहास? अंगावर काटा आणणारा इतिहास!
पहिल्याच पिरियड नंतर, म्हणजे चौदाव्या वर्षीच एका बत्तीस वर्षाच्या माणसाशी लग्न लावून देण्यात आले. लग्न म्हणजे काय, लैंगीक संबंध म्हणजे काय, इतकेच काय तर सासरी जाणे म्हणजे काय हेही माहीत नसलेली ही अडाणी ग्रामीण समाजातील मुलगी! मात्र भलतीच बंडखोर आणि शूर! लग्नाच्या दिवसापासून सलग पाच वर्षे तिने नवर्याला हातही लावू दिला नाही. त्यावरून रोज मारहाण सहन केली. सासू, सासरे, दीर व नवरा ह्यांची! पण नाही म्हणजे नाही. हे ऐकून मलाही नवल वाटले. खरे तर अश्या मानसिकतेच्या समाजात तिच्यावर केव्हाच पतीकडूनच बलात्कार झाला असता. कोणास ठाऊक, कदाचित झाला असेलही. पण तिनेतरी मला सांगितले की सलग पाच वर्षे हालहाल सहन केले पण हात लावू दिला नाही. मात्र पाच वर्षे छळ सहन केल्यावर तिने शेवटी शरणागती पत्करली व नवर्याला शरीरसुख देऊ लागली. घरकाम आधीपासूनच करत असल्यामुळे आता तक्रारी, मारहाण व छळ जरा कमी झाला होता. दिवस गेले. पहिला मुलगा झाला. डिलीव्हरीच्या वेळी काही कारणाने रक्ताची तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे. म्हणून नवर्याची तपासणी केली तर त्याला तर तो रोग नव्हताच. तिच्या आई वडिलांनाही नव्हता. नेहाला हा रोग चक्क निर्जंतुकीकरण न केलेल्या इन्स्ट्रुमेंट्समुळे झाल्याचे निष्पन्न झाले. गरोदरपणात घेतलेल्या काही वैद्यकीय सेवांमध्ये सहभागी झालेल्या एका क्लिनिकमधील मेडिकल व नॉन मेडिकल स्टाफने झालेली चूक कबूलही केली. त्यांनी चूक कबूल केली खरी, पण ती भोगात आली नेहाच्या! आता घरी पुन्हा मारहाण व छळ सुरू झाला. मुलासकट माहेरी हाकलून देण्यात आले. माहेरच्यांनी कसेबसे मनधरणी करून तिचा पुन्हा स्वीकार करायला लावला. ह्या विचित्र परिस्थितीत तिला पुन्हा एकदा दिवस गेले. ह्यावेळी मुलगी झाली. तोवरच पहिला मुलगा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मुलगी अजूनतरी निगेटिव्ह आहे. मुलगा आता आठ आणि मुलगी सहा वर्षाची आहे. पण नेहा? मुलगी झाल्यावर तिला पुन्हा मारहाण करून हाकलून देण्यात आले. कारण तिला हाकलले नसते तर गावकरी त्या कुटुंबालाच वाळीत टाकणार होते. अतोनात छळ झाला तिचा! सासू तिला ताट, उलथ्ने, असे कश्यानेही मारत असे. नवरा येताजाता फोडून काढत असे. कपाळावर एक मोठी खोक आहे. तिला वैद्यकीय उपचारांची नितांत गरज असताना कसलेही उपचार न करता तिला हाकलून देण्यात आले. कोणीतरी संस्थेत आणले आणि तिला उपचार मिळाले. उपचार मिळाले खरे, पण न्युमोनिया आणि पाठोपाठ ब्राँकायटिसने शरीराचा ताबाही घेतला. वजन एखाद्या लहानश्या मुलासारखे वीस किलोवर आले. अंथरुणात ती निजली असली तर दिसायचीही नाही. दोन वेळा मृत्यूला भोज्या करून शूर नेहा परत जगात आली. हळूहळू प्रकृती सुधारू लागली तसे तिने संस्थेच्या कामात एक समुपदेशक म्हणून स्वतःला झोकून दिले. पण दुर्दैव अजूनही पाठ सोडत नव्हते. मुलाला आणि मुलीला भेटण्याची परवानगी तिला नाकारण्यात आली. दोघांना तिचा नवरा स्वतःकडे घेऊन गेला. तिच्या आईनेही तिच्याशी संबंध सोडला,. तिचा नवरा तिच्याच आईला, म्हणजे स्वतःच्या सासूला, जी साधारण त्याच्याच वयाची होती, म्हणाला की तुमच्या मुलीने माझ्या आयुष्याचे वाटोळे केले आणि आता मला शरीरसुखही मिळत नाही. त्यावर त्या सासूने उत्तर दिले की जर तुम्ही माझ्या मुलीशी कायमचा संबंध संपवणार असाल तर तुमची ठेवलेली बाई म्हणून राहायला आणि तिच्या 'फक्त' मुलीचा (जी निगेटिव्ह आहे) सांभाळ करायला मी तयार आहे. आता नेहाची आई नेहाच्या पतीबरोबर त्याच्या बायकोप्रमाणे राहते. दोघे नवराबायको प्रमाणे सुखात राहतात आणि मुलीला मोठे करतात. नेहाचा मुलगा त्यांच्याबरोबरच राहतो पण त्याच्यासाठी काही विशेष केले जात नाही. आणि नेहा? कधीही न दिसू शकणार्या आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी टिकून आणि टिच्चून उभी आहे. कल्पनेतील सर्व विकृतीच्या पातळ्यांना उलटेपालटे करून सोडणार्या या भीषण घटना रोज आपल्या आसपास घडत आहेत,
लेखमालिकेच्या पुढील भागात अश्या आणखीन काही महिलांचा, तसेच वेश्यांचा व बलात्कारितांचा परिचय करून घेऊ! हे सर्व लिहिण्याची उदार परवानगी मला स्नेहालयाने दिलेली आहे. शेवटच्या भागात अर्थातच संस्थेची माहिती व छायाचित्रे देईनच!
पुढील भागात कौटुंबिक हिंसा व वेश्याव्यवसायास भाग पाडले जाण्याची काही हृदयद्रावक उदाहरणे वाचूयात!
माणूस देव होऊ शकत नाहीच, माणूस होणेही जवळपास अशक्यच असते पण निदान माणसातील जनावरपणाची पातळी जरी माणसाने खालावत आणली तरी समाज जगण्यासाठी एक अधिक चांगली जागा होऊ शकेल.
-'बेफिकीर'!
नि:शब्द.
नि:शब्द.
......
:(......
शब्द.........
शब्द.........
नि:शब्द
नि:शब्द
बाप रे!
बाप रे!
खरच नि:शब्द....
खरच नि:शब्द....
(No subject)
मी अशाच एका कहाणीचा मूक
मी अशाच एका कहाणीचा मूक सा़क्षीदार आहे..
कालच्या पेपरला अशीच १७
कालच्या पेपरला अशीच १७ वर्षाच्या मुलीची बातमी होती तिचा २ वेळा निकाह झाला ४ वेळा विकले, शेवटी स्वत:च्या मावशीला गाटुन आई, आजी, बापाच्या विरोधात तक्रार दिली.
बाप रे..नि:शब्दच..
बाप रे..नि:शब्दच..
काय बोलू हे सगळं वाचुन आज लाल
काय बोलू
हे सगळं वाचुन आज लाल निळ्या टिकल्यांची उधळणही करावीशी वाटत नाहीये. या व्यक्तींसाठी स्वतः काहीच करू शकत नाही या आगतिकतेचा संताप येतोय!
लेखनमालिकेसाठी शुभेच्छा!
सुन्न........ नि:शब्द....
सुन्न........ नि:शब्द....
सगळं सुन्नं करणारं आहे.
सगळं सुन्नं करणारं आहे.
सहृदय प्रतिसाददात्यांनो,
सहृदय प्रतिसाददात्यांनो,
आपल्या प्रतिसादांचे आभार मानतानाच मला एक बाब आणखीन नोंदवावीशी वाटते ती ही की हे अनुभव जरी थक्क करणारे, नि:शब्द करणारे असले तरी नुसतेच स्वतःच्या मनाची झालेली अवस्था प्रतिसादात लिहून कृपया मोकळे होऊ नका. स्नेहालयाच्या वतीने कोणतीही मदत वगैरे मी मुळीच मागत नाही आहे. ही त्या संस्थेची जाहिरातही नाही. त्या संस्थेच्या मदतीसाठी एक वेगळा धागा आधीच मायबोलीवर आहे. पण तुमच्याकडून एक माफक अपेक्षा आहे. किमान अश्या घटकांसाठी काय करण्याची इच्छा मनात येत आहे ते तरी लिहा. मग तुम्ही कितीही दूर असलात तरी काही ना काही वाटतच असेल ना? त्यातूनच काहीतरी आकाराला येऊ शकेल. मी तेथे पुन्हा पुन्हा जाणार आहेच. ह्या लेखमालिकेतील पुढच्या भागात अजूनच व्यथित व उद्विग्न करणारे अनुभव वाचायला लागणार आहेत. पण तुम्हाला काय करावेसे वाटले असते हेही कृपया लिहा की? संस्थेतल्या कोणी कधी हे पान वाचलेच तर त्यांनाही जाणवूदेत की समाजात अनेकांना विविध प्रकारचे सहाय्य करण्याची निदान इच्छा तरी आहे. एनीवे प्रतिसाद देणारच आहात तर थोडासा विस्तृत प्रतिसाद द्यायला वेळ काढाल का?
नुसतेच नि:शब्द, सुन्न असे म्हणायला ही एखादी काल्पनिक कथा नाही, नाही का?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
दिवसाअखेरी तिस-यांदा वाचूनही
दिवसाअखेरी तिस-यांदा वाचूनही आलेली ह्तबुध्दता कमी होत नाहीय. सुरक्षिततेच्या कवचात वावरुन नसलेली दु:खे कवटाळण्याची सवय जडलेल्या भेकड मनाला हे वास्तव पेलवण्या पलिकडच वाटतय. या धक्यातून बाहेर पडू शकेन तेव्हाच त्यावर काहीतरी करता येवू शकण्याच्या शक्यतेबाबत सुसंगत विचार करण्याची मानसिकता जोम धरु शकेल बेफिजी.
(हवालदिल)
-सुप्रिया.
बेफिकीर .. तुम्हाला आठवतयं का
बेफिकीर .. तुम्हाला आठवतयं का .. हबा नि आम्ही (आर्यतै, विशालदा,मी,विदिपा ) एक संस्था सुरु केली होती .. नि एक सायकल पण भेट दिली होती एनजीओला .. त्याचा वृतांत आहे माबोवर .. ती सुद्धा याच विषयावर आहे ..
दुर्दैवाने मला काहीच प्रत्यक्ष मदत करता नाही आली .. पण हबाला शोधुन परत सुरुवात करता येईल ..
बेफि़कीरजी, स्नेहालयाच्या
बेफि़कीरजी,
स्नेहालयाच्या कार्यास अतिशय परिणामकारक शब्दांत समाजासमोर
आणल्या बद्द्ल शतशः धन्यवाद!
निशब्द होने म्हनजे काय ते आज
निशब्द होने म्हनजे काय ते आज कळाले.
एक वेगळंच चॅलेंज आहे हे.
एक वेगळंच चॅलेंज आहे हे. शुभेच्छा!
बे फीं नी विचारलय, काय करू
बे फीं नी विचारलय, काय करू शकतो? आपण, काही कार्यक्रम आयोजीत करू शकतो, ज्यात सकारात्मक विचार, थोडेसे मनोरंजन असे काहि असु शकेल.
सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच
सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच पण प्रथम तुम्हाला हाती घेतलेले काम उत्तमरित्या पूर्ण होवो ह्यासाठी शुभेच्छा.
kharch ruday helavun taknar
kharch ruday helavun taknar aahe he sagal, khup vait vatat he sarv vachun , befikirji tumhi kele vyaktichitran mala nehamich bhavat, katha aadhich fulvun sangnyachi tumchi hatoti tyala tod nahi, tumchya likhanala anek shubechha,,,,,,thank you
गुरुजी, एका वेगळ्या क्षेत्रात
गुरुजी, एका वेगळ्या क्षेत्रात काम केल्याबद्दल अभिनंदन
बेफिकीरजी, शोषित योध्याचे
बेफिकीरजी,
शोषित योध्याचे चारही भाग वाचले.
सर्वप्रथम एक आव्हानात्मक सामाजिक उपक्रमात सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! या स्तरातील स्त्रियांशी स्वतः बोलून, त्यांना बोलते करून , त्यांचे विचार ऐकून, शुद्ध भाषेत शब्दबद्ध करणे हे खचितच उल्लेखनीय आहे.
स्वतःच्या उबदार घरट्यात सुरक्षित आणि सु़खात रहात असताना बाहेरच्या जगातील थंडी-वारा-उन्हात त्रस्त असणार्यांच्या जीवनाची ही होरपळ जाणवली. सर्वप्रथम आभार मानावेसे वाटले त्या परमेश्वराचे, आपणा सर्वांस तुलनात्मक दृष्ट्या रॉयल जीवन दिल्याबद्दल.
आपण विस्तृत प्रतिसाद अपेक्षिले आहेत, त्यासंबंधी -
मला असे प्रामाणिकपणे वाटते की समाजातील या घटकासाठी जे काही करावेसे वाटते ते ठरवण्याआधी "स्नेहालय" या संस्थेशी सर्वांची ओळख व्हावी, त्यांचे काय व कसे नियम आहेत, त्यांना सध्या कोणत्या मदतीची अपेक्षा आहे ते आपण आपल्या स्नेहालय बद्दलच्या भागात सविस्तर लिहावे, त्यानंतर आपण मायबोलीकर एकत्रितपणे किंवा वैयक्तिक पातळीवर काय व कसे कार्य करू शकतो यावर चर्चा केली तर ती जास्त फायद्याची ठरेल. उदा. आनंदवनातील मुलांशी पत्रमैत्री हा आशय घेऊनच धागा उघडला व त्याला भरभरून प्रतिसाद मिळाले. त्यानुसार एखादा उपक्रम करण्याचा मानस संस्थेचा असल्यास कळवावा म्हणजे त्यावर कार्यवाही करता येईल.
धन्यवाद
माणूस देव होऊ शकत नाहीच,
माणूस देव होऊ शकत नाहीच, माणूस होणेही जवळपास अशक्यच असते पण निदान माणसातील जनावरपणाची पातळी जरी माणसाने खालावत आणली तरी समाज जगण्यासाठी एक अधिक चांगली जागा होऊ शकेल.>>.+११११
मला असे प्रामाणिकपणे वाटते की समाजातील या घटकासाठी जे काही करावेसे वाटते ते ठरवण्याआधी "स्नेहालय" या संस्थेशी सर्वांची ओळख व्हावी, त्यांचे काय व कसे नियम आहेत, त्यांना सध्या कोणत्या मदतीची अपेक्षा आहे ते आपण आपल्या स्नेहालय बद्दलच्या भागात सविस्तर लिहावे, त्यानंतर आपण मायबोलीकर एकत्रितपणे किंवा वैयक्तिक पातळीवर काय व कसे कार्य करू शकतो यावर चर्चा केली तर ती जास्त फायद्याची ठरेल.>>>+११११
ह्याच्या पुढच्या भागांच्या लिंक्स कृपया द्या . सापडत नाहीयेत
निदान माणसातील जनावरपणाची
निदान माणसातील जनावरपणाची पातळी जरी माणसाने खालावत आणली तरी समाज जगण्यासाठी एक अधिक चांगली जागा होऊ शकेल. >>>> +१
कल्पनेतील सर्व विकृतीच्या पातळ्यांना उलटेपालटे करून सोडणार्या या भीषण घटना रोज आपल्या आसपास घडत आहेत>>>> ह्या विचाराने रात्री झोप लागणार नाही. सुरक्षित कवचामध्ये जगलेल्या माझ्यासारख्या स्त्रियांसाठी हे वाचणे फारच धक्कादायक आहे.
इतक्या धीराच्या आणि एवढे सोसलेल्या स्त्रियांना माझ्यासारख्या कमकुवत स्त्रिया काय मदत करणार?? पण तरीही मदत करायची खूप इच्छा आहे. आम्ही काय करू शकतो??
मला असे प्रामाणिकपणे वाटते की समाजातील या घटकासाठी जे काही करावेसे वाटते ते ठरवण्याआधी "स्नेहालय" या संस्थेशी सर्वांची ओळख व्हावी, त्यांचे काय व कसे नियम आहेत, त्यांना सध्या कोणत्या मदतीची अपेक्षा आहे ते आपण आपल्या स्नेहालय बद्दलच्या भागात सविस्तर लिहावे, त्यानंतर आपण मायबोलीकर एकत्रितपणे किंवा वैयक्तिक पातळीवर काय व कसे कार्य करू शकतो यावर चर्चा केली तर ती जास्त फायद्याची ठरेल.>>> +१
तुमच्या पुस्तकासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!!