मराठी भाषा दिन : एक संकल्प
नमस्कार मित्रहो,
आज २७ फेब्रुवारी आणि महाशिवरात्री सुद्धा आजच. ५२ वर्षापूर्वी महाशिवरात्री अशीच नेमकी २७ फेब्रुवारी या दिवशी आली होती आणि नेमका हाच शुभमुहूर्त निवडून अस्मादिकांनी या पृथ्वीतलावर आपले ’पुनरागमन’ केले. या दिवसाला वाढदिवस का म्हटले जाते हे एक गूढ कोडेच आहे आणि हा दिवस साजरा करावा हे आणखी एक जटिल कोडे. या दिवशी ’वाढ’ कशात होते हेच कळेनासं झालंय. वयमानात वाढ होते मात्र जगण्याचा काळ कमी होत जातो. यात हर्षोल्लास करण्यासारखे काय आहे?
वय वाढत जाताना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ’वाढ’ या शब्दाचे संदर्भ देखील बदलत जातात. बालपणी वाढत्या वयासोबत शारीरिक बल आणि बुद्धी वाढत जाते. तरुणपणी वाढत्या वयासोबत चैतन्य आणि विवेकशीलता वाढत जाते मात्र एकदा का तारुण्य ओहोटीला लागलं की मग वाढत्या वयासोबत ’वाढ’ शब्दाचे संदर्भही उलटे पडायला लागतात. मानसन्मान वाढण्याची शक्यता असते; केवळ शक्यता असते खात्री नाहीच. मात्र वाढत्या वयासोबत डोळ्याच्या नंबरमध्ये सततची वाढ, प्राकृतिक विकारामध्ये निरंतर वाढ हे मात्र हमखास असते आणि तरीही आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत ’वाढदिवस’ साजरा करण्याचा आपला उत्साह मात्र यत्किंचितही कमी होत नाही. हे मानवी स्वभावातील एक रहस्यच समजावे लागेल.
आजचा दिवस "मराठी भाषा दिवस" "जागतिक मराठी भाषा दिवस" "मराठी भाषा दिन" म्हणूनही जगभरातील मराठी भाषिकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेऊन मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. या दिवसाचे औचित्य साधून आपणही काहीतरी संकल्प करायला हवा.
आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलन झालेत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून एका वर्षाच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे ठरवले आहे.
शामियान्याच्या भव्यदिव्यतेपेक्षा चर्चात्मक दर्जाची "भव्यदिव्यता" जर प्रकटीत करता आली तर ते कदाचित अधिक प्रभावकारी शेतकरी साहित्य संमेलन ठरू शकेल. या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्यांची प्रचंड गरज भासेल. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची याचना करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. आपण लवकरच यासंदर्भात चर्चा सुरू करू. संघटनात्मक प्रारूप ठरवू, नियमावली बनवू, संस्था नोंदणीसाठी दस्तावेज तयार करू आणि आकारास आणू अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ.
सहकार्याच्या अपेक्षेत...!
आपला नम्र
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गंगाधर मुटे, तुमच्या कार्यास
गंगाधर मुटे,
तुमच्या कार्यास यश लाभो!
१९९० च्या सुमारास जागतिकीकरण बरेच चर्चेत होते. तेव्हा त्यासंबंधी माझ्या एका मित्राशी चर्चा करत होतो. मित्र संगणक अभियंता आहे. शेतकरी वगैरे नाही. बोलण्याच्या ओघात म्हणालो की आपण सगळे ग्लोबलायझेशन म्हणून नाचतोय, पण यात शेतकरी नागवला जाणार आहे. तो सध्याच्या अर्थव्यवस्थेची शेवटली कडी आहे. नव्या आर्थिक समीकरणात त्याच्यासाठी काहीच तरतूद नाही. मित्राने सहमती दर्शवली. पण शेतकऱ्यांसाठी नक्की काय करायला पाहिजे याविषयी आम्ही दोघेही अनभिज्ञ होतो.
यानंतर काही वर्षांतच विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या!
आताही २०+ वर्षांनी आमच्या आकलनात फारसा फरक पडलेला नाही. आम्ही पडलो संगणक बडवणारे शहरी लोकं. तुमची स्थितीही आमच्यासारखीच आहे का? तिच्या संदर्भात ठरवावे की 'शेतकरी साहित्य' हे केवळ साहित्य म्हणूनच असावे की त्यातून शेतकऱ्यास एखादे सर्वांगीण व्यासपीठ मिळावे?
आ.न.,
-गा.पै.
गामा_पैलवान, मला असे वाटते की
गामा_पैलवान,
मला असे वाटते की हे व्यासपिठ केवळ शेतकरी साहित्यापुरतेच मर्यादित असावे.
सर्वांगीण चर्चेसाठी अन्य व्यासपीठ आहेतच.
मात्र साहित्यच तयार होताना असे तयार व्हावे की ते शेतकरी समाजाला/शेती व्यवसायाला दिशा देणारे ठरावे.
गंगाधर मुटे, >> ... साहित्यच
गंगाधर मुटे,
>> ... साहित्यच तयार होताना असे तयार व्हावे की ते शेतकरी समाजाला/शेती व्यवसायाला दिशा देणारे ठरावे.
नव्वदीच्या दशकात शेतकऱ्यांची अधोगती जाणवली होती, पण घाऊक आत्महत्या होतील असं वाटलं नव्हतं. साधारण त्याच धर्तीवर म्हणावंसं वाटतं की शेतकरी साहित्य हे शहरी साहित्यासारखे नसणार हे स्पष्ट आहे, मात्र नक्की स्वरूप ध्यानी येत नाहीये! शे.सा. विकसित होताना पाहायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
शुभेच्छा !
शुभेच्छा !
<< शे.सा. विकसित होताना
<< शे.सा. विकसित होताना पाहायला आवडेल. >>
गामा_पैलवान,
बस कार्य करीत राहावे, एवढेच मला आवडते.
शेतकरी साहित्याची दिशा बदलून टाकण्यासाठी एखादा युगपुरूषच जन्माला यावा लागेल. तेवढ्या अपेक्षा कृपया माझ्याकडून बाळगू नका. आणि मी सुद्धा स्वतःवर कुठल्याच अपेक्षा लादणार नाहीये.
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे
(कूप = कुपण / कुंपण)
मात्र एखादा युगपुरूष-साहित्यकार जन्माला येण्यासाठी पार्श्वभूमी तयार करणे अवघड नाही, ते कुणालाही शक्य आहे. म्हणूनच मलाही शक्य होऊ शकेल.
शुभेच्छा एक विसरुन चालणार
शुभेच्छा
एक विसरुन चालणार नाही की आमच्यासारखा शहरी एखाददोन पिढ्यांमागे "शेतकरीच" होता "गावकरी" होता, अन आमच्यात अजुनही तेव्हांचे काही अंश हाडीमाशी शिल्लक असतिल तर या विषयात सहभाग राहीलच राहील, किमान याची गरज तरी समजुन घेईल.
आज शेती आणि मराठी भाषा या
आज शेती आणि मराठी भाषा या दोन्ही संदर्भात काम करणाऱ्यांची मुले / पुढची पिढी यात राहील का आणि का राहील असे प्रश्न असताना अशा संकल्पासाठी शुभेच्छा गंगाधरजी !
limbutimbuजी, मला शेतकरी विषय
limbutimbuजी,
मला शेतकरी विषय हाताळण्यात आणि त्यासाठी वेळ खर्च करण्यात आनंद मिळतो. म्हणून मी हे काम हाती घेतले आहे.
माझ्यासाठी निवडणुकींच्या राजकारणाचे दरवाजे सताड उघडे असताना आणि माझ्या अनेक बाजू जमेच्या असुनही मी त्यापासून स्वतःला दूर राखत आलो आहे.
यावर्षीच्या लोकसभा उमेदवारासाठी म्हणून माझ्या नावाचीही चर्चा झाली पण मी ते नम्रपणे नाकारले. पुढील विधानसभेसाठी माझ्यासाठी उमेदवार म्हणून आग्रह आणि मोकळे रान असतानाही मी त्या मार्गाने अजिबात जाणार नाहीये. कारण ते काम करताना मला हवा तो आनंद त्यामध्ये मिळणार नाही. असो. याकामात आपले सहकार्य अपेक्शित आहेच.
मुटेजी, शेतीविषयक साहित्य असे
मुटेजी, शेतीविषयक साहित्य असे काही अस्तित्वातच आलेले नाहीये.
येऊनजाउन दादा कोन्डकेंनी त्यान्च्या कोणच्याश्या सिनेमात (चित्रपटात ) "माळ्याच्या मळ्ञामधी कोणं गं उभी"..... या गाण्याद्वारे थोडीफार शेती आणली तितकीच.
अजुनही काही प्रयत्न झाले असतील, पण निखळ शेती/शेतकरी/त्यांचे जीवन याबाबत फारसे कधी वाचल्याचे आठवत नाही/नजरेत आलेले नाही.
हे करताना एक सावधगिरी बाळगायलाच लागेल, ती म्हणजे शेतीविषयक साहित्य लिहायचे म्हणजे ते सरकारी पिकपाण्याच्या माहितीच्या पुस्तिकांप्रमाणेही व्हायला नकोय, पण त्याचबरोबर गेल्या शतकाच्या शेवटच्या पाव भागात आलेल्या "दलित" साहित्याप्रमाणे केवळ शिवीगाळ्/वंचना/दारिदृय यांचे "वास्तव" रुप रेखाटण्याच्या नादात एकसूरीही व्हायला नकोय.
जगाला "खाऊपिऊ" घालणारा शेतकरी/बळीराजा हा यासगळ्यापेक्षा "प्रचंड थोर" ताकदीचा उदार राजा आहे /होता, अन हे वास्तव, तयाच्या जगण्याच्या श्रद्धा / रुढी/परंपरा, अडीअडचणी, सोडविण्याचे मार्ग, बदलत्या परिस्थितीने बदललेले तन्त्र/मन्त्र, बोलिभाषेतील शब्द (अर्थासहित) इत्यादी सगळे सगळे यायला हवय.
पुण्याची पेठी पेशवाई भाषा प्रमाण मानायचि नसेल्/व्याकरण मानायचेच नसेल, तर अन तरीही त्याकरता कुणा "शहरी " लेखकावर त्याचेकडून शहरातल्या चाळीतल्या आपल्या एखाद्या खोलीत बसुन केवळ अन केवळ "इम्याजिनेशन" वर अवलम्बुन लिहिल्या जाणार्या ग्रामिण कथा/कादम्बर्यांवर अवलम्बुन राहून पुन्हा पेठी/पेशवाई मराठी भाषेला अन लेखकान्ना आरोपींच्या पिंजर्यात उभेकरणे हे देखिल अपेक्षित नाही, व तसे न होण्यास ग्रामिण भागातील लेखकान्नाच योग्य ते मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
बरच काही लिहायच असेल, तर आधी बरेच काही वाचलेले देखिल असायला हवे, त्या अनुषंगाने वाचनालयाची वाढ ग्रामिण भागात होणे अपेक्षित आहे.
शालेय पातळीवरच "निबंध" या अत्यंत दुर्लक्षित प्रकारावर लक्ष केंद्रित करुन भविष्यातील लेखक बनविणे गरजेचे राहील.
हा एकुणच पसारा फार मोठा असणार आहे. पण सुरुवात तर व्हायला हवीये.
राजकीय परिस्थितीची मत व्यक्त करण्यावरील दहशतही इथे अडथळा बनू शकते हे विसरुन चालणार नाही.
असो. कालाय तस्मै नमः
limbutimbu, वरचा प्रतिसाद
limbutimbu, वरचा प्रतिसाद पटला. या घडीला तरी आपल्यासारख्या शहरी/निमशहरी लोकांना शे.सा.मध्ये 'काय हवं' त्यापेक्षा 'काय नको' याची अधिक जाण आहे. ती हळूहळू 'काय हवं' याकडे वळवणे हे मुख्य कौशल्य असेल. वाचकांत अभिरूची उत्पन्न करणे हा वेगळाच अनुभव असतो. तो गंगाधर मुट्यांना यथार्थपणे हाताळता यावा म्हणून शुभेच्छा देऊया!
आ.न.,
-गा.पै.
गामा, धन्यवाद. या धाग्याचा
गामा, धन्यवाद.
या धाग्याचा विषय नाही, पण साहित्यावर सुचले म्हणुन मांडतोय... मग ते शेती/शेतकरी साहित्य असो वा अजुन कोणते......
काय होते ना की गेल्या काही वर्षात मिडियाने आमच्या आवडीनिवडीवर इतके राज्य करणे सुरु केलय की आपणही मिडीयाच्या तालानेच "कुत्र माणसाला चावलं तर बातमी होत नाही माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते" असे समजुन तशाच प्रकारच्या लेखनाला/व्यक्तहोण्याला मान्यता देतो.
मिडीयाचा उद्देशच तत्काळ भावना चाळविणारे/उद्दीपित करणारे (राग/लोभ/मोह/द्वेष/मत्सर या बाबी जागृत करणारे म्हणून उद्दीपीत हा शब्द, केवळ दैहिकवासना उद्दिपीत करणे इतकेच नव्हे) व प्रेक्षकांच्या रोजच्या सरळ जीवनापेक्षा काही वेगळे दाखविणे हा हेतू असतो. वृत्तपत्रे निदान आजची उद्यापर्यंत तरी रहातात, मिडीयाच्या बातम्या या त्याक्षणी ऐकल्या जाऊन त्याक्षणीच एकतर कचरा होतात किन्वा डोक्यावर घेतल्या जातात, तर अशा बातम्या डोक्यावर घेतल्या जाण्याकरता मिडिया, व हल्ली मिडियाच्याबरोबरीने वृत्तपत्रे/मासिके वगैरे छापिल माध्यमेही 'त्वरित परिणामाकरता' बाकी परिणामांचा विचारही न करता केवळ अन केवळ प्रेक्षक/वाचकांच्या "भावनांशी खेळत" असतात अन प्रेक्षक्/वाचक बापडे त्यात रन्गुन जाऊन स्वतःची विचारशक्तिही गमावुन बसतो असे माझे मत.
अन त्यामुळेच वर उल्लेख केले तसे गेल्या शतकातील दलित/वंचित साहित्य प्रकारात केवळ अन केवळ दारिद्र्य/दु:ख/दैन्य यांचेच दर्शन होते, जेव्हा की असे दारिद्र्य / दु:ख/वंचना/दैन्य समाजातील बाकी घटकान्नी, खास करुन १९४८ नन्तर (व आधीही) उच्चवर्णीयांन्नी पाहिले/अनुभवलेच नाही असे नाही. पण त्याबद्दल भोगाव्या लागलेल्या दारिद्र्याबद्दल श्यामचि आई वगळता कोणत्याही अन्य कथापुस्तकात पुसटसाही उल्लेख निदान मला तरी सापडला नाही, उलट सापडले ते सर्व होकारात्मक/प्रोत्साहनपर साहित्य होते. अन श्यामची आई या पुस्तकातही त्या दारिद्र्याचे रसभरित "वर्णन" टाळून त्यावर "मात" कशी केली/त्यास तोन्ड कसे दिले याचे सकारात्मक वर्णनावर भर आहे.
हे सगळे सांगण्याचे कारण की शेतीविषयक लिहीताना त्याला केवळ शेतकर्यान्ची दैन्यावस्था/आत्महत्य्या/कर्जबाजारिपणा/व वाताहात याचे "वाचकान्ना हेलावुन सोडणारे व टीपे गाळायला लावणारे" साहित्य तेवढेच आले तर तो देखिल शेतकर्यांवर अन्याय ठरेल, व त्यांचे एकतर्फी दर्शन होईल. शेतीमधे सकारात्मक बाबी अनेक आहेत किम्बहुना बहुसन्ख्येने आहेत, त्या प्रोत्साहनपर पद्धतीने न मान्डता लेखकुन्नी जर मिडियाच्या पद्धती लेखनात हाताळायच्या ठरविले तर शेती हा जगाला तगविणारा म्हणून राहुदेच, स्वतःलाही जगविणारा व्यवसाय नाही असे काहीसे विपरित एकतर्फी चित्र उभे राहील.
शेतीविशयक साहित्य हवेच, तर शेतकर्यांची खरोखरीची पूर्वस्थिती, सद्यस्थिती याचा सर्वगामी आढावा घेणे अपेक्षित राहील. कुळकायद्याचे चान्गले/वाईट परिणामही त्यातुन सुटणार नाहीत, व नन्तर कुटुम्बान्तर्गत वाटे अन त्यामुळे पडणारे तुकडे हे देखिल दुर्लक्षुन चालणार नाही. एकत्र कुटुंब पद्धतीमधे थोरल्या भावाचा १०० टक्के हक्क जाऊन वाटेपद्धत आली, नंतर स्त्रीयांचे लग्नानन्तरचेही माहेरच्या जागेवरचे हक्क आले, या सर्वांचा शेतीवर काय परिणाम झाला हे न बघता तसेच पुढे जाणे ही प्रतारणा ठरेल, स्वतःलाच फसविणे ठरेल.
शहरी/ग्रामिण भारतातील उत्पन्नाच्या शक्यतेमधील जीवघेणी तफावत उद्याच्या शेतीव्यवसायास माणसेच मिळू नयेत इतकी खालावणार नाही ना याचीही दखल या साहित्याला घ्यावी लागेल, व आज शहरी लोकांच्याबाबत कुचेष्टेचा विषय ठरलेले वृद्धाश्रम उद्या गावोगन्ना उभारणे सरकारला भाग पडणार नाही ना याचा आढावा घेणे आवश्यक ठरेल, कारण उत्पन्नाच्या साधनातील/उत्पन्नातील जीवघेण्या तफावतीमुळे आत्ताच गावेच्या गावे ओस पडून शेती करण्यास कोणी मिळत नाही/तयार नाही हे दृष्य डोळे उघडे ठेवले तर गावोगन्ना दिसते. उद्याचे काय?
शेतीविषयक साहित्यात अशा प्रकारे सर्वांगिण पातळ्यांवर नेमके बोट ठेवले गेले तर अन तरच त्यास शेतीविषयक साहित्य म्हणता येईल, अन्यथा मिडियाच्या चटपटीत भावनोत्तेजक बातम्यांप्रमाणे, व वर बातमीचे कुत्रे माणसास चावले तर बातमी होत नाही, माणूस कुत्र्यास चावला तर बातमी होते, केवळ याच बातमी सदृष मुल्याचे व दु:ख/दैन्य/दारिद्र्य/ शिव्याशाप यान्नी नकारात्मकरित्या खच्चून भरलेले वर्गद्वेषी पण नाष्ट्याच्या कॉफी टेबलवर बसुन चहा/कॉफिचे घुटके घेत सुखाने हास्स हुस्स करीत वाचायचे साहित्य तयार होईल जे टाळणे आवश्यक असेल.
असो. पोस्ट फारच लाम्बली बोवा. (ही पोस्ट कुणाला पटॅल अशी अपेक्षा नाही, पटावी अशी तर त्याहुन नाही)
limbutimbu आणि गापै, आपल्या
limbutimbu आणि गापै,
आपल्या वरिल दोन्ही पोस्ट पटल्या. तुमच्या सर्वच मुद्द्यांशी मी सहमत आहे.
limbutimbu आणि गापै. उत्तम
limbutimbu आणि गापै. उत्तम प्रतिसाद.
मुटेजी शुभेच्छा
limbutimbu, थोडक्यात सांगायचं
limbutimbu, थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला विजिगिषु शे.सा. वाचायला आवडेल.
बरोबर?
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद बोबो! आ.न., -गा.पै.
धन्यवाद बोबो!
आ.न.,
-गा.पै.
मुटेजी, बोबो, गामा, धन्यवाद.
मुटेजी, बोबो, गामा, धन्यवाद.
गामा, होय विजिगिषूच!
आजचे वर्तमानात जगत असलेले आपण मानव, हे पिढ्यान्पिढ्यान्च्या विजिगीषू वृत्तीने अपरिमित संकटांवर/विरोधी परिस्थितीवर मात करीत जगलेल्यान्चाच परिपाक (वंशविस्तार) आहे, असे माझे मत.
मी जेव्हा म्हणतो की "आम्ही मिशीला तुप्प लावुन फिरतो" तेव्हा त्यात दारिद्र्याची हिटाई सुद्धा असते, व ती केवळ विजिगीषु प्रवृत्ती ज्याला समजते त्यालाच कळू शकते, कारण जेवायलाखायला आहे की नाही याची वर्णने/विचार करत बसण्या पेक्षा अन जगापुढे रडगाणे गाऊन त्यान्ची फुकटची करमणूक करण्यापेक्षा पुढचा क्षण समाजात प्रतिष्ठेने/ताठ मानेने मस्तीत जगणे असेल, तर मिशिला तुप लावुन जगणेच आवश्यक असे माझे मत. असो, हा या धाग्याचा विषय नाही.
गंगाधर मुटे, तर शे.सा.ची
गंगाधर मुटे,
तर शे.सा.ची पहिली अट अशी की ते विजिगिषु असावे!
हे बरोबर बोललो ना मी?
एकंदरीत भारतीय शेतकऱ्यात विजिगिषा आहेच. हे माझं मत नसून प्रबोधनकार ठाकरे यांचं आहे. अधिक माहितीसाठी त्यांचं शेतकऱ्यांचं स्वराज्य हे पुस्तक इथे आहे : http://www.prabodhankar.com/node/279
वरील पुस्तकाच्या तिसऱ्या पानावरील शेवटल्या परिच्छेदात उपरोक्त मत व्यक्त झालं आहे.
आ.न.,
-गा.पै.
शे.सा.ची पहिली अट अशी की ते
शे.सा.ची पहिली अट अशी की ते विजिगिषु असावे! - अगदी बरोबर
विजिगिषा म्हणजे नेमके काय, शेतकरी साहित्यामध्ये ते कशाप्रकारे अभिव्यक्त करता येऊ शकते, याविषयी स्पष्टपणे भूमिका विषद करावी लागेल.
कृपया याविषयी लिहा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरिल फोटोतही शेतकर्यांच्या चेहर्यावर मला विजिगिषाच दिसत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
गंगाधर मुटे, शेतकऱ्याच्या
गंगाधर मुटे,
शेतकऱ्याच्या संदर्भात विजिगिषा म्हणजे काय हे मला ठाऊक नाही. मात्र शेतकऱ्याने भारतीय समाजाची विजिगिषा जागवलेली पाहायला आवडेल.
ऐन मिरगात आकाशात सुरव्यादेव आग ओकीत असला तरी पेरणी करण्यातच पुरुषार्थ आहे, असं काहीसं वाचल्याचं आठवतं.
आ.न.,
-गा.पै.
गामा_पैलवान, विजिगिषाचा
गामा_पैलवान,
विजिगिषाचा नेमका शब्दश: अर्थ काय असावा?
आईग, गंगाधरजी, किती अवघड
आईग, गंगाधरजी, किती अवघड विचारता हो?
विजिगिषू वृत्ती म्हणजे युयुत्सु वृत्ती... म्हणजे आई सान्गते त्याप्रमाणे " कितीही प्रतिकूलता आली/काहीही गमवावे लागले तरी अंती जिकायचेच - ते प्रयत्न कधीच सोडायचे नाहीत, व प्रयत्नही अन्ग चोरत करायचे नाहीत" अशी प्रवृत्ती.
आता या शब्दांची व्याकरणात्मक फोड जाणकार करतील... मला ते माहित नाही, मी आपला आशययुक्त अर्थाने तो शब्द वापरला आहे.
गंगाधरराव, जिगिषा म्हणजे
गंगाधरराव, जिगिषा म्हणजे जिंकण्याची ईर्षा. वि हे उपपद विशेषत्वे या अर्थी वापरले आहे.
आ.न.,
-गा.पै.
विजिगिषा या शब्दाचा भावार्थ
विजिगिषा या शब्दाचा भावार्थ लक्षात आला.
साहित्य विजिगिषु असावे असे म्हणता येईल पण असावेच असा आग्रह धरणे अवघड वाटते. निदान शेतीसाहित्यात हा शब्दच गैरलागू ठरावा अशी स्थिती आहे.
एखाद्याचे हातपाय बांधून ठेवायचे, जाणिवपूर्वक मुस्कटदाबी करायची आणि मग इतर बलाढ्यांसोबत स्पर्धा करायला सिद्ध करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपण विजिगिषु वृत्ती बाळगण्याचे धडे द्यायला गेलो तर ते अन्यायकारक आणि निरुपयोगाचे ठरेल ना? तसेच काहिसे.
माझा एक शेर आठवतो,
छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे
गंगाधरराव, तुमचा मुद्दा मला
गंगाधरराव,
तुमचा मुद्दा मला पटतो आहे. आता असं बघा की शिवाजीमहाराजांनी शेतकऱ्यांना हाताशी धरलं होतं. त्यांना मारिता मारिता मरेतो झुंजण्याची ऊर्मी दिली.
आज प्रत्यक्षात नसली तरी साहित्यापुरती तरी विजिगिषु वृत्ती दाखवता येईल का? माझा हा प्रश्न बरोबर आहे का?
आ.न.,
-गा.पै.
गामा_पैलवानजी, मुळात
गामा_पैलवानजी,
मुळात शेतकर्याकडे विजिगिषु वृत्ती आहेच. पिढ्यानपिढ्या उद्याच्या चांगल्या दिवसाच्या आशेवर न परवडणारा हातबट्याचा धंदा इमानेइतबारे करत राहाणे, ही त्याची नैसर्गिक स्वभावविशेषतःच झाली आहे.
मी शेतीत गेल्यानंतर दोनच वर्षात "ब्रह्मांड" आठवल्यावर तातडीने शेतीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण शेतीवरचे पोट काढून घ्यायला पुढील दहा वर्षे खर्ची पडली. एकदा शेतीत घुसलं की दलदलीसारखं फसतच जाते. बाहेर पडायचे मार्गही दुष्कर होऊन जातात.
म्हणजे असे की शेती हा विचित्र व्यवसाय झाला आहे. शेती करून जगायला आणि शेती सोडून बाहेर पडायला सुद्धा प्रचंड इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते.
माझी खंत ही की, हे जर समग्र भारतात वर्षानुवर्षे असेच सुरू आहे तर ते वास्तवाच्या अंगाने साहित्यात का उमटले नाही?
विजिगिषु वृत्ती असल्याशिवाय कोणत्याच कार्यात यश लाभ नाही. त्यामुळे विजिगिषु वृत्तीला पर्याय नाही.
"रानमेवा" या काव्यसंग्रहात मी
"रानमेवा" या काव्यसंग्रहात मी भूमिका म्हणून माझे मत मांडले ते थोडक्यात खालीलप्रमाणे;
शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शेतकरी म्हणून जगणे हाच एक ग्रंथ असतो. या ”लाइव्ह" ग्रंथात निसर्गाशी जवळीक, प्राणिमात्रावर प्रेम, बीजांचे अंकुरणे, झाडांचे बहरणे, कळ्यांचे फ़ुलोरणे, फ़ळांचे लदबदणे, धरणीची माया, आभाळाची छाया...... सारं काही असते. त्यासोबतच वेदना, प्रतारणा, शल्य, उबग, उद्वेग, जोष, होश आणि क्षोभ... अगदी सारंच काही असते. फ़क्त एकच गोष्ट नसते आणि ती म्हणजे उसंत. ना जीवनाचा सर्वंकष उपभोग घेण्याची उसंत, ना आपल्या भावना व्यक्त करण्याची उसंत. ना कविता लिहिण्याची उसंत, ना क्षोभ व्यक्त करण्याची उसंत. फ़क्त कष्ट,कष्ट आणि केवळ कष्ट. मग त्या हाडाच्या शेतकर्याने कविता लिहावी तरी कशी? मग माझ्यासारखा थोडीशी संधी मिळताच शेती प्रत्यक्ष कसण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतलेला, शेतीतल्या कष्टापासून मुक्ती मिळविलेला पण शेतीशी थोडीफ़ार नाळ जुळवून ठेवून बर्यापैकी उसंत मिळविलेला शेतकरीपुत्र लेखना-वाचनाच्या, साहित्याच्या जगात “हाडाचा शेतकरी” ठरू लागतो. आणि मग शेती कसण्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीपासून वंचित झालेला माझ्यातला शेतकरीपुत्र; मला दिसलेल्या, जाणवलेल्या, अनुभवलेल्या शेतकर्याला शब्दबद्ध करू लागतो. स्वाभाविकपणे मग शेतकर्याच्या वास्तविक मूळ वेदनांपेक्षा माझ्या कल्पनाविलासातला शेतकरी वरचढ ठरून जातो आणि अंतिमत: शेतकर्याचे मूळ प्रश्न पुरेशा वास्तविकतेने साहित्यात उतरायचे राहूनच जात असावे, असे समजायला बराच वाव आहे.
“कवितेचा शेवट आशादायी असावा, होकारात्मक शेवट नसेल तर ते केवळ रुदन ठरते!” असा सल्ला मला माझ्या मित्रांनी बरेच वेळा दिला, पण मला मात्र तो अमलात आणताच आला नाही. नभ पुन्हा एकदा या भुईला दान देईल, वरूणदेव प्रसन्न होऊन धो-धो पाऊस पडेल, शिवार हिरवेकंच होऊन फ़ळाफ़ुलांनी मोहरून जाईल, सोन्याच्या ताटाला मोत्याची कणसे लागतील आणि मग शेतीची भरभराट होऊन शेतकरी आनंदाने नाचायला लागेल, असे काहीसे सकारात्मक चित्र उभे करणे म्हणजे आशादायी शेवट. पण खरं तर असा शेवट करणे म्हणजे केवळ मनाच्या समाधानासाठी ओढूनताणून केलेले स्वप्नरंजनच असते हे ढळढळीत वास्तव.
शेतात सूर्य, चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असतील तर.... तर शेतकर्याच्या आयुष्यात त्याचे नैराश्य संपून आशादायी चित्र उभे राहणार तरी कसे? मग याला होकारात्मक/आशादायी शेवट म्हणायचा की स्वप्नरंजन म्हणायचे? की होकारात्मक,आशादायी, सकारात्मक असल्या गोंडस शब्दाआडून शेतकरी जीवनाची डोळ्यात केलेली धूळफ़ेक म्हणायची? उत्तर जटील आहे, हे मात्र नक्की.
त्यामुळेच समग्र साहित्याचा तोंडवळा बदलण्याची ऐपत असलेला, वास्तवाचं भान आणि ग्रामीण सुखदु:खाशी नाळ जुळून असलेला, अठराविश्व दारिद्र्यातून सोडवणुकीसाठी करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण असलेला आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रसंगी स्वत:च्या आयुष्याची होळी करून कार्य तडीस नेण्याची जिद्द बाळगणारा, कर्तव्यप्रवीण ‘वैचारीक बैठक’ असलेला प्रतिभाशाली साहित्यिकच शेतकर्याच्या घरात जन्माला आल्याखेरीज साहित्य क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून येईल असे वाटत नाही.
वांगे अमर रहे पुस्तकात
वांगे अमर रहे पुस्तकात "श्याम्याची बिमारी" या लेखातील एक उतारा;
ना. धो. महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्तुंग लोकप्रियता लाभलेली पण श्याम्याला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. आणि भुईला दिलेल्या दानावर नभ अजूनही ठाम व प्रामाणिक आहे म्हणून तर ही सजीवसृष्टी टिकून आहे. देशाची लोकसंख्या चमत्कारिक गतीने वाढत असतानाही सर्वांना पोटभरून खायला पुरेल आणि सडायलाही शिल्लक साठा उरेल एवढे मुबलक अन्नधान्य या देशात पिकते. नभाचे दान आहे म्हणूनच असे घडते ना?
मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. मग समजा नभाने या अतिरिक्त दानाची आराधना स्वीकारली, भरमसाठ उत्पादन आले आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जरी जखडलेत तरी त्याने काय घडणार आहे, असा श्याम्याचा सवाल आहे. कवीने ज्या शेतकरी समाजाच्या भल्यासाठी हे अतिरिक्त दान मागितले, त्या शेतकर्याच्या पदरात काय पडणार आहे? हाच लाखमोलाचा प्रश्न आहे, असे त्याला वाटते.
शेतीमध्ये जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जखडायला लागल्याबरोबर प्रचलित व्यवस्थेनुसार कोणतेही सरकार चांदणे, सूर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टिकोनातून बघणार, अतिरिक्त उत्पादन येऊनही "ग्राहकासाठी शेतमाल स्वस्तात उपलब्ध झाला पाहिजे" या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने निर्यातबंदी लादणार आणि या सूर्य, चंद्र तार्यांना "कांदाभजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपूर व्यवस्था करणार. कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानित किंमतींत सूर्य, चंद्र तारे उपलब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, कचरापेटीत व नालीच्या प्रवाहात सूर्य, चंद्र, तारकांचे ढिगारे साचलेले दिसतील. त्यामुळे मुबलक पिकण्याचे आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र लागण्याचे कवीचे स्वप्न साकार होईल.
पण
ज्या शेतकर्यांसाठी हिरिरीने एवढे मोठे दान मागितले त्याच्या पदरात काय पडणार आहे? शेतात सूर्य, चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर त्याची दरिद्री आहे तशीच राहणार आहे, सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्या ऐवजी कवीने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, विजेच्या लखलखाटाने सरकारचे डोके ठिकाणावर यावे, जेणेकरून शेतकर्यांच्या दारापर्यंत विकाससूर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नसते का ठरले? त्यातल्या त्यात कवी बिगर शेतकरी असता तर श्याम्याची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तूरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभीर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हातात घेतो आणि फेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखील भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
पण श्याम्याला भुरळ पडेल तर तो श्याम्या कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्याच्या घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्यांच्या वेदना विकून मोठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण शेतकर्याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफार थांबावे आणि कवीला (श्याम्याला देखील) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे होऊन शेतकर्याचा घरात आनंदीआनंद नांदावा यासाठी पुढे मग कवीने काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थिती उद्भवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो.