म्हणींची ओळख म्हणाल तर आजीमुळेच... म्हणी म्हणजे आजीच हेच समीकरण. तिच्या म्हणी खूपच वेगळ्या असत. बहुधा अनुभवाचे बोल असत असे आता वाटतं.
आजी आणि म्हणी ह्यांचे एक नातंच होतं. हि आजी माझ्या आईची आई.
सरळ असं बोलणंच नाही. जे काही बोलायचं ते म्हणींतून किंवा कोडयात. आमच्या घरी ती शक्यतो रहायची नाही. तिच्या जुन्या समजुतीप्रमाणे, मुलीच्या घरी फार काळ राहु नये, मान जातो. 'जावयाचं घर म्हणजे परक्याचं दार, तिथे राहु नये फार' असे तिचे म्हणणं.
आजी आणि बाबा ह्यांच्यात एक वेगळच नातं होतं. एकीकडे स्वकर्तुत्वावर सगळं मिळवलेला, हुशार जावई म्हणून खरे तर आवडायचा. पण काही बाबतीत बाबांनी आईवर अन्याय केलाय असे तिला वाटे व त्याचा जरासा राग की खंत असे होते. त्याचे असे होते ना, आई एकदम लाडात वाढलेली. पप्पांच्या घरी गोतावळा भारी. समाजसेवेची आवड असल्याने म्हणा किंवा मित्र मंडळीचा ग्रूप मोठा म्हणून सतत कोणी ना कोणी घरी. त्यांची उठबस सतत आईला करावी लागे. त्यातच सासरची कर्मकांडं खूप. हे सर्व लग्नानंतर आईच्या गळ्यात. आईने ते आवडीने केलं/करते सुद्धा पण आजीला हा राग की तिच्या मुलीला कामं खूप पडली. बरं, खाष्ट सासूमुळे त्रास झाला. घरात नोकर नको, सगळी कामं आपणच करायची असा उगाच खाक्या साबांचा. व त्यात पप्पांनी काहीच बदल केला नाही सुरुवातीच्या दिवसात.फक्त काही महिने लग्नाच्या सुरुवातीला बाई ठेवली न्हवती कामाला पण हा राग आजी कायम ठेवूनच... कधीही उल्लेखा झाला की, हो तुझ्या बापाचं म्हणजे, 'बडा घर आणि पोकळ वासा'(( हे रागात आली की ती मला मुद्दामहून सांगायची मग बाबांचा उल्लेख, तुझा बाप असाच व्हायचा).
माझ्या मुलीला त्रास झाला. माझी मुलगी म्हणून चालला संसार तुमचा. नाहितर कोणी दिली असती मुलगी? आधी कधी कधी आडून तर नंतर नंतर आजी सरळ ह्या गोष्टीचा उल्लेख करी पप्पांसमोर... इतक्या वर्षांनंतर बाबांना त्याच काहीच वाटत नसे. ते आधीही आजीला सांगून दमले होते की, आई ठेवतोय ना आता तुमच्या मुलीला सुखात. झाली माझी चूक. पण आजीचे एकच, माझी मुलगीच गुणाची, नाहितर 'संन्यासाने पसरली झोळी, चुकुन दिली लेक त्याची झाली दिवाळी आणि हिची झाली रांगोळी'....
त्यावर आजीला उगाच डिचवायला पप्पा हळूच म्हणत,
तुम्हाला काय माहीती.. 'पदरी पडलं पवित्र झालं'. हि म्हण मोठ्याने म्हणायचे धाडस बाबांमध्ये न्हवतचं अर्थात. आणि खरं तर पुर्णपणे गंमतीने ते म्हणत. आईच्या गुणांचे पप्पांना खरेच कौतुक आहे/होतं पण आजीला कोण सांगणार? आजी मरेपर्यंत पप्पांना हिच एक गोष्ट एकवायची.
अश्यातच आम्ही कधी गावी गेलो आणी आजारी पडलो की आजी आपली चिंतेत. मग आम्ही ठिक होईपर्यंत तिला चिंता. घरी जो कोणी येइल त्याला, बायो.. 'लोकाचं पोर, जीवाला भारी घोर'. त्यावेळी मला कळायचं नाही, की आजी सारखी लोकाचं पोर, लोकाचं पोर असा का उल्लेख करते माझ्याविषयी बोलताना. ती चुकुन लेकीचे पोर म्हणण्याएवजी लोकाचं तर म्हणत नसेल? नंतर खूप मोठेपणी कळले की मुलीची मुलं म्हणजे मोठी जबाबदारी असते ह्या जुन्या आजींना कारण त्यांची गंमतीदार विचारसरणी.
आजीच्या घरी सुद्धा सतत गोतावळा असे. तिच्या हातचं जेवण म्हणून जेवायला आईचा एक लांबचा मावसभाउ यायचा. तो सतत फिरतीवर असायचा. पण मुद्दाम्हून गाडी वळवून गावात जायचा. पण कधी रात्री आला की आजी भराभर काहीतरी बनवायची. आधी काही उरलं असलच तर ते नाही वाढायची. आता पटकन काय होणार तर पिठलं. ताट वाढलं की जेवायचा मनसोक्त. पण नंतर गप्पा मारताना रात्री तक्रार करी, मावशे, पिठलं केलस छान पण पोटाची वाट लागेल.
आजी, लगेच.. तुला मेल्या काहीतरी कारण लागतं, दिवसभार नको ते चरतोस आणि इथे येतोस... उगाच आपलं 'पा** पावट्याचं निमित्त'
कुठेही निघताना आम्हा मुलांच नेहमीच काहितरी बिनसायचं. आमची आपसात भांडणं तरी व्हायची का काहितरी.
आजी वेळेची पक्की. एकदा असच तिला भजनाला जायचं होतं.(तिच्या भाषेत, मंदीर गाठायचं होतं). कधी न्हवे ते मी तयार झाली कारण माझं कोनातरी भावंडाशी भांडण झालेलं. मला त्याच्यांबरोबर रहायचं न्हवतं, आजोबा आपल्या कामात. आई तिच्या मैत्रीणीला भेटायला गेलेली. अचानक माझा देवळात यायचा मूड पाहून, आजीने माझी तयारी सूरु केली. आजी नेहमीच मस्त तयार व्हायची. सुंदर एखादी जरीची साडी, तुकतुकीत गोरा रंगावर छान दिसायची. मग मला कशी ती अवतारात नेणार? अश्यातच घाईत तयार होताना मी बाथरूमच्या दरवाजातच पडले... व दात तुटला. आजी रागात लगेच.. 'आधीच हौस त्यात पडला पाउस'.
शिस्तीवरून आजी कितीही बडबडली तरी आम्ही आपले... 'नळी फुंकली सोना रे, ...... ' असे होतो तिच्याच भाषेत सांगायचे तर.
मुलांच्या खाण्या पिण्याच्या बाबतीत तिचं हेच एक कायम मत, की काही का असेना....
त्यात माझ्या खाण्याच्या आवडी निवडी एकदमच वेगळ्या असं तिचं म्हणणं. आणि माझं म्हणणं सुद्धा हेच की, तुम्ही असं कसं काय खाता? कधी नुसता चिकट गूळ कसा खावु शकता?
त्यावर मी अगदी कायम एकलेली म्हण. काय असेल ओळखा बरं?
--
---
---
---
---
गाढवाला गुळाची चव काय?
(बाबांच्या आईच्या बर्याच खानदेशी म्हणी इथे लिहिल्या तर पेज उडवावं लागेल)
.
.
मस्त लिहिलंय, खानदेशी
मस्त लिहिलंय, खानदेशी म्हणींकरता उघडा की वेगळा धागा कोण अडवतंय
मस्त लिहिलंय, खानदेशी
मस्त लिहिलंय, खानदेशी म्हणींकरता उघडा की वेगळा धागा कोण अडवतंय
>>>>>>>> +१
मस्त लिहिले आहे..
मस्त लिहिले आहे..
मस्त
मस्त
मस्त लिहिलय !!!
मस्त लिहिलय !!!
भारी
भारी
सगळ्या आज्यांच्या मस्त
सगळ्या आज्यांच्या मस्त वेगवेगळ्या म्हणी वाचायला मिळतायत या निमित्ताने.
मस्त!
मस्त!
आजीचे व्यक्तीमत्व, खूप सुंदर
आजीचे व्यक्तीमत्व, खूप सुंदर रेखाटलय.