सबको मालूम है मै शराबी नहीं, फिरभी कोई पिलाये तो मै क्या करूं
सिर्फ इक बार नजरोंसे नजरें मिलें, और कसम टूट जाये तो मै क्या करूं
============================
मद्यपींचा प्रामाणिक, अंध व तीव्र तिरस्कार वाटणार्यांनी हा लेख कृपया वाचू नये अशी विनंती आहे.
-'बेफिकीर'!
============================
तू स्वतः बदनाम! तुझ्यामुळे माणूस बदनाम! तुझ्यामुळे कुटुंबाची वाताहात! तुझ्यामुळे प्रकृतीचा नाश! तुझे रूप गूढ! तुझी चव तिरस्करणीय! तुझा गंध नकोसा! तुझा स्पर्श झिणझिण्या आणणारा! तुझी किंमत जो तुला विकत घेतो त्याचे आयुष्य! तुझ्यावर अनेक प्रकारची बंदी! तुझ्यातून सर्वाधिक महसूल! तुझ्यावर अनेक प्रकारची टीका! तुझ्या पायाशी लोळणारे सर्वाधिक! तुझ्यामुळे जीवनातील सर्व प्रकारची दु:खे!
तरी......
........ जीवनातील सर्व सुखे क्षणभर तरी देऊ शकणारी...... फक्त तूच!
यह इंतजार गलत है के शाम होजाये
जो हो सके तो अभी दौरे-जाम होजाये
मुझ जैसे रिंदको भी तुने हश्रमें या रब
बुलालिया है तो कुछ इंतजाम होजाये
=============================
कुणी सव्यापसव्याने झिजवली जानवी त्यांची
मला ब्राह्मण्य आल्यावर नशीले आचमन झाले
सूर, लय, ताल ह्यांचे ज्ञान जन्मतः होते. मराठी गाणी कधी आवडलीच नाहीत. घरातले सर्वजण जमले की आधीच्या पिढीतले लोक कानडा राजा, धुंदी कळ्यांना, रुपेरी वाळूत, देहाची तिजोरी, रामा रघुनंदना ह्या पलीकडे जायचे नाहीत. माझ्या पिढीतले बहुतेक सगळेजण माझ्यापेक्षा मोठे! ते १९६० ते १९७० च्या हिंदी गाण्यांपलीकडे जाणे तुच्छ समजायचे. मला आवडायचा फक्त किशोर! प्यार दिवाना होता है! किशोर कोणीही गायचे नाही. लक्ष्मी रोडवर विजय टॉकीजसमोर चार चार आण्याला 'पिक्चर'च्या गाण्यांची लहान पुस्तके मिळायची. मोठ्या बहिणी 'आज सगळे जमणार आहेत, आपल्याला गाणी म्हणा म्हणतील म्हणून आपण पुस्तक घेऊ चला' असे म्हणून पुस्तके घ्यायची. ती असायची हरियाली और रास्ता, सरस्वती चंद्र, कभी कभी, अजीब दास्ताँ है ये वगैरे! सोबतच आराधना, कटी पतंग, सफर, शोले, अमर अकबर, मुकद्दर का सिकंदर, डॉन, नटवरलाल, लावारिस, शराबी वगैरे पुस्तकेही असायची. पण 'ए नवी नकोत हां' ह्यावर जुन्यांचे एकमत व्हायचे. मतच नसलेला मी चालत चालत त्यांच्यासोबत घरी यायचो. रात्री अडीच वाजेपर्यंत गप्पा व्हायच्या. 'ए तू गाणं म्हण ना, ह्याचा आवाज चांगला आहे हां' असे नेहमीचे प्रकार व्हायचे. खूप इच्छा असूनही गाणे म्हणायला लाजावे लागायचे. कारण गाण्याचे शब्द आणि शब्दांचे अर्थ माहीत नसायचे. दोन्हींत झालेल्या चुकांना अनेकजण चोरून हासतील आणि वरवर 'मी लहान आहे' म्हणून क्षमाशीलता आणि औदार्य दाखवतील ह्याची लाज वाटायची. मग फारच आग्रह झाला की 'अनहोनीको होनी करदे होनीको अनहोनी, एक जगह जब जमा है तीनो, अमर्र, अकबर्र, अॅन्थनी' म्हणून टाकले की झाले.
तुम्हाला कधी अनुभव आला आहे का? फक्त तुम्हाला वाटत असलेल्या भीतीमुळे लहानपणी कित्येकदा तुमचे मन मोडले जाते? वास्तविक तुमचे फार चुकीचे नसते किंवा नसतेच? मला लाज वाटायची किशोर कुमारची गाणी म्हणायची. वाटायचे की सगळे म्हणतील की काय ही हल्लीची फालतू गाणी, न अर्थ न चाल! भीती वाटायची की आपल्याला शब्द माहीत नसताना आपण कडवे कसे म्हणणार ह्याची! आणि मग मन मोडले जायचे. जे काही गायचो त्यावर मोठी भावंडे 'चांगला गाशील, नीट शिकून घे' असा वडीलधारा सल्ला द्यायची आणि ते सर्टिफिकेट मानून मी गरीब चेहरा करून बघत राहायचो. मोठ्यांच्या मोठ्या गप्पा सुरू व्हायच्या. लग्नाला आलेल्या बहिणी दाखवायला आणल्यासारख्या खाली बघून गोड आवाजात 'मैं नदियाँ फिरभी मै प्यासी' वगैरे गात बसायच्या.
कित्येकदा नकारात्मकतेच्या अतिरेकातूनच सकारात्मकता जन्म घेते.
आपण म्हातारे होणार आहोत ह्याचे भान माणसाला कधीही न येणे ही ह्या आयुष्याची एकमेव जादू आहे.
एखादी अप्राप्य लावण्यवती प्रचंड प्रतीक्षेनंतर आपली व्हायला तयार व्हावी आणि तिच्याशी रत झाल्यानंतर समजावे की तिच्याशी रत होण्यातही अर्थ नव्हताच, सच इज लाईफ फॉर मी!
पालकांनी रक्तात ओतलेल्या आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिमेचा, चारित्र्याचा चक्काचूर करून स्वतःच्या प्रतिमेचा अदृष्य ठसा इतरांवर उमटवण्यात एक वेगळी मजा आहे हे समजायला फार फार वाट पाहावी लागली.
व्यक्तिमत्व विकासात मी जगाच्या दहा वर्षे मागे आहे. दहा वर्षांपूर्वी माझ्या मित्रांच्या ज्या इच्छा असत त्या माझ्या आज आहेत. हे मागासलेपण मला इतरांपेक्षा दहा वर्षांनी तरुण करत आहे.
दहा वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणींच्या ज्या इच्छा असत त्या आज त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणींच्या आहेत.
एका ठिकाणी थांबुनी अनुभव प्रवाहाला जरा
कित्येकजण मिळतील जे उद्दिष्टही मानत तुला
तर...... पंकज उधास!
ही व्यक्ती ह्या जगात नसती तर हा लेख काही 'पाडला जाऊ शकला नसता'.
सुट्टीत 'मामाच्या गावाला जाऊ या' प्रमाणे मी सतत बदल्या स्वीकारणार्या माझ्या मामाकडे जायचो ते मामेभावाशी, ज्याच्यावर माझे आत्यंतिक प्रेम आहे त्याच्याशी, काही काळ खेळता यावे म्हणून! आणि एका सुट्टीत मामा अंबरनाथला असताना आणि माझे 'निदान लावल्या गेलेल्या कॅसेट्स ऐकण्याचे इतरांच्या मते' वय असताना त्या क्वार्टरमध्ये पंकज उधासच्या कॅसेट्स लावल्या गेल्या.
मुलायम आवाज, उर्दूमिश्रित हिंदी किंवा हिंदीमिश्रित उर्दूमधील गझला आणि लाईव्ह शो असल्याने शेराशेराला मिळत असलेल्या टाळ्या आणि शिट्ट्या!
प्रचीती वगैरे यावी तसा मी भक्तीभावाने खिळून एक अन् एक शब्द ऐकू लागलो. आजतागायत मला पंकज उधासने गायलेल्या किमान साठ गझला तोंडपाठ आहेत. तेव्हा ऐंशी टक्के गझला समजतच नव्हत्या. शब्दांचे अर्थ मामेभावाला विचारायचो. त्याचे बरेच शिक्षण हिंदीतून झालेले असल्याने आणि कानपूरसारख्या ठिकाणी त्याचे बरीच वर्षे वास्तव्य असल्याने अनेक शब्दांचे अर्थ तो मला सांगू शकायचा, पण पुन्हा भीती वाटायची. त्याला तरी किती शंका विचारायच्या? पण तो पहिला माणूस आहे, ज्याने मला हे सांगितले की उर्दू कवितेमध्ये जो शायर असतो तो स्वतःचे नांव शेवटच्या कडव्यात / शेरात / ओळीत गुंफतो. जान कुर्बान! किती अर्थपूर्ण वाटायच्या त्या ओळी ज्यांना मी आज सहजपणे 'मक्ता' म्हणतो. 'राशिद' तुम आगये हो ना आखिर फरेबमे, कहते ना थे जनाब, जमाना खराब है! नशा हो तो क्या खौफ मरनेका 'आदम', के हम कब्रमेभी गये पीते पीते! आधी ऐकताना राशिद, आदम असे शब्द अडायचे. मग ती नांवे आहेत हे समजल्यावर धमाल येऊ लागली.
'शराब'चे उदात्तीकरण करणार्या गझलांनी त्या आडनिड्या वयात इतके शिकवले की एक मोठ्ठा, खूप मोठ्ठा घटक आपल्यावर झालेल्या संस्कारांपेक्षा खूप वेगळ्या आवडीनिवडी, तत्वज्ञान जोपासत आहे. हे समजण्याचे वय नव्हते की टाळ्या वाजवणारे कदाचित घेतही नसतील, पण हे समजण्याचे वय होते की अजिबात न घेणारेही ह्या विषयाला बेसुमार टाळ्या वाजवत आहेत.
मग काय चांगले आणि काय वाईट हे ठरवण्याचे निकष काय? होत असलेले संस्कार की ऐकत असलेले काव्य?
दिखाऊपणाला भुलण्यात आपण नंबर वन आहोत ह्याचे अजिबातच वैषम्य नाही.
दाखवण्यासारखे काहीच नसल्यामुळे नुसत्याच गप्पा ठोकण्यापेक्षा दाखवण्यासारखे बरेच काही आहे असे दाखवून दाखवू नयेत अश्या गोष्टी दाखवणे काय वाईट?
माझ्यासाठी जग ही 'आहिस्ता आहिस्ता' नग्न होणारी जमात आहे.
पंकज उधासने शराबला दिलेले स्थान माझ्या घरी अमान्य होते. गुणगुणण्याला, गायला मज्जाव नव्हता, अनुयय करायला होता. आणि अगदी खरे सांगू? तेव्हा अनुययही कोणाला करायचा होता? जे कोणीच ऐकलेले नाही ते मी गाऊ वगैरे शकतो हेच खूप मोठे होते. पण त्यातही लज्जा होती. भावाने ऐकले तर? तो तर सरळच म्हणेल की मी ते त्याच्याकडे ऐकले? मग खास माझे असे श्रेय काय? काहीच नाही.
त्याच भावाबरोबर आयुष्यातील पहिली बीअर अर्धी अर्धी अंबरनाथला घेतली. इयत्ता नववी! 'मस्त' वाटले होते हे आजही आठवते.
त्याने सतरांदा आश्चर्य व्यक्त केले, विजूआत्याने तुला इतके धाकात वाढवलेले असताना तू बीअर घेशील असे वाटलेच नव्हते. माझी आई म्हणजे त्याची विजू आत्या!
आईची एकदाही आठवण आली नाही कारण तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता आणि विजूआत्याच्या अनुपस्थितीत माझी जबाबदारी त्याच्यावर होती असे सर्वांचेच गृहीतक होते. तरीही त्याने हे विधान अनेकदा केले आणि मला जाणीव झाली की 'विजूआत्याचा मुलगा' ह्या पलीकडे माझी एक ओळख होत आहे, जी जगाला नकोशी आहे.
आज स्वतःला नकोसे होण्याचा छंद जडलेला असताना मी हवासा झालेलो असणारी कित्येक व्यक्तिमत्वे आहेत.
तेव्हा हवासा होण्याच्या अपेक्षा असताना मला नकोसे होण्यात एक अनोखी मजा असते हे नव्यानेच समजले होते. साल १९८४!
मग काहीच नाही. मग हार्डली घेतली. म्हणजे नाहीच घेतली.
मला माझ्या आयुष्यात भेटलेली भावंडं आणि सोसायटीतील मित्र हे कायम माझ्यापेक्षा बरेच मोठे होते. त्यामुळे 'लहान' असण्याचा शिक्का अजूनही माझ्या चेहर्यावर आहे. माझ्यापेक्षा कोणी लहान भेटले तर त्यांना 'राह दिखानेवाला' होण्याची हिम्मतच होत नाही कारण मलाच मार्ग दर्शवण्याची गरज आहे अशी छाप माझ्या देहबोलीवर कायमची कोरली गेलेली आहे.
कोणत्या सुखाच्या, समाधानाच्या अपेक्षेने सकाळी उठून तुम्ही कार्यरत होता? काल मिळवलेल्या कोणत्या यशाची आज स्तुती व्हावी म्हणून तुम्ही ताठ्यात असता? तुमचे भगीरथ प्रयत्न तुम्हाला कोणत्या दिशेला नेऊन महान ठरवणार आहेत ह्या कल्पनेने तुम्ही रोमांचित होता? कोणत्या किरकोळातील किरकोळ उपलब्धतेवर आपले संपूर्ण लक्ष ठेवून असता?
मुलगा, मुलगी पहिल्या पाचात आली? प्रमोशन मिळाले? पगार वाढला? नवीन वस्तू घेतली? आज कोणीही प्रतिवाद करू शकले नाही? आज सगळ्यांनी स्तुती केली? आज मनाला, शरीराला मस्त वाटले? आज कोणालातरी मस्त वाटवल्यामुळे ते कोणीतरी फार खुष झाले? आज काहीही वावगे घडले नाही? आज जे काही घडले ते पॉझिटिव्ह घडले? डिव्हर्सपर्यंत वेळ आली नाही? डिव्हर्स मिळाला? डिव्हर्सच काय, लग्नच नको होते? गच्चीत तुळस लावली? शाळेची व्हॅन आली तेव्हा पोरगं आधीपासूनच उभं होतं? आज मुलगा नाईट आऊटला गेला? आज मुलगा नाईट आऊटला जाईल असे ठरलेले असताना काही कारणाने 'नाही' गेला? पार्लरची अपॉईंटमेंट मिळाली? एक्स रे मध्ये काहीही निघाले नाही? महान संशोधक ठरता आले? व्यासंगाची वाहवा झाली? शिकाऊ आहे हे सांगण्यातील प्रामाणिकपणामुळे अनुभवींकडून आश्रय मिळाला?
की ......'आजचाही दिवस सरला'?
कोणते सुख? कसले सुख?
एका ग्रहावर प्राणवायू, पाणी आणि सूर्यप्रकाश ह्यांचे उचित 'काँबो' झाल्यामुळे उत्क्रांत झालेलो आपण!
अरे आनंद तरी कश्यातून मिळवायचा ह्याचे प्राधान्य ठरवा?
अर्थात, इच्छा असली तर!
मुझको मयकश समझते है सब बादाकश
क्युंकि उनकी तरह लडखडाता हूं मैं
मेरी रगरगमे नश्शा मुहोब्बतका है
वे समझने ना पाये तो मैं क्या करूं
'कोणीच नसणे ते कोणीतरी असणे' ह्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याने मला नशा दिली. कधी काही कमी पडले नाही. वरवर प्रचंड दु:खी भासत असतानासुद्धा माझ्या आतमध्ये कोणीतरी मोठा विनोद झाल्यासारखा हासत असतो. कसे काय ते माहीत नाही.
तर कॉलेजमध्ये जाईपर्यंत ह्या व्यसनाचे पुन्हा नांवही निघाले नाही. एकदा मात्र असे झाले की तो मामे भाऊ, मी आणि मामे बहिणीचे मिस्टर (म्हणजे मामे भावाचे सख्खे व माझे मामे मेव्हणे) असे तिघे सदाशिव पेठेतून नळस्टॉपकडे आमच्या घरी येत असताना तिघांचे ठरले की एक बीअर प्यावी. प्रत्येकाने दहा दहा रुपये घालून एक बीअर तिघात प्यायली आणि तिघेही घरी आलो. मी व भाऊ झोपून गेलो. आई व बाबाही झोपले. बहिण आणि मेव्हणे जागे होते हे मला माहीतच नव्हते. दुसर्या दिवशी सकाळी बहिण, मेव्हणे आणि मामे भाऊ चहा घेऊन निघून गेले. घरातल्या वातावरणाची मला सूतरामही कल्पना नव्हती. आईच्या चेहर्यावर उग्रपणा आणि संताप तर वडिलांच्या चेहर्यावर निराशा होती. आणि मग मला दमात घेऊन झापण्यात आले. तुझ्याकडे दहा रुपये कुठून आले, बीअरची कल्पना कोणी काढली, बीअर पिताना माझी आठवण आली नाही का, पुन्हा प्यायलीस तर बघ वगैरे! हे सगळे मला नवीनच होते. म्हणजे बीअर पिण्यावर इतका मोठा एपिसोड होईल हे मुळीच नवीन नव्हते, घरी कळेल तर बिनपाण्याने होईल हे व्यवस्थित माहीत होते. पण घरी कळलेले होते हेच माझ्यासाठी नवीन होते. सर्वात शेवटी समजले की रात्री मेव्हण्यांना त्या एक तृतीयांश बीअरने उल्टी वगैरे झाली होती आणि त्यांनी बहिणीला बिनबोभाटपणे सांगितले होते की 'आम्ही बीअर घेतल्याने मला हा त्रास झाला'.
मला धक्काच बसला. म्हणजे आमच्यात सर्वात मोठे जे मेव्हणे होते ते जावई असल्याने म्हणा, स्वतः मिळवत असल्याने म्हणा किंवा जबाबदार असल्याने म्हणा, ह्या शिव्याशापांपासून वाचले होते. प्रत्यक्षात त्यांना हे सुचलेलेच नव्हते की लहान मुलांनी बीअर घेऊ नये असे त्यांनी निदान मला तरी सांगायला हवे होते. मामे भाऊ, जो माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा होता, त्यालाही हे सुचले नव्हते आणि तोही शांतपणे ह्या संतापाला वगैरे बळी न पडता निघून गेलेला होता. आणि जणू काही सगळे काही मी एकट्याने ठरवले आणि ह्या दोघा मोठ्यांनी नुसते त्याचे पालन केले असावे अश्या थाटात मी बोलणी खात होतो. मी मुलगा असल्याने माझ्यावर संस्कार करणे किंवा मला बोलणे हे पालकांचे कर्तव्य होते हे मला आजही मान्य आहे, पण निदान मला असे वाटावे की इतके नाही पण थोडेसे तरी त्या दोघांना बोलले जाऊ शकते इतक्यापुरतेही त्यांना कोणी काहीही बोलले नाही.
लहानपणापासून माझ्या बाबतीत प्रत्येकवेळेला हेच होत आलेले आहे. मोठ्या भावंडांना त्यांचे किंवा माझे पालक काहीही न बोलणे आणि मला मात्र सगळ्यांनी बोलणे! मान्य, की चुका माझ्याही असल्यामुळेच मला बोलत असणार, पण कित्येकदा त्या माझ्यासोबतच दुसर्यांच्याही असायच्याच. पण एखादवेळीही माझे मन जाणून निदान माझ्या बालसमाधानासाठीही दुसर्या कोणाला निव्वळ सोबतीला म्हणूनही बोलले गेलेले नाही आहे. त्यामुळे 'बाकीचे वेगळे आणि आपण वेगळे' ही दरी जी तेव्हा पडली ती अजूनही तशीच आहे व ती माझ्यात आणि माझ्या संपर्कातील प्रत्येक माणसात अदृष्यपणे असतेच. हे फक्त 'वेगळे' असण्याबाबत आहे, श्रेष्ठ कनिष्ठ असे काही नाही, फक्त वेगळे! आपण वेगळे आहोत, इतकेच! ह्यातून आलेला अहं आजही मला पोखरतच राहतो. तो अहं समर्थनीय आहे म्हणून काहीतरी अचाट करत राहण्याची लालसा निर्माण होत राहते. कधीतरी काहीतरी खरंच अचाट होते तर इतर वेळेला काहीतरी हास्यास्पद होते. एकुणात, मी जसा नाहीच आहे तसा मी आहे हे मला व इतरांना पटावे ह्यासाठी अथक परिश्रम करत राहणे हेच जणू जीवितकार्य! हे विषयांतर नव्हे, तेविसाव्या विबासंची तर्कशुद्ध कारणमीमांसा ह्यात दडलेली आहे. हवीय कोणाला ही कारणमीमांसा, असा प्रश्न आपोआप मनात आला असेल तर यापुढचे वाचले नाहीत तरी चालेल असे नम्रपणे सुचवू इच्छितो.
विवाहपूर्व निर्माण झालेल्या संबंधाला विबासं कसे म्हणता येईल? असा प्रश्न मनात असेल तर त्याचे उत्तर हे आहे की लग्नापूर्वी प्रत्येकाच्याच मनात कोणीतरी कधीतरी भरलेले असू शकते. पण लग्न अनेकदा वेगळ्या व्यक्तीशी होते. मग ते लग्नापूर्वीचे माणूस जेव्हा नंतर कधीतरी पुन्हाम, वेगळ्या स्वरुपात भेटते, तेव्हा नकळत मनाची एक अशी नाजूक तार छेडली जाते जिच्या ध्वनीकंपनांवर स्वार होऊन आपण आपले तात्कालीन व्याप क्षणभर विस्मरून आपल्या कोवळ्या तरुणाईच्या काळात पोचतो. अश्यावेळी जर त्या संबंधांच्या मिती व्यापक झाल्या, आवाका वाढला आणि मन बहकले, तर विबासंच म्हणणार ना?
ह्या विबासंचे पाच सहा टप्पे आहेत. विवाहपूर्व टप्पा वर लिहिलाच. त्याचा उरलेला भाग म्हणजे सोसायटीतील काही वरिष्ठ मित्रांसोबत गणेशोत्सवाच्या दरम्यान हलके फुलके बीअरपान करून रात्रभर भटकत राहणे किंवा एखाद्या लांबच्या ढाब्यावर सगळ्यांबरोबर जाऊन अर्धी बीअर (वयानुसार असलेल्या कुवतीत तेवढीच बसायची) आणि चिकन करी, रोटी वगैरे थाट करून परतायचे. तो काळ असा होता की मी 'घेत' असेन हेच घरी माहीत नसल्याने मी घेऊन गेलो तरी कोणाला काही समजायचे नाही आणि मुख्य म्हणजे मी घेऊच इतकीशी शकायचो की त्यापेक्षा जास्त तर लोक दिवसातून कफ सिरप घेत असतील.
लग्नानंतर मात्र एक मोठाच ब्रेक आला ह्यात! एक एक वर्षाच्या पहिल्या तीन नोकर्या, लग्नाची नवी नवलाई, सणवार, तुटपुंजा पगार आणि मुळातच त्या व्यसनाच्या आहारीच गेलेले नसणे ह्या सर्वांमुळे ९२ ते ९५ ह्या काळात मी नगण्य मदिरापान केलेले असेल. जे काय केले त्याबाबत बायकोलाही हरकत नव्हती. मात्र त्यानंतर किर्लोस्कर व नंतर व्हॅममध्ये मिळालेल्या नोकर्यांनी पायरीपायरीने मदिरेला माझ्या आयुष्यात कायम केले.
ऑफीसची पार्टी सहकुटुंब असणे, कधी नुसतेच बॅचलर्स, कधी टारगेट अॅचिव्ह झाले म्हणून, कधी कोणाचे प्रमोशन म्हणून वगैरे करत करत बीअरचा नाद सोडून हार्ड ड्रिंककडे वळलो. मस्त वाटायचे. दिड किंवा दोन ड्रिंक्स घेऊन एकदम हलके फुलके वाटत असे. एरवी जेमतेम तीन पोळ्या खाऊ शकणारा मी ड्रिंक घेतल्यावर तीन तीन तंदुर रोटी आणि वर अर्धा राईस खाऊ शकत असे. त्यावेळी एक मुघल मोनार्च म्हणून व्हिस्की मिळत असे. ही ती पातळी होती, जेव्हा लग्नापूर्वी जिच्यावर भाळलो होतो ती पुन्हा एकदा जणू रस्त्यात दिसली होती आणि ती जवळपासच राहते असे समजले होते.
नंतरच्या नोकरीनिमित्त जसे नीरा, बारामतीला सातत्याने जाणे सुरू झाले तसा मात्र मन रमवण्याचा हुकुमी उपाय जणू मद्यात मिळाला. अजूनही ड्रिंक्स ही गरज नव्हती, पण घेतले तर जाम मजा येते इतपत अवस्था झालेली होती.
कभी मैखानेतक जाते है हम और कमभी पीते है
घटा जुल्फोंकी छाजाये तो बेमौसमभी पीते है
असे झालेले होते.
मग कळू लागले. पावसाळ्यात संध्याकाळी व्हिस्की घेतली की औरच वाटते. जाम थंडीत रम घेतात म्हणे! घेत असताना चिकनचे झणझणीत स्नॅक्स घेतले तर मझा येतो. जो मित्र किंवा सहकारी दिवसभर रटाळ वाटत असतो तो घेत असताना गप्पा मारण्यास उत्तम कंपनी ठरतो हे लक्षात येऊ लागले.
मी आणि माझा एक समवयीन चुलतभाऊ सम'स'वयीनही होतो. आपोआपच १९८८ पासून आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलेलो होतो. आमची लग्नेही एक वर्षाच्याच अंतराने झालेली असल्याने आम्ही चौघेही बरेचदा एन्जॉय करत असू. मी जेव्हा घेतही नसे आणि सिगारेटही ओढत नसे तेव्हापासून तो ते प्रयोग करत होता.
त्यातच माझ्या दोन बेस्ट फ्रेंड्सपैकी एक, जो ब्लूमिंग्टनला (शिकागो) होता तो २००२ मध्ये परत आला. आमच्या चौघांचाही, म्हणजे आम्ही तीन मित्र आणि माझा चुलतभाऊ, कुटुंबकबिल्यासकट एक अतिशय उत्तम ग्रूप तयार झालेला होता. आणि हा शिकागोहून आलेला मित्र आम्हा सर्वांचा 'घेण्यातील' मेंटॉर ठरला. शिवास रीगल, ब्लॅक लेबल ह्यात भारतीय ब्रँड्सच्या तुलनेत नेमके काय चांगले असते, घेताना काय काय खावे, हे सगळे त्याने जणू स्वतःच्या उदाहरणातून शिकवलेच. प्रथमच इतके व इतक्या प्रकारचे स्नॅक्स, त्याच्या पत्नीने व त्याने मन लावून इंतजाम करणे, उत्तमोत्तम ब्रँड्स हे सगळे आम्हाला अत्याकर्षक वाटत असे.
येथवर पोचेपर्यंत 'विबासं' सुरू झालेला नव्हता. वारंवारता वाढलेली असली तरी किरकोळ कुरबूर ह्यापलीकडे माझे आणि पत्नीचे वाद होत नव्हते. तीही ग्रूपचा एक भाग असल्याने तिच्या इतर स्त्री मेंबरांप्रमाणेच एन्जॉय करण्याच्या वेगळ्या प्रायॉरिटीज होत्या. मग त्या ग्रूपमध्ये पहाटे पाच पाच, सहा सहा वाजेपर्यंत गॉसिपिंग, हास्य विनोद, गाणी लावून नाचणे, वादविवाद काय वाट्टेल ते चालायचे.
दृष्ट लागली.
२००३ पर्यंत सगळे सुखाच्या शिखरावर होते. २००४ आणि २००५ ही वर्षे मात्र काहीतरी भलतेच घेऊन आली.
ह्या दोन वर्षांमध्ये कामानिमित्त अनेकदा झोनल ऑफीस मुंबईला असल्याने मुंबईला जाणे होत असे. दोन दोन तीन तीन दिवस तेथे राहात असताना अचानकच डान्स बारशी जानपहचान झाली. स्वतःचीच लाज वाटली. कर्कश्श आवाजाने आणि डोळ्यासमोर लवणार्या तारुण्याच्या झळाळीने इंद्रिये जणू बधीर झाली. लोकांना टीप म्हणून नोटांच्या माळा नृत्यांगनेच्या गळ्यात घालताना पाहून अचंबीत वाटू लागले. फक्त अर्धी क्वार्टर घेणारे आपण, तरी आपल्याशी शेकहँड करताना स्टाफ आपल्याला जणू राजेशाही वागवत आहे ही भावना दडपण आणू लागली. साध्या बारच्या तुलनेत दुप्पट, अडीचपट पैसे आकारणार्या ह्या बार्समध्ये आपण असूच नये असे वाटणेही हळूहळू बंद झाले. ह्याची दोन तीन कारणे होती. मी राहात असे तेथील साधे बार हे जवळजवळ गुत्तेच होते. मुंबईत पुण्यासारखी प्रशस्त व गार्डन वगैरे असलेली हॉटेल्स असतील ही अपेक्षाच चुकीची होती. दुसरे म्हणजे तेथे मला कोणीच पाहणारे नव्हते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, पिताना समोर नृत्य करणारा तरुणींचा तांडा हे काँबिनेशन मनाला सुखवू लागले होते. चारशे रुपयात दोन बीअर आणि शंभर रुपये टीपचे असे पाचशेचे बजेट ठेवून मी तेथे जायचो. दोन तास एका वेगळ्या विश्वास वावरून बाहेर पडायचो तेव्हा आवाजांनी डोके जडावलेले तर असायचेच, पण बाहेर मुंबईचे भीषण आणि बकाल वास्तव आपली घामट मजबूरी माझ्यावर ओतायला तयार असायचे. प्रचंड निराशा व्यापायची मनावर! मग ती घालवण्यासाठी वाईन शॉपमधून आणखी एक बीअर घेऊन राहत्या हॉटेलवर जायचो. ज्या गोष्टीच्या गरजेमुळे त्रास होतो त्या गोष्टीचा त्रास टाळण्यासाठी तीच गोष्ट वापरणे म्हणजे व्यसन! जे मला लागलेले होते.
त्यातच २००४ सालीच चुलतभावाच्या वडिलांनी, माझ्या काकांनी एकदा तो रात्री त्याच्या कंपनीतील पार्टीनंतर घरी परतला तेव्हा दार उघडले व त्यांना वास आला. त्यांनी त्याला बोलण्याऐवजी आमच्या इतर सर्व नातेवाईकांकडे दुसर्या दिवशी प्रत्यक्ष जाऊन सांगितले की भूषणने माझ्या मुलाला बिघडवले आहे. ह्याचा माझ्या आई वडिलांच्या आणि माझ्या मनावर अतिशय परिणाम झाला. ते दोघेही मला बोलले. पुन्हा एकदा, संबंधित जगाने, फक्त मला एकट्याला दोषी ठरवले. तो भाऊ स्वतः माझी माफी मागत होता, पण नाते दुरावलेच. अजूनही आम्ही खूप आनंदाने गेले क्षण स्मरतो, पण जी दरी पडली ती अजूनही तशीच आहे. ह्यात वाईट मी एकटाच ठरलो. ह्याच २००४ साली शिकागोहून आलेल्या मित्राच्या पत्नीचे आणि माझ्या पत्नीचे कशावरून तरी मोठे वाद झाले. आता त्यां दोघींमध्ये पडलेली दरी आम्ही सर्वांनीच बुजवायचा परोपरीने प्रयत्न केला, पण व्यर्थ! शेवटी तो मित्र एकटा आणि बाकी आम्ही चौघे असा ग्रूप फॉर्म झाला. ह्या सर्व घटनाक्रमांची जोरदार चर्चा, वादावादी हे सगळे होत होते मदिरेच्या साक्षीने व सहभागाने! अजूनही मदिरा गरज नव्हती, अपरिहार्य नव्हती पण आवश्यक वाटू लागली होती.
आणि २००५ सालाने मला मृत्यूची चुणूक जवळून दाखवली. झालेला तो अपघात माझ्या व्यक्तिमत्वात कायमस्वरुपी असे सखोल बदल घडवून गेला. मृत्यू केव्हाही येऊ शकतो ही भावना त्या अपघाताने जागृत केलीच, पण एकुण हॉस्पिटलायझेशन, त्यात असलेल्या प्राणांतिक वेदना, सहा महिन्यांसाठी दिनचर्या पूर्णपणे बदलली जाणे ह्यामुळे माझे विचारही बदलले. सर्वांनाच मी वाईट वाटतो हे माझ्या मनावर ठसले. 'असे करू नको व तसे करू नको' अश्या स्वरुपाच्या बंधनांचा इतका अतिरेक झाला की घुसमट होऊ लागली. मी मनाने कमकुवत झालो. बरीच माणसे मला ह्या कालावधीत जणू नव्यानेच समजली. अडीच महिन्यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या पायांवर कोणत्याही आधाराशिवाय उभे राहताना डोळ्यातून घळाघळा पाणी वाहिले. आणि त्यातून बाहेर पडून मी जेव्हा कंपनीच्या कामासाठी आधीसारखा फिरू लागलो...... तेव्हा हा विबासं एक विबासं झाला.......
हाल सुनकर मेरा सहमे सहमे है वो, कोई आया है जुल्फे बिखेरे हुवे
मौत और जिंदगी दोनो हैरान है, दम निकलने न पाये तो मै क्या करूं
एका घनघोर नशेत घालवलेली गेली काही वर्षे अचानकच तुटल्यासारखी संपली होती. संपताना मला बदलवून संपली होती. जीवनाची क्षणभंगुरता, लहानपणी ऐकलेल्या पंकज उधासच्या अर्थपूर्ण गझला, पाठोपाठ ऐकलेल्या गुलाम अलीच्या फिलॉसॉफिकल गझला, सुरेशचंद्र नाडकर्णींचे 'गझल' हे पुस्तक वाचायला मिळणे, काकांनी केलेली बदनामी, किशोर किंवा पंकज उधासची गीते गाताना आता न वाटणारी लाज, आपण दारुडे आहोत असे बहुतांशी परिचयातल्यांनी स्वतःच्याच मनाशी मान्य केलेले असणे, बायकोचा पिण्याला आता होत असलेला कसून विरोध, पिण्यासाठी कारणे काढता यावीत ह्या प्रयत्नांत लागणारे मन आणि प्यायल्यानंतर येणारी तल्लीनता!
ह्या सर्वांनी माझ्यात दोन ठळक बदल घडवले. लहानपणापासून शायरी, सूर, लय, ताल ह्यांच्यावर अतोनात व नैसर्गीकच प्रेम असलेल्या माझ्यातल्या कवीला बोलके बनवले......
...... आणि मला वाईट, बदनाम व चारित्र्यहीन समजणार्या जगाबाबत आणि स्वतःचे भवितव्य, स्वतःची प्रकृती ह्या सर्वांबाबत मला 'बेफिकीर' बनवले.
आता येणारी प्रत्येक संध्याकाळ आशेचा एक किरण घेऊन यायची. कारणे चाचपडण्यात दुपार जायची. होऊ शकणारा विरोध कसा टाळता येईल ह्यावर फिल्डिंग लावण्यावर विचार केला जायचा. सुतोवाच करून ठेवले जायचे. वादावादी व्हायची. तात्पुरते सुधारल्यासारखे वागले जायचे. फ्रिक्वेन्सी किती असावी ह्यावर अॅग्रीमेंट्स व्हायची. क्वाँटिटी किती असावी ह्यावर अर्ग्यूमेंट्स व्हायची. खर्चाची फिकीरच नसायची.
सोबती बदलायचे. कधी हे मित्र, कधी ते! कधी बायको आणि मी दोघेच तर कधी नात्यातलेच कोणीतरी! आजतागायत, ह्या क्षणापर्यंत, कधीही पिऊन लास झालो नाही की तोंडातून नको ते शब्द गेले नाहीत ज्यांना जग अर्वाच्य म्हणते. त्यातच कवितासंग्रह पाठोपाठ प्रकाशित झाले. एक नवीनच वर्तुळ प्रस्थापित झाले. ते सर्व वर्तुळ अट्टल पिणार्यांचेच होते. त्या वर्तुळात माझ्या कविता आवडायला लागल्यामुळे आधीच्या मित्रांबरोबर जाण्याचे प्रमाण आपोआपच घटले व ह्या नवीन वर्तुळात जाण्याचे प्रमाण वाढले.
एक क्वार्टर आता 'यूं' पिऊ शकत होतो. किंबहुना पीतच होतो. जास्तच पीत होतो. हँग ओव्हर म्हणजे काय हे पूर्णपणे समजलेले होते. त्यावरचे उपाय शिकून झालेले होते. आता ड्रिंक्सनंतर खायचे असलेल्या अन्नात किंवा सोबतच्या स्नॅक्समध्ये राम उरलेला नव्हता. आता कंपनीतल्या दोस्तांबरोबर बारामती विभागातील एखाद्या ग्रामीण ढाब्यावर आरामात पीत बसता यावे म्हणून ऑफिशियल ट्रीप्स ठरू लागल्या होत्या. आता दिवसच्या दिवस गझलेच्या नशेत जाऊ लागले होते. आठवड्यातून तीन ते चार संध्याकाळी वारुणीच्या सहवासात जाऊ लागल्या होत्या. घरात आता माझ्यात आणि बायकोमध्ये एक भिंत उभी राहिलेली होती, जिचे नांव होते दारू, शराब, मय!
"ऐ दिल...... चल पीकर झूमे...... इन्ही गलियोंमे झूमे...... तुझे यहीं खोना था...... बदनाम होना था...... हुवा"
मन स्वतःलाच सांगत होते. बदनामी वाढतच चालली होती. बेफिकीरी वाढत चालली होती.
विवाहबाह्य संबंध फक्त दोन 'शरीरांमध्येच' होतात का? 'एक शरीर आणि एक पेय', 'एक शरीर आणि एक गझल' ह्यांच्यात असू शकत नाहीत?
आणि एके दिवशी तो प्रकार घडला. कोणत्यातरी हॉटेलवर मी आणि माझे दोन कवीमित्र बसलेले असताना एकमेकांच्या कविता ऐकत होतो. आणि मी माझी कविता ऐकवताना शेजारच्या टेबलवरूनही काही लोकांनी टाळ्याबिळ्या वाजवल्या. फारच अप्रूप वाटले. आणि नंतर त्याची चक्क सवय झाली. काही ठेवणीतल्या कविता, गझला ह्यांचा शिडकावा केला की आजूबाजूची दहा पाच टेबले सर्व लक्ष आपल्यावरच खिळवतात ह्याचा कोण अभिमान वाटू लागला. ते लोक अगदी येऊन फोन नंबर्स घेऊन जायचे. कित्येकांचे फोन यायचेही. एक दोन ठिकाणी तर कार्यक्रमालाही जावे लागले.
घरात तीन माणसे होती. बायको, आई आणि वडील! तिघेही अनभिज्ञ! आपल्या मुलाला पियक्कडांचे जग झिंग आणणारे पेय समजते ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती.
जरी जाणीव आहे की तसा शालेय आहे मी
जगाला झिंग यावी प्राशुनी ते पेय आहे मी
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी...... स्वतःचे ध्येय आहे मी
ऑर्डरही आता ठरून गेली होती. स्नॅक्सही आणि सिगारेट्सची संख्याही! बारमध्ये जाऊन बसल्यानंतर आता मला काही सांगावे लागतच नव्हते. हडपसरच्या ऑफीसखालीच असलेला बार म्हणजे अक्षरशः माझा अड्डा झालेला होता. मी कधी येतो ह्याची वाट पाहात गिर्हाईके तेथे पीत बसत. मी आल्यानंतर निघणारे थांबत. फर्माईशींवर फर्माईशी झडत. नव्यानेच मला भेटणारे स्तुतीसुमने उधळत. मी स्वतःला खूप काही समजू लागलो होतो. माझ्याकडे आता एक अशी प्रेयसी होती, जी बाकीच्या जगालाही जणू ललचावत होती, भुरळ पाडत होती.
त्या बारमध्ये आधी माझ्या गझला, मग गाण्याच्या भेंड्या आणि शेवटी माझी आवडीची चित्रपट गीते असले प्रकार चालायचे. उर्दू ढंगाचा मयखाना झाला होता तिथे!
त्या पेयसीला एक पवित्र शाप लागला. तो शाप उलटला माझ्यावर! रक्त थुंकत रुग्णालयात दाखल झालो. वेदनांनी तळमळत पुन्हा मरणाच्या समीप पोचलो. व्हेंटिलेटरवर अवलंबून बसलो. तेरा दिवसांचा तो थरार आठवला की हातपाय थरथरतात.
मद्य! माझ्या आयुष्यातून कायमचे हद्दपार करण्यात आले. घेत असलेले औषध व मद्य हे एकमेकांशी रिअॅक्ट होतात व भलतेच काही घडू शकते हे सांगून डॉक्टरांनी मला घेण्यास मज्जाव केला. आणि आजारपणाला तीन महिने उलटून गेल्यानंतर......
...... मी घेऊ लागलो. फरक इतकाच, की आता एकटा घेतो. अगदीच कधीतरी कोणी मित्र असला तर त्याच्यासोबत! अन्यथा एकटाच! कारण शेवटी फक्त घेणे हेच त्या सगळ्या कार्यक्रमाचे जर सबकुछ असेल तर बाकीचा सरंजाम हवा कशाला? कशाला हवेत सोबती, स्नॅक्स, कविता, गझला, गाणी, टाळ्या आणि काय काय! शिकागोवाल्या मित्राला कर्करोग झाला आहे. दुसरा मित्र मध्यंतरी अॅक्यूट डिप्लोपियाने रुग्णालयात दाखल झाला होता. आता बायको वाद घालतच नाही.
आता फक्त इतकेच उरले आहे...... की मी जर स्वतःहून ह्या प्रेयसीचा नाद सोडला...... तर सुटेल!
आता सवय आहे असेही वाटत नाही. आयुष्याचा एक भागच आहे आता तो! आता घ्यायला फार आवडते असेही नाही, घ्यायची म्हणून घेतली जाते. आता काही चुकतंय असेही वाटत नाही, फक्त चुकतंय हे कळतंय असं दाखवतो. आता नशेत असणे आणि नशेत नसणे दोन्ही एकच! तुम्ही अवश्य टीका करा, तुम्हाला ...... पिताच येत नाही तर मी काय करू?
कैसी लत, कैसी चाहत, कहाँकी खता
बेखुदीमे है 'अन्वर' खुदी का नशा
जिंदगी इक नशेके सिवा कुछ नही
तुमको पीना ना आये तो मै क्या करूं
आत्म्यास शांती द्यायला आहेच कोणीही कुठे
प्रत्येक घोटाला तुझ्या मी फक्त तर्पण मानतो
-'बेफिकीर'!
===================================
नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826
जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871
घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000
नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230
दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898
त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193
म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432
माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217
एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399
मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963
जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177
ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976
आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642
शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399
थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो - http://www.maayboli.com/node/34260
तू भार नात्याचा तुझ्या नेलास तेव्हापासुनी
मी एकही ओझे न असण्यालाच दडपण मानतो - http://www.maayboli.com/node/36341
त्या दोन अश्रूंची बचत आहे पुरेशी त्यास ... जो
या राहिलेल्या जीवनाला शुद्ध उधळण मानतो - http://www.maayboli.com/node/39414
मी स्त्री कधी बनलोच तर बदलेन इथली संस्कृती
प्रसवेन त्या मर्दास जो पुल्लिंग वेसण मानतो - http://www.maayboli.com/node/39478
तू भेटली नसतीस तर मी गोठलो असतो पुरा
मुक्कामस्थानी पोचणे आता पदार्पण मानतो - http://www.maayboli.com/node/43059
तडजोड हा पाया इथे प्रत्येक नाते राखतो
हेही कळत नाही मला मी हीच शिकवण मानतो
====================================
-'बेफिकीर'!
मी गेले काही दिवस फक्तं वाईन
मी गेले काही दिवस फक्तं वाईन घेऊन दिवस काढत होतो.......आज वाटतंय पुन्हा एकदा 'तिच्या' मिठीत जावं.....बेफि का वार करता राव्....उदास उदास व्ह्यायला होतं!!!
मनाला भिडणारं सच्चं
मनाला भिडणारं सच्चं लेखन..स्पीचलेस करुन टाकणारं..
खूप प्रामाणिकपणे मांडलं
खूप प्रामाणिकपणे मांडलं आहे हे सगळं. मान्य. पण म्हणूनच प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं की ....
>>> लहानपणापासून माझ्या बाबतीत प्रत्येकवेळेला हेच होत आलेले आहे. मोठ्या भावंडांना त्यांचे किंवा माझे पालक काहीही न बोलणे आणि मला मात्र सगळ्यांनी बोलणे! >>>> या वाक्यात तुमची समस्या आणि तिची उकलही आहे.
जेव्हा तुमच्या कमकुवतपणाला पाठीशी घालण्यासाठी तुम्ही इतरांकडे बोट दाखवणे थांबवाल तेव्हा तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवणे सहज जमेल असे वाटते. 'सगळे मलाच बोलतात' असं जेव्हा वाटतं तेव्हा स्वतःत बदल करण्याची गरज असते - नेहमीच!
सातीलाही अनुमोदन!
क्या बात है बेफिकीर, हे असले
क्या बात है बेफिकीर, हे असले काही लिहावे तर तुम्हीच..
स्वता घेत नाही, ना घेणार्यांना कौतुकाच्या नजरेने बघतो, कित्येकदा किवच वाटते अश्यांची.... आणि तरीही फार आवडले.
मी स्वता माझ्या शैलीत जगतो आणि त्या प्रत्येकाचा आदर आहे जो आपल्या स्वताच्या शैलीत जगतो.
सर्व सहृदय प्रतिसाददात्यांचा
सर्व सहृदय प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
प्रामाणिकपणे लिहलय त्याबद्दल
प्रामाणिकपणे लिहलय त्याबद्दल अभिनंदन, तरीही लेखन वाचून वाटले की तुम्हाला मुक्तांगणमध्ये जाण्याची नितांत गरज आहे. स्वतःसाठी, स्वत:च्या कुटूंबियांच्या भल्यासाठी.
हे कसं काय वाचायचं राहुन गेले
हे कसं काय वाचायचं राहुन गेले ?
अफाट लिहिलय बेफी ___/\___ निव्वळ अप्रतिम
Pages